Thursday, June 24, 2010

झोपाळू राजाची गोष्ट

पात्रें (प्रवेशानुक्रमें)
१) दवंडीवाला
२) एक पोरगा
३) राजज्योतिषी
४) राजवैद्य
५) राजगायक
६) राजविदूषक
७) द्वारपाल
८) लट्ठू
९) राजेसाहेब
१०) राणीसाहेब
११) राजकन्या
व इतर बरेच जण

अंक पहिला
(प्रवेश पहिला)

( एका राज्यातील एका रस्त्याचा देखावा. पडदा उघडतो तेव्हा स्टेजवर कुणीच नसतं. आतून तोतरं बोलण्याचा आवाज ऐकू येतो आणि एक दवंडीवाला प्रवेश करतो. )
दवंडीवाला : ऐका हो, ऐका ...
एक पोरगा : (स्टेजवर धावत येत) अडबड गडबड बडबड धडपड नगरीच्या राजाला दोन बायका ...
दवंडीवाला : ए, असं उगीच काहीतरी नाही बोलायचं. आमच्या राजाला एकच बायको आहे.
पोरगा : बरं असूं दे एक बायको. सांग, तू दवंडी कशाला पिटतोयस?
दवंडीवाला : अरे, तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय. तू अडवलंस. (मोठ्याने बोलायचा प्रयत्न करीत) ऐका हो, ऐका...
पोरगा : ए, लवकर सांग ना. मघापासून सारखं ऐ..ऐ..ऐ.. करत आहेस!
दवंडीवाला : जरा गप्प बस. बोलताना कुणी अडवलं तर मला त्रास होतो.
पोरगा : ठीक आहे, गप्प बसतो. पण आधीच सांगून ठेवतो, मला बोलावसं वाटलं तर मात्र मी बोलणार हं. आपल्याला नाही बुवा गप्प बसायला आवडत. शाळेत सुद्धा मी बडबडत असतो. मग मास्तर म्हणतात ...
दवंडीवाला : गप्प! हाताची घडी, तोंडावर बोट.
पोरगा : (खुश) अगदीं अस्संच म्हणतात.
दवंडीवाला : प्लीज़, आता मला दवंडी पिटायची आहे.
पोरगा : ... आणि मला दवंडी ऐकायची आहे. तू आपला मघापासून फक्त "ऐका हो, ऐका..." करतोयस.
दवंडीवाला : ऐका हो, ऐका. अडबड गडबड बडबड धडपड नगरीच्या राजाने ...
पोरगा : तू दवंडी पिटतोयस खरा, पण तुझी दवंडी ऐकायला इथं माझ्याशिवाय दुसरं आहे तरी कोण?
दवंडीवाला : खरंच. तू लवकर जा आणि सर्वांना सांग की सर्वांनी अस्साल तस्सं इथं यावं. महत्वाची दवंडी पिटायची आहे.
पोरगा : ठीक आहे. बघच तू आता कशी दवंडी पिटतो ते. (त्याच्या हातून ढोलकं घेवून पिटायला लागतो.) ऐका हो, ऐका. दवंडीवाला दवंडी पिटतोय पण ऐकायला कुणीच नाही. तेव्हा सर्व लोकांनी जस्सं अस्साल तस्सं यावं हो...
( काहीवेळ ओरडत रहातो. आतून बरीचशी माणसं यायला सुरू होतात. राजवैद्य आपल्या बायकोला ओढत आणतो, बायकोचा दंड त्याच्या हातात. राजगायक हातातल्या थाळीतून काहीतरी खात प्रवेश करतो. दोनतीन मुलं हातात पाट्यापुस्तकं घेवून अभ्यास करीत येतात. राजज्योतिषी डाव्या काखेत एक पुस्तकाचे बाड संभाळण्याचा प्रयत्न करीत दुसर्‍या हाताने आपलं धोतर सावरीत प्रवेश करतो. एक बाई पोळपाट-लाटणं घेवून येते व स्टेजवर आल्याबरोबर खाली बसून लाटायला सुरवात करते. राजविदूषक आपलं अर्धंच रंगवलेलं तोंड रंगवीत प्रवेश करतो. )
दवंडीवाला : आले का रे सर्वजण?
पोरगा : आता विचारून सांगतो. हां, तर जे कुणी इथं आलेले नसतील त्यांनी आपापले हात वर करावेत. (विदूषकाचा हात वर जातो.) ए दवंडीवाल्या, एक विदूषक सोडून इतर सर्वजण आलेयत.
ज्योतिषी : (काखेतलं पंचाग उघडून पहात) हे कसं शक्य आहे? या पंचागात लिहिल्याप्रमाणे या घटकेला विदूषक इथं असायला हवा. हे कसं शक्य आहे की तो हज़र नाही? सकाळचे दहा वाजत आहेत. एक मिनीट थांबा. मी आकाशातील नक्षत्रे पाहून अगदी बरोब्बर सांगतो. (वर आकाशाकडे पहात) सर्वं नक्षत्रें जागच्या जागी आहेत. म्हणून मी अगदी छाती ठोकून सांगतो की या क्षणाला विदूषक इथं असायलाच हवा. एकवेळ राजवैद्यांचं रोगाचं निदान खोटं ठरेल, पण माझं, राजज्योतिषी बोलखोटेशास्त्र्य़ांच, भविष्य कधीच खोटं ठरणार नाही.
राजवैद्य : (बायकोचा दंड सोडीत) हाँ, हाँ, बोलखोटेशास्त्री, आपलं तोंड संभाळून बोला. उगीच भलतंसलतं बोललात तर तुमच्या दंडातील नाडी हरवून टाकीन. साधासुधा वैद्य नाही मी. राजवैद्य सदारोगी म्हणतात मला. असे कितीतरी पेशंट्स माझ्या स्वत:च्या हाताने मारलेयत मी. एकवेळ माझं औषध चुकीचं ठरून माणूस मरेल, पण माझ्या रोगाचं निदान कधीच खोटं ठरणार नाही. राजगायकाने आळवलेला राग चुकेल, पण माझं निदान चुकणं त्रिवार अशक्य. हाँ, सांगून ठेवतो.
राजगायक : हाँ हाँ, राजवैद्य सदारोगी, माझ्या रागाबद्दल काही बोलूं नका. मला राग आला तर आता माझा खास निद्राराग आळवून तुम्हा सर्वांना झोपवून टाकीन. म्हणजे तुमची खात्री पटेल की राजगायक रडवेबुवांचा राग कधीच चुकत नसतो. आणि तुम्ही तुमच्या औषधाबद्दल मला काय सांगता? अहो, परवा माझ्या मुलाचे साधे डोके दुखत होते म्हणून मी त्याला या राजवैद्याकडे नेला. तर याने काय करावें? चक्क मुलाच्या पायातली नाडी शोधून त्याच्या कानात औषध घातले.
राजवैद्य : हाँ, हाँ, तशी एखादी चूक होते माणसाच्या हातून. चुकून हात पायाकडे गेला.
दवंडीवाला : मी तेच म्हणतोय. माझी दवंडी ऐकायची सोडून तुम्ही एकमेकांशी भांडत बसलायत हे चूक आहे.
राजज्योतिषी : ते खरं आहे रे. पण आधी हे भांडण सुरू कशावरून आणि कुठल्या मुहूर्ताला सुरू झालं ते बघायला हवे. (पंचांग उघडून बघायला लागतो.)
विदूषक : बोलखोटेशास्त्री, त्यासाठी पंचांग बघायची गरज नाही. भांडण माझ्यावरून सुरू झालं.
राजगायक : पण का?
विदूषक : हा पोरगा म्हणाला की ...
पोरगा : मी सांगतो मी काय म्हणालो ते. मी म्हणालो, जो माणूस इथं हज़र नाही त्याने आपले हात वर करावेत.
विदूषक : ... आणि मी हात वर केला.
राजगायक : पण मी असं म्हणतो की तू हज़र असताना हात वर केलाच का?
राजवैद्य : तू इथं हज़र नसतास तर एक वेळ हात वर करायला हरकत नव्हती. चूक तुझीच आहे.
राजज्योतिषी : आकाशातील नक्षत्रं तेच सांगतात. चूक तुझीच आहे.
विदूषक : पण चूक माझी नाही. आता जरा माझ्या तोंडाकडे पहा. (सगळेजण त्याच्याभोवती गोळा होतात.) पाहिलंत ना? आता मला जरा श्वास घेवूं द्या. आता सांगा, रोज मी असा दिसतो का?
( सगळेजण एकमेकांच्या चेहर्‍यांकडे बघतात. )
पोरगा : मी सांगतो, विदूषक रोज असा दिसत नाही.
विदूषक : हा पोरगा एकदम हुशार आहे. माझं तोंड पुरतं रंगवेलेलं नाही. म्हणजेच मी इथं आहे सुद्धा अन नाहीसुद्धा. काही प्रकाश पडला की नाही डोक्यात?
सर्वजण : बरोबर आहे. विदूषक इथं आहे सुद्धा व नाही सुद्धा.
विदूषक : म्हणूनच मी इथं असूनदेखील हात वर केला. कळलं?
सर्वजण : कळलं.
विदूषक : भांडण मिटलं?
सर्वजण : भांडण मिटलं?
विदूषक : असं मी तुम्हाला विचारलं. तुम्ही मला विचारायचं नाही. मिटलं भांडण?
सर्वजण : (ओरडून) मिटलं.
विदूषक : मग तुम्ही ओरडू नका. या दवंडीवाल्याला ओरडूं द्या. दवंडीवाल्या, सुरू कर तुझी दवंडी.
दवंडीवाला : (ढोलकं पिटीत) ऐका हो ऐका. अडबड गडबड बडबड धडपड नगरीचे राजे अगडबंब महाराज यांनी आता दरबारात तातडीची सभा भरवायचं ठरवलं आहे. तेव्हां समस्त मंडळीनी ताबडतोब दरबारात यावं हो. दवंडी संपली, माझं काम संपलं हो... (ओरडत निघून जातो,)
राजगायक : चला हो, चला आधी आपापल्या घरी. कारण आपल्याला जायचंय दरबारात. चला बोलखोटेशास्त्री.
राजज्योतिषी : चला हो सदारोगी.
राजवैद्य : चला हो, रडवेबुवा.
( सगळे जायला वळतात. )
विदूषक : थांबा हो थांबा.
सर्वजण : आता काय?
विदूषक : मला कुणीच हाक दिली नाही. (नक्कल करीत) "चला हो बोलखोटेशास्त्री, चला हो सदारोगी, चला हो रडवेबुवा". पण कुणीच म्हणत नाही, "चला हो विदूषकराव." कारण काय तर मला आपलं नावच नाही. आम्ही बिननावाचे विदूषक! तरी मी माझ्या बाबांना त्यांच्या लग्नाआधीपासून सांगत आलोय की मला नाव ठेवा. अक्षय कुमार... रणबीर कपूर...शाहरूखखान... कित्तीकित्ती चांगली नावे आहेत आपल्यापुढे. पण माझं कुणीहि ऐकत नाही. (मुसमुसून रडायला लागतो.)
राजज्योतिषी : (पंचांग पाहून) विदूषका, रडू नकोस. माझ्या पंचांगाप्रमाणे आज तुझा जन्म होण्याचा योग आहे.
विदूषक : आज माझा जन्म होण्याचा योग आहे. म्हणजे अजून मी जिवंतावस्थेत नाही? (रडायला लागतो.) मला कुणीतरी वांचवा रे...
राजज्योतिषी : तसं नव्हे रे विदूषका. आज तुझा जन्म होण्याचा योग आहे म्हणजे आज तुला नाव मिळण्याचा योग आहे.
विदूषक : असं होय? मग मी कशाला रडू? (डोळे पुसतो.) तसा आज मी दरबारात सत्याग्रह करणारच होतो, राजाला सांगणार होतो की जोपर्यंत मला माझं नाव मिळत नाही तोपर्यंत मी भूक लागेपर्यंत अन्नाचा थेंबही घेणार नाही.
पोरगा : त्याला पाण्याचा थेंब आणि अन्नाचा कणही घेणार नाही असं म्हणतात.
विदूषक : तेच म्हणायचं होतं मला.
राजवैद्य : कशाला बरं बोलावली असेल राजाने तातडीची सभा? राजा आजारी तर नाही ना?
राजज्योतिषी : अहो, आजारी असला तरी फक्त तुम्हाला बोलावण्यासाठी सभा बोलावणार नाही.
राजवैद्य : ते का?
राजज्योतिषी : कारण त्याच्या कुंडलीत एवढ्यात मरायचा योग नाही.
राजवैद्य : बोलखोटेशास्त्री, पुन्हा सांगतो, तोंड संभाळून बोला.
राजगायक : बरोबरच आहे. कुणातरी कवीने म्हटलेच आहे की प्रत्येक प्रसंगी सत्य बोलणे योग्य नव्हे.
विदूषक : ऐका. मी सांगतो, मी सांगतो.
सर्वजण : काय?
विदूषक : एक गम्मत सांगतो.
राजज्योतिषी : मग लवकर सांग. नाहीतर ...
राजवैद्य : नाहीतर काय होईल?
राजज्योतिषी : नाहीतर गमतीची वेळ टळून जाईल.
विदूषक : पण छोटीशीच आहे हो गम्मत.
राजगायक : लवकर सांग, नाहीतर गप्प तरी बस.
विदूषक : मला नाव नाही, कबूल?
सर्वजण : कबूल. तर?
विदूषक : या गोष्टीचा मला भंयकर त्रास होतो, कबूल?
सर्वजण : कबूल. तर?
विदूषक : माझ्याएवढाच तुम्हा सर्वांना सुद्धा या गोष्टीचा त्रास होतो, कबूल?
सर्वजण : कबूल. तर?
विदूषक : मला होतो, तुम्हाला होतो, तर राजेसाहेबांना देखील त्रास होत असेल. खरं की नाही? (सगळेजण रागाने त्याच्याकडे पहातात.) तर मला गंमत ही सांगायची आहे की माझं नव्याने बारसं करण्यासाठीच राजेसाहेबांनी आजची सभा बोलावली असेल.
राजगायक : अरे वेड्या, तुझ्या एकट्यासाठी सभा भरवायला राजा काही वेडा नाही. त्याला माझं गाणं ऐकायचा मूड आला असेल. माझं गाणं ऐकल्याशिवाय त्याला सकाळी कधीच झोप येत नाही.
राजज्योतिषी : आठवतंय, पक्कं आठवतंय. मागे एकदा मी चहा पिण्याचा मुहूर्त काढायला पंचांग पहात होतो, तेव्हा मला या गवईबुवांचं गाणं ऐकू आलं. मग विचारता काय? ताबडतोब झोपी गेलो. पंचागाचं पान तसंच उघडं होतं. संध्याकाळी यांचं गाणं संपल्यावर जाग आली, तो बघतो काय! अहाहा, काय अवर्णनीय दृश्य होतं ते!
राजगायक : म्हणजे तुम्हाला सुद्धा मान्य आहे ना की माझं गाणं ऐकून लगेच झोप येते? माझी तर खात्रीच आहे राजेसाहेबांनी नक्कीच माझं गाणं ऐकायला सभा भरवली आहे.
राजज्योतिषी : चूक. (पंचाग पाहून) यावेळी तुम्हाला राहू-केतू-सोम-मंगळ-बुध-गुरू-शुक्र-शनि-रवी वगैरे सर्व ग्रह ग्रासणार आहेत. यावेळी तुम्ही गायला तोंड उघडलंत तर राजाला झोप येण्याऐवजी तुम्हीच घोरायला लागाल. तेव्हा यावेळी तुम्ही न गायलेलं बरं.
राजवैद्य : अहो बोलखोटेशास्त्री, तुमच्या या पंचांगात हे लिहिलेलं नाही का, की तुम्ही केव्हा किती बोलावं किंवा मुळीच बोलूं नये?
राजज्योतिषी : आहे ना. आत्ताच बघा, आकाशातील नक्षत्रं सांगतात की ...
राजवैद्य : ... की या क्षणाला तुम्ही न बोललेलं उत्तम.
विदूषक : सदारोगीराव, टाळी द्या, टाळी.
राजवैद्य : (टाळी देत) ही दिली, पण कशासाठी?
विदूषक : आयुष्यात अगदी पहिल्यादांच तुम्ही बरोब्बर सल्ला दिला. बरं मंडळी, आता बोलण्यात वेळ नका घालवू. सभेला उशीर झाला. तुम्ही व्हा पुढे, मी हे एवढं तोंड रंगवून आलोच.
राजगायक : खरंच, बोलण्याच्या भरात आपण सभेचं विसरूनच गेलो. घाई करा, घाई.
( सर्वजण घाईघाईने निघून जातात. )

प्रवेश दुसरा

( राजदरबाराचा देखावा. स्टेजच्या मध्यभागी दोन सिंहासने आहेत -- एक राजासाठी, दुसरं राणीसाठी. सुरवातीला ही आसने रिकामीच असतात. बाकीच्या आसनांवर राजज्योतिषी बोलखोटेशास्त्री, राजवैद्य सदारोगी, राजगायक रडवेबुवा व इतर काहीजण येऊन हाश्शहुश्श करीत बसतात. सगळेजण जांभया देत असतात. अस्वस्थतेने आपापसात कुजबुजायला लागतात. एवढ्यात द्वारपाल घाईघाईने प्रवेश करतो. )
द्वारपाल : मंडळी, तुम्हां सर्वांना चांगलं माहीत आहे की दरबारात आल्यावर जास्त बोलायचं नसतं. राजा समोर असला की कसे सगळेजण गप्प असतात. मग राजा हज़र नसताना गप्प बसता येत नाही? आपल्या जिभेवर थोडा ताबा ठेवायला शिकावं माणसानं. निदान माझं उदाहरण घेऊन तरी गप्प बसा. आता राजेसाहेब आले आणि त्यांनी तुम्हाला इतकं बडबडताना पाहिलं की ते काय म्हणतील? आणि राजेसाहेब केव्हा येतील याचा काही नेम नाही. राजेच ते, मनाला वाटेल तसं वागतील. वाटेल तेव्हा येतील, वाटेल तेव्हा जातील, वाटेल तेव्हा झोपतील... आणि काय हो बोलखोटेशास्त्री, तुम्ही का सारखं आपलं पंचांग उघडून पहात असतां?
राजज्योतिषी : काही नाही. आम्हाला जास्त बोलू नका म्हणून तू स्वत: बडबड करतोयस, तेव्हा तुझे ग्रह कसे आहेत ते बघतोय.
राजवैद्य : आणि काय रे, आम्हाला तातडीने बोलवून घेवून स्वत: महाराज गेलेयत तरी कुठे?
द्वारपाल : मंडळी, तेवढं एक विचारू नका. राजेसाहेब एका खूप महत्वाच्या मामाला, म्हणजे, कामाला गेलेयत. एकदम खाजगी काम. ते काम कुठलं हे मला माहीत आहे, पण मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण त्यांना ते मुळीच आवडणार नाही. मी कामाशिवाय बोललेलं त्यांना मुळीच आवडत नाही. आणि माझी ती सवयही नाही. म्हणून मला काही विचारू नका कारण मला ते सांगता येणार नाही.
राजगायक : जरा कमी बोल रे बाळा. तुझा कर्कश्श आवाज ऐकवत नाही. आम्हाला तातडीनं बोलावून राजे कुठे गेले ते तुला माहीत नाही. म्हणजे आम्ही फक्त वाट पहायची. आणि त्या विदूषकाचाही पत्ता नाही. आम्हाला भयंकर कंटाळा येतोय बघ.
द्वारपाल : (हसत) मी तुमचा कंटाळा दूर करावा असं तुम्हाला वाटणं साहजिकच आहे. पण मग हे आधी नाही का सांगायचं? उगीच एवढं बोलून मी तुमचा व स्वत:चा वेळ दवडला नसता. थोडक्यात म्हणजे राजे कुठे गेलेयत हे तुम्हा सर्वांना जाणून घ्यायचे आहे.
सर्वजण : हो रे बाबा. लवकर सांग.
द्वारपाल : परत परत तेच का हो विचारता? एकतर मला ते ठाऊक नाही. जर मला ते माहीत असतं तर मी कदाचित सांगितलं असतं. पण जर मी ते सांगितलं असतं तर राजेसाहेब रागावले असते. आणि जर राजेसाहेब रागावले असते तर ...
राजवैद्य : ... तर त्यांनी तुझं डोकं उडवलं असतं. आणि आता तू गप्प नाही बसलास तर मी तुला विष देऊन मारीन. सार्‍या राज्यात मी प्रसिद्धच आहे याकरिता.
( एवढ्यात बाहेरून लठ्ठूचा आवाज ऐकू येतो,"अडबड गडबड बडबड धडपड नगरीचे राजे अगडबंब महाराज दरबारात हज़र होत आहेत हो." यामागून लठ्ठू प्रवेश करतो. )
लठ्ठू : दरबारात हज़र असलेल्यांनी आत्ता गप्प बसावं. मूर्खासारखी बडबड करू नये, कारण राजेसाहेब दरबारात येऊन बोलायला सुरवात करतील.
( बाहेरून राजेसाहेब आणि राणीसाहेब प्रवेश करतात. राजा बोलताबोलताना जांभया देत असतो.)
राजेसाहेब : राणीसाहेब, आम्ही दरबारात यायच्या आधी हा लठ्ठू काय म्हणत होता ते आम्हाला समजावून सांगा.
राणीसाहेब : महाराज, आम्ही स्वत: नीट ऐकलं नाही. लठ्ठू, आत्ता काय म्हणत होतास तू?
लठ्ठू : राणीसाहेब, आम्ही म्हणत होतो... (राणीसाहेब त्याच्याकडे कडक नज़रेने बघतात.) सॉरी, मी म्हणत होतो, "दरबारात हज़र असलेल्यांनी आता गप्प बसावं. मूर्खासारखी बडबड करू नये, कारण राजेसाहेब दरबारात येऊन बोलायला सुरवात करतील."
राणीसाहेब : महाराज, लठ्ठू म्हणाला, "दरबारात हज़र असलेल्यांनी आता गप्प बसावं. मूर्खासारखी बडबड करू नये, कारण राजेसाहेब दरबारात येऊन बोलायला सुरवात करतील."
राजेसाहेब : शाब्बास, शाब्बास. बरोबर बोलला हा. आम्ही बोलत असताना दुसर्‍या कुणीहि मूर्खासारखं बोलूं नये. तर प्रिय प्रजाजनहो, नमस्ते.
सर्वजण : नमस्ते.
राजेसाहेब : मला सगळेजण दिसतात, पण तो विदूषक कुठे गेला?
राजवैद्य : महाराज, तो आपलं तोंड रंगवायला गेला आहे.
राजेसाहेब : आम्ही इथं आहोत, मग तो माझं तोंड रंगवायला गेला तरी कुठे?
राजगायक : महाराज, आपलं, म्हणजे स्वत:चं तोंड रंगवायला गेलाय.
राजेसाहेब : म्हणजे कमाल झाली. प्रिय राणीसाहेब सुद्धा आपलं तोंड रंगवायला इतका वेळ घेत नाहीत. मग विदूषकाला तोंड रंगवायला इतका वेळ? कुठे, गेलाय तरी कुठे तो? राणीसाहेब, आपण जाता त्या ब्यूटी पार्लरला तर गेला नाही ना?
राणीसाहेब : नाही महाराज.
राजेसाहेब : तो आला नाही तर आमची करमणूक कोण करणार? आम्हाला झोप यायला लागली. लवकर विदूषकाला बोलवा.
( सर्वजण इथेतिथे धावत विदूषकाला हाका मारायला लागतात. तेवढ्यात बाहेरून विदूषक नाचत येतो. )
विदूषक : महाराज, ओरडणं थांबवा. मी आलोय.
राजेसाहेब : विदूषका, कुठे होतास इतका वेळ? तुझ्याशिवाय मला करमत नाही, माहित आहे ना तुला? झोप येते आम्हाला.
विदूषक : पण महाराज, आज मी तुम्हाला दरबारात झोपू देणार नाही.
राजेसाहेब : हा काय ज़ुलूम आहे? बेडरूम मध्ये राणी झोपू देत नाही, दरबारात तू झोपू देत नाहीस.
विदूषक : महाराज, मी तुम्हाला झॊपू देणार नाही कारण ... कारण ...
राणीसाहेब : कारण?
विदूषक : ... कारण आज मी दरबारात ...
राजेसाहेब : दरबारात काय करणार आहेस? नाच?
विदूषक : नाही महाराज. आज मी दरबारात सत्याग्रह करणार आहे.
राजेसाहेब : सत्याग्रह? म्हणजे?
विदूषक : जो गांधीजींनी केला होता तो. अन्नत्याग. जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत पाण्याचा एक कण किंवा अन्नाचा एक थेंबही घेणार नाही.
राजेसाहेब : पण का, विदूषका?
विदूषक : त्यालाही एक कारण आहे.
राजेसाहेब : काय?
विदूषक : मला नाव नाही. कुठे जायचं असेल तर मला कुणी बोलवत नाही. कारण मला नाव नाही. अहो बोलखोटेशास्त्री ...
राजज्योतिषी : काय रे विदूषका?
विदूषक : तुम्हाला नाही हो बोलवलं मी. फक्त उदाहरण दिलं. कुठे जायचं असेल तर लोक तुम्हाला बोलवतात. बोलखोटेशास्त्री, चला. राजवैद्यांना बोलवतात. अहो सदारोगी, चला.
राजवैद्य : कुठे चलू?
विदूषक : कुठे नाही हो. मी उदाहरण दिलं. राजगायकांना बोलवतात. अहो सदारडे, या.
राजगायक : येतो.... कळलं, तू बोलावलं नाहीस. फक्त उदाहरण दिलंस.
विदूषक : सगळ्यांना आमंत्रणं जातात. मी सोडून. कारण मला नाव नाही. ते काही नाही, आज मला नाव मिळाल्याशिवाय मी इथून हलणार नाही.
राणीसाहेब : हलणार नाही म्हणतोस, पण मघापासून अंग सारखं हलवीत आहेस.
विदूषक : मला म्हणायचं होतं की आज मला माझं नाव मिळायलाच हवं.
राजेसाहेब : आज तुला नाव मिळेल. तुला नावं ठेवल्याशिवाय मी तुला जाऊच देणार नाही.
राणीसाहेब : महाराज, त्याला नांवं ठेवू नका. फक्त एक छानसं नाव द्या.
राजेसाहेब : तर मित्रा, सांग, तुला कोणतं नांव हवंय? (दरबाराला) सांगा मंडळी, कोणतं नाव द्यायचं विदूषकाला? (कुणीच बोलत नाही.) अरे बोला, मी तुम्हाला विचारतोय. (सगळे शांत) अरे काय झालंय काय तुम्हाला? कुणी बोलत का नाही?
राजगायक : महाराज, मघाशी हा द्वारपाल म्हणत होता की तुमच्याशिवाय दुसरं कुणीहि मूर्खासारखं बोलायचं नाही. मग आम्ही कसं बोलणार?
राजेसाहेब : ठीक आहे, मी तुम्हाला मूर्खासारखं बोलायची परवानगी देतो. झालं समाधान? सांगा, काय नाव द्यायचं या विदूषकाला? (कुणीच बोलत नाही.) आता काय झालं?
राजवैद्य : महाराज, आम्ही विचार करतोय. मूर्खासारखं बोलायचं म्हणजे त्याला थोडा विचार करायला नको का?
( काहीवेळ सगळेजण आपापल्या पद्धतीने विचार करतात. )
राजगायक : मला एक मस्त आयडिया सुचली आहे. हा आपला विदूषक नेहमीच दुर्मुखलेला असतो. याला आपण दुर्मुखे हे नाव दिलं तर कसं?
राजेसाहेब : तशी कल्पना वाईट नाही. आपलं काय मत आहे, राणीसाहेब?
राणीसाहेब : मला चालेल हे नाव.
विदूषक : राणीसाहेब, आपण माझ्यासाठी नाव शोधतोय, आपल्यासाठी नव्हे. मला हे नाव आवडलं. आता मंडळी, टाळ्या वाजवा. राजेसाहेबांनी ज्या कामासाठी दरबार भरवला होता ते काम झालं.
( सगळेजण टाळ्या वाजवतात. )
राजेसाहेब : टाळ्या थांबवा. विदूषक दुर्मुखे, मी त्यासाठी दरबार भरवला नव्हताच मुळी. तुम्हीच सांगा पाहू मी दरबार कशासाठी भरवला असेल ते.
राजवैद्य : महाराज, या विषयावर सकाळपासून वेगवेगळे तर्क बांधून आमच्या मेंदूतली नाडी झोपी गेली, म्हणजे मेंदू झोपी गेला. तुम्हीच सांगा या प्रश्नाचं उत्तर.
राजेसाहेब : काही विशेष कारण नव्हतं. अगदी सहज भरवला होता आम्ही दरबार.
( काहीवेळ सगळेजण स्तब्ध बसतात. )
राजज्योतिषी : सहज? काही विशेष कारण नसताना, तुम्ही आम्हाला अगदी अस्साल तस्से निघून या म्हणून दवंडी पिटवली?
राणीसाहेब : हो. सकाळी महाराज उठले तेव्हा भयंकर कंटाळलेल्या मूडमधे होते. मी खूप प्रयत्न केला त्यांचा मूड बदलायचा.
राजेसाहेब : शेवटी काहीच सुचेना म्हणून राणीसाहेबांनी सल्ला दिला की दरबार भरवा. म्हणून मी दवंडीवाल्याला दवंडी पिटायला पिटाळलं.
राजवैद्य : महाराज, काय अनर्थ केलात हा? माझ्या बायकोचं डोकं दुखत होतं म्हणून मी जरा तिचं डोकं चेपीत बसलो होतो. तुमची दवंडी ऐकून मी तिचं डोकं तसंच टाकून निघून आलो.
राजगायक : आणि मी माझा आवाज़ मोकळा व्हावा म्हणून आल्याचा काढा करून पीत होतो.
राजज्योतिषी : आणि मी चहा प्यायचा मुहूर्त शोधीत होतो, तेवढ्यात तुमची दवंडी ऐकून तसाच आलो. आत्ता दरबार संपला असेल तर आम्हाला घरी जाऊं द्या. कंटाळा आला बसून बसून.
लठ्ठू : पण राजेसाहेबांना कुठं कंटाळा आलाय? जोपर्यंत त्यांना कंटाळा येत नाही तोपर्यंत दरबार चालू राहील.
राजेसाहेब : राणीसाहेब, हा लठ्ठू काय म्हणतोय?
राणीसाहेब : महाराज, हा म्हणतोय की जोपर्यंत तुम्हाला कंटाळा येत नाही तोपर्यंत दरबार चालू राहील.
राजेसाहेब : छान झालं, छान झालं. जोपर्यंत मला कंटाळा येऊन झोप येत नाही तोपर्यंत दरबार चालू राहील.
विदूषक : पण महाराज, आमच्या झोपेचं काय? मला तर विलक्षण झोप यायला लागलीय. (भलीमोठी जांभई देतो.)
राजेसाहेब : विदूषका ...
विदूषक : (त्यांना थांबवीत) महाराज, आता मी कुणी साधासुधा विदूषक नाही. आजच तुम्ही मला एक सुंदरसं नाव दिलंय. विसरलात वाटतं? दुर्मुखे.
राजेसाहेब : दुर्मुखे, आम्ही ते विसरलेलो नाही. पण मी आता तुझ्यावर रागावणार होतो. तुझ्या चर्‍हाटामुळे मी माझ्या रागाचं कारण मात्र विसरलो.
राजज्योतिषी : महाराज, तुम्ही सगळं विसरणार असाल, पण मी मात्र हे सांगायला विसरणार नाही की आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही. हे लोकतंत्र आहे.
विदूषक : महाराज, बरोबर आहे. हा ज्योतिषी आम्ही कदापि सहन करणार नाही.
राजज्योतिषी : (रागाने) दुर्मुख्या, काय बडबडतोयस?
विदूषक : चुकलो, चुकलो. मला म्हणायचं होतं एक, पण माझ्या मुखातून दुसरंच काहीतरी निघालं. मला म्हणायचं होतं की आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही.
राजेसाहेब : (आनंदाने) आठवलं, आठवलं. दुर्मुखे, मी म्हणणार होतो की तू हे काय बडबडतोयस?
विदूषक : पण महाराज...
राजेसाहेब : आधी उत्तर दे, नाहीतर मी पुन्हा विसरेन की मी तुझ्यावर का रागावणार होतो. बोल, कसला अन्याय सहन करणार नाहीस तू? कसला अन्याय केला मी?
विदूषक : महाराज, हे मी नाही म्हणालो. हे राजज्योतिषी बोलखोटेशास्त्री तसं म्हणाले.
राजवैद्य : हा अन्याय आहे की तुम्हाला कंटाळा येईपर्यंत दरबार चालू राहणार.
राजेसाहेब : राजगायक रडवेबुवा, तुम्हालाहि हा अन्याय वाटतो का?
राजगायक : महाराज, मला हा अन्याय वाटला तरी मी तसं स्पष्टपणे कसं बोलून दाखवीन? मला माझ्या प्राणांपेक्षा माझी नोकरी प्यारी आहे.
राजज्योतिषी : पण महाराज, मी हाडाचा ब्राम्हण आहे. राग आला तर शाप देऊन सार्‍या जगाला भस्म करून टाकीन. दुर्वास मुनींचा वंशज आहे मी. माझं नाव बोलखोटेशास्त्री असेल, पण मी दिलेला शाप कधीच खोटा ठरणार नाही.
राणीसाहेब : अय्या, बोलखोटेशास्त्री, तुम्हाला शाप देता येतो? मी आजपर्यंत फक्त पुस्तकात वाचलं होतं, पण प्रत्यक्षात जगाचं भस्म झालेलं कधीच पाहिलेलं नाही. द्याच तुम्ही सार्‍या जगाला शाप आणि करून टाका सगळ्यांचं भस्म.
राजेसाहेब : काय बडबडताय तुम्ही? बोलखोटेशास्त्री, तुम्ही मला भस्म करणार?
राजज्योतिषी : केलं असतं, कधीच केलं असतं. पण या रडवेबुवांसारखी मलाहि माझी नोकरी प्यारी आहे. पण मी तुम्हाला असा काही शाप देऊ शकतो ...
विदूषक : ... की ज्यामुळे सारखं सारखं दरबार भरवायचं तुमचं वेड भस्म होईल.
राजेसाहेब : दुर्मुखे, आपली बडबड बंद कर. मला कंटाळा येऊन झोप येईपर्यंत हा दरबार असाच चालू रहाणार. काय करायचं ते खुशाल करा.
लठ्ठू : बास्स. राजेसाहेबांना झोप येईपर्यंत हा दरबार असाच चालू रहाणार. काय हवं ते करा.
राजज्योतिषी : मग महाराज, मी तुम्हाला असा शाप देतो की तुम्हाला सारखी झोप येत राहील.
राजेसाहेब : बोलखोटेशास्त्री, तुमचा हा शाप मात्र खोटा ठरणार. मी नुकताच चहा पिवून आलोय. परीक्षेला बसणार्‍या मुलांना हाच चहा दिला जातो. मला झोप येणे ... (बोलताबोलता जांभया द्यायला लागतो.) शक्यच .. (जांभई) नाही. (जांभई) अरेच्चा, हे काय? (जांभई) मला खरोखरच ... (जांभई) झोप यायला ... (जांभई) अरे, कुणी ... (जांभई) आहे का ... (झोपी जाऊन घोरायला लागतो.)
राणीसाहेब : (त्याचं वाक्य पूर्ण करीत) ... अरे कुणी आहे का तिकडे?
द्वारपाल : (जांभया देत) महाराज, मी ... आहे ... इकडे...
( झोपलेल्या राजेसाहेबांना राणीसाहेब उठवायचा प्रयत्न करतात. )
राणीसाहेब : (घाबरून) राजेसाहेबांना खरोखरच झोप आली. कुणीतरी उठवा त्यांना. बोलखोटेशास्त्री, काही करून हा तुमचा शाप घालवा.
विदूषक : बोलखोटेशास्त्री, अनर्थ झाला. तुमचा शाप खरा झाला. काहीतरी करा. हवातर त्यांना एखादा साप द्या. सापाचं विष घालवायला राजवैद्यांचा उपयोग होईल. पण हा शाप ...
राजवैद्य : (राजाची नाडी पहात) महाराज खरोखरच झोपी गेलेत. आणखी थोडा वेळ हे झोपून राहिले तर ते बेशुद्ध होतील. थोडा वेळ ते बेशुद्ध राहिले तर ... तर ...
राजज्योतिषी : (गोंधळून) ... तर फार अनर्थ होईल, कारण माझ्या वडिलांनी मला फक्त शाप द्यायला शिकवलं, शाप घालवायला नाही.
राजगायक : मी प्रयत्न करून पहातो. माझं गाणं ऐकून माणसं झोपी जातात, पण झोपलेल्या माणसाला जागं करायची माझी ही पहिलीच वेळ असेल.
( गायला लागतो. महाराज दचकून जागे होतात व जांभया देत बोलायला लागतात. )
राजेसाहेब : अरे कुणीतरी ... या माणसाला थांबवा रे ... नाहीतर ... हे गाणं ऐकून ... मला ... मृत्यू ... येईल.
राणीसाहेब : बोलखोटेशास्त्री, लवकर काहीतरी करा.
राजज्योतिषी : मला शाप घालवायची कला येत नाही. पण मी राजेसाहेबांना एक उश्शाप देऊ शकतो की ज्यावेळी महाराजांना एखादी चिंता सतावू लागेल त्या वेळी त्यांची झोप उडेल.
राजेसाहेब : (जांभया देत बोलतात.) बोलखोटेशास्त्री ... हा ... तुमचा ...अजून एक ... चावटपणा ... अडबड ... गडबड ... बडबड ... धडपड ... नगरीच्या राजाला .... चिंता ... कसली ... असणार? ... ते काही ... नाही ... या बोलखोटेला ... प...(मोठी जांभई देऊन राजा झोपी जातो व घोरायला लागतो.)
राणीसाहेब : महाराजांना काहीतरी बोलायचं होतं, पण वाक्य पूर्ण होण्याआधीच ते झोपी गेले. काय बरं म्हणायचं असेल त्यांना? या बोलखोटेला प...
विदूषक : या बोलखोटेला प.. पक्वान्नं द्या.
राजवैद्य : दुर्मुख्या, उगीच काहीतरी बडबडू नकोस. या बोलखोट्याला शिक्षा द्यायची असेल तर पक्वान्नं का देतील? बहुतेक त्यांना म्हणायचं होतं की याला माझ्याकडची पेपरमिंटची गोळी द्या. यापेक्षा वाईट शिक्षा कुठलीही नसेल.
राजगायक : खोटं. बहुतेक त्यांना म्हणायचं होतं की याला पेटी, म्हणजे माझ्याकडची बाजाची पेटी द्या. गाणं शिकायला.
राजज्योतिषी : का? तुझं गाणं ऐकायची शिक्षा कमी पडली असती म्हणून? मला वाटतं, बहुतेक त्यांना म्हणायचं होतं की या राजज्योतिष्याला पकडा.
राणीसाहेब : बरोबर. पकडा या बोलखोटेशास्त्रींना.
(सगळेजण एकदम ओरडायला लागतात, "बोलखोटेंना पकडा..." आणि त्यांच्यापाठी लागतात. बोलखोटेशास्त्री त्यांना चुकवून गोलगोल पळायला लागतात. हा गोंधळ चालू असतानाच पडदा पडायला लागतो.

( पहिला अंक समाप्त )
------------------------------------------------------------------------------------------------------
( दुसरा अंक )
( प्रवेश पहिला )
( रस्त्याचा देखावा. पडदा वर जातो तेव्हा स्टेज रिकामं असतं. काही वेळाने आतून दवंडीवाल्याचा तोतरं बोलल्याचा आवाज ऐकू येतो. )
दवंडीवाला : ऐका हो ऐका. (स्टेजवर प्रवेश करतो.)
मुलगा : (प्रवेश करून) कायहो दवंडीवाले काका, आज काय झालं? हल्ली अडगड गडबड बडबड धडपड नगरीत रोजच दवंड्या पिटल्या जातात. राजाला काही काम उरलं नाही वाटतं? आज पुन्हा दरबार आहे की काय?
दवंडीवाला : अरे कसला दरबार आणि कसलं काय? महाराज अजून झोपलेलेच आहेत.
मुलगा : म्हणजे बोलखोटेशास्त्र्यांचा शाप खरा ठरला तर? राजाला झोप आली? (आनंदाने नाचायला लागतो.)
दवंडीवाला : ए चुप! महाराजांना झोप आली म्हणून आमची झोप उडालीय, आणि तुला नाचायला निम्मित मिळतंय? मला अजून दवंडी पिटायची आहे. आत जा व सगळ्यांना बाहेर पाठव.
( मुलगा आनंदाने नाचत आणि ओरडत आत जातो, "ऐका हो ऐका...". काही वेळाने राजविदूषक, राजज्योतिषी, राजगायक व राजवैद्य प्रवेश करतात. )
राजवैद्य : आज पुन्हा तातडीचा दरबार आहे वाटतं?
राजगायक : अहो सदारोगी, आज दरबार घ्यायला महाराज जागे कुठायत? बोलखोटेशास्त्र्यांचा कालचा शाप खरा होवून ते जे झोपले ते अजून उठलेच नाहीत. सारखे आपले घोरताहेत. (घोरण्याचा आवाज काढून दाखवतो.)
विदूषक : मंडळी, महाराज उठले होते एकदा. आज सकाळी ते उठले आणि राणीसाहेबांनी त्यांच्या हातात दात साफ करायचा ब्रश दिला. अन झाली काय गम्मत, की दात घासता-घासताच त्यांना आली झोप आणि ते ब्रश तसाच तोंडात ठेवून झोपी गेले. आणि राणीसरकार आपला प्रयत्न करताहेत त्यांच्या तोंडातला ब्रश काढायचा.
राजगायक : आत्ता राजेसाहेबांची झोप कशी घालवायची या चिंतेने राणीसाहेबांची झोप उडाली आहे.
दवंडीवाला : तर ऐका हो ऐका, राणीसाहेबांनी बक्षीस जाहीर केलंय की जो कुणी महाराजांची झोप घालवील त्याला बक्षीस मिळेल.
मुलगा : काय बक्षीस मिळेल?
दवंडीवाला : जो कुणी राजाची झोप घालवील त्याला अर्धी राजकन्या व अर्धं राज्य बक्षीस मिळेल.
विदूषक : राज्य अर्धं ... आणि राजकन्या सुद्धा अर्धीच?
दवंडीवाला : चुकलो. राजाची झोप घालवणार्‍याला सबंध राजकन्या व अर्धं राज्य बक्षीस मिळेल हो. (ओरडत आतल्या बाजूने निघून जातो.)
राजगायक : कायहो सदारोगीबुवा, तुमच्याकडे नाही वाटतं एखादं औषध राजाची झोप घालवायला? बिचार्‍या राणीसाहेब ओरडून ओरडून... चुकलो, रडून रडून अर्ध्या झाल्यायत. मला वाईट वाटतं हो सारखंसारखं त्यांना पाहून.
राजवैद्य : मग कशाला पहाता त्यांना सारखंसारखं? आणि औषधाचं म्हणाल तर मी सगळ्या प्रकारची औषधं देवून पाहिली. कारल्याचा ज्यूस, लिंबाचा ज्यूस, कोका-कोला, पेप्सी, ७-अप, मिरिंडा, सगळंसगळं देवून पाहिलं. अहो, मी त्यांना लिमलेटच्या गोळ्या देखील देवून पाहिल्या. पण छ्याट! ही झोप अजबच दिसतेय. माझ्या मुलाला साध्या लिमलेटच्या गॊळ्या नुसत्या दाखवल्या तरी त्याची झोप कुठल्या कुठे उडून जाते. पण या गोळ्यांचा राजावर काही परिणाम होत नाही.
राजगायक : अहो, काय सांगू? मी सुद्धा सर्व प्रकारचे राग गावून पाहिले -- ओरडराग, रडराग, बडबडराग, कव्वाली, गझल, अंगाईगीतं. अहो, हिंदी सिनेमातील साध्या गाण्यांपासून ते रीमिक्स पर्यंत गाऊन पाहिले. पण महाराजांचं घोरणं काही बंदच होईना. ते घोरताहेत, मी गातोय. मी घोरतोय, ते गाताहेत. चालूच होती आमची जुगलबंदी.
राजज्योतिषी : कशाचा काही उपयोग होणार नाही. ही साधीसुधी झोप नाही काही. झापाची शोप आहे, झापाची. चुकलो. शापाची झोप आहे, शापाची. औषधांनी किंवा गाण्यांनी उडणारी झोप नव्हे. एखादी भयंकर चिंताच महाराजांची झोप घालवू शकेल.
विदूषक : तीच तर चिंता आहे सर्वांपुढे. आम्ही छोटी माणसं, छोट्या चिंतेने सुद्धा आमची झोप पार उडून जाते. चहाच्या डब्यात चहा नसला तर आमची झोप उडते. मुलाला शाळेत दिलेली गणितं सुटली नाहीत की आमची झोप उडते. पण राजेसाहेब आहेत मोठी असामी. त्यांची झोप उडवणारी चिंता देखील तशीच मोठी हवी.
राजवैद्य : पण असली चिंता सापडणार कुठे? चिंता म्हणजे काय माणसाची नाडी आहे की शरीरात कुठेही मिळेल? हातात नाडी, पायात नाडी, डोक्यात नाडी, कानात, नाकात? कठीण काम आहे बाबा.
राजगायक : कठीण काम तर आहेच. पण ते सोपं करून महाराजांना उठवलंच पाहिजे. नाहीतर, राजेसाहेब आपल्याला कायमचं झोपी करतील.
विदूषक : आपण सर्व मिळून विचार करूया. (काहीवेळ सगळेजण बसल्या जागी विचार करतात. अचानक...) आली.
( सगळेजण इथेतिथे पहायला लागतात. )
राजगायक : कोण आली?
राजज्योतिषी : कुठे आहे?
राजज्योतिषी : आली तर दिसत का नाही?
विदूषक : दिसत नाही कारण ती माझ्या डोक्यात आहे. माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आली.
राजवैद्य : कसली आयडिया?
विदूषक : ती Walk and Talk वाली आयडिया. आपण बसून विचार करण्याऐवजी फेर्‍या मारून विचार करूया. म्हणजे आपल्या बुद्धीला चालना मिळेल. मारा फेर्‍या. मी करतो तसं करा.
( विदूषक फेर्‍या मारायला लागतो. इतर सर्वजण त्याचं अनुकरण करतात व फेर्‍या मारायला लागतात. विदूषक मधेच डोक्यावरची टोपी काढून डोकं खाजवायला लागतो. सगळेजण तसंच करायला लागतात. )
राजवैद्य : काय रे, दुर्मुख्या, तू डोकं का खाजवतोयस? तुझ्या डोक्यात dandruff झालंय का? मी स्वत: तयार केलेला शॅम्पू देऊ का तुला? अगदी रामबाण उपाय आहे बघ.
विदूषक : सगळे विद्वान लोक गंभीर विचार करताना असंच डोकं खाजवून विचार करतात.
राजज्योतिषी : पण मी डोकं कसं खाजवणार?
विदूषक : का, काय झालं?
राजज्योतिषी : (डोक्यावरची पगडी काढून) माझ्या केसावर डोकंच नाही ... चुकलो. माझ्या डोक्यावर केसच नाहीत. मग मी काय खाजवू? माझं टक्कल?
राजवैद्य : मी स्वत: घरी तयार केलेलं औषध आहे. देवू का? केस येण्याकरिता अगदी रामबाण उपाय आहे.
विदूषक : नको. केस यायचे पण डोकं जायचं. बोलखोटेशास्त्री, त्यापेक्षा तुम्ही फक्त फेर्‍या मारून विचार करा.
राजगायक : बरोबर आहे. तुम्ही फक्त फेर्‍या मारा.
राजवैद्य : तुम्ही सगळं मैदान मोकळं करा व माझ्या मार्गातून बाजूला व्हा. कारण मी विचार करताना समोर असलेल्या सगळ्या वस्तू फेकून देतो.
विदूषक : म्हणजे सदारोगीबुवा, तुम्ही एखाद्या जंगलात जावूनच विचार करायला हवा. म्हणजे एका दगडात दोन पक्षी ठार होतील. तुमचा विचार होईल आणि जंगल आयतं साफ होईल.
राजवैद्य : नको, त्यापेक्षा मी घरीच जावून विचार करतो. मला जंगलात जायला आवडत नाही.
राजगायक : जंगलात जायची भीति वाटते असं कबूल करा की राव.
राजवैद्य : मी त्या वाघसिंहांना घाबरतो असं वाटतं की काय तुम्हाला?
राजगायक : नुसतं वाटत नाही, माझी खात्रीच आहे.
राजवैद्य : अरे ज्जारे रडवेबुवा. मला त्या प्राण्यांची भीति वाटत नाही. पण विनाकारण कुणाची हत्या करायला मला आवडत नाही. तुम्ही आपला इथंच विचार करा आपापल्या पद्धतीनं. मी घरी जावून माझ्या पद्धतीने विचार करतो. (कुणी काही बोलायच्या आधी घाईघाईने निघून जातो. राजगायक आपली हनुवटी खाजवीत चकरा मारतात.)
विदूषक : कायहो रडवेबुवा, तुम्ही आपली हनुवटी का खाजवीत आहात? दाढी वाढली की काय?
राजगायक : अरे दुर्मुख्या, तू आहेस अनाडी, तुला काही कळणार नाही. नुकताच मी जेम्स बॉण्डचा एक सिनेमा पाहिला होता. त्यात तो विचार करतेवेळी आपल्या पिस्तुलानं हनुवटी खाजवीत असतो. माझ्याकडे पिस्तुल नाही म्हणून मी विचार करताना हाताने हनुवटी खाजवीत असतो.
विदूषक : ठीक आहे. आपण आपापल्या पद्धतीने विचार करू. पण विचार करायला तर हवा.
( राजज्योतिषी जोरजोरात फेर्‍या मारून, राजगायक हनुवटी खाजवीत व विदूषक आपलं डोकं खाजवीत विचार करायला लागतात. )
विदूषक : काय बोलखोटेशास्त्री, आला का काही विचार तुमच्या सुपीक डोक्यात? मोठ्या जोरजोराने फेर्‍या मारताहात!
राजज्योतिषी : तुझ्या डोक्यात आला का काही विचार? मघापासून तूसुद्धा आपलं डोकं जोरजोराने खाजवतोयस!
विदूषक : पण मी तसा विचार कुठे करतोय? मी आपला विचार करीत होतो की तुमच्या डोक्यात कसले गहन विचार चालले आहेत.
राजगायक : मग आला का काही अंदाज? नाही ना, मग परत विचार करा.
( परत सगळेजण विचार करायला लागतात. )
विदूषक : (मधेच ओरडून) आली.
सर्वजण : अरे, कोण आली?
विदूषक : मस्त आयडिया आली. आपण असं करूया.
सर्वजण : कसं करूया?
विदूषक : आपण आता महाराजांकडे जावूया.
राजगायक : आणि ते कशाला?
विदूषक : त्यांनाच विचारू की त्यांना कोणती अशी चिंता हवीय की ज्यामुळे त्यांची झोप उडेल. म्हणजे अनायासे आपली चिंता दूर होईल.
राजज्योतिषी : आपल्याला कसली चिंता आहे?
विदूषक : अहो, असं काय करता? महाराजांची झोप उडवण्यासाठी कोणती चिंता शोधून काढायची ही आपली मोठी चिंता आहे, नाही का? जर या प्रश्नाचं उत्तर आपण महाराजांनाच विचारलं तर आपोआपच आपली चिंता दूर होईल की नाही?
राजगायक : खरं आहे. चला, आपण आत्ताच्या आत्ता महालात जावू आणि महाराजांना किंवा महाराणींना एक झकासपैकी चिंता शोधून काढायला सांगू.
( सगळेजण घाईघाईने आत निघून जातात. )

( प्रवेश दुसरा )
( राजवाड्यातील एक खोली. मध्यभागातील एका पलंगावर राजेसाहेब झोपलेले आहेत. बाजूला असलेल्या एक आरश्यासमोर राणीसाहेब डोळे मिटून उभ्या आहेत. मधेच राजाची झोप उडते व तो पलंगावर उठून बसतो. )
राजेसाहेब : राणीसाहेब, तुम्हालासुद्धा झोप आली का? असं आरशापुढे डोळे मिटून का उभ्या आहात?
राणीसाहेब : महाराज, उठलात आपण? कित्तीकित्ती बरं वाटलं. मला झोपावसं वाटलं तरी मुळीच झोप येत नाही. मला खूपखूप वाटायचं की एकदां तरी पहावं की मी झोपेत कशी दिसते. म्हणून आज डोळे मिटून आरशासमोर उभी होते, मी झोपेत कशी दिसते ते पहायला.
राजेसाहेब : राणीसाहेब, मला आलेली झोप कशी उडवायची या चिंतेने मला सतावलंय. तुम्ही झोपेचा विचार तरी कसा करू शकता?
राणीसाहेब : काय करू महाराज? झोपल्यावर तरी स्वप्नात तुमची झोप उडवायचा काही उपाय सुचतो का ते नको का बघायला?
राजेसाहेब : ठीक आहे. तुम्ही स्वप्नं बघा, मी आपला झोपी जातो. मला झोप मुळीच आवरत नाही.
( एक भली मोठी जांभई देऊन राजा पुन्हा झोपी जातो. राणी परत आरश्यासमोर डोळे मिटून उभी रहाते. बाहेरून विदूषक, राजगायक, राजवैद्य व राजज्योतिषी प्रवेश करतात. )
विदूषक : राणीसाहेब, येऊ का आत?
राजगायक : अरे दुर्मुख्या, मूर्खासारखं का बोलतोस? आत आल्यावर काय विचारतोस, आत येऊ का म्हणून?
विदूषक : मी दुर्मुखे आहे पण मूर्ख नाही. असं विचारणं साधा शिष्टाचार आहे. म्हणून विचारतोय, राणीसाहेब, आम्ही आत येऊ का? (राणीसाहेब डोळे मिटून आरश्यात आपलं तोंड पहाण्यात मग्न आहेत, म्हणून त्यांचं लक्ष जात नाही.) अरेच्चा, राणीसाहेबांना सुद्धा झोप लागली वाटतं? म्हणजे झाली ना पंचाईत? आता आपल्याला दोनदोन चिता शोधाव्या लागतील.
राजवैद्य : मूर्खा, चिता नव्हे. चिंता म्हण. चिं... ता!!
विदूषक : अहो तेच म्हणतोय मी. चिं ... ता! पण दोनदोन शोधाव्या लागतील की नाही? एक सापडत नाही, दोन कुठून शोधणार? (मोठमोठ्याने रडायला लागतो. त्या आवाजाने राणीसाहेबांची तंद्री भंगते व त्या विदूषकाकडे पहातात.)
राणीसाहेब : अरे, तुला रडायला काय झालं?
विदूषक : अरेच्चा, तुम्ही जाग्याच आहात? मला वाटलं की तुम्ही सुद्धा झोपी गेलात, म्हणून मी रडायला लागलो.
राणीसाहेब : झोपले नव्हते काही मी. झोपल्याचं नाटक करीत होते, मी झोपल्यावर कशी दिसते ते बघायला. पण ते जाऊंदे. आधी आपण महाराजांच्या झोपेबद्दल विचार करुया.
राजवैद्य : राणीसाहेब, एवढा वेळ आम्ही तेच करीत होतो. मी तर विचार करून-करून खूप दमलो.
राजज्योतिषी : विचार करून-करून माझे तर पाय भयंकर दुखायला लागले.
विदूषक : अन माझं डोकं!
राजगायक : आणि माझे हात व हनुवटी.
विदूषक : म्हणूनच म्हणतो की आता विचार केलेला पुरे.
राणीसाहेब : ते असूंदे. विचार करून काही उपयोग झाला का? काही उपाय सुचला की नाही?
विदूषक : हो तर, एक झकास कल्पना सुचली.
राणीसाहेब : काय?
विदूषक : बराच वेळ विचार करून मला अशी कल्पना सुचली की ..
राणीसाहेब : काय?
विदूषक : मधेमधे अडवू नका हो राणीसाहेब मला. मधे बोलू नका. मला काय सुचलं ते ऐकायचं आहे की नाही? (राणी गप्प.) बोला ना. गप्प का?
राजवैद्य : अरे तूच म्हणालास ना त्यांना बोलू नका म्हणून.
विदूषक : अच्छा, तर मी म्हणालो म्हणून गप्प आहेत का त्या? उत्तम. तर विचार करून-करून मला एक कल्पना आली की आपण इथं येऊन राजेसाहेबांनाच विचारू की त्यांना कसल्या प्रकारची चिता ... सॉरी, कसल्या प्रकारची चिंता आवडेल. तर त्यांना उठवायला हवं. आणि राणीसाहेब, आता तुम्ही बोलायला हरकत नाही.
राणीसाहेब : बरोबर आहे. आपण ह्यांना उठवू.
( सर्वजण पलंगाजवळ जाऊन राजेसाहेबांना उठवायचा प्रयत्न करतात. )
राजगायक : उठा राजे, उठा. पहाट झाली, उठा. दुपार होईल, उठा. सांज होईल, उठा. रात्र होईल, मगच झोपा.
राजज्योतिषी : राजेसाहेब, पंचागाप्रमाणे आपली उठायची घटिका झाली. ही वेळ टळली तर अनर्थ होईल. जागे व्हा.
राणीसाहेब : तसे नाही उठायचे ते. (ओरडून) हं, आता उठा. खूप झाली झोप. मी पांचपर्यंत मोजते, तेवढ्यात नाही उठलात, तर तुमची खैर नाही. एक ... दोन ..
राजवैद्य : राणीसाहेब, ही कसली पद्धत आहे महाराजांना उठवायची?
राणीसाहेब : तुम्ही मला नका शिकवू. त्यांना धाकात ठेवायची ही एकच रीत आहे. एवढी वर्षं असाच नाही संसार केला मी. ओरडल्याशिवाय कळणार नाही त्यांना. रोजची सवयच आहे. (परत ओरडून) सांगितलं ना, खूप झाली झोप. मी पाच मोजायच्या आत उठा, नाहीतर तुमची धडगत नाही. एक ... दोन ... तीन ...
( राजेसाहेब खडबडून जागे होतात व पलंगावर बसतात. )
राजेसाहेब : राणीसाहेब, वादळ आलं का? ही वीज कडकडल्याचा आवाज कुठून आला? आणि ही गर्दी कशाला जमलीय इथं?
विदूषक : महाराज, तुम्हाला गाढ झोप लागली होती.
राजेसाहेब : मग मला कशाला उठवलंत? सुखाने दोन मिनीटं झोपता पण येत नाही. (परत गाढ झोपी जातात.)
राजवैद्य : राणीसाहेब, महाराज परत झोपी गेले. आता?
विदूषक : परत कसरत चालू. करा सुरवात.
राजगायक : उठा राजे, उठा. पहाट झाली, उठा. दुपार होईल, उठा. सांज होईल, उठा ...
राजज्योतिषी : महाराज, उठा. पंचागाप्रमाणे आपली उठायची घटिका झाली...
राणीसाहेब : तुम्ही थांबा. (ओरडून) हं, उठा. खूप झाली झोप. मी पाचपर्यंत मोजते, तेवढ्यात उठा, नाहीतर...
( खडबडून राजेसाहेब उठतात. )
राजेसाहेब : राणीसाहेब, काय झालं? मी झोपलो होतो का?
राजवैद्य : हो महाराज, तुम्हाला ...
राणीसाहेब : (घाईघाईने त्यांचं तोंड बंद करीत) महाराज, तुम्हाला झोप नव्हती लागली. म्हणूनच तुमच्या कानावर घालायचं आहे की मी सार्‍या गावात दवंडी पिटवली आहे.
राजेसाहेब : कसली दवंडी?
विदूषक : जो कुणी तुमची झोप उडवील त्याला तुम्ही अर्धी राजकन्या व अर्धं राज्य बक्षीस द्याल.
राजेसाहेब : बरोबर आहे, बरोबर आहे.
राजज्योतिषी : हा चुकला, महाराज, याला म्हणायचं होतं, अर्धं राज्य व संपूर्ण राजकन्या.
राजेसाहेब : बरोबर आहे, बरोबर आहे. मग तुम्ही इथं कशाला वेळ फुकट घालवताय? आधी जा आणि माझी झोप घालवायचा उपाय शोधा. (पलंगावर आडवा होतो.)
राणीसाहेब : (त्याला उठवीत) झोपू नका. तुमची झोप घालवण्यासाठीच इथं आलेयत हे.
राजेसाहेब : मग इथंच झोपा. तोपर्यंत मी थोडा आडवा होतो. (आडवा होतो.)
राणीसाहेब : तुम्हाला एखादी भयंकर चिंता लागली तरच तुमची झोप उडेल.
राजेसाहेब : आता राजाला कसली आलीय चिंता?
राजज्योतिषी : तुम्हाला चिंता हवी. मीच तसं सांगितलंय.
राजेसाहेब : बहुतेक तुम्हीच मला काहीतरी साप की शाप काय तरी दिला होता, बरोबर? मग या वेळी मला झोपायलाच हवं, नाहीतर तुमचा शाप खरा कसा होईल? (पलंगावर आडवा होऊन डोळे मिटतो.)
राणीसाहेब : लागली ना वाट? महाराज पुन्हा झोपी गेले.
( पटकन महाराज उठून बसतात. )
राजेसाहेब : अजून नाही. माझी झोप कशी घालवायची याचा विचार करीत होतो. माझं ऐका. मला एखादी चिंता लागली की माझी झोप उडते. तेव्हा माझ्यासाठी एखादी चिंता शोधून काढा.
राजगायक : अहो महाराज, तेच विचारायला आम्ही सगळे इथं जमलोय. तुम्हाला कुठली चिंता हवी?
राजेसाहेब : (विचार करीत) चिंता? कुठली चिंता? कसली चिंता? पण आधी मला कळूं दे, चिंता म्हणजे तरी काय?
विदूषक : सोपं आहे. चिंता म्हणजे ... म्हणजे ...
राजेसाहेब : ... म्हणजे काय?
विदूषक : ...म्हणजे... म्हणजे... काळजी
राजेसाहेब : हे बघा, आता मला खरोखरच काळजी वाटायला लागलीय. काळजी म्हणजे काय?
विदूषक : म्हणजे ... म्हणजे ...
राजेसाहेब : हे बघ दुर्मुखे, ज्या शब्दांचा अर्थ माहीत नाही ते शब्द वापरू नये.
विदूषक : असं नाही महाराज. चिंता म्हणजे काय हे तुम्हाला नीट समजावून सांगायचं म्हणजे मोठी चिंताच आहे. बोलखोटेशास्त्री, आता तुम्हीच सांगा महाराजांना चिंता म्हणजे काय ते. तो शब्द तुम्हीच आधी वापरला.
राजज्योतिषी : चिंता म्हणजे ... चिंता न करण्याविरुद्ध. आता सांगा तुम्हाला कसली चिंता आहे.
राजेसाहेब : आहे. (सगळेजण खुश!) तुम्ही सगळे मघापासून "चिंता... चिंता" करीत आहात, म्हणजे नेमकं काय करताहात ही चिंता मला लागली आहे.
राजगायक : हे नाही चालणार. बरं, मी प्रयत्न करून पहातो. आता बघा, तुम्ही राजे आहात, सुखी आहात. खरं? (राजा मान डोलावतो.) आम्ही साधी माणसं आहोत, खरं? (राजा मान डोलावतो.) आम्ही तुमच्यासारखे श्रीमंत, सुखी कसे आणि कधी होणार, या मखमलीच्या गादीवर तुमच्यासारखं कधी लोळणार या गोष्टींचा आम्ही सारखा विचार करीत असतो, खरं? (राजा मान डोलावतो.) असं सारखं एकाच गोष्टीचा विचार करीत राहिलं की त्याला चिंता म्हणतात.
राजेसाहेब : मग सरळ इंग्रज़ीतून नाही का सांगायच, "worry" म्हणून. आहे, मला सुद्धा एक worry आहे.
सगळेजण : (आनंदाने) आहे ना? सांगा पाहू.
राजेसाहेब : सांगतो, ओरडू नका. आधीच माझं डोकं दुखतंय. माझ्यासारख्या सुखी माणसाला कसली चिंता असणार ह्याचा विचार करून-करून माझं डोकं भयंकर दुखायला लागलंय. मला थोडं झोपायला हवंय.
विदूषक : तेवढं सोडून काय हवं ते करा. महाराज, तुम्ही कसलीच काळजी करू नका. आम्ही सगळे मिळून चिंता करतो, म्हणजे नक्कीच उपाय सापडेल.
राजेसाहेब : ठीक आहे. सगळेजण विचार करायला लागा. मीसुद्धा विचार करतो.
( सगळेजण विचार करायला लागतात. विदूषक जोरजोराने डोकं खाजवायला लागतो; राजज्योतिषी फेर्‍या मारायला लागतात; राजगायक हनुवटी खाजवायला लागतो; राजवैद्य खिशातून एकेक वस्तू काढून जमिनीवर आपटायला लागतात; राजेसाहेब पलंगावर आडवे होतात व राणीसाहेब राजाला वारा घालायला लागतात. तेवढ्यात राजेसाहेब अचानक उठून बसतात. )
राजेसाहेब : मी सांगतो तसं करा. असा वेळ फुकट घालवण्यापेक्षा आपण सगळे मिळून खोलीभर शोधूया चिंता सापडते का. मी थोडा आडवा होतो. घाबरू नका, मी झोपत नाही.
( सगळेजण इथेतिथे शोधायला लागतात. मधेच राजगायकाला गायचा मूड येतो. )
राजगायक : त्या तिथे (सगळेजण त्याच्या हाताच्या दिशेने पळतात.) पलीकडे ... (सगळेजण त्या बाजूला.) तिकडे ... (सगळे "तिकडे" धावतात.) माझिया प्रियेचे झोपडे ... (सगळेजण वैतागून एकमेकांकडे पहायला लागतात.)
राणीसाहेब : रडवेबुवा, कित्तीवेळा तुम्हाला सांगून-सांगून थकले, आम्ही गंभीर मूडमध्ये असताना तुम्ही गात जावू नका. आणि तेसुद्धा इतकं जुनं गाणं .. गाणं चांगलं आहे, पण... प्रसंगाला शोभणारं नाही. आता तुम्ही "त्या तिथे, पलीकडे, तिकडे" म्हणून आम्हाला उगीच इकडेतिकडे पळायला लावलंत. हं, पुन्हा शोधा.
( काहीवेळ शोधाशोध चालू रहाते. )
राजवैद्य : माझ्या मनात एक लघुशंका ... म्हणजे एक लहान शंका आलीय. विचारू का?
राणीसाहेब : विचारा. म्हटलंच आहे कुणीतरी की मनात काही ठेवू नये, लघुशंका सुद्धा नाही.
राजवैद्य : राणीसाहेब, आपण चुकीच्या जागी चिंता शोधतोय. राजमहालात चिंता कशी सापडेल?
राजगायक : खरं आहे.
राजज्योतिषी : मी इतकी पोथ्यापुस्तकं वाचलीयत, पण राजाराणीला चिंता असल्याचं एकाही पुस्तकात वाचलेलं नाही.
विदूषक : पण मी पुस्तकात वाचलंय की राजकन्या हरवली की राजाराणीला चिंता वाटते. आपण एखादा राक्षस पकडून आणू. म्हणजे तो राक्षस महाराजांना पळवून नेईल ... चुकलं, महाराज राक्षसाला ... नाही, राजकन्या राक्षसाला ... पुन्हा चुकलो, महाराज राजकन्येला ...
राणीसाहेब : दुर्मुखे, पुरी कर तुझी दर्दभरी कहाणी. महाराज, त्याला म्हणायचं आहे की राक्षस राजकन्येला पळवून नेईल ...
विदूषक : ... व तुम्हाला चिंता पडेल की राजकन्येला कुठे शोधायचं ...
राजगायक : त्या तिथे, पलीकडे, तिकडे... (राणीसाहेब रागाने त्याच्याकडे पहातात.) मी राजकन्येला शोधण्याबद्दल म्हणत होतो.
राजेसाहेब : (पलंगावर उठून बसत) विदूषका, उत्तम कल्पना दिलीस तू. आता तातडीने जा आणि एखाद्या राक्षसाला पकडून आण.
विदूषक : (थरथरा कापायला लागतो.) म...म...मी राक्षसाला .... प..प .. पकडून आणू?
राजेसाहेब : मग? अरे, राक्षसच आला नाही तर राजकन्येला कोण पळवून नेणार? मी, का तू?
राणीसाहेब : ते काही नाही. मी नाही माझ्या लाडक्या राजकन्येला पळवून नेऊ देणार. कुणाचे भलते लाड नकोयत मला. केवढ्या प्रेमाने वाढवलीय मी माझ्या ठकीला! (थोडा विचार करून) अन शिवाय राजकन्येला पळवून नेलं तर बक्षीस म्हणून सबंध राजकन्या देणार तरी कशी? ते काही नाही. राजकन्येला मुळीच पळवायचं नाही. हवंतर मला पळवून न्या. (तरातरा बाहेर निघून जातात.)
राजेसाहेब : शेवटी काय ठरलं तुम्हा लोकांचं? कुणीतरी कुणाला पळवून न्या. हवंतर मला पळवून न्या. पण जे काही करायचंय ते लवकर करा. नाहीतर मला स्वस्थ झोपूं तरी द्या.
राजज्योतिषी : महाराज, तुमची कल्पना तशी बरी आहे. पण राजाला पळवून नेल्याचं मी आजपर्यंत कुठल्याच पुस्तकात वाचलेलं नाही. आम्हाला अजून थोडावेळ विचार करूद्या.
राजेसाहेब : अरे, मघापासून तुम्ही फक्त विचारच करीत आहात. लवकर काहीतरी ठाम निर्णय घ्या आणि मला आपलं मोकळं करा.
( सगळेजण आपापसात कुजबुज करायला लागतात. )
विदूषक : हे बघा, माझं ऐका. मघाशी राणीसाहेब म्हणत होत्या ना की त्यांना पळवून न्या.
राजगायक : हो, मग?
विदूषक : आपण राणीसाहेबांना पळवून नेवूया
राजज्योतिषी : दुर्मुख्या, तू राणीसाहेबांना पळवून नेणार?
विदूषक : मी एकटा नाही काही. आपण सर्व मिळून राणीसाहेबांना पळवून न्यायचं. महाराजांचं राणीसाहेबांवर खूप प्रेम आहे. त्यांची झोप नक्कीच उडेल.
राजेसाहेब : (उठून त्यांच्याजवळ येत) काय खलबतं चालली आहेत तिथं?
विदूषक : महाराज, सगळा प्लॅन ठरला. आम्ही ठरवलंय की आज तुम्हाला मुळीच झोपू द्यायचं नाही. आज आम्ही तुम्हाला इतक्या भयंकर चितेत टाकणार आहोत...
राजवैद्य : गाढवा, चितेत नाही, चिंतेत टाकणार आहोत.
विदूषक : तेच ते. तुम्हाला इतक्या भयंकर चिंतेत टाकणार आहोत की तुम्हाला झोप येणे शक्यच नाही.
राजेसाहेब : ठरलं का कुणाला पळवून न्यायचं ते?
राजज्योतिषी : महाराज, आम्ही राणीसाहेबांना पळवून न्यायचं ठरवलं आहे.
( याचवेळी प्रवेश करीत असलेल्या राणीसाहेब त्यांचं संभाषण ऐकतात. )
राणीसाहेब : काय? मला पळवून नेणार तुम्ही?
विदूषक : होय राणीसाहेब, आमचा नाईलाज आहे. तयार व्हा, पळून यायला आमच्याबरोबर.
राणीसाहेब : मी काही हिंदी सिनेमातील नायिका नाही तुमच्याबरोबर स्वखुशीने पळून यायला.
विदूषक : आम्ही सुद्धा तुमची परवानगी नाही विचारली. तुम्हाला पळवून न्यायचा निर्णय घेतलाय. चला रे, पकडा राणीसाहेबांना.
राणीसाहेब : (किंचाळून) वाचवा रे वाचवा.
( राणीसाहेब घाबरून इथंतिथं सैरावैरा धावायला लागतात. इतर सर्वजण त्यांच्यामागून धावायला लागतात. ही सर्व गडबड चालू असतानाच पडदा पडायला लागतो. )

दुसरा अंक समाप्त
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
( तिसरा अंक )
( राजवाड्यातील एक खोली. राजेसाहेब पलंगावर स्वस्थ झोपलेले आहेत. एका कोपर्‍यात राजज्योतिषी, राजवैद्य, राजगायक व विदूषक गंभीरपणे चर्चा करीत आहेत. )
विदूषक : आली की नाही पंचाईत? चांगली कल्पना सुचली होती, तर राणीसाहेब सहकार्य देत नाहीत. आल्या असत्या पळून तर काही बिघडलं असतं का? कुणी मला पळवून न्यायचं म्हटलं तर मी कसा चुटकीसरसा तयार झालो असतो. काय excitement असते असल्या गोष्टीत! काय भाव वाढतो आपला! पेपरमध्ये फोटो काय छापून येतात! कुणी आपल्या काळजीनं खाणंपिणं सोडून काय देतं, तर कुणाची झोपच उडते.
राजवैद्य : इथं राणीसाहेब महालातून गायब झाल्या आहेत आणि महाराज मस्तपैकी झोपलेयत.
राजगायक : आणि आपल्या अकलादेखील! एका बाईला पळवून नेण्याइतकी साधी गोष्ट आपल्याला जमू नये?
विदूषक : धिक्कार असो राणीसाहेबांचा. माझ्या पळून जाण्याने महाराजांची झोप उडली नसती म्हणून. नाहीतर मी गेलो असतो की पळून. ते काही नाही. या सर्व प्रकाराचा निषेध करायलाच हवा.
राजज्योतिषी : आणि हे सर्व या दुर्मुख्यामुळे झालं
विदूषक : अगदी बरोबर आहे. (लक्षात येऊन) ए, काय बडबडताय? मी काय केलं?
राजवैद्य : राणीसाहेबांना पळवून नेण्याची भयानक कल्पना तुझ्याच सुपीक डोक्यातून निघाली होती ना?
राजज्योतिषी : राणीसाहेब म्हणजे काय कुत्रं किंवा मांजर आहेत की धरली शेपटी व सुटलो पळत? केवढी जाडजूड आणि भरभक्कम बाई आहे ती.
विदूषक : हे बघा, ही कल्पना माझ्या सुपीक डोक्यातून निघाली असेल, पण ती मान्य केली तुमच्या सुपीक डोक्यानीच ना? आणि शिवाय ही कल्पना मला सुचली ती तरी राणीसाहेबांच्या बोलण्यावरूनच ना? तर मग उगीच मला दोष कशाला देता?
राजगायक : ते काही नाही, सगळी चूक तुझीच आहे.
विदूषक : हे बघा, शेवटचं सांगतोय, गप्प रहा. मला राग आला, तर ...
राजवैद्य : .. तर काय?
विदूषक : ... तर ... तर ..
राजज्योतिषी : ... तर काय करशील? सांगच ना, बघू तुझी हिम्मत.
विदूषक : मला राग आला तर ... तर मी रडेन.
राजवैद्य : हॅं, म्हणे रडेन. अरे, पुरुषासारखा पुरूष तू, अन रडणार?
विदूषक : म्हणे, पुरूषासारखा पुरूष! पुरूष पुरूषासारखाच असणार ना? आणि कुठल्या पुस्तकात लिहीलंय की पुरूषांनी रडूं नये असं? पुरूषांनी रडलेलं त्यांच्या तब्येतीसाठी बरं असतं असं मानसशास्त्राच्या पुस्तकात सुद्धा लिहीलंय. मी स्वत: वाचलंय. ते काही नाही, मला राग आला तर मी रडणारच.
राजज्योतिषी : मग रड. पण सांगून ठेवतो, या क्षणाला तू रडणं फार हानिकारक असेल.
विदूषक : तुम्ही सांगताय तर मुळीच नाही रडणार. हे सगळं प्रकरण तुमच्यामुळेच सुरू झालं. विचार न करतां तुम्ही महाराजांना शाप दिला ना, म्हणून सर्व भानगड सुरू झाली. खोटारडे!
राजज्योतिषी : ए दुर्मुख्या, इतर काही शिवी दे, पण मला खोटारडा म्हटलेलं कधीच सहन करणार नाही मी. उगीच नाही मी महाराजांना दिलेला शाप खरा ठरला.
( नेमक्या याच वेळी राजेसाहेब ओरडत पलंगावर उठून बसतात. )
राजेसाहेब : पकडा... पकडा त्याला. (राजज्योतिषी घाबरतात.) पकडा त्या राक्षसाला. आमच्या राणीसाहेबांना पळवून न्यायला आलाय.
राजवैद्य : महाराज, बहुतेक तुम्हाला स्वप्न पडलेलं दिसतंय. राणीसाहेबांना कुणी पळवून नेलेलं नाही.
विदूषक : त्या स्वत:च पळून गेलेल्या आहेत. आम्ही स्वत: इथं हज़र असताना राणीसाहेबांना पळवून न्यायला राक्षस वेडा झालेला नाही.
राजज्योतिषी : आणि राणीसाहेबांसारख्या भरभक्कम व्यक्तीला पळवून नेण्याआधी कुणी वेडा सुद्धा दहा वेळा विचार करेल.
राजगायक : तुमच्या ओरडण्याचा आवाज ऐकून राणीसाहेब जिथं असतील तिथून धावत येतील.
( त्याच वेळी राणीसाहेब घाईघाईने प्रवेश करतात. )
राणीसाहेब : महाराज, तुम्हाला स्वप्न पडलं का?
राजेसाहेब : एकदम खरं वाटावं असं स्वप्न होतं ते. एक तांबड्या नाकाचा राक्षस तुम्हाला पळवून नेतोय असं स्वप्न. म्हणून मी दचकून जागा झालो. आणि पहातो तो तुम्ही समोर नव्हता. मी झोपलेला असताना तुम्ही माझ्या डोळ्यासमोर नसलात म्हणजे काळजीने माझा डोळाच लागत नाही.
विदूषक : (राजज्योतिषांना बाजूला बोलावून) मी सांगत होतो ना तुम्हाला की राणीसाहेबांना पळवून नेल्याने राजेसाहेबांची झोप नक्की उडेल असं.
राजज्योतिषी : त्याचा अंदाज होता मला. पण प्रश्न होता की राणीसाहेबांना पळवून न्यायचं कसं. त्या या गोष्टीला मुळीच तयार नव्हत्या. आणि जबरदस्तीने त्यांना न्यायचे म्हणजे येरागबाळ्याचे काम नव्हें.
विदूषक : मी अजून सांगतोय, राणीसाहेबांना कसंही करून पळवून नेण्यात आपण यशस्वी झालो तर महाराजांची झोप कायमची उडेल.
राजेसाहेब : दुर्मुखे, बोलखोटेशास्त्री, कसली खलबतं चाललीयत मघापासून?
राणीसाहेब : महाराज, त्यांना काय विचारता? मी सांगते. मला पळवून न्यायचे बेत चाललेयत त्या सर्वांचे. पण मी मुळीच तयार नाही याला. सांगून ठेवते. नाहीतर नंतर म्हणाल की राणीसाहेब तयार असत्या तर आम्ही त्यांना पळवून नेलं असतं.
( याचवेळी दरवाजातून एक देखणी राजकन्या प्रवेश करते. )
राजकन्या : मम्मी, तुम्ही कुणाला पळवून नेलं असतं?
राणीसाहेब : डार्लींग, आम्ही म्हणजे आम्ही नव्हे. आम्ही म्हणजे हे सगळेजण. (राजज्योतिषी, राजवैद्य, राजगायक व विदूषकाकडॆ बोट दाखवते.) आणि त्यांना, म्हणजे आम्हाला, तुझ्या लाडक्या मम्मीला.
( राजकन्या मुसमुसून रडायला लागते. )
राणीसाहेब : बाळ, आता काय झालं? त्यांनी मला पळवून नेलं असतं, पण नेलं नाही अजून. उगी, उगी, रडू नको हं. मी आहे अजून इथं.
राजकन्या : ए, हे "उगी, उगी" थांबव आधी. मी काही कुक्कुलं बाळ नाही. Teenager आहे मी.
राणीसाहेब : मग रडतेस कशाला? कारणाशिवाय रडत नाहीत तुझे ते टिनटिन कोण आहेत ते.
राजवैद्य : कन्याराजे, प्लीज रडू नका. हवंतर आम्ही तुमच्या मम्मीला पळवून न्यायचा प्लॅन कॅन्सल करतो.
राजगायक : खरंच तुम्ही असं रडू नका. त्याआधी मी तुम्हाला सुरात रडायला शिकवतो.
विदूषक : रडणं थांबवा, तुम्हाला रडताना पाहून मलाही रडावसं वाटतं. (रडूं लागतो.)
राजकन्या : तुम्ही कुणीहि रडायची गरज नाही. तुम्ही मम्मीला पळवून नेणार म्हणून नव्हते काही मी रडत!
विदूषक : मग?
राजकन्या : मी एवढी सुंदर राजकन्या हजर असताना तुम्ही एका प्रौढ राणीला पळवून नेताय म्हणून रडत होते मी. आजपर्यंत कुठल्याही गोष्टीत कुणी राणीला पळवून नेल्याचं ऐकलंय?
विदूषक : मग आम्ही तुम्हाला खुश्शाल पळवून नेऊ.
राणीसाहेब : चावटपणा पुरे. मी नाही माझ्या गुणी मुलीला पळवून नेऊं देणार.
( राजकन्या पुन्हा रडायला लागते. राणीसाहेब तिला समजवायचा प्रयत्न करतात. राजे परत झोपी जातात. )
राणीसाहेब : हे बघ, असा हट्ट नाही करायचा.
राजकन्या : करणार मी हट्ट. प्रत्येक गोष्टीतली राजकन्या हट्टीच असते. आणि आता मी मोठी झालेय. आईबाबा सांगतील त्याच्या विरुद्ध वागायचा जन्मसिद्ध हक्कच आहे माझा. (विदूषकाला) ते काही नाही विदूषककाका ...
विदूषक : हं, विदूषककाका नाही. आता मला मस्तपैकी नाव मिळालय, दुर्मुखेकाका म्हण.
राजकन्या : बरं. दुर्मुखेकाका, तुम्ही न्या हो मला पळवून. मी तयार आहे. माझ्या क्लासमधल्या सगळ्या मुलींना कुणी ना कुणी, केव्हा ना केव्हा किडनॅप करून नेलं आहे. सर्वजणी मला वर्गात सारख्या चिडवत असतात.
विदूषक : आता आली ना परत पंचाईत! कुणाला पळवून नेऊ आम्ही? तुम्हाला की राजकन्येला?
राणीसाहेब : पळवून न्यायची एवढी जर हौस असेल, तर स्वत:च्या बायकोला न्या पळवून.
विदूषक : तेही केलं असतं. पण माझ्या बायकोला पळवून नेल्याने महाराजांची झोप उडेल असं का वाटतं तुम्हाला? उलट मलाच चांगली झोप लागेल.
राणीसाहेब : मग मी काय करावं असं म्हणायचंय तुम्हाला?
राजज्योतिषी : ते तुमचं तुम्ही ठरवा. पण मला माझा शाप परत घेता यायचा नाही. कुणा जवळच्या माणसाला पळवून नेल्याशिवाय महाराजांची झोप उडणं अशक्य.
राणीसाहेब : आणि काही झालं तरी मी स्वत:ला किंवा राजकन्येला पळवून नेऊं देणार नाही.
राजवैद्य : आपण परत थोडावेळ विचार करूं.
राजकन्या : उगीच टाईमपास नकोय. त्यापेक्षा असं करा.
राणीसाहेब : कसं?
राजकन्या : मम्मी, तू स्वत:च पळून जा यांच्याबरोबर. म्हणजे प्रश्नच सुटला. तुला कुणी पळवून नेलं असंही होणार नाही. आणि बाबाना वाटेल की तुला कोणीतरी पळवून नेलं. मग त्यांना काळजी वाटून त्यांची झोप खलास!
राणीसाहेब : दुर्मुखे, ही कल्पना कशी काय वाटते तुम्हाला? (दुर्मुखे डोक्यावरची टोपी काढून डोकं खाजवायला लागतो.) दुर्मुखे, डोकं खाजवायची ही वेळ नव्हे. डोक्यात उवा झाल्या असतील तर घरी जावून काढा.
विदूषक : मी उवा नव्हतो काढत. विचार करीत होतो.
राजकन्या : त्यात विचार कसला करायचा? मी नाही तर नाही, मम्मीला किडनॅप करा.
राणीसाहेब : मी तयार आहे तुमच्या बरोबर पळून यायला.
विदूषक : पण तुम्ही किंवा महाराजांनी दिलेली प्रत्येक कल्पना अमलात आणलीच पाहिजे असं नाही. लोकतंत्र आहे. (राणीसाहेब रागाने त्याच्याकडॆ पहातात.) असं मी म्हणत नाही, हे राजवैद्य सदारोगी म्हणत होते मघाशी
राजवैद्य : दगाबाज़! शत्रू!!
राजज्योतिषी : सदारोगी, कशाला रागावताय?
राजवैद्य : अहो, आपल्यातील गुपीतं फोडणारा दगाबाज़ नाही तर कोण?
राणीसाहेब : अहो, भांडणात वेळ नका घालवू. मला पळवून नेताय ना?
विदूषक : मी तयार आहे. तुम्ही तयार व्हा.
राणीसाहेब : म्हणजे नक्की काय करायचं?
विदूषक : दोनचार दिवसांचे कपडॆ वगैरे काही घ्यायचे असतील तर घ्या.
राणीसाहेब : आणखी काय करायचं असतं किडनॅप होताना?
विदूषक : हे मला काय माहीत? मी कधी कुणाला पळवून नेलेलं नाही, किंवा स्वत: किडनॅप झालेलो देखील नाही.
राजकन्या : आई, मला माहीत आहे, मी सांगू?
राणीसाहेब : (संशयाने) तुला ग काय माहीत? तू नव्हतीस ना कुणाबरोबर पळून गेलीस?
राजकन्या : नाही ग मम्मी, तू सिनेमे पाहात नाहीस ना म्हणून असं बोलतेयस. मी परवाच तो "किडनॅप" सिनेमा पाहिला डीव्हीडी वर. म्हणून मला माहीत आहे.
विदूषक : मी सुद्धा वाचलंय महाभारतात. तो राम सीतेला पळवून नेतो ...
राजकन्या : दुर्मुखेकाका, सीतेला पळवून नेतो तो रावण, राम नव्हे. आणि महाभारत नव्हे, रामायण. शिवाय मी वाचलंय खूपखूप गोष्टीतून. राजकन्या खेळत असताना एक राक्षस येतो...
राजगायक : (घाबरून) बापरे, राक्षस? कन्याराजे, थांबा. मला राक्षसाचं नाव ऐकून सुद्धा भीति वाटते. आधी मी बाहेर जातो, मगच येवूं दे राक्षसाला. चला हो सदारोगी, चला हो बोलखोटेशास्त्री.
दोघेजण : चला, चला.
( राजवैद्य, राजगायक व राजज्योतिषी लगबगीने बाहेर निघून जातात. )
राणीसाहेब : (उत्सुकतेने) एक राक्षस येतो. मग?
राजकन्या : मग तो राजकन्येचं तोंड बंद करून तिला उचलतो.
विदूषक : तोंड बंद करण्यापर्यंत ठीक आहे, पण मला राणीसाहेबांना उचलावं लागेल?
राजकन्या : नाही हो काका. तुम्ही आईला खरंखुरं कुठे पळवून नेताय? ती स्वत:च येतेय तुमच्याबरोनर. तेव्हा तोंड बंद करायची किंवा तिला उचलायची सुद्धा गरज नाही.
विदूषक : (लांब श्वास घेवून) मग सुटलो बाबा. बायकांचं तोंड बंद करायचं म्हणजे नाकी नऊ येतात.
राणीसाहेब : मग पुढे काय होतं?
राजकन्या : राक्षसाने उचलताच राजकन्या मोठ्याने ओरडते, "वाचवा.. वाचवा."
( राणी आणि राजकन्या मोठ्याने ओरडतात, "वाचवा, वाचवा." ते ऐकून राजा उठून बसतो. )
राजेसाहेब : (दचकून) काय झालं? काय झालं?
राणीसाहेब : अजून काही झालेलं नाही, व्हायचंय. तुम्ही खुशाल झोप काढा. काही झालं की आम्ही तुम्हाला उठवू. (राजा झोपी जातो.) मग पुढे?
राजकन्या : राजकन्या जोरात ओरडते...
राणीसाहेब : कळलं. तू नको ओरडूस. त्यानंतरचं सांग.
राजकन्या : ओरडताओरडता राजकन्या आपल्या अंगावरचे दागिने काढून फेकते.
राणीसाहेब :श्शी, दागिने काढावे लागणार?
राजकन्या : त्याशिवाय राजाला कसं कळणार, राजकन्येला पळवून कुठं नेलंय ते?
राणीसाहेब : बास्स, एवढंच ना? चला, सुरवात करा. मी इतकी excitement झालीय.
विदूषक : हं, आता तुम्ही ओरडा.
राणीसाहेब : मूर्खच आहात. मी आधीच ओरडले तर हे उठतील ना, मग मी पळून कशी येणार?
राजकन्या : मम्मी, तू आधी दागिने काढून फेकायला लाग. व बाहेर गेल्यावर ओरडायला लाग. मीसुद्धा ओरडते.
( राणीसाहेब हातातल्या बांगड्या काढून फेकायचा प्रयत्न करते, पण बांगड्या निघत नाहीत. )
विदूषक : त्वरा करा. आपल्याकडे तेवढा वेळ नाही.
राणीसाहेब : या बांगड्या निघत नाहीत त्याला मी तरी काय करू?
राजकन्या : अग, आई, बांगड्याच फेकायला हवं असं नाही. दुसरा कुठलाहि दागिना फेकला तरी चालतो.
राणीसाहेब : तुला म्हणायला काय जातं? बाकी सगळे दागिने खर्‍या सोन्याचे आहेत. या बांगड्याच काय त्या खोट्या आहेत.
राजकन्या : आई, हे खरे दागिने देखील आपल्याच राजवाड्यातच पडणार आहेत ना? शेवटी बाबांनाच मिळतील. लवकर कर.
( राणीसाहेब गळ्यातील कंठा काढून खाली फेकतात व ओरडायला लागतात... )
राणीसाहेब : वाचवा... वाचवा.
राजकन्या : मम्मी, over-acting करूं नकोस. तुम्ही जा, मी ओरडते. (राणीसाहेब व विदूषक बाहेर निघून जातात.) वाचवा... वाचवा..
राजेसाहेब : (पलंगावर उठून बसत) कन्याराजे, काय झालं? कसला आरडाओरडा चालला होता? मला एक भयंकर स्वप्न पडलं.
राजकन्या : कसलं स्वप्न, डॅडी?
राजेसाहेब : मला स्वप्न पडलं की एक भयंकर तोंडाचा राक्षस आमच्या राणीसाहेबांना पळवून नेत होता आणि ती ओरडत होती, "वाचवा, वाचवा".
राजकन्या : डॅडी, स्वप्न नव्हतं ते. खरोखरच आईला पळवून नेली.
राजेसाहेब : (बाह्या सरसावून) कोण राक्षस आला होता ते सांग.
राजकन्या : राक्षस नव्हता आला. ते जावूं दे. आपण इथं एखादी खूण सापडते का ते बघू.
राजेसाहेब : (घाबरून) खून? तुझ्या मम्मीचा खून झाला?
राजकन्या : खून नाहो हो बाबा. तुम्ही देखील ना? खूण... खूण. कुणाला पळवून नेतात, तेव्हा राजकन्या दागिने वगैरे टाकते त्याला खूण म्हणतात. ती खूण घेवून आपण तपास करायचा असतो. (खाली पडलेला कंठा उचलून देत) हा बघा कंठा. हा घेवून राजकन्येचा शोध करायचा असतो.
राजेसाहेब : पण राजकन्या म्हणजे तू तर इथंच आहेस. मग तुझा शोध कसा करायचा?
राजकन्या : बाबा, तुम्ही पण ना? अहो, राजकन्या हरवली तर राजकन्येचा शोध. आता आई हरवलीय म्हणजे आईचा शोध.
राजेसाहेब : कळलं. तेवढा काही मूर्ख नाही मी. आता तू जा अन आईचा शोध कर. हवं तर सगळ्या टीव्ही चॅनल्सवर बातमी दे. पैशाची काळजी नको करूस. तुझी आई सापडली की मला सांग. तोपर्यंत मी थोडा झोपून उठतो.
राजकन्या : पा, तुम्ही झोपायचं नाही. उलट आम्हाला तुमची झोप पळवून लावायचीय.
राजेसाहेब : ती कशी काय?
राजकन्या : पॉप, असं काय करता? आईला पळवून नेलंय व तुम्हाला काळजी वाटत नाही? उद्या सकाळी तुम्हाला नाश्ता कोण करून देईल? रात्री तुम्हाला झोपवताना गोडसं गाणं कोण म्हणेल?
राजेसाहेब : खरंच की. हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. आता मला झोप कशी येईल? या काळजीनं माझी तर झोपच उडाली.
राजकन्या : हां, आता आलात ना लाईनवर? तुम्हाला झोप कशी येईल?
राजेसाहेब : बरं मग तू म्हणशील का एखादं गोडसं गाणं मला झोपवायला?
राजकन्या : डॅड, आधी आपल्याला मॉमचा शोध घ्यायचाय.
राजेसाहेब : हे काम तर गुप्तहेराचं आहे. त्या लठ्ठूला सांग की आपल्या राज्यातील सर्वात हुशार गुप्तहेराला बोलावून आण.
राजकन्या : पप्पा, गुप्तहेर कशाला हवा? तुमच्या बायकोचा शोध तुम्हालाच घ्यायला हवा.
राजेसाहेब : म्हणजे नेमकं काय करायचं? मी आजपर्यंत कुणाचाच शोध लावलेला नाही. मला कसं कळणार काय करायचं ते?
राजकन्या : सोपं आहे. हा कंठा घेवून बाहेर जायचं व सर्वांना विचारत फिरायचं, "असे दागिने फेकत, ’वाचवा, वाचवा’ ओरडत जाणार्‍या बाईला कुणी पाहिलंय का?"
राजेसाहेब : मी नाही बुवा कुणाला पाहिलं.
राजकन्या : फ़ादर, मी तुम्हाला नाही विचारलं. तुम्ही कसा शोध घ्यायचा ते दाखवलं. आपण असं विचारलं की लोक आपल्याला खुणा सांगतात. आपण त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन राजकन्येला, म्हणजे राणीसाहेबांना, म्हणजे आईला, सोडवून आणायचं. कळलं?
राजेसाहेब : कळलं?
राजकन्या : तुम्ही शोध घेणार म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे. कळलं?
राजेसाहेब : कळलं.
राजकन्या : काय कळलं?
राजेसाहेब : हेच की मी शोधायला जाणार म्हणजे मला कळायला हवं.
राजकन्या : पण तुम्हाला कळलं ना?
राजेसाहेब : पक्कं कळलं.
राजकन्या : मग निघा आणि आईचा शोध घ्यायला लागा.
राजेसाहेब : मी एकटाच?
राजकन्या : मग काय, सबंध राज्याला घेवून जाणार?
राजेसाहेब : तू ये ना माझ्याबरोबर.
राजकन्या : आणि माझं होमवर्क कोण करणार? तुम्ही एकटेच जा.
राजेसाहेब : आणि मला वाटेत कुणी पळवून नेलं तर?
राजकन्या : तुम्हाला पळवून न्यायला कुणाला वेड नाही लागलं. शिवाय राजाला पळवून नेल्याचं मी एकाही पुस्तकात वाचलेलं नाही. तुम्ही आता जा पाहू.
राजेसाहेब : आता तू म्हणतेच आहेस तर जातो बापडा. (बाहेर जातो.)
राजकन्या : शाब्बास! (तेवढ्यात राजा परत येतो.) आता काय झालं?
राजेसाहेब : तुझा निरोप घेवून जातो, नाहीतर तू रागावशील.
राजकन्या : आता तुम्ही नाही गेलात तर नक्कीच रागावेन. मी तीन मोजायच्या आत तुम्ही राजवाड्याबाहेर असायला हवं. एक ... दोन ... सव्वादोन ... अडीच ...
( राजा "पावणेतीन... तीन" करीत बाहेर जातो. तो गेल्यावर थोडा वेळ गेल्याचं सूचक म्हणून स्टेजवर अंधार पसरतो. थोड्या वेळाने प्रकाश परत येतो. )
राजकन्या : अजून कसे नाही आले पा व मा? वाट पाहूनपाहून भयंकर कंटाळा आला.
( बाहेरून राजाचा आवाज येतो, "आम्ही आलो." मागून राजा आणि राणी प्रवेश करतात. )
राजेसाहेब : (स्वत:वरच खूष होऊन) बघ, आणलं की नाही तुझ्या आईला सोडवून?
राजकन्या : (राणीला बाजूला घेवून) ए आई, सुटका होऊन आल्यावर राणी राजकन्येला मिठी मारून म्हणते, "बाळ, कित्ती ग वाळलीस तू?"
राणीसाहेब : मी आले ना सुटका होऊन. मग विचार मला, "बाळ, कित्ती ग वाळलीस तू?"
राजकन्या : आई, तू कश्शी ग जरासुद्धा वाळली नाहीस?
राजेसाहेब : कन्याराजे, विचार मला तुझी मम्मी कुठे सापडली ते.
राजकन्या : कुठे?
राजेसाहेब : राजविदूषक दुर्मुखेच्या घरी.
राजकन्या : म्हणजे दुर्मुखेकाकांनी आईला पळवून नेलं होतं? बाप रे बाप!
राजकन्या : तुझ्या बापानेच आणलं तुझ्या आईला. आणि कुणी पळवून नव्हतं नेलं काही तिला. बस इथं, मी सांगतोच सारी गम्मत. हा कंठा घेवून मी बाहेर पडलो तेवढ्यात हे राजवैद्य समोर दिसले. कंठा दाखवून मी त्यांना विचारलं, "असे दागिने फेकत, ’वाचवा, वाचवा’ असं ओरडत जाणार्‍या बाईला कुणी पळवून नेताना तुम्ही पाहिलंत का?"
राजवैद्य : (प्रवेश करीत) मी म्हणालो, हो पाहिलंय.
राजेसाहेब : तर मी म्हणालो, कुठे पाहिलं, लवकर सांगा. माझ्या लाडक्या राणीला एका रंगीबेरंगी व बेढंगी राक्षसाने पळवून नेलंय. त्या राक्षसाचं लक्ष चुकवून तिनं हा कंठा फेकला खूण म्हणून.
राजवैद्य : तर मी यांना एक डूल दिला आणि म्हणालो, "महाराज, हा डूल घ्या. त्यांना तो राक्षस नेत होता तेव्हा राणीसाहेबांनी हा डूल तुम्हाला द्यायला म्हणून दिला."
राजेसाहेब : मी हा डूल घेतला आणि म्हणालो, "चला, आपण जरा पुढे जावूया व अजून एखादी खूण मिळते का ते बघूया. व आम्ही जरा पुढे गेलो.
राजवैद्य : तिथं आम्हाला राजगायक रडवेबुवा भेटले. मी त्यांना विचारलं, "कायहो रडवेबुवा, असे दागिने फेकत ’वाचवा, वाचवा’ असं ओरडत जाणार्‍या बाईला कुणी पळवून नेताना तुम्ही पाहिलेंत का?"
राजगायक : (प्रवेश करीत) हो, पाहिलं की. त्यांनी मला ही अंगठी दिली.
राजेसाहेब : ही अंगठी राणीची वाटत नाही.
राजगायक : तेव्हा मी म्हटलं, महाराज, राणीसाहेब आपल्याच ओठातली... चुकलो, आपल्याच बोटातली अंगठी काढून देणार होत्या. पण ती अंगठी त्यांच्या जाडजूड बोटात इतकी जाम घट्ट बसली होती की ती निघेनाच. शेवटी त्या मला म्हणाल्या, "रडवेबुवा, तुम्ही आपल्याच हातातली अंगठी खूण म्हणून महाराजांना द्या. माझी अंगठी निघतच नाही." मी म्हणालो, चालेल. फक्त काम झाल्यावर परत तेवढी द्या.
राजवैद्य : आणि आम्ही पुढे निघालो. आणि बरं का कन्याराजे, तिथं आम्हाला राजज्योतिषी बोलखोटेशास्त्री भेटले. आम्ही त्यांना विचारलं ...
तिघेजण एकत्र : कायहो बोलखोटेशास्त्री, असे दागिने फेकत, ’वाचवा, वाचवा’ असं ओरडत जाणार्‍या बाईला कुणी पळवून नेताना तुम्ही पाहिलंत का?"
राजज्योतिषी : (प्रवेश करीत) तर राणीसाहेब मला म्हणाल्या, "बोलखोटेशास्त्री, मी माझ्या हातातल्या बांगड्या खूण म्हणून देणार होते. पण त्या माझ्या हातातून निघतच नाहीत. तेव्हा तुम्ही तुमच्या हातातील बांगड्या महाराजांना द्या." मी मान डोलावली व पुढे आल्यावर माझ्या लक्षात आलं.
राणीसाहेब : काय?
राजज्योतिषी : की बहुतेक पुरुषांच्या हातात बांगड्या नसतात.
राणीसाहेब : मग?
राजज्योतिषी : मग आम्ही सगळेजण पुढे निघालो. तिथे आम्हाला विदूषक भेटला.
राजवैद्य : आम्ही त्याला तसंच विचारलं -- ते दागिने फेकणं, ओरडणारी बाई, वगैरे.
राजविदूषक : (प्रवेश करीत) आणि मी म्हणालो, महाराज, पाहिलंय का म्हणून काय विचारता. पाहिलंय. आधी या दोन डोळ्यांनी भरभरून पाहिलं. विश्वास बसेना म्हणून चष्मा, दुर्बीण, भिंग घेवून सुद्धा पाहिलं. राणीसाहेबच होत्या. महाराजांना मस्का मारायची ही उत्तम संधी होती. मी राणीसाहेबांना म्हटलं...
राणीसाहेब : हा दुर्मुखे म्हणतो कसा, "राणीसाहेब, काही काळजी करू नका. मी तुम्हाला या राक्षसाच्या तावडीतून सोडवतो."
राजकन्या : So exciting! मग?
विदूषक : मी सांगतो. मी त्या राक्षसाला म्हणालो, "मूर्खा, हिम्मत असेल तर मला पळवून ने, पण राणीसाहेबांना सोड." असं म्हणून मी काडकन त्याच्या थोबाडीत मारली. पण तो शहाणा ऐन वेळी खाली बसला व ती थप्पड माझ्याच मुस्काटीत बसली. मग त्याने मला मारलं. नंतर मला त्याने मारलं. मग आम्ही कुस्ती लढलो. कधी तो वर, मी खाली. तर कधी मी खाली, तो वर. मग मी माझ्या खिशात असलेली तपकिरीची डब्बी काढून थोडी तपकीर त्याच्या नाकात कोंबली.
राजकन्या : (हसत) मग?
विदूषक : मग काय? तो लागला जोरजोरात शिंकायला. हॅंक छी, हॅंक छी, हॅंक छी. नेमकी हीच संधी साधून मी राणीसाहेबांना उचललं आणि माझ्या घरी घेवून गेलो. (राजकन्या जोरजोरात हसायला लागते.) कन्याराजे, हसताय का? खरी गोष्ट सांगतोय मी.
राजकन्या : विदूषककाका, खरीखोटी जी असेल गोष्ट, पण तुम्ही मस्तपैकी सांगता. हसायला येतंच. तुम्ही? मम्मीला उचललं? (परत हसायला लागते.) पुढे काय झालं? तुमची हाडं खिळखिळी झाली? मग?
विदूषक : मग आम्ही सगळेजण राणीसाहेबांना घेवून इथं आलो.
राजवैद्य : मात्र उचलून नव्हे हं! (हसतो.)
राजकन्या : मग?
विदूषक : मग ... मग ...(गोंधळून) मग काय झालं?
राजकन्या : संपली गोष्ट?
विदूषक : गोष्ट? म्हणजे तुम्हाला वाटतं मी इतका वेळ थापा मारत होतो? कुठल्याही टीव्ही चॅनलवर Breaking News म्हणून आली असती ही गोष्ट.. नाही, ही बातमी. म्हणे गोष्ट संपली?
राजेसाहेब : हो, गोष्ट संपली, काळजी मिटली, पुन्हा मला झोप यायला लागली. मी चाललो झोपायला.
सगळेजण : (ओरडून) नको महाराज. झोपेची गोष्ट नको.
राणीसाहेब : तुमची झोप उडावी म्हणून तर आम्ही एवढी धडपड केली. आणि तुम्ही परत झोपायची गोष्ट करता? प्लीज़...
राजेसाहेब : हे बघा, तुम्ही नव्हता तेव्हा चिंता होती. चिंता होती तेव्हा झोप नव्हती. आता तुम्ही आहात तेव्हा चिंता नाही. चिंता नाही तेव्हा झोपलं तर कुणाच्या बापाचं काय जातं? ते काही नाही, आम्ही झोपणारच. शुभ रात्रि, Good night.
( राजेसाहेब आपल्या पलंगावर जावून झोपतात. राणीसाहेब घाईघाईने पलंगाजवळ येतात, व ... )
राणीसाहेब : (ओरडून) हं उठा आता. खूप झाली झोप. राजा म्हणून काही कामं आहेत की नाही तुम्हाला? मी पाच मोजायच्या आत उठा, नाहीतर... एक ... दोन ...
( राजेसाहेब पटकन उठून पलंगावर बसतात. सगळेजण कौतुकाने राणीकडे बघतात. )
राजेसाहेब : राणीसाहेब, ते जुनं झालं. आता असल्या धमक्यांना घाबरत नाही मी. सवय झालीय मला. शुभ रात्रि. Gooooood ... (बोलताबोलताच जांभया देत पलंगावर आडवा होतो आणि जोरजोराने घोरायला लागतो.)
राणीसाहेब : आली ना पंचाईत? आता काय करायचं?
विदूषक : काय करणार? आधी थोडा विचार करायचा, मग दवंड्या पिटवायच्या, राजाची झोप घालवणार्‍याला अर्धं राज्य व अर्धी राजकन्या ...
राजकन्या : (त्याला मधेच थांबवून) ... नाही, पूर्ण राज्य आणि पूर्ण राजकन्या देणार. (हसायला लागते.)
( परत सगळेजण आपापल्या पद्धतीने विचार करायला लागतात. हळूहळू पडदा पडायला लागतो. )


* * * * * तिसरा अंक/नाटक समाप्त * * * * *

लेखक

लक्ष्मीनारायण हटंगडी
EC51/B104, Sai Suman CHS,
Evershine City, Vasai (E)
PIN 401208
(E-mail: suneelhattangadi@gmail.com)






No comments:

Post a Comment