Saturday, November 14, 2009

मीच का?

बघता बघता विमानाने धरा सोडली आणि आकाशात उंच भरारी घेतली. काही वेळ सगळं सुरळीत चाललं होतं आणि लवकरच विमानातील सगळे प्रवासी रंगीत स्वप्नांच्या दुनियेत रमले. माझी झॊप मोडली ते एका गोड आवाज़ात (पण त्यावेळी विशेष-गोड-न वाटणार्‍या) आवाजात केलेल्या घोषणेनं. खरंतर सगळेच जण दचकून जागे झाले. मघाशी वास्तवात असलेली ती स्वप्नसुंदरी घोषणा करीत होती, "आपापल्या seat-belts घट्ट बांधून घ्या. आणि धूम्रपान करूं नका. बाहेरची हवा थोडीशी वादळी होत आहे. पण घाबरायचं काही कारण नाही." पूर्वानुभवाने मला चांगलंच माहीत झालं आहे, जेव्हा कुणी म्हणतं, "घाबरायचं कारण नाही", तेव्हा सगळी माणसं दाट भीतीच्या गराड्यात गुंफलेली असतात. त्या दिवशीहि तसंच झालं. ज्यांनी कुणी आधी आपल्या seat-belts बांधलेल्या होत्या त्यांनी सुद्धा त्या सोडून धांवपळ करायला सुरवात केली होती. चारी बाजूंनी रडण्या-ओरडण्याचे आवाज ऐकू यायला सुरवात झाली होती. मला वाटतं त्या सार्‍या गर्दीत बहुतेक मी एकटाच (मूर्ख) असेन ज्याच्यावर या गोंधळाचा विशेष परिणाम झाला नसावा. अगदी स्पष्टच सांगायचं झालं तर मी हे सगळं एन्जॉय करत होतो. आणि बघताबघता जितक्या वेगाने ही धांवपळ सुरू झाली होती त्याच वेगाने विमान खाली कोसळायला लागलं. आणि पुढल्याच क्षणी, काय होतंय हे कुण्याच्या लक्षात येण्याआधीच विमान प्रचंड जोराने जमिनीवर आदळून सर्वत्र त्याचे तुकडे सैरवैर पसरले . जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर चारी बाजूंना फक्त प्रेतं पडलेली दिसलीं. अजून कुणी जिवंत आहे का हे पहायला मी गुंगीत असल्यासारखा चालत राहिलो. पण कुणीहि जिवंत आढळलं नाही ... माझ्या एकट्याशिवाय! तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण त्या भीषण विमान अपघातात मी एकटाच जिवंत राहिलो होतो. अगदी अविश्वसनीय! मरणावर विजय मिळवल्याच्या अदभुत आनंदाच्या गुंगीत मी तसाच चालत राहिलो. तितक्यात अचानकपणे माझ्या खांद्यावर एक हात पडला. घाबरून मी मागे पाहिलं.
आणि दचकून जागा झालो. माझी बायको माझ्या खांद्यावर हात ठेवून मला उठवीत होती. तर स्वप्‍न होतं ते? हो, फक्त एक स्वप्‍नच होतं ते! फरक एवढाच होता की याआधीहि मी हे स्वप्‍न बर्‍याच वेळा पाहिलं होतं. आणि खरं सांगायचं तर मी या स्वप्‍नात अगदी रंगून जायचो. मला पडणार्‍या आणखी एक स्वप्‍नातही मी रमून जायचो. पण त्या स्वप्‍नाविषयी अजून केव्हातरी सांगेन. गेल्या दोन वर्षांत माझ्या जीवनात ज्या काही घडामोडी झाल्या आहेत त्यामुळे माझी खात्री पटली आहे की मी हे "एकटाच जिवंत" असण्याचं स्वप्‍न खरंच जगलो आहे.
मी कर्करोगाबरोबर, म्हणजे कॅन्सरबरोबर, दिलेल्या माझ्या लढ्याबद्दल, बोलतोय.
चला, दोन वर्षांमागचा फ़्लॅशबॅक घेवूया. जून २००७. माझं सगळं कुटुंब गोव्याला सुटीसाठी गेलं होतं. काही शूटींग्सची कमीटमेण्ट्स (commitments) असल्यामुळे मी मुंबईमध्येच राहिलो होतो. आणि माझ्या लक्षात आलं की बर्‍याच वेळा मला गिळताना त्रास होत असे. कधीकधी जाड पदार्थ (solids) खातानाच त्रास व्हायचा तर कधीकधी इतका त्रास व्हायचा की साधं पाणी सुद्धा गिळणं जमत नसे. गोव्याला फोन करून याबद्दल सांगितल्यावर घरातल्या डॉक्टरीणबाईंनी (बायकोची वहिनी उत्तमपैकी डॉक्टर आहे!) ऍसिडिटी करता गोळ्या घ्यायचा सल्ला दिला. तात्पुरता फायदा झाला देखील. पण फक्त तात्पुरताच. रजेवर गेलेली फ़ॅमिली डॉक्टर परत आल्यावर मी त्यांना जाऊन भेटलो. त्यांना सगळी लक्षणं सांगितल्यावर मनातल्या शंकांचं निरसन व्हावं म्हणून ताबडतोब बर्‍याचशा tests करून घ्यायला सांगितल्या. तेवढ्यात माझी फॅमिली परत आली होती, आणि आम्ही सगळ्या tests करून घेतल्या. जेव्हा टेस्ट रिपो‍र्ट हातात आले तेव्हा मनात दडून राहिलेल्या भीतींना जिवंत स्वरूप आलं होतं. मला esophagus म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर झाला होता.
माझ्या endoscopy आणि biopsy चे रिपोर्ट बघायला आम्ही डॉ. शेट्टींच्या क्लिनिक मध्ये बसलेलो होतो. एकदम गंभीर चेहर्‍याने डॉक्टर म्हणाले, "खूप वाईट कॅन्सर आहे." "धन्यवाद डॉक्टरसाहेब, माझी समजूत होती की कॅन्सर नेहमीच खूप चांगला असतो. माझे गैरसमज दूर केल्याबद्दल थॅंक्स." अर्थातच मी हे सगळं मनातल्या मनात बोलत होतो. काय करणार, बर्‍याच गोष्टी मनात असून सुद्धा मोठ्याने बोलता येत नाहीत, नाही का? "तातडीने शस्त्रक्रिया करून घ्यावी लागेल तुम्हाला." अंगातली सगळी ताकत गळून गेल्याप्रमाणे आम्ही म्हणालो, "हो."
आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला. "मी लीलावती हॉस्पिटलमध्ये बर्‍याच डॉक्टरांना ओळखतो. हवं तर..." आतापर्यंत मी वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवरच्या पत्रकारांना लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या स्टार पेशण्ट्सच्या मुलाखती घेण्यासाठी एकमेकांना धक्के देतांनाच फक्त पाहिलं होतं. कधीतरी स्वत: कुणा ओळखीच्या रुग्णांना भेटण्यासाठी गेल्याचंही आठवलं. पण मी स्वत: लीलावतीमध्ये रूग्ण म्हणून? माझ्या चेहर्‍याकडे पाहिल्यानंतर सुद्धा मी इतक्या प्रतिष्टित हॉस्पिटलमध्ये रूग्ण म्हणून भरती व्हायला योग्य (अयोग्यच म्हणा ना!) होतो असं कुणाला तरी वाटावं हे ऐकून मला तेवढ्यापुरतं तरी अंगावर मूठभर मांस चढल्यासारखं वाटलं. बाहेर पडल्यानंतर लोकांकडे याबद्दल बढाई मारायला आता हरकत नव्हती! पण आम्ही नाईलाजाने डावीकडून उजवीकडे माना हलविल्या. "माझ्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सुद्धा ओळखी आहेत," डॉक्टर सहानभूतीने म्हणाले. काही उत्तर न देताच आम्ही तिथून बाहेर पडलो.
आता आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये बसलो होतो. माझे सगळे रिपोर्ट्स तिच्या पुढ्यात होते. आणि मी तिला विचारलं, "मी सिगारेट किंवा बिडी ओढत नाही; दारू पीत नाही. मला इतर व्यसनं नाहीत. मग मीच का? हा कर्करोग मलाच का?" "नियती!," तिने एका शब्दात उत्तर दिलं. माझी बायको बाहेर बसली होती. मी हलकेच विचारलं, " डॉक्टर, मला निदान अजून दोन वर्षं जगायचंय. मिळेल एवढी मुदत? मला माझी मुलगी पदवीधर झालेली बघायची आहे. शिल्पशास्त्रात (Architecture) पदवीसाठी शिकतेय ती... अजून दोन वर्षं आहेत तिची." मानवी मन इतकं लोभी असतं याचा प्रत्यय मला आताच झाला होता. "मिस्टर हटंगडी, कॅन्सर बरा होवू शकतो," तिच्या आवाजात धैर्य होतं, सहानुभूती होती. पण मला उगीचच वाटलं की तिच्याही डोळ्यात आसवं आलेली असावीत.
माझ्या मुलीने, बहिणीने आणि तिच्या मैत्रिणींनी इण्टरनेट आणि फोनवर बराच वेळ घालवून मिळवलेल्या माहितीच्या मदतीने दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही टाटामध्ये specialistच्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर डॉक्टर प्रमेश भेटले. ते म्हणाले, "कॅन्सरच्या उपचारात दिरंगाई करून उपयोग नाही. पण तरीहि दोनतीन आठवड्यांनी काही फरक पडू नये. तुम्ही बाहेरून करून घेतलेल्या tests अगदीच निरुपयोगी आहेत असं नाही, पण सगळ्या tests टाटामध्ये कराव्या लागतील. उद्या सकाळी रिकाम्या पोटी या."
दुसर्‍या दिवशी सकाळी परत एकदा आम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये वाट पहात होतो. आणि त्या दिवशी तिथे मी जे दृश्य पाहिलं त्यामुळे जीवनाकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोनच बदलून गेला. भारताच्या अनेक कानाकोपर्‍यातून व इतर अनेक देशातून सुद्धा डोळ्यात आशा आणि हृदयात स्वप्‍नं घेवून लोक इथं आलेले असतात. वेगवेगळ्या वयोगटाचे, वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीचे, कॅन्सरच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असलेले लोक इथं आलेले असतात. त्या दिवशी देखील काहीजण हातात फक्त case papers घेवून वाट पहात होते. काहीजण उपचारासाठी मुंबईत रहावं लागेल तेव्हा बरोबर आणलेलं आपलं थोडंफार सामान हॉस्पिटलबाहेरच्या आवारात ठेवून, मिळेल त्यांच्याकडे चौकशी करत फिरत होते की जवळपास स्वस्तात राहायची काही सोय होवू शकेल का जिथून त्यांना आपल्या कॅन्सरच्या ट्रीटमेण्टसाठी हॉस्पिटलला वेळेवर येता येईल. मात्र दुर्दैव हे की त्या क्षणाला कुणाला काहीच कल्पना करता येत नव्हती की उपचारासाठी किती दिवस, किंवा कदाचित महीनेदेखील, रहावं लागेल.
आणि तिथं लांबलचक रांगेत उभं असताना मला बरीच लहान मुलं रांगेत उभी दिसलीं. कुणीं आपले केस नसलेलीं डोकी लपवण्यासाठी तर्‍हेतर्‍हेच्या टोप्या घातल्या होत्या. कुणाच्या शरिराच्या वेगवेगळ्या भागातून लहानमोठ्या नळ्या बाहेर डोकावत होत्या. त्यात काही नुकतेच पाळण्यातून बाहेर ओढून काढलेले जीव होते. काही मुलं दोनतीन वर्षांची तर काही थोडेसे मोठे. काही मुलं पुन्हा एकदा शाळेत जाण्याच्या आशेने हातात वह्यापुस्तकं घेवून आले होते. काही मुलं आपलं दु:ख सहन न होवून रडत होती, तर काही त्या अवस्थेतही मोठ्या हिम्मतीने हंसायचा प्रयत्न करीत होते. काही अजाण मुलांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह साफ दिसत होतं, "हे परमेश्वरा, आम्ही असा काय गुन्हा केलाय की तू आम्हाला त्याची अशी कठोर शिक्षा देतोयस?" आणि त्याचवेळी माझं लक्ष तिथं रांगेत उभ्या असलेल्या आठ-दहा वर्षाच्या दोन मुलांकडे गेलं. दोघांच्या चांगल्या गप्पा रंगल्या होत्या.
एका मुलाने दुसर्‍या मुलाला विचारलं, "तुझ्या किती chemotherapy sessions झाल्या?"
दुसर्‍या मुलाने उत्तर दिले, "ही माझी पहिलीच वेळ आहे. फार दुखतं कारे?"
"पहिल्यांपहिल्यांदा खूप त्रास होतो. ओकायला होतं. केस गळतात. पण घाबरू नकोस, मित्रा. लवकरच सवय होईल तुला, जशी मला झाली. माझी पाच सेशन्स झाली आतापर्यंत. हे बघ माझं टक्कल," म्हणून त्या मुलानं आपली टोपी काढून दाखवली. आणि दोघेही जोरजोराने हसायला लागले. तेवढ्यात तिथून जाणार्‍या नर्सने त्यांना "तुम्ही हॉस्पिटलात आहात" याची आठवण करून देत "हुश्श" करून गप्प केलं. त्यानंतरही दबल्या आवाजात त्यांच्या गप्पाटप्पा चालूच होत्या.
मी थक्क होवून त्या मुलांकडे पहातच राहिलो. जून २००७, मी आयुष्याची ६५ वर्षं पूर्ण केलेली होती. बरंच आयुष्य अनुभवलं होतं. भरपूर मजा लुटली होती. जीवनाच्या इन्द्रधनुष्याचे वेगवेगळे रंग पाहिले होते. आणि तरीहि मी माझ्या दैवाला प्रश्न करायचं धाडस करीत होतो, "मीच का?" खरंच, काय हक्क होता मला हा प्रश्न विचारायचा? मी स्वत:भोवती नाचतखेळत असलेल्या त्या रंगबेरंगी इन्द्रधनुष्याकडे पाहिले आणि स्वत:लाच विचारलं, "मी का नाही?"
जून-जुलै २००७, कॅन्सरचं निदान आणि पूर्वोपचार करण्यात गेले. ऑगस्ट २००९ मध्ये माझं कॅन्सरचं ऑपरेशन झालं. मला वाचवण्याचा एकुलता एक उपाय म्हणून डॉक्टरांनी माझी अन्ननलिका (esophagus) पूर्णपणे काढून त्याजागी माझ्या पोटाचा भाग वर खेचून लावला. आता हा भागच माझ्या अन्ननलिकेचं काम करणार होता. थोडक्यात म्हणजे माझ्या शरीरातील सबंध plumbing systemच बदलण्यात आली होती. या रुग्णक्रियेच्या वेळी माझी स्वरनलिका निरुपयोगी होवून काही महीने माझी "वाचा गुल" झाली होती. एप्रिल २००८मध्ये अजून एका रुग्णक्रियेनंतर मला माझा आवाजसुद्धा, पहिल्यासारखा नसला तरी, थोडाफार परत मिळाला. मी परत एकदा auditions द्यायला सुरवात केलीय, सीरीयल्स किंवा सिनेमातून नसलं तरी जाहिरातींतून थोडीफार कामंसुद्धा केलीयत. आणि अजून बरीच कामं करायची इच्छासुद्धा मनात बाळगून आहे. मी लिहीलेली काही scripts एखाद्या निर्मात्याला देवून त्यांचे चित्रपट बनतील अशी स्वप्‍नंसुद्धा उराशी बाळगून आहे. माझी मुलगी ग्रॅज्युएट होवून एका चांगल्या कंपनीत नोकरी करतेय. बरीचशी पाहिलेली स्वप्‍नं पूर्ण झालेली पाहिलीत, बरीचशी पूर्ण होतीलही कदाचित, पण मी स्वप्‍नं पहाणं अजून बंद केलेलं नाही. जीवनाशी संघर्ष चालू आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी कॅन्सरवर विजय मिळवला आहे ... जे मी ओळखत असलेल्या बर्‍याच जणांना जमलेलं नव्हतं. मला भेटत असलेली बरीच माणसं (मी ६७चा असतांना सुद्धा) मला ८३चा समजतात. त्यांत काय झालं? कॅन्सरच्या व्याधीतून वाचलेला मी एकटा नसेनही कदाचित, त्यांत काय झालं? निदान वारंवार येणार्‍या त्या स्वप्‍नातल्या विमानाच्या भीषण अपघातातून जिवंत रहाण्याचं माझं स्वप्‍न पूर्ण झालं आहे. फरक एवढाच की माझ्या आयुष्यातील त्या भीषण विमान-अपघाताचं नांव आहे कॅन्सर. आता मी नियतीला कधीच प्रश्न विचारीत नाही, "मीच का?"


लक्ष्मीनारायण हटंगडी,
वसई (पूर्व)
१४ नोव्हेंबर, २००९

Wednesday, November 4, 2009

प्रश्न

प्रश्न तेच असतात... वेळ फक्त बदललेली असते,
व्यक्ती त्याच असतात... संदर्भ बदललेले असतात.
प्रश्न कधी कधी तेच जुने असतात,
उत्तरं मात्र बदललेली असतात...
कारण आपल्या बरोबर काळ देखील बदललेला असतो.
चांगली गोष्ट ही असते की आपण उत्तराची वाट न पहातां,
प्रश्न मात्र सारखे विचारत असतो... कारण
काळ बदलला असला, तरी आपण तेच असतो.

Tuesday, November 3, 2009

बत्ती गुल!

नमस्कार मित्रांनो,
बरेच दिवसांपासून तुम्हां सर्वांची भेट घ्यायचा विचार होता, पण काय करणार? ग्रह जुळत नव्हते. या कम्प्युटर नांवाच्या गृहस्थाचे आणि माझेही ग्रह फारसे जुळत नाहीत. कम्प्युटरवर हात चालवायचा माझा मूड असतो तेव्हां साहेबांचा मूड नसतो. आणि जेव्हां दोघांचेही ग्रह जुळतात बरोब्बर तेव्हां "बत्ती गुल" असते. कळतंय ना मी काय म्हणतोय ते! निवडणुकीचा दिवस होता, म्हटलं सगळं नीट जमून येईल, तर कम्प्युटरवर थोडी बोटं फिरवावीत. पहाटे ७.३० वाजतां उठलो आणि कम्प्युटर समोर बसलो.

"कम्प्य़ुटरवर बसायचा विचार दिसतोय", मिसेस म्हणाली. माझ्या उत्तराची वाट न पहाताच (आत्ता यांत नवीन काय आहे म्हणा!), ती उत्तरली, "बत्ती गुल व्हायचे चान्सेस आहेत."

आधी मी मोठा उसासा टाकला... मग मोठ्यानं हसलो. "श्रीमतीजी, आज निवडणुकीचा दिवस आहे. बत्ती गुल करायची हिम्मत होणार नाही त्यांची." मोठ्या थाटाने मी कम्प्युटर ऑन केला. पुढल्याच क्षणी थोडे विचित्र आवाज़ आले आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. पाठीमागून एक मोठा उसासा आणि हसण्याचे आवाज़ ऐकू आले. ते आवाज़ कुठून आले हे कळण्यासाठी अर्थांतच मागे वळून पहाण्याची गरज़ नव्हती. (बायकोला ’अर्धांगिनी’ का म्हणतात ते आत्तां लक्षांत आलं! तुमच्याही लक्षात आलं असेलच म्हणा!) कुणातरी अज्ञात व्यक्तीला मनातल्या मनात शिव्या टाकत मी उठलो आणि स्वत:ला पुन्हां पलंगावर झोंकून दिलं.

डोळा लागायच्या आत "अर्धांगिनी"चं खिदळणं कानांवर पडलं. ती म्हणत होती, "इलेक्ट्रिसिटी परत आलीय. तुम्हीं कम्प्युटर सुरु करुं शकता." मी तोंडावर पाण्याचे चार फवारे मारले आणि परत कम्प्युटर स्टार्ट केला. स्वत:लाच खुष करण्यासाठी मी स्वत:शीच पुटपुटलो, "अरे बाबा, मघाची बत्ती गुल हा केवळ एक अपघात होता. तूं आपलं काम सुरु ठेव." अखेरीस कम्प्युटर सुरु झाला आणि मी एम.एस.ई.डी.सी. ला धन्यवाद दिले. (कृपया या M.S.E.D.C.चं स्पष्टीकरण द्यायला सांगू नका.) पण "धन्यवादा"तला ’धन्य’ पूर्ण व्हायच्या आधीच परत एकदा कम्प्युटर वर अंधार पसरला. हा अनुभव मला नवीन नव्हता, पण पहिल्यांदाच त्या अंधारलेल्या पडद्यावर मला एक दृश्य दिसूं लागलं ते खालीलप्रमाणे होतं.
इलेक्ट्रिसिटी बोर्डाचं नियंत्रण केंद्र. सकाळची वेळ. दोन-तीन कर्मचारी पेंगाळलेल्या डोळ्यांनी प्रवेश करतात. त्यांची नांवं अशी काहीतरी असावीत: पाण्डू, लाण्डू, माण्डू, साण्डू... किंवा गा....
पाण्डू : अरे भाई, कुणी Evershine Cityची बत्ती गुल केली की नाय?
माण्डू : ऐं, किती वाजले? मला वाटलं की आज एका तासानं बत्ती गुल करायची.
पाण्डू : आरं, तुला काय पण समजत नाय, माण्डू. बत्ती गुल कर ...आत्ताच करून टाक बेगीन.
( माण्डू बेगीनशान बत्ती गुल करतो आणि Evershine Cityमध्ये अंधार पसरतो. कर्मचारी माणसं डुलक्या घेवू लागतात. तेवढ्यात लाण्डू जांभया देत आंत येतो. )
लाण्डू : च्यायला मारी.. कुणा गाढवानं Evershineची बत्ती गुल केली?
माण्डू : मला पाण्डूनं सांगितलं म्हणूनशान मी बत्ती गुल केली. काय लोच्या झाला की काय़?
लाण्डू : पाण्डूच्या बैलाचा घॊ. माण्ड्या, तुला म्यां सांगतुय, Evershine Cityची बत्ती ऑन कर. आत्ताच्या आत्ता.
( माण्डू switch on करतो. पुन्हा Evershine City चमकायला लागते. नुकताच झोपेतून जागा झालेला गा... आंत येतो. )
गा.. : आयच्या मारी. इथं काय लोचा चाललाय कुणी सांगल का मला? Evershine Cityची बत्ती गुल करायच्या येळला बत्ती चालू कशी काय? बत्ती गुल कर. आत्ता.
माण्डू : पण साहेब, आज निवडणूक हाय न्हवं?
गा.. : च्यायला मारी. निवडणूक गेली खड्ड्यात. हित्तं साहेब कोण? तू ... का मी?
माण्डू (लाचारपणे हंसत) : साहेब, साहेब तुम्हीच. काय डाउट हाय की काय?
गा.. : मग मी सांगतो, तस्सं करायचं. समज़लं?
माण्डू : व्हय साहेब. तुमची ऑर्डर म्हणजी ऑर्डर. ही घ्या, Evershineची बत्ती गुल.
( परत एकदा Evershine Cityत अंधारच अंधार पसरतो. हा अंधार आणि प्रकाशाचा खेळ बराच वेळ चालू रहातो. अर्थातच बिचार्‍या Evershineच्या लोकांना बत्ती येतेय का गुल होतेय कळत नाही ... त्याच बिचार्‍या गोंधळेलेल्या लोकांपैकी मी ही एक असतो. )
मित्रांनों, तर सांगायचा मुद्दा हा आहे की निवडणूका असोत अथवा नसोत, अंधारात असलेला माणूस अंधारात चाचपडत रहायची सवय लावून घेतो... दुसरं करणार तरी काय, नाही का? आत्ता हा ब्लॉग लिहिणार म्हणून कबूल केलंय तर झोपेच्या वेळी जागं राहून काम करावंच लागणार. काय, कळतय ना मी काय म्हणतोय ते? का झाली बत्ती गुल?
माझं सुद्धा क्रिकेट!

मला आठवतंय मी लहान असतांना बरंच क्रिकेट खेळलं जात असे. पण हल्ली सगळ्या देशभर जेवढं क्रिकेटचं वारं पसरलेलं दिसतं तेवढं आमच्या काळी नक्कीच नसायचं. आपला कामधंदा संभाळून क्रिकेट बघितलं जायचं आणि खेळलं देखील जायचं. आज तसं नाही. जेव्हा पहावं तेव्हा, जिथं पहावं तिथं, ज्याला पहावं त्याला, क्रिकेटचा विषय! शाळेंतून शिक्षक काय किंवा विद्यार्थी, हातांतला ट्रॅंझिस्टर कानाला लावून असलेले दिसतात. बहुतेक सगळी ऑफिसं रिकामी पडललीं. कधीं नव्हे ते सिक लीव्हचे अर्ज साहेबाच्या टेबलावर पडलेले असतात. पण ते अर्ज बघायला साहेब सुद्धा कॅबीन मध्ये नसतो. रस्त्यारस्त्यातून, दुकानांदुकानांतून चालू असलेल्या टीव्ही वरून प्रसारित होत असलेल्या क्रिकेट मॅचेस बघायला ही तुंबड गर्दी! धोनीच्या टीमने दुसर्‍या टीमची केलेली धुलाई, किंवा दुसर्‍या टीमच्या हातून होत असलेली धोनीच्या टीमची धुलाई जीव मुठीत घेऊन लोकं पहात असतात. बरेच (आंबट)शौकीन असं म्हणतांना आढळतात, "ह्या लोकांपेक्षा आमच्या गल्लीतली मुलं सुद्धा चांगलं खेळून जिंकली असतीं". थोडक्यात काय, सगळीकडे फक्त आणि फक्त क्रिकेटचं वारं! ह्या अशा वातावरणांत थोडं वारं माझ्याहि अंगात शिरलं तर नवल नाही. म्हणूनच आज मी माझ्या वाचक दोस्तांना माझे क्रिकेटविषयीचे काही निवडक अनुभव सांगणार आहे.

इतर प्रसिद्ध क्रिकेटपटुंप्रमाणॆ मी देखील अगदी लहानपणींच क्रिकेट खेळायला सुरवात केली. "मुलाचॆ पाय पाळण्यांत दिसतात या उक्तीप्रमाणे मी सुद्धा पहिला चेंडू पाळण्यात असतानांच फेकला होता.तेव्हां मी सुमारे एक वर्षाचा असेन. आमच्या घरी बर्‍याच बायका जमल्या होत्या. (त्यांची बडबड सहन होईना म्हणून असेल कदाचित) मी जोरजोराने रडायला सुरवात केली. मला शांत करायला म्हणून आईनं माझ्या हातांत एक रबरी चेंडू दिला. कांही वेळ गप्प राहून मी परत जोराचं भोकांड पसरलं. काय होतंय हे कुण्याच्या लक्षात यायच्या आधीच मी हातातला चेंडू नेम न धरताच बाहेर फेकला. माझं रडणं शांत झालं ते एका बाईच्या (ओ)रडण्याचा आवाज ऐकून. माझा नेम एकदम अचूक त्या बाईच्या नाकावर बसून तिचं नाक लाल-लाल झालं होतं. अर्थांतच ही होती माझी पहिली विकेट.

मी दुसरा बॉल फेकला त्यावेळी साधारण तीन-साडेतीन वर्षांचा असेन. मी एक वर्षाचा असताना गाजवलेले प्रताप विसरून बाबांनी मला परत चेंडूच खेळायला दिला होता. यावेळी मात्र मी माणसांवर नेम न रोखतां चेंडू थेट दिवाणखान्यातील महागड्या आरशावर फेकून मारला होता. किचनमधलं काम सोडून येऊन आईनं माझ्या मुस्काटीत दोन मारल्या तेव्हां मला माझा पराक्रम कळला. फरक एवढाच की ह्या वेळेला तोंड माझं लाल झालं होतं.

एव्हांना माझ्या मनात क्रिकेटची भलतीच आवड निर्माण झाली होती. जरासा मोठा झाल्यावर देखील मी क्रिकेटचा नाद सोडला नव्हता. आमच्या कॉलनीच्या शेजारीच एक फ़िल्म स्टुडिओ होता. मुलं खेळताहेत असा एखादा सीन असला की स्टुडिओवाले आम्हां पोरांनाच बोलवायचे. पण माझ्या सोबतचीं पोरं इतकी दांडगट की मला कधी कॅमेराच्या समोर येऊंच ध्यायची नाहीं. एकदा मी सॉलीड वैतागलो आणि माझी बॅट काढून त्यांच्या टाळक्यात हाणली. माझ्या स्ट्रोक मध्य़े इतका ज़ोर होता की माझी बॅट तर फुटलीच, शिवाय त्या मूर्ख डायरेक्टरनं मलाच दांडगट म्हणून मलाच स्टुडिओचा दरवाज़ा दाखवला. माझं डोकं सॉलीड तापलं होतं. मी माझी फुटलेली बॅट त्याचा अंगावर फेकून जोरात ओरडलो, "अरे, तुमचं सिनेमांतलं क्रिकेट गेलं खड्ड्यात, मी खरंखुरं खेळीन, पतौडीसारखं. मग याल मला मस्का लावायला." असं म्हणून मी मात्र पहिल्या बॉललाच विकेट गेलेल्या खेळाडूसारखा पाय आणि हातांत शिल्लक राहिलेल्या बॅटचं हॅण्डल आपटीत स्टुडिओबाहेर पडलो.

मोठ्या शाळेत आल्यावर सुद्धा इतर मुलांच्या विरोधामुळे मला क्रिकेट टीमपासून दूरच ठेवण्यात आलं होतं. पण मी कधीच धीर सोडला नाही. कधी तरी चान्स मिळेलच म्हणून मी कॉलनीतल्या लहान मुलांबरोबर टेनीसच्या बॉलनं प्रॅक्टीस करीत राहिलो. तरीहि काही जमलं नाही म्हणून मी हळूंहळूं आमच्या क्रिकेट कॅप्टनला आणि क्रिकेट कोचला मस्का लावायचं शहाणपण दाखवायचं ठरवलं. माझं हे धोरण मात्र उपयोगी ठरलं आणि अखेरीस माझं नांव शाळेच्या क्रिकेट टीम मध्यें झळकू लागलं. तीन वर्षं सतत मस्का लावून लावून पिच बरंच नरम झालेलं होतं.

माझी पहिलीवहिली मॅच खेळायच्या दिवशी मी अगदी भल्या पहाटेच मैदानावर जाऊन बसलो होतो. अखेरीस दहा वाजले व मॅचला सुरवात झाली. खास ह्याच दिवसासाठी शिवून घेतलेले पांढरेशुभ्र कपडे चढवून, नवीन बॅट फिरवीत मी आघाडीचा खेळाडू म्हणून थाटात चालत मैदानावर गेलो. (ही ओपनींग बॅट्समनची जागा मिळवण्यासाठी मला कायकाय करावं लागलं होतं हे माझं मलाच माहीत! शिवाय त्या काळीं मस्का आजच्याइतका महाग नव्हता हें फायद्याचंच ठरलं होतं!!)

दुसर्‍या टीमचा ओपनींग बोलर आपल्या सफ़ेद पॅण्टीवर लालभडक चेंडू खुन्नसने चोळीत स्टार्ट घ्यायला धावला. खरं सांगायचं तर त्याचा तो पवित्रा पाहून मी तर जागच्या जागीच खलास झालो होतो. देवाचं नांव घेऊन मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि बॅट विकेटच्या समोर धरली. टाळ्या ऐकून मी डोळे उघडले तर पाहतो काय, बॉल सीमापार झाला होता. माझा आत्मविश्वास आता बळावत चालला होता. मी डोळे उघडे ठेवायचं धाडस केलं तर गोलंदाजाच्या डोळ्यांत मला अधिकच खुन्नस दिसून आला. मी परत डोळे मिटून घेतले. परत डोळे उघडले ते "कॅच" ह्या ओरडण्याने. मी बावरून इथंतिथं पहात होतो तेवढ्यात अंपायरने "नो बॉल" म्हणून खूण केली. बोलरनं तिसर्‍यांदा स्टार्ट घेतला. मी डोळे उघडले ते परत एकदा गर्दीतून ओरडण्याचा आवाज ऐकून. मी मागे पाहिलं तर मला एकच स्टम्प दिसला. बाकीचे दोन स्टम्प्स कुणी, कुठं आणि कशासाठी नेले असावेत याचा विचार करत असतांनाच समोर पाहिलं तर अम्पायरचा हात वर गेलेला दिसला. समोरून गोलंदाज मला चिडवीत घरी जायच्या खुणा करतांना दिसला.

मी शांत चेहर्‍याने मैदानाबाहेर चालायला लागलो. कुणाच्या काही लक्षांत येण्यापूर्वीच मी माझी नवीन वजनदार बॅट आधी अम्पायरच्या व मग बोलरच्या टाळक्यात हाणली. आणि धावत घराकडे पळालो. ह्या प्रसंगानंतर मात्र आमच्या (दुष्ट) प्रिन्सिपलनीं मला शाळेतून क्रिकेटच काय पण कुठलाच खेळ खेळायची बंदी केली. एवढंच नाही तर त्यांनी शाळेंतून मुळी क्रिकेटच बंद केलं.

अशा दु:खद प्रकारे माझ्या क्रिकेटची "इनींग्स" नीट सुरु व्हायच्या आधीच संपली. नाहींतर क्रिकेटच्या इतिहासांत माझं नांव नक्कीच अमर झालं असतं! जाऊंदे! काही लोकांना नशीबाची साथ कधीच मिळत नसते हेंच खरं!!!