Monday, May 24, 2010

दोस्ती

सहावीचा वर्ग होता. राणे बाई मुलांना महात्मा गांधीजींचा धडा समजावून सांगत होत्या. "गांधीजींना इतर कोणत्याहि गोष्टींपेक्षा सत्य जास्त प्रिय होतं. जणूं सत्याचा अट्टाहासच होता त्यांना. आणि म्हणूनच जेव्हां प्रभावी इंग्रजी साम्राज्याशी लढा द्यायची वेळ आली तेव्हां त्यांनी सत्याचा आग्रह धरला. मोहनदास करमचंद गांधीजींचं प्रभावी साधन होतं, ते सत्याग्रह ..."
थोडा वेळ वर्गांत विलक्षण शांतता पसरली होती --- पण थोडाच वेळ. अचानक वर्गाच्या एका कोपर्‍यातून ओरडण्याचा आवाज ऐकूं आला. राणे बाई बोलायच्या थांबल्या. त्यांचं ध्यान भंगलं, लक्ष उडालं. अत्यंत शांतपणे त्यांनी आपल्या हातातलं पुस्तक समोरच्या टेबलावर ठेवलं. त्यांच्या रुंद कपाळावर पसरलेल्या आठ्यांचं जाळं कुंकवाच्या मोठ्या गोल टिळ्यातून स्पष्टपणे दिसूं लागलं. त्यांनी सावकाशपणे मान उंचावली व नजर रोखून आवाजाच्या दिशेने पाहिलं.
"मोघे आणि शेंडे, दोघेही इथं या", त्या अत्यंत शांत पण करारी आवाजात बोलल्या.
हळूंच वर्गांतल्या सर्व मुलांनी आपापल्या माना त्या कोपर्‍याकडे वळवल्या व सूचक अर्थाने एकमेकांकडे पाहिलं. "आतां काहीतरी धमाल गम्मत येणार" या आशयाचं हसूं सर्वांच्या ओठांतून पाझरायला लागलं. थोडा वेळ कांहींच घडलं नाहीं. बाईंनी ज्या मुलांना बोलावलं होतं त्यांच्यापैकी कुणीच हललं नाहीं.
"इथं या म्हणते ना. कां तुमचाहि सत्याग्रह चाललाय?" आतां त्यांचा आवाज बराच चढला होता. त्यांचा प्रश्न ऐकून सगळेजण खुदखुदून हंसले -- पण बाईंची जरबी नजर वर्गावरून फिरताच सगळे ताबडतोब गप्प झाले. वर्गात मूकपणे हालचाल सुरूं झाली. मोघे व शेंडे टेबलाच्या दिशेने येऊं लागले.
"कसला तमाशा चालला होता तिथं?"
कुणीच कांही बोललं नाहीं. दोघांच्याहि माना खाली होत्या.
"अशोक मोघे, तुला विचारतेय मी. कसला तमाशा चालला होता तिथं?" राणेबाई परत गरजल्या.
"कांहीं नाही, बाई.... मी कांहीं केलं नव्हतं," अशोक मोघे खालच्या मानेनं दबल्या आवाजात उत्तरला.
"सत्य बोला, पोरांनॊ. मग खाली मान घालून घाबरलेल्या आवाजात बोलायचं कांहीं कारण नाहीं."
मराठीच्या पुस्तकांतून प्रत्यक्ष वर्गात अवतरलेला गांधीजींचा आधुनिक स्त्री-अवतार पाहून वर्गांतली पोरं दबल्या आवाजात हंसली, पण परत एकदां बाईंची कडक नजर वर्गावरून फिरेपर्यंतच.
"बाई, हा मोघे असत्य बोलतोय. चक्क खोटं बोलतोय हा. यानं माझ्या हातांतून माझं पुस्तक खेंचून घेतलं ... व उलट मला इंग्रज़ीतून शिवीसुद्धां दिली. गांधीजींच्या आत्म्याला कित्ती यातना झाल्या असतील, बाई!" शेंडे म्हणाला.
शेंडेच्या तोंडून गांधीजींचं नांव ऐकून वर्ग खदाखदा हंसला पण राणे बाईंनी कौतुकाने शेंडेकडे पाहिलं. हे पाहून शेंडेला अजून चेव चढला व तो बोलतच सुटला. अशोक फक्त नकारात्मक मान डोलवायचा प्रयत्न करीत होता.
"हात पुढे कर," बाईंनी हुकूम दिला. अशोकला उगीचच वाटलं की बाई शेंडेला शिक्षा देताहेत. "मोघे, हात पुढे कर. तुला सांगतेय मी," राणेबाई गरजल्या.
"पण बाई, मी सत्य बोलतोय. माझी कांहीच चूक नव्हती."
"मग हा बिचारा शेंडे खोटं बोलतोय असं म्हणायचंय तुला?"
"पण बाई ..." नजरेनं दयेची याचना करीत असतांनाच बाईंनी एका हातानं अशोकचा हात जबरदस्तीनं खेंचून वर केला आणि दुसर्‍या हातानं टेबलावरची छडी उचलून त्याच्या हातावर सपकन वाजवली.
"आई ग ---" वेदनेनं अशोकचे डोळे ओलावले व त्या वेदनेला प्रतिसाद वर्गभर मुलांच्या उंचावलेल्या मानांनी दिला.
"बाळा, जागेवर जाऊन बस. मोघ्या, तुला नाहीं सांगितलं मी जागेवर जायला. तू तास संपेपर्यंत वर्गाबाहेर जाऊन उभा रहा," राणे बाई निर्णायक स्वरांत म्हणाल्या.
विजयी मुद्रेनं शेंडे पुन्हां आपल्या जागेवर जाऊन बसला व अशोक मोघे बाहेर चालूं लागला. वर्गांत गडबड वाढत चालली होती. बाईंनी पुन्हां एकदां डस्टर टेबलावर आपटला व लगेच वर्ग शांत झाला. राणे बाई परत बोलूं लागल्या -- "गांधीजींचं आवडतं शस्त्र होतं, सत्य. सत्याच्या जोरावर त्यांनी प्रभावी ब्रिटिश साम्राज्याला प्रचंड आव्हान दिलं ..."
बाहेर आलेल्या अशोकच्या कानांवर बाईंचा आवाज पडत होता पण आतां त्याला त्या आवाजांत मुळीच रस नव्हता. तो वर्गाबाहेर आला तेव्हां तिथं अजून एक मुलगा उभा होता, पण अशोकचं लक्षच गेलं नाहीं तिकडे. आपली कांहींच चूक नसतांना राणे बाईंनी सबंध वर्गासमोर आपल्याला छडी मारून वर्गाबाहेर काढलं होतं --- सत्याचा पाठ समजावून सांगणार्‍या बाईंनी आपलं कांहींच न ऐकतां असत्य बोलणार्‍या शेंडेचं समर्थन केलं होतं, या अपमानाच्या जाणीवेनं अशोकचं मन धगधगत होतं. नुकताच घडलेला अपमानास्पद प्रसंग विसरून जाण्याची प्रबळ इच्छा असूनही तें जमत नव्हतं.
"ए, नवीन पांखरूं आहेस वाटतं?" आधीच बाहेर उभ्या असलेल्या त्या पोरानं अशोकला विचारलं. आणि प्रथमच अशोकचं लक्ष तिकडे गेलं. त्याच्यासमोर फाटक्या अंगाचा एक काळसर मुलगा उभा होता; असेल बारातेरा वर्षांचा; तेल न घातलेले त्याचे राकट केस त्याच्या कपाळावर स्वैर रुळत होते; नाकांतून शेंबूड बाहेर येऊं पहात होता; दांत किडलेले होते. बरेच दिवस धुतले न गेलेले त्याचे कपडे कांही फाटक्या भागातून त्याच्या मळकट अंगाचं दर्शन घडवीत होते. अशोकला त्याची किळस वाटली. घरापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या चांगल्यापैकी इंग्रज़ी शाळेत न पाठवतां घराच्या जवळच असलेल्या एका साधारण म्युनिसिपल शाळेत आपला दाखला घेतल्याबद्दल प्रथमच अशोकला आपल्या वडिलांचा राग आला, व त्याने रागाने मान फिरवून घेतली. वर्गांत नेहमीच शेवटच्या बांकावर एकट्यानेच बसून राहणारा तो मुलगा बहुतेक वर्गाबाहेरच असायचा. त्याच्याशी कुणीच जास्त बोलत नसे अन त्यालाही त्याची बहुतेक पर्वा नसावी. तो नेहमीच आपला बिनधास्त असायचा. त्याने अशोकला पुन्हां एकदां हटकलं --
"काय रे साल्या, ऐकूं नाहीं आलं काय? भडव्या, तुझ्याशी बोलतोय मी."
काहीच उत्तर न देतां अशोकनं भिंतीवरच्या मोठ्या घड्याळाकडे डोळे फिरवले, तास संपायला अजून अर्धा तास होता. तोपर्यंत करणार तरी काय? अशोक नाईलाजाने त्या मुलाकडे वळला. त्या मुलाचे आळशी डोळे उगीचच चमकले.
"साला, मघाशी काय फुक्कट भाव खात होतास? नवीन पांखरूं आहेस का शाळेत?" त्यानं पुन्हां विचारलं. अशोकला त्याच्या तोंडची भाषा जरासुद्धां आवडली नाहीं, पण काय करणार? त्याला वेळ काढायचा होता.
"ए भावखाऊ, नवीन आहेस काय शाळेत?", त्यानं पुन्हां विचारलं.
"हूं ..." अशोकनं जोरांत मान हलवली.
"नांव काय तुझं?"
"अशोक सदानंद मोघे."
"माझं नांव लाल्या," तो उगीचच बडबडला. अशोकनं खरं तर त्याचं नांव विचारलंसुद्धां नव्हतं.
कांहीतरी बोलायचं म्हणून अशोकनं त्याला विचारलं, "फक्त लाल्या? वडिलांचं नांव... आडनांव कांहीं नाही?"
"होय, फकत लाल्या म्हणतात आपल्याला. बाप नाहीं मला. आणि ते आडनांव का बिडनांव आपल्याला माहीत न्हाय," तो म्हणाला.
अशोकला आश्चर्य वाटलं, पण तो गप्प बसला.
"कायरे मोघ्या, तू खरोखरच शिवी दिलीस त्या शेंड्याला?"
लाल्याचा तो प्रश्न ऐकून मात्र अशोकला खूप बरं वाटलं. या विषयावर आपली बाजू कुणाला तरी सांगावी असं खूप वाटत होतं त्याला. लाल्याचा हा प्रश्न ऐकून त्याच्या भावनांना आतां वाचा फुटली. आनंदानं थोडा वेळ त्याच्या तोंडून शब्दच फुटेना.
"निदान कबूल तरी करायचं होतंस. कदाचित त्या राणे बाईनं मोकळं सोडलं असतं तुला."
पुन्हां अशोकचं मन उसळून आलं. तो आवेगानं बोलला, "पण मी मुळी शिवी दिलीच नव्हती तर कबूल कां करावं? माझी चूक नव्हतीच मुळी."
लाल्याला बहुतेक अशोकचं म्हणणं पटलं असावं. त्यानं हलकेच अशोकचा हात आपल्या हातांत घेतला व तो म्हणाला, "मला वाटलंच तूं शिवी देणार नाहीस म्हणून. तू काय मी आहेस शिवी द्यायला? साला, ती राणे बाईच वाईट आहे. शाळेत सगळेच चमचे आहेत त्या शेंडेचे. उगीच जळतात आपल्यावर."
इच्छा असूनही अशोक लाल्याचा राकट हात दूर करूं शकला नाहीं. पण आपली कांहींच चूक नसतांना राणे बाईंनी आपल्याला शिक्षा करावी व खर्‍या अपराध्याला मोकळं सोडून द्यावं? कां? सगळेच जण शेंडेचे चमचे का काय म्हणतात ते होते, पण कां? सगळे उगीच लाल्यावर व आपल्यावर जळतात कां? नेमक्या याच कोड्याचं उत्तर पाहिजे होतं अशोकला.
"अरे, तो शेंड्या आपल्या हेडमास्तरांचा मुलगा आहे ना, मग त्याला कोण कशाला मारेल? साला नोकरी जाईल ना त्यांची ! म्हणून सगळे चमचे आहेत त्याचे. आयच्याण, साला अस्सा राग येतो एकेकाचा. वाटतं, धरून एकेकाला लाथ घालावी गांडीत. ..." लाल्या बोलतच होता. त्याच्या तोंडच्या त्या शिव्या ऐकून अशोकला तोंड फिरवून कान बंद करून घ्यायची इच्छा झाली, पण तो तसं करूं मात्र शकला नाहीं.
"अशक्या, पेरू खाणार कां रे?" लाल्याच्या प्रेमळ प्रश्नानं अशोकचं लक्ष पुन्हां लाल्याकडे गेलं.
"लाल्या, माझं नांव अशोक मोघे आहे, अशक्या नाहीं."
"जाऊंदे भिडू. अशक्या काय, अशोक काय, आपल्याला दोन्हीं शेम. पण सांग, पेरू खाणार का तूं?" म्हणत लाल्यानं हातांतला पेरू अशोकच्या तोंडाकडे नेला. किडक्या दांतांनी उष्टावलेला अर्धवट पेरू धरलेला लाल्याचा हात अशोकनं पटकन दूर सारला व तोंड फिरवून घेतलं.
"साला, उष्टं खायला लाजतोस काय? का उगीच भाव खातोयस?" म्हणत लाल्या आपले किडके दांत दाखवून हंसला. त्याच्या हंसण्याचा आवाज मात्र त्याच वेळी झालेल्या घंटीच्या ठणठणाटात बुडून गेला. राणे बाईंचा तास केव्हां संपला होता हे मुळी अशोकला कळलंच नव्हतं.
"पुन्हां तमाशा करूं नका वर्गांत." वर्गाबाहेर पडणार्‍या राणे बाईंचा आवाज त्या दोघांच्या कानावर पडला. लाल्या निर्लज्जपणे हंसत व राणे बाईंची नक्कल करीत वर्गांत शिरला. अशोक मागाहून आपलं डोकं खाली घालून आंत येत होता. अचानक मागे वळून पहात लाल्यानं विचारलं, "ए अशक्या --- च्यायला, चुकलो, अशोक, माझ्याबरोबर माझ्या बांकड्यावर बसतोस का? एक धम्माल गम्मत सांगतो तुला." आणि त्याच्या होकाराची वाट न पहाताच लाल्या अशोकला आपल्याबरोबर घेऊन गेला.
नंतरच्या तासाला राजे मास्तर भूगोल शिकवीत होते, का इतिहास याच्याकडे दोघांचही लक्ष नव्हतं. ते दोघेही आपापसात कुजबुजत होते. त्यांचे आपले कसले तरी बेत चालले होते. तास संपवून राजे मास्तर वर्गाबाहेर गेले तेव्हां लाल्या व अशोक मोठ्यानं हंसले व सगळ्यांचं लक्ष त्या दोघांकडे गेलं.
शाळेचे आठ तास संपून शाळा केव्हां सुटली याचं भान त्या दोघांनाहि नव्हतं. शेवटच्या घंटेचा आवाज थांबायच्या आधीच लाल्या व अशोक घाईघाईनं बरोबरच बाहेर पडले व शाळेच्या वळणावर येऊन उभे राहिले. शेंडे घरी जायचा रस्ता लाल्याला चांगलाच माहीत होता. शेंड्याला मस्त धडा शिकवणं अत्यंत जरूरीचं होतं -- त्याला बेदम धोपटणं जरूरीचं होतं. शेंड्याला एकटाच येतांना पाहून लाल्यानं नाकांतून बाहेर पडूं पहाणारा शेंबूड आपल्या मळक्या शर्टाच्या तोकड्या बाहीनं मागे सारला व उगीचच आपल्या बाह्या सरसावल्या. शेंडे जवळ येतांच लाल्या पुढे लपकला. आपली पुस्तकांची पिशवी अशोककडे फेंकून लाल्यानं शेंड्याच्या सफ़ेद शर्टाची कॉलर पकडली.
"भडव्या, खोटं बोलायला पाहिजे नाहीं कां? आत्तां तुला अस्सा मस्त धडा शिकवतो की खोटं बोलणं दूर राहिलं, साल्या तुझी बोलतीच बंद होईल. हेडमास्तरांचा पोरगा जन्माला आलास म्हणून माजलास होय? आज तुझ्यामुळे माझ्या या दोस्ताला शिक्षा झाली. साला, खूप मस्ती चढलीय तुला, बघ कशी सगळी मस्ती उतरवतोय तें."
बोलताबोलतांच लाल्या शेंडेला बदडत सुटला. मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात दडून बसलेल्या सुडाच्या भावनेनं अशोकचं मन पेटलं होतं. इच्छा असूनही अशोकनं लाल्याला प्रतिकार केला नाहीं. नशिबानं रस्त्यावर दुसरं कुणीहि नव्हतं. आपण योग्य तो सूड घेतलाय याची खात्री पटल्यावर लाल्या थांबला. अंगावरचा घाम पुसत, जणूं कांही घडलंच नाही या थाटात लाल्यानं अशोककडून आपली बॅग हिसकावून घेतली, व अशोकच्या खांद्यावर आपला हात टाकून त्यानं शेंडेला पुन्हां एकदां धमकावलं, "साल्या, कुणाला या प्रकरणाबद्दल सांगितलंस तर तुझी खैर नाही. तुझ्या अंगावरच्या सालड्याची पायताणं करून त्यानीच झोडून काढीन तुला. कळलं? आतां पळ काढ इथून ... नाहींतर अजून ठोकीन."
आपलं अंग चोळीत रडणार्‍या शेंडेला तसाच सोडून दोघेही वळणावर अदृश्य झाले. लाल्याबरोबर अशोकच्या तोंडावर देखील सूड उगवल्याचा आसूरी आनंद पसरला होता. त्याच तंद्रीत अशोक मोघे घरी पोंचला ते दुसर्‍या दिवसापासून आपली दोस्ती एकदम पक्की झाल्याचं वचन लाल्याला देऊन.

* * * * * * * * *

अशोक घरीं पोंचला तेव्हां अशोकचे वडील घरीं नव्हते --- अशोक शाळेतून घरीं पोंचतेवेळी ते कधीच परतलेले नसत. घरी असायचे ते फक्त ’मामा’ स्वयंपाकी. रोजच्यासारखं आजही मामांनी अशोकला बटाटेपोहे खायला दिले, व आपली वेळ झाल्यावर ते निघून गेले. संध्याकाळीं अशोकची व श्रीयुत मोघ्यांची भेट व्हायची ती अगदी अंधार पडल्यावर --- अन त्यावेळी ते पार थकलेले असायचे. जेवण संपवून ते लगेच अंथरुणावर पडायचे. अशोकच्या डोक्यावरचं आईचं छत्र नाहीसं झाल्यावर त्यांचं कशांतच लक्ष लागत नसे. अशोकची आई त्याच्या लहानपणीच वारली होती. त्यानंतर दुसरं लग्न न करतां स्वयंपाकघर संभाळण्यासाठी अशोकच्या वडिलांनी मामांना नेमलं होतं. त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळीं ऑफिसला जावं, दिवसभर काम करावं आणि थकूनभागून संध्याकाळी घरी परत यावं याशिवाय दुसरं कांहीच करावसं वाटत नसे त्यांना. आपल्या एकुलत्या एका मुलाकडे लक्ष द्यायला सुद्धां त्यांना वेळ नव्हता ... आणि अशोकला या गोष्टीची खंत नेहमीच वाटत असे. पण तक्रार तरी कुणाकडे करणार?
तरीसुद्धां त्या दिवशी ते घरी आल्याबरोबर अशोक मोठ्या उत्साहाने त्यांना बिलगला. आज जे कांही घडलं होतं ते त्याला आपल्या बाबांना सांगायचं होतं. नेहमीप्रमाणेच त्यांनी निर्विकारपणे त्याला दूर केलं. अशोकचा उत्साह थोडा मावळला, पण तरीहि पुन्हां त्यांना बिलगत तो म्हणाला, "बाबा, आज किनई मला एक नवा मित्र मिळाला. खुप्पखूप्प चांगला आहे..."
"छान झालं," एवढंच उदगारून त्यांनी कूस बदलली. बराच वेळ अशोक बरंच कांही सांगत सुटला, पण थोड्याच वेळानं त्यांच्या घोरण्याचा आवाज ऐकून तो हिरमुसला झाला व आपल्या खोलीत निघून गेला.
दुसर्‍या दिवशी अशोक काहीं न खाताच शाळेत आला. लाल्या त्याच्या आधीच येऊन त्याची वाट पहात होता. त्या दिवशी अशोकनं आपली जागा बदलली व तो शेवटच्या बांकावर लाल्याच्या शेजारी बसला. सगळेच तास त्यांनी एकमेकांबरोबर गप्पा मारण्यात घालवले. मधल्या सुट्टीत दोघेही बरोबरच शाळेच्या उपहारगृहात गेले. सुटीनंतरचा तास सुरूं झाल्यावर अशोकनं आपलं इंग्रज़ीचं पुस्तक उघडून पाहिल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. पहिल्याच पानावर कुणीतरी गिरवून ठेवलं होतं. हा कुणाचा चावटपणा असेल या गोष्टीचा विचार करीत त्यानं रबर शोधायला पाकीट उघडलं तर रबर जागेवर नव्हता.
"लाल्या, रबर आहे?"
"नाहीं, यार. रोज कुठे असतो, जो आज असेल?" लाल्या उत्तरला.
पुढच्या बांकावरच्या मुलाकडे वळून अशोकने विचारलं, "ए माने, जरा रबर देना."
अशोकचा प्रश्न ऐकून माने उगाचच संतापला व तिरसटपणे म्हणाला, "आपल्या जिगरी दोस्ताकडे माग ना --- सगळं कांहीं देईल तो ..."
मानेला एकदम कसला झटका आला असेल याचा विचार करीत अशोकनं परत त्याला विचारलं, "असा कां बोलतोयस तूं?"
"मला विचारूं नकोस. तुम्हां दोघांशी कुणीच बोलायचं नाहीं अशी ताकीद दिलीय सरांनी सगळ्यांना. बॉयकॉट केलंय तुम्हांला," मानेनं आपली मान पुन्हां तिरसटपणे फिरवून स्पष्टीकरण दिलं.
लाल्याशी मैत्री करण्यांत इतकं काय वावगं आहे की इतर मुलांनी आपल्याला "बॉयकॉट" करावं या गोष्टीचा उलगडा बराच वेळ विचार करून देखील अशोकला झाला नाहीं. ओळख झालेल्या पहिल्याच दिवशीं आपल्या मित्राच्या अपमानाचा सूड उगवणारा लाल्या इतरांना इतका अप्रिय कां असावा, या रहस्याचं उत्तर जाणून घेण्याची सवड किंवा मूड अशोकला मुळीच नव्हता. आदल्या दिवशीं सबंध वर्गासमोर झालेल्या अपमानाची कडू आठवण मनांत ताजी असतांनाच वर्गांतील इतर मुलांनी आपल्याशी बोलणं बंद करावं हें अशोकला मुळीच आवडलं नाहीं. सर्वांचाच सूड उगवायचा या आसूरी भावनेनं अशोकचे निष्पाप डोळे चमकले. इतर मुलांना जो आवडत नव्हता त्या लाल्याचा जिगरी दोस्त बनणं हा एकच मार्ग अशोकच्या भाबड्या मनाला सुचला, आणि याच भावनेनं तो लाल्याच्या अधिक जवळ येत राहिला.
दिवसांमागून दिवस जात राहिले. अशोक व लाल्या एकमेकांच्या जास्तच जवळ येत राहिले. एका कुजक्या फळाची झळ इतर सर्व चांगल्या फळांना लगेच लागते असं म्हणतात. आणि अशोक तर तसा लहान मुलगाच होता. हळूंहळूं दोघांनाहि बरोबरच बांकावर उभं केलं जाई, तर कधीं एकत्रच वर्गाबाहेर काढलं जाई. लाल्याशिवाय इतर कुणी आपल्याकडे बोलत नाहीं याची जाणीव व खंत अधूनमधून अशोकच्या निरागस मनाला नक्कीच व्हायची. लवकरच त्याला समजून चुकलं की या सगळ्या गोष्टींना शेंडेच जबाबदार होता. आपल्याला पडलेल्या माराचा शेंडेनं पुरता सूड उगवला होता. अशोकच्या मनांत शेंडेविषयी पुरेपूर तिरस्कार भरला होता, आणि या तिरस्काराला जिवंत स्वरूप द्यायची संधी हवी होती अशोकला. आणि त्या दिवशी लाल्याच्या एका प्रश्नानं ठिणगी पेटवायचं काम केलं.
"अशोक, वर्गांत माझ्याशिवाय दुसरं कुणीच तुझ्याकडे बोलत नाही, याचं कांहीच वाटत नाहीं तुला?"
अशोकच्या आधीच चिघळलेल्या जखमेवर त्या प्रश्नानं जणूं मीठ चोळलं गेलं, पण तो गप्प बसला.
लाल्या परत म्हणाला, "तो साला शेंड्या आहे ना, त्याच्यामुळे सगळी भानगड झालीय. एकदा त्याला सरळ केला पाहिजे."
शेंडेचं नांव ऐकल्यावर अशोकच्या मनांत सुडाची भावना परत उफाळून आली. सूड --- सूड --- सूड घेतलाच पाहिजे या अपमानाचा, या एकाच विचारानं थैमान मांडलं होतं त्याच्या मनांत.
"त्या शेंडेकडे एक मस्त, महागडं चित्रांचं पुस्तक आहे. कसंही करून ते पुस्तक आपल्याकडे आलं ना तर ..." लाल्यानं वाक्य अर्धवट सोडून अशोकला अजून अस्वस्थ केलं.
मधल्या सुटीत सर्वजण वर्गाबाहेर निघून गेले. लाल्यानं अशोकला बाहेर यायला सांगितलं तर त्याला नकार देऊन अशोक एकटाच इकडॆ-तिकडे पहात वर्गांत बसून राहिला. त्याचं लक्ष शेंडेच्या आकर्षक बॅगेकडे गेलं. त्या बॅगेच्या बाहेरून सुद्धां दिसणारं रंगीत पुस्तक जणूं त्याला आव्हान देत होतं. अशोकला रहावेना. हलकेच तो आपल्या जागेवरून उठला.
ठणठणठण ... मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली व सगळीं मुलं परत वर्गांत यायला लागली. राणे बाईंचा तास होता. सबंध वर्गावरून एकदां आपली ज़रबी नजर फिरवून राणे बाईंनी शिकवायला सुरवात केली आणि त्या लवकरच रमल्या. त्यांची समाधी भंगली ती शेंडेच्या रडक्या आवाजाने.
"शेंडे, आतां काय झालं रडायला?" त्यांनी विचारलं.
"बाई, माझं नवीन पुस्तक पाकिटांतून नाहीसं झालंय. पुस्तक नाहीं सांपडलं तर बाबा झोडून काढतील मला," शेंडे अगदीच रडकुंडीला आला होता. असली महाग पुस्तकं, अभ्यासक्रमांत नसतांना देखील, वर्गांत कां आणली गेलीं हा प्रश्न राणे बाई आपल्याला नक्कीच विचारणार नाहींत याची शेंडेला पूर्णपणे खात्री होती. आणि नेमकं तसंच झालं.
राणे बाईंनी आपल्या हातातलं पुस्तक संतापाने टेबलावर आपटून घोषणा केली, "ज्या कुणी शेंडेचं पुस्तक घेतलं असेल त्यानं ताबडतोब त्याला परत करावं." पटकन अशोकच्या मनांत एक विचार चमकून गेला --- आपण जे कांही केलं ते नक्कीच चुकीचं होतं; कबूल करावा आपला गुन्हा व परत करावं शेंडेचं फालतू पुस्तक; आपल्याकडे याही पेक्षा चांगली पुस्तकं आहेत. पण छे, मग सूड कसा पूर्ण होणार? सुडाचा विचार मनांत येताच अशोक परत वेडापिसा झाला. इच्छा असूनही त्याच्या तोंडून शब्द फुटेना. त्यानं चोरट्या नजरेनं राणे बाईंकडे पाहिलं. त्याला त्यांच्या डोळ्यांत एक विलक्षण चमक आढळून आली.
राणे बाईंनी टेबलावरची छडी उचलली व गर्जना केली, "लाल्या, आपलं पाकीट इथं घेऊन ये."
बाईंची गर्जना ऐकून सर्वजण जोरात हंसले. लाल्याचं तोंड रागानं व शरमेनं लाल झालं. त्याच्या संतप्त चेहर्‍यावरची शीर न शीर ताठ झाली, पण स्वत:ला सांवरायचा प्रयत्न करीत तो शांतपणे म्हणाला, "बाई, मी चोरी केलेली नाहीं. मी चोर नाहीं."
"तुला विचारलं नाहीं मी. तें मला ठरवूं दे. आधी आपलं पाकीट घेऊन इथं ये."
आपलं निरपराधित्व सिद्ध करण्याच्या निश्चयानं लाल्या आपलं फाटकं पाकीट उचलून टेबलाकडे चालायला लागला. दुसर्‍याच क्षणी राणे बाई लाल्याच्या पाकीटातल्या वस्तू काढून ज़मिनीवर फेंकायला लागल्या. चाललेला प्रकार पाहून अशोकला वाटलं, हे जे कांहीं होतंय ते चूक आहे --- गुन्हेगार आपण आहोत, लाल्या नव्हें. अगदी एकच क्षण त्याला वाटलं की सार्‍या वर्गाला ओरडून हे सत्य सांगावं. पण त्याला धीर झाला नाहीं. तो गप्पच बसला.
पाकीट रिकामं झाल्यावर बाईंनी तपासणी संपवली. लाल्या आवेगाने ओरडला, "आतां तरी पटलं ना बाई, मी चोरी नाहीं केली तें?" राणे बाईंनी जणूं त्याचं ओरडणं ऐकलंच नाहीं. लाल्या संतापानं आपली बॅग भरायला लागला. मनाचा संयम मुळीच टळूं न देतां राणे बाई शांतपणें म्हणाल्या, "अशोक मोघे, आपलं पाकीट घेऊन इथं ये."
अशोकला वाटलं आपण देखील लाल्यासारखंच ओरडून सांगावं, "बाई, मी चोर नाहीं." --- पण त्याच्या तोंडून शब्दच फुटला नाहीं. कुणातरी अनोळख्या शक्तीनं खेंचून न्यावं तसं अशोक आपली बॅग घेऊन टेबलाकडे जाऊन उभा राहिला. बॅगेपेक्षा मोठं असलेलं ते रंगीत पुस्तक त्याच्या हातातल्या बॅगेतून बाहेर डोकावत होतं. राणे बाईंनी अगदी शांतपणे अशोकच्या हातांतून बॅग खेंचून घेतली व ते पुस्तक काढून शेंडेला परत दिलं. खाली मान घालून आपल्या जागेवर जायला निघालेल्या अशोकला त्यांनी शर्टाच्या कॉलरने मागे खेंचून आपल्यासमोर उभं केलं आणि हातातल्या छडीनं अशोकवर वार करायला सुरवात केली. आपली सुटका करून घ्यायची अशोकची सगळी धडपड व्यर्थ ठरली. अगदी आपला हात दुखेपर्यंत राणे बाईंनी अशोकला बदडलं, व आपल्या जागेवर जाऊन बसण्यासाठी त्याला दूर ढकललं.
कसंबसं जाऊन अशोक आपल्या बांकावर कोसळला. शाळा सुटल्याची घंटा ऐकून सुद्धां त्याला उठायचं त्राण नव्हतं. त्याला कुठंतरी पळून जावंसं वाटलं. त्याचा हात हातात घेऊं पहाणार्‍या लाल्याला त्यानं दूर लॊटलं. घरी गेल्यावर बाबा काय म्हणतील हा एकच विचार अशोकला सतावीत होता. अशोकनं केलेल्या चोरीची हकीकत राणे बाईंनी त्याच्या प्रगति-पुस्तकावर लिहून आपल्या पालकांची सही आणायचा हुकूम केला होता. बाबांची सही --- कसं शक्य होणार होतं ते? पण तें टाळणं सुद्धां अशक्य होतं. प्रगति-पुस्तक घरी दाखवण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. प्रगति-पुस्तक ! त्यावेळीं केवढा हास्यास्पद शब्द वाटला तो अशोकला. वर्गांत जे कांहीं चाललं होतं ती काय प्रगति होती? पण मग या सर्व गोष्टींना जबाबदार कोण होतं -- तो स्वत:? लाल्या? शेंडे? राणे बाई? विचार करून करून अशोकचं डोकं दुखायला लागलं, पण त्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेना.
अशोक रडतच घरी आला. त्याचे वडील ऑफिसमधून आज घरीं आले ते जरा जास्तच त्रस्त होते. त्यांना पाहिल्यावर अशोकला एकदां --- फक्त एकदाच --- वाटलं की बाबांना आपलं प्रगति-पुस्तक दाखवून मार खाण्यापेक्षां पंख्याला लटकून आत्महत्या करावी. घाबरत घाबरत अशोकनं आपलं प्रगति-पुस्तक त्यांच्यासमोर धरलं व सही मागितली. चोरी? अशोकने चोरी केली --- अशोकनं? आपल्या एकुलत्या एका मुलानं? अशोकच्या आईच्या अकाली निधनानंतर दुसरं लग्न न करतां आपण ज्याच्यासाठी जगलो त्या आपल्या मुलानं वर्गांत चोरी करावी? हा भयंकर विचार त्यांना मुळीच सहन झाला नाहीं. थरथरत्या हातानं त्यांनी सही केली, पेन बाजूला फेकून दिलं व पुन्हां एकदां अशोकला बदडून काढायला सुरवात केली. त्याला वांचवायला मामा देखील जवळ नव्हते. वेदनेनं अशोक जमिनीवर कोसळेपर्यंत ते त्याला मारत सुटले.
सबंध रात्र अशोकनं रडून काढली. त्याचं सारं अंग फणफणत होतं, डोक्यांत वणवासा पेटला होता. परतपरत मार खाऊन अंग दुखत होतं, की कधीं नव्हें ते आपल्या बाबांनी आपल्याला मारावं, व ते देखील आपली बाजू ऐकून न घेतां, यामुळें डोकं तापलं होतं हेच अशोकला कळेना. जादूने सार्‍या जगाचा फुटबॉल करावा --- अगदी शेंडे, राणेबाई, आपले बाबा यांच्यासकट --- व लाथेनं तो फुटबॉल अंतराळात झुगारून द्यावा असं त्याला वाटलं. याच अवस्थेंत, अर्धसुप्त व अर्धजागृतावस्थेच्या स्थितीत रात्र संपली.
दुसर्‍या दिवशी अशोक शाळेत आला तो आपलं ठणकणारं अंग चेपीत. आपलं दु:ख कुणाला सांगणार? आपल्याला कुशीत घेऊन आपलं दु:ख हलकं करणारी आई कुठे होती? डोळ्यांतून ओसंडून वाहूं पहाणारा अश्रूंचा प्रवाह आवरीत अशोक वर्गात आला. स्वप्नांत असल्याप्रमाणे अशोकनं प्रगति-पुस्तक बाईंच्या टेबलावर ठेवलं व परत तो आपल्या बांकावर, लाल्याच्या शेजारी येऊन बसला. वर्गात काय शिकवलं जात होतं याकडे त्याचं मुळीच लक्ष नव्हतं. कधी एकदां मधल्या सुटीची घंटा वाजते व आपण आपलं दु:ख लाल्याला बोलवून दाखवतो असं झालं होतं त्याला.
अखेरीस मधली सुटी आली व वर्ग रिकामा झाला. लाल्या आपल्या हातात हलकेच त्याचा हात घेऊन बसला. लाल्याचा स्पर्श होताच अशोक भणभणून रडला. आपले वडील इतके दुष्ट कां वागले याचं आश्चर्य करीत त्यानं लाल्याला विचारलं, "लाल्या, तुझे वडील मारतात तुला?"
लाल्याच्या डोळ्यांत दु:ख तरारून आलं. बाहीनं डोळे पुसत त्यानं म्हटलं, "मी माझ्या बापाला मुळी पाहिलंच नाहीं. माझी आई म्हणते मी जन्माला यायच्यापूर्वीच माझा बा मेला. कोण म्हणतं, माझा बा तुरुंगात आहे. मी फक्त माझ्या मायला ओळखतो. माझ्यासाठी विड्या वळून पैसे कमावणारी आई -- सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्यासाठी धडपडणारी माझी आई."
मोठाल्या डोळ्यांत दाटून येणारे अश्रू थांबवीत लाल्यानं अशोकला विचारलं, "तुझी आई देखील मारते तुला?"
अशोक रडक्या सुरांत म्हणाला, " मी अगदी लहान असतांनाच माझी आई देवाच्या घरी गेली. माझ्या बाबांनी सुद्धां पहिल्यांदाच मारलं मला."
"पण कां?"
"राणे बाईंनी माझ्या प्रगति-पुस्तकांत मी केलेल्या चोरीविषयी लिहिलेला शेरा वाचून."
"ती मारकी म्हैस आहेच तशी. पण अशोक, तूं देखील म्याड आहेस."
"कां पण?"
"अरे, असले वाईट शेरे लिहिलेलं पुस्तक घरी दाखवायची मुळी गरजच काय?"
"म्हणजे?"
लाल्या अशोकला जवळ घेऊन दबल्या आवाजात समजावून सांगायला लागला, "हें बघ, मागे एकदां मी असलाच एक वाईट शेरा असलेलं प्रगति-पुस्तक आईला दाखवलं होतं आणि तिने मला बेदम चोपून काढला होता. आतां मी आईला कधीच कांही दाखवीत नाहीं. तिची सही मीच गिरचटतो. आईला लिहितां येत नाहीं, आणि बाईंना कांहीं समजत नाहीं. आहे की नाहीं गम्मत?"
"म्हणजे तूं लबाडी करतोस?" डोळे विस्फारीत अशोक म्हणाला.
"काय करणार, दोस्त? आई एवढा त्रास घेऊन मला शाळेत पाठवते. तिला वाटतं इथं सगळं नीट चाललंय. मी एकदम खुष आहे. पण अशोक, तुला माहीत आहे ना शाळेंत काय चाललंय तें? मी झोपडपट्टीत रहातो म्हणून कुणीच माझ्याशी नीट वागत नाहीं. मुलं तर नाहींच, शिक्षक सुद्धां नाहीं. दर दिवसाआड कांहींना कांही खरेखोटे शेरे वह्या-पुस्तकांत लिहिले जातात. आणि मग आई मला मारते. म्हणून आतां मीच तिच्या नांवाने सही करतो. मला माहीत आहे, मी लबाडी करतोय ते." बोलतांबोलतांच अचानक लाल्याच्या डोळ्यांत पाणी आलं व तो अशोकला म्हणाला, " अशोक, मी लबाडी करतो --- वाईट आहे मी. तूं खूप चांगला आहेस. माझ्याशी मुळीच दोस्ती करूं नकोस."
शाळेत नियमितपणें छड्या खाऊन देखील कधीहि न रडणार्‍या लाल्याला त्या अवस्थेत पाहून अशोकला वाईट वाटलं. त्याचे डोळे पुसत अशोक म्हणाला, "लाल्या, असं नको म्हणूस. तूं मला खूपखूप आवडतोस. तूं तर माझा हीरो आहेस. कुणी कांही म्हणो, तूं मला मित्र म्हणून हवा आहेस. तुला जे जमतं ते मला मुळीच जमत नाहीं. तू आपल्या आईची सहीसुद्धां करतोस. वाह !!"
आईच्या किंवा वडिलांच्या नांवाने सही करण्याची कल्पना थोडी चुकीची असली तरी अशोकला त्यावेळी खूप गंमतीची वाटली. जे आपण कधी करण्याचा विचार देखील करूं शकलो नसतो ते लाल्या इतक्या सहज रीतीने करूं शकतो याचं अशोकला खूप कौतुक वाटलं. आणि अशोकच्या चेहर्‍यावरचं कौतुक पाहून लाल्याला खूप बरं वाटलं. त्या दिवशीच्या प्रसंगाने त्या दोघांना अधिकच जवळ आणलं. शाळा सुटायच्या आधी दोघांनी एकमेकांना अभेद्य मैत्रीची वचनं दिली. कुणीहि, कुठल्याहि परिस्थितीत त्यांना एकमेकांपासून दूर करूं शकणार नाही असं त्यांनी कबूल केलं. पण ---
पण मैत्रीच्या आनंदाने अशोकच्या शरिरांतील वेदना कांही कमी होऊं शकल्या नाहींत. आदल्या दिवशी मारानं दुखत असलेलं अंग आतां जास्तच ठणकायला लागलं होतं; डोकं जड झालं होतं. शाळा सुटल्यावर अशोकचं पाकीट धरून लाल्या त्याला अगदी घरापर्यंत सोडायला आला.
दुसर्‍या दिवशी शाळा सुटेपर्यंत लाल्या अशोकची वाट पहात होता, पण अशोक आलाच नाहीं. लाल्याला खूप एकटं वाटत होतं. सबंध दिवस लाल्याने जांभया देऊनच काढला. शाळा सुटल्याची घंटा वाजतांच लाल्यानं अशोकच्या घराकडे धूम ठोकली. त्यानं जोरानं दार वाजवलं अन बराच वेळ वाट पाहून दार ढकललं. अशोकला अंथरूणावर पडून राहिलेला पाहून लाल्याचे डोळे ओलावले. त्याने अशोकवर प्रश्नांचा भडिमार सुरूं केला. पण कुठल्याहि प्रश्नाचं उत्तर न देतां अशोक फक्त मंदपणे हंसत होता. लाल्यानं अशोकच्या अंगाला हात लावून पाहिला तर त्याला चटका बसला. अशोकचं अंग तापाने भणभणून निघालं होतं.
"अशोक, तुला ताप चढलाय," लाल्याच्या आवाजात चिंता होती. अशोक लाल्याचा हात हातांत धरून परत हंसला. आपण चिंतेनं व्याकूळ झालेलो असतांना सुद्धां अशोकला हंसतांना पाहून लाल्या सॉलीड वैतागला, व त्याने अशोकला फटकारलं, "साल्या, मी काळजीने मरतोय व तूं बिनधास्त हंसतोयस? लाज नाहीं वाटत तुला?"
लाल्याच्या मागे पाहून अशोक घाबरून एकदम उदगारला, "बाबा!"
लाल्यानं अचानक मागे वळून दारांत उभ्या असलेल्या अशोकच्या बाबांकडे शेक-हॅण्ड करायला हात पुढे केला व हंसायला तोंड उघडलं. त्याचे ते किडके दांत, मळकट कपडे अन त्याचा एकूण अवतार पाहून त्यांना किळस आली. त्यांनी वैतागून त्याचा हात दूर फटकारला व पुढे होऊन अशोकवर ओरडायला सुरवात केली. त्यांचा तो अवतार पाहून लाल्याने मात्र मागच्या मागे पलायन केलं.
"कोण होतं ते ध्यान?"
अशोकनं अगदी दबल्या आवाजांत उत्तर दिलं, "लाल्या, माझा जिगरी दोस्त. रोज मी तुम्हांला ज्याच्याबद्दल सांगायचा प्रयत्न करत असतो ना, तोच माझा दोस्त."
अशोकच्या अंगात ताप आहे हे विसरून त्याच्या बाबांनी अशोकच्या मुस्काटीत दिली व ते पुन्हां ओरडले, "पुन्हां ते कार्टं इथं दिसलं तर तुझी खैर नाहीं. चामडी उतरवीन मी तुझी, समजलं? झोपडपट्टीतल्या त्या कुत्र्याकडे तूं मैत्री केलेली मला मुळीच खपणार नाहीं. सांगून ठेवतो. त्याची मैत्री सोड, समजलास?"
आपल्या बाबांनी आपल्या अंगात ताप असून देखील आपल्याला मुस्काटीत मारली याहीपेक्षां त्यांनी आपल्याला लाल्याची मैत्री सोडायला सांगितली याचं दु:ख अशोकला अधिक वाटलं. ते दु:ख सहन न होऊन त्यानं मुसमुसत उशींत तोंड लपवलं.
नंतरचे दोन दिवस लाल्याने अशोकची वाट पहातच घालवले. तिसर्‍या दिवशीं अशोक शाळेत आला तो उतरलेल्या तोंडाने.
"अशोक, मी गेल्यावर त्या दिवशी काय झालं ते मला सांग," लाल्याने विचारलं.
"लाल्या, बाबांनी मला तुझी मैत्री सोडायला सांगितलंय. ते म्हणतात की तूं वाईट आहेस," अशोक हळूंच म्हणाला.
आपले अश्रू आपल्या मित्राला दिसूं नयेत म्हणून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करीत लाल्या म्हणाला, "खरं आहे, अशोक. मी खूप्पखूप्प वाईट आहे. मी स्वत:च म्हणालो होतो तुला."
लाल्याचे भिजलेले हात आपल्या हातांत घेत अशोक उत्तरला, " साफ खोटं आहे. तूं खोटं बोलतोयस. बाबा खोटं बोलताहेत. तू वाईट नाहींस ... बाबा वाईट आहेत. मी यापुढे त्यांना कांहीच सांगणार नाहीं. तू वाईट असलास तर मला सुद्धां वाईट व्हायचंय. मी सुद्धां खूपखूप वाईट होणार, पण कांहीं झालं तरी तुझी दोस्ती सोडणार नाहीं."
अशोकच्या वडिल्यांच्या मर्जीला न जुमानतां, शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अशोक व लाल्याची दोस्ती वाढतच चालली. वर्गांत आणि वर्गाबाहेर त्यांची बोलणी चालतच राहिली. पण फरक एवढाच होता की आतां त्यांना कशाचंच भय उरलं नव्हतं. शिक्षकांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या व प्रगति-पुस्तकं आई-वडिलांपर्यंत कधी पोंचतच नव्हती. आईच्या नांवाने सही करण्याची कला लाल्याकडे होतीच; वडिलांच्या नांवाने सही करायची कला लाल्याच्या मदतीने आतां अशोकने हस्तगत केली.
एके दिवशी अचानक लाल्या म्हणाला, "ए अशोक, माझ्या घरीं येणार? मी तुझ्या घरी आलोय, पण तूं कधींच नाहीं आलास." हात उडवीत अशोक म्हणाला, "आलो असतो, यार. पण या दिवसांत बाबा ऑफिसमधून लवकर घरी येतात. आणि त्यांची परवानगी विचारली तर ..."
"तर ते नक्कीच नाही म्हणणार, बरोबर? माहीत आहे मला. पण वेड्या, सगळ्या गोष्टी आपण कुठे घरी सांगायला हव्यात? आणि आपण तसं केलं तर त्यांत मजा ती काय राहिली? तूं असाच चल. आपण मधल्या सुटीनंतर दांडी मारून जाऊं. नाहींतरी आपण वर्गांत असलो काय की बाहेर असलॊ काय, कुणाला काय फरक पडतोय? मधल्या सुटीनंतर गेलो तर निदान तूं वेळेवर घरीं पोंचशील ना."
हळूंहळूं अशोक बर्‍या-वाईटांतील फरक विसरत चालला होता. त्यानं आनंदानं मान डोलावली व मधल्या सुटीची घंटा वाजताच दोघे दोस्त उड्या मारीत बाहेर पडले. चालतांचालतां त्यांना रस्त्यावर एक चित्रपटगृह दिसलं. लाल्या अशोकला आंत खेंचून घेऊन गेला. त्याला थांबवायचा तोकडा प्रयत्न करीत अशोक म्हणाला, "लाल्या, तुझ्या घरी जातोय ना आपण? तुझं घर इथं आहे?"
डोळे मिचकावून लाल्या म्हणाला, "ए, भंकस करतोस काय माझी? मी इथं रहातो काय? इथं अमिताभ बच्चन, संजय दत्त, अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि शाहरुख खान सारखे नट रहातात. पण जास्तीत जास्त एका आठवड्यासाठी. माझ्या घरी केव्हांहि जातां येईल. आज शाहरुख खानचा इथं शेवटचा दिवस आहे. म्हणजे या पिक्चरचा लास्ट डे आहे. सुप्पर पिक्चर आहे म्हणे. बघूं तरी काय भानगड आहे ती. हवंतर उद्यां माझ्या घरी जाऊं. मग तर खुष?"
"पण माझ्याकडे पैसे ...", अशोक बोलतांबोलतांच थांबला.
"बास्स काय, बॉस्स? मी विचारले तुला पैसे? तुझ्या या जिगरी दोस्ताकडे आहेत पैसे. फिकर नॉट, यार," असं म्हणत लाल्यानं दोन तिकीटं काढली व ते आंत जाऊन बसले.
अशोकला पिक्चर खरोखरच खूप मस्त वाटला. सिनेमाच्या पडद्यावर करामती करून खलनायकांचा नायनाट करणार्‍या त्या धाँसू हीरोच्या जागी अशोक लाल्यालाच पहात होता. आपल्या जिगरी दोस्ताचं त्याला सॉलीड कौतुक वाटलं आणि अभिमानानं त्याची छाती उंचावली. बाहेर आल्यावर लाल्याने त्याला परत एकदां आठवण करून दिली, "लक्षांत ठेव हं. शाळेत वार्षिक समारंभाची तयारी चाललीय. आपल्याला सुद्धां त्यांत असंच बिनधस्त ऍक्टींग करायचं आहे."
"साल्या ... सॉरी, मेरा मतलब है, लाल्या, मला शिकवूं नकोस. घरी काय सांगायचं ते मला चांगलंच माहीत आहे. गॅदरींगची तयारी चाललीय म्हणून उशीर झाला. करेक्ट?" अशोक हंसत म्हणाला.
"आखिर साला चेला किसका है?" लाल्यानं हंसत म्हटलं.
दुसर्‍या दिवशी अशोक लाल्याबरोबर त्याच्या आईला भेटायला म्हणून त्याच्या घरी गेला. घर? लाल्या ज्या जागी रहात होता त्या जागेला "घर" म्हणतां येईल की नाहीं याची अशोकला शंका वाटली. खुराडं होतं तें, घर नव्हें. त्याच्या आसपास रहाणार्‍या लोकांना पाहून अशोकला भीति वाटली. त्यांचे ते मळकट, खुनशी चेहरे --- त्यांच्या तोंडांतून क्षणॊक्षणी बाहेर पडणार्‍या त्या शिव्या --- त्यांची रानटी भाषा --- त्यांची प्रत्येक हालचाल --- त्यांच्याशी संबधित असलेल्या प्रत्येक वस्तूचा अशोकला तिटकारा आला. आपला जिगरी दोस्त लाल्या या ... या गटारांत कसलं जीवन जगतोय, असा प्रश्न अशोकला सतावूं लागला. पण कसेही असले तरी ते लाल्याचे ’लोक’ होते.
लाल्याच्या जीवनाविषयी अशोकला जितकी जास्त माहिती मिळत गेली तितकाच अशोकच्या मनांत लाल्याबद्दल जिव्हाळा व आपुलकी वाढत गेली.
"लाल्या, मी माझ्या आधीच्या शाळेत वार्षिक सम्मेलनांत नेहमी कामं करायचो. मला या शाळेत देखील भाग घ्यायचाय," एकदां अशोकनं लाल्याला म्हटलं.
"म्याड आहेस की काय तूं?" लाल्या म्हणाला.
"कां?"
स्टेजवर येणं सोड, आपल्याला प्रेक्षक म्हणून सुद्धां आत घेतील की नाहीं याची शंका आहे मला."
"पण कां?" अशोकनं पुन्हां विचारलं.
"तुला इतकी खाज असेल ना तर तूंच विचारून बघ."
अशोक तस्साच काळे गुरुजींकडे गेला. "सर, मलासुद्धां नाटकांत भाग घ्यायचाय. मीसुद्धां चांगला अभिनय करूं शकतो."
"राजाचे नवीन कपडे" या नाटुकल्याची तालीम थांबवून काळे सरांनी अशोककडे पाहिलं. त्यांच्या नजरेतील तिरस्कार पाहून अशोक घाबरला, पण हिम्मत करून तो परत म्हणाला, "सर, मला सुद्धां नाटकांत काम करायचं आहे. अगदी छोटी भूमिका असली तरी चालेल."
"तुम्हीं चालू ठेवा रे तालीम," असं ओरडून काळे गुरुजी अशोकला एका कोपर्‍यात घेऊन गेले व म्हणाले, "महाराज, काय करूं? छोटी कशाला, तुम्हांला मी राजाची भूमिका सुद्धां दिली असती. पण तुम्हीं आहात त्या बदमाष लाल्याचे गुलाम. आणि त्या झोपडपट्टीतील त्या किड्याकडे कसलाही संबंध असलेल्या कुणालाहि कुठल्याहि प्रकारे इन्व्हॉल्व करायचं नाहीं असा हुकूम आहे शेंडे सरांचा. साला, सरकारी दबाव आहे म्हणून, नाहींतर तुम्हीं दोघेही केव्हांचेच शाळेबाहेर झाला असतांत. चालते व्हा इथून."
अशोकला धक्का देऊन दूर करीत काळे गुरुजी इतर मुलांकडे वळून किंचाळले, "साला, तुम्हीं लोकं कसला तमाशा बघताय? तुम्हांला नाटक करायचंय की त्या दोघा गुंडांच्या वाटेला जायचंय?"
अशोक हिरमुसला होऊन हॉलबाहेर पडला. दाराबाहेरच रेंगाळणार्‍या लाल्यानं पुढं येत विचारलं, "काय अशोक कुमार, झालं समाधान?" त्या क्षणाला अशोकनं उत्तर दिलं नाहीं पण कसल्याशा विचारानं त्याला हसूं फुटलं.
अखेरीस वार्षिक समारंभाचा दिवस उजाडला. सबंध हॉल सुंदरपैकी सजवला गेला होता. कार्यक्रमांत भाग घेतलेली मुलं स्टेजच्या मागच्या बाजूला गोंधळ घालत होती. हळूंहळूं पाहुणे यायला लागले व हॉल भरूं लागला. या सगळ्या गोंधळात कांही पाकीटं हातांत घेऊन इथंतिथं फिरणार्‍या लाल्या व अशोककडे अगदी कुणाचंही लक्ष गेलं नाहीं.
हॉल भरल्यावर लवकरच कार्यक्रम सुरूं झाला. आधीं नकला, नाच-गाणी, भाषणं वगैरे किरकोळ कार्यक्रम झाले, अन मग घोषणा झाली, "आतां माध्यमिक विभागाची मुलं आपल्या मनोरंजनासाठी सादर करीत आहेत आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण, रंगीत नाटिका, "राजाला हवेत नवीन कपडे". तर माध्यमिक विभागाची मुलं सादर करीत आहेत एक मजेदार नाटिका, "राजाला हवेत नवीन कपडे".
अन लगेच पडदा उघडून नाटक सुरूं झालं. सारखे नवीन कपडे विकत घेण्याची हांव असलेल्या राजाची गोष्ट सगळ्यांनाच माहीत होती, पण त्याचं नाट्यरूपांतर पहाण्याची सगळ्यांनाच हौस होती. अन तसंच झालं. नाटिकेनं सगळ्यांनाच मोहून घेतलं. आणि मग एक मजेदार गोष्ट झाली. राजा झालेल्या शेंडेनं आधीं हळूंहळूं व नंतर जोरजोराने अंग खाजवायला सुरवात केली. कहाणीत नसलेला हा भाग पाहून कांहीं प्रेक्षकांनी गालांतल्या गालांत हंसायला सुरवात केली. प्रेक्षकांकडे पाहून पटकन शेंडेने स्वत:ला सांवरलं, पण थोडाच वेळ. सहन न होऊन त्यानं आपलं अंग जोरजोराने खाजवायला सुरवात केली. आतां स्टेजवर असलेल्या पात्रांना देखील हंसूं आवरेना. थोड्याच वेळांत शेंडे आपल्या अंगावरचे राजसी, रंगीबेरंगी कपडे एकेक करून बाजूला फेकीत होता व दुसरीकडे सगळं अंग जोरजोरानं खाजवीत होता. रंगाचा बेरंग व्हायला उशीर नाहीं लागला. लवकरच शेंडेने जोराने रडत ओरडायला सुरवात केली, "मला राजाचे नवीन कपडे मुळीच नकोत, पण माझे हे जुने कपडे आधी कुणीतरी काढा. मला सहन होत नाहीं."
ओरडत-ओरडत शेंडे अस्ताव्यस्त इथंतिथं धांवायला लागला. प्रेक्षागृहांत व स्टेजवर गोंधळ वाढतच चालला अन अचानक सगळीकडे अंधार पसरला. हॉलमधील सर्व दिवे गेले होते. घाबरून लोकांनी ओरडायला सुरवात केली, अन अचानक फटाक्यांचा आवाज यायला सुरवात झाली. सगळं शांत होईपर्यंत बराच उशीर झाला होता. या सगळ्या गोंधळांत लाल्या व अशोक हळूंच बाहेर सटकले.
थोड्याच वेळांत दोघेही लाल्याच्या घरी पोंचले. घरी पोंचल्यावर खूष होऊन लाल्यानं खिशांतून एक विडी काढून आपल्या ओठांमध्ये ठेवली.
"लाल्या, हे काय करतोयस?" अशोकने दबल्या स्वरात विचारलं.
लाल्या हंसला, "साला, भंकस करतोस काय माझी? दिसत नाहीं, मी विडी ओढतोय तें?"
अशोक कांहीच बोलला नाहीं. अचानक आपल्या तोंडातून विडी बाहेर काढीत लाल्या अशोकला म्हणाला, "ए, ओढतोस काय जराशी? मी मारली आईच्या कपाटांतून."
काय बोलावं हे न कळून अशोक गप्प बसला. हा अजब अनुभव नवीनच होता, पण ... अशोकची शांतता ही संमतिसूचक समजून लाल्यानं आपल्या तोंडातली उष्टी बिडी अशोकच्या ओठांमध्ये खुपसली व तो म्हणाला, "काय धम्माल आली ना शाळेत? सगळीकडे फटाक्यांचा धूरच धूर झाला होता बघ. अरे, बघतोयस काय असा येड्यासारखा? लेका, आधीं धूर आंत ओढून घे अन मग हलकेच बाहेर सोड. हां, अस्साच. शाबास बच्चा."
अशोकनं लाल्यानं सांगितल्यानुसार करायचा प्रयत्न केला, पण सहन न होऊन त्याला जोराचा ठसका बसला व खोकल्याची जोराची उबळ आली.
"साला, बच्चा आहेस अजून. पण होईल संवय हळूंहळूं." हंसत-हंसतच लाल्याने अशोकच्या हातांतली विडी आपल्या ओठांत धरली व झुरके मारायला सुरवात केली. तो अगदी रंगात आलेला असतांनाच अचानक बंद दारावर धक्का बसला व दार उघडलं. लाल्यानं झटक्यांत तोंडातली विडी काढून मागे फेकली. दारांत लाल्याची आई उभी होती. डोळ्यांतून आग ओकीत तिनं लाल्याकडे पाहिलं व त्याला विचारलं, "भडव्या, इडी वडत व्हतास नाय का?"
शाळेत सगळ्या शिक्षकांना उलट उत्तर देण्यासाठी वळवळणारी लाल्याची जीभ बावचळली व तो पुटपुटला, "न्हाय ग माये, मी नव्हतो वढीत."
सहजपणे वाकून तिनं लाल्यानं मागे फेकलेलं थोटूक उचललं व त्याच्यापुढे नाचवीत ती लाल्यावर गरजली, "मंग ह्ये थोटूक कंचा रे? तुझा मेलेला बा आला व्हता व्हय स्वर्गातनं हे वढायला? आरं गाढवा, तुझी आय हाय मी. मला बनवतुयास? आरं, म्यां माझ्या इडीचा वास वळखीत नाय की काय?"
एवढं बोलून तिनं लाल्याला दोन्हीं हातांनी बदडायला सुरवात केली. खूप मारल्यावर हुंदके देत ती अशोककडे वळली व म्हणाली, "आवं सायब, तुम्हीं तरी सांगा यास्नी. म्यां सांगितलेलं कायबी आयकत नाय बगा हें पोरगं. आतां तुमच्या शाळेकडनंच येतंय म्यां. सगळे बोंबलतायत येच्या नांवानं." तिच्या आवाजांत कारुण्य व काठिण्य या दोन्हींचा केविलवाणा संगम होता. या देखाव्याने बावचळून घाबरलेला अशोक धांवत बाहेर पडला.
घरी आल्यावर अशोक विचार करूं लागला, जिला लाल्या प्रेमळ म्हणतो त्या आईने त्याला कां मारावं? त्याची चूक तरी काय होती? विडी पिणं वाईट जर होतं तर ती स्वत: विड्या कां वळायची? शाळेंत वार्षिक समारंभाच्या वेळीं झालेला गोंधळ काय त्याच्या आईला कळला होता? आपण स्वत: वाईट वागलो होतों कां? आणि यापुढे काय? सगळे प्रश्न त्याला सतावीत राहिले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला कुणाकडून तरी हवी होतीं. पण कुणाला विचारणार?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लाल्याकडून घ्यायच्या निश्चयाने अशोक दुसर्‍या दिवशी शाळेंत गेला. लाल्याच्या हातांत त्याचं पाकीट नव्हतं. पहिल्या तासाची घंटा व्हायच्या आधीच लाल्याने अशोकला बातमी दिली, "अशोक, मी यापुढे शाळेत येणार नाहीं. झाल्या प्रकाराबद्दल हेडमास्तरांनी आईला शाळेत बोलावलं होतं. आई सरांना भेटायला आली होती. मी माझा गुन्हा कबूल केलाय. सरांनी माझं नांव काढलंय शाळेतून. यापुढे मी शाळेत येणार नाहीं... कधींच नाहीं."
ही भयंकर बातमी ऐकून अशोकचं आधीच अस्वस्थ झालेलं मन जास्तच चळलं. त्याच्या डोळ्यांपुढे अंधारसा पसरला. लाल्या शाळेत येणार नाहीं? वार्षिक समारंभात झालेल्या प्रकाराबद्दल फक्त लाल्याचं नांव काढलं होतं? त्या सगळ्या प्रकारात आपला जास्त हात असूनदेखील शिक्षा फक्त लाल्याला मिळावी? हे योग्य नव्हतं. "पण लाल्या..."
लाल्यानं अशोकचं तोंड दाबून धरलं व तो म्हणाला, "अशोक, एक शब्दही बोलूं नकोस. मी अगदी बाद झालोय, पण तूं वाईट नाहींस. मी तुला बिघडवलं होतं. आतां मी शाळेंत येणार नाहीं, तू परत चांगला हो. तुला माझी शप्पथ."
अशोक रडायला लागला होता. लाल्याने आपला गुन्हा स्वत:च्या अंगावर घेतला होता. आतां त्याच्याशिवाय आपलं कसं होणार? कॊण बोलणार आपल्याशी? कोण करणार आपल्याशी दोस्ती? त्याला रडूं आवरेना. त्याला त्या अवस्थेत बघून नेहमी त्याचं सांत्वन करणारा लाल्या चुपचाप वर्गाबाहेर पडला. मुसमुसून रडणार्‍या अशोकचा पुढे झालेला हात मागे सारून लाल्या बाहेर पडला --- अशोकचं सांत्वन करायची इच्छा असूनदेखील त्याच्याकडे न बघतां लाल्या वर्गाबाहेर जाऊन उभा राहिला.
राणे बाई वर्गांत शिरल्या व आपल्या खुर्चीवर जाऊन बसल्या. हजेरी घेण्याकरितां त्यांनी आपलं रजिस्टर उघडलं. "अशोक मोघे" म्हणून पहिलं नांव घेण्याआधीच कसल्याशा निर्धाराने अशोक राणे बाईंजवळ येऊन उभा राहिला... अगदी कांहींच न बोलतां.
राणे बाई त्याच्यावर खेंकसल्या, "आतां काय हवंय आपल्याला?"
अशोक मान खाली घालून कांहीं वेळ स्वस्थ उभा होता.
"मोघ्या, मी तुला विचारतेय, काय हवंय तुला?"
हळूंच मान वर करीत अशोक पुटपुटला, "बाई, मला परत चांगलं बनायचंय. इतर मुलांशी बोलायचंय. मी आतांपर्यंत खूप वाईट वागलो याचं मला खूपखूप वाईट वाटतंय. पण मला परत चांगलं बनायचंय ... मला एक चान्स द्या ... प्लीज़..." अशोक मुसमुसत होता.
कांहीं वेळ राणे बाई आश्चर्याने अशोककडे पहात राहिल्या. मग त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, त्यांनी एकदम अशोकला जवळ ओढलं व त्याच्या काळेभोर केसांतून प्रेमाने हात फिरवायला सुरवात केली. हे अजीब दृश्य पाहून कांही वेळ वर्गांत अजीब शांतता पसरली. मग एका मुलाने हळूंच टाळ्या मारायला सुरवात केली. थोड्याच वेळांत सगळा वर्ग टाळ्या मारायला लागला. वर्गांतलं ते दृश्य पाहून वर्गाबाहेर उभ्या असलेल्या लाल्याच्या मोठाल्या डोळ्यांतून समाधानाचे दोन अश्रू टपकले. त्याने आपली शर्टाची बाही वर केली, पण डोळे पुसायला नव्हें. त्या बाहीनं त्याने आपलं वहाणारं नाक हळूंच साफ केलं. त्याच्या डोळ्यांतून अश्रू टपकत राहिले अन त्याला वाटलं की त्याच्या अश्रूंनीं त्याचं सारं पाप ... त्याच्या सार्‍या चुका धुऊन निघाल्या.

* * * * * समाप्त * * * * *

No comments:

Post a Comment