Thursday, June 24, 2010

मुली नाटक बसवितात

( पात्रे: रोजचीच; वेळ: रोजचीच; स्थळ: रोजचंच. एखाद्या मध्यमवर्गीय घरातील खोली. स्टडीरूमचं वातावरण. पुस्तकं अस्ताव्यस्त पसरलेली. पडदा वर जातो तेव्हां दोन मुली एका पुस्तकावर आपली कातर चालवीत आहेत. त्यांच्यापुढे एक वही, शाईची बाटली व काही पेनं पडली आहेत. )
गीता : ए लता, हे चित्र बघ किती छान आहे. आपल्या नाटकाच्या जाहिरातीसाठी किती मस्त दिसेल नाही? बोल ना, गप्प का आहेस?
लता : चित्र छान आहे, पण मी विचार करतेय की सुमनताई काय म्हणेल. आपण चित्र कापलं खरं, पण ताईचं अभ्यासाचं पुस्तक आहे ते. आपली चांगलीच खरडपट्टी काढेल ती. पण माझी चूक नाही. मी नाही घाबरणार. चित्र तू कापलंस पुस्तकातून.
गीता : (संतापून) ए लतीटले, चित्र मी कापलं म्हणे! सांगितलं कुणी मला चित्र कापायला? तूच ना? नाहीतर मला कुठली एवढी अक्कल? खोटारडी कुठली!
लता : हाच तर प्रॉब्लेम आहे तुझा. स्वत:च्या अकलेवर काहीच करत नाहीस. रोज आपलं दुसर्‍यांनी सांगितलेलं करतेस. साधी गणितं सुद्धा बाबांच्या मदतीने करतेस. म्हणून तर शाळेत रोज छड्या पडतात.
गीता : आणि तू भारी शहाणीच आहेस ना? भूगोलात मार्क नेहमीचेच शून्य. सगळा गृहपाठ आईला विचारून करतेस. मग आणखी काय होणार? आईचा भूगोल नाहीतरी कच्चाच आहे.
लता : तुला ग काय माहीत?
गीता : मागे मी एकदा आईला विचारलं, "आई, ऍमेझॉन नदी कुठल्या शहरातून वहाते?" तर म्हणते कशी की म्हणे हिमालयात कुठेतरी उगम पावून पुण्याच्या वाटेने नंतर मुंबईच्या चौपाटीला येवून मिळते. बाईंनी मला वर्गाबाहेर काढल्यावर कळलं की उत्तर साफ चूक होतं.
लता : एवढी शहाणी बनतेस तर तूच सांग ना काय उत्तर आहे ते.
गीता : ऍमेझोन नदी मुळी हिमालयात उगम पावतच नाही. तिचा उगम पंजाबमधील सह्याद्री पर्वतात होतो. मग ती दिल्लीहून वहात जाऊन नाशिकात गंगेला मिळते.
लता : तुम्हा कुणालाही काही कळत नाही. ऍमेझोन मुळी नदीचं नावच नाही. अमेरिकेतील एका पर्वताचं नाव आहे ते.
गीता : काय अक्कल आहे!
लता : तसं म्हटलं तर बाबांना तरी गणित कुठे येतं? एकदा मी त्याना आमचं काळ, काम, वेगाचं गणित विचारलं. तू पण ऐक. एका हौदात ताशी सहा गॅलन पाणी भरतं, व ताशी पाच गॅलन वेगाने पाणी गळतं. जर त्या हौदात एकूण वीस गॅलन पाणी मावत असेल, तर हौद किती वेळात भरेल? बाबांनी काय उत्तर दिलं असेल सांग.
गीता : मी सांगते, हौद साडे-पाच तासात भरेल.
लता : साफ चूक. बाबांनी मुळी उत्तर दिलंच नाही. विचार करूनकरून थकले आणि शेवटी संतापून म्हणाले की असल्या फुटक्या हौदात आपण पाणी भरणारच नाही. (वेडावून दाखवते.)
गीता : लतीटले, मला वेडावून दाखवतेस? थांब, चांगलीच जिरवते तुझी.
( दोघीजणी एकमेकांच्या झिंज्या ओढून, फ़्रॉक ओढून भांडत असतात, तेवढ्यात बाहेरून त्यांची मोठी बहीण, सुमन, येते. )
सुमन : (ओरडून) ए साळकायांनो-म्हाळकायांनो, चालवलंय काय तुम्ही दोघांनी? आणि माझ्या पुस्तकावर सर्व शाई उपडी केलीत? दुष्ट कुठच्या! सारख्या माझ्या जिवाकर टपलेल्या असता.
( मारामारी थोडा वेळ थांबते. )
लता : ताई, या गीताने किनई .. तुझ्या पुस्तकातील ... तुझ्या पुस्तकातील... (गीताकडॆ वळून) सांगू?
गीता : (वेडावून) सांग, सांग. नी नाही घाबरत. तूच सांगितलंस मला...
सुमन : लता, आधी मला सांग. काय झालं?
लता : हिनं तुझ्या पुस्तकातलं चित्र कापलं.
सुमन : (पुस्तक पहात) बापरे, माझं मराठीचं पुस्तक? (गीताला रपाटा लगावीत) कसला शहाणपणा सुचला ग तुला?
गीता : (मुसमुसत) चूक ह्या लताची व मार मला! येऊं दे बाबांना. सांगतेच त्यांना तुझं नाव. (आत जाते.)
सुमन : (लताला रपाटे लगावीत) आणि माझ्या पुस्तकावर ही शाई कुणी सांडली?
लता : (डोळे पुसत) शाई आमच्या दोघांकडून पडली. आणि मार मात्र मला जास्त!
सुमन : पण तुमचे कसले उद्योग चालले आहेत ते तरी कळूंदे मला.
लता : (उत्साहाने) आम्ही मुली की नाही नाटक बसवतोय. म्हणून जाहिरातीसाठी तुझ्या पुस्तकातील हे रंगीत चित्र कापलं. मस्त आहे ना?
सुमन : मग स्वत:ची पुस्तकं कुठं गेली होती?
लता : आमच्या पुस्तकातली चित्रं कापली असतीं, तर वर्गात बाई ओरडल्या असत्या ना आमच्यावर?
( सुमन लताला मारायला तिच्या अंगावर धावून जाते. लता आत पळते. )
सुमन : कैदाशिणी आहेत नुसत्या! म्हणे नाटक बसवतोय!!
( बाहेरून काही मुली येतात. हातात काही पुस्तके आहेत. )
शोभा : ए सुमन, प्लीज़ आम्हाला मदत करतेस?
सुमन : कसली मदत? नाटक बसवायलाच ना?
सुनिता : (आश्चर्याने) अय्या, तुला कसं ग कळलं आम्ही मुली नाटक बसवतोय ते? रेखा, तू सांगितलंस हिला आपलं सीक्रेट?
रेखा : हॅट, मी कशाला हिला सांगू आपलं सीक्रेट? मी फक्त आईला, विद्याला, सुमित्राला व शरयूला सांगितलं होतं. आणि मी त्यांना ताकीदच दिली होती की कुण्णाला काही सांगायचं नाही म्हणून.
सुमन : आणि कुणाला सांगायची गरजच नव्हती. आता फक्त एफ़. एम. रेडिओवर ही बातमी सांगायचं बाकी आहे. ह्या माझ्या बहिणींनी आताच आपले प्रताप दाखवायला सुरवात केलीय.
ज्यॊति : काय झालं सुमन?
सुमन : (पुस्तक दाखवून) काय होणार? मी तुम्हाला मदत करण्याआधीच ही हालत.
ज्योति : (कौतुकाने) अय्या, किती मस्त कापलंय! शोभा, बघ तरी, कशी मस्तपैकी आकृती तयार झालीय!
शोभा : अय्या, खरंच किती छान दिसतंय. लता वा गीता भारीच बाई हुशार! मागे की नाही एकदा मी माझ्या बहिणीच्या पुस्तकातून चित्र कापायला घेतलं, तर उंदराची आकृती तयार झाली होती. मला नाही बाई, माणूस कापता येत. तुला येतो?
सुमन : काय निर्लज्ज आहात तुम्ही मुली? माझं चांगलं पुस्तक फाडलं त्या चेटकिणींनी, आणि तुम्ही त्यांची स्तुति करताय?
सुनिता : अय्या, चेटकिणी? नाझी ओळख करून दे ना. आई रोज मला भीति दाखवत असते, चेटकिणींच्या हाती देईन म्हणून.
त्याच्याशी एकदा मैत्री झाली की आईचीच चांगली फजीति होईल.
रेखा : (हसून) वेडीच आहेस अगदी! ही सुमन लता आणि गीताला चेटकीण म्हणतेय. त्यांनी तिचं पुस्तक फाडलं ना, म्हणून, लता आणि गीता चेटकिणी.
( आतून लता व गीता तावातावाने बाहेर येतात. )
लता : (रेखाला) मला आणि गीताला चेटकीण म्हणतेस? व तुम्ही कोण, राक्षसीण?
गीता : तू कोण ग आम्हाला चेटकीण म्हणणारी? दीडशहाणीच आहेस. आमच्याच घरी येवून आम्हालाच नावं ठेवतेस? वरून माझ्याच बहिणीची मदत मागतेस? कुणीहि मदत करणार तुम्हाला. चालत्या व्हा आधी.
सुमन : (बहिणींवर रागावून) आधी तुम्हीच आत चालत्या व्हा. रेखा, शोभा, मी करते तुम्हाला मदत. मी बसवते तुमचं नाटक. कोणतं नाटक? कोणतं नाटक करताय तुम्ही?
लता : ताई, खरंच बसवेतस आमचं नाटक? मी पण करणार हं नाटकात काम. ही ज्योति म्हणत होती की मला मुळी नाटकात घेणारच नाही.
ज्योति : मग? नाहीच मुळी घेणार. मराठी नाटकात काम करायला मराठी भाषा आधी नीट यावी लागते. तू तर इंग्रजी शाळेत जातेस.
गीता : पण म्हणून तू चिडवायची गरज नाही. तसं म्हटलं तर या शोभाचं तरी मराठी कुठं चांगलं आहे? तीसुद्धा इंग्रजी शाळेत शिकतेय. आणि लताचं मराठी तिच्यापेक्षा नक्कीच बरं आहे.
लता : शिवाय, मी आधी नाटकात काम सुद्धा केलंय.
सुनिता : लता, खोटं नको हं बोलूस. तू कधी ग नाटकात काम केलंयस?
लता : तुला काय ग माहीत? दिवाळीच्या वेळी झालेल्या "माझा नवरा" या नाटकात मी बायकोच्या मैत्रिणींच्या घोळक्यात होते की?
ही रेखा देखील होती की त्या घोळक्यात.
रेखा : पण त्या नाटकात तुला मुळी संवादच नव्हते. मला एक सबंध वाक्य होतं. सबंध नाटकात तू शेवटपर्यंत गप्पच असतेस.
लता : ते काही नाही, मला नाटकात काम नाही तर या शोभाला देखील काम नाही.
शोभा : (हातातील पुस्तकं नाचवीत) ते काही नाही. ही सगळी नाटकाची पुस्तकं मी माझ्या पॉकेटमनीतून आणली आहेत. मला काम मिळालंच पाहिजे.
गीता : तुला काम नाही मिळणार.
शोभा : मिळणार.
लता : नाही.
ज्योति : होय. मिळालंच पाहिजे.
गीता : तू मध्ये नाक का खुपसतेस?
ज्योति : खुपसणार मी नाक. शोभा माझी जिवलग मैत्रीण आहे. आणि नाटकाची पुस्तकं देखील तिचीच आहेत.
सुमन : ए मुलींनो, उगीच भांडू नका. मी बसवतेय ना तुमचं नाटक? मग आपण असं नाटक करूया की ज्यात सगळ्यांना काम मिळेल. मग तर झालं? तुम्ही एकूण किती मुली आहात?
सुनिता : सगळ्या जणी मिळून आम्ही किनई बाराजणी आहोत.
सुमन : बापरे बाप! बारा मुलींचं नाटक कुठला शहाणा लिहिणार?
सुनिता : ए सुमन, काही झालं तरी सर्वांना काम मिळालच पाहिजे. आणि ... नाटकाची हीरोईन मीच होणार.
ज्यॊति : व्वा ग व्वा! प्रत्येक वेळी तुलाच का ग हीरोईन व्हायचं असतं?
गीता : आणि दर वेळी आम्ही मात्र हीरोईनची मैत्रीण बनायचं वाटतं? ते काही नाही.
लता : आमची ताई नाटक बसवणार म्हणजे मुख्य भूमिका आमच्यापैकीच कुणीतरी करणार.
रेखा : हे बघ लता, तुला किंवा गीताला हीरोईन बनवायचं की नाही ते नंतर ठरवता येईल. पण सुनिताला नक्कीच करायचं नाही हीरॊईन.
शोभा : सुनिता, या वेळेला तू हवं तर हीरोईनची आई हो.
सुनिता : मी कशाला होणार कुणाची आई? तूच हो आई. नाहीतरी तू प्रौढच दिसतेस. तुझी मुलगी शोभेन मी नाटकात.
लता : पक्की स्वार्थी आहे ही सुनिता.
( बाहेरून विद्या, सुमित्रा, शरयू व विदुला येतात. )
शरयू : बरोब्बर बोललीस तू, लता. भयंकर स्वार्थी आहे ही सुनिता. मला नाही बाई आवडत तिचा स्वार्थी स्वभाव. हो की नाही ग विदुला?
विदुला : ए शरयू, तुझी मतं माझ्यावर कशाला लादतेयस? तुला कोण आवडतं किंवा कोण आवडत नाही हे मला कसं कळणार? हॊ की नाही ग विद्या?
विद्या : विदुला, आता तुला कसं कळणार, काय कळणार, कधी कळणार किंवा कळणार सुद्धा नाही हे मला कसं कळणार? हो, मला एवढं मात्र पक्कं माहीत आहे की ही सुनिता पक्की स्वार्थी आहे.
सुमित्रा : हे बघ, उगीच कुणाला नांवं ठेवायची ही तुझी सवय मला नाही बाई आवडत. तिनं काय घोडं मारलं तुझं?
विद्या : परवा किनई मला एक गणित येईना म्हणून कॉपी करायला मी सुनिताकडे तिची वही मागितली. तर म्हणते कशी, "मला स्वत:ला गणितं करायची आहेत".
विदुला : अन त्या दिवशी वर्गात बाईंनी शुद्धलेखन लिहायला दिलं होतं आणि माझ्याकडे पेन नव्हतं, म्हणून मी सुनिताकडे पेन मागितलं. तर म्हणते कशी, "माझ्याकडे एकच पेन आहे." मग येतेच का ही शाळेत दोन पेनं घेतल्याशिवाय? स्वार्थी कुठली!
सुनिता : बरं बरं, निस्वार्थीबाई, तुला कुणी चोंबडेपणा करायला सांगितला?
सुमित्रा : अग, या विदुलाला चोंबडेपणा करायला सांगायला कशाला हवं? स्वभावच आहे तिचा तो. त्या दिवशी काय झालं सांगू?
विदुला : ए, सांगून ठेवते हां, त्या दिवशीची चहाडी केलीस तर मी भलतीच चिडेन. ती गोष्ट कुणाला सांगणार नाही म्हणून माझ्याकडून चांगलं गोष्टींचं पुस्तक मागून नेलंस. आणि आता असा दगा देतेस? नरकांत सुद्धा जागा मिळणार नाही तुला. आणि आता कशाला आलीस माझ्याबरोबर इथे?
सुमित्रा : इथे यायला मी आधीच निघाले होते. तुला सोबत म्हणून नव्हते आले मी. नाटकात काम करायचं आहे म्हणून आले मी.
सुमन : नशीब, नाटक करायचं आहे ते आठवतंय अजून तुम्हाला. नाहीतर तुम्हा मुलींच्या भांडणात नाटक बाजूलाच पडलं. शॊभा, बघू कोणती पुस्तकं आणलीयस तू. (पुस्तके चाळून बघत) "माझी बायकॊ", अय्या, यात तर सगळी पुरुषपात्रं आहेत. हे कशाला आणलंस?
शोभा : मुद्दाम आणला. मला पुरुषाचा पार्ट करायला आवडते. ती राणी मुखर्जी ते ’दिल बोले हडिप्पा’मधे पुरुषाचा रोल केला ती इतकी चिकणी दिसते की मला पण पुरुषपात्र करायचा आहे.
रेखा : आणि म्हणूनच तो पिक्चर इतका फ़्लॉप गेला. मी नाही बाई तयार होणार दाढी-मिशा लावायला.
ज्योति : मी पण नाही बाई पुरुष बनणार. आई म्हणते की मी पुरुषाच्या वेषात अगदी घाणेरडी दिसते... अगदी बाबांसारखी दिसते म्हणे मी.
सुनिता : फार तर त्या नाटकात मी बायकोचा रोल करीन. पण बायको हीरोईन असेल तरच.
शरयू : अडलंय आमचं खेटर! ए लता, एक आरसा दे पाहू हिला. तोंड बघ म्हणावं आरश्यात.
सुमित्रा : मी तयार आहे हं पुरुष व्हायला. पण "माझी बायकॊ" नाटकात नाही. आई नेहमी म्हणत असते की एकूण सगळे नवरे कसाई असतात. मला आपलं बंडू व्हायचंय. दुसरं पुस्तक बघ ह्या गट्ठ्यात.
सुमन : (पुस्तके पहात) "बंडू मारामारी करतो". यात हिचा बंडू आहे. पण या नाटकात एकूण पांचच पात्रे आहेत.
सुमित्रा : हेंच पुस्तक म्हणत होते मी.
विद्या : पण सुमित्राबाई, तुला नवरा व्हायचं नव्हतं ना? या नाटकात बंडू नवराच आहे.
सुमित्रा : चालेल. "माझी बायको" नाटकातला नवरा व्हायचं नाही मला. बंडूचा नवरा झालेलं चालेल मला एकवेळ. केव्हांपासून माझी इच्छा आहे बंडू व्हावं अशी. गेल्या वर्षी शाळेत "बंडू मांजर पकडतो" हे नाटक झालं होतं तेव्हां सुद्धा आधी मी बंडू झाले होते. मग मात्र मला बदललं. बाई म्हणतात कशा, मी बंडूपेक्षा बंडीच जास्त वाटते. सुमन, आपण प्लीज़, हेच नाटक करूया.
लता : पण मिस्टर बंडू, या नाटकात फक्त पाचंच पात्रं आहेत. आणि आपण आहोत तब्बल बारा मुली. मग कसं होणार?
सुनिता : सुमन, "सुशिक्षित सासुरवास" नाटक आहे का बघ. त्यातलं हीरोईनचं काम मला छान जमेल.
सुमन : (पुस्तके पहात) "सुशिक्षित सासुरवास" नाटक नाहीय, पण "अशिक्षित माहेरवास" आहे. अगदी सॉलीड रोल आहे.
गीता : नको, त्या एकता कपूरच्या टीव्ही सिरीयलसारखं असेल काहीतरी. सध्या सगळ्या सासू-सासर्‍यांना टीव्ही वरून रजेवर पाठवलंय तेच बरं आहे.
रेखा : मग आपण त्याचं पुनर्वसन करूया.
शरयू : बिलकुल नको. म्हातारी सासू व्हायला कोण तयार होणार? मी नाही बाबा.
सर्वजण : (एकत्र) मी सुद्धा नाही.
सुमन : मग हे "संत तुकाराम" करूया. यात कुणी म्हातारं नाही.
विदुला (अंगावर झुरळ चढल्यासारखा चेहरा करून) श्शी. असला ऐतिहासिक किंवा पौराणिक प्रकार नको. कसं स्वर्गातून नरकात आल्यासारखं वाटतं.
सुमन : पण बयांनो, हे सामाजिक नाटक आहे, ऐतिहासिक किंवा पौराणिक नव्हे.
शोभा : पण तुकाराम असेलच ना त्यात?
सर्वजणी : हो, तुकाराम नको.
सुमन : नको तर नको, पण तुम्ही अशा किंचाळू नका.
विद्या : त्यापेक्षा एखादं जुनं नाटक करूया का. रांगणेकरांचं "कुलवधू"? माझ्या आजीने केली होती कुलवधूची मुख्य भूमिका. ती करेल मला मदत.
सुमित्रा : आणि आरती ओवाळूया आपण सर्वजणी मिळून या कुलवधूची.
सुमन : शिवाय, "कुलवधू" पुस्तक नाहीच आहे इथं. "घरकूल" आहे. सगळी पुस्तकं संपली. अजून नवीन आणावी लागतील.
शोभा : दे ही पुस्तकं मला. मी बदलून आणते.
गीता : लवकर जा आणि नवीन स्टॉक घेवून ये.
शोभा : आता आणते, पण एक अटीवर. मला नाटकात मोठा रोल मिळाला पाहिजे.
सुमित्रा : आधी जा आणि पुस्तकं बदलून आण. नाटकातच काय, तुला सिनेमात सुद्धा रोल मिळेल.
( सगळ्या मुली तोंडं लपवून हसतात. )
शोभा : कोणती आणूं?
विदुला : "लहान माझी बाहुली" आण. त्यात तुला मेन रोल, म्हणजे बाहुलीचा रोल देवू.
लता : अगदी पंधरा वर्षाची घोडी झालीस तरी बाहूल्यांबरोबर कसली खेळतेस?
विदुला : (ळताचे हात पकडून) तुला कुणी सांगितलं माझं वय पंधरा म्हणून. तूच असशील पंधरा वर्षांची घोडी किंवा गाढवीण.
शोभा : तुम्ही भांडत बसा. तेवढ्यात मी पुस्तकं बदलून आणते. (बाहेर निघून जाते.)
सुमन : तुम्हां पोरींच्या लफड्यात पडून माझं तर डोकं दुखायला लागलं. थोडा वेळ मला जरा शांत बसूं द्या. नाहीतर मी नाही काही तुमचं नाटक वगैरे बसवणार.
रेखा : (नखर्‍यात) ही बायकांची जात म्हणजे भारीच बाई भांडखोर.
शरयू : मग तू कुठल्या जातीची ग?
सुमन : प्लीज़, शांत व्हा. अगदी डोकं खाताय माझं.
सुनिता : अय्या, माणसं कधी डोकं खातात वाटतं?
ज्योति : त्यात काय झालं? बहुतेक तुझा भूगोल कच्चा दिसतोय. आमच्या भूगोलाच्या पुस्तकात लिहीलंय की आफ़्रिकेत माणसं खाणारी जात असते.
शरयू : श्शी. झुरळं खाणार्‍या चीनी माणसांविषयी वाचलंय मी, पण माणसं खाणारी माणसं? छी, कल्पनाच सहन होत नाही.
विद्या : माणसांची नसेल, जनावरांची जात असेल बहुतेक.
सुमन : अग, तुम्ही काय कमी जनावरं आहात का? नाटकाच्या निमित्ताने माझं डोकं खात आहात ते!.
सुमित्रा : आम्ही नव्हतो आलो तुला मस्का लावायला, नाटक बसव, नाटक बसव म्हणून. तुलाच हौस होती ना नाटक बसवायची? मग कबूलच का केलंस? आता भोग आपल्या कर्मांची फळं.
सुमन : हे मला सांगणारी तू कोण ग? तुझ्याच मैत्रिणी आल्या होत्या इकडे माझ्या घरी रडत, नाटक बसव म्हणून माझे पाय धरायला. नाहीतर खूपजण येतात मला मस्का लावायला.
रेखा : सुमन, उगीच थापा नको हं मारूस. पायबीय काही धरले नव्हते तुझे. आणि रडत नव्हतो आलो काही, चांगलं ओरडत आलो होतो
गीता : आणि कोण येत नाही हं तुला मस्का लावायला. कुणी फिरकत सुद्धा नाही इथं.
सुमन : काय ग गीतीटले, वेळोवेळी आपल्या मोठ्या बहिणीचा पाणौउतारा करायची सवयच लागून गेलीय तुला, आं?
ज्योति : जाऊं दे ना सुमन, नाहीतरी ह्या लहान बहिणी म्हणजे अश्याच असतात.
विदुला : अहाहा, काय पण मोठा आव आणते आहे! जणू काही स्वत: मोठी बहीणच लागून राहिलीस. तूसुद्धा जेव्हातेव्हा टाकून बोलत असतेस की आपल्या मोठ्या बहिणीला.
शरयू : हे बघ, सुमनला मस्का लावल्याने नायिकेचं काम तुला मिळेल असं जर तुला वाटत असेल, तर चुकीची कल्पना आहे तुझी. आम्ही तसं कधीच होऊं देणार नाही. सांगून ठेवते. मुख्य काम मलाच मिळायला हवं.
सुमन : अग, पण आधी नाटक कुठलं करायचं ते तरी ठरूंदे. मग ऑडिशन घेवून कोणी कुठली भूमिका करायची ते ठरवता येईल.
सुनिता : हे मात्र सुमनचं खरं आहे. अजून नाटकच निवडलं नाही आपण.
सुमित्रा : आणि ज्या नाटकात आपणा सर्वांना कामं मिळतील असं बारा पात्रांचं नाटक मिळणं फार कठीण आहे.
विद्या : मुद्दाम लिहावं लागेल कुणाला तरी. पण कोण लिहील?
लता : सुमनताई, तूच लिही ना नाटक आमच्या साठी.
सुमन : (थॊडं लाजून) बघते बाई प्रयत्न करून. मात्र जमेल की नाही सांगता येत नाही आत्ताच.
गीता : जमेल हं हिला. उगीच नखरे करतेय.
ज्योति : खरंच सुमन, जमेल तुला. तूंच लिही.
विदुला : पण काही करून नाटक हे बसलंच पाहिजे. नाहीतर ती शोभा लागेल नाटकं करायला.
गीता : म्हणेल, "मी इतका खर्च केला पुस्तकांकरता."
सुनिता : नाहीतरी ती शोभा मोठी भावखावूच. म्हणते कशी, "मी पुस्तकं आणलीत, मलाच हीरोईन बनवा."
सुमित्रा : स्वत:ला नीट मराठी बोलता येत नाही. स्वत: जाते इंग्लीश शाळेत आणि मराठी नाटकात काम करायचंय म्हणे, आणि तेही हीरोईनचं.
लता : अगदी तसंच नाही काही. इंग्रजी शाळेत जाणार्‍या मुली मराठी नाटकात काम करू शकतात. मी सुद्धा केलंय की मराठी नाटकात काम!
रेखा : होना. मग त्यात एक अक्षर देखील बोलायचं नव्हतं तर काय झालं?
लता : म्हणून काय झालं? माझं ठाम मत आहे की इंग्रजी शाळेत जाणार्‍या मुलींना, निदान मला तरी, मराठी नाटकातून काम करायची संधी मिळायलाच हवी. हो की नाही, सुमनताई?
सुमन : जरा गप्प बसाल का? तुम्ही सारखी बडबड करीत राहिलात तर मला नाटक लिहीणं सुचेल तरी कसं?
विद्या : सुमन, मी तुला हवीतर मदत करेन. छानपैकी नाटक लिही की ज्यात एक राजपुत्र असतो, एक राजकन्या असते. एक राक्षस येतो अन राजकन्येला पळवून नेतो. असलंच काहीतरी. म्हणजे आपणा सर्वांना सुंदरसुंदर पोषाख करायला चान्स मिळेल.
सुनिता : मला वाटलंच तू असं काहीतरी मूर्खासारखं बोलशील. अग असल्या नाटकात राजकन्येचा पार्ट एकवेळ मी करेन, पण राक्षसाची भूमिका कोण करेल? तू करशील? निदान शोभून दिसशील हं राक्षस म्हणून.
सुमन : काय कटकट आहे तरी! नाटक लिहायला बसले पण शांतता म्हणून नाही. सारखी बडबड बडबड!!
सुमित्रा : सुमन, आमची बडबड ऐकून तरी तू बंडूचंच नाटक लिही.
विदुला : सारखं बंडूनं झपाटलंय तुला. मघापासून बंडूचा जप लावला आहेस. दुसरं काही सुचतंय की नाही?
सुमन : (आनंदाने) सुचलं. अगदी मस्त कल्पना सुचलीय. तुम्ही जरा शांत राहिलात ना, तर आत्तां लिहून संपवते.
ज्योति : कसली ग कल्पना आली तुला? ऐकूं तरी.
सुमन : नाटकाचं नांव आहे "मुली नाटक बसवितात". आहे की नाही मस्त नाव?
शरयू : (तोंड वाकडं करीत) छी, काय तरी नाव आहे? म्हणे, "मुली नाटक बसवितात"? त्यापेक्षा सिनेमा नाही का काढीत?
रेखा : सुमन, नाव छानच आहे हं. हिला काय कळतंय? आता नाटक छानपैकी लिही म्हणजे झालं.
विद्या : आधी आपलंच नाटक अजून बसत नाहीय. हे कसलं नाटक, "मुली नाटक बसवितात"? त्यापेक्षा मघाशी मी सांगितल्याप्रमाणे राजकन्येचं आणि राजपुत्राचं नाटक लिही. एक असते राजकन्या, ती राजपुत्राला पळवून नेते ... चुकलं, चुकलं... राजपुत्र राजकन्येला पळवून ... चुकलं... राक्षस राजपुत्राला पळवून नेतो... छे, पुन्हा चुकलं... कुणीतरी कुणाला तरी पळवून नेतो... (गोंधळून जाऊन गप्पच बसते.)
सुनिता : (वेडावून) डोकं फिरलंय हिचं. म्हणे राक्षस राजपुत्राला पळवून नेतो. आणि सुटका कोण करणार, राजकन्या? अक्कल आहे का?
विद्या : तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे.
सुमन : (कंटाळून) हे बघा, मला तुमचं नाटक लिहायचं नाही आणि बसवायचं सुद्धा नाही. तुम्हीं काय ते करा आणि आपापली डोकी फोडून घ्या. माझं डोकं खाणं बंद करा.
( शोभा बाहेरून काही पुस्तके घेवून प्रवेश करते. )
शोभा : कोण लिहीतेय नाटक?
गीता : सुमनताई.
शोभा : स्वत:च नाटक लिहायचं होतं तर मला कशाला पाठवलं पुस्तकं आणायला? नसता त्रास मला!
सुमित्रा : त्रास म्हणजे काय? स्वत:च्या स्वार्थासाठीच करतेयस ना सगळं? नाटकात काम हवंय न्हणून तर चाललीय ना ही धडपड?
शोभा : ए चोंबड्ये, तुला नव्हतं कुणी विचारलं, कळलं?
सुमित्रा : कळलं. आणि तुला नव्हतं कुणी सांगितलं, समजलं?
शोभा : फार तोरा दाखवताय ना? मी निघूनच जाते कशी माझी पुस्तकं घेवून. मग करत बसा आपली नाटकं.
( रागाच्या भरात शोभा हातातली पुस्तकं टेबलावर आपटते आणि तडातडा पाय आपटीत निघून जाअते. काही मुली तिला थांबवायचा प्रयत्न करतात. )
शरयू : कमाल केलीस सुमित्रा. आता आपण नाटक कसं बसवणार? पुस्तकं कोण देणार आपल्याला?
सुमित्रा : (टेबलावरची पुस्तकं गोळा करीत) त्याची नको काळजी. शोभाने केलीय सारी व्यवस्था.
रेखा : अरे व्वा! शोभा इथंच पुस्तकं विसरून गेली, आता आपण आरामसे नाटक बसवूया.
( त्याचवेळी शोभा पाय आपटीत परत येते व सुमित्राच्या हातातील पुस्तकं खेचून काढते. )
शोभा : तुम्ही बसवाल नाटक, पण मी बरी बसवूं देईन. (सगळ्यांना जीभ दाखवत तडातडा निघून जाते.)
सुमित्रा : काय ज्वालामुखी आहे ही पोरगी! गेली खड्ड्यात. सुमन, तूंच लिही आमचं नाटक.
सुमन : माझ्या मनातला ज्वालामुखी देखील बाहेर यायचीच वाट पहातोय. आधी चालत्या व्हा इथून. जा म्हणते ना?
( लता व गीता सोडून इतर सर्व मुली बाहेर पळून जातात. )
लता : ए ताईटले, कां ग नाही बसवत आम्हां मुलींच नाटक?
सुमन : कारण मुली फक्त माझं डोकं खातात. आणि म्हणे "मुली नाटक बसवितात".

( तिन्ही मुली एकमेकांवर ओरडत असतानाच पडदा पडायला सुरवात होते. )

No comments:

Post a Comment