( एक बस-स्टॉप. संध्याकाळची आळसावेली वेळ. स्टॉपवर एक कॉलेज तरूण जांभया देत उभा आहे. हातात एकदोन रंगीत मासिकं. कानांवर Walkman. काही वेळाने स्वत:शीच शिव्या हांसडून मासिकं वाचायला लागतो. पुन्हा जांभया.. पुन्हा मासिकं. तेवढ्यात एक मध्यमवयीन बाई, शिक्षिका, प्रवेश करते. हातात वह्यांचा गठ्ठा. येऊन त्या तरुणाकडे उभी रहाते. त्याच्या जांभया अजून सुरूच. हळूच वाकून त्याच्याकडे बघते. तो तोंड फिरवून जांभया देतो. कसलंतरी बोलणं सुरू करायचा तिचा निष्फळ प्रयत्न चालूच आहे. )
बाई : Excuse me, इथं चार, दोन, शून्य नंबरची बस मिळेल का? (तरूण जांभई देतो.) Excuse me, पण मी तुम्हाला विचारलं इथं चार, दोन, शून्य नंबरची बस मिळेल का?
( पुन्हा जांभई. त्याच्या पाठीवर जोराने थाप मारीत) मी तुला विचारलं, इथं चारशे वीस नंबरची बस मिळेल का? (हातातील मासिक बाजूला सारून तिच्याकडे बघून मोठ्याने जांभई देतो.)
बाई : कुठल्या शाळेत होतात तुम्ही ... तू?
तरूण : (कानावरचा वॉकमन दूर सारून) मला काही विचारलं तुम्ही?
बाई : हो, तुझ्याकडेच बोलत होते मी.
तरूण : ("काय कटकट आहे!" या आविर्भावात) काय आहे?
बाई : कुठल्या शाळेत होतास रे तू?
तरूण : तुमच्या शाळेत नक्कीच नव्हतो.
बाई : ते दिसतंच आहे. माझ्या चाळीस मुलांपैकी एकही इतका बेशिस्त नाही.
तरूण : काय झालं?
बाई : मघापासून मी हज्जारदा विचारलं असेल.
तरूण : काय?
बाई : चारशे वीस नंबरची बस इथं मिळते का?
तरूण : दोनदाच विचारलं होतं तुम्ही.
बाई : पण तुम्ही... तू ऐकूनही उत्तर दिलं नाहीस. म्हणून म्हटलं मी, माझ्या चाळीस मुलांपैकी एकही इतका बेशिस्त नाही.
तरूण : अहो बाई, हा सार्वजनिक बस स्टॉप आहे. ह्या पाटीवर इथं थांबणार्या सगळ्या बसचे नंबर्स लिहिलेले आहेत. तुमच्या हातांत हा वह्यांचा गठ्ठा आहे, म्हणजे तुम्हीं एक शिक्षिका आहात. म्हणजे नक्कीच तुम्हांला वाचता येत असेल. मग उगीच मला बोलण्याचा आणि तुम्हाला ऐकण्याचा त्रास नको म्हणूनच सांगितलं नाही.
बाई : पण काही सभ्यता म्हणून आहे की नाही? लोकांनी माहिती विचारली की ती सांगणं ही साधी नागरीकत्वाची गोष्ट आहे. निदान एका आदर्श नागरीकाचं ते पहिलं कर्तव्य आहे.
तरूण : (तिला मध्येच थांबवून) हे बघा, शाळा संपल्यावर तुम्ही या बस-स्टॉपवर आलात, म्हणजे तुमची शाळा जवळच असेल. म्हणजे तुम्ही रोजच या स्टॉपवर येत असाल. म्हणजे तुम्हाला नक्कीच माहीत असेल की मुंबईच्या बसेस रेग्युलरली इर्रेग्युलर येत असतात. म्हणजे ... (बाई जांभई देते.) कंटाळलात ना? माझंही अगदी तसंच झालं होतं. (हात पुढे करून) द्या टाळी. (पटकन हात मागे घेत) सॉरी, तुमच्या हातात हे ओझं आहे. लक्षातंच गेलं नाही माझ्या. परत सॉरी.
बाई : तसे तुम्ही अगदीच असभ्य वाटत नाही. मघाशी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तेव्हा मला वाटलंच की तुमचा स्वभाव थोड रुक्ष असेल. पण तुमची विनोदबुद्धी तशी वाईट नाही.
तरूण : माझ्या विनोदबुद्धीचा आणि बसचा काय संबध?
बाई : दूरचा आहे, पण आहे. मी आल्यापासून पहातेय, तुमचा जांभया देण्याचा कार्यक्रम चालूच आहे. म्हणजे तुम्हाला जांभया देण्याचा मुळीच कंटाळा आलेला नाही. म्हणजे तुम्ही कुणाची तरी वाट बघत आहात. आणि बस बराच वेळ आलेली नाही.
तरूण : किंवा एवढ्यात येणार सुद्धा नाही.
बाई : म्हणून तर. दिवसभर वह्या तपासून व बोलून बोलून मी अगदी थकून गेले होते.
तरूण : वाटत नाही मात्र तसं. अजूनही दांडग्या उत्साहाने बोलताहात तुम्ही.
बाई : शिक्षिका होण्याचा हा मोठा फायदा आहे. एकदा सवय झाली की सारखं बोलायला काही वाटत नाही. ऐकणारी माणसं थकतील एक वेळ. हो, सुरवातीला जरा कठीण जातं, पण... सवयीने थकायला होत नाही. आजमात्र मी विलक्षण थकून गेले होते. सारखी काळजी वाटत होती की बससाठी उभं असताना वेळ कसा जाईल. तुम्हाला, सॉरी, तुला पाहिलं अन वाटलं, बोलायला कुणीतरी मिळालं. म्हणून बोलायचा प्रयत्न करीत होते. मघापासून मला सुद्धा भयंकर वाटतंय की भलीमोठी जांभई द्यावी. पण ह्या वह्या...
तरूण : त्या वह्या द्या माझ्याजवळ. मी धरतो थोडा वेळ. तुम्ही खुशाल हव्या तेवढ्या जांभया द्या.
( बराच वेळ कसरत केल्यावर तरूण बाईंच्या हातातील वह्या आपल्या हातात घेतो व कश्याबश्या धरून ठेवायचा प्रयत्न करतो. बाई जांभया द्यायचा प्रयत्न करतात, पण काही केल्या जांभई येत नाही. तरूण हसायला लागतो. बाई रागाने त्याच्याकडे बघतात. )
तरूण : सॉरी, तुम्हाला नव्हतो हसत. पण कधीकधी ह्या जांभया देखील बससारख्या असतात. हव्या तेव्हा येत नाहीत. द्या टाळी.
( हातांतल्या वह्या संभाळून टाळी द्यायचा प्रयत्न करतो, पण जमत नाही. एवढ्यात आतून एक तरुणी ओठांना लिपस्टिक लावीत प्रवेश करते. तरूण तिला हात दाखवून बोलवायचा प्रयत्न करतो, पण जमत नाही. या प्रयत्नात त्याच्या हातातील काही वह्या खाली पडतात. खाली वाकायचा केविलवाणा प्रयत्न करतो आणि बाईकडॆ बघतो. बाई काहीशी रागावून खाली वाकते आणि वह्या गोळा करायला लागते. )
बाई : तुझ्या हातातून खाली पडल्या, म्हणजे निदान खाली वाकून गोळा करायला तुला काही हरकत नव्हती.
तरूण : काहीच हरकत नव्हती, पण त्याचं असं आहे ... की ... की... (घुटमळतो.)
तरुणी : त्याचं असं आहे की टाइट जीन्स घालून खाली वाकणं म्हणजे कॉलेजमध्ये लेक्चर्स अटेण्ड करण्यासारखंच कठीण आहे. म्हणून तर मीसुद्धा वाकले नाही. नाहीतर माझी आई टीचरच आहे, आणि रोज वह्या घरी घेऊन येत असते. (बोलताबोलता बाईला ओलांडून तरुणाकडे येते.)
बाई : (तरुणीला ओलांडून पुढे आपल्या जागी येत) हरकत नाही. घरी संवय आहे मला ह्याची. म्हणूनच मी शाळेत एकाही मुलाला टाइट कपडे घालायची परवानगी देत नसते.
तरुणी : (बाईंना ओलांडून तरुणाकडे येत) बाई, प्लीज़, आम्ही एकाच कॉलेजात आहोत.
बाई : बरं आहे.
तरुणी : एकाच वर्गात आहोत.
बाई : छान आहे.
तरुणी : एकाच बेंचवर बसतो.
बाई : उत्तम आहे. मग मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे.
तरुणी : मघापासून मी तेंच सांगायचा प्रयत्न करतेय़.
बाई : काय?
तरुणी : आम्हाला एकत्र राहूं द्या. नाहीतरी स्टॉपवर गर्दी नाहीच आहे.
बाई : मग बसा ना बसमध्ये गेल्यावर एका सीटवर. गर्दी नाही ना? पण आतां गर्दी सुरु होईल. शाळा, ऑफिसं, सिनेमे सुटून लोक येतच असतील. तेव्हा बसेस सुद्धा भरून येतील.
तरूण : वाट बघा. म्हणे बसेस येतील! भरून काय किंवा रिकाम्या काय!
बाई : मी तरी वेगळं काय म्हणतेय? पण समजा मी तुम्हाला माझ्या पुढे जाऊं दिलं आणि बस आली आणि ती भरलेली असली ... समजा हं ...तर मग मला जागा कशी मिळणार? आणि जागा नाही मिळाली तर मी घरी उशीरा पोचेन. आणि मी घरी उशीरा पोचले, तर माझी ट्यूशनची मुलं माझी वाट पाहतील. ट्यूशन संपवून नंतर मला लग्नाला जायचं आहे. जर मी तुम्हाला पुढे जाऊं दिलं तर हे सगळं मला कसं शक्य होईल? बोला, बोला.
तरूणी : काय बोलणार, कप्पाळ? तुम्हाला स्वत:चा आवाज़ इतका आवडतो की तुम्ही दुसर्या कुणाला बोलायलाच देत नाहीत.
तरूण : पण काय हो बाई, तुम्हीं खरोखरच लग्नाला जात आहात? काय योगायोग आहे बघा, मीसुद्धा लग्नाला जातोय.
तरुणी : मी सुद्धा.
बाई : बरं झालं बाई, आपल्याला एकमेकांची सोबत होईल. मंडपात भेटूच आपण.
( एक माणूस येऊन रांगेत उभा रहातो. )
तरूण : काय हो, बहुतेक तुम्हाला देखील लग्नालाच जायचं असेल? (माणूस मान डोलावतो.) वा! आज लग्नाची वरातच निघालेली दिसतेय. कुणाच्या लग्नाला?
( माणूस खिशांतून एक पत्रिका काढून दाखवतो. )
तरुणी : (पत्रिका पहात) अय्या, हे आपल्याच लग्नाला चाललेयत.
बाई : (आश्चर्याने) अय्या, तुमचं लग्न, आणि तुम्ही अजून इथंच? बसच्या रांगेत? व्हा हो तुम्ही पुढे.
तरुणी : (लाजून) आमचं म्हणजे अगदी आमचंच नव्हें. आमच्या लग्नाला अजून घरच्यांनी परवानगी दिलेली नाही. पण आम्ही ज्या लग्नाला जातोय ना, त्याच लग्नाला हे सुद्धा चाललेयत.
( तो माणूस जोराजोराने मान डोलावून होकार दर्शवितो. )
बाई : कायहो, तुम्हाला कुणी "हाताची घडी, तोंडावर बोट" करून गप्प रहायला सांगितलं आहे का? (स्वत:च्या विनोदावर खूष होऊन स्वत:च हसते. माणूस खुणा करुन सांगतो, "मला बोलता येत नाही," )
तरुणी : तरी मला वाटलंच.
बाई : काय?
तरुणी : हेंच की ह्या गृहस्थांना बोलता येत नाही.
बाई : अय्या, बोलता येत नाही? म्हणजे कठीण आहे नाही?
तरूण : बरं आहे. तेवढंच तुम्हाला त्याच्या वाटचं बोलता येईल.
बाई : (हंसत) उगीच काहीतरी वेड्यासारखं बोलू नका.
( याचवेळी आतून एक वेडा जोरजोराने हसत प्रवेश करतो. )
वेडा : खरं आहे... खरं आहे. पण मी वेडा नाही, मी प्रधान मंत्री आहे. मला बोलायला खूपखूप आवडतं, पण मी बोललेलं ऐकतं कोण? कुणीच नाही. माझी बायको सुद्धा ऐकत नाही. सगळे मंत्री बोलतात... सगळ्यांना बोलायला आवडतं, पण कुणी कुणाचं ऐकत नाही. कुणीच ऐकत नाही.
तरुणी : (मागे सरकून) मला बाई, भितीच वाटते.
तरूण : मी असताना कुणाची भीति वाटते?
तरुणी : कधीकधी तुझीच भीति वाटते, पण आतां या क्षणाला या वेड्याची भीति वाटते.
वेडा : (जोरजोरानं हसत) वेडीच आहेस. मंत्र्याला घाबरते. मंत्र्याला घाबरायचं नसतं. त्याच्याशी मैत्री करायची असते. खूप फायदे होतात.
बाई : मेली, ही बस सुद्धा येत नाही. वेळापत्रकाप्रमाणे यायला हवी.
वेडा : यायला हवी, पण येणार नाही. टाईमटेबल प्रमाणे कधीच येणार नाही. सगळे बेकार आहेत. (मोटारीचा आवाज़ काढीत) हे पण useless. (ट्रेनचा आवाज़ काढीत) हे पण य़ूज़लेस. ट्रेनचा उपयोग फक्त जीव देण्यासाठी. पण गाड्या कधीच वेळेवर येत नाहीत. मग जीव कसा देणार? बस सुद्धा वेळेवर येत नाही. सगळ्या बसनां ट्रेनखाली द्यावं आणि सगळ्या ट्रेन्सनां बसखाली द्यावं.
बाई : प्लीज़, याला कुणीतरी आवरा. नाहीतर मी वेडी होईन.
वेडा : (बाईंकडे बघून) तुम्ही टीचर आहात ना? मला माहीत आहे. मी देखील कॉलेजात टीचर होतो, पुण्याला. पण मी नव्हतों कधी विद्यार्थ्यांवर ओरडत. तुम्हीपण नका ओरडूं. मारली तर मुलं कोडगी होतात. मुलांना प्रेमाने वागवायला हवं.
तरूण : (कुत्सितपणे) बोलतो जणू डबल ग्रॅज्युएट असल्यासारखा.
वेडा : मी ग्रॅज्युएट आहे. मी सुद्धा कॉलेजात जायचो. पण नुसतं प्रेम करायला किंवा पोरींवर लाईन मारायला नव्हे, आजकालच्या ह्या मुलांसारखं. मस्ती करायचो आम्ही, पण लेक्चर्स चालूं असताना कधीच नाही. त्या वेळी आमचे प्रोफेसर काय होते! व्वा! बोलायला लागले की आम्ही पोरं चुप्प! अगदी साधे कपडे. साधं, सफ़ेद धोतर, डोक्यावर सफ़ेद टोपी. वर्गात आले की टोपी काढून टेबलावर ठेवायचे आणि म्हणायचे, "हे बघा, सरकार मला बोलण्याचा पगार देतं आणि मी बोलणार. तुम्ही ऐका किंवा नका ऐकू." पीरीयडची घंटा होईपर्यंत बोलायचे. सगळं बोलणं थेट मेंदूत जाऊन घुसायचं! बस!
तरुणी : अय्या, खरंच बसचं काय झालं?
वेडा : मी सांगितलं, बस येणार नाही. जायची घाई असेल तर टॅक्सीने जा. नाहीतर चालत जा. बसची वाट पाहू नका. सरकारचे खजीने भरू नका. (तरूणाला) सिगरेट पिता?
तरूण : (हात पुढे करीत) हो.
वेडा : मग मला पण द्या.
तरूण : माझ्याकडे नाही. मला वाटलं तुम्ही द्याल.
वेडा : (हंसत) म्हणजे लोकांकडून मागून पिता? माझ्यासारखी? मग तुमच्या-माझ्यात फरक काय? सिगरेट मिळाली पाहिजे. जिवाला बरं वाटतं. पण सिगरेट पिणं जिवाला बरं नसतं.
( बडबडत हात हलवीत निघून जातो. )
माणूस : (तरुणाला खुणेनं विचारतो) किती वाजले?
तरूण : (बाईला विचारतो) किती वाजले हो?
बाई : माझ्या हातात वह्या आहेत. दिसत नाही? तुम्हीच बघा
तरूण : तुमच्या हातात वह्या आहेत ते दिसतं मला, पण माझ्या हातात घड्याळ नाही हे तुम्हाला ...
बाई : ते मला दिसतंय. माझ्या घड्याळात बघा म्हटलं मी.
तरूण : (बाईंच घड्याळ बघत) साडे पाच वाजताहेत.
तरुणी : आणि अजून बसचा पत्ता नाही, नक्कीच लग्नाचा मुहूर्त टळणार.
तरूण : जाऊं दे ना, लग्न आपलं थोडच आहे?
तरुणी : तुला कळत नाही. लग्नाला आलेल्या बायकांच्या साड्यांच्या डिज़ाईन्स बघायला आवडतं मला,
तरूण : मग आपल्या लग्नाच्या वेळी बघ ना... हव्या तेवढ्या डिज़ाइन्स बघ.
तरुणी : त्यावेळचं त्या वेळी. पण आतां कंटाळा येतोय ना?
तरूण : (रोमॅण्टिक मूडमध्ये) मग, जवळी ये, लाजू नको. अग, ये जवळी ये, लाजू नको.
बाई : (रुक्ष स्वरात) मी बरी येऊ देईन? एवढा कंटाळा येत असेल तर जाऊन एसीवाल्या मल्टीप्लेक्स मधे बसायचं. इथं पब्लीक प्लेसमध्ये रोमांस कसला करायचा तो?
तरुणी : तुझ्या हातातला एक फ़िल्मी अंक दे ना. (तरूण हातातलं एक मासिक तिला देतो.) लंडन ड्रीम्स पाहिलास?
तरूण : First day, first show. ब्लॅकमधे. तू पाहिलास?
तरुणी : हो, कसा वाटला?
तरूण : गाणी काही खास नाहीत. स्टोरी विशेष नाही. ऍक्टींग, चालू. Dialogues भंगार. Locations बरी आहेत. असीन चिकणी दिसते. पण सल्लूमिया तिचा बाप वाटतो.
तरुणी : त्यापेक्षा शाहीदला घ्यायला पाहिजे होता... किंवा रणबीरला ... किंवा इमरानला... किंवा
तरूण : हुं, त्यापेक्षा आपण काय वाईट आहोत?
बाई : तुम्ही ’संतोषी माता की महीमा’ पाहिलात?
तरुणी : श्शी, असले सिनेमे कोण मूर्ख पहातं?
बाई : मी पहाते. काय म्हणायचंय?
तरूण : तो ... काय बरं नांव आहे त्या सिनेमाचं... हिरो-हिरॉईननं पोस्टरवर मस्त झांसू रोमॅण्टिक पोज़ दिलीय बघ...
तरुणी : मला सुद्धा नांव आठवत नाही. पण मी कशी बघणार? तो Adults Only आहे.
तरूण : डार्लींग, तू सुध्दा adult आहेस.
तरुणी : चल, बघूया.
बाई : तुम्ही लग्नाआधी हा सिनेमा बघणार?
तरूण : हॅं, आमच्या लग्नापर्यंत कसला राहतो तो?
बाई : म्हणजे, आतां लग्नाला निघाला होता ना तुम्ही? म्हणून विचारलं.
तरुणी : उद्या मॅटीनीला जाऊंया. पण कुठं भेटायचं?
तरूण : आणि कुठं? कॅण्टीन.
तरुणी : श्शी, भंयकर गर्दी असते तिथं.
तरुणी : मग तू मला बाहेरून हाक मार.
तरुणी : पण तुझं नाव सांग ना. नाहीतर मी हाक कशी मारणार?
तरूण : माझं नाव वेंकटेश कुमार. पण तू मला फक्त कुमार म्हणून बोलवलंस तरी चालेल. आणि तुझं नाव नाही सांगितलंस?
तरुणी : मला बिपाशा म्हणून बोलव. किंवा करीना... किंवा कॅट्रीना. मला काही चालेल.
तरूण : बिपाशाच ठीक आहे. Hi Bips, glad to meet you.
बाई : तुम्ही दोघे एकाच वर्गात आहात असं म्हणत होता ना तुम्ही? मग एकमेकांचं नांव सुद्धा कशी माहीत नाहीत?
तरूण : बाई, दीडशे जणांच्या क्लासमध्ये सगळ्या मुलींची नावं कुणी लक्षांत तरी कसं ठेवणार?
बाई : (तरुणीला) बाई, तुम्ही इथं उभ्या राहू शकतां, नाहीतर उद्यापर्यंत हे तुमचं नाव देखील विसरतील.
( तरुणी आणि बाई आपापल्या जागा बदलतात. आंतून एक गुजराथी शेठ येतो. )
शेठ : (मुक्या माणसाला) अरे ओ, मोटाभाई, आ बस कयां जाअशे?
( उत्तर नाही. मुका माणूस खांदे उडवतो. )
शेठ :(पुन्हा) अरे मोटाभाई, अमे तारे संग बात करूं छूं. आमी विचारते आ बस कुठे जाते?
तरूण : ओ मोटाभाई, शूं थयूं?
शेठ : मी ये मोटाभाईला विचारते की हे बस कुठे जाते, तर हे जवाब नाही देते.
तरूण : सेठ, मी तुमाला जवाब देते. तमाला कुठे जवाचे हाय?
शेठ : तू तो बहु सारू छोकरा छे. मला शादीमंदी जवानू छे.
तरूण : सेठजी, तमे तो करेक्ट लाइनमंदी आव्या छे. तुमचा शादी माहीममंदी छे ना?
शेठ : (खुश होऊन) अरे, तमे केम खबर?
तरूण : सेठजी, आज सब माणूस माहीममंदीच शादीला जाते. मी पण शादीला जाते, ए माझी गर्ल फ़्रेण्ड पण लगीनला जाते. आ मोटी बेन पण शादीलाच जाते. इधर आज पूरा वरात खडा छे.
शेठ : बहुत टाइमपासून बस नाय आला काय?
तरुणी : अर्धा तासका वर हो गया, पण बसका अभीतक पत्ताच नही हमकू तो बहुत कंटाळा आला.
शेठ : केम डिकरी, तमाला वाटते की आज बारिस येल?
तरूण : सेठ्जी, वैसा पावसाळेका दिवस नही है, तो मेरेकू वाटता है की बारीस नाई येईल, पण मुंबईका बारीसका कुछ खात्री नही. वैसा ए बसका पण खात्री नहीं. आयेगा तो वेळपे आयेगा, नही तो रखडायेगा. पण खरं सांगनेका तो पाऊस आयेगा तो बॉडी थोडा ठण्डा होएगा. ठण्डा ठण्डा कूल कूल.
तरुणी : ए मिस्टर कुमार, तू बोलत असलेली हिंदी आपली राष्ट्रभाषा करायला हरकत नाही. कुठून शिकलास ही बंबयिया हिंदी?
तरूण : बम्बईमेच. आणि बिप्स, थोडी भंकस केली याची. तशी माझी हिंदी चांगली आहे.
( ह्याचवेळी आतून एक तरूण माणूस घाईघाईने प्रवेश करतो. अंगावर मस्तपैकी नवीन सूट आहे. )
तरूण 2 : (मुक्या माणसाकडे बघून) Excuse me please, how long are you waiting for the bus?
तरूण : You excuse him please. त्याला बोलता येत नाही.
तरूण २ : (नखर्यात बोलतो) ओह, त्याला इंग्लिश येत नाही?
तरूण : (जास्त नखर्याने) त्याला इंग्लिश येत नाही; मराठी येत नाही; राष्ट्रभाषा हिन्दी येत नाही. त्याला बोलताच येत नाही. बहुतेक तुम्ही देखील लग्नालाच चाललाय?
तरूण २ : (आश्चर्याने) तुम्हाला कसं कळलं?
तरूण : आतां कसं सरळ मराठी बोलायला लागलात? गम्मत म्हणजे आज ह्या स्टॉपवरची सगळी मंडळी लग्नालाच चालली आहेत. तुमचं लग्न देखील माहीमलाच आहे ना?
तरूण २ : कमाल झाली,
तरूण : कमाल काय त्याच्यात? आज ह्या स्टॉपवर लग्नाची वरातच भरली आहे. आम्ही सगळे जण माहीमलाच लग्नाला निघालोय.
तरूणी : पण ह्या गरमीत तुम्ही अगदी सूट वगैरे घालून, म्हणजे कमाल आहे.
तरूण २ : नाईलाज आहे. बघूं, कुठल्या हॉलवर आहे तुमचं लग्न? (तरूण कार्ड दाखवतो.) ही तर खरोखरच कमाल झाली.
तरूण : आता काय झालं?
तरूण २ : अहो, माझं लग्नसुद्धा ह्याच हॉलवर आहे.
बाई : (थट्टेच्या सुरात) अय्या, तुमचं लग्न आणि तुम्हीं अजून इथेच?
तरूण : अहो बाई, काय मस्करी करताय? ह्यांच लग्न असतं तर ते अजून इथे कसे असते? उगाच काहीतरी बोलता!
तरूण २ : बस आली तर प्लीज़ मला आधी जाऊं द्याल? मला खूप घाई आहे.
तरूण : घाई आम्हालाही आहे. पण काय करणार?
तरुणी : मुहुर्ताआधी पोचलंच पाहिजे आम्हाला.
तरूण २ : मलाही मुहुर्ताआधी पोचलं पाहिजे. सगळेजण हॉलवर माझी वाट पहात असतील.
तरूण : वाट आमची देखील पाहत असतील. आणि तुम्हाला तेवढीच घाई असेल पर रजा काढायची होती आजचा दिवस.
तरूण २ : रजा असायला हवी ना शिल्लक? सगळी रजा केव्हाच संपली. आज रजा विचारली असती तर साहेबानं घरीच बसायला सांगितलं असतं. म्हणून ठरवलं की घरून निघतानाच सूट घालून निघावं. ऑफिस सुटलं की बस घेऊन थेट मंडपात पोचायचं. पण ऑफिसाला गेल्यावर अजून एक भानगड झाली.
तरूण : काय झालं?
तरूण २ : बॉसने मला सूटमधे पाहिलं आणि वैतागला. मला कॅबीन मधे बोलावून घेऊन म्हणतो, "कारकुनाने कारकुनासारखंच रहावं. साहेबासारखं सुटाबुटामधे येऊं नये. आजच्यापुरतं ठीक आहे. पण ह्यापुढे कधीहि सूट घालून ऑफिसला आलात तर मला चालायचं नाही."
तरूण : मग तोंड न उघडता तुम्ही सगळं काम संपवलं आणि बाहेर पडलात, तर बस-स्टॉपवर ही गर्दी. खरं ना? (हसतो.)
( मुका माणूस आतल्या बाजूला पाहून कसलेसे हातवारे करतो. )
शेठ : आता य्हेला काय झाला?
तरूण : तो सांगतोय की बस येतेय.
( सगळेजण पुढे सरसावतात. )
तरूण २ : (विनवणीच्या सुरात अगदी हात जोडून) प्लीज़, मला पुढे जाऊं द्या.
सगळेजण : पण का?
तरूण २ : आत्तां कसं सांगू? तुम्ही ह्या लग्नाला गेला नाहीं तरी चालेल, पण मला कसंही करून हे लग्न अटेण्ड करायलाच हवं.
सगळेजण : (ओरडून) पण का?
तरूण २ : कारण मी ह्या लग्नातला नवरदेव आहे.
सगळेजण : (ओरडून) काय़ सांगताय?
तरूण २ : अगदी खरं सांगतोय. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे मला आजही रजा नाही मिळाली. माझ्या होणार्या बायकोला लग्नाआधीच रोमान्स करायचा होता. त्यामुळे सगळी रजा लग्नाआधीच संपली. आणि आज खरी रजेची गरज होती तेव्हा साहेब नखरे करायला लागला. स्वत: बाल-ब्रम्हचारी आहे ना? म्हणून शेवटी ठरवलं की थेट ऑफिसातून मंडपात जायचं. गाडीची व्यवस्था केली होती तर ऐन वेळी ड्रायव्हरने दगा दिला. त्यालापण आजच पळून जाऊन लग्न करायचं होतं. ऐनवेळी टॅक्सी मिळेना म्हणून बससाठी आलो. तर इथं ही तोबा गर्दी. एक बरं होतं की लग्नाचा मुहूर्त संध्याकाळचा होता.
( सगळेजण एकत्र बोलू लागतात. कुणाचं कुणाला काही ऐकू येत नाही. शेवटी ... )
बाई : नवरदेव, तुम्ही पुढं जायला आमची हरकत नाही.
तरूण : माझी देखील नाही.
तरुणी : (लाजत) कुमारची नाही तर माझीसुद्धा नाही.
शेठ : मला पन चालेल.
( मुका माणूस डोके हलवून सम्मति देतो. )
तरूण २ : Thank you so much, मित्रांनो. आणि हो, तुम्ही माझ्या लग्नाला येणारच आहात, तेव्हां जेवूनच जायचं. कबूल?
सगळेजण : (ओरडून) कबूल... कबूल ... एकदम कबूल.
तरूण : तुम्ही असं करा. तिथून चालती बसच पकडा. नाहीतर तुमचं लग्न पार पडेल आणि तुम्ही इथंच असाल बस-स्टॉपवर.
बाई : म्हणतात ना, "वरातीमागून घोडं!"
लेखक
लक्ष्मीनारायण हटंगडी
EC51/B104, Sai Suman CHS,
Evershine City, Vasai (E)
PIN 401208
(e-mail: suneelhattangadi@gmail.com)
Friday, April 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
मस्त! एकदम झकास!
ReplyDelete