( सातवी किंवा आठवीचा वर्ग. पडदा वर जातो तेव्हा वर्गात नुसता गोंधळ माजलेला असतो. वर्गाचा मॉनिटर, पाठारे, ओरडून सर्वांना शांत करायचा प्रयत्न करीत असतो, पण बिचार्याकडे कुणाचंच लक्ष नसतं. शेवटी सर्वांच्या आवाजावर ताण करून व डस्टर जोरात टेबलावर आपटून ... )
पाठारे : गप्प!
मुलें : पाठारे, तू गप्प!
पाठारे : जास्त गडबड केलीत तर फळ्यावर नांव लिहून सरांकडे तक्रार करीन. हां, सांगून ठेवतो. मग पेन-पेन्सील द्या, चॉकलेट द्या, काय हवं ते करा, मुळीच दया करणार नाही.
सोहोनी : जारे, आलायस मोठा नांवं लिहिणारा! काय शामत आहे सरांसमोर जायची?
मलुष्टे : हो ना. याची काय शामत लागून गेलीय? काल देखील असंच म्हणत होता. मग मधल्या सुटीत माझ्याबरोबर कॅण्टीनला येऊन माझी धुलाई केली.
पाठारे : चुप. गप्प बसा तिथं. कसली कुजबुज चाललीय?
वर्दे : साला, भाव काय खातोय बघ. सरांशी घरची ओळख निघाली म्हणून मॉनिटर झाला. आणि आज निघालाय मोट्ठा नांवं लिहायला!
पाठारे : ए वर्दे, लपून राहिलास बाकाखाली तरी आवाज ओळखतो तुझा. तू अन मी, दोघांनीहि दोन वर्षं काढलीयत या वर्गात.
( वर्गात जोराचा हंशा पिकतो, परत आरडाओरडा. )
पाठारे : वर्दे, गप्प हां, परत सांगतो साला, शिव्या द्यायचं काम नाही.
( पुन्हा वर्गात हंशा. )
पाठारे : काय, मस्ती चढली का रे तुम्हाला? हसायला काय झालं?
राव (बारीक आवाज) : सर, सर, मी सांगू?
( पुन्हा हंशा. )
पाठारे : राव, सांग.
राव : सर, त्याचं असं झालं... असं झालं...
पाठारे : चिमण्या, लवकर सांग.
राव : त्याचं असं झालं की शिव्या देऊ नये असं तू दुसर्यांना सांगितलंस आणि स्वत:च शिवी दिली... साला.
(पुन्हा वर्गात जोराचा हंशा. )
पाठारे : (भडकून) ठीक आहे, ठीक आहे. कळलं. तुला चोंबडेपणा करायला कुणी सांगितलं?
राव : तू विचारलंस म्हणून सांगितलं, नाहीतर मला काय गरज तुला सुधारायची?
पाठारे : च्योप, आज फळ्यावर पहिलं नाव तुझं. (फळ्यावर नाव लिहितो -- विनोद राव ... गडबड) आणि तू बाकावर उभा रहा.
राव : नाही उभा रहाणार बाकावर जा. मी काहीच केलेलं नाही. आपण नाही घाबरत सरांना.
भेंडे : इज़्ज़त ... इज़्ज़त! लाज काढली मॉनिटरची. काय पाठारे, तुझ्या शब्दाला एवढीच इज़्ज़त?
पाठारे : ए भेंडीगवारी, तुला मध्ये तोंड घालायची गरज नाही. वर्दे, बर्या बोलाने उभा रहा.
वर्दे : ए पाठारे, मी काय केलं? चूक रावची आणि नाव माझं घेतोस? छान!
सोहोनी : बरोबरच आहे. वर्दे रोजचा बकरा आहे ना त्याचा.
वर्दे : सोहोनी, श्याणपती करू नकोस. जास्त रुबाब दाखवलास तर परवाची ती गोष्ट सर्वांना सांगून टाकीन.
सोहोनी : सांगायला तोंड उघड तर खरा. तुझी बत्तीशी काढून तुझ्या हातात नाही दिली तर नावाचा सोहोनी नाही.
मुझुमदार : राहूं दे, राहूं दे. माहीत आहे सर्वांना तुझे वडील दातांचे डॉक्टर आहेत ते. म्हणून काय ऊठसूठ दात पाडायची धमकी द्यायची?
सोहोनी : आणि माहीत आहे तुझे वडील हवेत बंदूक उडवतात ते.
मुझुमदार : माहीत आहे तर काल घाबरलास कशाला एवढा?
भेंडे : कधी रे?
मुझुमदार : अरे, बाबांनी मारलेल्या वाघाचं नुसतं कातडं टांगलेलं पाहून याने किंचाळी फोडली.
भेंडे : पण तो वाघ तुझ्या बाबांनी नव्हता मारला. तुझ्या काकांनी मारला होता. उगीच बंडला ठोकू नकोस.
मुझुमदार : काकांनी मारला म्हणून काय झालं? काका तरी माझेच ना? शिवाय कातडं सुद्धा आमच्याकडेच आहे ना? आणि सोहोनी घाबरालाच ना?
सोहोनी : (हसायचा प्रयत्न करीत) हॅट, मी कधी कुणाला घाबरत नाही. ती नुसती ऍक्टींग केली मी.
भेंडे : मोठा शाहरूख खानच लागून गेलास की नाही?
पाठारे : सगळेजण गप्प बसा. राव, परत सांगतोय, बाकावर उभा रहा. नाहीतर...
राव : नाहीतर काय करशील रे तू? (वेडावून दाखवतो.)
वर्दे : आणखी काय करेल? घरी जाऊन धाकट्या भावाला पलंगावर उभा करेल. मला माहीत आहे ना?
पाठारे : वर्दे, आता मात्र तू सुद्धा वर उभा रहा. म्हणजे बाकावर उभा रहा. व राव, तू सुद्धा बाकावर.
( राव व वर्दे पुन्हा पाठारेला वेडावून दाखवतात. पाठारे त्यांना पकडायला धावतो. खूपशा धावपळीनंतर पराभव पत्करून पाठारे पुन्हा फळ्याजवळ जातो. )
पाठारे : वर्दे, तुझं नावसुद्धा लिहितो आता. अन दोघांच्याही नांवापुढे दोनदोन फुल्या. (फळा पाहून) आं, ही भंकस कुणी केली? फळ्यावरचं नाव कुणी पुसलं?
( वर्गात शांतता. थोड्या वेळाने)
दिघे : मला माहीत आहे.
पाठारे : सांग, कुणी पुसलं.
दिघे : माहीत आहे, पण सांगणार नाही.
पाठारे : सांगावंच लागेल.
दिघे : बिलकुल नाही सांगणार .... कारण नाव मीच पुसलं.
पाठारे : शंका होतीच मला. आता तुझं नाव देखील फळ्यावर.
दिघे : खुश्शाल लिही. आपण नाही घाबरत. शेवटी करून करून करणार काय मास्तर? दोन छड्या वाजवतील अन म्हणतील -- (सरांची नक्कल करीत) दिघ्या, वर्गाबाहेर चालता हो. (परत) सवय आहे मला याची.
( वर्गात हंशा. )
पाठारे : हसणं बंद. अगदी गप्प बसा. नाही तर सबंध वर्गाला उभं करीन.
देवधर : जारे, दोन मुलांना उभं करताना फाटते अणि म्हणे सबंध वर्गाला उभं करणार?
पाठारे : अहो, कुंभकर्ण, तुमच्याशी बोललं नाही कुणी. तुम्ही झोपा शांतपणे.
( वर्गातला हंशा ओसरल्यावर... )
देवधर : हॅं, झोपलो नव्हतो काही मी. जराशी डुलकी लागली होती. पण तुझी सगळी फजिती पहात होतो मी.
देसाई : गेली नाही वाटतं झोप अजून? पुरी पडत नसेल झोप घरी.
पाठारे : म्हणजे घरीदेखील झोपतो हा?
देसाई : हो ना. आठ-आठ वाजेपर्यंत लोळत असतो पलंगावर. मला विचार.
सोहोनी : त्याच्या पलंगावर तू काय करत होतास रे? I mean, तुला कसं माहीत असं विचारायचं होतं मला.
देसाई : परवां शाळेत नव्हतो आलो ना मी. म्हणून अभ्यास घ्यायला याच्या घरी गेलो होतो. पाहिलं तर हा मस्तपैकी लोळत होता पलंगावर.
देवधर : राजन, घरच्या गोष्टी बाहेर फोडायला कुणी हक्क नाही दिला तुला. स्वत: शाळेला दांड्या मारून पिक्चर बघायला जातोस आणि अभ्यास घ्यायला मात्र माझ्याकडॆ? आणि तू आलास तेव्हा झोपलो नव्हतो मी. जरासं डोकं दुखत होतं म्हणून नुसता पडलो होतो.
काही मुलें : (ओरडून) दांडी... दांडी.
देसाई : त्यात काय झालं? बाबानी सुद्धा sick leave घेतली होती. शेवटचा दिवस होता पिक्चरचा.
राव : कोणतं पिक्चर?
देसाई : अल्लादीन.
राव : अरे, तो तर नुकताच लागला. शेवटचा कसा?
देसाई : त्याचा पहिला आठवडाच त्याचा शेवटचा आठवडा होता.
काही मुले : (ओरडून) कसा होता रे पिक्चर?
राव : अरे, म्हणाला ना तो, त्याचा पहिला आठवडाच शेवटचा होता म्हणून. कळत नाही यावरून?
देवधर : त्यापेक्षा एखादा इंग्रज़ी पिक्चर पाहिला असतास तर?
मुझुमदार : पाहिला असता रे इंग्लीश पिक्चर, पण बिचार्याला इंग्लीश समजायला पाहिजे ना?
देसाई : समजतं. तुझ्यापेक्षा चांगलं समजतं. हवं तर तुला शिकवीन. मी सुद्धा पाहिलेत म्हटलं इंग्रजी सिनेमे.
मुझुमदार : हो, पाहिलेत हं त्याने इंग्रज़ी सिनेमे. Tom And Jerry, Donald Duck वगैरे.
देसाई : इतरही बरेच पाहिलेत. फार कठीण नसतात समजायला. साधं ए, बी सी डी न येणार्याला देखील समजू शकेल. मुझुमदार, तुला सुद्धा समजू शकतील.
मुझुमदार : (संतापून) म्हणजे तुला काय म्हणायचंय, मला इंग्लीश येत नाही?
पाठारे : च्योप बसा सगळेजण. ए देसाई, एक विचारू?
देसाई : तुला इंग्लीश येतं का म्हणून?
पाठारे : मला एकदा पास आणून दे ना इंग्लीश पिक्चरचा. तुझ्या बाबांना मिळतात ना फुकटचे पास? यापुढे कधीच नांव लिहिणार नाही तुझं फळ्यावर.
देसाई : नक्की? Promise?
पाठारे : God promise. नाही लिहिणार.
देसाई : ठीक आहे. मी बाबांना सांगेन पास आणायला.
( सगळेजण ओरडायला लागतात, "मला हवा पास". पाठारे टेबलावर डस्टर आपटतो. )
पाठारे : मी वर्गाचा मॉनिटर आहे. पास आधी मलाच मिळणार.
सर्व मुले : पक्का स्वार्थी आहे लेकाचा.
( पाठारे टेबलावर डस्टर आपटतो. काहीवेळ शांतता. नंतर कुजबुज, हळूहळू गलका आणि शेवटी एका कोपर्यातून कुणीतरी ओरडल्याचा आवाज. )
पाठारे : कायरे पटवर्धन, बोंबलायला काय झालं?
पटवर्धन : साल्या कोळश्याने पेन्सील टोचली.
पाठारे : कायरे काळे, पेन्सील का टोचलीस याला?
काळे : खोटारडा आहे हा पटवर्धन. माझ्या हातात पेन्सील तरी आहे का बघ. पेन्सील टोचली ती या गोरेने.
पाठारे : गोरे, तू टोचलीस पेन्सील पटवर्धनला?
गोरे : काळेनेच सांगितलं मला. आणि हा शाईचा डाग बघ काळेने लावलाय त्याच्या पाठीवर.
पटवर्धन : म्हणजे पेननं लिहीलंय की काय याने माझ्या शर्टावर?
माने : (पटवर्धनचा शर्ट पहात) लागली वाट. चक्क ४२० असं लिहीलंय इथं.
काळे : मी फक्त बेचाळीस म्हणजे चार आणि दोन लिहीलं होतं. शून्य गोरेचं आहे.
गोरे : हे सुद्धा काळेनंच सांगितलं मला.
मुझुमदार : हे उत्तम आहे. काळ्या सांगतो, "बैला, असं कर ..."
सोहोनी : आणि हा गोर्या बैलोबा म्हणतो, "होयबा..."
( सगळेजण हसतात. लगेच डस्टर आपटल्याचा आवाज. परत थोडी शांतता. )
पटवर्धन : माने, हे तुझ्या शर्टावर बघ.
माने : (हात कॉलरकडॆ नेत) आँ, ही चिट्ठी कुणी चिकटवली?
भेंडे : काय लिहीलंय वाच.
माने : (वाचीत) "हे गाढव विकणे आहे."
भेंडे : मग चूक काय लिहीलंय त्यात?
माने : शुद्ध माकडचेष्टा आहे ही.
मंकड : (एकदम उसळून) ए माने, मान तोडून टाकीन हाँ, सांगून ठेवतो. मी नव्हतं लिहीलं ते.
वर्दे : मंकड, चोराच्या मनात चांदणे.
मंकड : (वर्देची मान पकडून) वरद्या, तोंड वर करून बोलू नकोस. एक फुंकर मारली ना तर उडून जाशील कुठच्या कुठे. अंगात नाही काडीचा दम अन रुबाब केवढा दाखवतोस?
( पुन्हा गडबड... डस्टरचा आवाज ... थोडीशी शांतता ... )
मुंगे : (दाराकडे उभा) ए, सर्वांनी गप्प बसा. राजे सर येत आहेत.
( वर्गात अचानक विलक्षण शांतता पसरते. नंतर हळूच हसण्याचा आवाज येतो. )
मुंगे : कसं मस्त फसवलं सार्या वर्गाला?
पै : कोण मुंगे ना? वाटलंच मला. असला वात्रटपणा मुंगेशिवाय कुणीच करत नाही.
मुंगे : पै, चुप बस. असला सभ्यपणाचा आव सुद्धा तुझ्याशिवाय कुणीच आणत नाही. साधं क्रिकेट देखील खेळता येत नाही.
( एकदम मधल्या बाजूने आवाज येतो, "सिक्सर!" )
पाठारे : कुणी मारली सिक्सर?
खानोलकर : मी, खानोलकरने. या मलुष्टेच्या बॉलला.
मलुष्टे : आणि सहा विकेट्स घेतल्या ते पण सांग ना.
पाठारे : काय चाललंय काय तुमचं तिथं?
खानोलकर : वहीवरचं क्रिकेट. काय धमाल येते म्हणून सांगू? एकशे पन्नासला सहा.
मलुष्टे : सगळ्या विकेट्स मी घेतल्या. भारत विरुद्ध पाकिस्तान टेस्ट मॅच चाललीय आमची.
सोहोनी : उद्या टेस्ट सुरू होणार आहे ना. जाणार आहेस का?
मलुष्टे : काय साला प्रश्न आहे? शंभर टक्के जाणार म्हणजे जाणार. मी आणि माझा. हज़ाराचं तिकीट काढलंय महाराजा.
सोहोनी : सॉलीड गर्दी होती. तिकीटच मिळालं नाही.
वर्दे : जणू काही मिळालं असतं तर काढलंच असतं नाही?
सोहोनी : अलबत काढलं असतं. समजतोस काय मला? पण काही हरकत नाही. तिथं जाऊन धक्के खाण्यापेक्षा घरी बसून टीव्ही वर बघणार आपण. प्रत्येक angleमधून पहायला मिळतं. शिवाय, हवं तेव्हा replay करता येतं.
भेंडे : ए मलुष्टे, दांडी मारणार आहेस?
मलुष्टे : मारावीच लागणार. नाहीतर हज़ार रुपये फुकट जाणार.
मुझुमदार : माझे बाबा ना अगदी आगाऊ आहेत. मला म्हणतात की दांडी नाही मारायची. पण स्वत: मात्र sick leave घेतलीय.
मलुष्टे : पण ही सिस्टीम आपल्याला नाही बुवा पटत. पाच दिवस शाळा बंद ठेवली असती तर काही बिघडलं असतं का? उगीच दांडी मारावी लागणार.
खानोलकर : आणि टीव्ही वर live बघायची म्हटली तर ते देखील जमणार नाही. साला अर्धा दिवस सुद्धा रजा नाही.
राव : आपल्या टीममधून कोण खेळणार?
मंकड : काही सांगता येत नाही हल्ली. प्रत्येक मॅचला बदलत असते टीम. ते काय ते I.P.L. वगैरे सुरू झाल्यापासून गल्लीबोळातल्या सगळ्या खेळाडूंना चान्स मिळायला लागलाय.
पटवर्धन : टीम announce झाली केव्हाच. फक्त एकच नवीन आहे. बाकीचे बहुतेक सगळे second hand आहेत.
पै : पण गांगुलीला बसवलं ते ठीक नाही केलं. अजूनही काय सॉलीड फ़ॉर्म मध्ये खेळतो तो!
तेलंग : एवढा गंभीर होऊ नकोस रे. गंभीर आहे ना टीममध्ये. माझा दादा ओळखतो त्याला. खूप जणांना autographs आणून दिलेत त्याने.
राव : ए तेलंग, मला आणून देशील autographs? मी माझी वही आणून देईन तुला.
तेलंग : पक्कं autograph book पाहिजे हं. साध्या वह्यांवर सह्या देत नाहीत ते. सॉलीड भाव खातात.
राव : मी आणून देईन ना कोरं नवीन autograph book.
तेलंग : मग मी देईन सही.
राव : तुझी सही नकोय हं मला. (हंसतो.)
खानोलकर : मूर्ख आहात सगळे. उगीच खेळ खराब केलात आमचा.
मलुष्टे : चल रे, खानोलकर. आपला खेळ continue करूया.
तेलंग : (फळ्याकडॆ पाहून) ए पाठार्या, आमची नावं का लिहिलीस?
पै : आणि माझं सुद्धा?
पाठारे : गप्प बसा म्हणून सांगितलं तरी बोलत कशाला होतात?
तेलंग : पण आम्ही गप्पा नव्हतो मारत.
पै : क्रिकेटबद्दल बोलत होतो आम्ही. क्रिकेट national game आहे आपला. काही राष्ट्राभिमान म्हणून आहे की नाही?
देवधर : पण त्यासाठी ओरडून सगळ्या राष्ट्राला जागं करायची गरज नव्हती काही.
पाठारे : अहो, मिस्टर कुंभकर्ण, तुला उठवायला नव्हते ते ओरडत. तू झोप परत.
देवधर : ए पाठारे, तुला नव्हतं सांगितलं मी.
पाठारे : उगीच फालतू बडबड करण्यापेक्षा थोडी प्रॅक्टीस करा. उद्या टेस्ट आहे आपली.
सोहोनी : टेस्ट आहे त्यासाठी प्रॅक्टीस कशाला करायला हवी? टेस्ट खेळणारे खेळाडू सुद्धा प्रॅक्टीस करत नाहीत. आपण कशाला करायला हवी?
पाठारे : अहो, क्रिकेटप्रेमी, मी त्या स्टेडियमवरच्या टेस्टची गोष्ट करत नाही. शाळेतल्या टेस्टविषयी बोलतोय मी.
मंकड : लागली वाट! मी तर एकाही पुस्तकाला हात लावलेला नाही अजून.
पै : मग पुस्तकालाहि हात लावा. आणि जरा वर्गात लक्ष द्या. सारखं बाहेर बघत असतोस. एवढं काय interesting आहे तिथं?
एक आवाज : मुलींची शाळा.
( वर्गात हंशा. )
मंकड : सांग ना, पै. कोणत्या विषयाची टेस्ट आहे उद्या?
वर्दे : मंकड, त्याला काय विचारतोयस? त्याचं लक्षसुद्धा बाहेरच असतं.
पै : (भडकून) मग तू सांग ना. तुझं लक्ष असतं ना वर्गात?
वर्दे : असतंच मुळी. उद्या आहे मराठी आणि गणित.
मुंगे : म्हणजे मंकड साफ मेला.
मंकड : काही मेलो नाही. तसा माझा अभ्यास झालाय.
राव : म्हणजे गोडबोलेचा पहिला नंबर गेलाय.
सोहोनी : काही जात नाही गोडबोलेचा नंबर. मूळचाच स्कॉलर आहे तो. रटावं लागत नाही त्याला.
देसाई : साला, काय भाव खातोय बघ. इतकी स्तुति केली पण पुस्तकातून डोकं वर काढेल तर शपथ.
गोडबोले : (पुस्तकातून डोकं वर काढून बघत) ए, मला टपली कुणी मारली?
देवधर : मी नाही हं मारली.
गोडबोले : कशाला उगीच त्रास देता मला? मी कधी जातो का तुमच्या वाटेला?
( गोडबोले, पुन्हा पुस्तकात डोकं खुपसतो. पुन्हा एक जोराची टपली बसते. गोडबोले वर बघतो. )
देवधर : गोडबोले, आता खरोखरच मी नाही मारली. या वर्देने मारली.
गोडबोले : ए वर्द्या, उद्या परीक्षा आली आपली. प्लीज़, मला थोडा अभ्यास करूं दे.
वर्दे : केव्हापासून अभ्यास करतोयस. थोडा काय, थोडा जास्तच झाला.
मुझुमदार : अजून जास्त अभ्यास करायचा असेल ना, तर वर्गाबाहेर जाऊन कर. सर येईपर्यंत जरा पुस्तक मीट व आमच्याबरोबर धमाल कर. सर नसताना अभ्यास करायचा नसतो, धम्माल करायची असते.
( गोडबोले नाईलाजाने पुस्तक मिटतो आणि आजूबाजूला पहात बसतो. )
पाठारे : (ओरडून) आता कुणा शहाण्याने माझ्यावर हा खडू मारला?
पै : शहाण्याने मारला असेल तर नक्कीच वर्देने नाही.
वर्दे : आणि शहाण्याने मारला नसेल तर नक्कीच पैने मारला खडू. नाहीतरी खडूसच आहे तो.
पाठारे : हे बघा, हळूहळू तुम्ही गुद्दागुद्दीवर जाणार. त्यापेक्षा आधीच चुप बसा.
पै : हे बघ, मी मारामारी केली तरी वर्देच्या अंगात दम असायला हवा ना?
वर्दे : (बाह्या सरसावून) बघायचाय माझा दम? एक झापड दिली ना तर लंडनला जाऊन पडशील.
तेलंग : लंडन कुठे आहे ते साधं नकाशात सुद्धा दाखवता येणार नाही या वर्द्याला. म्हणे लंडनला पाठवतो.
वर्दे : तेल्या, माझा भूगोल कच्चा आहे म्हणून चिडवू नकोस हं मला. माझं गणित नक्कीच तुझ्यापेक्षा बरं आहे. इतके रट्टे मारीन तुला की मोजायची सुद्धा गरज लागणार नाही. आधी बे चा पाढा म्हणायला शीक.
तेलंग : स्वत:वरून जग ओळखू नकोस तू. पाच नी दोनची बेरीज आठ सांगणारा तू, मला गणित शिकवायला निघालास?
पै : तेलंग, सरांकडून आधी पेपर फुटला तरी फक्त पासापुरते मार्क मिळत नाहीत तुला. वर्दे नक्कीच शिकवू शकेल तुला.
देवधर : ए घुबड, दल-बदलू, मघाशी भांडत होतास वर्देबरोबर आणि आता त्याची बाजू घेतोस?
वर्दे : ए तेली, मित्र आहोत आम्ही. काय हवं ते करूं. एकमेकांच्या गळ्यात पडू किंवा एकमेकांचे गळे कापू.
पाठारे : (वैतागून) हे बघा, अगदी शेवटचं सांगतोय सगळ्यांना. पुन्हां वर्गात गडबड केलेली आढळली तर सरळ जाऊन दातार सरांना बोलवून आणीन.
मुझुमदार : मी पण पुन्हा सांगतो, न टरकता प्रिंसिपल सरांसमोर जाऊन उभा जरी राहिलास तरी काय वाट्टेल ते देईन. बघूच तुझी हिम्मत.
पाठारे : मुझुमदार, सांगून ठेवतो, जास्त आवाजी नको. ठोकून काढीन.
मुझुमदार : बघूयाच ना. खूप पाहिले ठोकून काढणारे. आधी पकडून तर दाखव. ठोकणं नंतर.
( भडकून पाठारे मुझुमदारच्या पाठी धावतो. थोड्या धावपळीनंतर... )
दिघे : मुंगे, आता मात्र खरोखरच सर आले.
मुंगे : पाठारे, खरोखरच राजे सर येताहेत. मी माझ्या स्वत:च्या डोळ्यानी पाहिलं.
पाठारे : साल्या, तू आपल्या डोळ्यांनी नाही पाहणार, तर काय माझ्या डोळ्यांनी? पण माझी वाट लागली ना? मी स्वत: मॉनिटर असून तुमच्याबरोबर मस्ती केलेली सरांनी पाहिली तर ते मला काय म्हणतील? आणि मी त्यांना काय उत्तर देऊ?
मुझुमदार : सांग सरांना, आपण वेगळे नाही. हम हैं पंछी एक डालके!
देवधर : म्हणारे सगळेजण, "हम पंछी एक डालके!"
सर्वजण : (एकत्र ओरडून) "हम पंछी एक डाल के... एक डाल के!"
( दारात राजे सर उभे दिसतात. पाठारे वैतागून डोक्यावर हात मारतो. हळूहळू पडदा पडायला लागतो. )
Thursday, June 24, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment