Thursday, March 4, 2010

वादळ

मुंबई
१७ मार्च, १९६१
प्रिय अरूणदादास,
स.नि.वि.वि. माझं हे पत्र पाहून तुला कदाचित आश्चर्य वाटेल. तू म्हणशील, "आशाने बर्‍याच महिन्यांनंतर दादाची आठवण काढलेली दिसतेय." पण अरूण, माझा मोठा भाऊ आहेस तू. तुझ्याशिवाय दुसर्‍या कुणाकडे व्यक्त करणार मी माझ्या भावना? नानांचा माझ्यावर बराच राग झालेला दिसतो. मला प्रत्यक्ष येऊन भेटणं सोडच, पण मला साधं पत्र लिहायला सुद्धा तयार नाहीत ते. कुणावर प्रेम करणं इतकं वाईट असतं का रे दादा? माझं हे पत्र तुझ्या हातात पडण्याआधीच नानांनी तुला पुण्याहून पत्र टाकलं असेल. माझ्याबद्दल खूपखूप तक्रारी असतील त्यांच्या. पण खरं सांगते अरूण, मी अगदी निर्दोष आहे. मोहनवर प्रेम करण्यात मी कसलीच चूक केली नाही. खरं ना? वडील भावाच्या नात्याने तू मला योग्य तो मार्ग दाखवशील या आशेनं मी आपलं मन तुझ्याकडे मोकळं करतेय.
मोहनचं सबंध नाव आहे मोहन मधुकर आळंदकर. माझी व त्याची पहिली ओळख हॉस्पिटलमध्येच झाली. मी ज्या वॉर्डला नर्स म्हणून काम करीत होते तिथंच तो पेशंट होता. कसल्याशा अपघातानं जखमी होऊन तो आमच्या हॉस्पिटलला आला. त्याची देखरेख करण्याचं काम माझ्याकडे होतं. मी त्याला प्रथम जखमी अवस्थेत पाहिलं तेव्हा माझ्या मनात त्याच्याबद्दल कसल्याच भावना नव्हत्या. पण तरूणपणी आपलं मन फारसं आपल्या ताब्यात नसतं. अरूणदादा, माझंही तसंच झालं. मी वेगळ्याच भावनेने त्याची सेवा करूं लागले. पण आपलं मन त्याच्याकडे व्यक्त करण्याचं धाडस मात्र मला कधीच झालं नाही. माझ्या सुप्त भावनांना त्याच्याकडून उत्तर मिळेपर्यंत गप्पच होते मी. मनातल्या मनात त्याच्यावर प्रेम करीत राहिले. तो जसजसा बरा होऊ लागला तसतशी त्याची अस्वस्थता वाढत चालली अन माझ्या भुकेल्या डोळ्यांना ते जाणवू लागलं.
अखेर जायच्या दिवशी कुणाचंही लक्ष नसताना त्यानं माझा हात हातात घेतला, व आपलं मन मोकळं केलं माझ्याकडे. माझ्या प्रेमाला उत्तर मिळालं होतं. मी प्रेमाला बळी पडले. पण माझा विश्वास कर, माझा काहीच गुन्हा नव्हता यात. अन तो आहे देखील तसाच राजबिंडा -- उंच, धिप्पाड, गोरा, देखणा. शिवाय उत्तमपैकी कलाकार आहे तो. बर्‍यापैकी नोकरी आहे त्याला. मग तूच सांग, त्याच्याशी प्रेम करण्यात मी काय पाप केलं? त्या दिवसानंतर आमच्या गाठीभेटी वाढत राहिल्या, कधी चोरून तर कधी खुल्लमखुल्ला. शेवटी मला रहावेना अन मी पत्र लिहून नानांना कळवलं की मी व मोहननं लग्न करायचं ठरवलंय. या साध्या गोष्टीत खरंतर नानांनी आकांडतांडव करण्यासारखं काहीच नव्हतं. तुला नाही असं वाटत?
खूपच विष ओकलं नानांनी आपल्या छोट्याशा पत्रात. ते पत्र जवळ घेऊन खूप रडले मी त्या दिवशी. माझ्याच खोलीत रहाणार्‍या सविताला सगळं सांगितलं मी. पण आपलं दु:ख हलकं करायला आपल्या माणसांची सहानुभूति लागते, अरूण. नानांनी खूपच नावं ठेवलीं मला. आईसुद्धा माझ्या विरुद्ध आहे. सुधा अजून लहान आहे. आपल्या वकिलीच्या परीक्षेपुढे दुसरं काहीच सुचत नाही त्याला. आणि तूसुद्धा खूप दूर आहेस माझ्यापासून. मी दुसरं काय करूं? निदान पत्रातून तरी तुला आपलं दु:ख कळवतेय. अरूणदादा, दुसर्‍या जातीत जन्म घेणं इतकं का वाईट असतं, की त्या दोन व्यक्तींच्या एकत्र येण्याला समाजानं आडकाठी घ्यावी? मोहन आपल्या जातीत जन्माला आला नाही यात त्याचा काय दोष? हे सगळं परमेश्वराच्या हाती असतं, नाही का? अन आपल्याला लग्न करायचं असतं ते एका व्यक्तीशी, त्याच्या जातीशी नव्हे. मी स्पष्ट सांगते दादा, अगदी कितीहि अडथळे आले तरी लग्न करायचं ठरवलंय आम्हीं दोघानीं.
अरूण, मला तुझा सल्ला हवाय, अन शक्य तो लवकर. खूप मोठं वादळ उठलंय माझ्या जीवनात. आता तूच सांग, मी काय करूं?

तुझी बहीण
आशा
_________________________________________________________________________________________

कल्याण
१९ मार्च, १९६१

प्रिय आशा,
तुझं पत्र मिळालं. नानांचं पत्र देखील त्याच सुमारास पोचलं. तुझ्या सांगण्याप्रमाणे ताबडतोब पत्र लिहितोय. पण मी जरा स्पष्टच सांगतोय, मी तुला सल्ला देऊ शकणार नाही. कारण माझ्या किंवा दुसर्‍या कुणाच्याहि सल्ल्याची अथवा मदतीची तुला गरज आहे असं कधीच दाखवलं नाहीस तू. ज्या वेळी सल्ला घेणं आवश्यक होतं त्यावेळी तू गप्प होतीस. आंधळ्या प्रेमानं तुझी वाचा बंद केली होती. खूप उशीरा पत्र लिहीलंस तू, स्वत:च्या मर्जीनं निर्णय घेतल्यावर. आशा, तुला खूपच घाई होती. तुला वाटेल, दादा आपल्या काळजाचे लचके तोडतोय. पण तुला माहीत आहे, माझा स्वभावच तसा आहे. माझा नाईलाज आहे. पूर्वींपासूनच जे मला पटलं तेच मी स्पष्टपणे सांगत आलोय. मला माफ कर, आशा, नानांप्रमाणेच मी सुद्धा पत्रात विषच ओकणार आहे.
मला अभिमान आहे की तुझे विचार फार उच्च आहेत. "दुसर्‍या जातीत जन्म घेणं वाईट नसतं. हे सगळं परमेश्वराच्या हाती असतं, आपल्याला लग्न करायचं असतं ते एका व्यक्तीशी, त्याच्या जातीशी नव्हे.." वगैरे वगैरे. तू म्हणतेस ते अगदी सगळं सगळं खरं असेल. पण कुटुंब, समाज, धर्म, वगैरेंची बंधनं, अगदी आपल्याला आवडत नसलीं तरी, जखडून ठेवतात आपल्याला, हेही तेवढंच खरं आहे. आपल्याच जातीच्या समाजात राहून समाजाच्या रूढींशी वैर धरणं कुणालाहि हितकारक ठरत नाही, आशा. आपल्या अरूण दादाचे हे बोल नीट लक्षात ठेव गैरसमज करून घेऊ नकोस आपल्या या भावाविषयी. तुझ्या व मोहनच्या लग्नाला माझा विरोध आहे असंच नाही. खरं सांगायचं तर तुला विरोध करायचा हक्कच नाही मला. तुझं भलं वाईट पहायला तुझी तू समर्थ आहेस. पण सत्य हे आहे की तुझी वडील माणसं जिवंत होती. लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांना कळवण्यापेक्षा तो निर्णय घेण्याआधी आमचं, निदान नानांचं तरी, मत घेणं हे कर्तव्य होतं तुझं असं नाही वाटत तुला? तू आधी कळवलं असतंस तर नाना संतापले असते मान्य आहे मला. त्यांनी चांगल्या शब्दात तुझी समजूत काढली असती. पण तुला ते नको होतं. तू म्हणतेस, तुझ्या जीवनात वादळ उठलंय. खूपच वाङ्मयीन वाटतात तुझे शब्द. पण भोवती वादळ उठलं असताना आपलं मन शांत ठेवणं आपल्याच हाती असतं. तू डोळे उघडे ठेवून वादळात उडी घेतलीस. ती उडी घेण्याआधी तुला योग्य तो सल्ला द्यायला आम्ही समर्थ व तयार होतों. नानांच्या क्रोधाची तुला भीति वाटत होती तर मला, आपल्या मोठ्या भावाला, विश्वासात घेऊन कळवायचं होतंस. मी केली असती त्यावेळी तुला मदत.
अरे हो, मला आलेल्या नानांच्या पत्राबद्दल मी तुला कळवलंच नाही की. तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. नानांनी आपला निर्णय बदलला आहे -- बदलला असं म्हणण्यापेक्षा त्यांना बदलावा लागला आहे असं म्हणणं जास्त योग्य वाटेल. आपण तिघंच मुलं आहोत नानांची, दोन मुलगे व तू एक मुलगी. नाना बाहेरून जितके कठोर दिसतात तितकेच प्रेमळ आहेत अंत:करणाने. फणस जसा वरून कांटेरी पण आतून मऊ असतो ना, नाना अगदी तसेच आहेत. एकवेळ आम्हा मुलांच्या मर्जीविरुद्ध जाऊन वागतील ते, पण आपल्या एकुलत्या एका मुलीच्या मर्जीविरुद्ध जाणं कधींच आवडलं नसतं त्यांना. खरं म्हणजे त्यांनी तुला ते पत्र लिहीलं ते रागाच्या भरात, अगदी आपल्या इच्छेविरुद्ध. पण त्यांचा राग शांत झाला तेव्हा ते स्वत:वरच चिडले व त्यांनी आपला निर्णय बदलला. तुझं लग्न अगदी मस्त थाटात लावून देण्याचं ठरवलंय त्यांनी. तुला नवीन दागिने देणार आहेत ते. तुझ्यासाठी, केवळ तुझ्या मर्जीसाठी, आपल्या मर्जीविरुद्ध, आपल्या ध्येयांविरुद्ध वागताहेत नाना. आपल्या तत्वांपेक्षांहि तुझ्यावर जास्त प्रेम आहे त्यांचं.
पण मी जरा स्पष्टच सांगतोय तुला आशा, मला हे मान्यच नाही मुळी, अन मी त्यांना साफ कळवलंय तसं. तुझ्या व मोहनच्या लग्नाला त्यांनी होकार दिला, काही हरकत नव्हती. पण इतर गोष्टी त्यांनी कबूल करायला नको होतं. माझं स्पष्ट मत वाचून तुला वाईट वाटेल कदाचित. तुझं मन दुखावलेलं त्यांना मुळीच आवडणार नाही. माझ्याशी संबंध तोडायला देखील तयार होतील ते. त्यालाहि तयारी आहे माझी. स्वत:च्या जीवनाचे धागेदोरे संभाळायला मी समर्थ आहे. स्वत:च्या पायांवर उभा आहे मी. माझं हे मत तुला कदाचित अविचार वाटणं शक्य आहे, पण माझा नाईलाज आहे. माझ्या मनाची घडणच तशी आहे.
जाऊंदेत या गोष्टी, येत्या एकदोन दिवसांत मी बहुतेक तुला भेटायला येईनच. मला समजून घे व माझ्यावर राग धरू नकोस. आशा, अनेक आशीर्वाद.
तुझा मोठा भाऊ
अरूण
_________________________________________________________________________________________

कल्याण,
४ जून, १९६१
प्रिय आशा,
बर्‍याच दिवसांनंतर तुला पत्र लिहितोय. लिहिणार नव्हतो खरं तर, पण भावा-बहिणीचे संबंध तोडेन म्हटलं तरी इतक्या सहजासहजी तुटत नाहीत. आज तुझ्याशी बोलावसं वाटलं, निदान पत्रांतून तरी. तू बहुतेक आपल्या थोरल्या भावाला विसरलेली दिसतेयस. साहजिकच आहे. तू दुसर्‍याची होणार आहेस. मी इतक्या सहजासहजी तुला विसरणं शक्य नाहीं. लहान असतांना आपण एकत्र हसलों-खेळलों आहोत. बर्‍याच वेळी तुझीं आसवं देखील पुसली आहेत मी. पण आता तू असं वागतेयस की मी जणूं कुणीच नाहीं तुझा. मी लिहिलेल्या पत्राला साधं उत्तर देणंसुद्धा जमलं नाही तुला. १९ मार्चला मी तुला शेवटचं पत्र लिहीलं होतं. तुझ्या उत्तराची वाट पाहिली, पण व्यर्थ ! पोस्टमन यायचा व निघून जायचा. त्यानंतर मी जवळजवळ तीनदां तुझ्या हॉस्पिटलमधे येऊन गेलो, पण तुझी भेट झाली नाही. तू नव्हतीस का मुद्दामच मला टाळायचीस कोण जाणे.कधीच भेटली नाहीस तू मला.
मी गेल्या पत्रात लिहिलेल्या गोष्टी बर्‍याच मनावर घेतलेल्या दिसतात तू. अग ए वेडे, एक भाऊ आपल्या बहिणीला लिहितो त्या सगळ्याच गोष्टी इतक्या गंभीरपणे घ्यायच्या नसतात. अखेर मलासुद्धा भावना आहेतच की नाही? त्या मेलेल्या नाहीत अजून. मी जरा कठोर वागलो त्यावेळी, मान्य आहे मला. पण त्याचं तू इतकं वाईट मानून आपल्या सख्ख्या भावाला विसरून जाशील असं माहीत असतं तर मी काही लिहिलंच नसतं मुळी. तुझ्या लग्नाला विरोध असूनही तसं स्पष्टपणे व्यक्त केलं नसतं. पण एखाद्याने केलेल्या चुकीला क्षमा नाहीच का? विसरून जा सारं.
मघाशी म्हटल्याप्रमाणे मी तीनदा तुझ्या हॉस्पिटलला येऊन गेलो. प्रत्येक वेळी तुला मात्र भेटू शकलो नाही. खोलीत तुझी मैत्रीण सविता फक्त असायची. इतक्या दूरून येऊन तू न भेटावीस याचं वाईट वाटून दुसरं काहीच न सुचल्यामुळे मी सविताकडे गप्पा मारीत बसायचो, आपलं दु:ख थोडं हलकं करायचो. थोडा वेळ तरी बरं वाटायचं. आता तुला वाटेल की आपला दादा एक परक्या व्यक्तीकडे कसा काय मन मोकळं करू शकतो. पण मला नाही वाटत की तू तशी समजूत करून घेशील, कारण तू सविताला कधी परकं मानलंच नसावं. आपल्या मनातील सर्व गोष्टी तू तिच्याकडे बोलून दाखवायचीस, आपली सुख-दु:खसुद्धा. तिला विश्वासात घ्यायचीस. फार काय, मी किंवा नानांनी तुला लिहीलेलीं पत्रं आधी तू तिला दाखवायचीस. आपल्या पत्रात तिच्याविषयी लिहायचीस. मी हॉस्पिटलमधे आलो होतो तेव्हा ती हेंच म्हणत होती. मग मी माझं थोडंसं दु:ख तिला सांगितलं यात काही चूक असेल असं मला तरी नाही वाटत, नाही का? अन तू नसतांना दुसरं करणार तरी काय होतो आम्ही?
आशा, काय करतेयस हल्ली? अग, एकदा तरी भेट व आपल्या त्या मोहनशी गांठ घालून दे माझी. त्याला भेटायची खूप इच्छा आहे माझी. घाबरू नकोस, टीका करायला नव्हे, अगदी आपलं सहजच. मग सांग, कधी भेटणार आहेस? गेल्या काही दिवसांत नानांचं पत्र वगैरे आलं होतं का? मला तर त्यांनी आताशा पत्र वगैरे लिहीणं बंदच केलंय. कदाचित तुझ्याविरुद्ध वागण्याचं धाडस मी केलं म्हणून असेल. बरेच दिवस आधी त्यांचं एक पत्र आलं होतं मला. पत्राचा सूर पाहून माझ्याशी संबंध तोडण्याचा निश्चय दिसला त्यांचा. त्यानंतर मी पुण्याला गेलोच नाही. मधे सुधाचं पत्र आलं होतं. त्याच्या वकीलीच्या परीक्षा झाल्या, पेपर्स चांगले गेले म्हणत होता. नानांचा माझ्यावरचा राग अजून तसाच कायम आहे असं देखील म्हणत होता तो. अरे हो, सविता म्हणत होती की तुझ्या नर्सींगच्या कोर्सची दुसरी परीक्षा जवळ येतेय. तयारी जोरात चालली असेल तुझी. वेळात वेळ काढून या पत्राचं उत्तर पाठव. आशा, आपल्या माणसांवर असा जास्त वेळ राग धरणं योग्य नव्हे. तुझ्या उत्तराची आतुरतेने वाट पहातोय. निराश करूं नकोस.
तुझा दादा
अरूण
_________________________________________________________________________________________
मुंबई
१२ जून, १९६१
प्रिय अरूण,
माझं हे पत्र पाहून तुम्हाला कदाचित बरंच आश्चर्य वाटेल, पण हे पत्र लिहीणं भागच होतं मला. तुम्ही आशाला लिहिलेलं चार जूनचं पत्र तिनं मला दाखवलं. खरं म्हणजे तिने मला तुमचं पत्र दाखवलं याच गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं. कारण ती आता पूर्वीसारखी मुळीच राहिलेली नाही. तुम्हाला वाटेल तुमच्याच बहिणीविषयी तक्रार करणं मला मुळीच शोभत नाही. पण मी नेहमी तिला धाकट्या बहिणीप्रमाणे वागवत आले अन आता त्याच नात्याने तिच्याबद्दल लिहीतेय. पूर्वी आपली सगळी सुखदु:खं ती माझ्याकडे बोलून दाखवायची. पण आता तिनं माझ्याशी बोलणंच बंद केलंय. मला अगदी परकी समजायला लागली आहे ती. तिच्यातला हा बदल पाहून मला खूप वाईट वाटतंय. पण मी तरी काय करणार? मूग गिळून गप्प बसलेय.आपलं समजून ज्याच्यावर जिवापाड प्रेम करावं त्याच व्यक्तीनं आपल्याला गैरसमजामुळे तिरस्काराने दूर करावं याहून दुर्भाग्याची गोष्ट नाही. मी काय करू अन कुठं जाऊ? लहानपणापासून आईवडिलांच्या मायेला मुकून परक्या छत्राखाली वाढलेली अनाथ मुलगी मी. आपण दुसर्‍यांच्या दु:खाचं वाटेकरी असावं, पण आपलं दु:ख हलकं करायला जवळ कुणीच नाही म्हणून नशीबाला दोष देण्याऐवजी आणखी करणार तरी काय मी?
आशाला भेटायला म्हणून जेव्हाजेव्हा तुम्ही हॉस्पिटलला आमच्या खोलीवर यायचा तेव्हातेव्हा नेमकी आशा खोलीवर नसायची. माझं दुर्दैवच म्हणायचं हें ... खरंच दुर्दैव. दर वेळी माझी व तुमची भेट व्हायची. भेट झाल्यावर बोलणं अगदी साहजिकच होतं. या साध्या भेटींचा पुढे इतका विपर्यास केला जाईल याची किंचितशी जरी कल्पना असती तर मी जाणूनबुजून तुम्हाला टाळलं असतं. आपण दोघं बोलत असतांना कुणीतरी पाहिलं व आशाला तिखटमीठ लावून सांगितलं. त्यानंतर आशा व मोहन मला इतकं काही बोलले की वाटलं सरळ तुमच्याकडे येऊन तुम्हाला जाब विचारावा. त्या दोघांची समजूत होती की आशा खोलीवर नसताना मीच तुम्हाला मुद्दाम बोलावून घेत असे, व तुम्ही तिथं यायचात ते केवळ मला भेटायला. आशानं माझ्यावर केलेले हे खोटे आरोप ऐकून माझ्या अंगातली सगळी शक्तीच गळून गेली. आशाला कधी माझ्या चारित्र्यावर शंका येईल असं मला स्वप्नांतसुद्धा वाटलं नव्हतं. माझं सारं जीवनच संपून गेल्यासारखं वाटायला लागलं. जिला मी आपलं सर्वस्व समजत आले तिनंच मला इतकं खोल गर्तेत ढकलावं?
आशा आता पार बदलली आहे. दुसर्‍याची झालेली आहे. तिचा स्वभाव एकदम बदलला आहे. हल्ली ती बराच वेळ हॉस्पिटलमधून बाहेरच असते. परीक्षा येतील वा निघून जातील. पण ---- जास्त काय लिहू? प्लीज़, तुम्ही हॉस्पिटलमधे येणं बंद करा. निदान माझ्यासाठी तरी. मी ज्या वादळात फसत चाललेय त्यातून मला बाहेर पडायचं असेल तर हा एकच मार्ग आहे माझ्यापुढे. माझं काही चुकलं असेल, अजाणता मी तुमच्यावर काही आरोप केले असतील तर क्षमस्व.
आपली
सविता
_________________________________________________________________________________________

लक्ष्मीनारायण हटंगडी

No comments:

Post a Comment