Thursday, March 4, 2010

युद्ध !

अविनाशने घेतलेला निर्णय ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. काही जणांनी आ वासले, काहींनी चक्क तोंडात बोटं घातलीं, तर काहींनी भुवया उंचावल्या -- क्रिया वेगवेगळ्या, पण प्रतिक्रिया एकच, आश्चर्याची! अन कुणालाहि आश्चर्य वाटणं अगदी साहजिकच होतं. अविनाशने घेतलेला तो निर्णयच तसा चमत्कारिक होता. अविनाशने युद्धावर जायचं ठरवलं होतं.
अविनाशने आपला बेत जाहीर केला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला वेड्यात काढलं; त्याच्या आईनं काळजीनं कपाळावर हात मारला; त्याची धाकटी बहीण त्याला चिडवायला लागली, व मित्रांनी चेष्टा करायला सुरवात केली. अवि युद्धावर जातो म्हणजे काय चेष्टा आहे?
बर्‍याच वर्षांमागे चीनने केलेल्या हल्ल्याने भारतावर अचानक कोसळलेल्या संकटाची आठवण इतक्या वर्षांनंतर अजूनही सर्वांच्या मनात ताजी होती. त्यावेळीं लाल चीनी फौजा अखंड भारताचं स्वातंत्र्य, भारताची सरहद्द लुटू पहात होत्या. भारताची अब्रू धोक्यात होती, अन हा धोका टाळण्यासाठी सर्वच बाजूंनी प्रयत्न केले जात होते. चीनी आक्रमणाला तोंड देण्यासाठी त्यावेळी सुद्धा भारतीय फौजेत सैनिकांची भरती चालू होती, चोहीकडे फ़ंड गोळा केले जात होते. आणि सध्या वर्तमानपत्रांमधून छापल्या जाणार्‍या बातम्यांनी परत एकदा भारतीय जनतेला सक्त ताकीद दिली होती की चीनकडून असलेला धोका अजूनही मूर्त स्वरूप घेऊ शकत होता. पण हे सगळं कितीहि खरं असलं तरी अविनाशने ... अविनाशने, युद्धावर जाण्याचा धाडसी (मूर्ख!) निर्णय घेणं म्हणजे जरा, जरा नव्हें, फारच विचित्र वाटलं सर्वांना.
तसा अविनाश एकदम फाटक्या प्रकृतीचा होता अशातली गोष्ट नव्हती. चांगला बावीस वर्षांचा गब्रू तरूण होता अविनाश. पांच फूट, सहा इंच उंची व सत्तर-ऐंशी किलोचं वजन. एकूण काय चेष्टा नव्हती राव! कुणाच्याहि डोळ्यात पटकन भरावी अशी शरीरयष्टी होती त्याची.
मॅट्रीक पास होऊन अविनाशने कॉलेजात ऍडमिशन घेतली तेव्हा बर्‍याच जणानी त्याला एन. सी. सी. जॉईन करण्याचा सल्ला दिला. बहुतेक गोष्टी दुसर्‍यांच्या मर्जीनुसार करणार्‍या अवीनं तो सल्ला मान्य करून लगेच एन. सी. सी.त नाव नोंदवलं. कॉलेजच्या मोकळ्या वातावरणानं दिपून गेलेल्या अवीला एन. सी. सी.चं आकर्षण पहिल्या प्रथम भारी कौतुकास्पद वाटलं, पण नंतर-नंतर त्याला त्या वातावरणाचा कंटाळा येऊ लागला. इतर मित्रांनी कॉलेजसमोरच्या मोठ्या झाडाखाली किंवा कॉलेज-कॅण्टीनमधे बसून टवाळक्या करीत येणार्‍याजाणार्‍या मुलींची टेहेळणी करीत असताना आपण मात्र निस्तेज खाकी गणवेषात "डावा-उजवा" करीत रहावं याचा त्याला लवकरच वीट यायला लागला. बघता-बघता त्यानं परेडींना दांड्या मारायला सुरवात केली. एवढंच नव्हे, आपल्या इतर मित्रांबरोबर त्यानं पोरींना पाहून चक्क शीळ घालायला देखील सुरवात केली.
अशाच एक प्रसंगी अविनाशची शीलाशी ओळख झाली. कॉलेज सुटलं होतं. अविनाश तास बुडवून आपल्या मित्रांबरोबर आधीच खाली उभा होता. त्यांची टेहेळणी चालूच होती. काही वेळाने बिल्डींगमधून मुलींचा एक तांडा बाहेर पडला.
"ए अवि, ती बघ शीला चाललीय," एका रोमिओनं अविनाशला हटकलं.
शीला देसाई कॉलेजची ’क्वीन’ समजली जात होती. तिची पाठ वळल्यावर तिच्याबद्दल वाटेल ते बोलायची संवय सगळ्या पोरांना असली तरी तिला तोंड द्यायला सगळेच टरकत होते.
"ए अव्या, ती बघ ना, ’शिळा’ चाललीय," रोमिओने त्याला पुन्हा हटकलं.
अवीने बेफिकिरीने खांदे उडवले व म्हटलं, " हॅं, तिला काय वेगळं पहायचं? रोजच भेटतो आम्ही कॉलेजच्या बाहेर."
"फॅण्टॅस्टिक यार! बहोत खूब!! चिडियाके पर उगने लगे हैं. हल्लीच तर अंड्यातून बाहेर पडून हे पोरींचे धंदे शिकलायस, अन म्हणे रोजच भेटतो! अहो मिस्टर, तिची फक्त स्वप्नंच पहा. ती कुणालाच लाईन देत नाही. समझ्या क्या?", अवीच्या एका मित्राने चावी फिरवली.
हे ऐकून अविनाशचा स्वाभिमान डिवचला गेला. विचार न करता आपल्या दोस्तांवर इम्प्रेशन मारायला बोललेले शब्द मागे घेणे तर शक्य नव्हतं त्याला. नुकत्याच फुटलेल्या मिशातल्या मिशात त्याने एक मंद हास्य केलं व तो म्हणाला, "बघायचंय काय, लेको?"
"हो जाये चायलेंज," सर्व पोरं इतक्या मोठ्याने ओरडलीं की पूढून जाणार्‍या मुलींनी पटकन मागे वळून पाहिलं. ही संधि साधून सर्वांनी अविनाशला पुढे ढकललं. चेष्टेच्या भरात पुढं फेकलं गेलेलं पाऊल पुन्हा मागे घेणं मुळीच जमलं नसतं त्याला. अविनाश हळूच पुढे सरकला व बोलला, "एक्स्क्यूज़ मी, मिस देसाई..."
शीलाने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं व ती जराशी थांबली. आपल्या मैत्रिणीला थांबलेली पाहून इतर मुली पुढे चालू लागल्या. पाहिलं न पाहिलसं करून ती म्हणाली, "मिस्टर, आत्ता कसली चॅलेन्ज द्यायची आहे मला?"
हे ऐकून अविनाश थोडासा गोंधळला, पण लगेच स्वत:ला सावरून त्याने बोलायला सुरवात केली, "त्याचं असं आहे, मिस देसाई, माझे मित्र ..." त्याने दबल्या आवाजात सगळा खुलासा केला. त्याचा खुलासा ऐकून शीला खुदकन हसली अन म्हणाली, "तर तुम्हाला आपल्या मित्रांना दाखवून द्यायचंय की तुम्ही व मी रोजच भेटतोय?" शीलाचा तो खणखणीत सवाल ऐकून अविनाशने ओशाळून मान डोलावली. "ठीक आहे. मग आपण असं करूया. याआधी जरी आपण रोज भेटत नसलों, तरी यापुढे रोजच भेटत जाऊं. मग तर तुमच्या मित्रांची खात्री पटेल. काय विचार आहे?"
सॉलीड खुश होऊन, अवीने सिनेमातल्या एखाद्या हीरोसारखी, पण मनातल्या मनात, कोलांटी उडी मारली. हलकेच त्यानं मागे वळून पाहिलं व आश्चर्याने थक्क झालेल्या आपल्या मित्रांना वेडावून दाखवून आपल्या ’कॉलेज क्वीन’ बरोबर चालायला सुरवात केली.
त्या दिवसानंतर अविनाश व शीला दोघंही जोडीनंच हिंडताना दिसूं लागले. त्यांचं एकमेकांवर प्रेम असल्याच्या गुजगोष्टी उघडपणे बोलल्या जाऊं लागल्या. पण आता अवीला त्याचं काहीच वाटत नव्हतं. आता तो आपल्या मित्रांबरोबर कमी व शीलाबरोबर जास्त दिसायला लागला. पण त्यानं कशाचीहि पर्वा केली नाही, कारण एव्हांना तो शीलासाठी पार वेडा झाला होता. त्याला प्रेमाची धुंदी चढली होती.
पण एकदा अचानक जेवढ्या वेगाने त्याला प्रेमाची धुंदी चढली होती तेवढ्याच वेगानं त्याची धुंदी उतरली देखील. त्या दिवशी संध्याकाळी शीला अवीला भेटली ती पडलेला चेहरा घेऊनच. तिचा तो चेहरा पाहून अवीला विलक्षण भीति वाटली. "काय झालं शीला?", त्यानं विचारलं.
"अविनाश, जे घडू नयें होतं अगदी तेच घडलंय," शीला उत्तरली. "तो टीव्हीवर कार्यक्रम यायचा ना..."
तिला मधेच तोडून अवीने विचारलं, "कुठला?"
"घडलंय, बिघडलंय. नाव त्या कॉमेडी कार्यक्रमाचं. आपली मात्र ट्रॅजडी झालीय, अवि."
"शीला, तो रामगोपाल वर्मा आपले सिनेमे उगीच ताणतो तसं ताणूं नकोस. काय झालंय ते स्पष्ट सांग.", अविनाश म्हणाला.
"अविनाश, तू जीव वगैरे देणार नाहीस ना, ही बातमी ऐकून? वचन दे तू मला", शीला अजूनच ताणत म्हणाली.
"नाही देणार मी जीव. पण तू आता स्पष्ट नाही सांगितलंस ना, तर माझा जीव तसाच जाईल."
"अवि, बाबांनी माझं लग्न ठरवलंय ... माझ्या मर्जीविरुद्ध."
"पण का? कुणाशी?? केव्हां??? कब, क्यों और कहाँ?" अविनाशने प्रश्नांचा भडिमार केला.
"उद्या साखरपुडा आहे माझा. बाबांनी माझं लग्न सैन्यातील एका ऑफिसरशी निश्चित केलंय."
अविनाशला हे ऐकवेना. त्याला के. एल. सैगलचं ते दर्दभरं गाणं आठवलं, "मेरे दिलके टुकडे हज़ार हुए, कोई यहां गिरा, कोई वहां गिरा." तो काहीवेळ इथेतिथे पहात राहिला, जणू काही अस्ताव्यस्त पसरलेल्या हृदयाचे तुकडेच शोधत होता तो. पुढल्याच क्षणी शीलाला गदगदा हालवीत तो म्हणाला, " पण आपलं प्रेम आहे एकमेकांवर, शीला, त्याचं काय? तो अगदी कितीहि मोठा ऑफिसर असला, अगदी आर्मी, नेव्ही किंवा एयरफोर्समधला का होईना, तरी तुझ्या मर्जीविरुद्ध तो तुझ्याशी थेट लग्न कसं काय करूं शकतो? तुझ्यावर ही असली ज़बरदस्ती का?"
"अविनाश, आपल्या भारतावर देखील कसली ज़बरदस्ती होतेय माहीत आहे ना तुला? आधी तो लाल चीनी शत्रू झाला, मग पाकिस्तान, मग ... मग ... " अजून काही शत्रूंची नांवं न आठवून शीला म्हणाली, "मग ते कठोर आतंकवादी! आपल्या भारतमातेवर कसले अन्याय होतायेत माहीत आहे ना तुला? मग असं असताना मी माझ्यावर होत असलेल्या या छोट्याशा अन्यायाविरुद्ध कसं काही बोलूं शकले असते? तूच सांग मला. सगळीकडे द्रव्यदान, श्रमदान, रक्तदान, वगैरे दानांचं प्रस्थ माजलेलं असतांना माझ्या बाबांनी माझी कन्यादान करायचं ठरवलं तर त्यात काय वावगं आहे? त्यांना दुसरं काहीच करणं शक्य नव्हतं, अविनाश."
शीलाचं हे स्पष्टीकरण ऐकून अविनाशला काहीच उत्तर सुचेना. बराच वेळ शांतपणे विचार करून शेवटी तो निश्चयाने म्हणाला, "शीला, मला पटतं तुझं म्हणणं. या परिस्थितीत देशासाठी कसलंतरी दान करणं माझंही कर्तव्य ठरतं. शीला, माझ्या लाडके, मी देशासाठी प्रेमदान करायचं ठरवलंय."
अन दुसर्‍याच दिवसापासून जेवढ्या चक्री वादळाच्या वेगाने अवि-शीलाच्या प्रेमाची बातमी झंज़ावाताप्रमाणे सगळीकडे पसरली होती तेवढ्याच वेगाने त्या दोघांचं प्रेम बळी पडल्याची बातमी सर्वकडे पसरत गेली. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सगळीकडे पुन्हा एकदा त्या दोघांबद्दल बोलणीं सुरू झालीं. त्यांतच अविनाशने युद्धावर जाण्याचा आपला दृढनिश्चय जाहीर केला.
अविनाशच्या अपूर्व देशभक्तीचं सगळ्यांनी तोंड भरभरून कौतुक करायला सुरवात केली. पण या गोष्टीचं खरं कारण कुणालाच माहीत नव्हतं ---
एक अविनाश व दुसरी शीला देसाई सोडून !


लक्ष्मीनारायण हटंगडी

No comments:

Post a Comment