Friday, April 23, 2010

वरातीमागून घोडं!

( एक बस-स्टॉप. संध्याकाळची आळसावेली वेळ. स्टॉपवर एक कॉलेज तरूण जांभया देत उभा आहे. हातात एकदोन रंगीत मासिकं. कानांवर Walkman. काही वेळाने स्वत:शीच शिव्या हांसडून मासिकं वाचायला लागतो. पुन्हा जांभया.. पुन्हा मासिकं. तेवढ्यात एक मध्यमवयीन बाई, शिक्षिका, प्रवेश करते. हातात वह्यांचा गठ्ठा. येऊन त्या तरुणाकडे उभी रहाते. त्याच्या जांभया अजून सुरूच. हळूच वाकून त्याच्याकडे बघते. तो तोंड फिरवून जांभया देतो. कसलंतरी बोलणं सुरू करायचा तिचा निष्फळ प्रयत्न चालूच आहे. )
बाई : Excuse me, इथं चार, दोन, शून्य नंबरची बस मिळेल का? (तरूण जांभई देतो.) Excuse me, पण मी तुम्हाला विचारलं इथं चार, दोन, शून्य नंबरची बस मिळेल का?
( पुन्हा जांभई. त्याच्या पाठीवर जोराने थाप मारीत) मी तुला विचारलं, इथं चारशे वीस नंबरची बस मिळेल का? (हातातील मासिक बाजूला सारून तिच्याकडे बघून मोठ्याने जांभई देतो.)
बाई : कुठल्या शाळेत होतात तुम्ही ... तू?
तरूण : (कानावरचा वॉकमन दूर सारून) मला काही विचारलं तुम्ही?
बाई : हो, तुझ्याकडेच बोलत होते मी.
तरूण : ("काय कटकट आहे!" या आविर्भावात) काय आहे?
बाई : कुठल्या शाळेत होतास रे तू?
तरूण : तुमच्या शाळेत नक्कीच नव्हतो.
बाई : ते दिसतंच आहे. माझ्या चाळीस मुलांपैकी एकही इतका बेशिस्त नाही.
तरूण : काय झालं?
बाई : मघापासून मी हज्जारदा विचारलं असेल.
तरूण : काय?
बाई : चारशे वीस नंबरची बस इथं मिळते का?
तरूण : दोनदाच विचारलं होतं तुम्ही.
बाई : पण तुम्ही... तू ऐकूनही उत्तर दिलं नाहीस. म्हणून म्हटलं मी, माझ्या चाळीस मुलांपैकी एकही इतका बेशिस्त नाही.
तरूण : अहो बाई, हा सार्वजनिक बस स्टॉप आहे. ह्या पाटीवर इथं थांबणार्‍या सगळ्या बसचे नंबर्स लिहिलेले आहेत. तुमच्या हातांत हा वह्यांचा गठ्ठा आहे, म्हणजे तुम्हीं एक शिक्षिका आहात. म्हणजे नक्कीच तुम्हांला वाचता येत असेल. मग उगीच मला बोलण्याचा आणि तुम्हाला ऐकण्याचा त्रास नको म्हणूनच सांगितलं नाही.
बाई : पण काही सभ्यता म्हणून आहे की नाही? लोकांनी माहिती विचारली की ती सांगणं ही साधी नागरीकत्वाची गोष्ट आहे. निदान एका आदर्श नागरीकाचं ते पहिलं कर्तव्य आहे.
तरूण : (तिला मध्येच थांबवून) हे बघा, शाळा संपल्यावर तुम्ही या बस-स्टॉपवर आलात, म्हणजे तुमची शाळा जवळच असेल. म्हणजे तुम्ही रोजच या स्टॉपवर येत असाल. म्हणजे तुम्हाला नक्कीच माहीत असेल की मुंबईच्या बसेस रेग्युलरली इर्रेग्युलर येत असतात. म्हणजे ... (बाई जांभई देते.) कंटाळलात ना? माझंही अगदी तसंच झालं होतं. (हात पुढे करून) द्या टाळी. (पटकन हात मागे घेत) सॉरी, तुमच्या हातात हे ओझं आहे. लक्षातंच गेलं नाही माझ्या. परत सॉरी.
बाई : तसे तुम्ही अगदीच असभ्य वाटत नाही. मघाशी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तेव्हा मला वाटलंच की तुमचा स्वभाव थोड रुक्ष असेल. पण तुमची विनोदबुद्धी तशी वाईट नाही.
तरूण : माझ्या विनोदबुद्धीचा आणि बसचा काय संबध?
बाई : दूरचा आहे, पण आहे. मी आल्यापासून पहातेय, तुमचा जांभया देण्याचा कार्यक्रम चालूच आहे. म्हणजे तुम्हाला जांभया देण्याचा मुळीच कंटाळा आलेला नाही. म्हणजे तुम्ही कुणाची तरी वाट बघत आहात. आणि बस बराच वेळ आलेली नाही.
तरूण : किंवा एवढ्यात येणार सुद्धा नाही.
बाई : म्हणून तर. दिवसभर वह्या तपासून व बोलून बोलून मी अगदी थकून गेले होते.
तरूण : वाटत नाही मात्र तसं. अजूनही दांडग्या उत्साहाने बोलताहात तुम्ही.
बाई : शिक्षिका होण्याचा हा मोठा फायदा आहे. एकदा सवय झाली की सारखं बोलायला काही वाटत नाही. ऐकणारी माणसं थकतील एक वेळ. हो, सुरवातीला जरा कठीण जातं, पण... सवयीने थकायला होत नाही. आजमात्र मी विलक्षण थकून गेले होते. सारखी काळजी वाटत होती की बससाठी उभं असताना वेळ कसा जाईल. तुम्हाला, सॉरी, तुला पाहिलं अन वाटलं, बोलायला कुणीतरी मिळालं. म्हणून बोलायचा प्रयत्न करीत होते. मघापासून मला सुद्धा भयंकर वाटतंय की भलीमोठी जांभई द्यावी. पण ह्या वह्या...
तरूण : त्या वह्या द्या माझ्याजवळ. मी धरतो थोडा वेळ. तुम्ही खुशाल हव्या तेवढ्या जांभया द्या.
( बराच वेळ कसरत केल्यावर तरूण बाईंच्या हातातील वह्या आपल्या हातात घेतो व कश्याबश्या धरून ठेवायचा प्रयत्न करतो. बाई जांभया द्यायचा प्रयत्न करतात, पण काही केल्या जांभई येत नाही. तरूण हसायला लागतो. बाई रागाने त्याच्याकडे बघतात. )
तरूण : सॉरी, तुम्हाला नव्हतो हसत. पण कधीकधी ह्या जांभया देखील बससारख्या असतात. हव्या तेव्हा येत नाहीत. द्या टाळी.
( हातांतल्या वह्या संभाळून टाळी द्यायचा प्रयत्न करतो, पण जमत नाही. एवढ्यात आतून एक तरुणी ओठांना लिपस्टिक लावीत प्रवेश करते. तरूण तिला हात दाखवून बोलवायचा प्रयत्न करतो, पण जमत नाही. या प्रयत्नात त्याच्या हातातील काही वह्या खाली पडतात. खाली वाकायचा केविलवाणा प्रयत्न करतो आणि बाईकडॆ बघतो. बाई काहीशी रागावून खाली वाकते आणि वह्या गोळा करायला लागते. )
बाई : तुझ्या हातातून खाली पडल्या, म्हणजे निदान खाली वाकून गोळा करायला तुला काही हरकत नव्हती.
तरूण : काहीच हरकत नव्हती, पण त्याचं असं आहे ... की ... की... (घुटमळतो.)
तरुणी : त्याचं असं आहे की टाइट जीन्स घालून खाली वाकणं म्हणजे कॉलेजमध्ये लेक्चर्स अटेण्ड करण्यासारखंच कठीण आहे. म्हणून तर मीसुद्धा वाकले नाही. नाहीतर माझी आई टीचरच आहे, आणि रोज वह्या घरी घेऊन येत असते. (बोलताबोलता बाईला ओलांडून तरुणाकडे येते.)
बाई : (तरुणीला ओलांडून पुढे आपल्या जागी येत) हरकत नाही. घरी संवय आहे मला ह्याची. म्हणूनच मी शाळेत एकाही मुलाला टाइट कपडे घालायची परवानगी देत नसते.
तरुणी : (बाईंना ओलांडून तरुणाकडे येत) बाई, प्लीज़, आम्ही एकाच कॉलेजात आहोत.
बाई : बरं आहे.
तरुणी : एकाच वर्गात आहोत.
बाई : छान आहे.
तरुणी : एकाच बेंचवर बसतो.
बाई : उत्तम आहे. मग मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे.
तरुणी : मघापासून मी तेंच सांगायचा प्रयत्न करतेय़.
बाई : काय?
तरुणी : आम्हाला एकत्र राहूं द्या. नाहीतरी स्टॉपवर गर्दी नाहीच आहे.
बाई : मग बसा ना बसमध्ये गेल्यावर एका सीटवर. गर्दी नाही ना? पण आतां गर्दी सुरु होईल. शाळा, ऑफिसं, सिनेमे सुटून लोक येतच असतील. तेव्हा बसेस सुद्धा भरून येतील.
तरूण : वाट बघा. म्हणे बसेस येतील! भरून काय किंवा रिकाम्या काय!
बाई : मी तरी वेगळं काय म्हणतेय? पण समजा मी तुम्हाला माझ्या पुढे जाऊं दिलं आणि बस आली आणि ती भरलेली असली ... समजा हं ...तर मग मला जागा कशी मिळणार? आणि जागा नाही मिळाली तर मी घरी उशीरा पोचेन. आणि मी घरी उशीरा पोचले, तर माझी ट्यूशनची मुलं माझी वाट पाहतील. ट्यूशन संपवून नंतर मला लग्नाला जायचं आहे. जर मी तुम्हाला पुढे जाऊं दिलं तर हे सगळं मला कसं शक्य होईल? बोला, बोला.
तरूणी : काय बोलणार, कप्पाळ? तुम्हाला स्वत:चा आवाज़ इतका आवडतो की तुम्ही दुसर्‍या कुणाला बोलायलाच देत नाहीत.
तरूण : पण काय हो बाई, तुम्हीं खरोखरच लग्नाला जात आहात? काय योगायोग आहे बघा, मीसुद्धा लग्नाला जातोय.
तरुणी : मी सुद्धा.
बाई : बरं झालं बाई, आपल्याला एकमेकांची सोबत होईल. मंडपात भेटूच आपण.
( एक माणूस येऊन रांगेत उभा रहातो. )
तरूण : काय हो, बहुतेक तुम्हाला देखील लग्नालाच जायचं असेल? (माणूस मान डोलावतो.) वा! आज लग्नाची वरातच निघालेली दिसतेय. कुणाच्या लग्नाला?
( माणूस खिशांतून एक पत्रिका काढून दाखवतो. )
तरुणी : (पत्रिका पहात) अय्या, हे आपल्याच लग्नाला चाललेयत.
बाई : (आश्चर्याने) अय्या, तुमचं लग्न, आणि तुम्ही अजून इथंच? बसच्या रांगेत? व्हा हो तुम्ही पुढे.
तरुणी : (लाजून) आमचं म्हणजे अगदी आमचंच नव्हें. आमच्या लग्नाला अजून घरच्यांनी परवानगी दिलेली नाही. पण आम्ही ज्या लग्नाला जातोय ना, त्याच लग्नाला हे सुद्धा चाललेयत.
( तो माणूस जोराजोराने मान डोलावून होकार दर्शवितो. )
बाई : कायहो, तुम्हाला कुणी "हाताची घडी, तोंडावर बोट" करून गप्प रहायला सांगितलं आहे का? (स्वत:च्या विनोदावर खूष होऊन स्वत:च हसते. माणूस खुणा करुन सांगतो, "मला बोलता येत नाही," )
तरुणी : तरी मला वाटलंच.
बाई : काय?
तरुणी : हेंच की ह्या गृहस्थांना बोलता येत नाही.
बाई : अय्या, बोलता येत नाही? म्हणजे कठीण आहे नाही?
तरूण : बरं आहे. तेवढंच तुम्हाला त्याच्या वाटचं बोलता येईल.
बाई : (हंसत) उगीच काहीतरी वेड्यासारखं बोलू नका.
( याचवेळी आतून एक वेडा जोरजोराने हसत प्रवेश करतो. )
वेडा : खरं आहे... खरं आहे. पण मी वेडा नाही, मी प्रधान मंत्री आहे. मला बोलायला खूपखूप आवडतं, पण मी बोललेलं ऐकतं कोण? कुणीच नाही. माझी बायको सुद्धा ऐकत नाही. सगळे मंत्री बोलतात... सगळ्यांना बोलायला आवडतं, पण कुणी कुणाचं ऐकत नाही. कुणीच ऐकत नाही.
तरुणी : (मागे सरकून) मला बाई, भितीच वाटते.
तरूण : मी असताना कुणाची भीति वाटते?
तरुणी : कधीकधी तुझीच भीति वाटते, पण आतां या क्षणाला या वेड्याची भीति वाटते.
वेडा : (जोरजोरानं हसत) वेडीच आहेस. मंत्र्याला घाबरते. मंत्र्याला घाबरायचं नसतं. त्याच्याशी मैत्री करायची असते. खूप फायदे होतात.
बाई : मेली, ही बस सुद्धा येत नाही. वेळापत्रकाप्रमाणे यायला हवी.
वेडा : यायला हवी, पण येणार नाही. टाईमटेबल प्रमाणे कधीच येणार नाही. सगळे बेकार आहेत. (मोटारीचा आवाज़ काढीत) हे पण useless. (ट्रेनचा आवाज़ काढीत) हे पण य़ूज़लेस. ट्रेनचा उपयोग फक्त जीव देण्यासाठी. पण गाड्या कधीच वेळेवर येत नाहीत. मग जीव कसा देणार? बस सुद्धा वेळेवर येत नाही. सगळ्या बसनां ट्रेनखाली द्यावं आणि सगळ्या ट्रेन्सनां बसखाली द्यावं.
बाई : प्लीज़, याला कुणीतरी आवरा. नाहीतर मी वेडी होईन.
वेडा : (बाईंकडे बघून) तुम्ही टीचर आहात ना? मला माहीत आहे. मी देखील कॉलेजात टीचर होतो, पुण्याला. पण मी नव्हतों कधी विद्यार्थ्यांवर ओरडत. तुम्हीपण नका ओरडूं. मारली तर मुलं कोडगी होतात. मुलांना प्रेमाने वागवायला हवं.
तरूण : (कुत्सितपणे) बोलतो जणू डबल ग्रॅज्युएट असल्यासारखा.
वेडा : मी ग्रॅज्युएट आहे. मी सुद्धा कॉलेजात जायचो. पण नुसतं प्रेम करायला किंवा पोरींवर लाईन मारायला नव्हे, आजकालच्या ह्या मुलांसारखं. मस्ती करायचो आम्ही, पण लेक्चर्स चालूं असताना कधीच नाही. त्या वेळी आमचे प्रोफेसर काय होते! व्वा! बोलायला लागले की आम्ही पोरं चुप्प! अगदी साधे कपडे. साधं, सफ़ेद धोतर, डोक्यावर सफ़ेद टोपी. वर्गात आले की टोपी काढून टेबलावर ठेवायचे आणि म्हणायचे, "हे बघा, सरकार मला बोलण्याचा पगार देतं आणि मी बोलणार. तुम्ही ऐका किंवा नका ऐकू." पीरीयडची घंटा होईपर्यंत बोलायचे. सगळं बोलणं थेट मेंदूत जाऊन घुसायचं! बस!
तरुणी : अय्या, खरंच बसचं काय झालं?
वेडा : मी सांगितलं, बस येणार नाही. जायची घाई असेल तर टॅक्सीने जा. नाहीतर चालत जा. बसची वाट पाहू नका. सरकारचे खजीने भरू नका. (तरूणाला) सिगरेट पिता?
तरूण : (हात पुढे करीत) हो.
वेडा : मग मला पण द्या.
तरूण : माझ्याकडे नाही. मला वाटलं तुम्ही द्याल.
वेडा : (हंसत) म्हणजे लोकांकडून मागून पिता? माझ्यासारखी? मग तुमच्या-माझ्यात फरक काय? सिगरेट मिळाली पाहिजे. जिवाला बरं वाटतं. पण सिगरेट पिणं जिवाला बरं नसतं.
( बडबडत हात हलवीत निघून जातो. )
माणूस : (तरुणाला खुणेनं विचारतो) किती वाजले?
तरूण : (बाईला विचारतो) किती वाजले हो?
बाई : माझ्या हातात वह्या आहेत. दिसत नाही? तुम्हीच बघा
तरूण : तुमच्या हातात वह्या आहेत ते दिसतं मला, पण माझ्या हातात घड्याळ नाही हे तुम्हाला ...
बाई : ते मला दिसतंय. माझ्या घड्याळात बघा म्हटलं मी.
तरूण : (बाईंच घड्याळ बघत) साडे पाच वाजताहेत.
तरुणी : आणि अजून बसचा पत्ता नाही, नक्कीच लग्नाचा मुहूर्त टळणार.
तरूण : जाऊं दे ना, लग्न आपलं थोडच आहे?
तरुणी : तुला कळत नाही. लग्नाला आलेल्या बायकांच्या साड्यांच्या डिज़ाईन्स बघायला आवडतं मला,
तरूण : मग आपल्या लग्नाच्या वेळी बघ ना... हव्या तेवढ्या डिज़ाइन्स बघ.
तरुणी : त्यावेळचं त्या वेळी. पण आतां कंटाळा येतोय ना?
तरूण : (रोमॅण्टिक मूडमध्ये) मग, जवळी ये, लाजू नको. अग, ये जवळी ये, लाजू नको.
बाई : (रुक्ष स्वरात) मी बरी येऊ देईन? एवढा कंटाळा येत असेल तर जाऊन एसीवाल्या मल्टीप्लेक्स मधे बसायचं. इथं पब्लीक प्लेसमध्ये रोमांस कसला करायचा तो?
तरुणी : तुझ्या हातातला एक फ़िल्मी अंक दे ना. (तरूण हातातलं एक मासिक तिला देतो.) लंडन ड्रीम्स पाहिलास?
तरूण : First day, first show. ब्लॅकमधे. तू पाहिलास?
तरुणी : हो, कसा वाटला?
तरूण : गाणी काही खास नाहीत. स्टोरी विशेष नाही. ऍक्टींग, चालू. Dialogues भंगार. Locations बरी आहेत. असीन चिकणी दिसते. पण सल्लूमिया तिचा बाप वाटतो.
तरुणी : त्यापेक्षा शाहीदला घ्यायला पाहिजे होता... किंवा रणबीरला ... किंवा इमरानला... किंवा
तरूण : हुं, त्यापेक्षा आपण काय वाईट आहोत?
बाई : तुम्ही ’संतोषी माता की महीमा’ पाहिलात?
तरुणी : श्शी, असले सिनेमे कोण मूर्ख पहातं?
बाई : मी पहाते. काय म्हणायचंय?
तरूण : तो ... काय बरं नांव आहे त्या सिनेमाचं... हिरो-हिरॉईननं पोस्टरवर मस्त झांसू रोमॅण्टिक पोज़ दिलीय बघ...
तरुणी : मला सुद्धा नांव आठवत नाही. पण मी कशी बघणार? तो Adults Only आहे.
तरूण : डार्लींग, तू सुध्दा adult आहेस.
तरुणी : चल, बघूया.
बाई : तुम्ही लग्नाआधी हा सिनेमा बघणार?
तरूण : हॅं, आमच्या लग्नापर्यंत कसला राहतो तो?
बाई : म्हणजे, आतां लग्नाला निघाला होता ना तुम्ही? म्हणून विचारलं.
तरुणी : उद्या मॅटीनीला जाऊंया. पण कुठं भेटायचं?
तरूण : आणि कुठं? कॅण्टीन.
तरुणी : श्शी, भंयकर गर्दी असते तिथं.
तरुणी : मग तू मला बाहेरून हाक मार.
तरुणी : पण तुझं नाव सांग ना. नाहीतर मी हाक कशी मारणार?
तरूण : माझं नाव वेंकटेश कुमार. पण तू मला फक्त कुमार म्हणून बोलवलंस तरी चालेल. आणि तुझं नाव नाही सांगितलंस?
तरुणी : मला बिपाशा म्हणून बोलव. किंवा करीना... किंवा कॅट्रीना. मला काही चालेल.
तरूण : बिपाशाच ठीक आहे. Hi Bips, glad to meet you.
बाई : तुम्ही दोघे एकाच वर्गात आहात असं म्हणत होता ना तुम्ही? मग एकमेकांचं नांव सुद्धा कशी माहीत नाहीत?
तरूण : बाई, दीडशे जणांच्या क्लासमध्ये सगळ्या मुलींची नावं कुणी लक्षांत तरी कसं ठेवणार?
बाई : (तरुणीला) बाई, तुम्ही इथं उभ्या राहू शकतां, नाहीतर उद्यापर्यंत हे तुमचं नाव देखील विसरतील.
( तरुणी आणि बाई आपापल्या जागा बदलतात. आंतून एक गुजराथी शेठ येतो. )
शेठ : (मुक्या माणसाला) अरे ओ, मोटाभाई, आ बस कयां जाअशे?
( उत्तर नाही. मुका माणूस खांदे उडवतो. )
शेठ :(पुन्हा) अरे मोटाभाई, अमे तारे संग बात करूं छूं. आमी विचारते आ बस कुठे जाते?
तरूण : ओ मोटाभाई, शूं थयूं?
शेठ : मी ये मोटाभाईला विचारते की हे बस कुठे जाते, तर हे जवाब नाही देते.
तरूण : सेठ, मी तुमाला जवाब देते. तमाला कुठे जवाचे हाय?
शेठ : तू तो बहु सारू छोकरा छे. मला शादीमंदी जवानू छे.
तरूण : सेठजी, तमे तो करेक्ट लाइनमंदी आव्या छे. तुमचा शादी माहीममंदी छे ना?
शेठ : (खुश होऊन) अरे, तमे केम खबर?
तरूण : सेठजी, आज सब माणूस माहीममंदीच शादीला जाते. मी पण शादीला जाते, ए माझी गर्ल फ़्रेण्ड पण लगीनला जाते. आ मोटी बेन पण शादीलाच जाते. इधर आज पूरा वरात खडा छे.
शेठ : बहुत टाइमपासून बस नाय आला काय?
तरुणी : अर्धा तासका वर हो गया, पण बसका अभीतक पत्ताच नही हमकू तो बहुत कंटाळा आला.
शेठ : केम डिकरी, तमाला वाटते की आज बारिस येल?
तरूण : सेठ्जी, वैसा पावसाळेका दिवस नही है, तो मेरेकू वाटता है की बारीस नाई येईल, पण मुंबईका बारीसका कुछ खात्री नही. वैसा ए बसका पण खात्री नहीं. आयेगा तो वेळपे आयेगा, नही तो रखडायेगा. पण खरं सांगनेका तो पाऊस आयेगा तो बॉडी थोडा ठण्डा होएगा. ठण्डा ठण्डा कूल कूल.
तरुणी : ए मिस्टर कुमार, तू बोलत असलेली हिंदी आपली राष्ट्रभाषा करायला हरकत नाही. कुठून शिकलास ही बंबयिया हिंदी?
तरूण : बम्बईमेच. आणि बिप्स, थोडी भंकस केली याची. तशी माझी हिंदी चांगली आहे.
( ह्याचवेळी आतून एक तरूण माणूस घाईघाईने प्रवेश करतो. अंगावर मस्तपैकी नवीन सूट आहे. )
तरूण 2 : (मुक्या माणसाकडे बघून) Excuse me please, how long are you waiting for the bus?
तरूण : You excuse him please. त्याला बोलता येत नाही.
तरूण २ : (नखर्‍यात बोलतो) ओह, त्याला इंग्लिश येत नाही?
तरूण : (जास्त नखर्‍याने) त्याला इंग्लिश येत नाही; मराठी येत नाही; राष्ट्रभाषा हिन्दी येत नाही. त्याला बोलताच येत नाही. बहुतेक तुम्ही देखील लग्नालाच चाललाय?
तरूण २ : (आश्चर्याने) तुम्हाला कसं कळलं?
तरूण : आतां कसं सरळ मराठी बोलायला लागलात? गम्मत म्हणजे आज ह्या स्टॉपवरची सगळी मंडळी लग्नालाच चालली आहेत. तुमचं लग्न देखील माहीमलाच आहे ना?
तरूण २ : कमाल झाली,
तरूण : कमाल काय त्याच्यात? आज ह्या स्टॉपवर लग्नाची वरातच भरली आहे. आम्ही सगळे जण माहीमलाच लग्नाला निघालोय.
तरूणी : पण ह्या गरमीत तुम्ही अगदी सूट वगैरे घालून, म्हणजे कमाल आहे.
तरूण २ : नाईलाज आहे. बघूं, कुठल्या हॉलवर आहे तुमचं लग्न? (तरूण कार्ड दाखवतो.) ही तर खरोखरच कमाल झाली.
तरूण : आता काय झालं?
तरूण २ : अहो, माझं लग्नसुद्धा ह्याच हॉलवर आहे.
बाई : (थट्टेच्या सुरात) अय्या, तुमचं लग्न आणि तुम्हीं अजून इथेच?
तरूण : अहो बाई, काय मस्करी करताय? ह्यांच लग्न असतं तर ते अजून इथे कसे असते? उगाच काहीतरी बोलता!
तरूण २ : बस आली तर प्लीज़ मला आधी जाऊं द्याल? मला खूप घाई आहे.
तरूण : घाई आम्हालाही आहे. पण काय करणार?
तरुणी : मुहुर्ताआधी पोचलंच पाहिजे आम्हाला.
तरूण २ : मलाही मुहुर्ताआधी पोचलं पाहिजे. सगळेजण हॉलवर माझी वाट पहात असतील.
तरूण : वाट आमची देखील पाहत असतील. आणि तुम्हाला तेवढीच घाई असेल पर रजा काढायची होती आजचा दिवस.
तरूण २ : रजा असायला हवी ना शिल्लक? सगळी रजा केव्हाच संपली. आज रजा विचारली असती तर साहेबानं घरीच बसायला सांगितलं असतं. म्हणून ठरवलं की घरून निघतानाच सूट घालून निघावं. ऑफिस सुटलं की बस घेऊन थेट मंडपात पोचायचं. पण ऑफिसाला गेल्यावर अजून एक भानगड झाली.
तरूण : काय झालं?
तरूण २ : बॉसने मला सूटमधे पाहिलं आणि वैतागला. मला कॅबीन मधे बोलावून घेऊन म्हणतो, "कारकुनाने कारकुनासारखंच रहावं. साहेबासारखं सुटाबुटामधे येऊं नये. आजच्यापुरतं ठीक आहे. पण ह्यापुढे कधीहि सूट घालून ऑफिसला आलात तर मला चालायचं नाही."
तरूण : मग तोंड न उघडता तुम्ही सगळं काम संपवलं आणि बाहेर पडलात, तर बस-स्टॉपवर ही गर्दी. खरं ना? (हसतो.)
( मुका माणूस आतल्या बाजूला पाहून कसलेसे हातवारे करतो. )
शेठ : आता य्हेला काय झाला?
तरूण : तो सांगतोय की बस येतेय.
( सगळेजण पुढे सरसावतात. )
तरूण २ : (विनवणीच्या सुरात अगदी हात जोडून) प्लीज़, मला पुढे जाऊं द्या.
सगळेजण : पण का?
तरूण २ : आत्तां कसं सांगू? तुम्ही ह्या लग्नाला गेला नाहीं तरी चालेल, पण मला कसंही करून हे लग्न अटेण्ड करायलाच हवं.
सगळेजण : (ओरडून) पण का?
तरूण २ : कारण मी ह्या लग्नातला नवरदेव आहे.
सगळेजण : (ओरडून) काय़ सांगताय?
तरूण २ : अगदी खरं सांगतोय. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे मला आजही रजा नाही मिळाली. माझ्या होणार्‍या बायकोला लग्नाआधीच रोमान्स करायचा होता. त्यामुळे सगळी रजा लग्नाआधीच संपली. आणि आज खरी रजेची गरज होती तेव्हा साहेब नखरे करायला लागला. स्वत: बाल-ब्रम्हचारी आहे ना? म्हणून शेवटी ठरवलं की थेट ऑफिसातून मंडपात जायचं. गाडीची व्यवस्था केली होती तर ऐन वेळी ड्रायव्हरने दगा दिला. त्यालापण आजच पळून जाऊन लग्न करायचं होतं. ऐनवेळी टॅक्सी मिळेना म्हणून बससाठी आलो. तर इथं ही तोबा गर्दी. एक बरं होतं की लग्नाचा मुहूर्त संध्याकाळचा होता.
( सगळेजण एकत्र बोलू लागतात. कुणाचं कुणाला काही ऐकू येत नाही. शेवटी ... )
बाई : नवरदेव, तुम्ही पुढं जायला आमची हरकत नाही.
तरूण : माझी देखील नाही.
तरुणी : (लाजत) कुमारची नाही तर माझीसुद्धा नाही.
शेठ : मला पन चालेल.
( मुका माणूस डोके हलवून सम्मति देतो. )
तरूण २ : Thank you so much, मित्रांनो. आणि हो, तुम्ही माझ्या लग्नाला येणारच आहात, तेव्हां जेवूनच जायचं. कबूल?
सगळेजण : (ओरडून) कबूल... कबूल ... एकदम कबूल.
तरूण : तुम्ही असं करा. तिथून चालती बसच पकडा. नाहीतर तुमचं लग्न पार पडेल आणि तुम्ही इथंच असाल बस-स्टॉपवर.
बाई : म्हणतात ना, "वरातीमागून घोडं!"

लेखक
लक्ष्मीनारायण हटंगडी
EC51/B104, Sai Suman CHS,
Evershine City, Vasai (E)
PIN 401208
(e-mail: suneelhattangadi@gmail.com)

Thursday, March 4, 2010

युद्ध !

अविनाशने घेतलेला निर्णय ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. काही जणांनी आ वासले, काहींनी चक्क तोंडात बोटं घातलीं, तर काहींनी भुवया उंचावल्या -- क्रिया वेगवेगळ्या, पण प्रतिक्रिया एकच, आश्चर्याची! अन कुणालाहि आश्चर्य वाटणं अगदी साहजिकच होतं. अविनाशने घेतलेला तो निर्णयच तसा चमत्कारिक होता. अविनाशने युद्धावर जायचं ठरवलं होतं.
अविनाशने आपला बेत जाहीर केला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला वेड्यात काढलं; त्याच्या आईनं काळजीनं कपाळावर हात मारला; त्याची धाकटी बहीण त्याला चिडवायला लागली, व मित्रांनी चेष्टा करायला सुरवात केली. अवि युद्धावर जातो म्हणजे काय चेष्टा आहे?
बर्‍याच वर्षांमागे चीनने केलेल्या हल्ल्याने भारतावर अचानक कोसळलेल्या संकटाची आठवण इतक्या वर्षांनंतर अजूनही सर्वांच्या मनात ताजी होती. त्यावेळीं लाल चीनी फौजा अखंड भारताचं स्वातंत्र्य, भारताची सरहद्द लुटू पहात होत्या. भारताची अब्रू धोक्यात होती, अन हा धोका टाळण्यासाठी सर्वच बाजूंनी प्रयत्न केले जात होते. चीनी आक्रमणाला तोंड देण्यासाठी त्यावेळी सुद्धा भारतीय फौजेत सैनिकांची भरती चालू होती, चोहीकडे फ़ंड गोळा केले जात होते. आणि सध्या वर्तमानपत्रांमधून छापल्या जाणार्‍या बातम्यांनी परत एकदा भारतीय जनतेला सक्त ताकीद दिली होती की चीनकडून असलेला धोका अजूनही मूर्त स्वरूप घेऊ शकत होता. पण हे सगळं कितीहि खरं असलं तरी अविनाशने ... अविनाशने, युद्धावर जाण्याचा धाडसी (मूर्ख!) निर्णय घेणं म्हणजे जरा, जरा नव्हें, फारच विचित्र वाटलं सर्वांना.
तसा अविनाश एकदम फाटक्या प्रकृतीचा होता अशातली गोष्ट नव्हती. चांगला बावीस वर्षांचा गब्रू तरूण होता अविनाश. पांच फूट, सहा इंच उंची व सत्तर-ऐंशी किलोचं वजन. एकूण काय चेष्टा नव्हती राव! कुणाच्याहि डोळ्यात पटकन भरावी अशी शरीरयष्टी होती त्याची.
मॅट्रीक पास होऊन अविनाशने कॉलेजात ऍडमिशन घेतली तेव्हा बर्‍याच जणानी त्याला एन. सी. सी. जॉईन करण्याचा सल्ला दिला. बहुतेक गोष्टी दुसर्‍यांच्या मर्जीनुसार करणार्‍या अवीनं तो सल्ला मान्य करून लगेच एन. सी. सी.त नाव नोंदवलं. कॉलेजच्या मोकळ्या वातावरणानं दिपून गेलेल्या अवीला एन. सी. सी.चं आकर्षण पहिल्या प्रथम भारी कौतुकास्पद वाटलं, पण नंतर-नंतर त्याला त्या वातावरणाचा कंटाळा येऊ लागला. इतर मित्रांनी कॉलेजसमोरच्या मोठ्या झाडाखाली किंवा कॉलेज-कॅण्टीनमधे बसून टवाळक्या करीत येणार्‍याजाणार्‍या मुलींची टेहेळणी करीत असताना आपण मात्र निस्तेज खाकी गणवेषात "डावा-उजवा" करीत रहावं याचा त्याला लवकरच वीट यायला लागला. बघता-बघता त्यानं परेडींना दांड्या मारायला सुरवात केली. एवढंच नव्हे, आपल्या इतर मित्रांबरोबर त्यानं पोरींना पाहून चक्क शीळ घालायला देखील सुरवात केली.
अशाच एक प्रसंगी अविनाशची शीलाशी ओळख झाली. कॉलेज सुटलं होतं. अविनाश तास बुडवून आपल्या मित्रांबरोबर आधीच खाली उभा होता. त्यांची टेहेळणी चालूच होती. काही वेळाने बिल्डींगमधून मुलींचा एक तांडा बाहेर पडला.
"ए अवि, ती बघ शीला चाललीय," एका रोमिओनं अविनाशला हटकलं.
शीला देसाई कॉलेजची ’क्वीन’ समजली जात होती. तिची पाठ वळल्यावर तिच्याबद्दल वाटेल ते बोलायची संवय सगळ्या पोरांना असली तरी तिला तोंड द्यायला सगळेच टरकत होते.
"ए अव्या, ती बघ ना, ’शिळा’ चाललीय," रोमिओने त्याला पुन्हा हटकलं.
अवीने बेफिकिरीने खांदे उडवले व म्हटलं, " हॅं, तिला काय वेगळं पहायचं? रोजच भेटतो आम्ही कॉलेजच्या बाहेर."
"फॅण्टॅस्टिक यार! बहोत खूब!! चिडियाके पर उगने लगे हैं. हल्लीच तर अंड्यातून बाहेर पडून हे पोरींचे धंदे शिकलायस, अन म्हणे रोजच भेटतो! अहो मिस्टर, तिची फक्त स्वप्नंच पहा. ती कुणालाच लाईन देत नाही. समझ्या क्या?", अवीच्या एका मित्राने चावी फिरवली.
हे ऐकून अविनाशचा स्वाभिमान डिवचला गेला. विचार न करता आपल्या दोस्तांवर इम्प्रेशन मारायला बोललेले शब्द मागे घेणे तर शक्य नव्हतं त्याला. नुकत्याच फुटलेल्या मिशातल्या मिशात त्याने एक मंद हास्य केलं व तो म्हणाला, "बघायचंय काय, लेको?"
"हो जाये चायलेंज," सर्व पोरं इतक्या मोठ्याने ओरडलीं की पूढून जाणार्‍या मुलींनी पटकन मागे वळून पाहिलं. ही संधि साधून सर्वांनी अविनाशला पुढे ढकललं. चेष्टेच्या भरात पुढं फेकलं गेलेलं पाऊल पुन्हा मागे घेणं मुळीच जमलं नसतं त्याला. अविनाश हळूच पुढे सरकला व बोलला, "एक्स्क्यूज़ मी, मिस देसाई..."
शीलाने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं व ती जराशी थांबली. आपल्या मैत्रिणीला थांबलेली पाहून इतर मुली पुढे चालू लागल्या. पाहिलं न पाहिलसं करून ती म्हणाली, "मिस्टर, आत्ता कसली चॅलेन्ज द्यायची आहे मला?"
हे ऐकून अविनाश थोडासा गोंधळला, पण लगेच स्वत:ला सावरून त्याने बोलायला सुरवात केली, "त्याचं असं आहे, मिस देसाई, माझे मित्र ..." त्याने दबल्या आवाजात सगळा खुलासा केला. त्याचा खुलासा ऐकून शीला खुदकन हसली अन म्हणाली, "तर तुम्हाला आपल्या मित्रांना दाखवून द्यायचंय की तुम्ही व मी रोजच भेटतोय?" शीलाचा तो खणखणीत सवाल ऐकून अविनाशने ओशाळून मान डोलावली. "ठीक आहे. मग आपण असं करूया. याआधी जरी आपण रोज भेटत नसलों, तरी यापुढे रोजच भेटत जाऊं. मग तर तुमच्या मित्रांची खात्री पटेल. काय विचार आहे?"
सॉलीड खुश होऊन, अवीने सिनेमातल्या एखाद्या हीरोसारखी, पण मनातल्या मनात, कोलांटी उडी मारली. हलकेच त्यानं मागे वळून पाहिलं व आश्चर्याने थक्क झालेल्या आपल्या मित्रांना वेडावून दाखवून आपल्या ’कॉलेज क्वीन’ बरोबर चालायला सुरवात केली.
त्या दिवसानंतर अविनाश व शीला दोघंही जोडीनंच हिंडताना दिसूं लागले. त्यांचं एकमेकांवर प्रेम असल्याच्या गुजगोष्टी उघडपणे बोलल्या जाऊं लागल्या. पण आता अवीला त्याचं काहीच वाटत नव्हतं. आता तो आपल्या मित्रांबरोबर कमी व शीलाबरोबर जास्त दिसायला लागला. पण त्यानं कशाचीहि पर्वा केली नाही, कारण एव्हांना तो शीलासाठी पार वेडा झाला होता. त्याला प्रेमाची धुंदी चढली होती.
पण एकदा अचानक जेवढ्या वेगाने त्याला प्रेमाची धुंदी चढली होती तेवढ्याच वेगानं त्याची धुंदी उतरली देखील. त्या दिवशी संध्याकाळी शीला अवीला भेटली ती पडलेला चेहरा घेऊनच. तिचा तो चेहरा पाहून अवीला विलक्षण भीति वाटली. "काय झालं शीला?", त्यानं विचारलं.
"अविनाश, जे घडू नयें होतं अगदी तेच घडलंय," शीला उत्तरली. "तो टीव्हीवर कार्यक्रम यायचा ना..."
तिला मधेच तोडून अवीने विचारलं, "कुठला?"
"घडलंय, बिघडलंय. नाव त्या कॉमेडी कार्यक्रमाचं. आपली मात्र ट्रॅजडी झालीय, अवि."
"शीला, तो रामगोपाल वर्मा आपले सिनेमे उगीच ताणतो तसं ताणूं नकोस. काय झालंय ते स्पष्ट सांग.", अविनाश म्हणाला.
"अविनाश, तू जीव वगैरे देणार नाहीस ना, ही बातमी ऐकून? वचन दे तू मला", शीला अजूनच ताणत म्हणाली.
"नाही देणार मी जीव. पण तू आता स्पष्ट नाही सांगितलंस ना, तर माझा जीव तसाच जाईल."
"अवि, बाबांनी माझं लग्न ठरवलंय ... माझ्या मर्जीविरुद्ध."
"पण का? कुणाशी?? केव्हां??? कब, क्यों और कहाँ?" अविनाशने प्रश्नांचा भडिमार केला.
"उद्या साखरपुडा आहे माझा. बाबांनी माझं लग्न सैन्यातील एका ऑफिसरशी निश्चित केलंय."
अविनाशला हे ऐकवेना. त्याला के. एल. सैगलचं ते दर्दभरं गाणं आठवलं, "मेरे दिलके टुकडे हज़ार हुए, कोई यहां गिरा, कोई वहां गिरा." तो काहीवेळ इथेतिथे पहात राहिला, जणू काही अस्ताव्यस्त पसरलेल्या हृदयाचे तुकडेच शोधत होता तो. पुढल्याच क्षणी शीलाला गदगदा हालवीत तो म्हणाला, " पण आपलं प्रेम आहे एकमेकांवर, शीला, त्याचं काय? तो अगदी कितीहि मोठा ऑफिसर असला, अगदी आर्मी, नेव्ही किंवा एयरफोर्समधला का होईना, तरी तुझ्या मर्जीविरुद्ध तो तुझ्याशी थेट लग्न कसं काय करूं शकतो? तुझ्यावर ही असली ज़बरदस्ती का?"
"अविनाश, आपल्या भारतावर देखील कसली ज़बरदस्ती होतेय माहीत आहे ना तुला? आधी तो लाल चीनी शत्रू झाला, मग पाकिस्तान, मग ... मग ... " अजून काही शत्रूंची नांवं न आठवून शीला म्हणाली, "मग ते कठोर आतंकवादी! आपल्या भारतमातेवर कसले अन्याय होतायेत माहीत आहे ना तुला? मग असं असताना मी माझ्यावर होत असलेल्या या छोट्याशा अन्यायाविरुद्ध कसं काही बोलूं शकले असते? तूच सांग मला. सगळीकडे द्रव्यदान, श्रमदान, रक्तदान, वगैरे दानांचं प्रस्थ माजलेलं असतांना माझ्या बाबांनी माझी कन्यादान करायचं ठरवलं तर त्यात काय वावगं आहे? त्यांना दुसरं काहीच करणं शक्य नव्हतं, अविनाश."
शीलाचं हे स्पष्टीकरण ऐकून अविनाशला काहीच उत्तर सुचेना. बराच वेळ शांतपणे विचार करून शेवटी तो निश्चयाने म्हणाला, "शीला, मला पटतं तुझं म्हणणं. या परिस्थितीत देशासाठी कसलंतरी दान करणं माझंही कर्तव्य ठरतं. शीला, माझ्या लाडके, मी देशासाठी प्रेमदान करायचं ठरवलंय."
अन दुसर्‍याच दिवसापासून जेवढ्या चक्री वादळाच्या वेगाने अवि-शीलाच्या प्रेमाची बातमी झंज़ावाताप्रमाणे सगळीकडे पसरली होती तेवढ्याच वेगाने त्या दोघांचं प्रेम बळी पडल्याची बातमी सर्वकडे पसरत गेली. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सगळीकडे पुन्हा एकदा त्या दोघांबद्दल बोलणीं सुरू झालीं. त्यांतच अविनाशने युद्धावर जाण्याचा आपला दृढनिश्चय जाहीर केला.
अविनाशच्या अपूर्व देशभक्तीचं सगळ्यांनी तोंड भरभरून कौतुक करायला सुरवात केली. पण या गोष्टीचं खरं कारण कुणालाच माहीत नव्हतं ---
एक अविनाश व दुसरी शीला देसाई सोडून !


लक्ष्मीनारायण हटंगडी

मित्र

संध्याकाळची वेळ होती. बाहेर अंधार पडू पहात असला तरी दुकानात दिवे चकाकत होते. रस्त्यावरून जाणार्‍यायेणार्‍या गर्दीकडे पहात मी उभा होतो. आत फारशी गर्दी नव्हती. दिवसभर काम करून थकलेले काही सैनिक दारूच्या बाटल्या समोर ठेवून गप्पा मारीत बसले होते. मला विशेष काम नव्हतं. आळसावलेल्या नजरेने मी माझ्या बाहीकडे पाहिलं, व स्वत:शीच हसलो. कापडाच्या तीन सफ़ेद फिती होत्या माझ्या शर्टावर. अकरा वर्षांच्या सर्वीसनंतरही मी अजून हवालदार म्हणून वावरत होतो; बदली झाली की एका जागेवरून दुसर्‍या जागी आपल्या बॅरेक्स बदलत फिरत होतो. माझ्याबरोबरचे काहीजण माझ्याहि पुढे निघून गेले होते.. पण मी? दुकानातील एका कोपर्‍यात उभा राहून दुकानात आलेल्या-गेलेल्या लोकांची नोंद ठेवत होतो. सहा महिन्यांपासून इथं अंबाल्याला पोस्टींगवर होतो. त्याआधी काश्मीरला; त्याआधी बॅंगलोरला. काय विचित्र असतो जीवनप्रवाह, कुठून कुठे आणून ठेवतो माणसाला!
"मिस्टर, एक ब्ल्यू सील बाटली द्या."
मी दचकून समोर पाहिलं व समोर असलेल्या व्यक्तीला सलाम ठोकला. असले कित्येक सलाम ठोकले असतील मी आजवर. माझ्या पुढ्यात एक दिमाखदार मेजर उभा होता. मला उगीचच त्याचा हेवा वाटला. शक्य असतं तर मी अगदी कुणालाच सलाम केला नसता, पण परिस्थितीनं मला साथ दिली नव्हती. मी बाजूच्या शेल्फवरून एक बाटली उचलून त्याच्या समोर आपटली.
मी जेवढ्या उद्वेगानं बाटली त्याच्या समोर आपटली होती तेवढ्याच शांततेनं त्यानं ती बाटली उचलली, तिचं निरीक्षण केलं व पुन्हां ती समोर टेबलावर ठेवली. आपले सर्व दात दाखवीत तो हसला आणि म्हणाला, "बॉस, ही नको. ज़रा जास्त किमतीची द्या. आज आपण खुषीत आहोत. हं !!"
त्याच्या त्या हसण्याचा विलक्षण राग येऊन मी पुन्हा समोर पाहिलं. त्याचा चेहरा नीट पहायचा होता मला. त्या चेहर्‍याकडे पहाता पहाता माझ्या गत स्मृति चाळवल्या गेल्या. तो हसरा, बेफिकीर चेहरा मी त्यापूर्वीहि कुठेतरी पाहिला होता. ते हास्य माझ्या ओळखीचं होतं. त्या एका क्षणात मी माझ्या सर्व मित्रांचे चेहरे डोळ्यांसमोर आणले. तो चेहरा पाहून बरीच वर्षं लोटली होती. जॉन! जॉन? हो, नक्की जॉनच होता तो.
मी नकळत त्याचा हात हातात घेतला व उदगारलो, "जॉन?" तोहि दचकला. त्याच्या हातातली सिगरेट त्यानं खाली जमिनीवर फेकली, व किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. बराच वेळ टक लावून पाहिल्यावर एकदम त्यानं मला मिठी मारली व ओरडला, "सुनील!" त्या ओरडण्यानं सगळ्यानी आमच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. पण जॉनला त्याची मुळीच पर्वा नव्हती. तो परत ओरडला, "सुनील, मित्रा, आधी ओळखलं नाही मी तुला. पण आता ट्यूबलाईट पेटली. किती वर्षं झाली रे आपल्याला न भेटून? सहा? का सात?"
मी लगेच माझ्या सहकार्‍याला टेबलाशी उभं केलं व जॉनला घेऊन दुसर्‍या टेबलाशी बसलो. खूप वर्षांनंतर माझा मित्र मला भेटला होता, व मला त्या भूतकाळात जमा झालेल्या वर्षांचा आढावा घ्यायचा होता. खूपखूप बोलायचं होतं मला त्याच्याशी. खूप ऐकायचं होतं त्याच्याकडून. बियरनं भरलेला एक ग्लास त्याच्यापुढे करीत मी म्हटलं, "जिगरी, सहासात नव्हे, दहा वर्षं होत आली आपल्याला भेटून. जेव्हा आपली ट्रेनींग सुरू होती तेव्हा बरोबर होतो आपण. आठवतंय? आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा असेच बसलो होतों."
तो जोराने हसला व म्हणाला, "साफ़ झूठ, मित्रा. आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा ही नव्हती आपल्याबरोबर." त्याने आपल्या हातातल्या बाटलीकडे बोट दाखवलं व तो परत मोठ्याने हसला. मी सुद्धा हसलो. जॉन म्हणाला, "मित्रा, युद्ध किती वाईट असतं नाही? आपल्या जवळच्या माणसांना फक्त एका क्षणात किती दूर करून सोडतं ! कुणी शोधून काढली असेल रे ही युद्धाची कल्पना? जगात जर युद्ध नसतं तर केवढं बरं झालं असतं, सुनील. पण मग मला सांग, युद्ध जर नसतं, तर आपण कदाचित भेटलो सुद्धां नसतो. या, या बाटलीचं व आपलं एवढं सख्य सुद्धा नसतं झालं. क्यों?"
जॉन बोलतच होता. सवयच होती त्याला आधीपासून खूप बोलायची. आणि मला त्याचं बोलणं ऐकायला खूप आवडायचं. पण आज माझं लक्ष त्याच्या बोलण्याकडे मुळीच नव्हतं. माझं मन भूतकाळात भरकटत चाललं होतं, अंधुकशा धुळीने भरलेल्या गोष्टी जरा स्पष्टपणे आठवायचा प्रयत्न करीत होतो मी. हळूहळू सारा चित्रपट माझ्या समोरून सरकू लागला. जॉनची व माझी अगदी पहिल्यांदा भेट झाली होती तो दिवस मला आठवला.
ट्रेनींगसाठी म्हणून मी बॅंगलोरला होतो. दुपारपर्यंत रायफल पकडून थकून गेल्यानंतर मी दुपारी थोडा वेळ झोपायचो व संध्याकाळी वेळ चोरून आर्मी कॅण्टीनला जायचो. जॉन मला भेटला तो रविवारचा दिवस होता. मी असाच चहाचे घुटके मारीत एका टेबलाशी बसलो होतो; आपल्याच धुंदीत रंगलो होतो. अचानक माझ्या पाठीवर जोराची थाप बसली. मी भलताच दचकलो. आमच्या प्लटूनच्या उस्तादला माझी चोरून कॅण्टीनला यायची सवय चांगलीच माहीत होती. मी दचकून मागे पाहिलं व पहातच राहिलो. माझ्यासारखाच एक जवान उभा होता तिथं. मी यापूर्वीं त्याला कधीहि पाहिलं नव्हतं, पण मला त्याच्याकडे पहातच रहावसं वाटलं. त्याच्या चेहर्‍यात कसली विलक्षण जादू होती कोण जाणे !
"दोस्त, मॅचबॉक्स है?", त्याने विचारलं.
का कोण जाणे, पण सिगरेट न ओढण्याच्या माझ्या सवयीचा त्यावेळी मला राग आला. मी मान हलवली अन म्हणालो, "सॉरी, मै सिगरेट नही पिता." मी त्याच्याकडे पहात असतानाच तो मला तसाच सोडून निघून गेला. थोड्या वेळानं तो परत आला. त्याच्या हातात एक सिगरेटचं पाकीट व एक मॅचबॉक्स होती. माझ्यासमोरची खुर्ची ओढून तो माझ्यासमोर बसला. आपलं पाकीट माझ्या पुढ्यात धरून त्यानं मला विचारलं, "दोस्त, सिगरेट पियेगा?" यावेळेला मी थोड्या रुक्षपणे म्हटलं, "दोस्त, मैने बोला मैं सिगरेट नही पिता."
"तो मोठ्यानं हसला व म्हणाला, "कहाँके हो भाई?"
"बम्बई."
त्यानं पुन्हा विचारलं, "मराठी?"
मी होकारात्मक मान डोलावली. त्यानं माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं, व आपल्या भुंवया उंचावीत विचारलं, "बंबईका बाबू, और सिगरेट पीत नाही? कमाल आहे."
त्याच्यावरची नज़र न काढताच मी त्याला विचारलं,"तुमच्या शुद्ध भाषेवरून मी सांगू शकतो, तुम्ही मराठी ब्राह्मण आहात. बरोबर?"
तो पुन्हा हसला व म्हणाला, "सॉरी मित्रा, फसलास तू देखील? मी क्रिस्ती आहे. जॉन सलदान्हा माझं नाव. पण मी बरीच वर्षं पुण्याला काढलीयत, म्हणून सवयीनं थोडंफार मराठी बोलतो."
त्या दिवशी आमचं बोलणं तेवढ्यावरच थांबलं, पण त्यानंतर जॉन व मी रोजच भेटत राहिलो. संध्याकाळी तो कॅंटीनला यायचा व आम्ही चहाचे घुटके घेत गप्पा मारायचो. दिवसेंदिवस आमची मैत्री वाढतच गेली. लवकरच आम्हाला एकमेकांवाचून करमेनासं झालं.
अशाच एका संध्याकाळी आम्ही बसलेलो असताना जॉननं मला विचारलं, "सुनील, खरं सांग, तुला बरं वाटतं आर्मीत येऊन?" त्याच्या आवाजातील गंभीरतेनं मी चपापलो आणि हळूच त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत आसवं तरारून आली होतीं. यापूर्वी मी जॉनला केवळ हसताना पाहिलं होतं; त्याचं हे वेगळं रूप मला सहन होईना. मला घरची आठवण आली. माझे मित्र आठवले, माझं स्वच्छंद जीवन आठवून डोळे भरून आले.
मी म्हटलं, "जॉन, तुला म्हणून सांगतोय, मला खूप वाईट वाटतंय आर्मीत आल्याबद्दल. अगदी मनापासून पश्चाताप वाटतोय. वाटतं उगीचच भांडलो मी वडिलांशी."
"भांडलास?", त्याने मधेच विचारलं.
"हो जॉन, मी वडिलांशी भांडून आर्मीत भरती झालो. उडाणटप्पू बनून भटकायचो मी मुंबईला. त्या दिवशी बाबा मला बरेच काही बोलले. मीहि त्यांना उलट उत्तरं दिलीं, खूप भांडलो त्यांच्याशी, गेलो गेटवे ऑफ़ इंडियाच्या रिक्रूटींग ऑफिसला आणि भरती झालो. पण आता मला वाईट वाटतंय. जॉन, जेव्हा बॅंगलोरकरता ट्रेन सुटली तेव्हा बाबा फक्त एवढंच बोलले, ’माझं बोलणं तू एवढं मनावर घ्यायला नको होतंस. मोठी चूक केलीस तू.’. आता मला इथून पळून जावसं वाटतं. पण ---"
जॉननं पुन्हा जोराचं हास्य केलं व म्हटलं, "हाट, मला नाही वाटत परत जावसं. हं, दु:ख ज़रूर होतंय आर्मीत आल्याचं. वाटतं सगळं स्वातंत्र्य गमावून बसलोय. पण परत जावसं नाही वाटत. एकदा पाऊल उचललं ना, की मागे नाहीं घ्यायचं. बी.एस.सी. पास आहे मी. चांगली नोकरी सोडून इथं डावा-उजवा करीत पाय आपटायला यायचा मूर्खपणा केला नसता मी. पण मी कसा काय भरती झालो याचं माझं मलाच आश्चर्य वाटतंय. सकाळी नाश्ता करून मी ऑफिसला जायला निघालो होतो त्या दिवशी, पण अगदी नकळत रिक्रूटींग ऑफिसला गेलो. का व कसं ते माझं मलाच कळलं नाही. बहुतेक सकाळी न्यूज़पेपर वाचल्याचा परिणाम होता तो. चीनने आपल्या मातृभूमीवर आक्रमण केल्याचं जाहीर करून देशाच्या तरूणांना सैन्यात भरती व्हायचं आव्हान दिलं होतं प्रधान मंत्रींनी. सारं कसं अगदी स्वप्नात असल्यासारखं घडलं."
मी अभिमानानं जॉनकडे पाहिलं. त्याच्यासमोर मी कुणीतरी अगदीच क्षूद्र असल्याची जाणीव झाली मला. एकदां वाटलं की जॉनला खांद्यावर बसवून खूप नाचावं आनंदाने. त्या दिवसानंतर आम्ही जास्तच जवळ आलो. एतकं जवळ की ज्या दिवशी आम्हाला कळलं की ट्रेनींग संपून आम्हा दोघांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली झालीय, त्या दिवशी मी खूप रडलो. युद्ध ही कल्पना शोधून काढणार्‍या त्या व्यक्तीची मला विलक्षण चीड आली, तिटकारा वाटला. पण सत्य हे होतं की युद्धानं जॉनला व मला वेगळं केलं होतं, एकमेकांपासून दूर केलं होतं. माझी बदली मुंबईला झाली होती तर जॉनची उत्तर प्रदेशला. काही महिने मुंबईला घालवल्यावर पुन्हा माझी बदली झाली, होतच राहिली.
इतकी वर्षं भूतकाळात जमा झालीं, व इतक्या व्यक्तिरेखा माझ्या मनावर ठसा सोडून गेल्या की मी त्या दिवशी जॉनला अंबाल्याला पाहिलं नसतं तर कदाचित माझ्या स्मृतिपटलावरून पुसट होत चाललेली जॉनची आकृति साफ अदृश्य झाली असती. पण विधिलिखित काहीतरी वेगळंच होतं. माझी व जॉनची पुन्हा एकदा नव्याने भेट झाली होती. जुन्या आठवणी पुन्हा चाळवल्या गेल्या होत्या. नशीब माणसाच्या जीवनाशी असा लपंडाव का खेळतं हे मला कळेना. मल भूतकाळाच्या आठवणींतून डोकं बाहेर काढावसं वाटेनाच, पण ---
जॉनच्या त्या प्रश्नानं माझी तंद्री भंगली. त्यानं मला विचारलं, "सुनील, इतक्या वर्षांनंतर तुला अजून फक्त तीनच फिती मिळाल्यायत?"
मी खोटंखोटं हसलो व उत्तरलो, "हो मित्रा, अजून हवालदारच. आणि कदाचित हवालदार म्हणूनच रहावं लागेल आयुष्यभर. तुला मिळाली तशी मला नशिबाची साथ नाही मिळाली."
जॉनने हवेत हात उंच उडवले. "साला, कमाल आहे या नशिबाची. आपण दोघांनी बरोबरच ट्रेनींग केली, अन आता दहा वर्षांनी एकत्र आलो ते केवढे बदललेलो आहोत आपण. माझी उत्तर प्रदेशला बदली झाल्यानंतर मी ऑफिसर्स कमिशनसाठी अर्ज़ केला. आणि माझं नशीब चांगलं होतं म्हणून मला कमिशन मिळालं सुद्धा, फारसा त्रास न होता. एमरजंसी असल्यामुळे फटाफट प्रमोशन देखील मिळत गेलं, अन आज मी अगदी सुखात आहे. पण सुनील, तुझ्या बाबतीत असं का व्हावं? नशिबानं तुला असा दगा का द्यावा?"
मला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देता येईना. मी एवढंच म्हणालो, "पूर्वजन्मीच्या पुण्याईची फळं आहेत ही जॉन."
त्यानं प्रेमानं माझा हात आपल्या हातात घेतला व म्हटलं, "काळजी करूं नकोस मित्रा. तुझ्या प्रमोशनची जबाबदारी माझी. तू बेफिकीर रहा."
एवढं बोलून जॉन त्या संध्याकाळी निघून गेला. तो गेल्यावर माझं कामात लक्ष लागेना. सबंध वेळभर त्याचाच चेहरा समोर येत राहिला. त्यानं पुन्हा दुसर्‍या दिवशी यायचं वचन दिलं होतं. मी दुसर्‍या दिवशाची वाट पहात राहिलो. अखेर ती संध्याकाळ आली. मी आतुरतेनं जॉनची वाट पहात होतो, पण तो आला नाही. संध्याकाळ आली व निघून गेली. रात्र आली, निघून गेली, पण जॉन काही आला नाही. मी वाट पहातच राहिलो. नंतर बरेच दिवस माझं मन लागेना. मी रोजच जॉनची वाट पहायचो. मग एके दिवशी अनपेक्षितपणे एक पत्र आलं. मला वाटल्याप्रमाणे जॉनचं पत्र होतं ते. घाईघाईने मी पत्र उघडून वाचलं. मला भेटल्यानंतर अचानकपणे त्याची युद्धक्षेत्रात बदली झाली होती. जाण्याआधी मला भेटू न शकल्याबद्दल त्यानं दु:ख व्यक्त केलं होतं. मला विलक्षण भीति वाटली. वाटलं, जॉननं आर्मीत यायला नको होतं. आम्हीं दोघं भेटलोच नसतो तर किती बरं झालं असतं. जिवाला ही विलक्षण हुरहूर तरी लागली नसती. पण जॉनबद्दल मला एवढी काळजी का वाटावी हे कोडं मात्र मला उलगलं नाही.
त्या पत्रानंतर बरेच दिवस जॉनचं पत्र नव्हतं. त्याची काहीच बातमी नव्हती. वाट पाहून पाहून त्याच्याकडून पत्र यायची आशा मी सोडली, अन एका संध्याकाळी मी दुकानातून बॅरॅकवर परत आलो तर पलंगावर एक टेलिग्रामचा लिफाफा पडलेला दिसला. लिफाफा उघडून वाचण्याआधीच माझं हृदय धडधडू लागलं होतं, हात थरथर कापत होते. पण तार वाचणं भाग होतं. तार वाचल्यावर कळलं, मी उगीचच घाबरलो होतो. जॉनचीच तार होती आणि त्यानं कळवलं होतं की तो त्याच आठवड्यात अंबाल्याला परत येणार होता. माझ्या मनावरचा भार एकदम हलका झाला. मला खूप बरं वाटलं. ठरलेल्या दिवशी जॉन परत दुकानावर आला. त्याला पहाताच मी प्रेमानं मिठी मारली. गप्पात संध्याकाळ कशी सरली हे आम्हाला कळलंच नाही. रात्र पडत आल्यावर मी जॉनला म्हटलं, "जॉन, तुझी तार पाहून मी इतका घाबरलो होतो, इतका घाबरलो होतो की ..."
जॉननं हसत विचारलं, "का रे?"
मी चाचरत बोलायला सुरवात केली, "...कारण मला वाटलं... मला वाटलं ... की तू... तू..."
"की मी गचकलो," जॉन हसत म्हणाला. "अरे, तुझ्याकरता गुड न्यूज़ आणली आहे. ही वाच." असं म्हणून त्यानं माझ्या हातात एक सरकारी लिफाफा ठेवला. मी आश्चर्यानं त्याच्याकडे पहात असताना त्याने मला लिफाफा उघडून वाचण्याची खूण केली. "साहेब, मी माझं प्रोमिस पूर्ण केलंय. तुझी हेडक्वार्टर्सला बदली करून घेतलीय मी. तिथून तुझ्या ऑफिसरच्या पदासाठी निवड करणं सोपं जाईल मला. आता आपलं सामान बांधायला लाग, बेटा."
माझ्या चेहर्‍याकडे पाहून जॉन काय समजायचं ते समजला. त्यानं एकदम मला उचलून घेतलं व जोरात हसायला सुरवात केली. आणि मी इच्छा असूनही त्याला प्रतिकार करूं शकलो नाहीं.

लक्ष्मीनारायण हटंगडी

होळीचा हुडदंग!

होळी आली .. होळीबरोबर इतर अनेक गोष्टी आपल्या दारावर फक्त टिचक्याच नव्हें, तर हातोडा मारीत आहेत असं म्हणायला हरकत नाहीं.. उदाहरणार्थ, लवकरच सुरू होणारं शाळेचं नवीन वर्ष; मुलांची झोप उडवणार्‍या वार्षिक परीक्षेचा आईबापांवर होणारा (नको तेवढा) विपरीत परिणाम; या निमित्ताने आईबापांचा आपल्या मुलांमुलींवर वाढत जाणारा दबाव; (ओघाओघाने येणार्‍या आत्महत्तेच्या सत्रांचा उल्लेख मी मुद्दामच करीत नाहींय !); के. जी. च्या वर्गात ऍडमिशन मिळवण्यासाठी शिकवण्यांचे वर्ग; त्यापाठोपाठ शाळाशाळांतून के. जी. प्रवेशाच्या मुलाखती ... एक ना दोन ! तर चला, या गंभीर वातावरणाला थोडं हलकं करायचा एक हुडदंगी नाट्यमय प्रयत्न करूंया. पहिल्या प्रवेशाचं नांव आहे "के. जी. मुलाखती".

के. जी. मुलाखती

सूत्रधार : नमस्कार मित्रहो, शिक्षण क्षेत्रात एक क्रांति घडून येत आहे. विद्वान लोकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे की आईबापांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम मुलांच्या वाढीवर होत असतो. म्हणूनच मुलांना के. जी.च्या वर्गात प्रवेश देण्यासाठी, मुलांबरोबर, त्यांच्या आईबापांच्या मुलाखती घेण्याची प्रथा शाळाशाळांत सुरू केलेली आहे. एक नमूना पेश आहे.
( एका नेहमीच्याच शाळेतील एक नेहमीचंच ऑफीस. मुलाखत घेणारी बाई हातात एक पिशवी घेऊन प्रवेश करते. येतांच समोरच्या टेबलावर पिशवीतील काही लहानमोठे लाकडी ठोकळे पसरते; आपल्या जीनच्या खिशातून एक पिस्तूल काढून हवेत चालवते, व घोषणा करते. )
बाई : के. जी. ऍडमिशनच्या मुलाखती सुरू होऊं देत. पहिला बळी आत पाठवा. (एक घाबरलेला गृहस्थ आपली नखं चावीत प्रवेश करतो.) मिस्टर, घाबरण्याचं काहीहि कारण नाहीं. (तिच्या लक्षात येतं की तो आपल्या हातातील पिस्तुलाला घाबरला आहे, व ती आपलं पिस्तूल खिशात लपवते.) तुमचं नांव?
माणूस १ : पटेल.
बाई : (जरबीने) संपूर्ण नांव सांगा.
माणूस १ : श्रीयुत रामजीभाई देवजीभाई पटेल.
बाई : शिक्षण?
माणूस १ : गुजरात युनिव्हर्सिटीतून एम. कॉम.
बाई : (रुक्षपणे) आता हे ठोकळे त्यांच्या रंगांप्रमाणे या टेबलावर मांडा. (काहीवेळ तो ठोकळे लावायचा निष्फळ प्रयत्न करतो.) नापास. पुढल्या महिन्यात परत या. (तो घाबरून बाहेर पळतो.) पुढील पालक कोण आहे? (बाहेरून सूट घातलेला एक माणूस येतो.) हं, नांव?
माणूस २ : (आत्मविश्वासाने) डॉक्टर अनंतस्वामी रंगस्वामी मुदलियार. माझं संपूर्ण नाव. मूळ वास्तव्य चेन्नई. गेली बरीच वर्षं मुंबईत स्थाईक.
बाई : सेनेची सैनिक नाहींय मी. इतिहास-भूगोल विचारला नाहीं. शिक्षण कुठपर्यंत झालंय?
माणूस २ : बॉस्टन युनिव्हर्सिटीतून M.B.B.S, F.R.C.S.
बाई : कळलं. सबंध बाराखडी नकोय. मला सांगा, इंग्रज़ी एस. आणि यू.च्या मधे कुठलं अक्षर येतं?
माणूस २ : सोपं आहे. (हातावरच्या घड्याळाकडे पहात) टी.
बाई : उत्तम. बाहेर वाट पहा. तुमच्या मुलाचा इण्टरव्यू झाला की तुम्हाला उत्तर मिळेल. बाहेर उभे रहा.
माणूस २ : माझ्या टीची म्हणजे चहाची वेळ झाली. थॅंक यू. (बाहेर जातो.)
बाई : पुढल्या पालकाला आत पाठवा. (माणूस ३ आत येतो.) नांव?
माणूस ३ : श्रीयुत मनसुख रणधीर तनखारामानी. उल्हासनगर युनिव्हर्सिटीतून प्रथम श्रेणीतून एम. कॉम. पास. बॅंकेत ...महिन्याची कमाई सांगू?
बाई : (रुक्षपणे) जास्त बोलायचं काम नाहीं. हा कागद-पेन्सील घ्या व एक कोंबड्याचं चित्र काढून दाखवा. (माणूस कागदावर कसलंतरी चित्र काढतो व कागद बाईला देतो.) तुमचा कोंबडा कोंबड्यासारखा नाहीं, अंड्यासारखा दिसतो.
माणूस ३ : कारण मी अंडाहारी आहे, कोंबडी खात नाहीं. काही दिवसांनी त्यातून कोंबडा बाहेर येईल, तेव्हां बघा. (तिच्या उत्तराची वाट न पहाता निघून जातो.)
बाई : बापरे, कसले कसले लोक येतात के. जी.च्या मुलाखतींसाठी ! (मोठ्याने) हं, पुढचा कोण आहे, आत या.
( बाहेरून एक मुलगा प्रवेश करतो. )
मुलगा १ : मॅडम, लवकर इंटरव्यू सुरू करा. मला घाई आहे. माझा क्रिकेटचा गेम अर्धा सोडून आलोय.
बाई : (तोंडावरचा घाम पुसून) नाव सांग.
मुलगा १ : "प्लीज़" म्हणा. चांगल्या संस्कारांचं लक्षण असतं. असूं दे. माझं नांव मनोज अनंतस्वामी रंगास्वामी मुदलियार. माझे बाबा डॉक्टर आहेत. आणि प्लीज़, हा डॉक्टरकीचा विषय सोडून दुसरे कुठलेही प्रश्न विचारा. मला डॉक्टर व्हायचं नाहीं.
बाई : औधोगिक क्रांतीविषयी तुला काय माहिती आहे? .... प्लीज़ ... सांग.
( मुलगा १ न थांबता धडाधड उत्तर देतो. )
मुलगा १ : अजून काही माहिती हवीय? ( बाई घाबरून घाम पुसायला लागते. ) प्लीज़, टेंशन घेऊ नका. रिलॅक्स.
( मुलगा मागे न बघता बाहेर निघून जातो. बाईला भलताच घाम सुटला आहे. )
बाई : (नर्व्हस) नेक्स्ट....
( बाहेरून मुलगा २ आत येतो. )
मुलगा २ : बाई, तुम्हीं बसा ना. माझा मित्र मनोज म्हणाला, तुम्हीं भयंकर नर्व्हस आहात म्हणून. घाबरू नका, जास्त वेळ घेणार नाहीं तुमचा. माझं नाव अमिताभ रामजीभाई पटेल. माझे बाबा जास्त शिकलेले नाहीत म्हणून माझ्या के. जी.च्या ऍडमिशनसाठी उगीचच टेंशन घेतात.
बाई : भारतातील सुवर्णयुगाबद्दल तुला काय माहिती आहे?
मुलगा २ : माझे बाबा, आजोबा, पणजोबा आणि आमच्या घराण्यातले सगळे जोबा सोन्याचांदीचे मोठे व्यापारी होते. त्यांच्या मनांत आहे की मीसुद्धा त्यांच्यासारखाच सोन्याचांदीचा व्यापार करावा. पण मला शिकून मोठा डॉक्टर व्हायचं आहे. तेव्हां त्याविषयी तुम्हांला कांही विचारायचं असेल तर ठीक, नाहींतर तुमचा, आणि महत्वाचं म्हणजे माझा अमूल्य वेळ दवडूं नका. आणि मी बाहेर गेल्यावर आधी आपला घाम पुसा. नाहीतर माझ्यामागून येणार्‍या मुलावर वाईट इंप्रेशन पडेल.
( तिच्या उत्तराची वाट न पहाता तडातडा निघून जातो. बाई घाम पुसत असते तेवढ्यात मुलगा ३ प्रवेश करतो. )
मुलगा ३ : हाय. माझं नाव ह्रितीक शाहमीर पचपन.
बाई : हे नांव थोडं फिल्मी नाहीं वाटत?
मुलगा ३ : असेल. पण मला आवडतं. मी तसा थोडा... नाहीं, जरा जास्तच फ़िल्मी आहे. माझ्या बाबांना सुद्धां आवडतं हे नांव. माझ्या बाबांचं नांव तनखारामानी आहे, पण त्यांना तनखा, म्हणजे पगार, वगैरे काहीं मिळत नाहीं. त्याची गरजच पडत नाहीं त्यांना. कारण मी सिनेमांतून व टीव्हीवर ऍड्स मधून कामं करतो. महिन्याला सत्तर-ऐंशी हज़ार सहज मिळतात, म्हणून डॅडने आपली बॅंकेतली जॉब सोडली. सध्या सगळं घर माझ्या कमाईवर चालतं. तेव्हां खरं तर मला शाळा-कॉलेजात ऍडमिशन घ्यायची सुद्धां गरज नाही. पण मग मलाच कधी तरी या सगळ्याचा कंटाळा येतो, म्हणून शाळेत येऊन मस्ती करावसं वाटतं. अजून काही जाणून घ्यायचंय? प्लीज़, मी जाऊं शकतो? सॉरी, आपला खूप वेळ खाल्ला. थॅंक्स. (नाच करीत बाहेर निघून जातो.)
( बाई काय बोलावं हे न सुचून पटकन समोरच्या खुर्चीवर बसते. )
सूत्रधार : (प्रवेश करून) तर मंडळी, तुमच्यापुढे पेश केलेले हे नमूने तुम्हांला कसे आवडले हे ज़रूर कळवा. धन्यवाद. (बाहेर निघून जातो.)


* * * * *

लक्ष्मीनारायण हटंगडी
वसई (पूर्व)

वादळ

मुंबई
१७ मार्च, १९६१
प्रिय अरूणदादास,
स.नि.वि.वि. माझं हे पत्र पाहून तुला कदाचित आश्चर्य वाटेल. तू म्हणशील, "आशाने बर्‍याच महिन्यांनंतर दादाची आठवण काढलेली दिसतेय." पण अरूण, माझा मोठा भाऊ आहेस तू. तुझ्याशिवाय दुसर्‍या कुणाकडे व्यक्त करणार मी माझ्या भावना? नानांचा माझ्यावर बराच राग झालेला दिसतो. मला प्रत्यक्ष येऊन भेटणं सोडच, पण मला साधं पत्र लिहायला सुद्धा तयार नाहीत ते. कुणावर प्रेम करणं इतकं वाईट असतं का रे दादा? माझं हे पत्र तुझ्या हातात पडण्याआधीच नानांनी तुला पुण्याहून पत्र टाकलं असेल. माझ्याबद्दल खूपखूप तक्रारी असतील त्यांच्या. पण खरं सांगते अरूण, मी अगदी निर्दोष आहे. मोहनवर प्रेम करण्यात मी कसलीच चूक केली नाही. खरं ना? वडील भावाच्या नात्याने तू मला योग्य तो मार्ग दाखवशील या आशेनं मी आपलं मन तुझ्याकडे मोकळं करतेय.
मोहनचं सबंध नाव आहे मोहन मधुकर आळंदकर. माझी व त्याची पहिली ओळख हॉस्पिटलमध्येच झाली. मी ज्या वॉर्डला नर्स म्हणून काम करीत होते तिथंच तो पेशंट होता. कसल्याशा अपघातानं जखमी होऊन तो आमच्या हॉस्पिटलला आला. त्याची देखरेख करण्याचं काम माझ्याकडे होतं. मी त्याला प्रथम जखमी अवस्थेत पाहिलं तेव्हा माझ्या मनात त्याच्याबद्दल कसल्याच भावना नव्हत्या. पण तरूणपणी आपलं मन फारसं आपल्या ताब्यात नसतं. अरूणदादा, माझंही तसंच झालं. मी वेगळ्याच भावनेने त्याची सेवा करूं लागले. पण आपलं मन त्याच्याकडे व्यक्त करण्याचं धाडस मात्र मला कधीच झालं नाही. माझ्या सुप्त भावनांना त्याच्याकडून उत्तर मिळेपर्यंत गप्पच होते मी. मनातल्या मनात त्याच्यावर प्रेम करीत राहिले. तो जसजसा बरा होऊ लागला तसतशी त्याची अस्वस्थता वाढत चालली अन माझ्या भुकेल्या डोळ्यांना ते जाणवू लागलं.
अखेर जायच्या दिवशी कुणाचंही लक्ष नसताना त्यानं माझा हात हातात घेतला, व आपलं मन मोकळं केलं माझ्याकडे. माझ्या प्रेमाला उत्तर मिळालं होतं. मी प्रेमाला बळी पडले. पण माझा विश्वास कर, माझा काहीच गुन्हा नव्हता यात. अन तो आहे देखील तसाच राजबिंडा -- उंच, धिप्पाड, गोरा, देखणा. शिवाय उत्तमपैकी कलाकार आहे तो. बर्‍यापैकी नोकरी आहे त्याला. मग तूच सांग, त्याच्याशी प्रेम करण्यात मी काय पाप केलं? त्या दिवसानंतर आमच्या गाठीभेटी वाढत राहिल्या, कधी चोरून तर कधी खुल्लमखुल्ला. शेवटी मला रहावेना अन मी पत्र लिहून नानांना कळवलं की मी व मोहननं लग्न करायचं ठरवलंय. या साध्या गोष्टीत खरंतर नानांनी आकांडतांडव करण्यासारखं काहीच नव्हतं. तुला नाही असं वाटत?
खूपच विष ओकलं नानांनी आपल्या छोट्याशा पत्रात. ते पत्र जवळ घेऊन खूप रडले मी त्या दिवशी. माझ्याच खोलीत रहाणार्‍या सविताला सगळं सांगितलं मी. पण आपलं दु:ख हलकं करायला आपल्या माणसांची सहानुभूति लागते, अरूण. नानांनी खूपच नावं ठेवलीं मला. आईसुद्धा माझ्या विरुद्ध आहे. सुधा अजून लहान आहे. आपल्या वकिलीच्या परीक्षेपुढे दुसरं काहीच सुचत नाही त्याला. आणि तूसुद्धा खूप दूर आहेस माझ्यापासून. मी दुसरं काय करूं? निदान पत्रातून तरी तुला आपलं दु:ख कळवतेय. अरूणदादा, दुसर्‍या जातीत जन्म घेणं इतकं का वाईट असतं, की त्या दोन व्यक्तींच्या एकत्र येण्याला समाजानं आडकाठी घ्यावी? मोहन आपल्या जातीत जन्माला आला नाही यात त्याचा काय दोष? हे सगळं परमेश्वराच्या हाती असतं, नाही का? अन आपल्याला लग्न करायचं असतं ते एका व्यक्तीशी, त्याच्या जातीशी नव्हे. मी स्पष्ट सांगते दादा, अगदी कितीहि अडथळे आले तरी लग्न करायचं ठरवलंय आम्हीं दोघानीं.
अरूण, मला तुझा सल्ला हवाय, अन शक्य तो लवकर. खूप मोठं वादळ उठलंय माझ्या जीवनात. आता तूच सांग, मी काय करूं?

तुझी बहीण
आशा
_________________________________________________________________________________________

कल्याण
१९ मार्च, १९६१

प्रिय आशा,
तुझं पत्र मिळालं. नानांचं पत्र देखील त्याच सुमारास पोचलं. तुझ्या सांगण्याप्रमाणे ताबडतोब पत्र लिहितोय. पण मी जरा स्पष्टच सांगतोय, मी तुला सल्ला देऊ शकणार नाही. कारण माझ्या किंवा दुसर्‍या कुणाच्याहि सल्ल्याची अथवा मदतीची तुला गरज आहे असं कधीच दाखवलं नाहीस तू. ज्या वेळी सल्ला घेणं आवश्यक होतं त्यावेळी तू गप्प होतीस. आंधळ्या प्रेमानं तुझी वाचा बंद केली होती. खूप उशीरा पत्र लिहीलंस तू, स्वत:च्या मर्जीनं निर्णय घेतल्यावर. आशा, तुला खूपच घाई होती. तुला वाटेल, दादा आपल्या काळजाचे लचके तोडतोय. पण तुला माहीत आहे, माझा स्वभावच तसा आहे. माझा नाईलाज आहे. पूर्वींपासूनच जे मला पटलं तेच मी स्पष्टपणे सांगत आलोय. मला माफ कर, आशा, नानांप्रमाणेच मी सुद्धा पत्रात विषच ओकणार आहे.
मला अभिमान आहे की तुझे विचार फार उच्च आहेत. "दुसर्‍या जातीत जन्म घेणं वाईट नसतं. हे सगळं परमेश्वराच्या हाती असतं, आपल्याला लग्न करायचं असतं ते एका व्यक्तीशी, त्याच्या जातीशी नव्हे.." वगैरे वगैरे. तू म्हणतेस ते अगदी सगळं सगळं खरं असेल. पण कुटुंब, समाज, धर्म, वगैरेंची बंधनं, अगदी आपल्याला आवडत नसलीं तरी, जखडून ठेवतात आपल्याला, हेही तेवढंच खरं आहे. आपल्याच जातीच्या समाजात राहून समाजाच्या रूढींशी वैर धरणं कुणालाहि हितकारक ठरत नाही, आशा. आपल्या अरूण दादाचे हे बोल नीट लक्षात ठेव गैरसमज करून घेऊ नकोस आपल्या या भावाविषयी. तुझ्या व मोहनच्या लग्नाला माझा विरोध आहे असंच नाही. खरं सांगायचं तर तुला विरोध करायचा हक्कच नाही मला. तुझं भलं वाईट पहायला तुझी तू समर्थ आहेस. पण सत्य हे आहे की तुझी वडील माणसं जिवंत होती. लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांना कळवण्यापेक्षा तो निर्णय घेण्याआधी आमचं, निदान नानांचं तरी, मत घेणं हे कर्तव्य होतं तुझं असं नाही वाटत तुला? तू आधी कळवलं असतंस तर नाना संतापले असते मान्य आहे मला. त्यांनी चांगल्या शब्दात तुझी समजूत काढली असती. पण तुला ते नको होतं. तू म्हणतेस, तुझ्या जीवनात वादळ उठलंय. खूपच वाङ्मयीन वाटतात तुझे शब्द. पण भोवती वादळ उठलं असताना आपलं मन शांत ठेवणं आपल्याच हाती असतं. तू डोळे उघडे ठेवून वादळात उडी घेतलीस. ती उडी घेण्याआधी तुला योग्य तो सल्ला द्यायला आम्ही समर्थ व तयार होतों. नानांच्या क्रोधाची तुला भीति वाटत होती तर मला, आपल्या मोठ्या भावाला, विश्वासात घेऊन कळवायचं होतंस. मी केली असती त्यावेळी तुला मदत.
अरे हो, मला आलेल्या नानांच्या पत्राबद्दल मी तुला कळवलंच नाही की. तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. नानांनी आपला निर्णय बदलला आहे -- बदलला असं म्हणण्यापेक्षा त्यांना बदलावा लागला आहे असं म्हणणं जास्त योग्य वाटेल. आपण तिघंच मुलं आहोत नानांची, दोन मुलगे व तू एक मुलगी. नाना बाहेरून जितके कठोर दिसतात तितकेच प्रेमळ आहेत अंत:करणाने. फणस जसा वरून कांटेरी पण आतून मऊ असतो ना, नाना अगदी तसेच आहेत. एकवेळ आम्हा मुलांच्या मर्जीविरुद्ध जाऊन वागतील ते, पण आपल्या एकुलत्या एका मुलीच्या मर्जीविरुद्ध जाणं कधींच आवडलं नसतं त्यांना. खरं म्हणजे त्यांनी तुला ते पत्र लिहीलं ते रागाच्या भरात, अगदी आपल्या इच्छेविरुद्ध. पण त्यांचा राग शांत झाला तेव्हा ते स्वत:वरच चिडले व त्यांनी आपला निर्णय बदलला. तुझं लग्न अगदी मस्त थाटात लावून देण्याचं ठरवलंय त्यांनी. तुला नवीन दागिने देणार आहेत ते. तुझ्यासाठी, केवळ तुझ्या मर्जीसाठी, आपल्या मर्जीविरुद्ध, आपल्या ध्येयांविरुद्ध वागताहेत नाना. आपल्या तत्वांपेक्षांहि तुझ्यावर जास्त प्रेम आहे त्यांचं.
पण मी जरा स्पष्टच सांगतोय तुला आशा, मला हे मान्यच नाही मुळी, अन मी त्यांना साफ कळवलंय तसं. तुझ्या व मोहनच्या लग्नाला त्यांनी होकार दिला, काही हरकत नव्हती. पण इतर गोष्टी त्यांनी कबूल करायला नको होतं. माझं स्पष्ट मत वाचून तुला वाईट वाटेल कदाचित. तुझं मन दुखावलेलं त्यांना मुळीच आवडणार नाही. माझ्याशी संबंध तोडायला देखील तयार होतील ते. त्यालाहि तयारी आहे माझी. स्वत:च्या जीवनाचे धागेदोरे संभाळायला मी समर्थ आहे. स्वत:च्या पायांवर उभा आहे मी. माझं हे मत तुला कदाचित अविचार वाटणं शक्य आहे, पण माझा नाईलाज आहे. माझ्या मनाची घडणच तशी आहे.
जाऊंदेत या गोष्टी, येत्या एकदोन दिवसांत मी बहुतेक तुला भेटायला येईनच. मला समजून घे व माझ्यावर राग धरू नकोस. आशा, अनेक आशीर्वाद.
तुझा मोठा भाऊ
अरूण
_________________________________________________________________________________________

कल्याण,
४ जून, १९६१
प्रिय आशा,
बर्‍याच दिवसांनंतर तुला पत्र लिहितोय. लिहिणार नव्हतो खरं तर, पण भावा-बहिणीचे संबंध तोडेन म्हटलं तरी इतक्या सहजासहजी तुटत नाहीत. आज तुझ्याशी बोलावसं वाटलं, निदान पत्रांतून तरी. तू बहुतेक आपल्या थोरल्या भावाला विसरलेली दिसतेयस. साहजिकच आहे. तू दुसर्‍याची होणार आहेस. मी इतक्या सहजासहजी तुला विसरणं शक्य नाहीं. लहान असतांना आपण एकत्र हसलों-खेळलों आहोत. बर्‍याच वेळी तुझीं आसवं देखील पुसली आहेत मी. पण आता तू असं वागतेयस की मी जणूं कुणीच नाहीं तुझा. मी लिहिलेल्या पत्राला साधं उत्तर देणंसुद्धा जमलं नाही तुला. १९ मार्चला मी तुला शेवटचं पत्र लिहीलं होतं. तुझ्या उत्तराची वाट पाहिली, पण व्यर्थ ! पोस्टमन यायचा व निघून जायचा. त्यानंतर मी जवळजवळ तीनदां तुझ्या हॉस्पिटलमधे येऊन गेलो, पण तुझी भेट झाली नाही. तू नव्हतीस का मुद्दामच मला टाळायचीस कोण जाणे.कधीच भेटली नाहीस तू मला.
मी गेल्या पत्रात लिहिलेल्या गोष्टी बर्‍याच मनावर घेतलेल्या दिसतात तू. अग ए वेडे, एक भाऊ आपल्या बहिणीला लिहितो त्या सगळ्याच गोष्टी इतक्या गंभीरपणे घ्यायच्या नसतात. अखेर मलासुद्धा भावना आहेतच की नाही? त्या मेलेल्या नाहीत अजून. मी जरा कठोर वागलो त्यावेळी, मान्य आहे मला. पण त्याचं तू इतकं वाईट मानून आपल्या सख्ख्या भावाला विसरून जाशील असं माहीत असतं तर मी काही लिहिलंच नसतं मुळी. तुझ्या लग्नाला विरोध असूनही तसं स्पष्टपणे व्यक्त केलं नसतं. पण एखाद्याने केलेल्या चुकीला क्षमा नाहीच का? विसरून जा सारं.
मघाशी म्हटल्याप्रमाणे मी तीनदा तुझ्या हॉस्पिटलला येऊन गेलो. प्रत्येक वेळी तुला मात्र भेटू शकलो नाही. खोलीत तुझी मैत्रीण सविता फक्त असायची. इतक्या दूरून येऊन तू न भेटावीस याचं वाईट वाटून दुसरं काहीच न सुचल्यामुळे मी सविताकडे गप्पा मारीत बसायचो, आपलं दु:ख थोडं हलकं करायचो. थोडा वेळ तरी बरं वाटायचं. आता तुला वाटेल की आपला दादा एक परक्या व्यक्तीकडे कसा काय मन मोकळं करू शकतो. पण मला नाही वाटत की तू तशी समजूत करून घेशील, कारण तू सविताला कधी परकं मानलंच नसावं. आपल्या मनातील सर्व गोष्टी तू तिच्याकडे बोलून दाखवायचीस, आपली सुख-दु:खसुद्धा. तिला विश्वासात घ्यायचीस. फार काय, मी किंवा नानांनी तुला लिहीलेलीं पत्रं आधी तू तिला दाखवायचीस. आपल्या पत्रात तिच्याविषयी लिहायचीस. मी हॉस्पिटलमधे आलो होतो तेव्हा ती हेंच म्हणत होती. मग मी माझं थोडंसं दु:ख तिला सांगितलं यात काही चूक असेल असं मला तरी नाही वाटत, नाही का? अन तू नसतांना दुसरं करणार तरी काय होतो आम्ही?
आशा, काय करतेयस हल्ली? अग, एकदा तरी भेट व आपल्या त्या मोहनशी गांठ घालून दे माझी. त्याला भेटायची खूप इच्छा आहे माझी. घाबरू नकोस, टीका करायला नव्हे, अगदी आपलं सहजच. मग सांग, कधी भेटणार आहेस? गेल्या काही दिवसांत नानांचं पत्र वगैरे आलं होतं का? मला तर त्यांनी आताशा पत्र वगैरे लिहीणं बंदच केलंय. कदाचित तुझ्याविरुद्ध वागण्याचं धाडस मी केलं म्हणून असेल. बरेच दिवस आधी त्यांचं एक पत्र आलं होतं मला. पत्राचा सूर पाहून माझ्याशी संबंध तोडण्याचा निश्चय दिसला त्यांचा. त्यानंतर मी पुण्याला गेलोच नाही. मधे सुधाचं पत्र आलं होतं. त्याच्या वकीलीच्या परीक्षा झाल्या, पेपर्स चांगले गेले म्हणत होता. नानांचा माझ्यावरचा राग अजून तसाच कायम आहे असं देखील म्हणत होता तो. अरे हो, सविता म्हणत होती की तुझ्या नर्सींगच्या कोर्सची दुसरी परीक्षा जवळ येतेय. तयारी जोरात चालली असेल तुझी. वेळात वेळ काढून या पत्राचं उत्तर पाठव. आशा, आपल्या माणसांवर असा जास्त वेळ राग धरणं योग्य नव्हे. तुझ्या उत्तराची आतुरतेने वाट पहातोय. निराश करूं नकोस.
तुझा दादा
अरूण
_________________________________________________________________________________________
मुंबई
१२ जून, १९६१
प्रिय अरूण,
माझं हे पत्र पाहून तुम्हाला कदाचित बरंच आश्चर्य वाटेल, पण हे पत्र लिहीणं भागच होतं मला. तुम्ही आशाला लिहिलेलं चार जूनचं पत्र तिनं मला दाखवलं. खरं म्हणजे तिने मला तुमचं पत्र दाखवलं याच गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं. कारण ती आता पूर्वीसारखी मुळीच राहिलेली नाही. तुम्हाला वाटेल तुमच्याच बहिणीविषयी तक्रार करणं मला मुळीच शोभत नाही. पण मी नेहमी तिला धाकट्या बहिणीप्रमाणे वागवत आले अन आता त्याच नात्याने तिच्याबद्दल लिहीतेय. पूर्वी आपली सगळी सुखदु:खं ती माझ्याकडे बोलून दाखवायची. पण आता तिनं माझ्याशी बोलणंच बंद केलंय. मला अगदी परकी समजायला लागली आहे ती. तिच्यातला हा बदल पाहून मला खूप वाईट वाटतंय. पण मी तरी काय करणार? मूग गिळून गप्प बसलेय.आपलं समजून ज्याच्यावर जिवापाड प्रेम करावं त्याच व्यक्तीनं आपल्याला गैरसमजामुळे तिरस्काराने दूर करावं याहून दुर्भाग्याची गोष्ट नाही. मी काय करू अन कुठं जाऊ? लहानपणापासून आईवडिलांच्या मायेला मुकून परक्या छत्राखाली वाढलेली अनाथ मुलगी मी. आपण दुसर्‍यांच्या दु:खाचं वाटेकरी असावं, पण आपलं दु:ख हलकं करायला जवळ कुणीच नाही म्हणून नशीबाला दोष देण्याऐवजी आणखी करणार तरी काय मी?
आशाला भेटायला म्हणून जेव्हाजेव्हा तुम्ही हॉस्पिटलला आमच्या खोलीवर यायचा तेव्हातेव्हा नेमकी आशा खोलीवर नसायची. माझं दुर्दैवच म्हणायचं हें ... खरंच दुर्दैव. दर वेळी माझी व तुमची भेट व्हायची. भेट झाल्यावर बोलणं अगदी साहजिकच होतं. या साध्या भेटींचा पुढे इतका विपर्यास केला जाईल याची किंचितशी जरी कल्पना असती तर मी जाणूनबुजून तुम्हाला टाळलं असतं. आपण दोघं बोलत असतांना कुणीतरी पाहिलं व आशाला तिखटमीठ लावून सांगितलं. त्यानंतर आशा व मोहन मला इतकं काही बोलले की वाटलं सरळ तुमच्याकडे येऊन तुम्हाला जाब विचारावा. त्या दोघांची समजूत होती की आशा खोलीवर नसताना मीच तुम्हाला मुद्दाम बोलावून घेत असे, व तुम्ही तिथं यायचात ते केवळ मला भेटायला. आशानं माझ्यावर केलेले हे खोटे आरोप ऐकून माझ्या अंगातली सगळी शक्तीच गळून गेली. आशाला कधी माझ्या चारित्र्यावर शंका येईल असं मला स्वप्नांतसुद्धा वाटलं नव्हतं. माझं सारं जीवनच संपून गेल्यासारखं वाटायला लागलं. जिला मी आपलं सर्वस्व समजत आले तिनंच मला इतकं खोल गर्तेत ढकलावं?
आशा आता पार बदलली आहे. दुसर्‍याची झालेली आहे. तिचा स्वभाव एकदम बदलला आहे. हल्ली ती बराच वेळ हॉस्पिटलमधून बाहेरच असते. परीक्षा येतील वा निघून जातील. पण ---- जास्त काय लिहू? प्लीज़, तुम्ही हॉस्पिटलमधे येणं बंद करा. निदान माझ्यासाठी तरी. मी ज्या वादळात फसत चाललेय त्यातून मला बाहेर पडायचं असेल तर हा एकच मार्ग आहे माझ्यापुढे. माझं काही चुकलं असेल, अजाणता मी तुमच्यावर काही आरोप केले असतील तर क्षमस्व.
आपली
सविता
_________________________________________________________________________________________

लक्ष्मीनारायण हटंगडी

Friday, January 29, 2010

लिझ्झी

लिझ्झीची अन माझी ओळख साधारण आठवड्यापुरती मर्यादित होती. खरं सांगायचं तर सुरवाती-सुरवातीला मला तिचं फारसं कौतुक देखील नव्हतं. पण जसजसे मी तिच्या सहवासात दिवस घालवायला लागलो, तसतशी ती मला हळूहळू आवडूं लागली. आणि तसं पाहिलं तर हे साहजिकच होतं. आपल्या जवळचीं माणसं, आपले नातेवाईक व मित्रमंडळी, आपल्यापासून दूर असली की आपण कुणावर प्रेम करणं किंवा कुणी आपल्यावर प्रेम करणं या गोष्टीचा एक वेगळाच नशा चढायला लागतो. तुम्हां सर्वांबद्दल मी खात्रीदायक सांगूं शकत नाहीं, पण माझ्या बाबतीत हे खरं ठरलं होतं.
ही गोष्ट साठीच्या सुरवातीची आहे ... म्हणजे माझ्या साठीतील नाही, पण १९६०च्या सुरवातीची आहे. मी आर्मीत (Army Service Corps) भरती होऊन आठ महिन्यांचा अवधी लोटला होता. १९६२ मध्यें मी सैन्यात भरती झाल्यापासून घरच्या लोकांपासून दूर रहाण्याचं सुरू झालेलं सत्र केव्हां संपेल हे माझं मलाच माहीत नव्हतं. याआधी मी घराचं सुरक्षाचक्र सोडून कधीच दूर गेलेलो नव्हतो. फारफार तर दोनचार दिवसांकरितां गेलेलो असेन, पण एवढ्या दीर्घ अवधीकरितां कधीच नाहीं. सगळ्यांकडेच मिळूनमिसळून रहायच्या सवयीमुळे जवळचे असे मित्र सुद्धां नव्हते. मी नेहमींच माझ्या घराच्या व घरवाल्यांच्या मर्यादित चौकटीत वावरत असायचो. पण ---
पण नोव्हेंबर १९६२च्या त्या एका सकाळी कुणालाहि न सांगतां मी आर्मीत भरती झालो व माझ्या आयुष्याच्या एका नव्या पर्वाची सुरवात झाली. (आतां मी आर्मीत मुळी भरतीच का झालो ही एक वेगळीच कथा आहे !) आणि अगदी पहिल्यांदाच -- आणि हे सर्व किती दिवस, महीने किंवा वर्षं चालणार होतं याची मला निदान त्यावेळी तरी किंचितसुद्धां कल्पना नव्हती -- मला सर्वांपासून दूर रहावं लागणार होतं. पण या गोष्टीला मी काही एकटाच अपवाद नव्हतों. जसं इतर लोकांच्या बाबतीत घडतं तसं मला सुद्धां असं एकटं रहाण्याची सवय लागत गेली. अर्थातच बर्‍याच वेळां मला भयंकर एकटं आणि एकाकी वाटायचं.
मी इतर लोकांमध्ये फारसा कधीच मिसळत नव्हतों, पण आसपासच्या छोट्या मित्रमंडळीकडे माझं सूत मस्त जमत गेलं. सुरवातीच्या बेँगलोरमधील (सध्या बंगलुरू असावं बहुतेक!) ट्रेनींगनंतर माझी बदली पुण्याला झाली. मी मनातल्या मनात विचार केला, चला, निदान पुणे बॉंबे (आताचं मुंबई) पासून बरंच जवळ होतं. दुदैर्वाने पुण्यात देखील माझ्या खास ओळखी नव्हत्या. मात्र, लवकरच माझी ओळख कुलकर्णी परिवाराकडे झाली. कुलकर्णी सर आर्मीत (Army Ordinance Corps) मेजरच्या पदवीवर होते. मेजर कुलकर्णी आमच्या सारस्वत समाजातील होते व त्यांनी मला लगेच जवळ करून घेतलं. अर्थांतच माझी जवळीक त्यांच्या मुलांकडे, मुलगा विवेक व मुलगी स्मिता, अधिक होती. मेजर कुलकर्णी दीर्घ काळाकरिता उत्तर भारतात, बर्‍याच वेळी महिन्याहून जास्त दिवस, बदलीवर असत, त्यामुळे त्यांची व माझी भेट कमीच व्हायची. मी माझा बराच फावला वेळ त्यांच्या घरी घालवायचो. आणि अशाच एका प्रसंगी मी लिझ्झीला पाहिलं. काही दिवसांनी तिच्या विषयी माझ्या मनात एक विचित्र आकर्षण निर्माण झालं. मित्रांनो, हें प्रथमदर्शनी प्रेम होतं अशांतील प्रकार मात्र नव्हता. मी आधीच सांगितल्याप्रमाणॆ जसजसा मी लिझ्झीच्या सहवासात रहात गेलो, तसतसं या आकर्षणाचं रूपांतर प्रेमात होत गेलं. कुलकर्णी परिवारात लिझ्झीचा जन्म झालेला नसला तरी त्या सर्वांनी तिला आपल्या परिवारापैकीच एक म्हणून वाढवलं होतं -- अगदी ती जन्माला आल्यापासून.
अगदी पहिल्यांदाच मी लिझ्झीच्या घरीं, म्हणजे मेजर कुलकर्णींच्या घरीं गेलो, तेव्हां मी सैन्याचा हिरवा गणवेष परिधान केलेला होता. लिझ्झीने माझा तो ओळखीचा वाटणारा गणवेष पाहिला व ती माझ्याकडे धावत आली. लिझ्झीचं हे विचित्र वागणं विजय व स्मिताला फारसं आवडलेलं दिसलं नाहीं, कारण ती दोघं नेहमी तिच्याचकडे खेळायचीं, आणि त्यांना वाटायचं की लिझ्झीनं फक्त त्यांच्याशीच खेळावं. पण खरं सांगायचं तर मी त्या क्षणीच लिझ्झीच्या प्रेमात पडलो. मी तिला माझ्या मांडीवर बसवून घेतलं व तिचे लाड करायला लागलो. ती सुद्धां भलतीच खुश झाली व तिने मला अंगभर चाटायला सुरवात केली.
माझ्यावर प्रेम करणारे सगेसोयरे माझ्यापासून दूर असल्याने मला लिझ्झीचे ते चाटणं खूपच रोमांचकारी वाटलं. मी काय म्हणतोय ते कळतंय ना तुम्हांला? अशा वेळीं एका कुत्र्याचं (लिझ्झीच्या संदर्भात कुत्रीचं) चाटणं रोमांचक वाटणं अगदी साहजिकच होतं. हो मित्रांनो, लिझ्झी कुलकर्णी परिवारातील एक पाळीव कुत्री होती. पण थांबा, हा आमच्या प्रेमकहाणीचा अंत नव्हता. ही सुरवातच होती म्हणा ना. लवकरच मीसुद्धां त्या परिवाराचा एक अविभाज्य हिस्सा बनलॊ, आणि बराच फावला वेळ त्यांच्या घरी घालवायला लागलो. कधीकधी मी रात्री तिथेच झोपायचो आणि सकाळ झाली की लवकर उठून परत बॅरेक्सवर निघून यायचो. वेळेवर ड्यूटीवर हज़र रहाण्याची खबरदारी घेतली तर एवढं स्वातंत्र्य मला माझ्या वरिष्टांकडून मिळायचं कारण ऑफिसमधे सर्वांनाच माहीत होतं की मी मेजर कुलकर्णींच्या परिवारापैकीच एक होतो.
एका सकाळी तिथं रात्र घालवल्यानंतर नेहमींप्रमाणे मी सकाळी ड्यूटीवर यायला निघालो. चालतांना मला सारखं जाणवत राहिलं की कुणीतरी चपळाईनं माझा पाठलाग करीत होतं. जेव्हां मी अचानक पाठी वळायचो, तेव्हां तो "कुणीतरी" पटकन लपायचा. हा लपंडाव बराच वेळ चालू राहिला. एव्हांपर्यंत त्यांच्या घरापासून बरंच अंतर पार करून मी माझ्या बॅरेक्सच्या जवळ येऊन पोचलॊ होतों. आतां माझ्या लक्षांत आलं होतं की माझा पाठलाग करणारा तो कुणीतरी दुसरातिसरा नसून माझी ’मैत्रीण’ लिझ्झीच होती. माझ्या हे लक्षांत येईपर्यंत एव्हांना खूप उशीर झाला होता आणि मागे वळून तिला परत घरी घेऊन जाणं मला मुळींच परवडलं नसतं. लिझ्झी इतकी चाणाक्ष होती की तिच्या मागावर मला वळलेलं पहातांच ती कुठंतरी लपली असती.
मी तिला माझ्यामागून बॅरेक्सपर्यंत येऊं दिलं. एका कुत्र्याला, सॉरी, कुत्रीला, बॅरेक्सवर ठेवणं आर्मीच्या कायद्याविरुद्ध व शिस्तीविरुद्ध ठरलं असतं, पण माझा अगदीच नाईलाज होता. मी दुसरं कांहीसुद्धां करणं म्हणजे लिझ्झीला गमावण्यासारखं होतं. माझ्या इतर सहकार्‍यांनी लिझ्झीला खायला घालण्यात व तिच्यासाठी उबदार पलंग तयार करण्यात मला बरीच मदत केली. लिझ्झीच्या गायब होण्याने कुलकर्णींच्या घरी जो कांही गोंधळ माजला असेल त्याची मला संपूर्ण कल्पना नसली तरी एवढं नक्कीच माहीत होतं की लिझ्झीच्या गायब होण्याने सर्वजण काळजीत असतील.
दुसर्‍या दिवशी भल्या पहाटेच बॅरेक्समधून मी लिझ्झीला घेऊन तिला तिच्या हक्काच्या घरी सोडायला निघालो. आदल्या रात्रीं तिनं केवढी भयंकर भानगड करून ठेवली होती याची थॊडीशी कल्पना एव्हांना लिझ्झीला देखील आली असावी. त्यांच्या घराजवळ पोचतांक्षणींच लिझ्झीनं जोरजोरांत भुंकायला सुरवात केली. तिचं भुंकणं ऐकून विजय व स्मिता बाहेर धावत आले आणि त्यांना पाहता क्षणीच लिझ्झीनं त्यांच्या अंगावर उडी मारून त्यांना प्रेमानं चाटायला सुरवात केली. विजय आणि स्मिताचे डोळे खुशीच्या आसवांनी भरलेले होते. सौ. कुलकर्णी म्हणाल्या की आदल्या रात्री त्यांच्यापैकी कुणाचाहि डोळा लागला नव्हता. बहुतेक त्यांना अंधुकशी कल्पना आली होती, माझा गणवेष पाहून लिझ्झीला वाटलं असावं की ती आपल्या मालकाचाच पाठलाग करीत असावी. पण जेव्हां लिझ्झीला आपली चूक कळाली तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. असो, म्हटलंच आहे ना, "ज्याचा शेवट गोड असतो ...
या प्रसंगाला बरीच वर्षं लोटली आहेत. विजय व स्मिताची लग्नं झाली असतील. त्यांची मुलंसुद्धां आतां मोठी झाली असतील. मी आर्मी सोडून बरीच वर्षं झालीयत व शक्य आहे कुलकर्णी परिवार मला विसरला देखील असेल. त्यांच्या घरात एखादा पाळीव प्राणी असेल-नसेल, मला माहीत नाहीं. पाळीव प्राणी माणसाचा मानसिक त्राण कमी करायला उपयुक्त ठरतात असं मानसशास्त्रांत मानलं जातं. पण माझ्या बाबतीत याचं प्रात्यक्षिक मला दिलं होतं लिझ्झीनं !

Tuesday, December 22, 2009

सान्ता क्लॉस येतोय !

या ’गोडबोल्या’ व हंसर्‍या चेहर्‍याच्या म्हातार्‍या माणसाच्या आठवणी माझ्या बालपणीच्या अविस्मरणीय आठवणींच्या संग्रहात घर करून आहेत. त्यावेळी मला ’सान्ता क्लॉस’ हा शब्द मराठीत नीट लिहिता येत नव्हता, की त्याचं इंग्रज़ी स्पेलींग सुद्धा येत नव्हतं. सदर्‍याच्या बाहीनं शेंबडं नाक साफ करण्याचा सतत निष्फळ प्रयत्न करणारा छोटासा कारटा होतो मी त्यावेळी. मी लवकर झोपावं म्हणून आई नेहमी मला एका जाडजूड म्हातार्‍याच्या भयानक गोष्टी सांगून घाबरवायची, "तू लवकर झोपला नाहीस तर हा पांढरीशुभ्र दाढीवाला म्हातारा तुला आम्हां सगळ्यांपासून दूर कुठल्यातरी गांवी घेऊन जाईल. त्याचं नाव आहे ’सांता क्लॉस’." आणि कुणीतरी जादू केल्याप्रमाणे मी लगेच झोपी जायचो. त्या दाढीवाल्या म्हातार्‍याची सॉलीड भीति वाटायची मला त्या वेळी !
हा हसर्‍या (?) चेहर्‍याचा, पण मनात भीती निर्माण करणारे लालभडक कपडे घातलेला (लाल म्हणजे धोका, हे समीकरण!) म्हातारा मला पुन्हा दिसत असे तो डिसेंबर महिन्याच्या सुमारास बाबांना त्यांच्या ऑफिसमधे मिळणार्‍या ग्रीटींग कार्ड्सवर. ती चित्रं पाहून माझी अगदी खात्रीच पटली होती की त्या म्हातार्‍याच्या पाठीवर असलेल्या मोठ्या लाल पोत्यात माझ्यासारखीच लवकर न झोपणारी बरीच वात्रट पोरं भरलेली होती.
आणि म्हणूनच डिसेंबरच्या एका संध्याकाळी, जेव्हां बाबांच्या गोर्‍या साहेबाने दिलेल्या एका मुलांच्या पार्टीत मी त्या हसर्‍या म्हातार्‍याला आपलं लाल पोतं घेऊन नाचत येताना पाहिलं, तेव्हा मला आश्चर्याचा गोड धक्काच बसला. मला अगदी चांगलं आठवतंय, जेव्हा त्यानं आपल्या पाठीवरचं लाल पोतं जमिनीवर ठेवलं, तेव्हा त्याला तिथं पाहून मी मोठ्यानं किंचाळून पळूनच जाणार होतो. आणि नेमका भीतीने चक्कर येऊन मी जमिनीवर कोसळणार, तेवढ्यात मला आपल्या पोत्यात कोंबण्याऐवजी आपल्या पोत्यातून एक मस्तपैकी भेट काढून त्यानं माझ्या हातात ठेवली. मी अगदी मोठ्याने ओरडलो खरा पण घाबरून नव्हे, तर आनंदाने !
त्या दिवशी घरी पोचल्यावर मी आईशी चक्क भांडलो की तिने मला त्या सफ़ेद दाढीवाल्या, लालभडक कपडे घातलेल्या, प्रेमळ म्हातार्‍याबद्दल काहीतरी भलत्याच खोट्या दंतकथा सांगून उगीचच घाबरवलं होतं. आणि पहिल्यांदाच माझ्या कोणत्याहि प्रश्नाचं उत्तर आईजवळ नव्हतं. कदाचित याचं कारण हे असणं शक्य होतं की तिच्या मते सांता क्लॉस (एव्हांना मला त्याचं नाव कळून चुकलं होतं !) क्रिस्ती धर्माचं प्रतीक होतं, एक असा धर्म जो ती ना पाळत होती, ना समजत होती.
त्या बालपणीच्या आठवणी खूप मागे सोडून मी बरीच वाटचाल केलीय. आता मला जाणवतंय की त्यावेळी मला व इतर मुलांना आपल्यापासून दूर पळताना पाहून सांता क्लॉसला किती वाईट वाटलं असावं. आणि तेसुद्धा तो इतक्या प्रेमाने सगळ्या मुलांना जवळ बोलावीत असतांना. काही मुलं मला पाहून देखील अगदी तसंच वागायची. हो, सांता क्लॉसच्या भावना मी नीट ओळखून चुकलो आहे.
माझ्या एकुलत्या एक भाचीचा वाढदिवस नाताळ सणाच्या दिवशी, म्हणजे २५ डिसेंबरला, येतो. भारत सोडून पैशांची हिरवळ शोधायला म्हणून मी दुबईच्या रुक्ष वाळवंटात गेलॊ (बापरे बाप !) त्यावेळी मी तिचा वाढदिवस तिथं माझ्या काही छोट्या मित्रांच्या संगतीत साजरा करायला सुरवात केली. एकदा जेव्हा माझ्या चिमुकल्या मैत्रीणीनं मला विचारलं, "दोस्त, या पार्टीला सांता क्लॉस येतोय का?", तेव्हा मी स्वत:लाच विचारलं, "का नाही?" एका म्हातार्‍या क्रिस्ती बाईनं मला लगेच सांता क्लॉसचा झकास पोषाख शिवून दिला, अगदी त्याच्या झुब्बेदार टोपी व लाल पोत्यासकट. तिथल्याच एका सुपर-मार्केटमधून मी पांढरीशुभ्र दाढी असलेला एक मुखवटा विकत घेतला आणि अशा प्रकारे माझ्या सांता क्लॉसच्या रूपाने जन्म झाला.
"सांता क्लॉस येतोय... सांता क्लॉस येतोय," मुलांच्या उत्साहपूर्ण गलक्याने माझं स्वागत केलं. त्या सगळ्यांच्या निष्पाप चेहर्‍यांवर थोडासा अविश्वास व खूपखूप आनंद भरलेला होता. सगळ्या दिशांतून मुलं येत होतीं ... सगळ्या वयाची ... सगळ्या धर्मांची ... सगळ्या सामाजिक स्तरांची. सांता क्लॉसला प्रत्यक्षात बघायचंय या एकाच इच्छेनं त्या सर्वांना एका सूत्रात बांधलेलं होतं. त्या सर्वांना "याची देही, याची डोळा" सांता क्लॉसला पहायचं होतं, त्याला स्पर्ष करायचा होता, त्याला अनुभवायचं होतं, तो देत असलेल्या अपूर्व आनंदात सहभागी व्हायचं होतं... आणि हो, तो मोकळ्या हातानं वाटत असलेल्या भेटवस्तूंवर ताबा सुद्धा मिळवायचा होता. या असीम आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या इच्छेनं मी दुबईच्या एका प्रसिद्ध सुपर-मार्केटनं, मोहेबी सेण्टरनं, दिलेल्या जाहिरातीला उत्सुकतेनं प्रतिसाद दिला होता. त्यांना नाताळच्या काही दिवस आधीपासून दुकानात बसायला सांता क्लॉस हवा होता. आणि मला हा अनुभव (व त्याबरोबर मिळणारा आर्थिक मोबदला देखील !) हवा होता.
माझ्याकडॆ तयार असलेला लाल पोषाख मला आयता उपयोगी पडला. मी सेण्टरवाल्यांना फक्त काळे बूट द्यायला सांगितलं. मागे अशाच एका प्रसंगी एका लहान मुलीनं मला विचारलं होतं, "सांता क्लॉसचे काळे गमबूट तुझ्याकडे का नाहीत?" या अचानक प्रश्नाने मी थोडावेळ गोंधळून गेलो होतो. पण लगेच मी प्रसंगावधान बाळगून तिला उत्तर दिलं होतं, "दुबईच्या वाळवंटात सांता क्लॉसला त्यांची मुळी गरजच नाही, म्हणून." त्या थोड्या अवधीत मुलांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांनी मला जणू टाचेवरच ठेवलं होतं.
"सांता, तू इतका बारीक का दिसतोयस? तुला तुझी आई नीट खायला देत नाही का?" एका मुलीनं विचारलं.
"तुझी दाढी इतकी पांढरीशुभ्र कशी?" अजून एकानं विचारलं.
"तू खराखुरा माणूस नाहीस, खरं ना?", एक अतिचौकस मुलगा म्हणाला.
आणखी एका (आगाऊ) मुलाला माझा मुखवटा काढून माझा खरा चेहरा पहायचा होता. या मुखवट्यामागे खरा चेहरा कुणाचा होता, कुणालाच माहीत नव्हतं. जणूं सारं विश्व अगदी जवळून तसंच खूप अंतरावरून पाहिल्यासारखं होतं.
"बाळा, तू पांचगणीहून केव्हा आलास?" मी हलकेच एका मुलाला कौतुकाने विचारलं, कारण मला माहीत होतं की तो मुलगा पांचगणीच्या एका शाळेत शिकत होता.
"सांता, पण तुला कसं कळलं मी पांचगणीला शिकतोय तें?" त्याने डोळे विस्फारून मला मोठ्या आश्चर्याने विचारलं.
"सांताला सगळं काही माहीत असतं," मी उत्तरलो.
"सगळं काही?", तो पुन्हा म्हणाला. "तू माझ्या बाबांना सुद्धा ओळखतोस? ते देखील माझ्याच शाळेत होते, लहान असतांना."
"माहीत आहे मला. मी त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा ते तुझ्यापेक्षाहि लहान होते."
त्याने माझ्या सफ़ेद दाढीकडे पाहिलं आणि आपल्या शंकेचं निरसन झाल्याच्या समाधानाने मान डोलावली.
काही मुलं एकटी आली तर काही घोळक्यात आली. काहींना फक्त सांताला पाहायचं होतं, काहींना त्याच्याकडे हस्तांदोलन करायचं होतं, काहींना सांताबरोबर फोटो काढून घ्यायचे होते. बरेच जण फुकट मिळणार्‍या भेटवस्तू घेण्यासाठी परत येत होते, तर काही आईबाप आधी मिळालेल्या वस्तू कुठेतरी लपवून आपल्या मुलांना भेटवस्तूंसाठी पुढे ढकलत होते. काहीजण सांताला आपल्या घरी निमंत्रित करण्यासाठी येत होते.
"सांता, तू माझ्या घरी येशील?," एका मुलाने माझा लाल झगा ओढीत हळूच विचारलं.
"नक्की येईन, माझ्या लाडक्या बाळा."
"तू माझ्या घरी ईदसाठी येशील?" एकीने विचारलं.
"अन माझ्या घरी दिवाळीच्या वेळी?", दुसर्‍या एका गोड मुलाने प्रश्न केला.
"त्यांच्या घरी ईद व दिवाळीला जाणार असशील तर माझ्या वाढदिवसाला सुद्धा येशील?" दुसर्‍याने विचारलं.
अन सांता त्याचा गालगुच्चा घेत म्हणाला, "वाढदिवसालाच कशाला, तुझ्या लग्नाला सुद्धा येईन बरं."
हे ऐकून सगळेजण जोरजोराने हंसायला लागले. या सर्व प्रश्नोत्तरांनी त्यांचा सांता क्लॉसच्या अस्तित्वावर असलेला विश्वास दिसून येत होता. या वेळी त्यांच्या मनात सांता क्लॉस केवळ क्रिस्ती धर्माचं प्रतीक राहिलं नव्हतं. काळाचं, वेळेचं किंवा धर्माचं कसलंच बंधन सांताला नव्हतं. तो होता शांति, शुभेच्छा व आनंदाचा अग्रदूत -- मग दिवाळी असो, ईद असो, पटेटी असो की नाताळ. कारण एक निष्पाप बालकाला मानवेतेशिवाय दुसर्‍या कुठल्याहि धर्माचं बंधन नसतं. मोठ्यांच्या दुनियेत खूप मोठ्या प्रमाणात असतात ताण, दाह, कलह, द्वेष, मत्सर. अशा परिस्थितीत एकच सत्य असतं. प्रत्येक मूल स्वर्गातील ईश्वराचा हा संदेश घेवून पृथ्वीवर जन्माला येतं की तो, म्हणजे परमेश्वर, मानवाच्या बाबतीत अजून हताश झालेला नाही. कधीतरी हे कलह, ही युद्धं नक्की थांबतील. आणि प्रत्येक नाताळाला सांता क्लॉस याच महत्वपूर्ण संदेशाची पूर्ति करण्यासाठी येतो.


लक्ष्मीनारायण हटंगडी
वसई (पूर्व)