( पडदा उघडतो तेव्हा स्टेज रिकामे असते. थोड्या वेळाने एक तेरा-चौदा वर्षाचा मुलगा हताशपणे चालत प्रवेश करतो. चेहरा रडका व चिंताग्रस्त, केस विस्कटलेले. )
सुनील : नमस्कार मंडळी, बहुतेक तुम्ही सगळे आम्हा मुलांचं नाटक पहायला आला आहात. सुखी आहात.
म्हणजे आमचं नाटक पहायला आलात म्हणून सुखी आहात अशातला भाग नाही. पण तुम्ही फक्त नाटक
पहायला आलायत, कधी स्वत: नाटक बसवायच्या भानगडीत पडला नसावात म्हणून सुखी आहात. मी
सांगतो तुम्ही कधी या भानगडीत पडू सुद्धा नका. हा असला प्रसंग देवाने शत्रूवर सुद्धा आणू नये.
देवाची, नव्हे, या रिकाम्या स्टेजची शप्पत घेऊन सांगतो या असल्या भानगडीत डोकं पिकून जातं. विश्वास
नाही ना बसत? माझ्या या विस्कटलेल्या केसांकडे बघा. हां, तसे पूर्ण पिकलेले नाहीत अजून, पण या
नाटकाचा दुसरा प्रयोग होईपर्यंत डोक्यावर एकही काळा केस शिल्लक नसेल.
( आतून दुसरा मुलगा, अनील, वैतागलेल्या स्थितीत पाय आपटीत येतो. )
अनील : ए सुनील, नुसता बडबडत काय बसला आहेस इथं? आत ये लवकर, स्टेज कोसळून पडायची वेळ आली
आणि तुला अजून गप्पा सुचताहेत!
सुनील : गप्पा नाही मारत उभा मी इथे. आधीच वैतागलोय. आणखी वैताग नको देऊस. दु:ख लोकांकडे व्यक्त
केलं तर कमी होतं म्हणतात हे बहुतेक ठाऊक नाही तुला.
अनील : मग आम्हाला सांग ना आपलं दु:ख. आम्ही कमी करूं. ह्या बिचार्या प्रेक्षकांचं डोकं नको पिकवूस.
सुनील : तुम्ही? माझं दु:ख कमी करणार? तसं असतं तर ह्या बिचार्या प्रेक्षकांचं डोकं पिकवायची वेळ माझ्यावर कशाला आली असती? चल आत सटक. मोठ्या माणसांनी बोलत असताना लहानांनी डोकं खुपसायचं नसतं. चल हो आत. (अनील पाय आपटीत आत निघून जातो.) तर मंडळी, ही अशी अवस्था आहे. म्हणून सांगत होतो की कधीही नाटक बसवण्याच्या भानगडीत पडूं नका.
( प्रेक्षकातील एक मुलगा उठून स्टेजवर येतो. )
मुलगा : पण का भानगडीत पडू नका ते नाही सांगितलंत.
सुनील : थांब रे जरा, तेच सांगतोय. माझं नाव सुनील. मी ह्या बालनाट्यगडबड मंडळीचा कर्तासवरता. सूत्रधार. सूत्रधार म्हणजे अगदी one man show. तुम्हाला वाटेल मी खोटं बोलतोय. पण या रिकाम्या स्टेजची शप्पत.
अगदी मुलं जमवण्यापासून ते स्टेज बांधेपर्यंत सर्व मलाच पहावं लागतं.
मुलगा : आपली तारीफ पुरे. एक तासपासून वाट पहातोय आम्ही. नाटक कधी सुरु करणार ते आधी सांगा.
सुनील : तीच तर गम्मत आहे. आमच्या नाटकाचं नाव माहीत नसेल तुम्हाला. मी मस्तपैकी बोर्ड तयार केला होता. पण तो दारावर लावायला ही मुलं विसरली. (धावत आत जाऊन एक बोर्ड घेऊन बाहेर येतो.) दिसतोय की नाही झकास? हा सुंदर बोर्ड देखील मीच तयार केला. नाटकाचा लेखक सुद्धा मीच आहे. "कृष्ण हरण" नाव आहे. नाव जरा चमत्कारिक वाटेल, पण एकदम हटके आहे की नाही? शिवाय स्वत: लिहिलेल्या नाटकात सगळं खपून जातं. बाहेरच्या लेखकाचं नाटक घेऊन त्याला फुकटचे मानधन द्या, कशाला हवी कटकट? म्हणून विचार करून शेवटी मीच लिहीलं नाटक. महाभारतातला घेतला कृष्ण आणि रामायणातल घेतलं हरण.
मुलगा : चोर चोर.
सुनील : ह्यॅं. म्हणे चोर. मोठ्या प्रसिद्ध लेखकांनी चोरी केलेली चालते वाटतं? आम्ही मुलांनी इथून-तिथून प्रेरणा घेऊन स्वतंत्र नाटक लिहीलं तर म्हणे चोरी! जाऊंदे. म्हटलंच आहे ना, "जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण". तर मित्रहो, ऐकायची आहे का आमच्या, चुकलो, माझ्या नाटकाची स्टोरी?
प्रेक्षक : (ओरडून) हो, हो.
सुनील : तर एकदा काय होतं...
( आतून दिलीप धावत येतो. )
दिलीप : साला, शहाणाच आहेस, गोष्ट सांगायला निघालायस तो. हो म्हणायला लोकांच्या बापाचं काय जातं? नाटकाआधी गोष्ट सांगून कधी सस्पेन्स नसतो घालवायचा.
सुनील : दिलीप, हे बघ, तू मला शिकवायला जाऊ नकोस. सस्पेन्स जायला आपलं नाटक कुठे मर्डर मिस्टरी आहे? आणि तुला माहित नाही वाटतं, हल्लीच्या नाटक-सिनेमात लोकांना अगदी The End आला तरी स्टोरीचा पत्ता लागत नाही.
दिलीप : असेल. तरीहि आपल्या नाटकाची स्टोरी लोकांना सांगायची नाही. तुला एक अक्कल ती नाही.
सुनील : आणि तुझी अक्कल कळली. मला... आपल्या बॉसला पब्लीकसमोर अक्कल शिकवतोयस? आधी आत सटक. मी बोलवेन तेव्हाच या एकेकजण.
दिलीप : (दम देत) जातो, पण ताकीद देतोय, पब्लीकला स्टोरी सांगायची नाही म्हणजे नाही. या नाटकाला माझंसुद्धा contribution आहे. हरणाचं, म्हणजे रामायणाचं पुस्तक माझं होतं. (तणतणत आत जातो.)
सुनील : (समोर बघून) गैरसमज करून नका घेऊ तुम्ही. ह्या दिलीपचा attitude पाहून तुमचा गैरसमज होणं साहजिकच आहे. पण या नाटकाचा कर्ताधर्ता, म्हणजे लेखक, निर्माता, दिग्दर्शक, हीरो, वगैरे सर्व मीच आहे. पण काय करणार, नाटक करायची हुक्की मलाच आहे ना? तेव्हा तोंड दाबून बुक्कीचा मार मलाच खावा लागणार.
मुलगा : ते सगळं जाऊंदे. आधी नाटक सुरू करा, नाहीतर अंड्यांचा मार खावा लागेल.
सुनील : असं नसतं रे बोलायचं. असा जवळ ये. (मुलगा स्टेजवर येतो.) नाव काय तुझं?
मुलगा : राहुल सदाशिव काळे.
सुनील : तरीच.
मुलगा : तरीच काय?
सुनील : तरीच एवढा गोरा आहेस. एक गम्मत सांगू तुला, मला आजपर्यंत भेटलेले सगळे काळे गोरेच होते. काय गम्मत आहे नाही?
मुलगा : ती गम्मत सोड. पैसे देऊन तिकीटं काढलीयत आम्ही. दिलेली वेळ संपून अर्धा तास झाला, अजून तुमचं नाटक सुरू होत नाही. अंडी हवीत असं दिसतं. गम्मत करत नाही मी.
सुनील : (कानात हळूच बोलत) तुला म्हणून सांगतोय, आमचं एक पात्र अजून आलेलं नाही म्हणून थोडा टाईम पास करतोय मी. तोपर्यंत इतर पात्रांची ओळख करून देतो. पात्रं म्हणजे काय, अगदी पात्रंच आहेत.
दिलीप : (आतून येत) ए, ऐकतोय मी. पात्रं काय? आमच्या पाठी बोलतोस? असेल हिम्मत, तर समोर बोल ना? अजून जास्त बडबड केलीस ना, तर ... तर ...
सुनील : तर काय करशील?
दिलीप : (थोडा वेळ विचार करून) नाटकात काम नाही करणार. मग बघीन कसं नाटक करशील ते. (ताडताड आत निघून जातो.)
सुनील : पाहिलंत, अशी लफडी आहेत सगळी. ऐकून घ्यावं लागतं सगळं. म्हणतात ना, अडला हरी ...
मुलगा : ...हरी म्हणालास तेव्हा आठवण झाली. पात्रांची ओळख करून देणार होतास ना?
सुनील : अरे हो, आधी पांच पाण्डवांची ओळख करून देतो. (आत पडद्याकडे पाहून) ए धर्मा, आधी बाहेर ये बघू.
( काही वेळ कुणीच बाहेर येत नाही. मग दिलीप तणतणत बाहेर येतो. )
दिलीप : च्यायला, बोंबलायला काय झालं?
सुनील : मग हाक दिल्याबरोबर यायला काय झालं?
दिलीप : म्हणे हाक दिल्याबरोबर यायला काय झालं? मी काही भीमासारखा लेचापेचा नाही. धर्मराज आहे, धर्मराज. कुणाची दादागिरी ऐकून नाही घेणार.
( मुलगा, राहुल, सुनीलकडे आश्चर्याने पहातो. )
मुलगा : हा ज्वालामुखी, धर्मराज?
दिलीप : तो रामायणातला धर्मराज असेल शांत स्वभावाचा.
मुलगा : तुला महाभारतातला म्हणायचंय?
दिलीप : रामायणातला असेल, महाभारतातला असेल, नाहीतर भारतातला असेल. तुला कळलं ना मला काय म्हणायचंय ते? मग झालं तर.
( मुलगा सुनीलकडे प्रश्नार्थक नजरेनॆ बघतो. )
सुनील : नाईलाज आहे. नाटक करायची हौस मलाच आहे ना? शिवाय जिथं हे स्टेज बांधलंय ते गॅरेज या दिलीपचं आहे. ऐकून घ्यावं लागतं.
दिलीप : (परत येत) मग उपकार करतोयस? गॅरेज आहेच मुळी माझं.
सुनील : तर ह्याला धर्मराज केलं एवढंच नव्हे, तर ह्याच्या तापट स्वभावाप्रमाणे नाटकातल्या धर्माला देखील तापट बनवला.
दिलीप : मिस्टर, पुन्हा सांगतोय, उपकार केले नाहीस.
सुनील : (हात जोडून) नाही धर्मराज, मी नाही, तुम्ही उपकार केले माझ्यावर. आता आत जा आणि अर्जुनाला बाहेर पाठवा.
( तेवढ्यात आतून शैलेश, म्हणजे अर्जुन, "डावा-उजवा, डावा-उजवा, क्विक मार्च" करीत स्टेजवर येतो. )
सुनील : अरे गाढवा, इतक्या तालमी झाल्या तरी अजून तुझ्या लक्षात रहात नाही?
शैलेश : चांगलं लक्षात आहे. तू सांगितलं होतंस की भाषण विसरलो तर जीभ बाहेर काढायची नाही. ही अश्शी. (जीभ बाहेर काढून दाखवतो.)
सुनील : बाबारे, ते नाटक सुरू झाल्यानंतर. तुझी एण्ट्री कशी घ्यायला सांगितली होती मी?
शैलेश : अगदी दणक्यात. घेतली की नाही दणक्यात एण्ट्री? अगदी युद्धातल्या सैनिकासारखी?
सुनील : बाबारे, हे युद्ध पुराणातलं आहे, इंग्रज़ांच युद्ध नाही.
शैलेश : सॉरी यार, थोडा गोंधळ झाला. मी आत जातो आणि परत एण्ट्री घेतो. तू मला परत एकदा हाक मार मघासारखी. (आत जातो.)
मुलगा : गॅरेज धर्मराजांचं. ह्यांचं काय? स्टेज?
सुनील : याचे वडील डायरेक्टर आहेत.
मुलगा : मघाशी तर म्हणत होतास की तू डायरेक्टर आहेस.
सुनील : ती आतल्या गोटातली बातमी आहे. एक फडतूस मुलगा डायरेक्टर आहे म्हणून कळलं तर नाटक बघायला येईल कोण? तू आला असतास?
मुलगा : उन्हाळ्याच्या सुटीत सगळं चालतं मित्रा.
शैलेश : (आतून मान बाहेर काढून) ए, लवकर बोलाव ना. मी केव्हाची वाट पहातोय.
सुनील : चुकलो. अर्जुना, बाहेर ये.
( शैलेश पॅण्टीच्या खिशात हात घालून दिमाखाने चालत प्रवेश करतो. )
शैलेश : कशी काय झाली ही एण्ट्री?
सुनील : (नाईलाजाने डोक्यावर हात मारून घेत) मस्त झाली. अगदी ’डॉन’ सिनेमातल्या व्हिलन शाहरुख खानसारखी.
मुलगा : काय रे शैलेश, तुझे बाबा कुठे आहेत? डायरेक्टर ना ते, मग नाटकाच्या दिवशी त्यांना हजर असायला हवं.
शैलेश : काही गरज नाही. हा आहे ना हज़र अंडी खायला. शिवाय, त्यांची ट्यूशनची वेळ आहे.
मुलगा : शिक्षक आहेत ते? ऍक्टींग शिकवतात?
शैलेश : पीटी चे सर आहेत ते. पण ट्यूशन सर्व विषयांची घेतात. मला ही ग्रॅण्ड एण्ट्री घ्यायला त्यांनीच शिकवली.
मुलगा : तुझ्या चालण्यावरून वाटलंच ते. अजून किती पात्रं शिल्लक आहेत?
शैलेश : बरेच शिल्लक आहेत. आतां तर नुसते दोन पाण्डव झाले. तुझं रामायण फार कच्चं दिसतंय.
सुनील : आता पाळी भीमाची. (आंत पडद्याकडे पाहून) गदाधारी भीमा, एण्ट्री घे.
( आतून एक हडकुळा मुलगा, विकास, हातातली बॅट टेकवीत हळूहळू बाहेर येतो. जांभया देत बोलतो. )
विकास : काय झालं? चांगली डुलकी लागली होती. कशाला उठवलंस मला उगीच?
सुनील : अरे भीमा, नाटक सुरू व्हायची वेळ झाली आणि तू अजून डुलक्या देतोयस?
विकास : चक्क अर्धा तास वाट पहातोय, नाटक आतां सुरू होईल, मग सुरू होईल. शेवटी ही गदा हलवायची प्रॅक्टीस करून करून थकलो आणि डोळा लागला.
सुनील : हा आमचा भीम. खरं नाव विकास.
मुलगा : हा भीम होणार?
विकास : होणार नाही, झालोय.
मुलगा : (सुनीलला) आणि ह्याचं काय? महाभारत की रामायणाचं पुस्तक?
दिलीप : (अंगावर धावून जात) रामायण माझं आहे. फार तर ही गदा, म्हणजे ही बॅट ह्याची असेल.
शैलेश : बॅट सुद्धा त्याची नाही, त्याच्या बाबांची आहे. क्रिकेटचे कोच आहेत ते.
विकास : कोच क्रिकेटचे असतील, पण बाबा तरी माझे आहेत की नाही?
मुलगा : कायहो डायरेक्टर, दुसरा कुणीच भेटला नाही भीमाच्या भूमिकेला?
सुनील : भेटला होता ना. चांगला लट्ठ गुबगुबीत मुलगा भेटला होता. अंगावर काही कपडे देखील घालायची गरज़ नव्हती. नुसता उभा केला असता ना, तरी भीम वाटला असता. पण ... (विकास रागावून आत जायला लागतो.) अरे विकास, तुला रागवायला काय झालं?
विकास : मग उगाच कुणी माझ्याबद्दल वाईट बोललं तर मी का खपवून घेऊं? तुम्हाला गदेसाठी कुणी बॅट द्यायला तयार नव्हतं म्हणून तर तुम्ही मला मस्का लावायला आलात आणि मी अगदी ऐन वेळी काम सुद्धा करायला तयार झालो. त्याचं तुम्हाला कौतुक नाही!
सुनील : कौतूक नाही कसं? कौतुक आहे म्हणून तर मी ऊठसूठ सगळ्यांना सांगत सुटतो की माझ्या जोड्यांचं कातडं जरी या विकास जाडेच्या अंगावर घातलं तरी त्याचे उपकार फेडणं शक्य नाही. (प्रेक्षकांना) अहो, परवापर्यंत तो सुहास लुकडे भीमाचं काम करायला तयार होता. मग या दिलीपचं आणि त्याचं झालं भांडण. मग काय, तो म्हणाला "या नाटकात एकतर मी राहेन किंवा हा दिलीप".
मुलगा : मग?
सुनील : मग काय? भीमाच्या भूमिकेला तो फिट होता म्हणून त्याला ठेवला असता, तर हे गॅरेज, हे स्टेज वगैरे काही मिळालं नसतं. म्हणून या दिलीपला ठेवला. काय करणार, मघाशी मी म्हणालोच ना, "अडला हरी... (विकास बुक्का दाखवतो.) मग आयत्या वेळी हा विकास जाडे भेटला. दुसरा कुणी जाड्या भीमाची भूमिका करायला तयारच नव्हता.
विकास : आणि तरीसुद्धा मी भाव नाही खायचा?
सुनील : अरे, असं कसं शक्य आहे? तुम्हा सर्वांना भाव द्यायला मी एवढा तयार असताना तुम्ही भाव नाही खाणार तर दुसरं काय खाणार, वडा पाव?
दिलीप : बरी आठवण केलीस. मध्यंतरात खायची व्यवस्था केली आहेस ना?
सुनील : सगळी व्यवस्था झाली आहे, सरकार. आता नकुलला बोलवायला हवं.
विकास : लवकर बोलवायला हवं. तो केव्हांपासून स्टेजवर यायला उतावीळ झालाय.
( एवढ्यात आतून नकूल झालेला अनील घाईघाईने प्रवेश करतो. )
अनील : घात झाला, घात झाला.
मुलगा : हा तेवढा नॉर्मल दिसतोय!
सुनील : नॉर्मलच आहे. आपले सगळे संवाद विसरलाय. हे "घात झाला, घात झाला" कृष्णहरण नाटकातले संवाद नाहीत. गेल्या वर्षी केलेल्या ’शिवसंभव’ नाटकातला डायलॉग आहे हा.
दिलीप : शिवसंभव मधीलच असं नाही. कुठल्याहि ऐतिहासिक नाटकात केव्हातरी, कुठेतरी, एकदातरी घात होतच असतो.
अनील : आणि मी नाटकाचा संवाद म्हणून नव्हतो पाठ करीत. खरोखरच घात झालाय.
सुनील : म्हणजे नक्की काय झालं?
अनील : हरवली.. हरवली. आपल्या नाटकाची एकुलती एक कॉपी हरवली.
( सुनील वैतागून डोक्यावर हात मारतो आणि मट्कन खाली कोसळतो. तो खाली पडण्याच्या आधीच शैलेश व दिलीप त्याला सावरायचा प्रयत्न करतात. विकास आपल्या हातातील बॅट मुलाच्या म्हणजे राहुलच्या हातात देतो आणि आपल्या मित्रांना मदत करायला धावतो. मुलगा ती बॅट खांद्यावर घेवून भीमाच्या पवित्र्यात उभा राहतो. )
सुनील : आतां कसं होणार?
अनील : अगदी तेच तर विचारायला म्हणून मी यायची घाई करीत होतो. फण तुमची इथलीं नाटकं संपतच नाहीत. आता विचारतो, आपलं कसं होणार?
शैलेश : आता बोंबला. वाट लागली आणखी काय?
( एवढ्यात आतून प्रदीप हातात कागदाचे एक गुंडाळे घेऊन धावत येतो. )
प्रदीप : सुनील, मी एक आनंदाची बातमी दिली तर मला काय देशील?
सुनील : वाटेल ते देईन... पण ती आनंदाची बातमी काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे.
प्रदीप : वचन देशील तर सांगेन.
सुनील : दिलं वचन. सांग.
प्रदीप : मिळाली, आपल्या नाटकाची एकुलती एक कॉपी मिळाली. पण ...
सुनील : पण काय?
प्रदीप : ... एक दु:खाची बातमी आहे.
सुनील : तू विचारण्याच्या आधीच दिलं, काय मागशील ते देण्याचं वचन दिलं. लवकर सांग.
प्रदीप : बघ हं, हे दुसरं वचन. मग टाळाटाळ करू नकोस.
सुनील : लवकर सांग. उगीच ब्लॅकमेल करू नकोस.
प्रदीप : नाटकाची एकुलती एक कॉपी मिळाली, पण श्रीकृष्णाच्या लांब केसांचा टोप गुल झालाय.
सुनील : म्हणजे परत बोंबला.
दिलीप : बोंबलायचं काय त्यात? कृष्णाच्या केसांवाचून एकवेळ चालेल, पण नाटकाच्या एकुलत्या एक कॉपीवाचून नसतं चाललं.
सुनील : मूर्खपणा करू नकोस. कृष्णाला काय बोडका पाठवायचा स्टेजवर?
दिलीप : म्हणजे?
सुनील : त्याचा कुणीतरी लांबचा नातेवाईक वारला म्हणून त्याने डोक्यावरचे सगळे केस उडवले आहेत.
दिलीप : थोडासा बदल करायचा नाटकात. महाभारतातल्या धर्माला तापट आणि भीमाला कडक्या दाखवता येतो, तर मग लांब केसांच्या कृष्णाला टकल्या दाखवण्यात काय प्रॉब्लेम येईल?
मुलगा : खरं आहे. कृष्णाचे लांब केस नसतील, कृष्ण तरी आहे ना?
सुनील : मघापासून तीच तर गम्मत सांगायचा प्रयत्न करतोय मी. अरे, कृष्ण मुळी असताच तर मी मघापासून रडगाणं कशाला गात बसलो असतो? मघाशीच सुरू नसतं का केलं नाटक?
मुलगा : आता कृष्ण कुठे बोंबलला?
सुनील : महाभारतात त्या कृष्णाने out of way जाऊन लोकांची संकटं दूर केली. हा आमचा कृष्ण मात्र आम्हाला संकटात टाकून स्वत: आजारी पडलाय.
मुलगा : कशाने?
सुनील : कुणाच्या लग्नाला गेलेला असताना फुकटात मिळतं म्हणून डझनभर आईस्क्रीम्स खाल्लीत. वरून फ़्रिज़चं थंडगार पाणी प्याला. ताप नाही येणार तर काय होणार?
मुलगा : मग आतां?
सुनील : म्हणून तर मघापासून टाईमपास करतोय मी. ताप कृष्णाला आलाय पण डोक्याला ताप मात्र माझ्या. आमचं इवलंइवलं गोडसं हरण सुद्धा तयार आहे. पण कृष्णच नाही तर हरण कुणाचं करणार?
( याचवेळी इवलासा प्रशांत हरणासारखा उड्या मारीत स्टेजवर प्रवेश करतो. )
प्रशांत : म्हणजे शेवटी मला कामच नाही? मी एवढा तयार झालो तर ... मी आजोबांना तुमची कम्प्लेण्ट करणार.
विकास : प्रशांत, गुणी बाळ ना तू? असा हट्ट नाही करायचा. आता कृष्णच नाही तर हरणाचा उपयोग काय?
प्रशांत : (रडत) आमाला नाय माहीत जा. मी नाय नाटकात काम करणार.. कधीच नाही. हरण नाही, वाघ नाही, ससा नाही. अगदी माकड सुद्धा नाही. (रडत रडत आत निघून जातो.)
सुनील : हे अस्सं चाललंय नाटक करायला घेतल्यापासून. सगळ्यांची मर्जी संभाळावी लागते, अगदी धर्मापासून ते ह्या छोट्या हरणापर्यंत. शेवटी माझा मात्र बकरा होतो.
प्रदीप : मग आता नाटकाचं काय?
सुनील : तेच विचारायला उभा आहे ना इथं मघापासून? (प्रेक्षकांना) आता तुम्हीच सांगा, कृष्णाशिवाय नाटक तरी कसं होणार? नाटक कॅंसल केलं तर चालेल ना? पैसे परत मागणार नाही ना?
प्रेक्षक : पैसे परत करा आमचे.
सुनील : ते केव्हाच संपले. तुमच्यापैकी कुणी कृष्णाचं काम करायला तयार असेल तर नाटक करायचं धाडस करूं सुद्धा आम्ही. करणार का कुणी कृष्णाचा मेन रोल? उभे रहा.
( थोडा वेळ शांतता. मग हळूच एक मुलगा उभा राहतो. )
सुनील : शाब्बास. नांव सांग बघू आपलं.
मुलगा : नांव सागेन हवं तर, पण काम नाही करणार.
सुनील : मग उभा कशाला राहिलास?
मुलगा : बराच वेळ बसूनबसून खाज़ यायला लागली म्हणून उभा राहिलो.
(मुलगा कुल्हे खाजवत खाली बसतो.काही वेळाने एक मोठा माणूस उभा राहतो. )
माणूस : मी करेन कृष्णाचं काम.
सुनील : उपयोग नाही. आमच्या कृष्णाचे छोटे कपडे तुम्हाला कसे फ़िट येतील? खाली बसा.
मुलगा : मी केलं कृष्णाचं काम तर चालेल?
सुनील : (आनंदाने) अरे, चालेल म्हणजे काय, अगदी धावेल. खरंच करशील तू काम?
मुलगा : करीन, पण एक अट आहे.
प्रदीप : कसली अट?
मुलगा : तिथं बसलेल्या बाबांची परवानगी काढावी लागेल. (प्रेक्षकांत जाऊन एका माणसाकडे बोलतो आणि परत स्टेजवर येतो.) बाबा ’हॊ’ म्हणाले, पण त्यांची देखील एक अट आहे. फोटो काढावे लागतील.
सुनील : फोटोग्राफरची व्यवस्था केलेलीच आहे आम्ही. (कोपर्यात उभ्या असलेल्या माणसाकडे बोट दाखवून) तो काय आमचा फोटोग्राफर.
शैलेश : ते मामा आहेत माझे, फोटोग्राफर नाही.
दिलीप : मामा असतील तुझ्या घरी. इथे फोटोग्राफर आहेत आमचे.
सुनील : (मुलाला, म्हणजे राहुलला) लवकर आत जा आणि तयार व्हायला लाग. ही चावी घे व त्या कपाटातील काळा रंग अंगाला फासून घे लवकर.
मुलगा : काळा रंग कशाला?
प्रदीप : (वेडावून) महाभारतातला कृष्ण गोरा नव्हता तुझ्यासारखा. काळा होता काळा. रंग लावावाच लागेल.
मुलगा : पुराणातला कृष्ण असेल काळा-निळा. आपण नाही तयार काळं व्हायला.
अनील : काळा रंग न लावताच कृष्ण व्हायचं असतं तर आम्ही नसतो का झालो कृष्ण?
सुनील : (दम देवून) आता हे बघा, तुम्ही सगळे गप्प बसा. गोरा तर गोरा, छोटे केसवाला तर छोटे केसवाला. पण निदान कृष्णाला जास्त डायलॉग्स तरी पाठ करायचे नाहीत. फक्त उभं राहून बांसुरी वाजवायची आहे. एकदोन वेळा "वत्सा" म्हणायचं आहे.
मुलगा : हे बघा, मी पहिल्यांदाच नाटकात काम करतोय. ऐन वेळी "वत्सा" म्हणायला विसरलो तर नाटकं करायची नाहीत.
सुनील : निदान आत जाऊन कपडे तरी बदलून घे. की अस्साच येणार आहेस अर्ध्या चड्डीत?
शैलेश : आणि वत्सा, चुकून "वत्सा" म्हणायला विसरलास तर निदान जीभ बाहेर काढू नकोस.
मुलगा : हे बघा मला तेव्हढं कळतं. तेवढी अक्कल आहे मला. स्कॉलरशिपची परीक्षा दिली आहे मी. निकाल लागायचा आहे अजून.
सुनील : मग आत जाऊन कपडे बदलून घे. की निकाल लागेपर्यंत इथं असाच उभा रहाणार आहेस?
( सगळेजण घाईघाईने आत जातात. फक्त प्रदीप उभा असतो. )
सुनील : लेका, आता तुला काय झटका आलाय?
प्रदीप : मघाशी वचन दिलें तू मला, आठवतयं?
सुनील : मग त्याचं आता काय?
प्रदीप : एका वचनाने तू त्या गोर्या कृष्णाला काढून टाक. आणि दुसर्या वचनाने मला कृष्ण बनव.
सुनील : आतां हे काय नवीन?
प्रदीप : आम्ही ह्या बालनाट्यगडबड मंडळीचे जुने मेम्बर्स. आणि कृष्णाचं काम करणार कुणी नवीन मुलगा? नहीं चलेगा. शिवाय, वचन दिले तू मला.
सुनील : म्हणून असा ऐन वेळी तू केसाने माझा गळा कापणार? माझा घात करणार?
प्रदीप : ते सगळं मला काही माहीत नाही. कृष्ण गोराच ठेवायचा असेल तर मग मी काय घोडं मारलंय?
( ह्याचवेळी आतून सगळेजण धावत स्टेजवर येतात आणि एकत्र ओरडायला लागतात, "मी कृष्ण होणार". )
मुलगा : मी केलं तर फक्त कृष्णाचंच काम करणार, दुसरं कोणतंही नाही. (सगळे त्याच्या अंगावर धावून येतात. ) आतां तर मी कृष्णाचं सुद्धां काम नाही करणार. अगदी हज़्ज़ार फोटो काढले तरी नाही. (स्टेजवरून खाली उडी मारून प्रेक्षकात जाऊन बसतो.)
सुनील : झालं समाधान? आयता कृष्ण मिळाला होता, तोहि गेला.
दिलीप : गेला तर जाऊंदे. मी आहे ना. मी होतो कृष्ण. अखेरीस स्टेज माझं आहे, रामायणाचं पुस्तक माझं आहे.
विकास : पण मग धर्माचं काय होणार?
दिलीप : मूर्ख आहेस. धर्म युद्धाला गेला असं दाखवायचं.
शैलेश : तूच मूर्ख आहेस. युद्धाला अर्जुन जात असतो, धर्म नव्हे. मी होतो कृष्ण. माझे कृष्णाचे डायलॉग्स पाठ आहेत.
विकास : स्वत:चे संवाद नाही पाठ करता येत, फक्त "वत्सा" म्हणायला काय पाठांतर हवंय?
प्रदीप : सुनील, माझं वचन! वचन मोडलंस तर नरकात जाशील.
अनील : मी आतापर्यंत बोललो नाही, पण माझ्या मेहनतीचं चीज़ झालंच पाहिजे.
विकास : तुझी कसली मेहनत?
अनील : कृष्णाला लग्नाला मी घेऊन गेलो होतो, त्याला डझनभर आईसक्रीम मीच खायला घातली होती. नंतर फ़्रिज़चं पाणी सुद्धा मीच त्याला पाजलं होतं. यात माझी मेहनत नाही आली?
सुनील : तर तू होतास ज्याने माझा केसाने गळा कापलास? नमक हराम... धोकेबाज़... कुत्ते... कमीने...
दिलीप : (आवेशाने) ... मैं तेरा खून पी जाऊंगा...
विकास : ...तुझे ज़िंदा नहीं छोडूंगा.
( सगळेजण एकाच वेळी ओरडू लागतात. सुनील पुढे येवून प्रेक्षकांकडे बोलायला लागतो. )
सुनील : प्रत्यय आला ना मघाशी मी काय म्हणत होतो त्याचा. म्हणूनच तुम्हाला सांगत होतो की कधी नाटक बसवायच्या लफड्यात पडू नका. असा ताप असतो डोक्याला. हो, पुढल्या वेळेला नाटक बघायला जात असाल, तर नाटक करणार्यांची आधी चौकशी करा व मगच जा.ह्या नाटकाच्या तिकीटाचे पैसे आमच्या बालनाट्यगडबड मंडळीला देणगी दिली असं समजा आणि घरी जाऊन एखादं मस्तपैकी टीव्ही सीरीयल बघा. थॅंक यू .... आणि सॉरी.
( मागे वळून ओरडण्यार्या मुलांना शांत करायचा निष्फळ प्रयत्न करायला लागतो. पडदा हळूहळू सरकायला लागतो. )
* * * * * समाप्त * * * * *
लेखक
लक्ष्मीनारायण हटंगडी
EC51/B104, Sai Suman CHS,
Evershine City, Vasai (E)
PIN 401208
(e-mail: suneelhattangadi@gmail.com)
Thursday, June 24, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment