( पददा वर जातो तेव्हा खोलीभर सगळा पसारा पडलेला आहे. एका खुर्चीवर बसून मास्तर डुलक्या देत आहेत. त्यांच्याजवळच बसलेला बंडू मोठमोठ्याने वाचीत आहे. )
बंडू : (पुस्तकातून वाचीत) या अवशेषांवरून त्या काळातील शेती, व्यापार आणि हस्तकला प्रसिद्ध होती असा नि...नि...निष्कर्ष निघतो. कुंभार, विणकर, सुतार, गवंडी, कोळी, सोनार, मूर्तिकार वगैरे अनेक कारागिरांचे व्यवसाय भरभराटीस आले होते. त्या काळच्या लोकांना नौकांचा वापर माहीत नसावा. (कंटाळून झोपा काढत असलेल्या मास्तरांकडे पाहून मोठ्याने ---) शेतीसाठी बैल किंवा मास्तर (जीभ चावून) मास्तर नाही. शेतीसाठी बैल किंवा गाढव यांचा ते उपयोग करीत असत. (अजून मोठ्याने) शेतीसाठी बैल किंवा गाढव... किंवा घोडा, उंदीर, मांजर यांचा उपयोग केला जाई. (मास्तरांच्या अगदी जवळ जाऊन) शेतीसाठी बैल किंवा गाढव यांचा ते उपयोग करीत... उपयोग करीत... करीत.
( या आवाजाने दचकून मास्तर खडबडून जागे होतात. )
मास्तर : काय बंडोपंत, झाला का अभ्यास?
बंडू : (हलकेच) काय मास्तर, झाली का झोप?
मास्तर : (दचकून) काही म्हणालास?
बंडू : काही नाही. मी म्हणालो की ते बैल किंवा गाढवाचा अभ्यास ... चुकलो, शेतीसाठी ते बैल किंवा गाढवाचा उपयोग करीत.
मास्तर : शाबास! असंच चालू दे.
बंडू : सर, काय चालू दे?
मास्तर : अभ्यासाबद्दल म्हणतोय मी. अभ्यास चालूं दे, गाढवा. मी जरा शेजारी जाऊन त्या सुभाषला शिकवून येतो. तोपर्यंत मी दिलेला गणिताचा अभ्यास करून ठेव. (बाहेर जातात आणि लगेच परत येतात.) आधी ते भूगोलाचे प्रश्न सोडवून ठेव. (घाईघाईने बाहेर जातात. बंडू वैतागून कपाळावर हात मारणार तेवढ्यात परत आत येत) आणि त्याआधी तो इतिहासाचा गृहपाठ संपव.
बंडू : सर, आधी कुठला अभ्यास करू ते आधी नक्की सांगा. म्हणजे नंतर तुमचा गोंधळ नको.
मास्तर : (बंडूचे कान धरून) गाढवा, मास्तरांची चेष्टा करतोस? आपल्या गुरूजनांशी कसे वागावे हे विसरलास वाटते?
बंडू : नाही गुरुजी. चांगलेच लक्षात आहे मजला. (मास्तरांची नक्कल करीत) गुरूजनांनी सांगितलेला अभ्यास वेळेवर करायला हवा. माहित आहे ना तुजला? (नीटपणे) माहीत आहे. (मास्तर बाहेर निघून जातात. बंडू वैतागून पुस्तक आपटतो.) शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या सगळ्या किल्ल्यांची नावे सांगा. शिवाजी महाराजांच्या आईवडिलांची नावें सांगा. त्यांच्या गुरूंचं नाव सांगा. च्यायला! सगळ्या उत्तरांचा गोंधळच होतो. आणि का नाही होणार? सगळे प्रश्न आमच्या जन्माआधीचे. अरे, मला माझ्या स्वत:च्या मामा-मामींचं नाव नाही आठवत. शिवाजीच्या कुटुंबातल्या लोकांची नावं कुठून लक्षात ठेवणार? भरीस भर म्हणून ह्या नवीन गणिताचे आकडे आमचं डोकं खातात, शिवाजीच्या किल्ल्यांची संख्या लक्षात कशी रहाणार? एवढी साधी गोष्ट न समजणारे आमचे शाळेतील शिक्षक -- ते आम्हां मुलांना काय शिकवणार कप्पाळ?
( तेवढ्यात बाहेरून राजू हाका मारीत येतो. )
राजू : बंडू, ए बंड्या, अरे या प्रश्नाचं उत्तर काय असेल?
बंडू : कुठला प्रश्न?
राजू : हा बघ. ग्रेट ब्रिटनच्या हवामानाबद्दल सविस्तरपणे सांगा.
बंडू : वैताग आहे नुसता! आता या ग्रेट ब्रिटनशी आपला काय संबंध? आपल्याकडे पेट्रोलचा सांठा नाही. खिशात डॉलर आणि पौंड नाहीत. आणि त्यातून सारखे-सारखे या विमान कंपन्याचे संप. जिथं जायची स्वप्नंसुद्धा पहाणं शक्य नाही तिथल्या हवामानाविषयी जाणून आपल्याला काय माती खायचीय?
राजू : शिवाय नुसती हवा खायला थेट ग्रेट ब्रिटनला कशाला जायला हवं? आपलं माथेरान व लोणावळा काय वाईट आहेत? कधी बाबांना लॉटरी लागलीच तर फार तर ऊटी किंवा नैनीतालला जाऊं. आपल्या इथं हवा खाण्यावर आणि भाषणं ऐकण्यावर बंदी कुठे आहे?
बंडू : हो ना. आणि निवडणुकींच्या दिवसांत तर चोहीकडे भाषणंच भाषणं. ऐकून आपले कान दुखतील, पण बोलणार्यांची तोंडे दुखणार नाहीत.
राजू : शिवाय या शिक्षकांना उत्तरं येत नाहीत तेव्हा आपली गाईड्स आपल्याकडून मागून घेतात व उत्तरं आपल्याला लिहायला सांगतात. आणि आम्हाला उत्तरं नाही आली की सर्व पापड आपल्याच डोक्यावर फोडतात.
बंडू : ए, त्याला पापड फोडणं म्हणत नाहीत. त्याला म्हणतात खापर फोडणं.
राजू : तुला कळलं ना मला काय म्हणायचं होतं ते. मग झालं. पण जे काही फोडतात ते आपल्याच डोक्यावर फोडतात ना? म्हणजे त्रास आपल्याच डोक्याला. ते का म्हणून?
बंडू : खरं सांगू राजू. हा प्रश्न माझ्या मनात बरेच दिवस घोकत होता.
राजू : त्याला "घोकत" नाही म्हणत, घोळत असतो, असं म्हणतात. कळलं?
बंडू : तुला कळलं ना मला काय म्हणायचं होतं ते? मग झालं. (टेबलावरचं वर्तमानपत्र उचलून राजूला दाखवतो.) राजू, हे बघ.
राजू : या सिनेमाच्या जाहिरातीत काय आहे बघण्यासारखं?
बंडू : सिनेमाशिवाय दुसरं काही दिसतं की नाही तुला? ही बातमी वाच. कामगार संघाने केलेला संप शंभर टक्के यशस्वी. यूनीयनने मांडलेल्या सगळ्या मागण्या मालकांनी मान्य केल्या. नाहीतर कंपनी बंद करण्याची धमकी दिली होती कामगारांनी.
राजू : या बातमीत नवीन काय आहे वाचण्यासारखं? या अश्या बातम्या तर रोजच येत असतात. आज दुकानं बंद. उद्या मुंबई बंद शंभर टक्के यशस्वी. परवा महाराष्ट्र बंद. तर तेरवा भारत बंद. नेहमीचंच झालं ते.
बंडू : अरे शहाण्या, तेच तर म्हणतोय मी. या सगळ्या बंदांवर कुणीच बंदी घालत नाहीत. अजूनही तुझ्या डोक्याची ट्यूबलाईट पेटत नाही?
राजू : नाही बुवा, माझ्या डोक्यात अजून प्रकाश पडलेला नाही.
बंडू : अरे, "शाळा बंद" ची बातमी वाचलीयस कधी पेपरात? आता समज, आपण जर संप केला तर?
राजू : हो, आपण संप केला तर? आं, आपण संप कसा करणार? आपण काय कुठे नोकरी करतॊ की गिरणीतील कामगार आहोत?
बंडू : अरे माझ्या राजा, आपण नोकरी करत नाही किंवा कामगार सुद्धा नाही आहोत गिरणीतले. पण आपण शाळेत तर जातो. शिंकायला नव्हे, तर शिकायला. विद्यार्थ्यांमुळे तर शाळा चालतात. आता या शाळा नावाच्या आरोपीनं आम्हां विद्यार्थ्यांवर अन्याय केला तर संपाचं वारं आपल्या अंगात नको शिरायला?
राजू : खरं बोलतोयस तू. संपाचं वारं आपल्यात का शिरू नये? सध्या संपाचं वारं आमच्या स्वयंपाकघरात देखील शिरलंय. गेले पंधरा दिवस आमचे चिंतोपंत स्वयंपाकी संपावर आहेत. त्यांचं सुद्धा यूनियन निघालंय ना? जेव्हांतेव्हां "चूल बंद, चूल बंद"च्या घोषणा चालू असतात.
बंडू : हे बघ, त्या स्वयंपाकी यूनियनला घाल चुलीत. आधी आपल्या संपाचं काय ते ठरवूया.
( त्याच वेळी सुरेश आत येतो. )
सुरेश : बंड्या, तुझा गृहपाठ झाला तर मला जरा मदत कर ना. हा अभ्यास बघ किती कठीण आहे. काहीच समजत नाही.
बंडू : मग नको करूस अभ्यास.
सुरेश : कसं शक्य आहे ते?
बंडू : त्याचीच तयारी चाललीय.
सुरेश : म्हणजे नक्की काय चाललंय?
बंडू : शिक्षकांविरुद्ध बंड पुकारणार आहोत आपण. शाळेत जाऊन रोज आपल्याला मार खावा लागतो. त्यात शिक्षकांचे धडे आपल्या डोक्यावरून bouncers जातात. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आली नाहीत म्हणून परत पाठीवर वळ उठतात.
राजू : हा अन्याय दूर झालाच पाहिजे.
सुरेश : राजू, तु फिल्मी आहेस हे मला माहीत होतं. पण हे लोकमान्य टिळकांचं ज़बरदस्त भाषण कुठल्या नाटकातून पाठ करून आलास?
राजू : फुकटची भाषणं पाठ करायला आपण काही मंत्री नाही. मला सांग सुरेश, तुला राग येत नाही?
सुरेश : राग येतो ना. (थांबून) पण कसला राग?
राजू : शाळेत रोज आपल्याला उगीच मार खावा लागतो त्याचा?
सुरेश : येतो रे, पण काय करू शकतो आपण?
बंडू : संप करू शकतो आपण. नाही, करूयाच आपण संप. शाळेविरुद्ध. शाळेसमोरून मोठा मोर्चा नेऊया. आणि जोरजोराने घोषणा देऊया. अशा (मोठ्याने) शाळा मुर्दाबाद! (शांत!) सगळे शिक्षक मुर्दाबाद!! (शांत!!) शिक्षकांनी मुलांवर केलेले अन्याय (शांत!!!) दूर करा. (शांत!!!!) सुरेश, तुला ओरडता येत नाही?
सुरेश : (ओशाळून) ओरडतां येतं रे. पण काय करणार? माझे बाबा मुख्याध्यापक आहेत ना... म्हणून.
राजू : हरकत नाही. आम्हीं सारे ओरडू, तू फक्त ओरडल्याची ऍक्शन कर. मी शिकवेन तुला ऍक्टींग करायला. निदान तुला पटतोय ना आमचा मुद्दा? मग झालं तर. तू जा आणि आपल्या मित्रांना गोळा कर.
( सुरेश जायला निघतो, व जाताजाता अचानक थांबतो. )
सुरेश : धम्माल येईल ना. जेव्हा आपण शाळेसमोरून ओरडत जाऊं तेव्हा सर्व शिक्षक कसे आश्चर्याने बघत राहतील आपल्याकडे.
बंडू : हो तुझे मुख्याध्यापक बाबा सुद्धा बघत रहातील. पण तू घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी.
सुरेश : (घाबरून) माझ्या पाठीशी असणार तुम्ही? आणि मी फक्त पुढे?
बंडू : तसं नाही बाबा म्हणायचं मला. तू आधी जा आणि सर्व मित्रांना गोळा कर. मुख्याध्यापकांचा मुलगा आपल्या चळवळीत सामील झाला आहे म्हटल्यावर कशी गरमी चढेल आपल्या चळवळीला, विचार कर नुसता!
सुरेश : (स्वत:शीच) हो, नुसत्या विचारानेच घाम सुटलाय मला. (जायला निघतॊ. तेवढ्यात बंडू त्याला थांबवतो.)
बंडू : सुरेश, थांब. आपण सगळेच एकत्र जाऊ.
( सगळेजण बाहेर जातात. काही वेळाने बंडूचे बाबा प्रवेश करतात. )
बाबा : बापरे बाप! काय हा पसारा! आता आमचे साहेब आले म्हणजे काय म्हणतील? (हाका मारीत) बंडू, अरे बंड्या. अरेच्चा, हा गेला तरी कुठे? बंड्या, बंडूबाळा, ए बंडोबा... छे, कुठेतरी बाहेर गेलेले दिसतात चिरंजीव! चला, शेवटी मलाच हे सगळं आवरणं
भाग पडलं. (सामान आवरीत) हे आमचे साहेब म्हणजे अगदी साहेबच आहेत. आता दार न वाजवता आत येतील अन चक्क म्हणतील, "अगदी वैताग आला बुवा! जरा मस्तपैकी चहा आणा बघू." (तेवढ्यात दार धाडकन उघडते आणि साहेब आत येतात.) साहेब, आलात तुम्ही? या बसा.
साहेब : (खुर्चीवर बसत) अगदी वैताग आला बुवा! जरा मस्तपैकी चहा आणा बघूं.
बाबा : साहेब, तुम्ही बसा. मी आता आणतो चहा. (आत जातात.)
( तेवढ्यात दारातून चिंतोपंत स्वयंपाकी येतात व साहेबांना पाहून परत जायला वळतात. )
साहेब : अहो या ना, बसा ना.
( एव्हाना दारात आलेले बंडूचे बाबा चिंतोपंताना पाहून हातातल्या चहाच्या कपासकट थरथरायला लागतात. )
बाबा : या चोंबड्या चिंतोपंताला कडमडायला नेमकी हीच वेळ मिळाली काय?
चिंतोपंत : बंडूचे बाबा, काही म्हणालात तुम्ही? जे बोलायचंय ते ऐकू येईल असं बोला. आमची पण यूनियन झाली आहे आता.
बाबा : काही म्हणालो नाही. म्हटलं बसा तुम्ही. साहेब, हे शेजारचे चिंतोपंत स्वयंपाकी. चिंतोपंत, बसा ना.
चिंतोपंत : बसायला मुळीच वेळ नाही. (फतकल मांडून बसतात.) बरीच कामं आहेत मला. पण आता तुमच्या बंडूच्या कागाळ्या सांगायला आलोय.
बाबा : चला, सुरू झालं यांचं बंडूपुराण. चिंतोपंत, घाई आहे का? आमचे हे साहेब तुमचं बंडूपुराण पुन्हा केव्हातरी ऐकतील. आज ते चहा प्यायला आलेयत. (स्वत:ला सावरून) नाही, म्हणजे आमचं थोडसं काम आहे. उद्या याल का सवडीने? नाहीतर आलाच आहात, तर थोडा चहा टाका. सॉरी, चहा पिऊन जा.
चिंतोपंत : चहा प्यायला आलो नाही आणि चहा टाकायला नक्कीच नाही. आणि आता आलोच आहे तर बसतो थोडा. ऐका तरी तुमच्या चिरंजीवांचे प्रताप. (एवढ्यात बाहेरून मुलांच्या घोषणा ऐकूं येतात.) बापरे बाप! ही शैतांनाची टोळी इथंच येतेय वाटतं? पळ काढलेला बरा. बरं बंडूचे बाबा, आता जरा घाईत आहे. तुम्ही सांगता तसं सवडीनं येईन म्हणतो. (घाईघाईने निघून जातात.)
( बाहेरून काही मुलांचं टोळकं घोषणा करीत आत येतं. )
राजू : शाळा मुर्दाबाद! मुलांचा संप झिंदाबाद!! We want न्याय!! We want सुट्टी. काय बंड्या, बरोबर ना?
बंडू : अगदी बरोब्बर. आमच्यावर होत असलेले अन्याय ...
सर्वजण : (ओरडून) दूर करा, दूर करा.
बाबा : आरे बंड्या, आपले साहेब आलेयत आपल्या घरी चहा प्यायला... नाही, नाही, मला भेटायला. हे काय चालवलंयस साहेबांसमोर?
साहेब : काहो मिस्टर, बोनस मागायला आलेले हे आपले कामगार तर नाहीत ना? पण आपण या अल्पवयीन मुलांना घेतलंच कसं नोकरीवर? Child labourवर बंदी घातलीय सरकारने. कुणाला कळलं तर ... तर टाळं लावावं लागेल.
बंडू : आम्ही? आणि कामगार? बाबा....
बाबा : साहेब, हे कामगार नाहीत, आपली पोरटीं आहेत. कायरे बंडू, आता हे काय नवीन सुरू केलंस?
बंडू : बाबा, आम्हाला न्याय हवाय. आम्ही शाळेविरुद्ध फिर्याद आणली आहे.
बाबा : अरे, मग शाळेत जाऊन काय तो दंगा घाला. शाळेच्या मुख्याद्यापकांच्या ऑफिसात जाऊन बोंबला.
बंडू : ते काही नाही. आम्हाला शाळेत कुणी घातलं? तुम्हीच ना? आता तुम्हीच आम्हाला न्याय द्या.
( साहेब टेबलावरचा हातोडा काढून बंडूच्या बाबांना देतात. )
बाबा : अहो साहेब, मी माझ्या मुलांना हातोड्याने मारीत नाही. मी त्यांना स्टीलच्या पट्टीने मारतो.
साहेब : अहो, मुलांना मारायचं नसतं कधी. हा हातोडा मी त्यांना मारायला नाही दिला. थोडा वेळ गम्मतजम्मत करूं. मुलांना न्याय हवाय ना? आपण देऊं त्यांना न्याय. थोडा वेळ मी होतो न्यायाधीश, व तुम्ही व्हा वकील. आता मी ओरडतो, "ऑर्डर, ऑर्डर."
( तेवढ्यात बाहेरून मास्तर जांभया देत येतात. )
मास्तर : अहो, बंडूचे बाबा, मी बाहेर जातानाच त्याला ऑर्डर देऊन गेलो होतो, अभ्यास कर म्हणून. काय बंडोपंत, झाला का अभ्यास?
साहेब : अहो, मुलांचा कसला कर्माचा अभ्यास घेताय? मुलंच तुमचा न माझा अभ्यास घ्यायला निघालीयत. बंडूचे बाबा, घरात भगवदगीता असेल तर घेऊन या.
बंडू : बाबा, आई गीता घेऊन गीतेच्या क्लासला गेलीय. पुढल्या आठवड्यात गीतेचे श्लॊक म्हणण्याची स्पर्धा आहे ना कॉलनीत?
साहेब : हरकत नाही. मी हा Filmfareचा अंक आणलाय बरोबर. तोच वापरूं आपण गीता म्हणून. घे रे बंड्या, या अंकाची शपथ घेऊन म्हण, "खोटं सांगेन, खरं सांगणार नाही."
बाबा : अहो साहेब, उलटं बोललात तुम्ही. खरं सांगेन, खोटं बोलणार नाही.
साहेब : बरं बरं. बंड्या म्हण, "खरं सांगेन, खोटं बोलणार नाही."
बंडू : बंड्या म्हण, खरं सांगेन, खोटं बोलणार नाही.
साहेब : बंड्या, तू फक्त "खरं सांगेन, खोटं बोलणार नाही" एवढंच म्हणायचं.
बंडू : खरं सांगेन, खोटं बोलणार नाही.
साहेब : सांगा कसली फिर्याद आणली आहे तुम्हां मुलांनी.
सुरेश : खरं सांगतो, माझे बाबा शाळेचे मुख्याद्यापक आहेत, पण आम्हाला शाळेत अगदी फालतू विषय शिकवले जातात.
साहेब : उदाहरणार्थ?
सुरेश : (साहेबांच्या हातात पुस्तक देत) तुम्हीच वाचा. माझ्याने बोलवत देखील नाही.
साहेब : (पुस्तक पहात) खरं सागतोयस. आमच्या लहानपणापासून हीच गणितं दिली जाताहेत. No change. आणखी?
राजू : हे पहा आमचं इतिहासाचं पुस्तक.
साहेब : (पुस्तक वाचीत) अरेच्चा! आमचा सुद्धा अगदी हाच इतिहास होता. जरासुद्धा बदलला नाही.
बाबा : अहो, साहेब, इतिहास कसा बदलत राहील?
साहेब : बंडूचे बाबा, जुना इतिहास बदलणार नाही, पण नवीन इतिहास घडत असतोच की नाही? तो कुठे आहे या जुनाट पुस्तकांत? म्हणे, अफ़झलखानाचा वध कुणी व कसा केला? आता मला सांगा, वेळ बदलली म्हणून अफ़झलखानाचा खूनी बदलेल का? नाही ना, मग लेको, निदान प्रश्न तरी बदला.
मास्तर : अहो साहेब, आम्हीसुद्धा अगदी हेंच सांगत असतो. तेच प्रश्न, तीच उत्तरं. आम्हा शिक्षकांना देखील भयंकर कंटाळा येतो तेच तेच वाचताना. पण काय करणार?
बंडू : सुट्ट्या द्या. आम्हाला सुट्या खूप कमी आहेत. आणि आहेत त्या दिवशी सुद्धां कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत बोलवतात. मग आम्ही मोकळ्या हवेत खेळायचं तरी केव्हा?
राजू : तर काय? खेळाचे तास सुद्धा गणिताचे सर मागून घेतात. म्हणे पोर्शन संपवायचा आहे.
सुरेश : हा अन्याय दूर व्हावा.
साहेब : बंडूचे बाबा, लवकर काय तो निर्णय द्यायला हवा. माझा चहा थंड होतोय.
बाबा : साहेब, चहाची काळजी नका करू तुम्ही. एकदा हा खेळ संपला की नव्याने चहा आणतो आणि फराळाचं सुद्धा.
साहेब : मग निर्णय देवूया लवकर. मला उशीर होतोय. बायको किटी पार्टी संपवून घरी आली तर पंचाईत होईल.
मास्तर : आम्हा शिक्षकांचा सुद्धा विचार करा बरं निर्णय देताना.
बंडू : ते काही नाही, निर्णय मुलांच्या बाजूने हवा.
( सगळी मुलं ओरडायला लागतात, "निर्णय आमच्या बाजूने हवा". )
साहेब : (हातोडा टेबलावर आपटीत) मी शाळेच्या चालकांना हुकूम देत आहे की त्यांनी मुलांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात. सुट्ट्या जास्त द्याव्यात. खेळाचे तास वाढवावेत.
मास्तर : आणि मुलं नापास झाली की त्यांच्या पालकांच्या शिव्या खाव्यात, असंच ना?
बंडू : ते काही नाही. सुटी हवी.
( सगळी मुलं आरडाओरडा करीत असतानाच पडदा पडतो. )
लेखक
लक्ष्मीनारायण हटंगडी
EC51/B104, Sai Suman CHS,
Evershine City, Vasai (E)
PIN 401208
(E-mail: suneelhattangadi@gmail.com)
Thursday, June 24, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment