Thursday, June 24, 2010

शाळा नावाचा आरोपी!

( एक मोकळी जागा. याला कसल्याहि सजावटीची गरज नाही. पडदा वर जातो तेव्हा स्टेजवर काही मुलांचा घोळका दिसतो. भलताच गोंगाट माजलेला आहे आणि कुणाचं कुणाला ऐकू जात नाही. जरा वेळाने एका मुलाचा आवाज इतर आवाजांपेक्षा जास्त चढतो. हा आवाज देशपांडेचा ... )
देशपांडे : ऑर्डर, ऑर्डर... (जराशी शांतता. गडबड चालू. परत ...) ऑर्डर, ऑर्डर.
जोशी : दोन प्लेट बटाटेवडे अन एक कप चहा!
( जोराचा हंशा )
देशपांडे : (ओरडून) मी म्हटलं, ऑर्डर. ऑर्डर.
खाडिलकर : ए शहाण्या, एकदा दिली ना ऑर्डर. अजून किती घेशील ऑर्डर? (परत हंशा)
देशपांडे : अरे, जरा शांतता राखा ना.
सोनावणे : का म्हणून? शिक्षक वर्गात नसताना गडबड करणं हा आम्हा विद्यार्थ्य़ांचा जन्मसिद्ध हक्कच आहे.
देशपांडे : विसरलात वाटतं? आज शाळा नावाच्या आरोपीला कोर्टात हज़र करायचं आहे.
कुलकर्णी: असेल. पण अजून आरोपी हज़र नाही. शिवाय तू अजून जज्ज देखील झालेला नाहीस.
देशपांडे : पण तयारी नको वाटतं करायला? हे सगळं करायला किती वेळ लागतो, माहीत आहे? माझे बाबा मोठ्या कोर्टात जज्ज आहेत म्हटलं. अन आपली काहीच तयारी झालेली नाही.
जोशी : आधी ही सारी गर्दी इथून हलवावी लागेल. चला मंडळी, कोर्ट रिकामं करा.
देशपांडे : खरं आहे. आधी निवडलेली सात-आठ मुलं सोडून बाकीची मुलं इथं नकोयत.
१ मुलगा: तुमचं आपलं दरवेळी अस्संच असतं.
२ मुलगा: अगदी ठराविक मुलंच निवडलेली!
३ मुलगा: आम्हाला कधी चान्‍सच मिळत नाही.
जोशी : अस्स कसं म्हणतोस? तुम्हाला पण काम दिलंय की! सर्वांत महत्वाचं काम. कोणतंही कोर्ट प्रेक्षकांशिवाय पूर्ण होत नसतं. तुम्ही प्रेक्षकांची भूमिका करा.
४ मुलगा: म्हणजे नक्की काय करायचं?
देशपांडे : तू अगदी मूर्ख आहेस बघ. प्रेक्षकांनी योग्य त्या वेळी शिट्ट्या मारायच्या, हंसायचं, टाळ्या पिटायच्या अन गोंगाट करायचा.
५ मुलगा: मग?
देशपांडे : (वैतागून) मग डोसकं माझं. अरे, तुम्ही गोंगाट केला नाही तर मी "ऑर्डर, ऑर्डर" म्हणून कुणावर ओरडणार? (गोंगाट सुरू) ऑर्डर, ऑर्डर. (शांतता) वाट्टेल त्या वेळी नाही. फक्त योग्य वेळी. मी सांगेन तेव्हांच.
जोशी : किंवा मी ...
सोनावणे : ...किंवा मी.
देशपांडे : ऑर्डर, ऑर्डर. आता सर्वजण खाली जाऊन बसा. आणि आपापल्या भूमिका सुरू करा.
१ मुलगा: म्हणजे गोंगाटच ना? सोप्प आहे. हा चाललो.
( सहा-सात मुलांखेरीज़ सर्वजण खाली जाऊन बसतात. आता यांचं काम केवळ योग्य वेळी गोंगाट करणं एवढंच. )
जोशी : ए जाड्या देशपांड्या, सारं सामान कुठं आहे?
देशपांडे : ए जोश्यापोश्या, जरा नीट बोलायला शीक ना. आता जज्ज आहे मी. लक्षात आहे ना? नाहीतर तुला आपलं हे असलं उलटंसुलटं बोलायची सवयच होवून जाईल.
जोशी : सॉरी, चुकलो बाबा. तसं मला सगळं माहीत आहे! तुझ्याशी बोलताना "My Lord" असं म्हणायचं. बरोबर?
देशपांडे : बरोबर. बरं, फिर्यादी कोण होणार आहे?
खाडिलकर: फिर्यादी म्हणजे?
देशपांडे : एवढं साधं कळत नाही? फिर्यादी म्हणजे ... म्हणजे...
कुलकर्णी : एवढं साधं कळत नाही? फिर्यादी म्हणजे जो फिर्याद करतो, तो.
खाडिलकर: पण फिर्याद म्हणजे काय?
सोनावणे : एवढं साधं कळत नाही? फिर्याद म्हणजे फिर्यादी करतो ती.
खाडिलकर: पण म्हणजे काय ते सांग ना.
जोशी : शरमेची गोष्ट आहे. लेको, इंग्रज़ी माध्यमातून शिकत असलात म्हणून काय झालं? एवढा साधा शब्द कळत नाही? आणि ते सुद्धा महाराष्ट्रात राहून? विसरूं नका, "मराठी असे आमूची मायबोली". फिर्याद म्हणजे complaint. आणि फिर्यादी म्हणजे complaint करणारा. कळलं?
सोनावणे : एवढं साधं कळत नाही?
खाडिलकर : कळलं. पण मग आधीच नाही का सांगायचं?
देशपांडे : बरं बरं. फिर्यादी कोण आहे?
सोनावणे : आरोपी कोण आहे सांग पाहू.
देशपांडे : शाळा. म्हणजेच आपले शिक्षक.
सोनावणे : मग? एवढी साधी गोष्ट कळत नाही? सगळे विद्यार्थीगण फिर्यादी आहेत. सरांविरुद्ध सर्वांच्याच तक्रारी आहेत. (प्रेक्षकांना) काय मित्रांनो, खरं ना? (प्रेक्षकांतून "होहो"चा ओरडा ऐकू येतो.)
देशपांडे : ऑर्डर, ऑर्डर. सगळेजण फिर्यादी होऊन चालणार नाही. फिर्यादी एकच हवा. बाकीचे हवेतर साक्षीदार व्हा.
खाडिलकर : मी फिर्यादी होतो. माझ्या शिक्षकांविरुद्ध सॉलीड तक्रारी आहेत.
कुलकर्णी : मी होतो साक्षीदार.
परांजपे : मी सुद्धा.
जोशी : अरे परांजप्या, तू होतास कुठे इतका वेळ?
परांजपे : इथंच होतो. पण गप्प होतो. कालच्या निवडणुकीच्या मिरवणुकीत किंचाळून किंचाळून घसा दुखत होता.
जोशी : कुठल्या पार्टीसाठी बोंबलत होतास?
परांजपे : जिथं खायला-प्यायला मिळत होतं त्यांच्या बाजूने. खराखुरा नेता बनायची प्रॅक्टीस करत होतो आतापासून.
जोशी : ठीक आहे. फिर्यादी झाले, साक्षीदार झाले. आता?
देशपांडे : फिर्यादीचा वकील कोण होईल?
सोनावणे : मी होतो.
देशपांडे : माहीत आहे ना कसं बोलायचं ते?
सोनावणे : चांगलंच माहीत आहे. (घसा खांकरून मोठ्याने) मी लॉर्ड...
जोशी : ओ लॉर्ड! मी लॉर्ड नव्हे. माय लॉर्ड म्हण.
सोनावणे : गप्प. मला शिकवू नकोस. मी बर्‍याच सिनेमांतून पाहिलंय, तसं म्हणायची फॅशन आहे. (परत घसा खांकरून) मी लॉर्ड, मी आईरक्ताची शपथ घेवून सांगतो ...
जोशी :(कपाळावर हात आपटून) आईशप्पथ हा सोनावण्या वाट लावणार. अरे मूर्खा, कोर्टात कधी आईरक्ताची शप्पथ नसते घ्यायची. कोर्टात घ्यायची असते ती गीतेची शप्पथ.
देशपांडे : च्यायला, बरी आठवण केलीस. गीता कुठे आहे?
खाडिलकर : फिरायला गेलीय. (देशपांडे रागाने बघतो.) सॉरी, सॉरी, मला वाटलं तू माझ्या बहिणीबद्दल विचारतोयस.
जोशी : गीता नाही मिळाली.
देशपांडे : पण जोश्या, तू कबूल केलं होतंस गीता आणीन म्हणून.
जोशी : हो, केलं होतं कबूल. पण त्यावेळी मला काय माहीत होतं की ऐनवेळी आई गीता उशीला घेवून झोपेल म्हणून. पण काही हरकत नाही. मी बाबांची ऑक्सफ़र्ड डिक्शनरी चोरून आणलीय. तीच वापरूं आपण कोर्टात गीता म्हणून.
देशपांडे : चलेगा. आता आरोपीचा वकील कोण होणार?
जोशी : तीच तर पंचाईत आहे. आरोपीचं म्हणजे शाळेचं वकीलपत्र घ्यायला कुणीच तयार नाही.
देशपांडे : जोश्या, मग तूच हो आरोपीचा वकील. अजून कोण राहिलं?
परांजपे : कोर्टात तो चोपदार का भालदार कोण असतो तो? लाल फेटेवाला. दर वेळी आरोळी ठोकतो, "हाज़ीर है?" अश्शी. ती कामगिरी आपण या गुप्त्याला देवूया. काय गुप्ते, तयारी आहे ना?
गुप्ते : तयारी आहे. फक्त आरोळी तर द्यायची, आणि काय करायचंय?
देशपांडे : पंख्याने मला वारा घालायचा.
गुप्ते : पंखा कुठे आहे?
देशपांडे : तोदेखील हा जोश्या विसरला. तू नुसती ऍक्शनच कर. (गुप्ते जोरजोराने हात हलवून पंखा घातल्याची ऍक्शन करतो.) ए गुप्त्या, आता ओरड, "फिर्यादी हाज़िर है?"
गुप्ते : (ओरडून) फिर्यादी हाज़िर है?
खाडिलकर : (उभा राहून) हो हुज़ूर, बंदा हाज़िर है. (हे ऐकून प्रेक्षकातून टाळ्यांचा गज़र होतो.) देशपांडे, मागे मी त्या औरंगज़ेबाच्या नाटकात काम केलं होतं ना, त्यावेळी बरोब्बर याच वाक्याला सॉलीड टाळ्या घेतल्या होत्या. अश्शा. त्याचा पुरावा हाज़िर है. (परत टाळ्यांचा कडकडाट होतो.)
देशपांडे : (पट्टी बाकावर आपटीत) ऑर्डर, ऑर्डर. (शांतता) साक्षीदार हाज़िर है?
दोघेजण : हाज़िर, हुज़ूर है... सॉरी, हुज़ूर, हाज़िर है.
देशपांडे : मग आता गैरहाज़िर व्हा. तुम्हाला बोलावलं की यायचं. (कुलकर्णी व परांजपे प्रेक्षकात जावून बसतात.) आरोपी हाज़िर है?
गुप्ते : देशपांडे, माझं आरोळी द्यायचं काम तूच केलंस तर मी काय बोंबलणार?
देशपांडे : दे आरोळी.
गुप्ते : जाऊंदे. आरोळी दिली असती, पण मला माहीत आहे ते कुठं आहेत ते. आपले आरोपी, म्हणजे, आपले शिक्षक स्टाफरूम मध्ये बसून मस्तपैकी चहा पिताहेत. आणि चहाबरोबर पुणेरी मिसळ.
देशपांडे : तू आरोळी द्यायचं काम कर. जास्त बोलायची गरज़ नाही.
गुप्ते : (ओरडून) हाज़िर है? (शांतता) परत हाज़िर है? (उत्तर नाही.)
सोनावणे : (उभा राहून) मी लॉर्ड... (जोशीचा हात कपाळाकडे जातो.) मी ... आईरक्ताची शपथ घेवून ... (लक्षात येवून जीभ चावतो. प्रेक्षकात हंशा.)
देशपांडे : ऑर्डर, ऑर्डर. (सगळेजण शांत)
सोनावणे : मी लॉर्ड, (जोशीकडे पाहून) हे सुद्धा चालतं. आरोपीला आधी सूचना देवूनसुद्धा आरोपीनं ऐन वेळी न्यायालयात. म्हणजे कोर्टात, गैरहज़र रहावं ही कोर्टाची तौहीन, म्हणजे अपमान आहे. कोर्टानं या गोष्टीची नोंद घ्यावी.
देशपांडे : नोंद केली जावी. नोंद केली गेली असं समजावं. (पटकन) पण हे साला भलतंच होत आहे. आरोपी नाही म्हणजे सगळी केसच फिसकटली. आता काय करायचं?
सोनावणे : मी लॉर्ड, किंवा हा जोशी म्हणतो तसं मायबाप काय असेल तें, लॉर्ड, आरोपीवरचा भयंकर गुन्हा लक्षात घेता आरोपीची गैरहज़ेरी जास्तच महत्वपूर्ण वाटते. तरी आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाला असं समजून आरोपीला शिक्षा सुनावली जावी.
जोशी : मी लॉर्ड... (चटकन जीभ चावून) माय लॉर्ड, ही फालतू सूचना आम्हास एकदम अमान्य आहे. या संदर्भात मी चोपदार श्रीयुत गुप्ते यांस साक्षीदार म्हणून उभं करण्याची परवानगी विचारतो.
देशपांडे : च्यायला, हे सगळंच उलटं चाललंय. आरोपी हज़र नाही, आणि साक्षीदारांच्या परेडीला मात्र सुरवात. चला ठीक है. परवानगी आहे.
जोशी : धन्यवाद.
गुप्ते : (ओरडून) साक्षीदार हाज़िर है? (काही वेळाने) हो, हाज़िर है. (पुढे होवून साक्षीदाराच्या खुर्चीजवळ उभा होतो.)
जोशी : (हातातली डिक्शनरी पुढे करून) शपथ घ्या.
गुप्ते : (डिक्शनरीवर हात ठेवून) चोरून आणलेल्या या ऑक्सफर्ड डिक्शनरीवर हात ठेवून मी शपथ घेतो की खरं कधी सांगणार नाही आणि खोट्याशिवाय दुसरं काही बोलणार नाही.
जोशी : ही कोर्टाची बेइज़्ज़ती आहे. नीट शपथ घ्या.
गुप्ते : राहिलं. मी या गीतेची शपथ घेवून सांगतो की फक्त खरं बोलेन.
जोशी : थॅंक्स. आरोपीचं नाव?
गुप्ते : प्रदीप कमलाकर गुप्ते...ऐं, चुकलं. अहो, आरोपीचे वकील, मी इथं साक्षीदार म्हणून उभा आहे, आरोपी म्हणून नव्हे.
जोशी : सॉरी. साक्षीदाराचं नाव?
गुप्ते : प्रदीप कमलाकर गुप्ते.
जोशी : तुम्हीं आरोपीला ओळखता?
गुप्ते : आरोपी, म्हणजे ही शाळाच ना? या जन्मठेपीच्या शिक्षेला कोण ओळखत नाही?
देशपांडे : (प्रेक्षकांना) अरे मूर्खांनो, असले काही विनोद निर्माण झाले तर हसायचं असतं. (हंशा. बाकावर पट्टी आपटून) ऑर्डर, ऑर्डर. (शांतता)
जोशी : मला माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर हवंय. तुम्ही आरोपीला, म्हणजे आपल्या वर्गशिक्षकाना, ओळखता?
गुप्ते : हो. चांगलंच ओळखतो.
जोशी : किती वर्षं?
गुप्ते : गेली सहा वर्षं. पाचवी ते आठवीपर्यंत.
जोशी : पाचवी ते आठवीपर्यंत म्हणजे फक्त चार वर्षं झाली.
गुप्ते : मी वर्गशिक्षकांना ओळखतो, पण तुम्ही मला ओळखत नाही. मी दोनदा एकेका वर्षात दोनदोन वर्षं काढलीयत.
( पुन्हा हशा, पुन्हा "ऑर्डर, ऑर्डर", पुन्हा शांतता. )
जोशी : तुम्ही आरोपीला शेवटी केव्हा पाहिलं?
गुप्ते : दहा-पंधरा मिनिटांपूर्वी.
जोशी : काय करताना?
गुप्ते : स्टाफ़रूममध्ये दुसरं काय करतात? एकतर भटाकडच्या चहाबरोबर मिसळ खाताना, किंवा आम्हां मुलांचं आयुष्य कसं अधिक खडतर बनवायचं याचं प्लॅनींग करताना.
जोशी : माय लॉर्ड, या महत्वाच्या गोष्टीची नोंद केली जावी.
देशपांडे : ए जोश्या, एक मिनीट थांब. तू मघापासून खर्‍या वकिलासारखं "याची नोंद केली जावी...त्याची नोंद केली जावी" म्हणतोयस खरा. पण इथं नोंद करायला आहे कोण? (प्रेक्षकांकडे पाहून) ए, तुमच्यापैकी कुणीतरी वही व पेन्सील घेवून इथं या. लवकर. (प्रेक्षकातून पाठारे हातात एक वही व पेन्सील घेवून येतो आणि एका कोपर्‍यात खुर्ची घेवून बसतो.) हं, काम पुढे चालूं द्या. ए पाठारे, मघाच्या गोष्टींची नोंद करून ठेव.
जोशी : मिस्टर गुप्ते, तुम्ही आपल्या भटाला ओळखता?
गुप्ते : हो.
जोशी : चांगलं?
गुप्ते : अगदी चांगलं. पाचवी ते आठवीच्या माझ्या सहा वर्षांच्या कारकिर्दींत.
( हंशा -- ऑर्डर, ऑर्डर, शांतता. )
जोशी : भटाबद्दल तुमचं काय मत आहे?
सोनावणे : (उभा राहून) युअर हॉनर... (जोशीकडॆ पाहून) अससुद्धां चालतं कोर्टात... युअर हॉनर, हा वादाबाहेरचा प्रश्न आहे. ऑब्जेक्शन.
जोशी : ऑब्जेक्शनवर ऑब्जेक्शन. आरोपी कोर्टात वेळेवर का हज़र राहू शकला नाही एवढंच आम्ही सिद्ध करू इच्छितो.
देशपांडे : नो ऑब्जेक्शन, म्हणजे objection over-ruled. पुढे.
जोशी : थॅंक यू. हां, तर मिस्टर गुप्ते, तुमचं आपल्या भटाबद्दल काय मत आहे?
गुप्ते : भिकार. आज दिलेली ऑर्डर उद्यापर्यंत मिळाली तर नशीब. व चहाची तर गोष्टच नको. तो घशाखाली उतरणं महा कठीण असतं.
जोशी : नोंद केली जावी. एकूण तुम्ही आरोपीला शेवटी पाहिलंत ते चहा पिताना?
सोनावणे : आरोपी पक्षाचे वकील नक्की काय सिद्ध करू पहात आहेत?
जोशी : एवढंच की जो चहा घशाखाली सुद्धा उतरत नाही तो चहा संपवून येताना आरोपीला थोडा उशीर होणं साहजिकच आहे.
गुप्ते : आता बस्स कर ना. ते बघ, सर आलेच. झगडाच खतम. जाऊ मी आपल्या जागेवर? (जोशी मान हलवतो, गुप्ते परत आपल्या जागेवर बसतो.)
देशपांडे : आरोपी हाज़िर है?
शिक्षक : (आत येत) हो, हाज़िर है.
देशपांडे : गुप्ते, सरांना आरोपीचा स्टॅण्ड दाखवा. (गुप्ते शिक्षकांना आरोपीच्या खुर्चीकडे घेवून जातो.) जोशी, आरोपी हज़र आहे.
जोशी : ऑब्जेक्शन. आरोपीवरचा गुन्हा अजून सिद्ध व्हायचा आहे.
देशपांडे : सोनावणे, तुम्ही आरोपीला प्रश्न विचारू शकता.
सोनावणे : आरोपीचं नाव?
शिक्षक : श्रीयुत राम कदम.
सोनावणे : उद्योग?
खाडिलकर : विद्यार्थ्यांना छळणं, आणि काय?
देशपांडे : खाडिलकर, हे कोर्ट आहे, मस्करी नाही. विचारल्याशिवाय बोलूं नका.
सोनावणे : आपला उद्योगधंदा?
शिक्षक : (स्मितहास्य करून) या प्रश्नाचं खरं उत्तर देण्याची गरज़ आहे का?
देशपांडे : या उद्धट प्रश्नाचा अर्थ काय?
शिक्षक : (हसत) अर्थ एवढाच की मी अजून शपथ घेवून सत्य सांगण्यास बाध्य झालेलो नाही.
गुप्ते : (घाईघाईने डिक्शनरी जवळ आणून) शपथ घ्या.
शिक्षक : (डिक्शनरीवर हात ठेवून) ईश्वरसाक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही.
सोनावणे : उद्योग?
शिक्षक : मी _________ शाळेत आठवी ’क’चा वर्गशिक्षक आहे.
सोनावणे : किती वर्ष?
शिक्षक : गेली दहा वर्षं मी या शाळेत शिकवतोय.
सोनावणे : तुमच्यावर केलेला आरोप तुम्हाला मान्य आहे?
शिक्षक : आरोप काय आहे ते कळल्याशिवाय तो मान्य अथवा अमान्य करण्याचा प्रश्नच येत नाही.
देशपांडे : फिर्यादीला हाज़िर करा.
खाडिलकर : (पुढे होत) मी लॉर्ड, मी हाज़िर है.
जोशी : ए, ते फक्त वकिलांनी म्हणायचं असतं.
खाडिलकर : चुकलो, सरकार. आम्हां सर्व मुलांचा शाळा नावाच्या आरोपीवर असा आरोप आहे की इथं आम्हाला किंचितसुद्धा आवड नसलेले विषय शिकवून आमचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातो.
सोनावणे : बोला मिस्टर कदम, आरोप कबूल?
शिक्षक : एकदम नाकबूल.
सोनावणे : जज्जसाहेब, हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी मी काही साक्षीदार हज़र करण्याची परवानगी मागू इच्छितो.
देशपांडे : खुश्शाल हाज़िर करा. परवानगी विचारण्याची देखील गरज नाही.
सोनावणे : साक्षीदार नंबर एक हाज़िर है?
परांजपे : (आत येत) केव्हांपासून हाज़िर है, सरकार. (गुप्तेने पुढे केलेल्या डिक्शनरीवर हात ठेवून) देवाशपथ खरं सांगेन.
सोनावणे : Good. तुमचं नाव?
परांजपे : श्रीधर सत्यवान परांजपे.
सोनावणे : तुम्ही आरोपीला ओळखता?
परांजपे : चांगलंच ओळखतो. वर्गशिक्षक आहेत ते आमचे.
सोनावणे : कायकाय विषयांचा अभ्यास घेतात ते?
परांजपे : बहुतेक सगळ्या विषयांचा.
सोनावणे : या अभ्यासाविषयी तुम्हाला काय वाटतं?
परांजपे : अगदी रामदास स्वामींसारखं जंगलात पळून जावसं वाटतं.
सोनावणे : नोंद व्हावी.
परांजपे : शाळेत एकदम असंबद्ध, फालतू विषय शिकवले जातात.
सोनावणे : उदाहरण देवू शकाल?
परांजपे : उदाहरणांचंच उदाहरण देतो ना!. ह्या चार-पांच संख्यांचा ल.सा.वि. शोधा.
सोनावणे : (गोंधळून जावून) म्हणजे काय?
परांजपे : इथं कुणा लेकाला माहीत आहे? पण मला हे उदाहरण सोडवता येईना म्हणून मी घरी गेल्यावर बाबांना दाखवलं. त्यांनी काय उत्तर दिलं असेल?
देशपांडे : (उत्सुकतेने) काय?
परांजपे : ते म्हणाले (नक्कल करीत) "अरेच्चा, हे ल.सा.वि. आणि म.सा.वि. बरेच लबाड दिसताहेत. आम्ही लहान असल्यापासून त्यांना शोधत आलोय. अजून सापडत नाहीत म्हणजे आहे काय प्रकार?" तर सरकार, जे उदाहरण आमच्या वडिलांना सुद्धा येत नाही ते आम्हीं सोडवावं अशी अपेक्षा का?
देशपांडे : बरोब्बर आहे.
जोशी : मी लॉर्ड, या साक्षीदाराला काही प्रश्न विचारायची परवानगी असावी.
देशपांडे : परवानगी आहे.
जोशी : हे ल.सा.वि.चं उदाहरण कठीण आहे असं तुमचं म्हणणं आहे. हा प्रश्न तुम्हाला येत नाही हे पाहिल्यावर त्यांनी तुम्हाला दुसरं सोपं उदाहरण विचारलं होतं, बरोबर?
परांजपे : हो, साध्या गुणाकाराचं. पंधरा पाचे किती असं विचारलं त्यांनी.
जोशी : त्या प्रश्नाचं उत्तरही दिलं नाही तुम्ही? का?
परांजपे : नाही दिलं उत्तर. पण त्याला कारण आहे. तुम्ही मला सांगा, पंधरा पाचे किती?
जोशी : अगदी सोप्पं आहे. पंच्याहत्तर.
परांजपे : खाडिलकर, तुम्ही सांगा.
खाडिलकर : पंच्याहत्तर. त्यात काय कठीण आहे?
परांजपे : आणि माय लॉर्ड, माझी खात्री आहे की या सोप्या प्रश्नाचं उत्तर अगदी तुम्हाला देखील येतं.
देशपांडे : नक्कीच येतं. पण तुम्हाला नक्की काय सिद्ध करायचंय? असले सोपे प्रश्न विचारून माझा अपमान करू नका. आणि कोर्टाचा किमती वेळ सुद्धा दवडू नका.
परांजपे : हेच, नेमकं हेच म्हणायचं आहे मला. ज्या प्रश्नाची उत्तरं कुणाहि सोम्यागोम्याला सहजपणे येतात ते प्रश्न आम्हाला विचारून आमचा अपमान का करावा? हा आमचा मानसिक छ्ळ आहे.
देशपांडे : बरोबर आहे. (प्रेक्षकांना) मूर्खांनो, टाळ्या वाजवा. (सगळेजण टाळ्या वाजवतात.)
परांजपे : अजून एक उदाहरण देतो. अर्ज़ किया है. एका टाकीत एका तासाला १५० गॅलन पाणी भरतं. त्याच टाकीतून एका तासाला ७० गॅलन पाणी गळतं. अन उत्तर काय हवंय तर म्हणे, टाकीत जर सातशे गॅलन पाणी मावत असेल तर ती टाकी किती तासात भरेल?
जोशी : या प्रश्नाला तुमचा विरोध का?
परांजपे : बरीच कारणं आहेत. कारण नंबर एक, मुंबईच्या लोकांना नगरपालिकेकडून इतकं पाणी कधीच मिळत नाही. आजकालचे नळ म्हणजे फक्त स्मारकं म्हणूनच उभे आहेत. असल्या परिस्थितीत आम्ही हे असत्य का सहन करावं? हा आपल्या राष्ट्रपित्याचा म्हणजे बापूंचा अपमान आहे. कारण नंबर दोन, असले फुटके हौद बांधणार्‍या इंजीनीयर्सना नगरपालीकेने नोकरी तरी का द्यावी? आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे असल्या फुटक्या हौदांची उदाहरणं आम्हां भोळ्या, निरागस, व अजाण बालकांपुढे ठेवून आमच्या नीतिमत्तेला धक्का पोचवला जातोय. माझ्या मते असली फुटकी व जळकी उदाहरणं देणार्‍या सर्व गणिताची पुस्तकं एकत्र करावीत आणि यापैकीच एखाद्या फुटक्या हौदात फेकून त्यांना गटारात वाहून देवू जावी. ये ज़ुल्म हम नही सहेंगे, नही सहेंगे. (प्रेक्षकांना उद्देशून) ओरडा रे, तुम्हीसुद्धा ओरडा.
देशपांडे : थांबा रे, मी सांगितल्याशिवाय मुळीच ओरडायचं नाही.
सोनावणे : बास्स. तात्पुरते प्रश्न संपले. दुसर्‍या साक्षीदाराला पुकारण्यात यावं.
गुप्ते : साक्षीदार नंबर दो हाज़िर है?
कुलकर्णी : (प्रवेश करीत) बराच वेळपासून हाज़िर है. (परांजपेने रिकाम्या केलेल्या जागी उभा राहून शपथ घेतो.) ईश्वरसाक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही.
सोनावणे : आरोपी तुम्हाला अजून कायकाय विषय शिकवतात?
कुलकर्णी : इतिहास, भूगोल, भाषा...
सोनावणे : बास्स, परवाचा प्रसंग आठवतोय?
कुलकर्णी : हो. इतिहासाच्या परीक्षेतील गोष्ट आहे. प्रश्नांचे काही इरसाल नमूने पेश करू इच्छितो. (खिशातून पेपर काढून) हां. शिवाजीचा जन्म कुठे व केव्हा झाला?
जोशी : सोपा प्रश्न आहे.
कुलकर्णी : कुठे झाला याचं उत्तर सोपं असेल कदाचित. माझ्यासारखाच त्याचा जन्म एखाद्या हॉस्पिटलमध्येच झाला असावा. पण केव्हा व का झाला हे मला बिचार्‍याला काय माहीत? त्यानं मला आपल्या बारश्याला थोडंच बोलावलं होतं? आणि हा प्रश्न बघा. शिवाजीने कोणकोणते किल्ले कितीकिती साली जिंकले? च्यायला! त्याला स्वत:ला माहीत नाही तर मला कसं माहीत असेल? स्वत: जिंकलेल्या किल्ल्यांचा हिशेब त्याला स्वत:ला ठेवता येत नव्हता तर लेकाने एखाद्या बॅंकेत खातं उघडायला पाहिजे होतं. घे, जिंकला किल्ला की टाकला बॅंकेत, जिंकला किल्ला, टाकला बॅंकेत. काम तमाम. आता त्याच्या किल्ल्यांवरून आमचा कडेलोट का?
देशपांडे : Interesting! Very interesting!! अजून काही?
कुलकर्णी : आहे ना. गेल्या आठवड्यात याच सरांनी मला विचारलं, "अफ़ज़लखानाचा वध कुणी व कसा केला?" आता घ्या. वध अफज़लखानाचा झाला अन उलटतपासणी मात्र आमची. मला त्याच्या वधाची जरासुद्धा कल्पना नव्हती. मला जर आधी कळलं असतं तर मी त्याला सावध केलं असतं की?
जोशी : फालतू बडबड नको. तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं?
कुलकर्णी : हे बघा, मी गीतेची शपथ घेवून खरं सांगेन असं म्हटलं ते उगीच नाही. मी त्यावेळी खरं सांगितलं अन आताहि खरंच सांगतो. मी अगदी कळकळून सरांना सांगितलं, "सर, मला खरोखरच माहीत नाही. मी तो खून नाही केला." पण त्यांचा विश्वास बसेना. त्यांनी पुन्हा दरडावून विचारल, "बोल, अफज़लखानाचा वध कुणी व कसा केला?" मी तर भीतीने थरथरा कापायला लागलो. म्हटलं, साला हे भलतंच लचांड निर्माण झालं. दुसर्‍या दिवशी बाबांना घेवून मी शाळेत गेलो.
जोशी : कशाला?
कुलकर्णी : स्वत:चं निरपराधित्व सिद्ध करायला. सिद्ध करून दाखवायला की अफज़लखानाच्या वधाशी माझा काहीच संबध नव्हता. त्या दिवशी मी अन बाबा "कातिल कौन?" या पिक्चरला गेलॊ होतो.
सोनावणे : मग काय झालं?
खाडिलकर: मग काय? सरांनी परत मला पकडलं आणि तोच प्रश्न विचारला. "बोल, अफज़लखानाचा वध कुणी, कसा व केव्हा केला?" मला सुद्धा नक्की माहीत नव्हतं. कारण त्या दिवशी मी माझ्या मावसआतेबहिणीच्या चुलत-मामेभावाच्या मुलाच्या बारश्याला गेलो होतो. पण माझा अंदाज़ होता की हा खून एखाद्या निर्ढावलेल्या गुन्हेगाराने केलेला असावा.
जोशी : मग?
खाडिलकर : आमच्या दोघांच्याहि उत्तरांवर अविश्वास दाखवून सरांनी आम्हाला वर्गाबाहेर काढलं. किती अपमानित झालो आम्ही त्या दिवशी! काय यातना झाल्या आमच्या मनाला त्या दिवशी, काय सांगू? छे, आजही तो प्रसंग आठवला की रडू येतं (मुसमुसून रडायला लागतो.)
देशपांडे : ऑर्डर, ऑर्डर. कोर्टात रडायला परवानगी नाही.
खाडिलकर : मग मला बाहेर जायची परवानगी असावी. माझ्यानं हे सहन होत नाही.
देशपांडे : फिर्यादीपक्षाच्या वकिलांना अजून काही प्रश्न विचारायचॆ आहेत? मला ही रडारड बघवत नाही.
सोनावणे : साक्षीदार म्हणून मिस्टर पाठारेना प्रश्न विचारायची परवानगी असावी.
देशपांडे : परवानगी आहे. नाईलाज आहे. तोपर्यंत नोंदीच्या वहीत मीच नोंद करतो.
( पाठारे आपली वही देशपांडेच्या हातात देतो व साक्षीदाराच्या खुर्चीजवळ उभा रहातो. )
पाठारे : ईश्वरसाक्ष जे सांगायचं आहे ते सांगेन आणि जे सांगू नये ते सांगणार नाही.
सोनावणे : तुमचं नाव?
पाठारे : प्रदीप जयवंत पाठारे. इयत्ता आठवी ’क’.
सोनावणे : थॅंक्स. आरोपी तुम्हाला अजून कोणते विषय शिकवतात?
पाठारे : विषय बरेच शिकवतात, पण माझा राग त्या भूगोलावर आहे.
जोशी : का?
पाठारे : फालतू विषय आहे अगदी. हे प्रश्नच वाचा ना. दक्षिण आफ्रिकेत काय पिकतं? आता तिथं सोनं पिकलं तरी आम्हाला काय उपयोग त्याचा? मग म्हणे युरोपमध्ये हवा कसल्या प्रकारची आहे? तुम्ही सांगा, या प्रश्नाला काही अर्थ? साला, नकाशात युरोप दाखवायचा म्हणजे माझी हवा टाइट होते. उत्तम असेल हवा, पण मला काय करायचंय? हवाच खायची असेल तर आपल्या भारतात कमी का खायला मिळतं? वाट्टेल तेवढी हवा खा. हवेवर रेशन नाही. हवी तेवढी खा, हवी तिथं खा, हवी तेव्हा खा. कुणी एका शब्दाने विचारणार नाही. आता या विषयाचा काय संबंध आहे आपल्या रोजच्या किंवा भावी जीवनाशी? मग कशाला हवेत असले विषय?
देशपांडे : सत्य वचन. हा छळ आहे, छळ.
सोनावणे : नोंद व्हावी, मी लॉर्ड. (देशपांडे लिहून घेतो.) That's all, My Lord. माझे प्रश्न संपलेयत.
देशपांडे : मिस्टर जोशी, आरोपीचा वकील या नात्याने तुम्हाला कुणाला काही विचारायचं आहे?
जोशी : (वैतागून) प्रश्न काय विचारणार, कप्पाळ? आमची बाजू आधीपासून लंगडी. किती म्हणून संभाळणार?
देशपांडे : सर, चुकलो, मिस्टर कदम, तुम्हाला काही सांगायचंय?
शिक्षक : बरंच काही.
देशपांडे : Go ahead. (स्वत:शीच) उपयोग काहीहि होणार नाही. (मोठ्याने) पण बोला.
शिक्षक : आम्हां शिक्षकांची दैना काय सांगणार, आणि कुणाला सांगणार? शिक्षक मुलांचं भविष्य घडवतो म्हणतात. पण आमचं भविष्य? पगार पुरेसा मिळत नाही, आणि मिळतो तेव्हा वेळेवर मिळत नाही. ध्येय म्हणून आम्ही जिवाचं रान करून पोरांना शिकवतो. आम्हाला कळत का नाहीत त्यांच्या अडचणी? वरून बोर्डाकडून वेळोवेळी circulars येत असतात. शिक्षणाच्या नावाने वारंवार प्रयोग केले जातात. आमचे हातही बांधले गेलेले असतात. आम्हालाही वाटतं की आयुष्यात पुढे उपयोग न येणारे प्रश्न विचारून मुलांना छळू नये. परीक्षेचं भूत आमच्याहि मानगुटीवर बसलेलं असतं. दिलेल्या वेळात पोर्शन संपवा; करमणूकीचे कार्यक्रम सुद्धा घ्या; निवडणुकीच्या वेळी कामं करा. वरून तक्रारी, मॅनेजमेण्ट्च्या तक्रारी, विद्यार्थ्यांच्या तक्रारी, त्यांच्या आईबापांच्या तक्रारी, घरी स्वत:च्या मुलांकडे नीट लक्ष देता येत नाही म्हणून घरातून तक्रारी. तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात ना, तेंच खरं. तरीहि मुलांचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही शिक्षकवर्ग ही वाटचाल चालू ठेवतो. आणि या विषयांचं म्हणाल तर सगळेच विषय काही टाकाऊ नसतात. आपला भूतकाळ किती उज्ज्वल होता हे कळल्यानं आपण पुढे येणार्‍या भविष्याचं स्वागत करूं शकूं. त्यासाठी इतिहास हवा. या अणूयुगात जग खूप छोटं बनत चाललं आहे. हे विश्वचि माझे घर ही भावना खरी ठरत चालली आहे. अशाप्रसंगी केवळ भारतातील नव्हे तर आजूबाजूच्या जगातील देशांविषयी जाणून घेणं ज़रूरीचं आहे. यासाठी भूगोल हवा. गणित ... (देशपांडे एक भलीमोठी जांभई देतो.) तुम्हाला भयंकर कंटाळा आलेला दिसतो. मला इतर काही बोलायचं नाही. मी माझं भाषण आवरतं घेतो.
सोनावणे : मी लॉर्ड, केस संपलेली आहे. आपल्यापुढे सादर केलेल्या सर्व पुराव्यांवरून आरोपीवर केलेले आरोप किती सत्य आहेत हे आपल्याला कळून चुकलं असेलच. तेव्हा मी न्यायालयाला विनंती करतो की कसलीहि दयामाया न दाखवतां आरोपीला कठोरात कठोर शिक्षा सुनावण्यात यावी.
जोशी : माय लॉर्ड, आरोपीची बाजू अगदीच लंगडी आहे. त्यामुळे मी बचावाचं भाषण करून न्यायालयाचा आणि इतर सगळ्यांचा वेळ व्यर्थ घालवू इच्छीत नाही. तरीसुद्धां न्यायमूर्तींनी हे लक्षात ठेवावं की समाजाला लागलेला अज्ञानाचा रोग दूर करण्याकरिता परमेश्वररूपी डॉक्टराने नेमलेलं शाळा हे कडू पण आवश्यक औषध आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेवून न्यायमूर्तींनी आरोपीला सौम्य शिक्षा द्यावी हीच विनंती.
देशपांडे : (विचार करीत प्रत्येक शब्द सावकाश उच्चारीत) न्यायमूर्तीने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकल्या आहेत. मी आरोपीला शिक्षा देत आहे ती केवळ माझ्या स्वत:च्या समाधानासाठी. शिक्षकवर्गाने आम्हा मुलांना शिक्षा म्हणून हे अमक्याच वेळा लिहा, ते तमक्याच वेळा लिहा असं अनेकदा सांगितलंय. माझ्या मते सूडाचा आनंद काही औरच असतो. म्हणून मी आर्रोपीला अशी शिक्षा फर्मावीत आहे की तो आपल्या डायरीत पानाच्या एका बाजूला सुवाच्य अक्षरात शंभर, नाही, हज़ार वेळा लिहून आणेल की यापुढे आरोपी उगीचच मुलांचा छळ करणार नाही. त्यांना बाकावर उभं करणार नाही. वर्गाच्या बाहेर काढणार नाही. आणि ही शिक्षा उद्यापर्यंत अमलात आणली जावी. अजून शिक्षा ही की रोज मुलांचा छळ होतोच. निदान उद्यातरी मुलांना हा छळ सहन करावा लागणार नाही अशी सोय केली जावी. म्हणजे उद्या शाळा नावाची संस्था बंद ठेवावी. सुटी जाहिर करावी. नाही, जज्ज या अधिकाराने मी शाळेला सुट्टी जाहिर करतोच.
( न्यायाधीशाचा निर्णय ऐकून प्रेक्षकातली मुले आनंदाने ओरडायला लागतात. देशपांडे हातातली पट्टी आपटून ओरडायला लागतो, "ऑर्डर, ऑर्डर". हा सगळा गोंधळ चालू असतानाच पडदा पडायला सुरू होतो. )

लेखक
लक्ष्मीनारायण हटंगडी
EC51/B104, Sai Suman CHS,
Evershine City, Vasai (E)
PIN 401208
(E-mail: suneelhattangadi@gmail.com)

No comments:

Post a Comment