Thursday, March 4, 2010

मित्र

संध्याकाळची वेळ होती. बाहेर अंधार पडू पहात असला तरी दुकानात दिवे चकाकत होते. रस्त्यावरून जाणार्‍यायेणार्‍या गर्दीकडे पहात मी उभा होतो. आत फारशी गर्दी नव्हती. दिवसभर काम करून थकलेले काही सैनिक दारूच्या बाटल्या समोर ठेवून गप्पा मारीत बसले होते. मला विशेष काम नव्हतं. आळसावलेल्या नजरेने मी माझ्या बाहीकडे पाहिलं, व स्वत:शीच हसलो. कापडाच्या तीन सफ़ेद फिती होत्या माझ्या शर्टावर. अकरा वर्षांच्या सर्वीसनंतरही मी अजून हवालदार म्हणून वावरत होतो; बदली झाली की एका जागेवरून दुसर्‍या जागी आपल्या बॅरेक्स बदलत फिरत होतो. माझ्याबरोबरचे काहीजण माझ्याहि पुढे निघून गेले होते.. पण मी? दुकानातील एका कोपर्‍यात उभा राहून दुकानात आलेल्या-गेलेल्या लोकांची नोंद ठेवत होतो. सहा महिन्यांपासून इथं अंबाल्याला पोस्टींगवर होतो. त्याआधी काश्मीरला; त्याआधी बॅंगलोरला. काय विचित्र असतो जीवनप्रवाह, कुठून कुठे आणून ठेवतो माणसाला!
"मिस्टर, एक ब्ल्यू सील बाटली द्या."
मी दचकून समोर पाहिलं व समोर असलेल्या व्यक्तीला सलाम ठोकला. असले कित्येक सलाम ठोकले असतील मी आजवर. माझ्या पुढ्यात एक दिमाखदार मेजर उभा होता. मला उगीचच त्याचा हेवा वाटला. शक्य असतं तर मी अगदी कुणालाच सलाम केला नसता, पण परिस्थितीनं मला साथ दिली नव्हती. मी बाजूच्या शेल्फवरून एक बाटली उचलून त्याच्या समोर आपटली.
मी जेवढ्या उद्वेगानं बाटली त्याच्या समोर आपटली होती तेवढ्याच शांततेनं त्यानं ती बाटली उचलली, तिचं निरीक्षण केलं व पुन्हां ती समोर टेबलावर ठेवली. आपले सर्व दात दाखवीत तो हसला आणि म्हणाला, "बॉस, ही नको. ज़रा जास्त किमतीची द्या. आज आपण खुषीत आहोत. हं !!"
त्याच्या त्या हसण्याचा विलक्षण राग येऊन मी पुन्हा समोर पाहिलं. त्याचा चेहरा नीट पहायचा होता मला. त्या चेहर्‍याकडे पहाता पहाता माझ्या गत स्मृति चाळवल्या गेल्या. तो हसरा, बेफिकीर चेहरा मी त्यापूर्वीहि कुठेतरी पाहिला होता. ते हास्य माझ्या ओळखीचं होतं. त्या एका क्षणात मी माझ्या सर्व मित्रांचे चेहरे डोळ्यांसमोर आणले. तो चेहरा पाहून बरीच वर्षं लोटली होती. जॉन! जॉन? हो, नक्की जॉनच होता तो.
मी नकळत त्याचा हात हातात घेतला व उदगारलो, "जॉन?" तोहि दचकला. त्याच्या हातातली सिगरेट त्यानं खाली जमिनीवर फेकली, व किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. बराच वेळ टक लावून पाहिल्यावर एकदम त्यानं मला मिठी मारली व ओरडला, "सुनील!" त्या ओरडण्यानं सगळ्यानी आमच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. पण जॉनला त्याची मुळीच पर्वा नव्हती. तो परत ओरडला, "सुनील, मित्रा, आधी ओळखलं नाही मी तुला. पण आता ट्यूबलाईट पेटली. किती वर्षं झाली रे आपल्याला न भेटून? सहा? का सात?"
मी लगेच माझ्या सहकार्‍याला टेबलाशी उभं केलं व जॉनला घेऊन दुसर्‍या टेबलाशी बसलो. खूप वर्षांनंतर माझा मित्र मला भेटला होता, व मला त्या भूतकाळात जमा झालेल्या वर्षांचा आढावा घ्यायचा होता. खूपखूप बोलायचं होतं मला त्याच्याशी. खूप ऐकायचं होतं त्याच्याकडून. बियरनं भरलेला एक ग्लास त्याच्यापुढे करीत मी म्हटलं, "जिगरी, सहासात नव्हे, दहा वर्षं होत आली आपल्याला भेटून. जेव्हा आपली ट्रेनींग सुरू होती तेव्हा बरोबर होतो आपण. आठवतंय? आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा असेच बसलो होतों."
तो जोराने हसला व म्हणाला, "साफ़ झूठ, मित्रा. आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा ही नव्हती आपल्याबरोबर." त्याने आपल्या हातातल्या बाटलीकडे बोट दाखवलं व तो परत मोठ्याने हसला. मी सुद्धा हसलो. जॉन म्हणाला, "मित्रा, युद्ध किती वाईट असतं नाही? आपल्या जवळच्या माणसांना फक्त एका क्षणात किती दूर करून सोडतं ! कुणी शोधून काढली असेल रे ही युद्धाची कल्पना? जगात जर युद्ध नसतं तर केवढं बरं झालं असतं, सुनील. पण मग मला सांग, युद्ध जर नसतं, तर आपण कदाचित भेटलो सुद्धां नसतो. या, या बाटलीचं व आपलं एवढं सख्य सुद्धा नसतं झालं. क्यों?"
जॉन बोलतच होता. सवयच होती त्याला आधीपासून खूप बोलायची. आणि मला त्याचं बोलणं ऐकायला खूप आवडायचं. पण आज माझं लक्ष त्याच्या बोलण्याकडे मुळीच नव्हतं. माझं मन भूतकाळात भरकटत चाललं होतं, अंधुकशा धुळीने भरलेल्या गोष्टी जरा स्पष्टपणे आठवायचा प्रयत्न करीत होतो मी. हळूहळू सारा चित्रपट माझ्या समोरून सरकू लागला. जॉनची व माझी अगदी पहिल्यांदा भेट झाली होती तो दिवस मला आठवला.
ट्रेनींगसाठी म्हणून मी बॅंगलोरला होतो. दुपारपर्यंत रायफल पकडून थकून गेल्यानंतर मी दुपारी थोडा वेळ झोपायचो व संध्याकाळी वेळ चोरून आर्मी कॅण्टीनला जायचो. जॉन मला भेटला तो रविवारचा दिवस होता. मी असाच चहाचे घुटके मारीत एका टेबलाशी बसलो होतो; आपल्याच धुंदीत रंगलो होतो. अचानक माझ्या पाठीवर जोराची थाप बसली. मी भलताच दचकलो. आमच्या प्लटूनच्या उस्तादला माझी चोरून कॅण्टीनला यायची सवय चांगलीच माहीत होती. मी दचकून मागे पाहिलं व पहातच राहिलो. माझ्यासारखाच एक जवान उभा होता तिथं. मी यापूर्वीं त्याला कधीहि पाहिलं नव्हतं, पण मला त्याच्याकडे पहातच रहावसं वाटलं. त्याच्या चेहर्‍यात कसली विलक्षण जादू होती कोण जाणे !
"दोस्त, मॅचबॉक्स है?", त्याने विचारलं.
का कोण जाणे, पण सिगरेट न ओढण्याच्या माझ्या सवयीचा त्यावेळी मला राग आला. मी मान हलवली अन म्हणालो, "सॉरी, मै सिगरेट नही पिता." मी त्याच्याकडे पहात असतानाच तो मला तसाच सोडून निघून गेला. थोड्या वेळानं तो परत आला. त्याच्या हातात एक सिगरेटचं पाकीट व एक मॅचबॉक्स होती. माझ्यासमोरची खुर्ची ओढून तो माझ्यासमोर बसला. आपलं पाकीट माझ्या पुढ्यात धरून त्यानं मला विचारलं, "दोस्त, सिगरेट पियेगा?" यावेळेला मी थोड्या रुक्षपणे म्हटलं, "दोस्त, मैने बोला मैं सिगरेट नही पिता."
"तो मोठ्यानं हसला व म्हणाला, "कहाँके हो भाई?"
"बम्बई."
त्यानं पुन्हा विचारलं, "मराठी?"
मी होकारात्मक मान डोलावली. त्यानं माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं, व आपल्या भुंवया उंचावीत विचारलं, "बंबईका बाबू, और सिगरेट पीत नाही? कमाल आहे."
त्याच्यावरची नज़र न काढताच मी त्याला विचारलं,"तुमच्या शुद्ध भाषेवरून मी सांगू शकतो, तुम्ही मराठी ब्राह्मण आहात. बरोबर?"
तो पुन्हा हसला व म्हणाला, "सॉरी मित्रा, फसलास तू देखील? मी क्रिस्ती आहे. जॉन सलदान्हा माझं नाव. पण मी बरीच वर्षं पुण्याला काढलीयत, म्हणून सवयीनं थोडंफार मराठी बोलतो."
त्या दिवशी आमचं बोलणं तेवढ्यावरच थांबलं, पण त्यानंतर जॉन व मी रोजच भेटत राहिलो. संध्याकाळी तो कॅंटीनला यायचा व आम्ही चहाचे घुटके घेत गप्पा मारायचो. दिवसेंदिवस आमची मैत्री वाढतच गेली. लवकरच आम्हाला एकमेकांवाचून करमेनासं झालं.
अशाच एका संध्याकाळी आम्ही बसलेलो असताना जॉननं मला विचारलं, "सुनील, खरं सांग, तुला बरं वाटतं आर्मीत येऊन?" त्याच्या आवाजातील गंभीरतेनं मी चपापलो आणि हळूच त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत आसवं तरारून आली होतीं. यापूर्वी मी जॉनला केवळ हसताना पाहिलं होतं; त्याचं हे वेगळं रूप मला सहन होईना. मला घरची आठवण आली. माझे मित्र आठवले, माझं स्वच्छंद जीवन आठवून डोळे भरून आले.
मी म्हटलं, "जॉन, तुला म्हणून सांगतोय, मला खूप वाईट वाटतंय आर्मीत आल्याबद्दल. अगदी मनापासून पश्चाताप वाटतोय. वाटतं उगीचच भांडलो मी वडिलांशी."
"भांडलास?", त्याने मधेच विचारलं.
"हो जॉन, मी वडिलांशी भांडून आर्मीत भरती झालो. उडाणटप्पू बनून भटकायचो मी मुंबईला. त्या दिवशी बाबा मला बरेच काही बोलले. मीहि त्यांना उलट उत्तरं दिलीं, खूप भांडलो त्यांच्याशी, गेलो गेटवे ऑफ़ इंडियाच्या रिक्रूटींग ऑफिसला आणि भरती झालो. पण आता मला वाईट वाटतंय. जॉन, जेव्हा बॅंगलोरकरता ट्रेन सुटली तेव्हा बाबा फक्त एवढंच बोलले, ’माझं बोलणं तू एवढं मनावर घ्यायला नको होतंस. मोठी चूक केलीस तू.’. आता मला इथून पळून जावसं वाटतं. पण ---"
जॉननं पुन्हा जोराचं हास्य केलं व म्हटलं, "हाट, मला नाही वाटत परत जावसं. हं, दु:ख ज़रूर होतंय आर्मीत आल्याचं. वाटतं सगळं स्वातंत्र्य गमावून बसलोय. पण परत जावसं नाही वाटत. एकदा पाऊल उचललं ना, की मागे नाहीं घ्यायचं. बी.एस.सी. पास आहे मी. चांगली नोकरी सोडून इथं डावा-उजवा करीत पाय आपटायला यायचा मूर्खपणा केला नसता मी. पण मी कसा काय भरती झालो याचं माझं मलाच आश्चर्य वाटतंय. सकाळी नाश्ता करून मी ऑफिसला जायला निघालो होतो त्या दिवशी, पण अगदी नकळत रिक्रूटींग ऑफिसला गेलो. का व कसं ते माझं मलाच कळलं नाही. बहुतेक सकाळी न्यूज़पेपर वाचल्याचा परिणाम होता तो. चीनने आपल्या मातृभूमीवर आक्रमण केल्याचं जाहीर करून देशाच्या तरूणांना सैन्यात भरती व्हायचं आव्हान दिलं होतं प्रधान मंत्रींनी. सारं कसं अगदी स्वप्नात असल्यासारखं घडलं."
मी अभिमानानं जॉनकडे पाहिलं. त्याच्यासमोर मी कुणीतरी अगदीच क्षूद्र असल्याची जाणीव झाली मला. एकदां वाटलं की जॉनला खांद्यावर बसवून खूप नाचावं आनंदाने. त्या दिवसानंतर आम्ही जास्तच जवळ आलो. एतकं जवळ की ज्या दिवशी आम्हाला कळलं की ट्रेनींग संपून आम्हा दोघांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली झालीय, त्या दिवशी मी खूप रडलो. युद्ध ही कल्पना शोधून काढणार्‍या त्या व्यक्तीची मला विलक्षण चीड आली, तिटकारा वाटला. पण सत्य हे होतं की युद्धानं जॉनला व मला वेगळं केलं होतं, एकमेकांपासून दूर केलं होतं. माझी बदली मुंबईला झाली होती तर जॉनची उत्तर प्रदेशला. काही महिने मुंबईला घालवल्यावर पुन्हा माझी बदली झाली, होतच राहिली.
इतकी वर्षं भूतकाळात जमा झालीं, व इतक्या व्यक्तिरेखा माझ्या मनावर ठसा सोडून गेल्या की मी त्या दिवशी जॉनला अंबाल्याला पाहिलं नसतं तर कदाचित माझ्या स्मृतिपटलावरून पुसट होत चाललेली जॉनची आकृति साफ अदृश्य झाली असती. पण विधिलिखित काहीतरी वेगळंच होतं. माझी व जॉनची पुन्हा एकदा नव्याने भेट झाली होती. जुन्या आठवणी पुन्हा चाळवल्या गेल्या होत्या. नशीब माणसाच्या जीवनाशी असा लपंडाव का खेळतं हे मला कळेना. मल भूतकाळाच्या आठवणींतून डोकं बाहेर काढावसं वाटेनाच, पण ---
जॉनच्या त्या प्रश्नानं माझी तंद्री भंगली. त्यानं मला विचारलं, "सुनील, इतक्या वर्षांनंतर तुला अजून फक्त तीनच फिती मिळाल्यायत?"
मी खोटंखोटं हसलो व उत्तरलो, "हो मित्रा, अजून हवालदारच. आणि कदाचित हवालदार म्हणूनच रहावं लागेल आयुष्यभर. तुला मिळाली तशी मला नशिबाची साथ नाही मिळाली."
जॉनने हवेत हात उंच उडवले. "साला, कमाल आहे या नशिबाची. आपण दोघांनी बरोबरच ट्रेनींग केली, अन आता दहा वर्षांनी एकत्र आलो ते केवढे बदललेलो आहोत आपण. माझी उत्तर प्रदेशला बदली झाल्यानंतर मी ऑफिसर्स कमिशनसाठी अर्ज़ केला. आणि माझं नशीब चांगलं होतं म्हणून मला कमिशन मिळालं सुद्धा, फारसा त्रास न होता. एमरजंसी असल्यामुळे फटाफट प्रमोशन देखील मिळत गेलं, अन आज मी अगदी सुखात आहे. पण सुनील, तुझ्या बाबतीत असं का व्हावं? नशिबानं तुला असा दगा का द्यावा?"
मला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देता येईना. मी एवढंच म्हणालो, "पूर्वजन्मीच्या पुण्याईची फळं आहेत ही जॉन."
त्यानं प्रेमानं माझा हात आपल्या हातात घेतला व म्हटलं, "काळजी करूं नकोस मित्रा. तुझ्या प्रमोशनची जबाबदारी माझी. तू बेफिकीर रहा."
एवढं बोलून जॉन त्या संध्याकाळी निघून गेला. तो गेल्यावर माझं कामात लक्ष लागेना. सबंध वेळभर त्याचाच चेहरा समोर येत राहिला. त्यानं पुन्हा दुसर्‍या दिवशी यायचं वचन दिलं होतं. मी दुसर्‍या दिवशाची वाट पहात राहिलो. अखेर ती संध्याकाळ आली. मी आतुरतेनं जॉनची वाट पहात होतो, पण तो आला नाही. संध्याकाळ आली व निघून गेली. रात्र आली, निघून गेली, पण जॉन काही आला नाही. मी वाट पहातच राहिलो. नंतर बरेच दिवस माझं मन लागेना. मी रोजच जॉनची वाट पहायचो. मग एके दिवशी अनपेक्षितपणे एक पत्र आलं. मला वाटल्याप्रमाणे जॉनचं पत्र होतं ते. घाईघाईने मी पत्र उघडून वाचलं. मला भेटल्यानंतर अचानकपणे त्याची युद्धक्षेत्रात बदली झाली होती. जाण्याआधी मला भेटू न शकल्याबद्दल त्यानं दु:ख व्यक्त केलं होतं. मला विलक्षण भीति वाटली. वाटलं, जॉननं आर्मीत यायला नको होतं. आम्हीं दोघं भेटलोच नसतो तर किती बरं झालं असतं. जिवाला ही विलक्षण हुरहूर तरी लागली नसती. पण जॉनबद्दल मला एवढी काळजी का वाटावी हे कोडं मात्र मला उलगलं नाही.
त्या पत्रानंतर बरेच दिवस जॉनचं पत्र नव्हतं. त्याची काहीच बातमी नव्हती. वाट पाहून पाहून त्याच्याकडून पत्र यायची आशा मी सोडली, अन एका संध्याकाळी मी दुकानातून बॅरॅकवर परत आलो तर पलंगावर एक टेलिग्रामचा लिफाफा पडलेला दिसला. लिफाफा उघडून वाचण्याआधीच माझं हृदय धडधडू लागलं होतं, हात थरथर कापत होते. पण तार वाचणं भाग होतं. तार वाचल्यावर कळलं, मी उगीचच घाबरलो होतो. जॉनचीच तार होती आणि त्यानं कळवलं होतं की तो त्याच आठवड्यात अंबाल्याला परत येणार होता. माझ्या मनावरचा भार एकदम हलका झाला. मला खूप बरं वाटलं. ठरलेल्या दिवशी जॉन परत दुकानावर आला. त्याला पहाताच मी प्रेमानं मिठी मारली. गप्पात संध्याकाळ कशी सरली हे आम्हाला कळलंच नाही. रात्र पडत आल्यावर मी जॉनला म्हटलं, "जॉन, तुझी तार पाहून मी इतका घाबरलो होतो, इतका घाबरलो होतो की ..."
जॉननं हसत विचारलं, "का रे?"
मी चाचरत बोलायला सुरवात केली, "...कारण मला वाटलं... मला वाटलं ... की तू... तू..."
"की मी गचकलो," जॉन हसत म्हणाला. "अरे, तुझ्याकरता गुड न्यूज़ आणली आहे. ही वाच." असं म्हणून त्यानं माझ्या हातात एक सरकारी लिफाफा ठेवला. मी आश्चर्यानं त्याच्याकडे पहात असताना त्याने मला लिफाफा उघडून वाचण्याची खूण केली. "साहेब, मी माझं प्रोमिस पूर्ण केलंय. तुझी हेडक्वार्टर्सला बदली करून घेतलीय मी. तिथून तुझ्या ऑफिसरच्या पदासाठी निवड करणं सोपं जाईल मला. आता आपलं सामान बांधायला लाग, बेटा."
माझ्या चेहर्‍याकडे पाहून जॉन काय समजायचं ते समजला. त्यानं एकदम मला उचलून घेतलं व जोरात हसायला सुरवात केली. आणि मी इच्छा असूनही त्याला प्रतिकार करूं शकलो नाहीं.

लक्ष्मीनारायण हटंगडी

No comments:

Post a Comment