Thursday, June 24, 2010

"सोन्याची बाहुली"

खास लहान मोठ्यांकरिता, व मोठ्या लहानांकरिता
एक रहस्यपूर्ण तीन अंकी नाटक


*** अंक पहिला ***
( एका छोट्या गावातील छोट्या घराची एक छोटीशी खोली. एका कोपर्‍यात एक रायटींग टेबल, त्यावर बरीचशी पुस्तकें. दुसर्‍या कोपर्‍यात छोटसं कपाट. मध्यभागी काही खुर्च्या, समोर एक गोल टेबल, व त्यावर एक फोन. पडदा वर जातो तेव्हां तीन मुलं -- अभय, त्याची बहीण रेखा, व अजय -- अस्वस्थपणे फेर्‍या मारीत असतात. यांचीं वयं अकरा ते तेरा वर्षांपर्यंत. काही वेळ फेर्‍या मारल्यावर ... )
रेखा : ए दादिटल्या, मी दमले.
अभय : हूं, म्हणे दमले. दमलीस तर गेलीस उडत.
अजय : तुम्हीं मुली म्हणजे ना, नेहमी अशाच. जरा वेळ फेर्‍या मारल्या की, "मी दमलें".
अभय : ते काही नाही. आम्ही फेर्‍या मारणार म्हणजे मारणार. काय रे अजय?
अजय : बरोबर आहे, आम्ही फेर्‍या मारणार म्हणजे मारणार. तू हवीतर आत जा अन काय हवं ते कर.
रेखा : अरे पण फेर्‍या तरी किती वेळ मारायच्या? अर्धा तासपासून आपल्या नुसत्या फेर्‍याच चालू आहेत. इथून तिथे, तिथून इथे.
अभय : शहाणीच आहेस तू अगदी. म्हणे अर्धा तास? अर्धा तास काहीच नाही. तुला काहीच माहीत नाही. विचार करायचा असला म्हणजे मोठमॊठे डिटेक्टिव अशाच फेर्‍या मारीत असतात. फक्त अर्धा तासच नव्हे तर दीडदोन तास. अश्या --- (हनुवटी खाजवीत एकदम थाटाने चालून दाखवतो.) कळलं?
रेखा : कळलं बरं, कळलं. मी सुद्धा वाचलीयत म्हटलं तसलीं पुस्तकं बाबांच्या कपाटात.
अजय : फक्त पुस्तकं वाचून काहीच उपयोग नसतो, रेखाबाई. त्याला अक्कल लागते अक्कल.
अभय : बरोब्बर बोललास. दे टाळी. अर्ध्या तासात हिचे पाय दुखायला लागले. आपलं काम एवढं सोपं थोडंच आहे की मारल्या चार फेर्‍या, व आले विचार डोक्यात? तू जा आत व पुस्तकं पालथी घाल. चलरे अजय, आपण मारूं फेर्‍या.
( अभय व अजय दोघे काहीवेळ फेर्‍या मारतात. मग --- )
अजय : अभय, आता मात्र माझेदेखील पाय दुखायला लागले. थोडा वेळ आपण स्वस्थ बसून विचार करूंया.
रेखा : सकाळपासून आपला विचारच चाललाय. नो ऍक्शन!
अजय : खरं सांगायचं तर तुमचं गांवच मुळी भिकार आहे. रेखा सांगते तसं अगदी नो ऍक्शन. मुळीच मजा नाही येत. तरी मी बाबांना सांगत होतो, मला नाहीं जायचं साहसपुरला. म्हणे साहसपूर! नांवच फक्त साहसपूर, पण इथं तर काहीच घडत नाही. बस, दिवसभर झोपायचं ---
अभय : झोपून कंटाळा आला की गप्पा मारायच्या ---
रेखा : गप्पा मारून कंटाळा आला की खात सुटायचं ---
अजय : खाऊन कंटाळा आला की पुन्हा झोप ---
अभय : मग पुन्हा गप्पा.
रेखा : मग पुन्हा खाणं.
अजय : पुन्हा झोप.
अभय : पुन्हा बडबड.
रेखा : पुन्हा खाणं.
अजय : मग पुन्हा ---
रेखा : आता पुरे. तेच-तेच काय आपण पुन्हापुन्हा बडबडतोय? आपण खाऊया का काहीतरी?
अभय : (जोराने हसून) अजय, दे टाळी.
अजय : (टाळी देऊन) टाळी कशासाठी?
अभय : अरे, या मुलींचं अस्संच असतं बघ. सदानकदा यांचं तोंड आपलं चालू. जेव्हा या खात नसतात तेव्हा बडबडत असतात, अन जेव्हा बडबडत नसतात तेव्हा खात असतात.
अजय : हे जागेपणीं झालं. जेव्हा या झोपलेल्या असतात तेव्हा देखील यांचं तोंड चालूच, घोरणं. (घोरून दाखवतो.)
रेखा : (रागाने) माझी एवढी चेष्टा करायची गरज नाही हं. मी जातेच कशी इथून. माझी गरज लागेल तेव्हा या मला मस्का लावायला.
अभय : रेखाबाई, खुश्शाल जा. आम्हाला तुझी गरजच लागणार नाही मुळी. उलट गेल्याबद्दल आभार मानूं तुझे.
( रेखा रागावून कोपर्‍यातल्या टेबलावर जाऊन बसते. )
अजय : अभय, मला एक कळत नाही, तुम्ही पोरं या रटाळ गावात दिवस तरी कसे काढता? मला तर अगदी दोनच दिवसांत सॉलीड कंटाळा यायला लागला.
रेखा : ए, मला एक मस्त आयडिया सुचलीय.
अभय : आता कां मधेमधे बोलतेस? आम्ही मस्का लावायला आलो नव्हतो कांही.
अजय : अभय, तू गप्प रे. रेखा, तू बिनधास्त बोल. कसली आयडिया?
रेखा : (अभयला चिडवून दाखवीत) आज दादाचा मित्र विकास व त्याची बहीण वनिता येणार आहेत आपल्याकडे.
अजय : मग?
रेखा : मग काय? मज्जाच मज्जा! येताना तो ढीगभर पुस्तकं घेऊन येईल. मग बघा दिवस कसे भराभर जातात ते.
अभय : पहिल्यांदाच शहाणपणाचं बोललीस. आज विकास येणार आहे, म्हणजे धम्माल येईल.
अजय : ती कशी?
अभय : तुला माहित नाही. जिथं विकास असतो ना, तिथं हज्जार भानगडी असतात. खूप धमाल येते, काही विचारू नकोस. कधी या हरवलेल्या वस्तूंचा तपास लाव, तर कधी त्याचा पाठलाग कर.
अजय : फॅण्टॅस्टिक! मग तर धमालच येईल. कधी येणार तुझा तो विकास?
( इतक्यात दारात एक पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा, विकास, व एक सुमारे दहा वर्षांची मुलगी, वनिता, येऊन उभे रहातात. विकासच्या हातात एक मोठी सूटकेस व वनिताच्या हातात एक छोटी बॅग असते. फक्त रेखा त्यांना पहाते व --- )
रेखा : दादा ...
( विकास दारातून तिला गप्प रहाण्याची खूण करतो. )
रेखा : दादा, सांग ना, कधी येणार विकास?
अजय : हो अभय, सांग ना, कधी येणार हा तुझा विकास?
विकास : (दारातून आंत येत) आजच येणार आहे हा विकास, आत्ताच येणार आहे. हा बघ, आला देखील.
( अभय आनंदाने जाऊन विकासला मिठी मारतो. अजय आश्चर्याने त्यांच्याकडे बघत रहातो. वनिता धावत जाऊन रेखाला बिलगते. )
अभय : अजय, हाच तो प्रसिद्ध विकास, ही त्याची बहीण वनिता.
रेखा : आणि विकास, हा माझा मावसभाऊ, अजय.
अभय : फक्त तुझा नाही, आमचा मावसभाऊ. दोनच दिवसांपूर्वी मुंबईहून आलाय आपली सुटी घालवण्याकरिता.
विकास : हॅल्लो अजय, कसा आहेस?
अभय : बरा दिसतोय ना? म्हणजे बरा आहे. तुमचं हाय-हॅल्लॊ नंतर. आधी सांग, तू आपल्याबरोबर कायकाय भानगडी घेऊन आलायस? फटाफट सांग. कुठे कसली चोरी झाली? कुणी कुणाचा खून केला? आज आपल्याला कुणाचा पाठलाग करायचा आहे?
विकास : अरे हो, जरा हळू चालव आपल्या प्रश्नांची गाडी.
अभय : ते शक्य नाही. आज आमची गाडी एकदम फास्ट धावणार आहे. Not stopping at any stations. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. अगदी नॉन-स्टॉप. नाहीतर मी तुझा खून करेन.
विकास : (हसत) अजय, बाबारे तुझ्या या भावाला सांग, तेवढं एक करू नकोस. कारण मी मेलो तर माझी ही बॅग कुणालाच उघडता येणार नाही. आणि बॅग नाही उघडली तर तुम्हाला पुस्तकंबिस्तकं काही मिळणार नाहीत. मग बसा बोंबलत.
अजय : अभय, त्या बिचार्‍याला थोडा दम तरी घेऊं दे.
अभय : काही बिचाराविचारा नाही हं. आणूनआणून शेवटी पुस्तकंच आणलीस ना? त्यापेक्षा एखादी मस्त भानगड घेऊन आला असतास तर काही बिघडलं असतं तुझं?
विकास : सॉरी दोस्त, गुन्हा कबूल. या खेपेला येताना मी कसलीच भानगड नाही आणली. पण काळजी नको. मी आहे म्हणजे भानगड फार दूर नसेल..
रेखा : ए विकासदादा, या अभयच्या भानगडी गेल्या खड्ड्यात. तू मला आपली पुस्तकं दे बघू..
वनिता : दादा, तुझ्या बॅगेतला माझा टॉवेल दे. खूप दमलेय मी. मस्त थंड पाण्याने आंघोळ करायची आहे मला.
अभय : मग आधी तुम्ही दोन्ही मुली आत कटा बघू. आत जाऊन आंघोळ करा नाहीतर काय हवा तो धुमाकूळ घाला.
विकास : मला आधी बसून माझी बॅग तर उघडूं द्या. मग मी तुला तुझा टॉवेल, रेखाला तिची पुस्तकं व जमल्यास अभयला चिक्कार भानगडी देईन.
अजय : आणि मला काहीच नाही?
अभय : वेडाच आहेस. विकासनं आणलेल्या भानगडी आपण तिघांनी मिळून सोडवायच्या.
रेखा : अन आम्ही नाही वाटतं?
अजय : मुलींची कटकट नकोय आम्हांला.
अभय : आता कसं शहाण्यासारखं बोललास.
वनिता : दादा, असला कसला रे हा आगाऊ मुलगा?
विकास : आधी सगळेजण गप्प बसा पाहू. मी माझी बॅग उघडतो आधी.
( विकास मधल्या खुर्चीवर बसून आपली बॅग उघडायला लागतो. सर्वजण त्याच्याभोवती घोळका करून उभे रहातात. बॅग उघडायला थोडा त्रास होतो म्हणून विकास आपल्या खिशातील स्क्रूड्रायवर काढून बॅग उघडतो. बॅग उघडताच त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलायला लागतात. तो वैतागलेला दिसतो. हळूंहळूं बॅगेतील एकेक कपडे काढून तो खाली फेकायला लगतो. कपडे बरेच मोठे असतात. )
अभय : काय विकासराव, हे काय? आपल्या बाबांची तर बॅग घेऊन आला नाहीस ना?
( विकास उत्तर देत नाही. तो हळूंहळूं सगळी बॅग रिकामी करून त्यातले कपडे बाहेर फेकतो. तेवढ्यात रेखा बॅगेत पाहून जोरजोराने हंसायला लागते. )
अजय : रेखा, हंसायला काय झालं?
रेखा : तूच येऊन बघ.
( अभय व अजय जवळ येऊन बॅगेत पहातात व हंसायला लागतात. फक्त विकास तेवढा गंभीर व गप्प आहे. )
अभय : विकास, तू बाहुल्यांबरोबर कधीपासून खेळायला सुरवात केलीस?
रेखा : अन तुम्ही मुलं मात्र आम्हा मुलींना चिडवायला नेहमी तयार असता.
वनिता : दादा, तू बाबांचे कपडे कशाला आणलेस? आणि ही बाहुली कुणाची आणलीस?
विकास : (चिडून) तू गप्प बस बघूं. माझं डोकं नको खाऊस.
वनिता : चूक तुझीच, मग उगीच माझ्यावर कशाला चिडतोस?
विकास : (थोडा शांत होत) चूक नाही, काहीतरी भानगड झालीय खास.
अभय : (आनंदाने ओरडत) हुर्रे! भानगड? वेरी गुड! तरी मला वाटलंच, विकास भानगडींशिवाय येणं अशक्यच.
विकास : म्हणजे तुला वाटतं तशी भानगड नाही काही. तशी साधीच गोष्ट आहे.
अभय : हॅत तिच्या!
( विकास वैतागून ओरडतो. )
वनिता : काय झालं दादा?
विकास : ही बॅग माझी नाही.
सर्वजण : (ओरडून) काय?
विकास : त्यात ओरडण्यासारखं काही नाही. ही बॅग माझी नव्हे.
रेखा : मग कुणाची?
विकास : तेच तर शोधून काढायचं आहे आपल्याला.
अभय : (आनंदाने ओरडून) लगेच सुरवात करूया शोधायला.
अजय : अब आयेगा मज़ा.
वनिता : ए दादा, मला माहीत आहे बॅग कुणाची असेल ते.
विकास : कुणाची?
वनिता : त्या माणसाची.
( अभय जोरजोराने हसायला लागतो. )
वनिता : हसायला काय झालं?
अभय : बॅग माणसांचीच असते. कुत्र्यामांजरांची नाही. एवढी साधी गोष्ट सांगायला तुझ्या अकलेची गरज नव्हती.
अजय : पण मला एक प्रश्न पडलाय.
विकास : काय?
अजय : बॅग मोठ्या माणसाची असती तर ती बाहुली कुणाची? मोठा माणूस बाहुलीबरोबर नक्कीच खेळणार नाही.
वनिता : तो माणूस बाहुली आपल्या मुलीसाठी घेऊन जात असेल.
विकास : शक्य आहे. साधी गोष्ट आहे.
अभय : शक्य आहे, पण साधी गोष्ट नाही.
रेखा : एक गोष्ट नक्की आहे. विकासदादाला वाटते तेवढी साधी गोष्ट दिसत नाही ही. यात नक्कीच काहीतरी भानगड आहे.
अभय : रेखाचं म्हणणं बरोबर आहे. आणि मी आधीच म्हणालो होतो. विकास जिथं आहे तिथं भानगड असायलाच हवी.
अजय : मोठ्या माणसाच्या बॅगेत बाहुली म्हणजे नक्कीच भानगड आहे. आणि भानगड असली तर आपण इथं जन्मभर रहायला तयार आहोत. माझे बाबा नेहमी म्हणतात, मी भानगडी करण्यात नंबर वन आहे.
अभय : अजय, पण इथं तू भानगड करायची गरजच नाही मुळी. भानगड आपल्यापुढे तयार आहे, आपल्याला फक्त भानगड सोडवायची आहे.
वनिता : ए दादा, ती बाहुली मला द्याना.
( विकास वैतागून बाहुली वनिताला देतो व दूर जाऊन विचार करायला लागतो. )
रेखा : मला वाटतं की आपण या बॅगेचा मालक शोधून त्याची बॅग त्याला देऊन टाकू.
अजय : (बॅग पहात) हे बघा, या बॅगेच्या मालकाचं नांव व पत्ता.
( सगळेजण अजयभोवती गोळा होतात. )
सर्वजण : बघूं बघूं.
विकास : (बॅगेवरील नाव वाचीत) मिस्टर शामराव काळे. यावर पत्ता मुंबईचा आहे.
अभय : त्याला या गावात शोधणार तरी कुठे?
अजय : पण त्याची बॅग तर त्याला दिली पाहिजे.
वनिता : दादा, मला ही बाहुली खूप आवडली.
अभय : लोकांच्या बाहुलीशी आपल्याला मुळीच खेळायचं नाही.
अजय : आपल्याला मुळी बाहुलीशीच खेळायचं नाही, मग लोकांची असो किंवा आपली स्वत:ची.
रेखा : जरा माझं ऐका.
( सर्वांचं लक्ष रेखाकडे जाते. तिच्या हातात बाहुली आहे. )
रेखा : ही साधीसुधी बाहुली नाही.
अभय : मूर्खच आहेस अगदी. बाहुलीसारखी बाहुली आहे. म्हणे साधीसुधी बाहुली नाहीं. वेडाबाई कुठची!
रेखा : मी पुन्हां सांगते, ही बाहुली साधीसुधी नाही.
सर्वजण : (आश्चर्याने) म्हणजे?
रेखा : ही हातात धरून पहा.
( आळीपाळीने सगळेजण बाहुली हातात घेऊन तिचं निरीक्षण करतात. )
रेखा : काय आढळलं?
सर्वजण : साधीच तर बाहुली आहे.
रेखा : साफ चूक. नीट पहा. ही बाहुली इतर बाहुल्यांपेक्षा जड आहे.
सर्वजण : (ओरडून) काय?
रेखा : होय.
सर्वजण : मला बघूंदे ... मला बघूंदे.
( सगळेजण तिच्या हातातून बाहुली हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतात. त्या गडबडीत बाहुली रेखाच्या हातून निसटून दाराकडे जाऊन पडते. याच वेळी दारात एक मध्यमवयीन गृहस्थ येऊन उभा आहे, पण त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाहीं. )
सर्वजण : बाहुली कुठे गेली?
गृहस्थ : (खाली वाकून बाहुली उचलत) माझ्याकडे आहे.
( सर्वजण चमकून दाराकडे बघतात. )
वनिता : (विकासला) दादा, मी त्या माणसाला कुठंतरी पाहिलंय.
विकास : मीसुद्धा. पण कुठं?
अभय : विकास, त्याच्या हातातली बॅग पाहिलीस? अगदी तुझ्या बॅगेसारखीच आहे.
अजय : त्याच्या बॅगेसारखी नाही, विकासचीच बॅग आहे ती. विकासने आणलेल्या बॅगेत याच माणसाचे कपडे होते. आणि आपण त्याची मस्करी करीत होतो,
गृहस्थ : (हसायचा प्रयत्न करीत) मुलांनो, कसलीं खलबतं चाललीयत तिथं?
रेखा : (धैर्य एकवटून) कोण हवंय तुम्हांला?
गृहस्थ : मला सर्वच मुलांना भेटायला आवडेल, पण तुमच्यापैकी विकास जोशी कोण आहे?
विकास : (पुढे होत) मी विकास जोशी. काय काम आहे?
गृहस्थ : खूप महत्वाचं काम आहे. आज गाडीने येताना माझी बॅग तू घेऊन आलायस.
विकास : (रोखून पहात) मी? तुमची बॅग घेऊन आलो --- का तुम्हीच जाणून-बुजून बॅगांची अदलाबदल केलीत?
गृहस्थ : (चपापून) आं? छे, छे, तुझी काहीतरी चूक होतेय.
( वनिता झटकन पुढे होऊन त्याच्या हातातली बाहुली ओढून घेते. )
वनिता : माझी बाहुली... चूकून तुमच्या हातात आली.
गृहस्थ : (अजून हसायचा प्रयत्न करीत) शक्य आहे, बाळा, शक्य आहे. माझीच चूक झाली असेल. पण ती बॅग व खाली पडलेले कपडे माझेच आहेत. यात काही चूक नाही.
रेखा : पण ही बॅग तुमचीच आहे कशावरून?
गृहस्थ : कारण ती बॅग शामराव काळेच्या मालकीची आहे, व मी शामराव काळे आहे. हवंतर माझं ओळखपत्र दाखवूं शकतो मी.
विकास : (हात जोडून) नाही, त्याची गरज नाही. तेवढा विश्वास आहे आमचा. खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. तुमच्या हातातली बॅग माझी आहे.
गृहस्थ : (विकासला हातातली बॅग देत) ही घे तुझी बॅग. आणि माझी बॅग?
विकास : समोरच आहे. तुम्हीं घेऊन जाऊं शकतां.
( रेखा विकासला चिमटा काढायचा प्रयत्न करते. तो गृहस्थ वाकून खाली पडलेले कपडे बॅगेत भरायला लागतो. बॅग भरून झाल्यावर --- )
गृहस्थ : थॅंक्स. बॅग मिळाली, पण अजून एक वस्तू शिल्लक आहे.
वनिता : कोणती वस्तू?
गृहस्थ : तुझ्या हातातली ती बाहुली.
विकास : वनिता, ती बाहुली देऊन टाक त्यांना.
( एवढ्यात रेखा विकासला जोराचा चिमटा काढते. तो ओरडतो. )
रेखा : विकासदादा, ही बाहुली वनिताची आहे. मला माहीत आहे.
वनिता : मी नाही देणार माझी बाहुली कुणाला.
गृहस्थ : (आवाज थोडा कठोर) हे पहा मुलांनो, ती बाहुली माझी आहे व मला परत हवीय.
विकास : मिस्टर काळे, तुम्हीं आम्हाला धमकी देताय?
गृहस्थ : (विकासच्या पाठीवरून हात फिरवीत) धमकी नव्हे, मुला. पण ती बाहुली मला हवीय. माझ्या मुलीची बाहुली आहे ती.
( रेखा वनिताच्या हातातून बाहुली घेऊन टेबलाकडे जाते. )
रेखा : आता बघूं कोण घेतं वनिताची बाहुली ते.
( आता अभय, अजय, रेखा, व वनिता खोलीच्या एका कोपर्‍यात आहेत, तर बरोब्बर त्यांच्या समोरच्या बाजूला दाराजवळ विकास उभा आहे व त्याच्या मागे तो गृहस्थ. )
विकास : वनिता, ठीक आहे, ठेव ती बाहुली तुझ्याकडे. मिस्टर काळे, जाऊं देना. आम्ही तुम्हाला या बाहुलीची किम्मत देऊं. चालेल?
गृहस्थ : नाही चालणार. मी बाहुली घेतल्याशिवाय इथून जाऊं शकत नाही.
( आता तो गृहस्थ हलकेच आपल्या खिशातून एक पिस्तुल काढून विकासच्या पाठीवर टेकवतो. हे प्रेक्षकांना दिसत असलें तरी स्टेजवरील मुलांना दिसत नाहीं. )
गृहस्थ : विकास, तू यांच्यापेक्षा मोठा आहे, शहाणा आहेस. तू ऐकशील ना माझं? माझ्या मुलीची बाहुली ... मला परत द्यायला सांग पाहूं त्यांना.
रेखा : विकासदादा, बाहुली वनिताची आहे.
अभय : काका, तुम्ही बॅग घेऊन जाना. हिला बाहुली खूप आवडलेली आहे.
अजय : शिवाय, तुमच्या बॅगेवर पत्ता मुंबईचा आहे, म्हणजे तुमची मुलगी मुंबईलाच असेल. तिला तिथं बाहुल्यांची काय उणीव?
विकास : अभय-अजय, तुम्हीं उगीच मध्ये बोलूं नका. रेखा, ती बाहुली मला दे. यांच्या मुलीची आहे.
( सगळेजण आपापसात कुजबुजायला लागतात, "या विकासला काडीची अक्कल नाही". )
विकास : मिस्टर काळे, तुम्हाला बाहुली हवी ना? तुमची बाहुली आहे, तुम्हाला मिळेल. त्यासाठी एवढं भांडण कशाला? मी आणून देतो तुम्हाला.
( विकास लगेच पुढे चालायला लागतो. गृहस्थ पटकन आपलं पिस्तुल खिशात परत टाकतो. विकास रेखाच्या हातून बाहुली घेतो व दोन पावलं पुढे टाकतो. )
विकास : मिस्टर काळे, ही घ्या बाहुली. पण लक्षात ठेवा, इतक्या सहजासहजी मिळणार नाही तुम्हांला. हिसकावून घ्यावी लागेल.
गृहस्थ : (दांतओठ चावीत) तितका वेळ नाही माझ्याकडे आता. मी पुन्हां भेटेन तुम्हांला. (जायला लागतो.)
विकास : काका, माझी बॅग? का हिसकावून घ्यावी लागेल?
( तो गृहस्थ परत येऊन आपल्या हातातली बॅग खाली ठेवतो व मघाची बॅग घेऊन जायला लागतो. )
गृहस्थ : मी पुन्हां सांगतो, ती बाहुली मला मिळालीच पाहिजे.
विकास : आणि मी पुन्हां सांगतो, ती तुम्हाला हिसकावूनच घ्यावी लागेल.
( तो गृहस्थ संतापाने निघून जातो. त्याने गेल्यावर विकास घाईघाईने बॅग उघडून पहातो. )
विकास : सर्व वस्तू ठीक आहेत.
वनिता : माझा टॉवेल?
रेखा : माझी पुस्तकं?
अभय/अजय : अन आमच्या भानगडी?
विकास : प्रत्येकाला आपापल्या आवडीच्या वस्तू मिळतील, पण आधी मला ती बाहुली हवीय.
रेखा : मघाशी तर माझ्या नावाने शंख करीत होतास, बाहुली त्याला परत दे, परत दे म्हणून.
विकास : करीत होतो... कारण मघाशी माझ्या पाठीला पिस्तुल लावलेलं होतं.
( सगळेजण आश्चर्यानं ओरडतात. )
रेखा : मी आधीच सांगितलं होतं तुम्हांला की ती बाहुली साधी नव्हें म्हणून.
विकास : शाबास रेखा, तू खरोखरच शहाणी आहेस. ही घे तुझीं पुस्तकं. (तिला पुस्तकं देतो. वनिताला टॉवेल देतो.) वनिता, हा तुझा टॉवेल. (वनिता आत पळते.) अभय-अजय, तुम्हाला मिळाली ना हवी ती भानगड? (अभय व अजय आनंदाने उड्या मारतात.) आता मला माझी बाहुली हवी. (रेखाच्या हातातून बाहुली घेतो.)
अजय : मी तर आता इथं कायमचा रहायला तयार आहे.
अभय : आता असं म्हणतोयस खरं, पण एकदा विकास मुंबईला गेला की परत माझं डोकं खायला लागशील.
( इतक्यात दारात एक तरूण, रुबाबदार व्यक्तिमत्वाचा गृहस्थ येऊन दार ठोठावतो. )
विकास : काय हवंय आपल्याला? कोण आपण?
इन्स्पेक्टर : मी कोण ते पर्यायाने कळेलच तुम्हांला. तूर्त तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. मला ती बाहुली हवीय.
विकास : कसली बाहुली? बाहुल्यांशी खेळायचं आमचं वय आहे असं का वाटतं तुम्हांला?
इन्स्पेक्टर : I like that. तुमचीं नावं काय?
अभय : माझं नाव अभय टिपणीस. तिथं पुस्तकांत डोकं खुपसून बसलीय ती माझी बहीण, रेखा.
अजय : मी अजय बर्वे, अभयचा मावसभाऊ.
इन्स्पेक्टर : थॅंक्स. पण मला तुमच्यापैकी कुणालाच भेटायचं नाही. मला फक्त ती बाहुली हवीय, आता.
अभय : त्याने सांगितलं तुम्हांला, बाहुल्यांशी खेळायचं वय नाहीं आमचं.
अजय : तुम्ही कुठल्या बाहुलीबद्दल बोलताय तेच कळत नाहीय आम्हाला.
इन्स्पेक्टर : शाबास बच्चे लोग. अभिनय सुंदर जमतो तुम्हांला, पण मला सर्व माहीत आहे. मला सांगा, आता इथून गेलेले गृहस्थ कोण?
विकास : आम्ही कुणीहि ओळखत नाही त्यांना.
अभय : आम्हीं त्यांना आज अगदी पहिल्यांदाच पाहिलं.
अजय : कोण होते ते?
इन्स्पेक्टर : विकास जोशीबरोबर बॅग बदललेले गृहस्थ होते ते.
विकास : तुम्हाला काय माहीत?
इन्स्पेक्टर : मला सर्व माहीत आहे. त्याने तुझ्याजवळ बदललेल्या बॅगेत सोन्याची बाहुली आहे हे देखील मला माहीत आहे. म्हणूनच मला ती सोन्याची बाहुली हवीय.
रेखा : (पटकन) पण सोन्याची बाहुली नाही ती. साधीच आहे.
इन्स्पेक्टर : (हसत) म्हणजे तुम्हाला त्या बाहुलीबद्दल माहीत आहे तर? मघाशी तर तुम्ही म्हणत होता की बाहुलीबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही.
विकास : हिच्या मूर्खपणापुढे आता काहीच लपवण्यात अर्थ नाही. हो, आम्हाला माहीत आहे बाहुलीबद्दल. नुकतेच आलेले ते गृहस्थ त्या बाहुलीसाठीच आले होते.
इन्स्पेक्टर : (घाईघाईने) तुम्ही दिली त्याला?
विकास : हो. काय करणार? ते म्हणाले की बाहुली त्यांच्या मुलीची आहे.
अभय : जवळजवळ हिसकावूनच घेतली त्यांनी आमच्या हातून.
अजय : ही वनिता रडली सुद्धा बाहुलीसाठी. हिला ठेवून घ्यायची होती बाहुली. हो की नाही ग, रेखा?
रेखा : हो ना, किती सुंदर बाहुली होती ती!
इन्स्पेक्टर : घोटाळा झाला.
अभय : म्हणजे नक्की काय झालं?
इन्स्पेक्टर : त्या बाहुलीत सोनं लपवून ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी मला ती बाहुली पाहिजे होती.
विकास : (रोखून पहात) तुम्ही नक्की आहात तरी कोण?
इन्स्पेक्टर : मी खरं सांगितलं तर कदाचित तुम्हीं घाबरून जाल.
विकास : आमच्याकडे पाहून तुम्हाला खरंच वाटतं की आम्हीं घाबरून जाऊ?
रेखा : आम्ही घाबरणारी मुलं नाही आहोत.
इन्स्पेक्टर : शाब्बास पोरांनो. मी आहे इन्स्पेक्टर ढवळे.
विकास : आणि तुम्हाला वाटतं की आम्ही तुमच्या थापांवर विश्वास ठेवूं?
इन्स्पेक्टर : मुळीच नाही. तुम्हीं अगदी स्मार्ट मुलं आहात. हे माझं कार्ड पहा, म्हणजे विश्वास बसेल तुमचा.
( खिशातून आपलं कार्ड काढून दाखवतो. सगळेजण ते कार्ड बघतात. )
विकास : इन्स्पेक्टर साहेब, बसा.
इन्स्पेक्टर : बसायला वेळ नाही. ती बाहुली त्या गृहस्थाकडे गेलीय, मला त्याचा पाठलाग करायला हवा.
विकास : पण त्या बाहुलीत आहे तरी काय एवढं?
इन्स्पेक्टर : सोनं. सोन्याची बाहुली आहे ती. सांगितलं मी.
रेखा : तरीच ती जड लागत होती.
इन्स्पेक्टर : तो माणूस सोनं स्मगल करून नेत आहे. मी त्याच्यावर पाळत ठेऊन मुंबईहून त्याचा पाठलाग करीत आहे. विकास, मी तुला सुद्धा गाडीत पाहिलं होतं.
विकास : माझं नाव कसं कळलं तुम्हांला?
इन्स्पेक्टर : सोपी गोष्ट आहे. स्टेशनवर उतरल्याबरोबर मी त्या माणसाची बॅग तपासली. त्यावर नाव होतं, "कुमार विकास जोशी".
अजय : अन मग?
इन्स्पेक्टर : तेव्हाच मला कळून चुकलं की त्यानं संधि साधून बॅगांची अदलाबदल केली होती. मी परत एकदा हरलो. पुराव्याअभावी मी त्याला अटक करूं शकलो नाहीं. ती बाहुली अखेर त्याच्याच हातात राहिली.
अभय : इन्स्पेक्टरसाहेब, तुम्ही अटक करूं शकत नाही त्याला?
इन्स्पेक्टर : नाहीं पोरांनो, मी म्हटलं ना, केवळ संशयावरून कुणालाहि अटक करता येत नाहीं आम्हांला. भक्कम पुरावा लागतो त्यासाठी.
विकास : अन तो पुरावा, म्हणजे ती बाहुली, सोन्याची बाहुली, त्या माणसाच्या हातात आहे. खरं ना? तुम्हांला त्याचा पाठलाग करायचा असेल ना?
इन्स्पेक्टर : हो मुलांनो, आता निघतो मी. पुन्हा भेटूच आपण. थॅंक्स.
( इन्स्पेक्टर घाईघाईने निघून जातो. रेखा त्याच्या पाठोपाठ जाऊन तो गेल्याची खात्री करून घेते. )
रेखा : गेला एकदाचा. आणि काय रे विकास, त्या इन्स्पेक्टरला खोटं का सांगितलंस की ती बाहुली त्या माणसाने नेली असं?
अभय : मग काय, ती आपल्याच जवळ आहे असं सांगून सारी मजा घालवायची? या गोष्टीचा शोध तर आपल्यालाच लावायचा आहे ना?
अजय : शिवाय आपल्याला स्वप्न थोडंच पडलं होतं तो गृहस्थ पोलिसांतला आहे म्हणून?
विकास : जाऊंदे. आता वाद नको. जे झालं ते उत्तमच झालं म्हणायचं. प्रत्येकाने आपापली कामगिरी उत्तम वठवली.
रेखा : आता कायरे होणार?
विकास : अब आयेगा मज़ा. हे बाहुलीचं प्रकरण भलतंच गूढ होत चाललंय. माझी खात्री आहे की तो माणूस पुन्हा एकदां ती बाहुली घेण्याचा प्रयत्न करेल.
अजय : पण आपण त्याला घेऊं दिली तर ना? आपण त्याला सामना द्यायचा.
विकास : सगळं खरं, पण ही भानगड अभयच्या आईबाबांना कळली म्हणजे?
अभय : त्याची काळजी नको. आईबाबा दोघेही बाहेर गेलेयत व आजचा दिवस तरी येणार नाहीत. आणि आपण सर्वांनी शपथ खायची की हे गुपित त्यांना कळूं देणार नाही. रेखा ....
रेखा : माझ्याकडे बोट नको दाखवूंस. मी कधीच कुणाला नाही सांगणार. तू आपली काळजी घे.
विकास : प्रत्येकाने आपापली काळजी घ्या म्हणजे झालं.
अजय : (हसत) आणि आपल्या सर्वांची काळजी विकास घेईल.
विकास : पण आता नव्हे. आता मी चिक्कार दमलोय. जरा आराम करूं द्या मला.
अजय : मला सुद्धां. मघापासून फेर्‍या मारून मारून माझे देखील पाय दुखतायत.
अभय : माझेदेखील.
रेखा : चला, आपण सर्वच जण मस्तपैकी आराम करूंया.
( सगळेजण आत निघून जातात. पडदा पडतो. )

* * * * * पहिला अंक समाप्त * * * * *

* * * * * दुसरा अंक * * * * *
( प्रवेश पहिला )

( पहिल्या अंकातील देखावा. दुसरा दिवस. आता खोली बरीच नीट लावलेली दिसते. पडदा वर जातो तेव्हां पांचही मुलं गप्पा मारताहेत. )
अजय : विकासचा तर्क खरा ठरला.
वनिता : कसला तर्क?
अजय : हाच की तो कालचा माणूस पुन्हां एकदा बाहुली घ्यायचा प्रयत्न करील.
रेखा : याचं सगळं श्रेय खरं म्हणजे मला मिळालं पाहिजे.
अभय : का म्हणून?
रेखा : कारण तुम्हां सर्वांना आधी मीच सांगितलं होतं की ती बाहुली साधीसुधी नाही ते. अखेर माझाच तर्क खरा ठरला.
अभय : (चिडवीत) अखेर माझाच तर्क खरा ठरला. कधी नाही चालत ती एकदा अक्कल चालली म्हणून एवढा भाव खायला नको कांही.
रेखा : खाणार, मी भाव खाणार. मला सांगणारा तू कोण? मला हवा तेवढा, हवा तेव्हां आणि हवा तिथं भाव खाणार मी.
अभय : खा. भाव खा, हवा खा. हवं तेव्हां, हवं तेवढं, हवं तिथं आणि हवं ते खा. दुसरं येतं काय तुला?
रेखा : खाणार, खाणार, खाणार. मला सांगणारा तू कोण? नाहीच खाणार मी, कांही नाही खाणार.
विकास : (संतापून) अभय-रेखा, जरा तुमची कटकट थांबवा पाहू. थोडा वेळ गप्प बसा.
अभय/रेखा : ठीक आहे, आता गप्पच बसतो आम्हीं.
( दोघेही "हाताची घडी, तोंडावर बोट" मुद्रेत बसतात. )
विकास : मी मघापासून विचार करतोय की आता पुढे काय करायचं?
अजय : ए विकास, जरा लवकर विचार कर ना. मला तर काहीतरी भानगड केल्यावाचून चैनच पडत नाहीं.
विकास : घाई करून चालणार नाही. प्रत्येक पाऊल सावधपणे उचललं पाहिजे. आपला शत्रू कुणी साधासुधा माणूस नाही.
वनिता : विकासदादा, तुला कसं कळलं?
अजय : मला विचार. अग, काल विकासच्या पाठीला त्यानं चक्क पिस्तुल लावलं होतं.
वनिता : आणि तुम्हीं सर्व गप्प बसलात? मी असते तर तेच पिस्तुल त्या दुष्ट माणसाच्या टाळक्यात मारलं असतं.
अजय : मग आता मार. तो बघ, तो माणूस परत आलाय.
( वनिता घाबरून विकासला बिलगते. अजय जोरजोराने हसायला लागतो. वनिता रागाने त्याला मारायला धावते, व तो पळतापळता खिडकीकडे येतो. तेवढ्यात वनिताचं लक्ष बाहेर जातं. )
वनिता : (घाईघाईने) विकासदादा, लवकर इथं ये.
विकास : (खिडकीजवळ येत) काय झालं?
वनिता : तो माणूस बघ बाहेर उभा आहे. बहुतेक आत येईल तो. मला भीति वाटतेय.
अभय : अहारे, भित्री भागूबाई.
विकास : आत येणार नाही तो. आता त्याची जायची वेळ झाली.
अजय : तुला कसं माहीत?
विकास : मी सकाळपासून त्याला तिथं पहातोय.
अजय : मला वाटलं मीच त्याला पहिला पाहिला. सकाळपासून आहे तो इथं?
विकास : हो, सकाळपासून. तो अन त्याचा साथीदार सकाळपासून आपल्यावर पाळत ठेवून आहेत. प्रत्येकजण तासभर वाट पहातो व निघून जातो.
वनिता : (घाबरून) बापरे!
विकास : हात वेडे. घाबरलीस होय?
अजय : आपण तर मारामारी करायला बेचैन झालोय.
विकास : ऊंहूं, हाणामारी करून चालायचं नाही. आपल्याला युक्तीनंच सगळी माहिती काढावी लागेल. काय अभय?
( अभय आधी कानांवर व नंतर तोंडावर बोट ठेवून आपण बोलणार नसल्याची खूण करतो. )
विकास : कायग रेखा, या अभयचं डोकं का फिरलं अचानक?
अभय : (भडकून) डोकं का फिरलं काय विचारतोस? तुझंच फिरलं असेल. आधी आम्हाला गप्प बसायला सांगतोस, व आम्हीं गप्प बसलॊ तर म्हणे डोकं फिरलं.
विकास : बरं बाबा, माझंच चुकलं.
अभय : फक्त चुकलं म्हणून सुटका होणार नाही. हात जोडून माफी माग.
विकास : बरं बाबा, हात जोडून माफी मागतो. (हात जोडून) अभयराव, माझी चूक झाली, मला माफ करा. (तोंड वळवून) काय करणार? अडला हरी, गाढवाचे पाय धरी.
अभय : काही म्हणालास तू?
विकास : नाही, म्हटलं, माझी चूक झाली.
अभय : शाब्बास, तर काय म्हणत होतास मघाशी?
रेखा : ए विकासदादा, तुला माझी सुद्धा माफी मागावी लागणार.
विकास : बरं बाबा, तुझी देखील माफी मागतो. अजून कुणाची माफी मागायची असेल तर रांगेत उभे रहा, एकदमच सर्वांची माफी मागतो. हुकुम करा.
रेखा : हं, काय म्हणत होतास मघाशी?
विकास : नी विचारत होतो की आता पुढे काय करायचं? तो बाहेर माणूस पाहिलास? सकाळपासून आपल्यावर पाळत ठेवली जात आहे.
अभय : (आनंदाने) ग्रॅण्ड! आता खरी मजा यायला लागलीय.
विकास : मिस्टर, फक्त मजा घेऊन चालणार नाही. आता हातपाय हलवायला सुरवात केली पाहिजे.
अजय : आणि तुम्हां लोकांचे केवळ रुसवेफुगवे व गप्पा चालल्यायत. चला, हातपाय हलवायला सुरवात करा.
रेखा : विकासदादा ...
विकास : ए, आधी तू हे ’विकासदादा’ म्हणणं बंद कर पाहू. आवडत नाहीं मला कुणी दादा म्हटलेलं. मुंबईच्या गुंडांना दादा म्हणतात.
रेखा : बरं. विकास, ती माणसं इथं आपल्यावर पाळत ठेवून उभी आहेत तोवर आपण त्यांच्या घरी जाऊन शोध घेऊंया.
अभय : (चिडवून) म्हणें घरी जाऊन शोध घेऊं. ते काय किचनमधे जाऊन लाडू चोरण्याइतकं सोपं आहे?
अजय : कल्पना उत्तम आहे.
वनिता : लाडू चोरण्याची?
अजय : नाही. त्यांच्या घरी जाऊन शोध घेण्याची.
विकास : पण तसं करण्यात धोका देखील तेवढाच आहे.
अजय : आपण तयार आहोत धोका पत्करायला.
अभय : आपण सुद्धां.
रेखा : मी सुद्धां.
वनिता : मी देखील.
विकास : पण आपणां सर्वांना जाता येणार नाही. कुणालातरी मागे रहावं लागणार.
सर्वजण : आपण नाही मागे रहाणार.
विकास : हे बघा, मी तुमच्यापेक्षा मोठा आहे, कबूल?
सर्वजण : कबूल.
विकास : आणि तुम्हीं मला आपल्या गॅंगचा लीडर नेमला आहे. कबूल?
सर्वजण : कबूल.
विकास : मग मी सांगेन तसंच करायचं. शिवाय ही भानगड देखील माझ्यामुळेच सुरु झाली, खरं ना?
सर्वजण : कबूल. आम्हीं ऐकूं तुझं. बोल.
विकास : अजून थोड्या वेळानं तो बाहुलीवाला माणूस निघून जाईल. मी अन आपल्यापैकी दुसरं कुणीतरी त्याचा पाठलाग करूं. तोपर्यंत तुम्हीं इथं त्या दुसर्‍या माणसाला चकवा. संधी साधून, त्याच्या घरी कुणी नसताना, आम्हीं आत शिरून घराचा तपास करूं. ठीक आहे?
रेखा : ठीक आहे, पण पाठलाग करणार कसा? त्यानं तुम्हांला पाहिलं तर?
विकास : तो मला ओळखणार देखील नाही कदाचित.
अजय : विकास, तुझ्याबरोबर मी येईन त्या बाहुलीवाल्याच्या घरी.
विकास : उत्तम. आणि या दोन मुलींना अभयबरोबर एकटं सोडणार? शहाणाच आहेस. ते काही नाही. मी व रेखा त्या बाहुलीवाल्याच्या घरी जातो. तुम्ही इथला मोर्चा संभाळा.
रेखा : पण विकास, आपण त्यांचा पाठलाग कसा करायचा ते नाहीं सांगितलंस.
विकास : सगळं काहीं सांगतो. घाई करूं नका. असे जवळ या अन नीट ऐका.
( सगळेजण विकासभोवती घोळका करतात. विकास हलकेंच त्यांच्या कानांत कुजबुजतो. ते ऐकून सगळेजण आनंदाने ओरडतात व विकासला उचलायचा प्रयत्न करतात. पडदा पडतो. )

* * * * * प्रवेश दुसरा * * * * *

( अभयच्या घरासमोरील रस्त्याचा देखावा. पहिल्या अंकातील माणूस, शामराव काळे, तिथं उभा आहे. सारखं घड्याळाकडे लक्ष. इतक्यांत रस्त्याच्या दुसर्‍या बाजूकडे त्याचं लक्ष जातं. )
शामराव : लवकर ये गाढवा. रेंगाळतोयस कशाला?
( आतून एक खुनशी चेहर्‍याचा माणूस घाईघाईने येतो.)
शामराव : राणे, इतका उशीर का झाला तुला?
राणे : मी सॉरी झालो, साहेब.
शामराव : बास, प्रत्येक वेळी फक्त सॉरी होतोस. हे बघ. ती मुलं कुठेतरी जायच्या तयारीत आहेत. त्यांचा नीट पाठलाग कर. ती कुठं जातात, काय करतात नीट लक्ष ठेव. गाढवपणा करूं नकोस. आणि गाढवपणा करून सॉरी झालो म्हणूं नकोस.
राणे : सॉरी साहेब... म्हणजे मी सॉरी झालो असं म्हणणार नाहीं. सगळं नीट होईल.
शामराव : ते कळेलंच आता. मी जातो. अर्ध्या तासानंतर मी इथंच भेटतो मी तुला. त्या मुलीच्या हातात एक पाकीट असेल, त्याच्याकडे नीट लक्ष ठेव. त्या पाकिटात आपली बाहुली असेल.
राणे : (मोठ्याने) सोन्याची बाहुली?
शामराव : बोंबलू नकोस.
राणे : मी सॉरी झालो, साहेब. चुकलो साहेब. तुम्ही जा. बघा तर मी सगळं कसं झटपट काम उरकतो तें.
( शामराव घाईघाईने निघून जातो. दुसर्‍या बाजूने अभय, अजय व वनिता प्रवेश करतात. वनिताच्या हातात मोठंसं पाकीट आहे. )
राणे : (मुलांना थांबवून) मुलांनो, मला जरा मदत करता का?
अजय : बोला मामा, काय हवंय तुम्हांला?
राणे : तुम्हीं कुठं चाललाय?
अभय : अहो, मिस्टर कोण असाल ते, आम्हीं कुठं जातोय याच्याशी तुम्हांला काय करायचंय? तुम्हांला काय हवंय तेवढं सांगा.
राणे : (हसत) रागावलात मुलांनो? मला वाटलं तुम्हीं हे पाकीट घेऊन पोस्टात जाताय. मलाही तिथंच जायचंय.
अभय : असं होय? मग असे या रस्त्याने जा. पुढे गेल्यावर दोन रस्ते लागतील. त्यातला डावा रस्ता पकडा. पुढे गेल्यावर तीन वळणं लागतील. त्यातलं मधलं वळण घ्या. पुढे जाऊन डावीकडे वळा, मग उजवीकडे, मग सरळ जा. मग परत डावीकडे. मग ---
राणे : बास्स, बास्स. कळलं.
वनिता : काय कळलं?
राणे : हेंच की पोस्टाला जायचा रस्ता सोपा नाही. मी तुमच्याबरोबर येऊं का?
( अभय अजय व वनिताला घेऊन बाजूला जातो. )
अजय : काय, बनवायचा का मामा याला?
अभय : अरे, मघाशीच तू मामा म्हणालास की याला. आता खराखुरा मामा बनवायला किती वेळ लागणार? (राणेला) तुम्हीं या आमच्याबरोबर. आम्हीं तुम्हाला चांगलाच रस्ता दाखवूं.
राणे : मुलांनो, एक प्रश्न विचारूं का तुम्हाला? या पाकीटात काय आहे?
अभय : (अजयकडे पाहून डोळे मिचकावीत) या पाकिटात एक बाहुली आहे, बाहुली. पहायचीय का?
राणे : अरे व्वा! मला पण एक बाहुली घ्यायचीय.
अजय : मामा, मग तुम्ही याच आमच्याबरोबर. (तोंड वळवून) पहा तुम्हांला कसा मामा बनवतो तें.
( सगळेजण एका बाजूने निघून जातात. काही वेळाने अभय वगैरे आलेल्या दिशेनेच एक दाढीवाला भिकारी काठी टेकत येतो. त्याच्याबरोबर आपल्या साडीचा पदर तोंडावर घेऊन एक बाई प्रवेश करते. )
भिकारी : ए संभाळून. तो बाहुलीवाला तिथं उभा आहे. त्याला मुळीच संशय येता कामा नये.
बाई : पण त्याच्यामागे आपण जाणार कसे?
भिकारी : बघच तू आतां. (खिशातून दहा रुपयाची नोट काढून खाली वाकल्यासारखं करतो. नंतर शामराव गेलेल्या बाजूला पाहून ओरडतो.) अवं साह्यब, जरा हतं या की वाईच.
( शामराव प्रवेश करतो. )
शामराव : काय आहे?
भिकारी : (त्याला नोट देत) साह्यब, ह्यी नोट तुमचीच न्हवं का?
शामराव : (नोट ओढून घेत) ठीक आहे, ठीक आहे. (जायला लागतो.)
भिकारी : अव्हं साह्यब ...
शामराव : (रागानं) आता काय झालं?
भिकारी : काय राव, कायपण बक्षीस द्या की. लई भूक लागलीय बघा.
शामराव : (खिशातून एक नाणं काढून देत) हे घे अन चालता हो.
भिकारी : साह्यब, एक गोष्ट इचारूं का? एवढ्यामंदी काय व्हतं?
शामराव : (संतापून) मग काय सोन्याची खाण आणून देऊं की काय तुला?
भिकारी : सोनं नगं साब, यखादी नोकरी द्या की राव.
शामराव : हूं, नोकर्‍या काय रस्त्यावर पडल्यायत की वाट्टेल त्याला देत सुटूं?
भिकारी : (विनवण्या करीत) साह्यब, नाय म्हणूं नगा. ही एक घरधनीण अन दोन कच्च्चीबच्चीं बी घरी हायती. कायपण नोकरी द्या, साह्यब. लई मेहरबानी व्हईल तुमची. त्यो वरचा परमेश्वर भरभरून देईल तुमास्नीं.
शामराव : मग जाऊन त्या वरच्या परमेश्वराजवळ माग. चल चालता हो. खूप कामं पडलीयंत मला.
( शामराव निघून जातो. )
बाई : विकास, त्यानं तुला मुळीच ओळखलं नाही.
भिकारी : आणि ओळखेल तरी कसा? उगीच नाही मी आन्तरशालेय नाट्यस्पर्धेंत बक्षीसं मिळवलीं.
बाई : आतां?
भिकारी : आता काय? त्याची पाठ सोडायची नाहीं. बास्स --- साह्यब, कायपण नोकरी द्या राव.
( रेखा हसते. दोघेही त्याच्या पाठोपाठ जातात. काही वेळानंतर पुन्हां शामराव प्रवेश करतो व त्याच्यामागून भिकार्‍याच्या वेषात विकास अन रेखा. )
भिकारी : साह्यब, कायपण नोकरी द्याना राव.
शामराव : (हात उगारून) आता दांत घशात घालीन तुझे. मघांपासून डोस्कं खातोयस माझं.
भिकारी : मंग काय खाऊ साह्यब? दोन दिसांपासून पोटात कायभी नाय बगा. मंगा म्यां दिलेली ती नोट तरी द्या ना राव. पोटाची खळगी भरंल.
शामराव : (खिशांतून दहाची नोट काढून देत) ही घे आणि तोंड काळं कर इथून. (झटक्यात निघून जातो,)
भिकारी : चला, आपली दहाची नोट तरी परत मिळाली.
बाई : आणि मला तुझी मस्त ऍक्टींग पहायला मिळाली.
भिकारी : आता काहीतरी खाऊन घेऊं. आपलं काम झालं. त्या समोरच्या घरात रहातो तो बाहुली बहाद्दर. आता थोड्या वेळाने तो बाहेर आला की आपण त्याच्या घरात घुसूं.
बाई : पण विकास, तुला एवढी खात्री कशी की तो बाहेर येईल म्हणून?
भिकारी : उगाच नाही मीं इतकीं बक्षीसं मिळवलीं गोष्टी व नाटकं लिहिण्यात. अग, सोपं आहे. इतकी महत्वाची बाहुली मिळवण्याची कामगिरी नक्कीच तो आपल्या मदतनिसावर सोपवणार नाही.
बाई : विकास, बरोब्बर बोललास तूं. बघ तो बाहेर येतोय.
( शामराव प्रवेश करतो. )
शामराव : (संतापाने) अरे, तुम्हीं अजून इथंच? निघा म्हणून सांगितलं ना?
भिकारी : जातुयां साह्यब. मघां इसरलॊच बघा.
शामराव : (संतापून) काय विसरलास?
भिकारी : मगां तुमी ति धाची नोट दिली त्येचा थांकू म्हणाया इसरलो. थांकू साह्यब, लई उपकार झालंया तुमचं. आज पोरांचं त्वांड ग्वाड करतुया.
शामराव : बास्स झालं. आता निघां इथून. नाहीतर पोलिसात देईन.
भिकारी : नगं साह्यब. जातुया. वाईच दम घेतो व निघतो. तुम्ही काळजी नगा करू.
( शामराव तातडीनं निघून जातो. )
बाई : (तो गेलेल्या दिशेने पहात) गेला बाई एकदाचा. मला तर भीतीच वाटत होती.
भिकारी : भीति कसली? खरं धोक्याचं काम तर आतांच आहे. ती खिडकी पाहिलीस? त्यातून आत उडी मारायचीय आपल्याला. जमेल?
बाई : न जमायला काय झालं? उगीच नाहीं मी ऍथलेटीक्समधे एवढीं बक्षीसं मिळवलीं.
भिकारी : (हसून) अच्छा, ऍथलेटीक्समध्ये बक्षीसं? मेरी बिल्ली और मुझीसे म्यांऊ? चल लवकर.
( भिकारी व बाई दुसर्‍या बाजूने निघून जातात. आधी गेलेल्या बाजूने अभय, अजय व वनिता येतात. ते काहीतरीं बोलत असतानाच साध्या कपड्यांतील एक माणूस हातात दुर्बीण घेऊन प्रवेश करतो. )
अजय : आता हा कोण मॅडकॅप?
अभय : त्यालाच विचारूं ना. काय हो पाहुणं?
माणूस : मी पाहुणा नाहीं.
अजय : मग?
माणूस : याच गावचा आहे.
अभय : मी सुद्धा याच गावचा आहे. पण याआधी कधी पाहिलं नाहीं मी तुम्हांला.
माणूस : मी ओळखतो तुम्हाला.
अभय : ते कसं काय?
माणूस : तुम्हीं या समोरच्या घरात राहता. बरोबर?
अभय : म्हणजे तुम्हीं आमच्या घरात डोकावून पहात होता तर?
माणूस : म्हणजे अगदी डोकावून पहात होतो असं नाही. पण पहात होतो.
अजय : पण का?
वनिता : ए अभय, चोर तर नसेल ना हा माणूस?
माणूस : नाही, नाही. मी चोर नाही.
अजय : मग कोण पोलीस आहात?
माणूस : नाही सांगू शकत.
अभय : ते का?
माणूस : साहेबांनी सांगितलंय की मी पोलीस आहे ते कुणालाहि सांगायचं नाही. ही गुप्त बातमी आहे. म्हणून सांगू शकत नाहीं.
अजय : कुठल्या साहेबांनी सांगितलंय तुम्हाला की तुम्ही पोलिस आहात हे कुणालाहि सांगायचं नाही असं?
माणूस : मघाशी ते इन्स्पेक्टर तुमच्या घरात आले होते ना, त्या साहेबांनी सांगितलंय. मी त्यांनाच शोधत होतो.
अभय : अच्छा, इन्स्पेक्टर ढवळेंनी सांगितलंय?
माणूस : (आश्चर्याने) तुम्हांला साहेबांचं नांव कसं माहीत?
अजय : अहो, त्यांनी स्वत:च सांगितलं आम्हांला.
माणूस : कमाल आहे. स्वत: आपलं नांव सांगितलं आणि मला सांगितलं माझी ओळख द्यायची नाही म्हणून? पण आता साहेब कुठे गेलेयत?
अभय : त्यांनी सांगितलंय की ते कुठे गेलेयत हे तुम्हांला नाहीं सांगायचं.
माणूस : पण का? मी तर त्यांचाच माणूस आहे, पोलिसांतला.
अजय : कारण ते गुप्त तपास करताहेत. तो मुंबईचा कुणी गुंड गावात आलाय ना, त्याच्या मागावर गेलेयत ते.
माणूस : मग मला जायला हवं.
अभय : मग निघा लवकर. (घाईघाईने जायला वळतो.) काका, एक मिनीट थांबा.
माणूस : काय झालं?
अभय : आम्हीं तुम्हांला सांगितलं हे त्यांना सांगू नका, प्लीज़.
माणूस : नाहीं सांगत. पण मुलांनो, तुम्हींही त्यांना नका सांगू हं.
अजय : काय?
माणूस : हेंच की मी तुम्हांला कांही सांगितलंय ते.
अभय : नाही सांगणार. आपलं खास गुपित.
अजय : अळी मिळी गुप चिळी.
माणूस : म्हणजे काय?
अजय : म्हणजे एकदम टॉप सीक्रेट. आम्हीं कुणाला नाहीं सांगणार.
अभय : आणि तुम्हीं कुणाला नाहीं सांगायचं.
( सगळेजण एकमेकांना तोंडावर बोट ठेवून गप्प रहायची खूण करीत वेगवेगळ्या बाजूला निघून जातात. )

* * * * * (तिसरा प्रवेश) * * * * *

( एक अंधारी खोली. समोरच्या खिडकीतून विकासची आकृति आत उडी टाकते. )

विकास : रेखा, लवकर उडी टाक ना. किती वेळ वाट पहायची?
रेखा : (बाहेरून) विकास, ही खिडकी खूप उंच आहे. जरा मदत कर ना.
विकास : शेवटी मदत लागलीच ना तुला? बढाया मारत होतीस, "न जमायला काय झालं?" आता ऍथलेटीक्समधली बक्षीसं बाजूला ठेव, माझा हात पकड अन आत ये. (हात बाहेर काढतो.)
रेखा : (बाहेरून) घट्ट पकड हां, हात सोडूं नकोस. मी उडी टाकतेय. (रेखा आत उडी टाकते.) विकास, इथे केवढा अंधार आहे. जरा दिवा लाव ना.
( विकास भिंतीकडे चाचपडत जातो व दिवा लावतो. काही वेळाने खोलीत उजेड पसरतो. ही शामरावची खोली. एका कोपर्‍यात एक पलंग व त्याखाली एक मोठी ट्रंक आहे. एकदोन खुर्च्या व एखादे टेबल. )
रेखा : ही ट्रंक बंद आहे.
विकास : मग काय कुणी आपल्यासाठी ट्रंक उघडी ठेवून जाणार आहे? काळजी करूं नकोस. माझ्याकडे सगळ्या बंद वस्तू उघडण्याचे उपाय आहेत. आत नाहीं का आलो आपण?
( विकास खिशातून किल्ल्यांचा झुबका काढतो व काही प्रयत्नांनंतर ट्रंक उघडतो व त्यांतून वस्तू काढून तपासायला लागतो. एक बाहुली काढून रेखाला दाखवतो. )
विकास : ही बघ बाहुली.
रेखा : तसलीच बाहुली?
विकास : फक्त बाहेरून, आतून नाहीं.
रेखा : म्हणजे तो अजून सोनं पळवण्याच्या तयारीत आहे की काय? विकास, कसंही करून आपण त्याचा हा प्रयत्न फसवायला पाहिजे.
विकास : अग हो, त्याचसाठी आलोयत आपण इथं. जरा थांब, अजून काही पुरावा सापडतो का बघूं.
( विकास बाहुलीखेरीज इतर सर्व वस्तू ट्रंकेत ठेवतो व ट्रंक बंद करून पलंगाखाली परत सरकवतो. )
रेखा : विकास, त्या तिथं कपाटात बघ.
( विकास कपाटाकडे जाऊन ते उघडायचा प्रयत्न करतो, पण व्यर्थ. )
रेखा : काय झालं?
विकास : हे कपाट लेकाचं हट्टी आहे, सरळपणे उघडत नाही. फिक्र नॉट. प्रयत्नांती परमेश्वर.
( तो पुन्हां कपाट उघडायचा प्रयत्न करीत असतांनाच अचानक खोलीचे दार उघडते व राणे आत येतो. )
राणे : पोरांनो, तुम्हीं नका त्रास घेऊं, मी मदत करतो तुम्हांला.
( विकास व रेखा दचकून दाराकडे पहातात. )
विकास : (स्वत:ला सावरून) साह्यब, कायपण घेतलं नाय म्यां. माफ करा राव, लई भूक लागली म्हनूनशान काही गावतं का बघाया आत शिरलो व्हतों. पन कायबी सापडलं नाय बघा.
राणे : (विकासजवळ येतो.) काय बी सापडलं नाय, फक्त ही बाहुली सापडली, काय?
विकास : साह्यब, माझ्या कच्च्याबच्च्यांसाठी घेतली व्हती.
राणे : (संतापाने) मला मूर्ख बनवायचा प्रयत्न करूं नका. कोण आहेस तूं सांग. (त्याच्या दाढीला हात घालतो. दाढी हातात येते.) तुम्हीं पोरं आहात तर? हेरगिरी करायचं धैर्य मोठं आहे तुमचं. हे घे बक्षीस. (काडकन त्याच्या मुस्काटीत भडकावतो. विकास कोलमडतो. राणे रेखाला मारायला जातो, तेवढ्यात विकास त्याचा हात पकडतो.)
विकास : त्या मुलीच्या अंगाला हात लावलास तर हात तोडून टाकीन तुझा. लेचापेचा समजायचं काम नाहीं.
( राणे मागे वळून दोन्हीं हातांनी विकासचा गळा पकडायचा प्रयत्न करतो, तेवढ्यात रेखा त्याच्या हाताला चावते. तो ओरडून हात सोडतो. )
राणे : पोरी, मला चावलीस? जिवंत सोडणार नाहीं मी तुला. (तिच्याकडे वळतो.)
( रेखा घाबरून पलंगाभोवती धावायला लागते. राणे तिच्यामागे धावतो. तो धावत असतांना विकास मध्ये पाय घालून त्याला खाली पाडतो. तो खाली पडल्यावर पलंगावर असलेले एक मोठं कुलुप घेऊन विकास त्याच्या टाळक्यात हाणतो. राणे खाली कोसळतो. )
विकास : छान काम झालं. आता निदान अर्धा तासतरी हा काही गडबड करूं शकणार नाहीं. आता याला मुसक्या बांधून कुठंतरी लपवला पाहिजे.
( विकास पलंगावरचे उशीचे कव्हर काढून राणेच्या तोंडात कोंबतो व पलंगावरची चादर काढून त्याला बांधतो. विकास व रेखा त्याला धरून खेंचायला लागतात. )
रेखा : कुठं टाकायचा याला?
विकास : त्या बाजूच्या खोलीत व्यवस्था करूं त्याची.
( दोघेही त्याला खेंचीत दुसर्‍या खोलीत नेतात व बाहेर येतात. )
रेखा : आता?
विकास : घरीं जायचं. चल लवकर.
( दोघेही घाईघाईने खिडकीकडे जायला वळतात. बाहेर उडी टाकणार तेवढ्यात दाराकडून आवाज येतो, "खबरदार, कसलीच हालचाल करूं नका." दोघेही दचकून दाराच्या दिशेने पहातात. शामराव आत येतो. )
शामराव : (जोराने हसत) भिकार्‍यांची पोरं? स्वत:ला फार हुशार समजत होतां नाहीं? आता तुमची हुशारी संपली. काय समजून घरात यायचं धाडस केलंत?
विकास : तुमच्या घराचा तपास करायला आलो होतों आम्हीं.
शामराव : (विकासची पाठ थोपटत) शाबास. उत्तर देतांना भीति नाहीं वाटत तुला?
विकास : एका गुन्हेगाराची कसली भीति वाटणार? विजय नेहमी सत्याचाच होत असतो. मुलांच्या पाठीला पाठून पिस्तूल टेकवून धमक्या देणार्‍या घाबरटाचा नाहीं.
शामराव : (रागाने त्याचा हात पिरगाळून) तोंड बंद ठेव कारट्या. नाहीतर जीभ खेंचून हातात ठेवीन, समजलं? बोल, कुठं आहे माझी बाहुली?
विकास : मला नाही माहीत.
शामराव : (अजून जोराने हात पिरगाळीत) माहीत नाहीं का सांगायचं नाहीं?
विकास : माहीत असेल तर परत विचारतां कशाला?
शामराव : तोंड बंद ठेव आणि सांग, कुठं आहे माझी बाहुली?
विकास : तोंड बंद ठेवून कसं सांगू?
शामराव : जास्त शहाणपणा नको. बोल, कुठं आहे बाहुली?
विकास : (निर्धाराने) मला माहीत नाही, आणि माहीत असलं तरी सांगायचं नाही.
रेखा : मी देते बाहुली. आधी त्याचा हात सोडा.
( शामराव विकासचा हात सोडतो. रेखा खाली पडलेली बाहुली उचलून शामरावला देते. )
शामराव : (बाहुली खाली फेकत) ए शहाणे, खेळायला नकोय मला ही बाहुली. माझी सोनं भरलेली बाहुली परत हवीय मला.
रेखा : इथं घेऊन यायला मूर्ख नाही आहोत आम्हीं. घरीं ठेवून आलोय ती सोन्याची बाहुली.
शामराव :अच्छा, एकूण लढा द्यायचं ठरवलंय तुम्ही पोरांनी?
विलास : बरोब्बर ओळखलं तुम्हीं.
शामराव : अजून किती वेळ तुमची हिम्मत टिकते तेच बघायचंय मला. अजून अर्ध्या तासात मला माझी बाहुली मिळाली नाही, तर माझं हे पिस्तूल असेल व तुमचीं टाळकीं.
रेखा : बाहुली हवी असेल तर घरी जाऊंदे आम्हांला.
शामराव : तितका मूर्ख नाहीं मी. तुमची दोस्त मंडळी घेऊन येतील ती बाहुली.
रेखा : आम्हांला कैद करून ठेवलंय असं त्यांना कळलं ना, तर ते पोलिसांना घेऊन येतील, बाहुली नाही.
शामराव : तुम्हांला कैद करून ठेवलंय असं त्यांना कळलं तर ना? त्यांना फोन करून इथं बोलावून घ्या.
विकास : ठीक आहे. कुठाय फोन?
शामराव : तो समोरच्या टेबलावर आहे फोन. (विकास जायला वळतो.) पण लक्षात ठेव. माझ्याशी कसलाहि दगाफटका करायचा विचार सुद्धा डोक्यात आणलास तर या पिस्तुलांतील गोळी या पोरीच्या मेंदूपार होईल. तो फोन उचल.
( विकास टेबलाकडे जाऊन फोन उचलतो शामराव खिशातील पिस्तुल काढून रेखाच्या मस्तकावर टेकवतो. विकास फोन उचलून नंबर फिरवतो. )
विकास : हॅल्लो, कोण बोलतंय? हां, अभय? हे बघ, तुला काहीतरी सांगायचंय. ती बाहुली घेऊन ताबडतोब मी सांगतो त्या पत्त्यावर निघून या. हो, काही काळजी करूं नका. रेखा माझ्याबरोबरच आहे. मी सांगतो तो पत्ता लिहून घे व मुळीच वेळ न दवडतां या. घर नंबर चौदा, तळमजला, तेलंग रस्ता. आणि येताना थोडी बिस्कीटं घेऊन ये. कडाक्याची भूक लागलीय मला. प्लीज़ लवकर या.
( फोन खाली ठेवतो. शामराव आपलं पिस्तुल हटवतो. )
शामराव : आता कसं वळणावर आलात. आता तुमची दोस्त मंडळी येईपर्यंत त्या पलंगावर बसून थोडा आराम करा.
( विकास व रेखा पलंगावर बसून रहातात. )

( पडदा पडतो. )
* * * * * दुसरा अंक समाप्त * * * * *

तिसरा अंक
* * * * * प्रवेश पहिला * * * * *

( पहिल्या अंकातील अभयच्या घराचा देखावा. अभय, अजय, व वनिता बोलत बसले आहेत. )
अभय : चला मंडळी, युद्धाला तयार व्हा.
अजय : (आश्चर्याने) युद्धाला का म्हणून? विकास तर म्हणाला, सर्व ठीक आहे म्हणून. मी ऐकत होतो तुमचं बोलणं.
अभय : विकासनं बिस्कीटं आणायला सांगितलंय.
वनिता : होना. विकासदादाला खूप भूक लागली असेल. पण त्यानं बिस्कीटं आणायला कशाला सांगितलं? त्याला तर बिस्कीटं मुळीच आवडत नाहीत. तो नेहमी म्हणत असतो की बिस्कीटं फक्त कुत्रीं खातात.
अभय : आणि तो कुत्रा थोडाच आहे?
अजय : मग त्यानं बिस्कीटं आणायला का सांगितलं?
अभय : अरे, तीच तर गम्मत आहे. इथून जायच्या आधी आमचं ठरलं होतं की जर तो धोक्यात असला तर मला बिस्कीटं आणायला सांगेल.
अजय : याचा अर्थ असा की विकास अन रेखा धोक्यात आहेत?
वनिता : (हुंदके देत) दादा धोक्यात आहे?
अभय : ए वेडाबाई, रडायचं नाही. आपण शूर मुलं ना?
वनिता : (रडत) हो.
अभय : व्वा, असं कधी कोण सांगतं वाटतं? (रडायची नक्कल करीत) आम्हीं शूर मुलं आहोत. हुं, हुं. चल, हेच वाक्य हंसून म्हण पाहू.
वनिता : (हंसून) मी नाहीं रडणार. मी शूर मुलगी आहे.
अजय : शूर विकासदादाची शूर बहीण आहे मी.
वनिता : तू नाहीस, मी विकासदादाची शूर बहीण आहे.
अभय : शाब्बास, आता सर्वजण तयार व्हा.
अजय : (उडी मारून) मी तर केव्हांचा एका पायावर तयार आहे.
अभय : उत्तम. एका पायावर तयार रहा अन एका हातात ती बाहुली घे.
अजय : इतक्या मुश्किलीने मिळवलेली बाहुली अशीच परत द्यायची?
अभय : अशीच परत नाही द्यायची. हातापायाबरोबर आपलं डोकंदेखील चालवायचं. पक्का लढा द्यायचा. आणि तशीच वेळ जर आली तर ती बाहुली त्या माणसाच्या तोंडावर फेकून द्यायची.
वनिता : पण का?
अभय : कारण त्या सोन्याच्या बाहुलीपेक्षा आपल्या मित्राचे प्राण जास्त महत्वाचे आहेत. चला, आता अजून वेळ नाही दवडायचा.
( तिघेजण घाईघाईने दरवाज्याकडॆ वळतात. तेवढ्यात पहिल्या अंकातील इन्स्पेक्टर ढवळे दारात उभा असतो. त्याला पाहून मुलॆं दचकतात. )
इन्स्पेक्टर : (हसत) घाबरलात मुलांनो?
अभय : पोलिसांना घाबरून कसं चालेल, इन्स्पेक्टरसाहेब?
इन्स्पेक्टर : शिवाय मी दोस्त आहे तुमचा, शत्रू नव्हें.
अजय : आमचा दोस्त?
इन्स्पेक्टर : हो, मदत करायला आलोय तुम्हांला.
अभय : (हसत) थॅंक्यू, पण आम्हांला मदत नकोय तुमची.
इन्स्पेक्टर : (हसत) थॅंक्यू. पण बर्‍याच वेळां आम्हां पोलिसांना लोकांच्या बोकांडी बसावं लागतं -- त्यांची इच्छा नसतांना देखील.
अभय : इन्स्पेक्टरसाहेब, ही ज़बरदस्ती झाली. आम्हांला कधी तुमची मदत हवी असलीच तर जरूर बोलावूं तुम्हांला. पण आता, प्लीज़, उशीर होतोय आम्हांला.
अजय : थोडं महत्वाचं काम आहे.
वनिता : थोडं नाहीं, खूप महत्वाचं काम आहे.
( इन्स्पेक्टर मध्यभागी येऊन तिथं खुर्चीवर ठाम मांडून बसतो. )
इन्स्पेक्टर : मुलांनो, नक्की कुठं जायचंय तुम्हांला?
( अभय, अजय व वनिता चरफडत एका बाजूला होतात. )
अभय : (बाजूला) हा चिकट्या माणूस असा ऐकायचा नाही.
अजय : मग अशा लोकांना काय करावें?
वनिता : आमच्या बाई म्हणतात, अशा लोकांना कोरड्या विहिरीत टाकून द्यावें.
अभय : आणि कोरडी विहीर नसली तर?
अजय : तर याला इथंच बंद करून ठेवावं.
अभय : ही कल्पना उत्तम आहे.
वनिता : तुझे बाबा परत आले म्हणजे?
अभय : बाबांनी येऊन दार उघडलं की जाईल निघून. फार फार तर चार शिव्या टाकेल आपल्याला.
इन्स्पेक्टर : मुलांनो, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीं दिलं तुम्हीं. कुठं जायचंय तुम्हांला?
अभय : इन्स्पेक्टर ...मामा, आम्हीं विचार करीत होतों, तुम्हांला खरं सांगायचं की खोटं?
इन्स्पेक्टर : मग काय ठरलं?
अजय : मामा, आम्हांला निर्णय घ्यायला अजून पांच मिनीटं द्या.
इन्स्पेक्टर : (संशयाने त्यांच्याकडे पहात) कबूल.
( इन्स्पेक्टर आपल्या मनगटावरील घड्याळाकडे पहात बसतो. अभय अजय व वनिताला बाजूला खेंचून घेऊन जातो. )
अभय : वेड्या, पांच मिनीटात काय होतं?
अजय : वत्सा, पांच मिनीटात चिक्कार कांही होऊं शकतं. (नाटकीपणें) पांच मिनीटात पर्वत उडूं शकतात. राज्यच्या राज्यं धुळीला मिळूं शकतात.
अभय : ए मिस्टर, नाटकं पुरे.
अजय : (शांतपणे) बालका, नाटकं नव्हें. अरे हा तर एक साधा माणूस आहे. याला आपल्या वाटेतून दूर करायला कित्ती वेळ लागेल? फक्त पांच मिनीटं पुरे आहेत.
अभय : म्हणजे नक्की काय करायचं?
अजय : आता तू आणि वनिता लायब्ररीत जाणार.
अभय : अरे पण आपल्याला तर ---
अजय : मुला, देवानं आपल्याला हे डोकं दिलंय तें आपण योग्य वेळीं वापरावं म्हणूनच ना?
अभय : (रागाने) मग तूंच वापर ना आपलं डोकं.
अजय : तेंच करतोय, अभय. त्या इन्स्पेक्टरला सांग की तू आणि वनिता लायब्ररीत जाणार आहांत. मी आतल्या खोलींत जाऊन वाचन करणार आहे. मी खिडकीतून तुम्हांला बाहुली देतो व उडी मारून बाहेर येतो. बाहेर गेल्याबरोबर तुम्हीं खोलीला कुलूप लावून घ्या. आहे की नाहीं सोपी गोष्ट? मी --- वापरलं --- आपलं --- डोकं.
अभय : जहांपनाह, तुस्सी ग्रेट हो!
अजय : इडीयट, आतां नाटकं नकोत.
अभय : उत्तम. काय घडलंय ते कळायच्या आधींच आपण गुल झालेले असूं.
इन्स्पेक्टर : तुमचीं पांच मिनीटं संपलीत.
अभय : आणि आम्हीं निर्णय घेतलाय. मी आणि वनिता लायब्ररीत जाणार आहोत.
अजय : मी आत कॉमिक्स वाचत बसणार आहे.
अभय : लायब्ररीतून परत आल्यावर आम्हीं सर्वजण त्या बाहुलीवाल्याच्या मागावर जाणार आहोत.
अजय : तोपर्यंत तुम्हीं आत माझ्याबरोबर कॉमिक्स वाचत बसूं शकतां. मी मुंबईहून येताना मस्तपैकी कॉमिक्स आणलीयत. याच तुम्हीं.
इन्स्पेक्टर : नको, मी इथंच ठीक आहे.
( अभय व वनिता बाहेर निघून जातात. अजय आंतल्या खोलीत जातो. इन्स्पेक्टर काही वेळ तिथंच बसून रहातो. मग कसला तरी संशय येऊन आतल्या खोलीत जातो, व वैतागून लगेच बाहेर येतो. चेहरा त्रस्त व वैतागलेला. )
इन्स्पेक्टर : पोरांनी पुन्हां एकदा मला बनवलेलं दिसतंय. (दाराकडे जाऊन बाहेर जायचा प्रयत्न करतो, पण अयशस्वी होऊन परत येतो.) कैद --- मला कैद करून कारट्यांनी बाहेरच्या बाहेर पळ काढलेला दिसतोय. सोडणार नाहीं तुम्हांला. याद राखा.

* * * * * प्रवेश दुसरा * * * * *

( शामरावच्या घरातील खोली. विकास व रेखा पलंगावर बसलेले आहेत. बाजूलाच शामराव हातात पिस्तूल घेऊन
उभा आहे. )
शामराव : वीस मिनीटं झालीं, अजून तुमच्या मित्रांचा पत्ता नाहीं. काही चलाखी तर केली नाहीं ना तुम्हीं?
विकास : उगीच काहीतरी काय बोलताय? चलाखी कशी करणार आम्हीं? मी फोन केला तेव्हां तुम्हीं समोरच तर होतात.
शामराव : मग आले का नाहींत तुझे मित्र?
विकास : उडून येणार नाहीत कांही ते. आता येतील सगळे.
शामराव : लक्षात ठेव, अजून दहा मिनीटात ते आले नाहीत तर आधी मी या मुलीचा मुडदा पाडणार आणि नंतर तुझा.
विकास : कबूल, पण तशी वेळच येणार नाहीं.
( तेवढ्यात दरवाजाची घंटा वाजते. शामराव जाऊन दरवाजा उघडतो. )
शामराव : (हसत) या मंडळी, आनंद झाला तुम्हांला भेटून. (आधी अभय, त्यामागून अजय व शेवटी वनिता प्रवेश करते. अभयच्या हातात एक पाकीट आहे. वनितानं मागे लपवलेल्या हातात बाहुली आहे.) अजून दहा मिनीटं उशीर केला असतां तर तुमच्या मित्रांना मी खायला देणार होतो --- या बंदुकीतली गोळी.
अभय : त्यांच्यासाठी बिस्कीटं आणलीयत आम्हीं. गोळी परत घाला --- तुमच्या घशात, सॉरी, बंदुकींत.
शामराव : (अभयची पाठ थोपटीत) शाब्बास! खूप काळजी घेताय आपल्या मित्रांची. माझी बाहुली कुठाय?
अभय : (हातातील पाकीट त्याला देत) ही घ्या. पॅक करून, खूप जपून आणलीय.
अजय : या फालतू बाहुलीपेक्षा आम्हांला आमचे मित्र प्रिय आहेत.
शामराव : अभिमान वाटतोय मला तुमचा. त्याच वेळी ही परत केली असतीत तर ही वेळच आली नसती. जाऊं दे. मुकाट्याने तुम्हीं बाहुली घेऊन आलात ते बरं केलंत.
( याचवेळी शामरावची नजर चुकवून वनिता आपल्या हातातली बाहुली हळूंच पलंगावर ठेवते व विकास ती पलंगाखाली लपवतो. )
वनिता : आतातरी तुम्हीं माझ्या दादाला सोडणार ना?
शामराव : (हसत) सोडेन ना, मला काय त्याचं लोणचं घालायचंय? पण परत कधी माझ्या भानगडीत पडूं नका. मला आजपर्यंत कुणीच चकवूं शकलं नाहीं.
अभय : खरं सांगायचं तर तसा प्रयत्न करणं हीच आमची चूक झाली. आम्हांला माफ करा.
( एव्हांना शामराव पाकीट सोडून बघायला लागतो, पण कागदांच्या गुंडाळ्यांखेरीज त्याला कांहीच सांपडत नाहीं. तो संतापून पाकीट खाली फेकतो. )
शामराव : (क्रूरपणे) बनवलं तुम्हीं मला?
अभय : काय झालं? बाहुली नाहीं त्यात? अगदी सकाळपर्यंत त्यांतच होती.
शामराव : मग आता कुठं गेली? माझाच मूर्खपणा झाला. मघांशी तुम्हीं मला तें पाकीट दिलं तेव्हांच मला कळायला हवं होतं की सोन्याने भरलेली बाहुली इतकी हलकी नसते.
अजय : खरंच कळायला पाहिजे होतं तुम्हांला. कसं कळलं नाहीं?
अभय : अजय, आपण देखील इतके मूर्ख कसे? आपल्याला देखील कळायला पाहिजे होतं, नाहीं?
शामराव : (खिशांतून पिस्तूल काढून) आता कळायला लागेल तुम्हां कारट्यांना. कुठं आहे बाहुली?
वनिता : मघाशी तिथं पाहिली मी.
अभय : चला रे, आपण सारेजण शोधूंया.
( सगळेजण इथंतिथं शोधल्याचं नाटक करतात. )
अभय : सापडली. तुमची बाहुली सापडली.
अजय : मग देना त्यांना.
अभय : मिस्टर, इथं पलंगाखाली आहे. आपण नाही बुवा हात लावणार. तुम्हींच काढा.
( शामराव बाहुली बघायला पलंगाखाली वाकतो, तोच अभय त्याच्या तंगडींत पाय अडकवून त्याला आडवा पाडतो. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराने शामरावचा तोल जाऊन तो पालथा होतो व त्याच्या हातून पिस्तूल खाली पडते.विकास एकदम पिस्तूल उचलून आपल्या खिशात टाकतो. अजय झटपट बाहुली उचलून एका कोपर्‍यात जातो. आता सर्व मुलें खोलीच्या वेगवेगळ्या कोपर्‍यांत वर्तुळाकार उभीं राहतात. शामराव उठून उभा रहातो. )
शामराव : खूप झाला चावटपणा. बाहुली कुठें आहे?
अजय : ही घ्या. आता खरंच घ्या. मघांशी चुकून आमचा पाय तुम्हांला लागला व तुम्हीं पडलात. सॉरी. ही घ्या बाहुली.
( शामराव अजयकडे जातो, तोच अजय बाहुली विकासकडे फेकतो. शामराव विकासकडे धावतो. तेवढ्यात विकास बाहुली अभयकडे टाकतो. शामराव तिथें जातो तेव्हां अभय बाहुली रेखाकडे टाकतो. शामराव रेखाकडे धावत असतांना अभय त्याच्या पायात पाय अडकवून त्याला पाडतो. शामराव पडल्याबरोबर विकास पलंगावरचे कुलूप काढून त्याच्या टाळक्यात मारायला जातो. पण शामराव चपळाईने बाजूला सरकतो व उठायचा प्रयत्न करतो. याचवेळी सर्व मुलॆं एकदम त्याच्यावर झडप घालतात, पण त्यांचा प्रयत्न साफ फसतो. शामराव त्यांना जोराने धक्का देऊन मागे सारतो. फक्त विकास त्याच्याशी झटापट करीत असतो. या झटापटीत विकासच्या खिशांतील पिस्तूल जमिनीवर पडते. शामराव चटकन पिस्तूल व बाजूला पडलेली बाहुली घेऊन दरवाज्याच्या बाजूला जातो. आता शामरावची पाठ दरवाज्याकडॆ आहे व सर्व मुलें त्याच्या समोर. शामरावचे पिस्तूल मुलांवर रोखलेले असतें. )
शामराव : (क्रूरपणे हंसत) झालं समाधान पोरांनो? तुम्हीं कारटीं स्वत:ला खूप चलाख समजत होतांत. पण शेवटी विजय माझाच झालाय. ही बाहुली मिळवण्याची खूप धडपड केलीत तुम्हीं, पण व्यर्थ. (वनिताकडे पाहून) पोरी, तुला बाहुली हवी होती ना? तू आठवण म्हणून ती रिकामी बाहुली ठेवून घे.
वनिता : (एकदम शामरावच्या मागे दरवाजाकडे पाहून) इन्स्पेक्टरकाका, यांना पकडा. आम्हांला मारायला निघालेत ते.
( शामराव दचकून मागे पहातो. ही संधी साधून विकास उडी मारून त्याचा पाय खेंचतो, आणि त्याने पडताच त्याच्या हातातून पिस्तूल ओढून घेऊन त्याच्यावर रोखतो. )
विकास : (क्रूर व्हायचा प्रयत्न करीत) शाळेत ट्रेनींग घेतोय मी, व पिस्तूल चालवता येतं मला. आजमावायचं असेल तर प्रयत्न करून बघा. किंचितही हालचाल केलीत तर कसलीहि दयामाया न दाखवतां ही गोळी तुमच्या मेंदूपार करीन. तुमच्यासारख्या बदमाषांना दयेने वळवतां येत नाहीं. आता मुकाट्याने ती बाहुली आमच्या स्वाधीन करा.
( शामराव थोडावेळ विचार करून बाहुली अजयच्या हातात देतो. अजय, अभय, रेखा आणि वनिताला घेऊन विकास बाहेरच्या दरवाजाकडे जातो, व नंतर शामरावच्या पाठीला पिस्तूल लावून त्याला आतल्या दरवाजाकडे घेऊन जातो. )
विकास : (पिस्तूल अजून शामराववर रोखलेले) इथून हलायचाहि प्रयत्न केलात तर हे तुमचंच पिस्तूल असेल व तुमचंच डोकं. (बाहेरच्या दरवाजाकडे जात) थोड्याच वेळात तुमचा तो साथीदार तुम्हांला सोबत द्यायला येईल. तो बघा आलाच. (आतून राणे प्रवेश करतो.) मिस्टर तुम्हीं जे कुणी असाल ते, आहात तिथंच उभे रहा. अभय, तू तो फोन उचल व घरीं फोन करून त्या इन्स्पेक्टरला बोलावून घे.
अभय : विसरलॊं मी, पण मोबाईल आणलाय मी. ( अभय खिशातला मोबाईल काढून नंबर फिरवतो. काहीच उत्तर न मिळाल्यावर फोन परत ठेवतो. )
अभय : विकास, घरी फोन कुणीच उचलत नाहीं.
विकास : ठीक आहे. आता तुम्हीं बाहेर जा. लवकर.
( विकासखेरीज सगळेजण बाहेर निघून जातात. विकासला एकटा पाहून शामराव व राणे पुढे सरकायचा प्रयत्न करतात. )
विकास : (क्रूरपणे) संभाळून. तुम्हांला जिवंत रहायचं असेल तर तसला मूर्खपणा मुळीच करूं नका. मी आधींच सांगितलंय तुम्हांला, मला पिस्तूल चालवतां येतं. विश्वास नसेल तर आता पुरावा देईन. हें पिस्तूल थेट तुमच्या मेंदूकडे रोखलेलं आहे.
( शामराव व राणे जागच्या जागी थांबतात. )
शामराव : (हात वर करीत) विकास, मी तुला शरण जातोय.
विकास : फक्त शरण जाऊन कांहींहि होणार नाही, मिस्टर शामराव काळे. काळी कृत्यं करणार्‍या देशद्रोही गुन्हेगारांना कायद्यानंच शिक्षा व्हावी लागते.
( याच वेळीं बाहेरून इन्स्पेक्टर ढवळे इतर मुलांसह प्रवेश करतो. त्याच्या एका हातात बेड्या व दुसर्‍या हातात एक कागद आहे. )
इन्स्पेक्टर : ... व ती झाल्याशिवाय रहाणार नाहीं. मिस्टर शामराव काळे, मी तुम्हांला अटक करीत आहे. हे आहे तुमच्या अटकेचं वॉरण्ट.
( काय घडत आहे हे कुणाच्या लक्षात येण्यापूर्वींच शामराव सर्वांना बाजूला ढकलून बाहेर पळतो. विकास घाईघाईने बाहेरच्या बाजूला धावतो. शामरावच्या पाठीं जावं की खोलींत असलेल्या राणेवर नजर ठेवावी हे न कळून इन्स्पेक्टर गोंधळलेल्या अवस्थेत असतांनाच बाहेरून आधी गोळी चालल्याचा व ताबडतोब शामरावच्या ओरडण्याचा आवाज ऐकूं येतो. काहीं वेळानं शामराव लंगडत प्रवेश करतो, व त्याच्यामागे विकास पिस्तूल घेऊन येतो. )
विकास : (हसत) शामराव, सांगितलं होतं मी तुम्हांला, मला पिस्तूल चालवतां येतं. आणि फक्त चालवतां येतं एवढंच नाहीं तर हवा तिथं नेमदेखील धरतां येतो. तुमच्या पायावर नेम धरला कारण मला तुम्हांला मारायचं नव्हतं, फक्त थांबवायचं होतं.
( इन्स्पेक्टर शामरावच्या व राणेच्या हातात बेड्या अडकवतो. )
इन्स्पेक्टर : शाबास मुला, तू खरोखरच कमाल केलीस.
विकास : इन्स्पेक्टरसाहेब, मी एकट्यानंच नाहीं, माझ्या या इतर मित्रांनीं सुद्धां.
इन्स्पेक्टर : (त्यांच्याकडे रोखून पहात) मान्य आहे मला, यांनी तर खरोखरच कमाल केली.
अजय : इन्स्पेक्टरसाहेब, मघाशी आम्हीं तुम्हांला कैद केलं त्याविषयीं म्हणात असाल, तर सॉरी. आम्हांला माफ करा. तो सगळा प्लॅन माझा होता.
अभय : आम्हांला तुमची अडचण नको होती. सर्व रहस्य आम्हांला स्वत:च सोडवायचं होतं.
इन्स्पेक्टर : पण तसं करण्यांत धोका होता.
विकास : जाणीव होती आम्हांला त्याची. पण ही ना ती भानगड करायला आम्हीं नेहमींच उत्सुक असतो.
इन्स्पेक्टर : (हसत) शाबास, बरेच साहसी आहात तुम्हीं सगळेजण. यापुढे मला कधी गरज लागलीच तर तुमचीच आठवण करीन मी.
सर्वजण : (आनंदाने ओरडून) खरंच? वचन द्या पाहूं.
इन्स्पेक्टर : वचन. पण एका अटीवर. आता तुम्हीं वचन द्या पाहूं.
रेखा : कबूल. कसलं वचन?
इन्स्पेक्टर : सगळं काम स्वत: करून माझ्या नोकरीवर गदा आणूं नका म्हणजे झालं.
सर्वजण : कबूल. दिलं वचन.
इन्स्पेक्टर : (शामरावकडॆ वळून) मंडळी, आपण आज संध्याकाळच्या गाडीनं मुंबईला जाणार आहोत. तिथली मंडळी तुम्हांला भेटायला बेचैन झाली असेल. तयारी आहे ना?
शामराव : इन्स्पेक्टर, या क्षणाला तुम्हीं न्याल तिथं यायची तयारी आहे माझी. पण सांगून ठेवतो, मला तुम्हीं जास्त वेळ आत ठेवूं शकणार नाहीं.
इन्स्पेक्टर : माहीत आहे मला. तुम्हां स्मग्लर लोकांचे आतबाहेर खूप कॉण्टॅक्टस असतात, ठाऊक आहे मला. पण तें नंतर बघूं. आतांपुरती तुमच्या नांवानं एक खोली रिझर्व आहे. आणि मुलांनो, चला, तुम्हांला मी माझ्या गाडीनं घरीं सोडतो.
सर्वजण : चला.
( आधी शामराव व राणेला घेऊन इन्स्पेक्टर बाहेर जातो, त्यानंतर इतर मुलें जातात. थोडावेळ स्टेज रिकामं असतं. मग विकास धावत परत येतो व पलंगावर पडलेली बाहुली उचलतो. )
इन्स्पेक्टर : (बाहेरून) विकास, आता काय राहिलं?
विकास : जिच्यामुळे सगळी भानगड निर्माण झाली ती सोन्याची बाहुली इथंच राहिली होती ती घ्यायला आलो मीं.
( इतक्यांत बाहेरून वनिता धावत येते व दुसरी बाहुली उचलते. )
वनिता : ही बाहुली त्या माणसानं मला घ्यायला सांगितलं होतं. आठवतंय ना? आतां चल.

( विकास व वनिता दोन्हीं बाहुल्या घेऊन बाहेर जातात. )

* * * * * पडदा पडतो * * * * *
( तिसरा अंक व नाटक समाप्त )

लक्ष्मीनारायण हटंगडी
EC51/B104, Sai Suman CHS,
Evershine City, Vasai (E)
PIN 401208
(suneelhattangadi@gmail.com)

No comments:

Post a Comment