Thursday, June 24, 2010

धडाधड धाडी

( पडदा वर जातो तेव्हां कथानायक राजूची, (वय, साधारण १२) खोली दिसते. या वयाच्या इतर मुलांच्या खोलीसारखीच या खोलीची अवस्था वाईट आहे. या खोलीत नुकतंच वादळ येऊन गेलं असावं असा कुणाचा समज होणं साहजिकच आहे.खोलीभर राजूच्या वस्तू अस्ताव्यस्त पसरल्या आहेत. कुठं पतंग, कुठं मांजाची फिरकी, कुठं कपडे, तर कुठं पुस्तकं -- कशाचा कशाला मेळ नाही. राजूचे बाबा या वस्तूंच्या जंगलात काहीतरी शोधायचा निष्फळ प्रयत्न करीत आहेत. बराच वेळ इथल्या वस्तू तिथॆ केल्यावर वैतागून ते खोलीभर चकरा मारायला लागतात, व राजूच्या नांवाने ओरडतात. )
बाबा : राजू ... राजू ... ( उत्तर नाही.) राजू ... (वैतागून राजूच्या कपाटाचा खण उपसायला लागतात. त्यांतून एक जुनाटसं दिसणारं प्रगति-पुस्तक काढतात व उघडून वाचायला लागतात.) छान! हे चिरंजीवांचं प्रगति-पुस्तक! यंदाच्या प्रगति-पुस्तकाची ही अवस्था -- कसली प्रगती करताहेत दिसतंच आहे यावरून. (पुस्तक चाळून पहातात.) हे ... हे असले मार्क ... गणित, शंभरापैकी सहा -- हिंदी, शंभरापैकी नऊ -- मराठी, शंभरापैकी सात. शरमेची गोष्ट आहे, मातृभाषेत देखील गाढवाला जास्त गूण मिळवता येऊं नयेत? इतिहास-भूगोल, शंभरापैकी आठ! छे, या गाढवाचे हे असले मार्क वाचण्यापेक्षा मला मरण कां नाही आलं? एकाही विषयात दहाची boundary पार करता येऊ नये! आणि म्हणे प्रगति-पुस्तक!! ही प्रगति नव्हे, अधोगति आहे. नको त्या गोष्टीत लक्ष असतं कारट्याचं... ते कांही नाही, आज चांगला फोडूनच काढला पाहिजे गाढवाला. (वैतागून प्रगति-पुस्तक टेबलावर आपटतात आणि गरजतात) राजू --- राजू, पत्ता नाही लेकाचा. कुठं तडफडायला गेलाय कोण जाणे? (परत किंचाळत) राजू ...
( त्याच वेळी बाहेरून राजू शिटी वाजवत प्रवेश करतो. हातात सिगारेटचं पाकीट आहे. )
राजू : मला बोलावलंत, बाबा?
बाबा : ऐकूं येत नाही? आणि हे हातांत काय आहे?
राजू : दिसत नाही? सिगारेटचं पाकीट आहे.
बाबा : ते दिसतंय. हे असले धंदे केव्हां सुरू केले?
राजू : दोन वर्षं झालीं बाबा.
बाबा : लाज नाही वाटत सांगायला? आम्हीं कॉलेजांत जाईपर्यंत कधी सिगरेट प्यायला सुरवात नव्हती केली. आणि तू ...
राजू : (हंसत) अरे बाबा, रिकामी पाकीटं आहेत हीं. छंद आहे माझा.
बाबा : छंद नाही... कचरा आहे नुसता. घरात कशाला जमा केला आहेस?
राजू : (दुखावला जाऊन) बाबा, कचरा नाही हा, मी जमवतोय... सांगितलं ना, माझा छंद आहे.
बाबा : आधी या खोलीची अवस्था बघ. शाळेत हेंच शिकतोस वाटतं? आणि घरातला कचरा कमी म्हणून ही पाकीटं उचलून आणलीस उकिरड्‍यावरून?
राजू : बाबा, उकिरड्यावरून नाहीं उचलली हीं.
बाबा : मग काय भीक मागून आणलीस?
राजू : माझे डुप्लीकेट स्टॅम्प्स देऊन मित्रांकडून गोळा केलीयंत मी हीं पाकीटं
बाबा : आणि तें कशाला?
राजू : (उत्साहाने) ही आठ रिकामी पाकीटं पाठवलीं की भारतीय क्रिकेट टीमची मस्त पोस्टर्स मिळतात.
बाबा : (कुत्सितपणे) चांगला धंदा आहे... एक कचरा देऊन दुसरा कचरा जमा करायचा. दुसरा देऊन तिसरा ... आणि तिसरा देऊन ... दिवसभर ह्याच भानगडी करा. अभ्यासाच्या नांवाने मात्र शंख!
राजू : बाबा, प्लीज़, छंद म्हणजे भानगडी नव्हे.
बाबा : ह्य़ें, कसले कपाळाचे छंद! त्याऐवजी ही खोली जरा साफ़ कर. एक वस्तु जागच्या जागी सांपडेल तर शपथ.
राजू : मी देतो ना शोधून. काय पाहिजे सांगा. नाही सांपडली तर नांव बदला. सांगा, काय पाहिजे?
बाबा : प्रगति-पुस्तक. सांपडलं... पण त्याचं नांव बदलावं लागेल. प्रगती नाही... अधोगती आहे.(प्रगति-पुस्तक राजूच्या हातात देत) हे घे आणि वाच.
राजू : (लाजेने मान खाली घालून) खरंच वाचू? (बाबा होकारार्थ मान हलवतात.) ठीक आहे, तुम्हीं सांगताय तर वाचतो आपला. (वाचीत) गणित, शंभरापैकी सहा... हिंदी, शंभरापैकी नऊ... मराठी, शंभरापैकी सात...
बाबा : लाज नाहीं वाटत वाचायला?
राजू : वाटते ना, पण तुम्हीच सांगितलं वाचायला!
बाबा : (स्वत:ला सांवरून) मला म्हणायचं होतं, लाज नाही वाटत असले मार्क मिळवायला? अरे, "मराठी असे आमुची मायबोली" असं म्हटलंय ना आचार्य अत्र्यांनी?
राजू : बाबा, ते अत्र्यांनी नाही, कवि यशवंतानी म्हटलंय.
बाबा : (ओरडून) कुणी का असेना, म्हटलंय ना कुणीतरी. आणि त्या आपल्या मायबोलीत तुल एवढे कमी मार्क मिळावेत? गप्प का? बोल.
राजू : (खाली मान घालून) पण बाबा...
बाबा : (वस्सकन‍) ...एक शब्द बोलू नकोस. पुढे वाच.
राजू : (वाचीत) इतिहास-भूगोल, शंभरापैकी आठ. सायन्स, शंभरापैकी नऊ.
बाबा : आणि आपले छंद कवटाळून बसलायस! अगदी एकाही विषयांत दहाची boundary पार केलेली नाहीस तू!!
राजू : (वाचीत, आनंदाने ओरडून) बाबा, boundary पार. स्ट्रेट छक्का. चित्रकला, पंच्याहत्तरापैकी बारा.
बाबा : चित्रकलेत? लाज नाही वाटत सांगायला?
राजू : पण बाबा ...
बाबा : च्य़ॉप! अरे, आम्ही काय लहान नव्हतो?
राजू : होतात.
बाबा : पण आमच्या लहानपणी आम्ही असले भलते चाळे नव्हते केले. डोकं खाली घालू नकोस. पुढचं पान वाच.
राजू : बाबा, मागचं पान वाचूं?
बाबा : (कुत्सितपणे) का? मागच्या पानावर काय असतं? ऐं?
राजू : विद्यार्थ्याचं नांव...
बाबा : ऐं, काय, म्हणायचंय काय तुला?
राजू : बाबा, ही प्रगती माझी नाही...
बाबा : (ओरडून) तुझी नाही, तर काय माझी आहे?
राजू : (आनंदानं) हो बाबा, हें तुमचं प्रगति-पुस्तक आहे. मला आईच्या कपाटात सांपडलं... मी माझ्या संग्रहासाठी काही नवीन सांपडतं का बघत होतो तेव्हा. तुमचं जुनं प्रगति-पुस्तक. सॉरी, प्रगती नाही, कांहीतरी नवीन शब्द शोधून काढावा लागेल, नाही? तुम्हीच म्हणालात.
बाबा : (ओशाळून) गप्प. नको तिथं डोकं खुपसायची तुझी ही संवय जाणार तरी कधी?
राजू : मी मोठा झाल्यावर.
बाबा : तुझी ही लक्षणं पाहिल्यावर तू कधी मोठा होशील असं वाटत नाही. अभ्यास नाही केलास तर मोठा कसा होशील, सांग.
राजू : बाबा, उगीच थापा नका मारू. मला सांगा, मी शाळेत जायला कितव्या वर्षी सुरवात केली?
बाबा : चार वर्षांचा असताना.
राजू : म्हणजे त्याआधी मी शाळेत नव्हतो जात... आणि तरीही मोठा झालोच की नाही?
बाबा : बास्स, तोंड वर करून बोलू नकोस. ह्यापुढं तुझ्या बाकीच्या सर्व भानगडी बास्स. फ़क्त अभ्यास.
राजू : पण बाबा...
बाबा : बाबा गेले खड्ड्यात... म्हणजे तुझ्या ह्या सगळ्या वस्तू गेल्या खड्ड्यात. ताकीद देतोय तुला. आज संध्याकाळपर्यंत हा सगळा कचरा तुझ्या खोलीतून गुल झाला पाहिजे.
राजू : बाबा, माझा अनमोल खजिना ..
बाबा : तुझा अनमोल खजिना तू नाही फ़ेकलास, तर ते सत्कार्य मला करावं लागणार. (तावातावानॆ पाय आपटीत खोलीबाहेर निघून जातात.)
राजू : (वैतागून) हुं, म्हणे कचरा बाहेर फ़ेकून देणार. बाबांना किम्मतच नाही आमच्या वस्तूंची. आम्ही त्रास घेऊन वर्षभर सगळ्या वस्तू जमवायच्या आणि हे निघालेयत सगळ्या वस्तू एका दिवसात बाहेर फेकायला. काही दिवसांनी मलाच कचरा म्हणून फेकून द्या घराबाहेर, म्हणजे सुटाल. मी एकदा मेलो ना, की सगळ्यांना किम्मत कळेल, माझी आणि माझ्या खजिन्याची. मग येतील मला मस्का लावायला. खुश्शाल या, पण मी नाही ऐकणार कुणाचं त्या वेळी. खोलीत घेणार पण नाही कुणाला. लाथा मारून हांकलून लावेन. (जोराने हवेंत लाथ झाडतो. लाथ लागून वस्तु खोलीभर पसरतात. संतापून राजू वस्तू गोळा करायला लागतो.) माझ्या खजिन्याला कुणाला हात लावूं देणार नाही.
( त्याच वेळी राजूचा मित्र, हर्षद, आंत येतो आणि वस्तू गोळा करायला राजूला मदत करायला लागतो. )
राजू : हात नको लावूस एकाही वस्तूला.
हर्षद : वैतागलेला दिसतोयस!
राजू : दिसतोय ना वैतागलेला? मग विचारतोयस कशाला?
हर्षद : (राजूच्या पाठीवर हात ठेवून) ए, मित्र आहे ना मी तुझा... मग मला सांग ना काय झालं ते. मी आपल्या गॅंगचा मेम्बर ना?
राजू : (थोडा शांत होत) सॉरी यार, खरं तर मी बाबांवर वैतागलोय.
हर्षद : ह्यांत नवीन काय? आज काय झालं ते सांग.
राजू : आधी तुझ्या हातांत काय आहे ते सांग. आणि कुठून आणलंस?
हर्षद : आपल्या खजिन्यासाठी जुनी ग्रीटींग कार्ड्‍स आणली... बाबांच्या ऑफ़िसमधून.
राजू : लक्की आहेस. माझे बाबा ह्या सगळ्या वस्तू बाहेर फेकायला तयार झालेयत. म्हणे हा कचरा घरात नकोय.
हर्षद : बापरे बाप! मग ह्या सगळ्या वस्तू ठेवायच्या तरी कुठे?
राजू : तेंच तर सुचत नाहीय मला.
हर्षद : तू आपल्या बाबांना सांगितलं नाहीस की ही खोली आपल्या गॅंगचं हेड ऑफ़िस आहे असं?
राजू : अरे बाबा, हे त्यांच्या ’हेड’मध्ये गेलं पाहिजे ना? त्यांच्या मते मी माझं हेड, म्हणजे डोकं, अभ्यास सोडून दुसर्‍या कोणत्याही गोष्टीत घालूं नये. त्यांनी कायदाच केलाय की अभ्यास सोडून मी दुसरं कांहीही करायचं नाहीं.
हर्षद : कायदा म्हटल्यावर बरी आठवण झाली. (वर्तमानपत्र दाखवून) हे बघ.
राजू : ह्यांत काय विशेष असणार? एखादा-दुसरा अपघात, तीन-चार खून, पांच-सहा सिनेमाच्या जाहिराती, आणि सात-आठ मंत्र्यांची भाषणं...
हर्षद : त्या रोजच्या बातम्या सोड. हे पेज थ्री बघ. मलबार हिल भागात पोलिसांचे छापे --- लाखोंचा काळा पैसा ज़प्त.
राजू : (कुतुहलाने वाचत) आणि ही बातमी वाच. देवघरांत दडवलेला सोन्याचा साठा ज़प्त. पोलिसांनी पंचवीस जणांना अटक केली.
हर्षद : WOW!!
राजू : सरकार सर्व गुप्त खजीने ज़प्त करीत आहे. कसल्याही वस्तूंचे ठेवले गेलेले सांठे उकरून काढले जात आहेत. (अचानक) तरीच!!
हर्षद : काय झालं?
राजू : सगळ्या राज्यभर लपवून ठेवलेल्या वस्तूंचे साठे ज़प्त करण्याचं वारं पसरलंय, तर थोडं वारं आमच्या बाबांच्या अंगात शिरलं तर नवल काय?
हर्षद : मला नाही समजलं.
राजू : लेका, तुझी ट्यूबलाइट नेहमींच उशीरा पेटते.
हर्षद : (रागाने) तुझी पेटते ना लवकर? मग सांग ना मला. उगीच भाव नको खाऊस.
राजू : हे बघ. सगळ्या शहरांतले गुप्त धनाचे साठे ज़प्त करण्यात येत आहेत... करेक्ट?
हर्षद : हो. मग?
राजू : मग काय? अरे,पोलिसांना जर आपल्या खोलीचा पत्ता लागला तर काय लफ़डं होईल अंदाज़ आहे का तुला?
हर्षद : आपल्याकडे काय आहे?
राजू : मिस्टर, आपल्याकडे काय नाही? आपल्या नाण्यांचा सांठा, आपल्या फ़ॉरेनच्या करेन्सी नोटा...
हर्षद : पण तो छंद आहे आपला.
राजू : छंद आपल्यासाठी. माझ्या बाबांना विचार. ते ह्याला कचरा समजतात. शिवाय पोलिसांचा तर असल्या गोष्टींवर डोळाच असतो. असं असताना पोलिसांनी आपल्या खोलीवर धाड घातली तर अजून काय काय खजीने सांपडतील त्यांना! आपल्या रंगीबेरंगी पतंगा, आपले देशी-विदेशी स्टॅम्‍प्स ..
हर्षद : सत्य वचन, वत्सा. आपल्या नाण्यांचं लक्षांतच आलं नव्हतं माझ्या. आधी बाहेर काढ बघू तो खजीना.
राजू : (काळजीने) हर्षद, आत्तां मात्र आपल्याला हा खजिना खरोखर इथून हलवावा लागेल.
हर्षद : शिवाय आपल्या गॅंगमधला दिलीप त्या सुजीतच्या गॅंगला जाऊन मिळालाय. एव्हांपर्यंत आपल्या खोलीची सगळी माहिती त्यानें सुजीतला सांगितली असेल.
राजू : देशद्रोही... विश्वासघातकी साला.
हर्षद : फ़क्त शिव्या देऊन काही होणार नाही. लवकर हातपाय हलवावे लागतील.
राजू :हातपाय नंतर, आधी आपला खजिना इथून हलवावा लागेल. सुजीतच्या गॅंगने पोलिसांना बातमी दिली व पोलीस इथे आले की सॉलीड गोची होईल.
हर्षद : आधी ती नाण्यांची पेटी बाहेर काढ.
(राजू कोपर्‍यातल्या भिंतीकडे जाऊन तिथं असलेले कॅलेण्डर हल्वतो व तिथे असलेल्या पोकळीत हात घालतो.)
राजू : हर्षद, सॉलीड लफ़डं झालंय.
हर्षद : म्हणजे exactly काय झालंय?
राजू : आपल्या अलिबाबाच्या गुहेतला खजिना गायब झालाय.
हर्षद : च्यायला, कुठे गायब झाला?
राजू : (वैतागून) देव ज़ाणे. (वैतागून डोकं हातांत घेऊन पलंगावर गप्पकन बसतो. )
हर्षद : राजू, सुजीतच्या गॅंगमधील कुणी आलं तर नव्हतं इथं?
राजू : कुणीच नाही... पण थांब, आत्तां आठवलं. काल संध्याकाळी मी ती पेटी बाहेर काढली होती. नंतर तिथं न ठेवता मी ती दुसरीकडेच ठेवली होती.
हर्षद : अरे, केवढा टरकलो मी! मानला तुला. एवढी साधी गोष्ट सुद्धां आठवत नाही तुला.
राजू : बाबारे, मी सुद्धा केवढा टरकलो होतो. तूं मघाशी ती भयानक बातमी आणलीस तेव्हापासून माझ्या डोक्यातसुद्धा भलतेसलते विचार येताहेत. इथंच थांब. मी आतां ती पेटी घेऊन येतो.
( राजू दुसर्‍या कोपर्‍यात जाऊन बुटांच्या कपाटांतून एक पेटी काढून आणतो. राजू व हर्षद पलंगावर बसून पेटीतला खजिना पलंगावर रिकामा करतात. )
राजू : हर्षद, खरोखरच पोलिसांनी इथं धाड मारली तर ...?
हर्षद : बिनधास्त पोलिसांना सांगायचं की आपल्याकडे कांहीच नाही असं.
राजू : मूर्ख आहेस का? आपण ही सगळी नाणी समोर पसरून बसलोय. याचवेळी पोलिसांनी झडप घातली तर पुराव्यासकट पकडले जाऊ आपण.
( याचवेळी दरवाज्यावर थाप ऐकू येते. समोरच्या दरवाज्यांत एक रुबाबदार पोलिस इन्स्पेक्टर उभा दिसतो. )
राजू : (दचकून) बापरे! पोलीस!!
इन्स्पेक्टर: (हंसत) घाबरलास ना?
राजू : (स्वत:ला सावरून) घाबरलो? कोण, मी? मी नाही घाबरलो... मी कशाला घाबरणार?
इन्स्पेक्टर: या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा तूंच देऊ शकशील.
राजू : पण तुम्ही कोण आहात?
इन्स्पेक्टर: माझ्या कपड्यांवरून ओळखूं येत नाही तुला? मी पोलिस इन्स्पेक्टर आहे. माझं नांव इन्स्पेक्टर देशपांडे.
राजू : ओळख नव्हती विचारली नव्हती मी.
इन्स्पेक्टर: मग?
राजू : इथं यायचं कारण विचारलं.
इन्स्पेक्टर: सहज़ आपलं...
राजू : पण मी नव्हतं बोलावलं तुम्हाला...
इन्स्पेक्टर: (हातांतली छडी फिरवीत) कुणी न बोलावताही येण्याची परवानगी फक्त पोलिसांनाच असते.
राजू : पण लहान मुलांच्या खोलींत त्यांचे पालक नसताना...? हे बघा, आत्तां आम्हाला मुळीच वेळ नाही, आम्ही कामांत आहोत.
इन्स्पेक्टर: (पलंगावरच्या वस्तूंकडे पहात) तें दिसतंच आहे मला. आणि मी नेमक्या त्याच कामासाठी इथं आलोय.
राजू : म्हणजे? मी नाही समज़लो.
इन्स्पेक्टर: आज सकाळीच कमिशनर साहेबांना एक फोन आला होता.
राजू : (धैर्याचा आव आणीत) फोन? कुणाचा फोन?
इन्स्पेक्टर: कुणाचा फोन आला होता यापेक्षा कशाबद्दल फोन आला होता हें महत्वाचं आहे.
राजू : कशाबद्दल फोन आला होता?
इन्स्पेक्टर: फोन करण्यार्‍या मुलानं ...
राजू : मुलाचा फोन? अखेर मला वाटत होतं तसंच झालं. इन्स्पेक्टर साहेब, मी सांगतो फोन कुणी केला तें. फोन करणार्‍या मुलाचं नांव होतं सुजीत. बरोबर?
इन्स्पेक्टर: चाणाक्ष आहेस मुला. सुजीतनं तुझ्या घराचा पत्त्ता दिला व सांगितलं की तूं बराच मौल्यवान खजिना आपल्या घरात दडवून ठेवलाय‍स म्हणून.
राजू : आणि त्याच्या सांगण्यावरून तुम्ही इथं आलात? उगीचच...
इन्स्पेक्टर: हो, त्याच्याच सांगण्यावरून मी इथं आलो, पण उगीचच नाही. पोलिसांना मिळालेली बातमी बरोब्बर होती. (खोलीवर नज़र फिरवीत) खजिन्याबद्दलची बातमी. इतर खजिने कुठं आहेत? (कॅलेण्डर लावलेल्या जागी जात) शाब्बाश! सगळी संपत्ती गोळा करून फ़रार व्हायची तयारी चालवली होती तर?
राजू : इन्स्पेक्टर, कशाला छळता आम्हाला?
इन्स्पेक्टर: (पलंगावरची नाणीं नाचवीत) ह्या खजिन्याची एकूण किम्मत काय असेल माहीत आहे तुला?
राजू : अहो, कसला खजिना घेऊन बसलात? छंद म्हणून जमवलेली साधी नाणीं आहेत हीं.
इन्स्पेक्टर: विदेशी चलनाचा सांठा जवळ बाळगणं सरकारी गुन्हा आहे, माहीत नाही बहुतेक तुला?
राजू : माहीत आहे.
इन्स्पेक्टर: आणि तरीहि ... यामुळे गुन्हा अधीकच गंभीर होतो. ह्या सर्व खजिन्याची किम्मत कमीत कमी लाख-दोन लाख असेल.
राजू : (पटकन) अगदी हेंच सांगत असतो मी नेहमी बाबांना. ते मात्र या सर्व गोष्टींना कचरा म्हणत असतात.
इन्स्पेक्टर: मूर्ख आहेत ते.
राजू : (रागाने) अहो इन्स्पेक्टर, बाबांना मूर्ख नाही म्हणायचं, सांगून ठेवतो. असाल तुम्ही इन्स्पेक्टर.
इन्स्पेक्टर: सॉरी, बॉस. पण ह्या धाडींत एवढा मोठा खजिना माझ्या हाती लागला असं सरकारला कळलं तर केवढं मोठं बक्षीस मिळेल मला, याची कल्पना नाही तुला. ताबडतोब promotion मिळेल मला.
( राजू बाजूला पडलेले कांही रंगीबेरंगी पतंग आणून इन्स्पेक्टरच्या समोर धरतो. )
राजू : इन्स्पेक्टर, हे घ्या... तुमच्यासाठी.
इन्स्पेक्टर: (हंसत) लांच देतोयस मला, मुला! अटक होऊ शकते तुला.
राजू : लांच नाही, बक्षीस देतोय मी तुम्हाला. बिनधास्त घ्या.
इन्स्पेक्टर: ड्युटीवर असताना बक्षीस घेत नसतो मी. (हंसतो)
राजू : अहो इन्स्पेक्टर, सगळे जण घेतात. तुम्ही सुद्धां घ्या. मी स्वखुशीनं देतोय तुम्हाला. कुणालाहि सांगणार नाही. प्लीज़, घ्या आणि निघून जा.
इन्स्पेक्टर: आणि हा खजिना असाच सोडून जाऊ? तें काही नाही. मला माझं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे.
राजू : म्हणजे हा खजिना ज़प्त करणार त्तुम्ही?
इन्स्पेक्टर: नक्कीच. आजपर्यंत कुठल्याच धाडीवरून रिकाम्या हातांनी परत गेलेलो नाही मी.
राजू : एक प्रस्ताव मांडतो. यांतली अर्धी नाणीं तुम्हीं घ्या. अर्धी आमच्या साठी ठेवा.
इन्स्पेक्टर: तें काही नाही. मला हा खजिना ज़प्त करावाच लागेल. य़ा शिवाय, तुलाहि माझ्याबरोबर पोलिस-स्टेशन वर यावं लागेल.
राजू : तें कशाला?
इन्स्पेक्टर: मी तुला अटक करतोय़. हे आहे अटकेचं वॉरण्ट. (खिशांतून एक कागद काढून राजूला देतो.)
राजू : (लगबगीने कागद फाडून टाकतो.) आत्तां?
इन्स्पेक्टर: सरकारी अधिकार्‍याच्या कामांत अडथळा आणल्यानिम्मित अधिकच शिक्षा होईल तुला. मुकाट्यानं माझ्याबरोबर ये.
राजू : आणि नाहीं आलो तर?
इन्स्पेक्टर: मला ज़बरदस्ती करावी लागेल. (खिशांतून पिस्तूल काढून) कदाचित गोळीहि घालावी लागेल.
राजू : मग घ्या हा खजिना आणि गोळी झाडा माझ्यावर. माझा खजिना मला स्वत:च्या प्राणांपेक्षा प्रिय आहे. तुम्हीं हा घेऊन गेल्यावर मी जगून तरी काय करूं? मारा गोळी.
( इन्स्पेक्टर हळूहळू मागे सरकत राजूच्या छातीचा नेम घेऊन गोळी झाडतो, आणि बाहेर निघून जातो. राजू आपली छाती धरून ज़ोरज़ोराने ओरडायला लागतो, "मेलो तरी चालेल, पण माझा खजिना कुणालाही नेऊं देणार नाही.". तिथेच उभा असलेला हर्षद जोरजोरानं राजूला हलवून शुद्धीवर आणतो. )
हर्षद : राजू, जागा हो. काय झालं? काय झालं?
राजू : एक पोलिस इन्स्पेक्टर आला होता इथं. आपला खजिना नेत होता. मी त्याला थांबवलं म्हणून मला गोळी मारली त्यानं.
हर्षद : मॅड आहेस. कुणीहि आलेलं नाहीं इथं. जागेपणी स्वप्न पाहिलं असशील तूं.
राजू : (डोळे चोळीत) खरं? आं..शक्य आहे. (नाणी बघायला लागतो.) हर्षद, हा बघ नवीन अमेरिकन डॉलर.
हर्षद : हा अजून आपल्याकडेच आहे? मला वाटलं दिलीप घेऊन गेला.
राजू : दिलीप बरा घेऊन जाईल... पण मी थोडाच त्याला नेऊं देईन? गेल्या वर्षी तो अमेरिकन पाहुणा आला होता, आठवतोय?
हर्षद : हो. जिथं जाईल तिथं सगळी मुलं त्याच्या भोंवती गराडा करायची.
राजू : हो, तोच. बाबा ज्याला कचरा म्हणतात त्याच माझ्या संग्रहावर फ़िदा होऊन त्यानं मला हा डॉलर दिला होता आणि म्हणाला कसा, "Keep it up, dude".
हर्षद : ह्या दिवसांत "कीप इट अप" करणं किती टफ़ आहे हे त्या बिचार्‍याला माहीत नसेल.
राजू : होना. पोलिसांनी धाड घालण्याआधीच बाबांनी आपल्या खजिन्यावर धाड घातली आहे. हर्ष, वाजले किती?
हर्षद : (घड्याळ पाहून) अकरा वाजून गेले.
राजू : आपल्या गॅंगचे इतर मेम्बर्स कुठे आहेत? आज सण्डे ना? आज weekly meeting आहे आपली. विसरेलेले दिसताहेत बहुतेक!
हर्षद : सुनीलला मी दिलीपच्या मागावर पाठवला आहे. आपल्या गॅंगची आज मीटींग आहे हे त्या दिलीपला माहीत आहे. सकाळपासून शहाणा माझा पाठलाग करत होता. अखेर मी त्याला चकमा दिला आणि सुनीललाच त्याच्या पाठी लावला. येतीलच सर्व एवढ्यात. ह्या धाडींबद्दल आज कांहीतरी निर्णय घ्यावा लागेल.
राजू : शिवाय आपले खजीने सुरक्षित ठेवण्याची काहीतरी सोय करावी लागेल. खिडकीतून बघ कुणी दिसताहेत कां ...
हर्षद : (खिडकींतून बाहेर बघत) सगळेजण येताहेत. सुनीलदेखील आहे बरोबर. (खिडकीतून शिटी वाजवून सगळ्यांना घाई करायची खूण करतो.)
राजू : हें बघ, प्रत्येकाच्या हातांत एकेक खजिना सोंपवायचा. पण त्य़ांना आधी कोड वर्ड विचारून मगच प्रवेश दे. मी आलोच.
हर्षद : आत्ता तूं कुठं चाललायस?
राजू : (हंसत) किचनमधला खजिना रिकामा केला पाहिजे ना? भगिनी समाजाच्या मीटींगला जायच्या आधी आई आपल्यासाठी फ़राळाचं ठेवून गेली आहे. आई ग्रेट आहे... बाबांसारखी नाही. सॉलीड सपोर्ट करते आपल्याला.
हर्षद : तुझी आई ज़िन्दाबाद! (राजू आतल्या खोलीत जातो. हर्षद घाईघाईने पलंगावरची नाणीं पेटीत भरून ठेवतो, व पेटी उशीखाली लपवतो. तेवढ्यात दार वाजतं.) कोण आहे? (बाहेरून आवाज येतो, "शेरवुडच्या जंगलातील रॉबिन हुडचे साथी".) मस्स्त! मी गॅंगचा सरदार, रॉबिन हुड. गुहेत प्रवेश करा.
( बाहेरून तीन मुलें प्रवेश करतात. )
सुनील : रॉबिन हुड ज़िंदाबाद!
हर्षद : आपली एकी ज़िंदाबाद! बसा. (सगळेजण पलंगावर बसतात.) सुनील, काय बातमी आहे?
सुनील : अरे, धमाल आली.
हर्षद : काय झालं ते सांग.
सुनील : सांगतो. पण आपलं पेट्रोल कुठे आहे?
हर्षद : राजू आणायला गेलाय. तू रिपोर्ट दे.
सुनील : बिलकुल नाही. पेट्रोल पोटात गेल्याखेरीज आपली गाडी सुरुच होत नाही. तोपर्यंत नितीन आणि जयंतला रिपोर्ट द्यायला सांग.
नितीन : ओके, बॉस.
हर्षद : हे काय नवीन?
( तेवढ्यात आतूंन राजू फ़राळ्याच्या पिशव्या संभाळीत येतो. इतर मुले पुढे होऊन त्याला मदत करतात. )
सुनील : (पिशवीतून चिवड्याचा घास घेत) चिवडा ज़िंदाबाद. आत्तां आपण रिपोर्ट द्यायला तयार आहोत.
राजू : बकासूर महाराज, आधी तोंडातील फ़राळ संपव आणि मग रिपोर्ट दे.
हर्षद : अगदी हवं तेवढं पेट्रोल नीट पोटात जाऊं दे, नाहींतर तुझी गाडी मध्य़ेच बंद पडायची. या पेट्रोलची गरज तुलाच सर्वात जास्त असते.
सुनील : धन्यवाद... धन्यवाद.
( सुनील एका बाजूला जाऊन खाण्यात गुंग होतो. इतर सर्वजण फ़राळाचा एकेक घास घेताघेता बोलायला लागतात. )
हर्षद : नितीन, हें नवीन ’बॉस’ प्रकरण काय आहे?
नितीन : यांत नवीन काही नाही. मी फ़िल्ममध्ये पाहिलंय की प्रत्येक गॅंगचे मेम्बर्स आपल्या लीडरला "बॉस" म्हणतात.
हर्षद : आपण फ़िल्मवाल्यांची नक्कल केलीच पाहिजे असं नाही.
राजू : बॉस, पण काही म्हण, ऐकायला झकास वाटतं, "बॉस्स".
हर्षद : ठीक आहे. आजपासून आपणसुद्धा "बॉस" म्हणायचं.
सर्वजण : (ओरडून) ओके, बॉस.
राजू : हळू ओरडा. आज आपल्यापुढॆ बरेच प्रश्न उभे आहेत.
जयंत : उदाहरणार्थ?
राजू : तुम्ही सर्वजण वर्तमानपत्रं वाचत असालच.
सुनील : बॉस, मी वर्तमानपत्रं बघत असतो, पण वाचत नाहीं.
नितीन : मी फ़क्त नवीन सिनेमांच्या जाहिराती बघत असतो.
जयंत : मी खेळांच्या बातम्या वाचत असतो.
राजू : देशाभरांत गुप्त धनाचे सांठे ज़प्त केले जात आहेत.
हर्षद : सर्व घराघरांतून धडाधड धाडी पडत आहेत.
राजू : आपल्या खजिन्यावर सुजीतच्या गॅंगचा डोळा आहेच...
हर्षद : आणि आत्ता बॉसच्या बाबांचा देखील डोळा आपल्या वस्तूंवर आहे.
राजू : म्हणजे माझ्या बाबांचा. कुठल्याहि क्षणाला पोलिसांची धाड आपल्या headquartersवर पडायची शक्यता आहे.
सुनील : आहे. (एक लाडू तोंडात कोंबतो.)
राजू : आपल्याला फ़ितूर झालेल्या दिलीपनं आपल्या खजिन्याची माहिती सुजीतला दिली असेलच. शिवाय मला दाट शंका आहे की त्यानंच पोलिसांना फोन करून आपल्या अड्ड्याची माहिती दिली असावी.
जयंत : राजू ...
राजू : बॉस म्हण.
जयंत : सॉरी, बॉस. बॉस, तुला फक्त शंका आहे, माझ्याकडे भरभक्कम पुरावा आहे. (खिशांतून कागद काढून राजूला देत) हें बघ. सुजीतच्या गॅंगचं पत्र. सुहासनं पोस्टाच्या पेटीत टाकताना मी पाहिलं होतं.
हर्षद : मग हें तुझ्या हातीं कसं पडलं?
जयंत : पोस्टमन येईपर्यंत मी तिथंच रेंगाळत राहिलॊ. त्यानं सगळीं पत्रं रिकामी केलीं, तेव्हां मी त्यांना म्हटलं, "पोस्टमन काका, मी पत्रावर चुकून चुकीचा पत्ता लिहिला. ज़रा देता कां?" मी पत्र घेतलं आणि पळ काढून इथं आलो. येतांना मला सुनील व नितीन भेटले.
सुनील : केवढ्या जोरात पळायला लावलं याने! सॉलीड थकलो मी.
हर्षद : कळलं. पेट्रोल पोटात गेल्यावर तुझा थकवा दूर झाला ना?
राजू : (पेपर न्य़ाहाळून पहात) हर्षद, ही कुठली भाषा आहे बघ जरा.
हर्षद : (पेपर पहात) च्यायला, चीनी किंवा जापानी भाषा दिसतेय.
नितीन : (पेपर घेत) नाही बॉस, अक्षरं इंग्रज़ीतच आहेत.
सुनील : (पेपर खेंचून घेत) ही चीनी नाहीं की जापानी देखील नाही, ही आहे गुप्त भाषा. म्हणजे सांकेतिक भाषा, ज्याला इंग्लिशमध्ये code language म्हणतात. गुप्तचरांची भाषा. Spy language. सगळे ऑप्शन्स दिलेयत मी.
जयंत : ती कशी काय?
सुनील : (डोक्याकडे बोट दाखवीत) त्याला अक्कल लागते.
राजू : अच्छा. पण मला वाटलं की तुझ्या त्या भागांत काही शिरत नाही. शिरतं तें सगळं (पोटाकडे बोट दाखवून) याच भागांत.
सुनील : इथंच तर चुकता तुम्हीं. एका जातिवंत बुध्दिवंताला ओळखायला दुसरा बुध्दिवंतच लागतो.
राजू : ठीक आहे, ठीक आहे. फ़ालतू बडबड नको. चिट्ठींत काय लिहीलंय तें सांग.
सुनील : सॉरी बॉस. सगळं पत्र वाचून हवंय की मेन पॉईंट पाहिजे?
राजू : फक्त मेन पॉईंट.
सुनील : मेन पॉईंट आहे नरीमन पॉईंट.
हर्षद : फालतूगिरी पुरे.
सुनील : फालतूगिरी नाही, सिरीयसली बोलतोय. सुजीतच्या गॅंगचं हेड ऑफिस आतां नरीमन पॉईंटला एका गॅरेजमध्ये हलवण्यात आलेलं आहे.
नितीन : तिथं का?
सुनील : त्यांची जुनी जागा आपल्याला कळली आहे म्हणून. शिवाय सुजीतचा आतेभाऊ तिथं जवळच राहतो. त्याचं गॅरेज त्यांना फुकटात वापरायला मिळतंय, हें दुसरं कारण.
जयंत : तरीच.
हर्षद : तरीच काय?
जयंत : गेल्या शनिवारी मी नरीमन पॉईंटला गेलो होतो तेव्हां सुजीत आणि दिलीपला एका बिल्डिंगीत शिरताना पाहिलं.
राजू : आणि तू हे आत्तां सांगतोयस?
हर्षद : आणि तू नरीमन पॉईंटला कशाला गेला होतास?
सुनील : समुद्रावरची हवा खायला गेला असेल.
जयंत : तुला लेकाला खाण्याशिवाय दुसरं काय सुचते?
हर्षद : जयंत, तू देखील त्या सुजीतच्या गॅंगमध्ये सामील तर झाला नाहीस ना?
जयंत : बास्स कां बॉस? गॅंग जॉइन करताना घेतलेली शपथ मी कधीच तोडणार नाही,
सुनील : आपण सुद्धां एकदा खाल्लेली शपथ कधीच नाही तोडणार.
हर्षद : खाल्लेली आहेस ना?
जयंत : मी माझ्या काकांच दिल्लीचं विमानाचं तिकीट आणायला बाबांबरोबर गेलो होतो नरीमन पॉईंटला.
राजू : ठीक आहे, विषय बदलू नका. आणि काय लिहीलंय पत्रांत?
सुनील : (पत्र वाचीत) आणखी लिहीलंय की चान्स बघून आपल्या खजिन्यावर डल्ला मारणार आहेत ते.
हर्षद : म्हणजे अजून एक धाड.
राजू : चोर लेकाचे.
सुनील : नुसते चोर नाहीत ... डोकं खाणारे महाचॊर.
राजू : आपला खजिना चोरणं म्हणजे तेवढं सिम्पल नाही म्हणावं.
हर्षद : प्रयत्न तर करून बघा, नाहीं एकेकाला अद्दल घडवली तर नावाचे रॉबिन हुड नाही.
जयंत : मग आत्तां काय करायचं आपण?
सुनील : मारामारी.
नितीन : एवढ्यांत नाही. मारामारी शेवटच्या रिळांत असते... दे दणादण.
हर्षद : नितीन, तुला ना, पिक्चरचं वेड लागलंय.
नितीन : पण बॉसला बॉस म्हणायची कल्पना माझीच की नाही.
राजू : हर्षद, तू इथला मोर्चा संभाळ. तोपर्यंत मी या रिकाम्या पिशव्या आंत ठेवून येतो.
सुनील : एक मिनीट, त्या आधी मी या पिशव्या खरोखर रिकाम्या करतो. (पिशव्या उलट्या करून उरलेला माल तोंडात कोंबतो.)
राजू : सुनील, तुझी रिकामी टाकी कधीच भरणार नाही. (आत जातो.)
हर्षद : हे बघा मित्रांनो, आज आपल्यासमोर मोठा गहन प्रश्न उभा आहे.
जयंत : तें तू मघाशीच सांगितलंस. पण तो गहन का काय तो प्रश्न कोणता हें अजून नीटसं कळलेलं नाहीं.
हर्षद : (वर्तमानपत्र दाखवून) आजकाल सगळीकडे धडाधड धाडी पडताहेत. अशावेळी आपला खजिना सुद्धां धोक्यात आहे. आपल्या खोलीचा पत्ता आपल्या शत्रूला माहीत आहे.
राजू : (आंत येत) हर्षदने तुम्हाला आपला प्रॉब्लेम सांगितला असेलच. माझे बाबा देखील हा कचरा --- सॉरी, हा खजिना या खोलीत ठेवण्याविरुद्ध आहेत. आजच्या आज सगळ्या वस्तू आपल्याला इथून हलवाव्या लागतील.
नितीन : पण कुठं?
राजू : माझ्या किचनच्या मागल्या बाजूला असलेल्या बागेत. सुजीतच्या गॅंगचं ओफिस गॅरेजमध्ये असेल, तर आपलं ऑफिस आजपासून माझ्या माळ्याच्या झोपडीत असेल.
हर्षद : कल्पना उत्तम आहे. आपला खजिना एका गरीब माळ्याच्या घरात शोधायची कल्पना कधीच कुणाला सुचणार नाही. आणि सरकार वेळोवेळी उपसून काढत असलेल्या नवनवीन कायद्यांपासून सुद्धा आपण बचावले जाऊ.
जयंत : म्हणजे सुजीतची गॅंग सरकारला सामील झाली आहे असं तर म्हणायचं नाही तुला?
हर्षद : मला एवढंच म्हणायचंय की सुजीतच्या गॅंगचा डोळा आपल्या खजिन्यावर आहे. आणि आपला डाव साधायला ते सरकारलाच काय, भुतांना सुद्धा सामील होतील. त्यांचा काही भरोसा नाही.
नितीन : म्हणजे "भूत हमारे साथी"!
राजू : चला, पटापट सगळ्या वस्तू इथून नेवूया.
( सर्वजण वेगवेगळ्या कोपर्‍यांतून वस्तू उचलतात, आणि आंत ठेवायला जातात. राजू पलंगावरची नाण्यांची पेटी उचलतो. )
राजू : संभाळून. धडपडू नका.
( एकएक करून आंत जायला लागतात. जातांना स्टेजवरचे दिवे मालवतात. स्टेजवर अंधुकसा उजेड आहे. थोडा वेळ स्टेजवर कुणीच नसतं. काही वेळाने खिडकीतून एक माणूस स्टेजवर उडी टाकतो. त्याचे कपडे मळकट आहेत. त्याच्या खांद्यावर एक पिशवी लटकते आहे. चेहर्‍यावर काळ्या रंगाचा बुरखा, डोळ्यांच्या जागी दोन भोकं. बुरख्याची संवय नसल्याने तो मान वेडीवाकडी करून इथंतिथं पहायचा प्रयत्न करीत खोलीभर फिरतो. कधी पलंगावरची उशी उचलून बघतो तर कधी टेबलाचा खण उपसून पहातो. हातांत एक टॉर्च, खांद्यावर दुर्बीण लटकतेय. मधूनच दुर्बीण डोळ्यांना लावून तो खोलीची तपासणी करतो. हे सर्व चाललेलं असतानाच आंतून राजू, हर्षद, नितीन, सुनील व जयंत खोलीत प्रवेश करतात. त्या बुरखाधारी व्यक्तीला पाहून ते दचकतात आणि एका कोपर्‍यात राहून आपापसात कुजबुजायला लागतात. )
नितीन : राजू, घरात चोर शिरलाय...
राजू : चोरबीर नाही, आपल्या घरावर धाड पडलीय, धाड.
जयंत : कुणाची धाड?
राजू : पोलिसांची, अजून कोणाची? नीट बघ, तो आपल्या गुप्त धनाचा शोध करतोय.
हर्षद : आणि आपण गप्प उभे राहून तमाशा बघतोय.
सुनील : पण त्याला सापडणार तरी काय इथं? आपण तर सर्व वस्तू आत्ताच लपवून ठेवल्यात.
राजू : अरे, पण त्याने घरात प्रवेश करून आपल्या वस्तू ज़प्त करण्याचा प्रयत्न तर केलाय.
हर्षद : मग करायचा का अटॅक?
( याचवेळी तो माणूस हातातला टॉर्च पलंगावर ठेवून कोपर्‍यातल्या बुटांच्या कपाटाकडे जातो व एकेक बूट काढून बघायला लागतो. हलक्या पावलांनी मुलं पुढे सरकतात. राजू पलंगावरचा टॉर्च घेऊन पुढे होतो व जोराने त्या माणसाच्या डोक्यावर हाणतो. "मेलो...मेलॊ.." असं ओरडत तो माणूस ज़मिनीवर पडतो. राजू व हर्षद त्याचे खिसे तपासायला लागतात. )
सुनील : सांपडलं का कांही?
हर्षद : ही फणी सांपडली.
नितीन : आपल्याला काय उपयोग या फणीचा? शाळेत लांब केस ठेवायला तर परवानगी नाही.
जयंत : त्या डिसूझा सरांचे केस मात्र ज़मीन साफ करीत असतात. त्यांना कुणीच काही बोलत नाही.
राजू : शिक्षकांमुळे कधी शिस्त बिघडत नसते... बिघडते ती आम्हां मुलांमुळे
नितीन : ती फणी दे बघू इकडे. आतां मी सुद्धा केस वाढवतो शाहरुख खानसारखॆ.
जयंत : नको, उगीच राडा नको शाळेत. परत ठेव ती फणी. अजून काही आहे का बघ.
हर्षद : एक पेन आहे.
नितीन : इथं दे.
हर्षद : शाई गळतेय त्यातून.
जयंत : (खाली पडलेल्या माणसाकडे निरखून पहात) बॉस, हा काहींच हालचाल करीत नाही. मेला तर नसेल ना?
( खाली पडलेला माणूस, शेम्स पॉण्ड नांव, मान उचलून वर पहातो. )
शेम्स पॉण्ड: अजून नाही, पण अजून जोराने मारलं असतंत तर नक्कीच मेलो असतो. आतां फक्त बेशुद्ध पडलो होतो.
जयंत : नशीब, जिवंत आहे ते, नाहीतर आणखी लफ़डं झालं असतं.
राजू : (शेम्स पॉण्डला उठवून बसवीत) आधी तो तोंडावरचा बुरखा काढा. तुमचं थोबाड तरी बघूंदे आम्हाला.
( शेम्स पॉण्ड चेहर्‍यावरचा बुरखा काढायचा निष्फळ प्रयत्न करतो. शेवटी बुरखा फाडून काढतो, आणि डोकं चोळायला लागतो. )
हर्षद : (त्या माणसाला पाहून चकीत होऊन) श्यामकाका, तुम्हीं?
राजू : हर्षद, तू ओळखतोस ह्यांना?
हर्षद : चांगलाच. आमच्याच बिल्डींगीत रहातात. ह्यांच नांव शामराव पाण्डे.
शेम्स पॉण्ड: हर्षद, प्लीज़, त्या नावाने हाक मारू नकोस. अंगावर कसं झुरळ चढल्यासारखं वाटतं. माझं नाव शेम्स पॉण्ड.
नितीन : तुम्हाला जेम्स बॉण्ड म्हणायचंय?
शेम्स पॉण्ड: नव्हे, शेम्स पॉण्डच. शामराव पाण्डेचा झाला शेम्स पोण्ड.
हर्षद : काका, तुम्ही नाव केव्हांपासून बदललं?
शेम्स पॉण्ड: हा धंदा सुरू केल्यापासून.
राजू : म्हणजे चोरीचा धंदा?
शेम्स पॉण्ड: मी चोर वाटतो तुम्हाला?
नितीन : तो काळा बुरखा घालून तुम्ही काळा पहाड वाटता. माझे आजोबा सांगायचे, मराठीतला प्रसिद्ध सीक्रेट एजण्ट.
शेम्स पॉण्ड: मी देखील सीक्रेट एजण्टच आहे.
सुनील : मिस्टर, तुम्ही फार फार तर सिग्रेटचे एजण्ट वाटता. पण तुम्ही इथं काय करताय? हें पानबिडीचं दुकान नाही.
शेम्स पॉण्ड: मी सीक्रेट एजण्टच आहे. तो जसा जेम्स बॉण्ड, तसा मी शेम्स पॉण्ड. अरे हर्षद, सांग ना तुझ्या मित्रांना.
हर्षद : ओ, सांगायला विसरलो, मीच यांना बोलावलं होतं, आपल्या गुप्त खजिन्याच्या रक्षणासाठी.
नितीन : या सॅम्पलला?
शेम्स पॉण्ड: हें बघा, मी सॅम्पल नाही. पण दिसतो तितका सिम्पलही नाही. मी एक गुप्त हेर आहे. आधी इथल्याच एका बॅंकेत कारकुनी करीत होतो. बायकोच्या ज़ाचाने कंटाळा आला म्हणून मी बॅंकेची नोकरी सोडली आणि हा गुप्त हेराचा धंदा सुरू केला. नाव जेम्स बॉण्ड्शी rhyme व्हावं म्हणून श्यामराव पाण्डे बदलून शेम्स पॉण्ड ठेवलं.
हर्षद : मी आजच्या पेपरात ह्या धाडींची बातमी वाचली आणि ठरवलं की आपल्याला सुद्धा एक गुप्त हेराची गरज आहे, तेव्हा शामकाकांना बोलवावं. तसंही त्यांना कुणी गिर्‍हाईक मिळत नव्हतं...
सुनील : म्हणून त्यांनी तुला गिर्‍हाईक बनवलं! दुसरं काय?
राजू : फार लागलं नाही ना, शामकाका?
शेम्स पॉण्ड: शामकाका नको रे, शेम्स पॉण्डच म्हण. निदान शेम्स अंकल तरी.
राजू : सॉरी, शेम्स अंकल. या हर्षदनं मला काहीच सांगितलं नव्हतं.
हर्षद : शिवाय तुमचा हा काळा बुरखा पाहून मी सुद्धां ओळखलं नाही तुम्हाला. फार लागलं नाही ना?
शेम्स पॉण्ड: (तोंड वेडंवाकडं करीत) नाही, फार लागलं नाही..
सुनील : मग पुढच्या वेळी जास्त जोरानं मारूं. (शेम्स पॉण्ड दचकतो.) अहो, तुम्हाला नाही, शत्रूला जोरानं मारूं
शेम्स पॉण्ड: (हंसत) नो प्रॉब्लेम. हेरगिरी करायची म्हणजे थोडाफार मार खाणं ओघाओघाने आलंच.
जयंत : अन मार देणंसुद्धा. लक्षात असूं दे.
नितीन : काका, तुम्ही दिवसासुद्धा टॉर्च वापरतां?
शेम्स पॉण्ड: अंधार असला की वापरतो. आणि ह्या बुरख्यामुळे अंधाराशिवाय कांही दिसत नव्हतं.
नितीन : मग बुरखा घातला तरी का?
शेम्स पॉण्ड: बुरखा घातला की शत्रूवर जरा impression पडतं, म्हणून घालतो. कुठं आहे शत्रू?
हर्षद : शत्रू यायचा आहे अजून.
सुनील : पण काका, आमचं रक्षण तुम्हीं करणार कसं? तुमच्याकडे हत्यार तरी कुठे आहे?
शेम्स पॉण्ड: (खिशांतून फणी काढून) हे काय माझं हत्यार? ह्यापुढं मोठेमोठे शत्रूदेखील नरम पडतात.
सुनील : (फणी घेऊन केस विंचरायचा प्रयत्न करीत) काका, या फणीनं साधे केससुद्धा नरम पडत नाहीत, का धड विंचरता येत नाहीत. शत्रू कसला नरम पडतोय?
शेम्स पॉण्ड: साधी फणी नाही ही. ह्यावरचं हे छोटं बटण फिरवलं की याच्या प्रत्येक दांतातून एक सुरा बाहेर निघतो.
जयंत : बापरे बाप! अजून काही?
शेम्स पॉण्ड: (खिशातून पेन काढून दाखवीत) हे पेन. (दांत काढून हंसत) दिसतं तेवढं साधंसुधं पेन नाही...
राजू : माहित आहे, शाई गळणारं पेन आहे तें.
शेम्स पॉण्ड: चूक. शाई गळणारं पेन होतं तें, पण मी बॅंकेत असताना. त्यावेळी माझं हत्यार हें पेन होतं. पण आतां हे पेन माझं हत्यार आहे.
नितीन : म्हणजे?
शेम्स पॉण्ड: हेरगिरी सुरू केल्यानंतर मी ह्याचं ओपरेशन करून घेतलं. (पेन उघडून दाखवीत) हे या पेनचं नीब, रशियात तयार केलेलं आहे. ह्यांत एक तीक्ष्ण सुरा बसवलेला आहे. हें याचं टोपण, अमेरिकेत बनवलेलं आहे. ह्यामध्ये एक छोटासा आरसा फिट‍ केलेला आहे.
राजू : हें सगळं वर्णन ऐकून मलाच फीट ... म्हणजे चक्कर येतेय.
शेम्स पॉण्ड: ही या पेनची बॉडी, जर्मनीत तयार केलेली आहे. ही डाव्या बाजूला फिरवली की पिस्तुल बाहेर येतं, आणि उजव्या बाजूला फिरवलं की ह्यांत बसवलेला कॅमेरा स्टार्ट होतो. काय, आहे की नाही गम्मत? खूप हिंडून चॊर बाज़ारातून विकत घेतलंय मी.
राजू : सॉलीड धमाल आहे. तुम्हींसुद्धा माझ्यासारखंच ठीकठिकाणांहून वस्तू गोळ्या केलेल्या दिसतात. पण आम्हीं नाही कुठली वस्तू चोर बाज़ारांत घेतलेली.
शेम्स पॉण्ड: काय करणार बाबा. आमचा धंदाच तसा आहे.
सुनील : हुं..कधी इथून उचल, तर कधी तिथून उचल.
शेम्स पॉण्ड: पण काही म्हणा पोरांनो, ह्या धंद्यांत थ्रिल आहे.. धाडस आहे.. प्रत्येक मिशनवर जाताना...
सुनील : मशीनवर सुद्धा जावं लागतं?
शेम्स पॉण्ड: मशीनवर नाही, मिशनवर.. म्हणजे कामगिरीवर. तुम्हाला नाही कळणार. बरं आत्तां माझी कामगिरी काय आहे ते सांगा पटकन.
राजू : फार कठीण नाही. आमच्याकडे लाख-दोन लाखांचा खजिना आहे...
शेम्स पॉण्ड: (गोंधळून जाऊन) ... क ...क...किती?
राजू : असेल लाख-दोन लाखांचा.
शेम्स पॉण्ड: (बोटांवर मोजायचा प्रयत्न करीत) म्हणजे एकावर किती शून्यें?
जयंत : शेम्स अंकल, तुम्हाला माहीत नाही? बॅंकेत होता ना तुम्हीं?
शेम्स पॉण्ड: पण कधी हज़ारांपलीकडे नोटा मोजल्या नाहींत.
राजू : जाऊं दे, किती शून्यं ते महत्वाचं नाही. सरकारचा व पोलिसांचा तर डोळा आहेच आमच्या खजिन्यावर. याशिवाय आमचे काही मित्र...
नितीन : बॉस, मित्र नाही, शत्रू ..
सुनील : चोर? ...नुसते चोर नाही, महाचोर.
शेम्स पॉण्ड: कोण? सरकार? की पोलिस?
हर्षद : आमच्या दुश्मनांची गॅंग. तुम्हाला आम्ही एवढ्याकरता बोलावलंय की तुम्ही आमच्या शत्रूपक्षाला आमच्या खजिन्यापर्यंत पोचूं द्यायचं नाही.
शेम्स पॉण्ड: एवढंच ना? ती माझी जबाबदारी. तुम्ही सगळं माझ्यावर सोपवा आणि बिनधास्त रहा.
राजू : चला, आपण चौपाटीला जाऊन येवू.
सुनील : भेळ खायला?
हर्षद : भेळ सोडली तर चौपाटीला खाण्यासारखी अजून एक वस्तू आहे.
सुनील : कोणती?
हर्षद : तिथली थंडगार हवा.
राजू : पण आम्ही तिथं जातोयं ते भेळ किंवा हवा खायला नव्हे. आम्ही जातोय तिथले शंख आणि शिंपले गोळा करायला.
हर्षद : पुढल्या महिन्यात आपल्या शाळेत शंख आणि शिंपल्यांचं प्रदर्शन आहे. पण तुझ्या बहुतेक लक्षात देखील नसेल हे.
सुनील : लक्षात आहे. पण चौपाटी म्हटलं की मला फक्त भेळपुरी आणि पाणीपुरीवालेच आठवतात.
राजू : बोलण्यात वेळ नका घालवू. आपल्याला लवकर परत यायचंय.
सुनील : वेळ नका घालवू. चला लवकर. भेळपुरीवाले माझी वाट पहाताहेत. तुम्ही शंख-शिंपले जमा करा, मी भेळपुरी खातो.
( सगळेजण बाहेर निघून जातात. राजू पलंगावरची एक रिकामी पिशवी उचलतो व बाहेर जातो. मुलांनी गेल्यावर शेम्स पॉण्ड काही वेळ इथंतिथं फिरतो. काहीवेळ दुर्बीणीतून बघत राहतो. शेवटी काही न सुचून खाली पडलेला फाटका बुरखा उचलतो, तोंडावर चढवतो, आणि पटकन पलंगाखाली जाऊन लपतो. एवढ्यात बाहेरून एक मुलगा (अजीत) चोरट्या पांवलानी आंत शिरतो. इथंतिथं पहात तो पलंगाजवळ येतो आणि खाली वाकून तपासणी करायला लागतो. याचवेळी पलंगाखालून शेम्स पॉण्ड अचानक आपलं डोकं बाहेर काढतो. फाटका बुरखा असलेलं ते तोंड पाहून अजीत घाबरतो आणि "भूत-भूत" म्हणून ओरडत बाहेर पळून जातो. शेम्स पॉण्ड दचकून बाहेर येतो. "भूतभूत" ही आरोळी ऐकून त्याची चांगलीच घाबरगुंडी उडलेली असते. टॉर्च लपवून तो भुताचा शोध घ्यायला लागतो. याच-वेळी बाहेरून येणार्‍या अजीतची व त्याची टक्कर होते. दोघेही घाबरून एकमेकांना सामोरे येतात आणि ओरडायला लागतात, "भूत-भूत". दोघेही दोन्ही बाजूंनी पळत सुटतात. काही वेळाने दोघे परत बाहेर येतात आणि एकमेकांना सामोरे जातात. )
शेम्स पॉण्ड: तू कोण?
अजीत : तुम्हीं कोण?
शेम्स पॉण्ड: मी आधी विचारलं. तू कोण?
अजीत : मी अजीत.
शेम्स पॉण्ड: मग भूत कुठाय?
अजीत : (त्यांच्याकडे बोट दाखवून) तुम्ही.
जेम्स पॉण्ड: मी भूत नाही.
अजीत : म्हणजे माणूस आहात तर?
जेम्स पॉण्ड: माणूस नाही...
अजीत : माणूस नाही... भूत देखील नाही. मग तुम्ही आहात तरी कोण?
शेम्स पॉण्ड: म्हणजे मी माणूस आहे, पण साधा माणूस नाही, डिटेक्टिव आहे. सीक्रेट एजण्ट, शेम्स पॉण्ड.
अजीत : (हंसत) आणि मी तुम्हालाच भूत समजलो.
शेम्स पॉण्ड: होतं असं कधीकधी. मागे मी आमच्या घरात उंदीर मारत होतो तेव्हां माझा मुलगा देखील मला भूत समजला होता.
अजीत : ते कसं?
शेम्स पॉण्ड: माझ्या बायकोनं हातांत काठी देऊन उंदीर मारायला म्हणून मला किचनमध्ये ढकललं. दोनतीन तास आमचा लढा चालू होता. कधी मी पुढे तर उंदीर मागे. कधी उंदीर पुढे, मी मागे. मी बाहेर आलो तेव्हा माझं तोंड कोळशानं आणि पिठानं माखलेलं होतं. माझा मुलगा मला भूत समजला आणि चक्कर येऊन पडला. तेव्हा माझी बायको माझ्या मागे लागली. मग कधी मी पुढे, ती मागे. तर कधी ती पुढे, मी मागे. (अचानक लक्षात येऊन थांबतो.) पण मी तुला हे सगळं का सांगतोय? तू माझ्याकडे गप्पा मारत राहू नकोस. मला माझी कामगिरी पार पाडायची आहे.
अजीत : कसली कामगिरी?
शेम्स पॉण्ड: हर्षद आणि त्याच्या मित्रांच्या खजिन्यावर त्याच्या शत्रूंचा डोळा आहे. त्यांना दूर ठेवण्याची कामगिरी त्यांनी माझ्यावर सोपवली आहे. आधी मला सांग, तू मित्र आहेस की शत्रू?
अजीत : शत्रू ... सॉरी, सॉरी, मित्र आहे. मित्रच म्हणा ना.
शेम्स पॉण्ड: मग हरकत नाही.
अजीत : हे बघा काका, तुम्ही पहारा देऊन दमला असाल. आतां थोडा वेळ आराम करा. मी पहारा देतो.
शेम्स पॉण्ड: कुणाला सांगणार नाहीस ना?
अजीत : Mother promise, नाही सांगणार. तुम्हीं बिनधास्त झोपी जा.
( शेम्स पॉण्ड जाऊन पलंगावर पडतो आणि थोड्याच वेळात घोरायला लागतो. अजीत हलक्या पावलांनी त्याच्याकडे जाऊन तो झोपला असल्याची खात्री करतो. घाईघाईने इथंतिथं काही सांपडतंय का ते पहातो. काही सांपडत नाही म्हणून निराश होतो. तेवढ्यात बाहेरून त्याचे मित्र सुजीत, दिलीप, सुहास आणि संजय प्रवेश करतात. )
सुजीत : अजीत, तूं इथं काय करतोयस?
अजीत : (वैतागून) माश्या मारतोय.
सुजीत : नीट बोलता येत नाही?
अजीत : नीटच बोलतोय. खरोखरच माश्या मारतोय. कुठे काही सापडत नाही. सगळा माल कुठेतरी लपवून लेकाच्यांनी पळ काढलेला दिसतोय.
सुजीत : तुला काय माहीत?
अजीत : मी बाहेर लपून बसलो होतो, तेव्हा त्यांना घाईघाईनं कुठेतरी जाताना पाहिलं.
सुजीत : पण आम्हाला सोडून तू इथं आंत आलासच कशाला? आपण बाहेर भेटायचं ठरलं होतं.
अजीत : आपण बरोबर अकरा वाजता भेटायच ठरलं होतं, आठवतंय ना? आता साडे अकरा वाजत आले.
सुहास : आम्हाला वाटेत थोडा उशीर झाला.
अजीत : ही माझी चूक झाली? मी बाहेर असताना या माणसाला आत शिरताना पाहिलं आणि स्वत: आत आलो.
सर्वजण : (पलंगाकडे पाहून ओरडत) हा कोण?
अजीत : शेम्स पॉण्ड: राजूच्या गॅंगने आपल्या खजिन्याचं रक्षण करायला याला नेमलंय.
सुजीत : (निरखून पहात) ह्या मॅडकॅपला? याच्याकडे पाहिलं तर हा स्वत:चं सुद्धा रक्षण करूं शकेल की नाही याची शंका आहे. हा काय खजिन्याचं रक्षण करणार?
अजीत : मिस्टर, दिसतं तसं नसतं...
सुहास : ...अन म्हणूनच जग फसतं.
अजीत : ह्याच्या बोलण्यावरून हा वाटतो बावळट, पण कदाचित बावळटपणाचा केवळ आव आणत असेल. म्हणूनच आपण फसलो.
संजय : आपण फसलो?
अजीत : आपणा सर्वांना पुरता मामा बनवून राजूची गॅंग पसार झालीय.
दिलीप : आता काय होणार?
अजीत : होणार काय? आपल्या डोळ्यांत धूळ झोंकण्याकरिता म्हणून तर त्यांनी या बावळटाला नेमलं..
संजय : आणि आपण बावळट बनलो.
सुजीत : अद्याप नाही. मला अजूनही वाटतं की त्यांचा खजिना इथंच कुठंतरी असेल.
सुहास : मग शोधत बसा.
सुजीत : शोधावा तर लागेलच. हा गुप्त खजिना आपण सरकारच्या हाती दिला तर आपल्या गॅंगला सरकारकडून मोठं बक्षीस मिळेल. पेपर्समध्ये लिहून आलंय तसं.
संजय : पण इथं खजिना नाही म्हणजे बक्षिसाची फक्त स्वप्नंच बघा.
सुजीत : (वैतागून मोठयाने ओरडतो) मूर्खासारखं काहीतरी बोलू नका. खजिना इथंच लपवलेला आहे आणि तो आपल्याला शोधायलाच हवा.
अजीत : पण म्हणून त्यासाठी ओरडायलाच हवं का? हा शेम्स पॉण्ड उठला तर बोंबा मारत फिरा.
( याचवेळी शेम्स पॉण्ड पलंगावरून उठून बसतो. )
शेम्स पॉण्ड: मग मारा बोंबा. (अजीतला) तू स्वत:ला राजूचा मित्र म्हणवतोस ना? मला आराम करायला सांगत होतास ना? आतां तुम्हीच आराम करा. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं. त्तुम्हां कुणालाही इथून हलूं देणार नाही मी आतां.
सुजीत : मिस्टर शेम्स पॉण्ड, आमचं चुकलं... आम्हाला प्लीज़, माफ करा.
शेम्स पॉण्ड: खजिना सरकारला देऊन बक्षीस पाहिजे होतं ना तुम्हाला? जेम्स बॉण्डचा गुरू शेम्स पॉण्ड इथं हज़र असताना तुम्ही खजिन्याच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही. (सगळेजण हलायचा प्रयत्न करतात. तेवढ्यात खिशातून फणी काढून त्यांच्यावर रोखून) खबरदार, कुणी हालचाल केलीत तर! ही फणी घालून जीव घेईन तुमचा.
सुजीत : नुसता बावळट नाही, मूर्खसुद्धा आहे हा. फणी घालून जीव घेणार म्हणे.
शेम्स पॉण्ड: (दांत विचकून) साधीसुधी फणी नाही ही. हिच्या प्रत्येक दांत्यात एकेक तीक्ष्ण सुरा बसवलेला आहे.
संजय : आम्हाला मूर्ख समजता? फणीत कधी सुरे बसवलेले असतात वाटतं?
शेम्स पॉण्ड: ह्यांत बसवलेले आहेत. नसेल विश्वास बसत तर स्वत: हातांत घेऊन बघा. (फणी संजयच्या हातात देतो.)
संजय : (फणी शेम्स पॉण्ड्वर रोखून) मिस्टर शेम्स पॉण्ड, प्रत्येक दांत्यात सुरा बसवलेली तुमची फणी आतां माझ्या हाती आहे.
शेम्स पॉण्ड: (खिशातून पेन काढून) काळजी करायचं कारण नाही. मी emergency करता हे पेन जवळ बाळगतो.
सुहास : असलीं पेनं बाज़ारात पांचपांच रुपयांना मिळत असतात.
शेम्स पॉण्ड: असलीं पेनं मिळत असतील, पण हें पेन नाही मिळणार. याच्या निबमध्ये deadly हत्यार बसवलेलं आहे.
दिलीप : बघूं बघूं. (हात पुढे करतो.)
शेम्स पॉण्ड: (पटकन हात मागे घेत) एकच चूक परत परत करत नसतो मी. तुमच्या युक्त्यांना आतां नाही फसणार मी. ह्याच खोलीत डांबून ठेवणार आहे मी तुम्हांला.
सुहास : केव्हापर्यंत?
शेम्स पॉण्ड: राजू आणि त्याचे मित्र परत येईपर्यंत.
सुजीत : पण ते तर तुमच्या मागेच उभे आहेत.
( शेम्स पॉण्ड अचानक मागे वळून पाहतो. त्याने वळल्याबरोबर सर्वजण त्याच्यावर हल्ला करतात व त्याला खाली पाडतात. तो स्वत:ला सोडवून घ्यायची धडपड करत असतानांच मुलं पलंगावरची चादर काढून त्याला बांधून ठेवतात व त्याच्या तोंडात बोळा कोंबतात. )
सुजीत : चला, या पाहुण्याची कटकट मिटली. आतां घाई करून आतल्या खोलीत खजिन्याचा शोध लावला पाहिजे.
( सगळेजण आत जायला वळतात त्याचवेळी राजू, हर्षद, जयंत, नितीन खिडकीतून पटापट उड्या मारून खोलीत प्रवेश करतात. मागून सुनील धडपडत प्रवेश करतो. )
राजू : सुजीत, आतल्या खोलीत काही सापडणार नाही तुम्हाला.
( सगळेजण दचकून मागे वळून पहातात.)
हर्षद : आमचा डाव यशस्वी झाला. अजीत, तूं जसं आम्हाला जाताना पाहिलंस तसंच मी तुला खाली उभा राहिलेला पाहिला.
सुजीत : (वैतागून अजीतला) स्वत:ला खूप शहाणा समजत होतास. झालास की नाही दीड शहाणा? घे आतां.
सुनील : सर्वच जण घ्या आत्तां. खजिना शोधूनशोधून खूप थकला असाल. भूक सुद्धा लागली असेल तुम्हाला, नाही? आतं आमच्या हातचा थोडा चोप खा. तोपर्यंत मी किचनमध्ये काही खायला मिळतं का बघतो.
( सुनील किचनकडे जातो. बाकीची मुलं सुजीतच्या गॅंगवर हल्ला करतात. काही वेळ त्यांची मारामारी चालू रहाते. शेवटी राजूच्या गॅंगची मुलं सुजीतच्या गॅंगमधल्या मुलांना हात मागे धरून उभं करतात. )
राजू : सुजीत, रॉबिन हुडच्या गॅंगला हरवणं तुम्हाला वाटतं तितकं सोप्पं नाही.
हर्षद : शिवाय आमचा खजिना आम्हांला आमच्या प्राणांहून प्रिय आहे. तो आमच्यापासून हिरावून घेणं तुम्हांलाच काय, भारत सरकारला सुद्धा जमणार नाही.
सुजीत : राजू, आम्हाला माफ कर. आम्हीं चुकलो.
सुनील : राजू, माफ कसला करतोयस ह्यांना? अजून चोप दे. परत कधीं रॉबिन हुडच्या टोळीशी टक्कर देण्याची हिम्मत नाही करणार.
जयंत : काय, जिरली की नाही पुरती?
सुजीत : जिरली, पुरती जिरली. ह्यापुढे आम्ही तुमचे शत्रू नाही. आम्ही शरण येतोय तुम्हाला.
अजीत : आम्हाला तुमच्या गॅंगमध्ये सामील व्हायचंय.
नितीन : तुमच्यासारखे देशद्रोही आम्हाला आमच्या गॅंगमधे नकोयत.
राजू : नितीन, असं नाही म्हणायचं. तू सिनेमे खूप पहात असतोस ना? मग, सिनेमाचा हीरो नाही का व्हिलनला सिनेमाच्या शेवटी माफ करीत?
हर्षद : शरण आलेल्या शत्रूंना जीवदान देणं हें आपलं कर्तव्य आहे.
शेम्स पॉण्ड: (स्वत:ला सोडवून घ्यायचा प्रयत्न करीत) अरे, कुणीतरी मला जीवदान द्या.
( सगळ्यांचं लक्ष शेम्स पॉण्डकडे जातं. सुजीत आणि अजीत जाऊन त्याला सोडवतात. तो आपलं अंग चोळीन "हाश्श-हुश्श" करीत उभा राहतो. )
सुजीत : सॉरी, मिस्टर शेम्स पॉण्ड.
शेम्स पॉण्ड: सॉरी तुम्हीं कशाला? सॉरी तर मला व्हायला पाहिजे. बॅंकेतली नोकरी सुटल्यावर गुप्त हेरांचे सिनेमे पाहून पाहून डोकं फिरलं आणि हा गुप्त हेराचा धंदा सुरू केला. आता कळलं की ही खायची गोष्ट नाही.
सुनील : बरोब्बर बोललात, ही अजिबात खायची गोष्ट नाहीं.
शेम्स पॉण्ड: "यह अपने बस का रोग नही".
हर्षद : श्यामकाका...
नितीन : श्यामकाका नाही, शेम्स पॉण्ड म्हण.
शेम्स पॉण्ड: नको नको. श्यामकाकाच ठीक आहे. मी शेम्स पॉण्डला retire करून परत श्यामकाका व्हायचं ठरवलंय.
हर्षद : उत्तम केलंत. घरी जा. राधाकाकू वाट पहात असेल.
( शेम्स पॉण्ड लंगडत लंगडत बाहेर जातो. सगळेजण हसायला लागतात. )
राजू : Welcome to the Robin Hood Gang.
सुजीत : रॉबीन हुडची गॅंग ज़िंदाबाद.
हर्षद : ही आरोळी मात्र थोडी चुकली.
राजू : का, काय झालं?
हर्षद : आपण म्हणायला हवं "धडाधड धाडी ज़िंदाबाद".
सुजीत : ही कसली आरोळी? धडाधड धाडी ज़िंदाबाद?
हर्षद : हीच तर खरी आरोळी. देशभर ह्या ज्या धडाधड धाडी पडताहेत त्यांच्यामुळेच तर आपले शत्रू आपले मित्र झाले, खरं ना?
राजू : अगदी खरं.
हर्षद : तर सगळे मिळून म्हणा, "धडाधड धाडी ज़िंदाबाद!"
( सगळे जण मोठ्याने ओरडतात, "धडाधड धाडी ज़िंदाबाद!!" )

* * * * * (हळूहळू पडदा पडायला सुरवात होते.) * * * * *

लेखक:
लक्ष्मीनारायण हटंगडी
EC51/B104, SAI SUMAN CHS,
EVERSHINE CITY, VASAI (E)
PIN 401208
( suneelhattangadi@gmail.com )

No comments:

Post a Comment