Thursday, December 9, 2010

दोस्ती

दोस्ती

सहावीचा वर्ग होता. राणे बाई मुलांना महात्मा गांधीजींचा धडा समजावून सांगत होत्या. "गांधीजींना इतर कोणत्याहि गोष्टींपेक्षा सत्य जास्त प्रिय होतं. जणूं सत्याचा अट्टाहासच होता त्यांना. आणि म्हणूनच जेव्हां प्रभावी इंग्रजी साम्राज्याशी लढा द्यायची वेळ आली तेव्हां त्यांनी सत्याचा आग्रह धरला. मोहनदास करमचंद गांधीजींचं प्रभावी साधन होतं, ते सत्याग्रह ..."
थोडा वेळ वर्गांत विलक्षण शांतता पसरली होती --- पण थोडाच वेळ. अचानक वर्गाच्या एका कोपर्‍यातून ओरडण्याचा आवाज ऐकूं आला. राणे बाई बोलायच्या थांबल्या. त्यांचं ध्यान भंगलं, लक्ष उडालं. अत्यंत शांतपणे त्यांनी आपल्या हातातलं पुस्तक समोरच्या टेबलावर ठेवलं. त्यांच्या रुंद कपाळावर पसरलेल्या आठ्यांचं जाळं कुंकवाच्या मोठ्या गोल टिळ्यातून स्पष्टपणे दिसूं लागलं. त्यांनी सावकाशपणे मान उंचावली व नजर रोखून आवाजाच्या दिशेने पाहिलं.
"मोघे आणि शेंडे, दोघेही इथं या", त्या अत्यंत शांत पण करारी आवाजात बोलल्या.
हळूंच वर्गांतल्या सर्व मुलांनी आपापल्या माना त्या कोपर्‍याकडे वळवल्या व सूचक अर्थाने एकमेकांकडे पाहिलं. "आतां काहीतरी धमाल गम्मत येणार" या आशयाचं हसूं सर्वांच्या ओठांतून पाझरायला लागलं. थोडा वेळ कांहींच घडलं नाहीं. बाईंनी ज्या मुलांना बोलावलं होतं त्यांच्यापैकी कुणीच हललं नाहीं.
"इथं या म्हणते ना. कां तुमचाहि सत्याग्रह चाललाय?" आतां त्यांचा आवाज बराच चढला होता. त्यांचा प्रश्न ऐकून सगळेजण खुदखुदून हंसले -- पण बाईंची जरबी नजर वर्गावरून फिरताच सगळे ताबडतोब गप्प झाले. वर्गात मूकपणे हालचाल सुरूं झाली. मोघे व शेंडे टेबलाच्या दिशेने येऊं लागले.
"कसला तमाशा चालला होता तिथं?"
कुणीच कांही बोललं नाहीं. दोघांच्याहि माना खाली होत्या.
"अशोक मोघे, तुला विचारतेय मी. कसला तमाशा चालला होता तिथं?" राणेबाई परत गरजल्या.
"कांहीं नाही, बाई.... मी कांहीं केलं नव्हतं," अशोक मोघे खालच्या मानेनं दबल्या आवाजात उत्तरला.
"सत्य बोला, पोरांनॊ. मग खाली मान घालून घाबरलेल्या आवाजात बोलायचं कांहीं कारण नाहीं."
मराठीच्या पुस्तकांतून प्रत्यक्ष वर्गात अवतरलेला गांधीजींचा आधुनिक स्त्री-अवतार पाहून वर्गांतली पोरं दबल्या आवाजात हंसली, पण परत एकदां बाईंची कडक नजर वर्गावरून फिरेपर्यंतच.
"बाई, हा मोघे असत्य बोलतोय. चक्क खोटं बोलतोय हा. यानं माझ्या हातांतून माझं पुस्तक खेंचून घेतलं ... व उलट मला इंग्रज़ीतून शिवीसुद्धां दिली. गांधीजींच्या आत्म्याला कित्ती यातना झाल्या असतील, बाई!" शेंडे म्हणाला.
शेंडेच्या तोंडून गांधीजींचं नांव ऐकून वर्ग खदाखदा हंसला पण राणे बाईंनी कौतुकाने शेंडेकडे पाहिलं. हे पाहून शेंडेला अजून चेव चढला व तो बोलतच सुटला. अशोक फक्त नकारात्मक मान डोलवायचा प्रयत्न करीत होता.
"हात पुढे कर," बाईंनी हुकूम दिला. अशोकला उगीचच वाटलं की बाई शेंडेला शिक्षा देताहेत. "मोघे, हात पुढे कर. तुला सांगतेय मी," राणेबाई गरजल्या.
"पण बाई, मी सत्य बोलतोय. माझी कांहीच चूक नव्हती."
"मग हा बिचारा शेंडे खोटं बोलतोय असं म्हणायचंय तुला?"
"पण बाई ..." नजरेनं दयेची याचना करीत असतांनाच बाईंनी एका हातानं अशोकचा हात जबरदस्तीनं खेंचून वर केला आणि दुसर्‍या हातानं टेबलावरची छडी उचलून त्याच्या हातावर सपकन वाजवली.
"आई ग ---" वेदनेनं अशोकचे डोळे ओलावले व त्या वेदनेला प्रतिसाद वर्गभर मुलांच्या उंचावलेल्या मानांनी दिला.
"बाळा, जागेवर जाऊन बस. मोघ्या, तुला नाहीं सांगितलं मी जागेवर जायला. तू तास संपेपर्यंत वर्गाबाहेर जाऊन उभा रहा," राणे बाई निर्णायक स्वरांत म्हणाल्या.
विजयी मुद्रेनं शेंडे पुन्हां आपल्या जागेवर जाऊन बसला व अशोक मोघे बाहेर चालूं लागला. वर्गांत गडबड वाढत चालली होती. बाईंनी पुन्हां एकदां डस्टर टेबलावर आपटला व लगेच वर्ग शांत झाला. राणे बाई परत बोलूं लागल्या -- "गांधीजींचं आवडतं शस्त्र होतं, सत्य. सत्याच्या जोरावर त्यांनी प्रभावी ब्रिटिश साम्राज्याला प्रचंड आव्हान दिलं ..."
बाहेर आलेल्या अशोकच्या कानांवर बाईंचा आवाज पडत होता पण आतां त्याला त्या आवाजांत मुळीच रस नव्हता. तो वर्गाबाहेर आला तेव्हां तिथं अजून एक मुलगा उभा होता, पण अशोकचं लक्षच गेलं नाहीं तिकडे. आपली कांहींच चूक नसतांना राणे बाईंनी सबंध वर्गासमोर आपल्याला छडी मारून वर्गाबाहेर काढलं होतं --- सत्याचा पाठ समजावून सांगणार्‍या बाईंनी आपलं कांहींच न ऐकतां असत्य बोलणार्‍या शेंडेचं समर्थन केलं होतं, या अपमानाच्या जाणीवेनं अशोकचं मन धगधगत होतं. नुकताच घडलेला अपमानास्पद प्रसंग विसरून जाण्याची प्रबळ इच्छा असूनही तें जमत नव्हतं.
"ए, नवीन पांखरूं आहेस वाटतं?" आधीच बाहेर उभ्या असलेल्या त्या पोरानं अशोकला विचारलं. आणि प्रथमच अशोकचं लक्ष तिकडे गेलं. त्याच्यासमोर फाटक्या अंगाचा एक काळसर मुलगा उभा होता; असेल बारातेरा वर्षांचा; तेल न घातलेले त्याचे राकट केस त्याच्या कपाळावर स्वैर रुळत होते; नाकांतून शेंबूड बाहेर येऊं पहात होता; दांत किडलेले होते. बरेच दिवस धुतले न गेलेले त्याचे कपडे कांही फाटक्या भागातून त्याच्या मळकट अंगाचं दर्शन घडवीत होते. अशोकला त्याची किळस वाटली. घरापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या चांगल्यापैकी इंग्रज़ी शाळेत न पाठवतां घराच्या जवळच असलेल्या एका साधारण म्युनिसिपल शाळेत आपला दाखला घेतल्याबद्दल प्रथमच अशोकला आपल्या वडिलांचा राग आला, व त्याने रागाने मान फिरवून घेतली. वर्गांत नेहमीच शेवटच्या बांकावर एकट्यानेच बसून राहणारा तो मुलगा बहुतेक वर्गाबाहेरच असायचा. त्याच्याशी कुणीच जास्त बोलत नसे अन त्यालाही त्याची बहुतेक पर्वा नसावी. तो नेहमीच आपला बिनधास्त असायचा. त्याने अशोकला पुन्हां एकदां हटकलं --
"काय रे साल्या, ऐकूं नाहीं आलं काय? भडव्या, तुझ्याशी बोलतोय मी."
काहीच उत्तर न देतां अशोकनं भिंतीवरच्या मोठ्या घड्याळाकडे डोळे फिरवले, तास संपायला अजून अर्धा तास होता. तोपर्यंत करणार तरी काय? अशोक नाईलाजाने त्या मुलाकडे वळला. त्या मुलाचे आळशी डोळे उगीचच चमकले.
"साला, मघाशी काय फुक्कट भाव खात होतास? नवीन पांखरूं आहेस का शाळेत?" त्यानं पुन्हां विचारलं. अशोकला त्याच्या तोंडची भाषा जरासुद्धां आवडली नाहीं, पण काय करणार? त्याला वेळ काढायचा होता.
"ए भावखाऊ, नवीन आहेस काय शाळेत?", त्यानं पुन्हां विचारलं.
"हूं ..." अशोकनं जोरांत मान हलवली.
"नांव काय तुझं?"
"अशोक सदानंद मोघे."
"माझं नांव लाल्या," तो उगीचच बडबडला. अशोकनं खरं तर त्याचं नांव विचारलंसुद्धां नव्हतं.
कांहीतरी बोलायचं म्हणून अशोकनं त्याला विचारलं, "फक्त लाल्या? वडिलांचं नांव... आडनांव कांहीं नाही?"
"होय, फकत लाल्या म्हणतात आपल्याला. बाप नाहीं मला. आणि ते आडनांव का बिडनांव आपल्याला माहीत न्हाय," तो म्हणाला.
अशोकला आश्चर्य वाटलं, पण तो गप्प बसला.
"कायरे मोघ्या, तू खरोखरच शिवी दिलीस त्या शेंड्याला?"
लाल्याचा तो प्रश्न ऐकून मात्र अशोकला खूप बरं वाटलं. या विषयावर आपली बाजू कुणाला तरी सांगावी असं खूप वाटत होतं त्याला. लाल्याचा हा प्रश्न ऐकून त्याच्या भावनांना आतां वाचा फुटली. आनंदानं थोडा वेळ त्याच्या तोंडून शब्दच फुटेना.
"निदान कबूल तरी करायचं होतंस. कदाचित त्या राणे बाईनं मोकळं सोडलं असतं तुला."
पुन्हां अशोकचं मन उसळून आलं. तो आवेगानं बोलला, "पण मी मुळी शिवी दिलीच नव्हती तर कबूल कां करावं? माझी चूक नव्हतीच मुळी."
लाल्याला बहुतेक अशोकचं म्हणणं पटलं असावं. त्यानं हलकेच अशोकचा हात आपल्या हातांत घेतला व तो म्हणाला, "मला वाटलंच तूं शिवी देणार नाहीस म्हणून. तू काय मी आहेस शिवी द्यायला? साला, ती राणे बाईच वाईट आहे. शाळेत सगळेच चमचे आहेत त्या शेंडेचे. उगीच जळतात आपल्यावर."
इच्छा असूनही अशोक लाल्याचा राकट हात दूर करूं शकला नाहीं. पण आपली कांहींच चूक नसतांना राणे बाईंनी आपल्याला शिक्षा करावी व खर्‍या अपराध्याला मोकळं सोडून द्यावं? कां? सगळेच जण शेंडेचे चमचे का काय म्हणतात ते होते, पण कां? सगळे उगीच लाल्यावर व आपल्यावर जळतात कां? नेमक्या याच कोड्याचं उत्तर पाहिजे होतं अशोकला.
"अरे, तो शेंड्या आपल्या हेडमास्तरांचा मुलगा आहे ना, मग त्याला कोण कशाला मारेल? साला नोकरी जाईल ना त्यांची ! म्हणून सगळे चमचे आहेत त्याचे. आयच्याण, साला अस्सा राग येतो एकेकाचा. वाटतं, धरून एकेकाला लाथ घालावी गांडीत. ..." लाल्या बोलतच होता. त्याच्या तोंडच्या त्या शिव्या ऐकून अशोकला तोंड फिरवून कान बंद करून घ्यायची इच्छा झाली, पण तो तसं करूं मात्र शकला नाहीं.
"अशक्या, पेरू खाणार कां रे?" लाल्याच्या प्रेमळ प्रश्नानं अशोकचं लक्ष पुन्हां लाल्याकडे गेलं.
"लाल्या, माझं नांव अशोक मोघे आहे, अशक्या नाहीं."
"जाऊंदे भिडू. अशक्या काय, अशोक काय, आपल्याला दोन्हीं शेम. पण सांग, पेरू खाणार का तूं?" म्हणत लाल्यानं हातांतला पेरू अशोकच्या तोंडाकडे नेला. किडक्या दांतांनी उष्टावलेला अर्धवट पेरू धरलेला लाल्याचा हात अशोकनं पटकन दूर सारला व तोंड फिरवून घेतलं.
"साला, उष्टं खायला लाजतोस काय? का उगीच भाव खातोयस?" म्हणत लाल्या आपले किडके दांत दाखवून हंसला. त्याच्या हंसण्याचा आवाज मात्र त्याच वेळी झालेल्या घंटीच्या ठणठणाटात बुडून गेला. राणे बाईंचा तास केव्हां संपला होता हे मुळी अशोकला कळलंच नव्हतं.
"पुन्हां तमाशा करूं नका वर्गांत." वर्गाबाहेर पडणार्‍या राणे बाईंचा आवाज त्या दोघांच्या कानावर पडला. लाल्या निर्लज्जपणे हंसत व राणे बाईंची नक्कल करीत वर्गांत शिरला. अशोक मागाहून आपलं डोकं खाली घालून आंत येत होता. अचानक मागे वळून पहात लाल्यानं विचारलं, "ए अशक्या --- च्यायला, चुकलो, अशोक, माझ्याबरोबर माझ्या बांकड्यावर बसतोस का? एक धम्माल गम्मत सांगतो तुला." आणि त्याच्या होकाराची वाट न पहाताच लाल्या अशोकला आपल्याबरोबर घेऊन गेला.
नंतरच्या तासाला राजे मास्तर भूगोल शिकवीत होते, का इतिहास याच्याकडे दोघांचही लक्ष नव्हतं. ते दोघेही आपापसात कुजबुजत होते. त्यांचे आपले कसले तरी बेत चालले होते. तास संपवून राजे मास्तर वर्गाबाहेर गेले तेव्हां लाल्या व अशोक मोठ्यानं हंसले व सगळ्यांचं लक्ष त्या दोघांकडे गेलं.
शाळेचे आठ तास संपून शाळा केव्हां सुटली याचं भान त्या दोघांनाहि नव्हतं. शेवटच्या घंटेचा आवाज थांबायच्या आधीच लाल्या व अशोक घाईघाईनं बरोबरच बाहेर पडले व शाळेच्या वळणावर येऊन उभे राहिले. शेंडे घरी जायचा रस्ता लाल्याला चांगलाच माहीत होता. शेंड्याला मस्त धडा शिकवणं अत्यंत जरूरीचं होतं -- त्याला बेदम धोपटणं जरूरीचं होतं. शेंड्याला एकटाच येतांना पाहून लाल्यानं नाकांतून बाहेर पडूं पहाणारा शेंबूड आपल्या मळक्या शर्टाच्या तोकड्या बाहीनं मागे सारला व उगीचच आपल्या बाह्या सरसावल्या. शेंडे जवळ येतांच लाल्या पुढे लपकला. आपली पुस्तकांची पिशवी अशोककडे फेंकून लाल्यानं शेंड्याच्या सफ़ेद शर्टाची कॉलर पकडली.
"भडव्या, खोटं बोलायला पाहिजे नाहीं कां? आत्तां तुला अस्सा मस्त धडा शिकवतो की खोटं बोलणं दूर राहिलं, साल्या तुझी बोलतीच बंद होईल. हेडमास्तरांचा पोरगा जन्माला आलास म्हणून माजलास होय? आज तुझ्यामुळे माझ्या या दोस्ताला शिक्षा झाली. साला, खूप मस्ती चढलीय तुला, बघ कशी सगळी मस्ती उतरवतोय तें."
बोलताबोलतांच लाल्या शेंडेला बदडत सुटला. मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात दडून बसलेल्या सुडाच्या भावनेनं अशोकचं मन पेटलं होतं. इच्छा असूनही अशोकनं लाल्याला प्रतिकार केला नाहीं. नशिबानं रस्त्यावर दुसरं कुणीहि नव्हतं. आपण योग्य तो सूड घेतलाय याची खात्री पटल्यावर लाल्या थांबला. अंगावरचा घाम पुसत, जणूं कांही घडलंच नाही या थाटात लाल्यानं अशोककडून आपली बॅग हिसकावून घेतली, व अशोकच्या खांद्यावर आपला हात टाकून त्यानं शेंडेला पुन्हां एकदां धमकावलं, "साल्या, कुणाला या प्रकरणाबद्दल सांगितलंस तर तुझी खैर नाही. तुझ्या अंगावरच्या सालड्याची पायताणं करून त्यानीच झोडून काढीन तुला. कळलं? आतां पळ काढ इथून ... नाहींतर अजून ठोकीन."
आपलं अंग चोळीत रडणार्‍या शेंडेला तसाच सोडून दोघेही वळणावर अदृश्य झाले. लाल्याबरोबर अशोकच्या तोंडावर देखील सूड उगवल्याचा आसूरी आनंद पसरला होता. त्याच तंद्रीत अशोक मोघे घरी पोंचला ते दुसर्‍या दिवसापासून आपली दोस्ती एकदम पक्की झाल्याचं वचन लाल्याला देऊन.

* * * * * * * * *

अशोक घरीं पोंचला तेव्हां अशोकचे वडील घरीं नव्हते --- अशोक शाळेतून घरीं पोंचतेवेळी ते कधीच परतलेले नसत. घरी असायचे ते फक्त ’मामा’ स्वयंपाकी. रोजच्यासारखं आजही मामांनी अशोकला बटाटेपोहे खायला दिले, व आपली वेळ झाल्यावर ते निघून गेले. संध्याकाळीं अशोकची व श्रीयुत मोघ्यांची भेट व्हायची ती अगदी अंधार पडल्यावर --- अन त्यावेळी ते पार थकलेले असायचे. जेवण संपवून ते लगेच अंथरुणावर पडायचे. अशोकच्या डोक्यावरचं आईचं छत्र नाहीसं झाल्यावर त्यांचं कशांतच लक्ष लागत नसे. अशोकची आई त्याच्या लहानपणीच वारली होती. त्यानंतर दुसरं लग्न न करतां स्वयंपाकघर संभाळण्यासाठी अशोकच्या वडिलांनी मामांना नेमलं होतं. त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळीं ऑफिसला जावं, दिवसभर काम करावं आणि थकूनभागून संध्याकाळी घरी परत यावं याशिवाय दुसरं कांहीच करावसं वाटत नसे त्यांना. आपल्या एकुलत्या एका मुलाकडे लक्ष द्यायला सुद्धां त्यांना वेळ नव्हता ... आणि अशोकला या गोष्टीची खंत नेहमीच वाटत असे. पण तक्रार तरी कुणाकडे करणार?
तरीसुद्धां त्या दिवशी ते घरी आल्याबरोबर अशोक मोठ्या उत्साहाने त्यांना बिलगला. आज जे कांही घडलं होतं ते त्याला आपल्या बाबांना सांगायचं होतं. नेहमीप्रमाणेच त्यांनी निर्विकारपणे त्याला दूर केलं. अशोकचा उत्साह थोडा मावळला, पण तरीहि पुन्हां त्यांना बिलगत तो म्हणाला, "बाबा, आज किनई मला एक नवा मित्र मिळाला. खुप्पखूप्प चांगला आहे..."
"छान झालं," एवढंच उदगारून त्यांनी कूस बदलली. बराच वेळ अशोक बरंच कांही सांगत सुटला, पण थोड्याच वेळानं त्यांच्या घोरण्याचा आवाज ऐकून तो हिरमुसला झाला व आपल्या खोलीत निघून गेला.
दुसर्‍या दिवशी अशोक काहीं न खाताच शाळेत आला. लाल्या त्याच्या आधीच येऊन त्याची वाट पहात होता. त्या दिवशी अशोकनं आपली जागा बदलली व तो शेवटच्या बांकावर लाल्याच्या शेजारी बसला. सगळेच तास त्यांनी एकमेकांबरोबर गप्पा मारण्यात घालवले. मधल्या सुट्टीत दोघेही बरोबरच शाळेच्या उपहारगृहात गेले. सुटीनंतरचा तास सुरूं झाल्यावर अशोकनं आपलं इंग्रज़ीचं पुस्तक उघडून पाहिल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. पहिल्याच पानावर कुणीतरी गिरवून ठेवलं होतं. हा कुणाचा चावटपणा असेल या गोष्टीचा विचार करीत त्यानं रबर शोधायला पाकीट उघडलं तर रबर जागेवर नव्हता.
"लाल्या, रबर आहे?"
"नाहीं, यार. रोज कुठे असतो, जो आज असेल?" लाल्या उत्तरला.
पुढच्या बांकावरच्या मुलाकडे वळून अशोकने विचारलं, "ए माने, जरा रबर देना."
अशोकचा प्रश्न ऐकून माने उगाचच संतापला व तिरसटपणे म्हणाला, "आपल्या जिगरी दोस्ताकडे माग ना --- सगळं कांहीं देईल तो ..."
मानेला एकदम कसला झटका आला असेल याचा विचार करीत अशोकनं परत त्याला विचारलं, "असा कां बोलतोयस तूं?"
"मला विचारूं नकोस. तुम्हां दोघांशी कुणीच बोलायचं नाहीं अशी ताकीद दिलीय सरांनी सगळ्यांना. बॉयकॉट केलंय तुम्हांला," मानेनं आपली मान पुन्हां तिरसटपणे फिरवून स्पष्टीकरण दिलं.
लाल्याशी मैत्री करण्यांत इतकं काय वावगं आहे की इतर मुलांनी आपल्याला "बॉयकॉट" करावं या गोष्टीचा उलगडा बराच वेळ विचार करून देखील अशोकला झाला नाहीं. ओळख झालेल्या पहिल्याच दिवशीं आपल्या मित्राच्या अपमानाचा सूड उगवणारा लाल्या इतरांना इतका अप्रिय कां असावा, या रहस्याचं उत्तर जाणून घेण्याची सवड किंवा मूड अशोकला मुळीच नव्हता. आदल्या दिवशीं सबंध वर्गासमोर झालेल्या अपमानाची कडू आठवण मनांत ताजी असतांनाच वर्गांतील इतर मुलांनी आपल्याशी बोलणं बंद करावं हें अशोकला मुळीच आवडलं नाहीं. सर्वांचाच सूड उगवायचा या आसूरी भावनेनं अशोकचे निष्पाप डोळे चमकले. इतर मुलांना जो आवडत नव्हता त्या लाल्याचा जिगरी दोस्त बनणं हा एकच मार्ग अशोकच्या भाबड्या मनाला सुचला, आणि याच भावनेनं तो लाल्याच्या अधिक जवळ येत राहिला.
दिवसांमागून दिवस जात राहिले. अशोक व लाल्या एकमेकांच्या जास्तच जवळ येत राहिले. एका कुजक्या फळाची झळ इतर सर्व चांगल्या फळांना लगेच लागते असं म्हणतात. आणि अशोक तर तसा लहान मुलगाच होता. हळूंहळूं दोघांनाहि बरोबरच बांकावर उभं केलं जाई, तर कधीं एकत्रच वर्गाबाहेर काढलं जाई. लाल्याशिवाय इतर कुणी आपल्याकडे बोलत नाहीं याची जाणीव व खंत अधूनमधून अशोकच्या निरागस मनाला नक्कीच व्हायची. लवकरच त्याला समजून चुकलं की या सगळ्या गोष्टींना शेंडेच जबाबदार होता. आपल्याला पडलेल्या माराचा शेंडेनं पुरता सूड उगवला होता. अशोकच्या मनांत शेंडेविषयी पुरेपूर तिरस्कार भरला होता, आणि या तिरस्काराला जिवंत स्वरूप द्यायची संधी हवी होती अशोकला. आणि त्या दिवशी लाल्याच्या एका प्रश्नानं ठिणगी पेटवायचं काम केलं.
"अशोक, वर्गांत माझ्याशिवाय दुसरं कुणीच तुझ्याकडे बोलत नाही, याचं कांहीच वाटत नाहीं तुला?"
अशोकच्या आधीच चिघळलेल्या जखमेवर त्या प्रश्नानं जणूं मीठ चोळलं गेलं, पण तो गप्प बसला.
लाल्या परत म्हणाला, "तो साला शेंड्या आहे ना, त्याच्यामुळे सगळी भानगड झालीय. एकदा त्याला सरळ केला पाहिजे."
शेंडेचं नांव ऐकल्यावर अशोकच्या मनांत सुडाची भावना परत उफाळून आली. सूड --- सूड --- सूड घेतलाच पाहिजे या अपमानाचा, या एकाच विचारानं थैमान मांडलं होतं त्याच्या मनांत.
"त्या शेंडेकडे एक मस्त, महागडं चित्रांचं पुस्तक आहे. कसंही करून ते पुस्तक आपल्याकडे आलं ना तर ..." लाल्यानं वाक्य अर्धवट सोडून अशोकला अजून अस्वस्थ केलं.
मधल्या सुटीत सर्वजण वर्गाबाहेर निघून गेले. लाल्यानं अशोकला बाहेर यायला सांगितलं तर त्याला नकार देऊन अशोक एकटाच इकडॆ-तिकडे पहात वर्गांत बसून राहिला. त्याचं लक्ष शेंडेच्या आकर्षक बॅगेकडे गेलं. त्या बॅगेच्या बाहेरून सुद्धां दिसणारं रंगीत पुस्तक जणूं त्याला आव्हान देत होतं. अशोकला रहावेना. हलकेच तो आपल्या जागेवरून उठला.
ठणठणठण ... मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली व सगळीं मुलं परत वर्गांत यायला लागली. राणे बाईंचा तास होता. सबंध वर्गावरून एकदां आपली ज़रबी नजर फिरवून राणे बाईंनी शिकवायला सुरवात केली आणि त्या लवकरच रमल्या. त्यांची समाधी भंगली ती शेंडेच्या रडक्या आवाजाने.
"शेंडे, आतां काय झालं रडायला?" त्यांनी विचारलं.
"बाई, माझं नवीन पुस्तक पाकिटांतून नाहीसं झालंय. पुस्तक नाहीं सांपडलं तर बाबा झोडून काढतील मला," शेंडे अगदीच रडकुंडीला आला होता. असली महाग पुस्तकं, अभ्यासक्रमांत नसतांना देखील, वर्गांत कां आणली गेलीं हा प्रश्न राणे बाई आपल्याला नक्कीच विचारणार नाहींत याची शेंडेला पूर्णपणे खात्री होती. आणि नेमकं तसंच झालं.
राणे बाईंनी आपल्या हातातलं पुस्तक संतापाने टेबलावर आपटून घोषणा केली, "ज्या कुणी शेंडेचं पुस्तक घेतलं असेल त्यानं ताबडतोब त्याला परत करावं." पटकन अशोकच्या मनांत एक विचार चमकून गेला --- आपण जे कांही केलं ते नक्कीच चुकीचं होतं; कबूल करावा आपला गुन्हा व परत करावं शेंडेचं फालतू पुस्तक; आपल्याकडे याही पेक्षा चांगली पुस्तकं आहेत. पण छे, मग सूड कसा पूर्ण होणार? सुडाचा विचार मनांत येताच अशोक परत वेडापिसा झाला. इच्छा असूनही त्याच्या तोंडून शब्द फुटेना. त्यानं चोरट्या नजरेनं राणे बाईंकडे पाहिलं. त्याला त्यांच्या डोळ्यांत एक विलक्षण चमक आढळून आली.
राणे बाईंनी टेबलावरची छडी उचलली व गर्जना केली, "लाल्या, आपलं पाकीट इथं घेऊन ये."
बाईंची गर्जना ऐकून सर्वजण जोरात हंसले. लाल्याचं तोंड रागानं व शरमेनं लाल झालं. त्याच्या संतप्त चेहर्‍यावरची शीर न शीर ताठ झाली, पण स्वत:ला सांवरायचा प्रयत्न करीत तो शांतपणे म्हणाला, "बाई, मी चोरी केलेली नाहीं. मी चोर नाहीं."
"तुला विचारलं नाहीं मी. तें मला ठरवूं दे. आधी आपलं पाकीट घेऊन इथं ये."
आपलं निरपराधित्व सिद्ध करण्याच्या निश्चयानं लाल्या आपलं फाटकं पाकीट उचलून टेबलाकडे चालायला लागला. दुसर्‍याच क्षणी राणे बाई लाल्याच्या पाकीटातल्या वस्तू काढून ज़मिनीवर फेंकायला लागल्या. चाललेला प्रकार पाहून अशोकला वाटलं, हे जे कांहीं होतंय ते चूक आहे --- गुन्हेगार आपण आहोत, लाल्या नव्हें. अगदी एकच क्षण त्याला वाटलं की सार्‍या वर्गाला ओरडून हे सत्य सांगावं. पण त्याला धीर झाला नाहीं. तो गप्पच बसला.
पाकीट रिकामं झाल्यावर बाईंनी तपासणी संपवली. लाल्या आवेगाने ओरडला, "आतां तरी पटलं ना बाई, मी चोरी नाहीं केली तें?" राणे बाईंनी जणूं त्याचं ओरडणं ऐकलंच नाहीं. लाल्या संतापानं आपली बॅग भरायला लागला. मनाचा संयम मुळीच टळूं न देतां राणे बाई शांतपणें म्हणाल्या, "अशोक मोघे, आपलं पाकीट घेऊन इथं ये."
अशोकला वाटलं आपण देखील लाल्यासारखंच ओरडून सांगावं, "बाई, मी चोर नाहीं." --- पण त्याच्या तोंडून शब्दच फुटला नाहीं. कुणातरी अनोळख्या शक्तीनं खेंचून न्यावं तसं अशोक आपली बॅग घेऊन टेबलाकडे जाऊन उभा राहिला. बॅगेपेक्षा मोठं असलेलं ते रंगीत पुस्तक त्याच्या हातातल्या बॅगेतून बाहेर डोकावत होतं. राणे बाईंनी अगदी शांतपणे अशोकच्या हातांतून बॅग खेंचून घेतली व ते पुस्तक काढून शेंडेला परत दिलं. खाली मान घालून आपल्या जागेवर जायला निघालेल्या अशोकला त्यांनी शर्टाच्या कॉलरने मागे खेंचून आपल्यासमोर उभं केलं आणि हातातल्या छडीनं अशोकवर वार करायला सुरवात केली. आपली सुटका करून घ्यायची अशोकची सगळी धडपड व्यर्थ ठरली. अगदी आपला हात दुखेपर्यंत राणे बाईंनी अशोकला बदडलं, व आपल्या जागेवर जाऊन बसण्यासाठी त्याला दूर ढकललं.
कसंबसं जाऊन अशोक आपल्या बांकावर कोसळला. शाळा सुटल्याची घंटा ऐकून सुद्धां त्याला उठायचं त्राण नव्हतं. त्याला कुठंतरी पळून जावंसं वाटलं. त्याचा हात हातात घेऊं पहाणार्‍या लाल्याला त्यानं दूर लॊटलं. घरी गेल्यावर बाबा काय म्हणतील हा एकच विचार अशोकला सतावीत होता. अशोकनं केलेल्या चोरीची हकीकत राणे बाईंनी त्याच्या प्रगति-पुस्तकावर लिहून आपल्या पालकांची सही आणायचा हुकूम केला होता. बाबांची सही --- कसं शक्य होणार होतं ते? पण तें टाळणं सुद्धां अशक्य होतं. प्रगति-पुस्तक घरी दाखवण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. प्रगति-पुस्तक ! त्यावेळीं केवढा हास्यास्पद शब्द वाटला तो अशोकला. वर्गांत जे कांहीं चाललं होतं ती काय प्रगति होती? पण मग या सर्व गोष्टींना जबाबदार कोण होतं -- तो स्वत:? लाल्या? शेंडे? राणे बाई? विचार करून करून अशोकचं डोकं दुखायला लागलं, पण त्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेना.
अशोक रडतच घरी आला. त्याचे वडील ऑफिसमधून आज घरीं आले ते जरा जास्तच त्रस्त होते. त्यांना पाहिल्यावर अशोकला एकदां --- फक्त एकदाच --- वाटलं की बाबांना आपलं प्रगति-पुस्तक दाखवून मार खाण्यापेक्षां पंख्याला लटकून आत्महत्या करावी. घाबरत घाबरत अशोकनं आपलं प्रगति-पुस्तक त्यांच्यासमोर धरलं व सही मागितली. चोरी? अशोकने चोरी केली --- अशोकनं? आपल्या एकुलत्या एका मुलानं? अशोकच्या आईच्या अकाली निधनानंतर दुसरं लग्न न करतां आपण ज्याच्यासाठी जगलो त्या आपल्या मुलानं वर्गांत चोरी करावी? हा भयंकर विचार त्यांना मुळीच सहन झाला नाहीं. थरथरत्या हातानं त्यांनी सही केली, पेन बाजूला फेकून दिलं व पुन्हां एकदां अशोकला बदडून काढायला सुरवात केली. त्याला वांचवायला मामा देखील जवळ नव्हते. वेदनेनं अशोक जमिनीवर कोसळेपर्यंत ते त्याला मारत सुटले.
सबंध रात्र अशोकनं रडून काढली. त्याचं सारं अंग फणफणत होतं, डोक्यांत वणवासा पेटला होता. परतपरत मार खाऊन अंग दुखत होतं, की कधीं नव्हें ते आपल्या बाबांनी आपल्याला मारावं, व ते देखील आपली बाजू ऐकून न घेतां, यामुळें डोकं तापलं होतं हेच अशोकला कळेना. जादूने सार्‍या जगाचा फुटबॉल करावा --- अगदी शेंडे, राणेबाई, आपले बाबा यांच्यासकट --- व लाथेनं तो फुटबॉल अंतराळात झुगारून द्यावा असं त्याला वाटलं. याच अवस्थेंत, अर्धसुप्त व अर्धजागृतावस्थेच्या स्थितीत रात्र संपली.
दुसर्‍या दिवशी अशोक शाळेत आला तो आपलं ठणकणारं अंग चेपीत. आपलं दु:ख कुणाला सांगणार? आपल्याला कुशीत घेऊन आपलं दु:ख हलकं करणारी आई कुठे होती? डोळ्यांतून ओसंडून वाहूं पहाणारा अश्रूंचा प्रवाह आवरीत अशोक वर्गात आला. स्वप्नांत असल्याप्रमाणे अशोकनं प्रगति-पुस्तक बाईंच्या टेबलावर ठेवलं व परत तो आपल्या बांकावर, लाल्याच्या शेजारी येऊन बसला. वर्गात काय शिकवलं जात होतं याकडे त्याचं मुळीच लक्ष नव्हतं. कधी एकदां मधल्या सुटीची घंटा वाजते व आपण आपलं दु:ख लाल्याला बोलवून दाखवतो असं झालं होतं त्याला.
अखेरीस मधली सुटी आली व वर्ग रिकामा झाला. लाल्या आपल्या हातात हलकेच त्याचा हात घेऊन बसला. लाल्याचा स्पर्श होताच अशोक भणभणून रडला. आपले वडील इतके दुष्ट कां वागले याचं आश्चर्य करीत त्यानं लाल्याला विचारलं, "लाल्या, तुझे वडील मारतात तुला?"
लाल्याच्या डोळ्यांत दु:ख तरारून आलं. बाहीनं डोळे पुसत त्यानं म्हटलं, "मी माझ्या बापाला मुळी पाहिलंच नाहीं. माझी आई म्हणते मी जन्माला यायच्यापूर्वीच माझा बा मेला. कोण म्हणतं, माझा बा तुरुंगात आहे. मी फक्त माझ्या मायला ओळखतो. माझ्यासाठी विड्या वळून पैसे कमावणारी आई -- सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्यासाठी धडपडणारी माझी आई."
मोठाल्या डोळ्यांत दाटून येणारे अश्रू थांबवीत लाल्यानं अशोकला विचारलं, "तुझी आई देखील मारते तुला?"
अशोक रडक्या सुरांत म्हणाला, " मी अगदी लहान असतांनाच माझी आई देवाच्या घरी गेली. माझ्या बाबांनी सुद्धां पहिल्यांदाच मारलं मला."
"पण कां?"
"राणे बाईंनी माझ्या प्रगति-पुस्तकांत मी केलेल्या चोरीविषयी लिहिलेला शेरा वाचून."
"ती मारकी म्हैस आहेच तशी. पण अशोक, तूं देखील म्याड आहेस."
"कां पण?"
"अरे, असले वाईट शेरे लिहिलेलं पुस्तक घरी दाखवायची मुळी गरजच काय?"
"म्हणजे?"
लाल्या अशोकला जवळ घेऊन दबल्या आवाजात समजावून सांगायला लागला, "हें बघ, मागे एकदां मी असलाच एक वाईट शेरा असलेलं प्रगति-पुस्तक आईला दाखवलं होतं आणि तिने मला बेदम चोपून काढला होता. आतां मी आईला कधीच कांही दाखवीत नाहीं. तिची सही मीच गिरचटतो. आईला लिहितां येत नाहीं, आणि बाईंना कांहीं समजत नाहीं. आहे की नाहीं गम्मत?"
"म्हणजे तूं लबाडी करतोस?" डोळे विस्फारीत अशोक म्हणाला.
"काय करणार, दोस्त? आई एवढा त्रास घेऊन मला शाळेत पाठवते. तिला वाटतं इथं सगळं नीट चाललंय. मी एकदम खुष आहे. पण अशोक, तुला माहीत आहे ना शाळेंत काय चाललंय तें? मी झोपडपट्टीत रहातो म्हणून कुणीच माझ्याशी नीट वागत नाहीं. मुलं तर नाहींच, शिक्षक सुद्धां नाहीं. दर दिवसाआड कांहींना कांही खरेखोटे शेरे वह्या-पुस्तकांत लिहिले जातात. आणि मग आई मला मारते. म्हणून आतां मीच तिच्या नांवाने सही करतो. मला माहीत आहे, मी लबाडी करतोय ते." बोलतांबोलतांच अचानक लाल्याच्या डोळ्यांत पाणी आलं व तो अशोकला म्हणाला, " अशोक, मी लबाडी करतो --- वाईट आहे मी. तूं खूप चांगला आहेस. माझ्याशी मुळीच दोस्ती करूं नकोस."
शाळेत नियमितपणें छड्या खाऊन देखील कधीहि न रडणार्‍या लाल्याला त्या अवस्थेत पाहून अशोकला वाईट वाटलं. त्याचे डोळे पुसत अशोक म्हणाला, "लाल्या, असं नको म्हणूस. तूं मला खूपखूप आवडतोस. तूं तर माझा हीरो आहेस. कुणी कांही म्हणो, तूं मला मित्र म्हणून हवा आहेस. तुला जे जमतं ते मला मुळीच जमत नाहीं. तू आपल्या आईची सहीसुद्धां करतोस. वाह !!"
आईच्या किंवा वडिलांच्या नांवाने सही करण्याची कल्पना थोडी चुकीची असली तरी अशोकला त्यावेळी खूप गंमतीची वाटली. जे आपण कधी करण्याचा विचार देखील करूं शकलो नसतो ते लाल्या इतक्या सहज रीतीने करूं शकतो याचं अशोकला खूप कौतुक वाटलं. आणि अशोकच्या चेहर्‍यावरचं कौतुक पाहून लाल्याला खूप बरं वाटलं. त्या दिवशीच्या प्रसंगाने त्या दोघांना अधिकच जवळ आणलं. शाळा सुटायच्या आधी दोघांनी एकमेकांना अभेद्य मैत्रीची वचनं दिली. कुणीहि, कुठल्याहि परिस्थितीत त्यांना एकमेकांपासून दूर करूं शकणार नाही असं त्यांनी कबूल केलं. पण ---
पण मैत्रीच्या आनंदाने अशोकच्या शरिरांतील वेदना कांही कमी होऊं शकल्या नाहींत. आदल्या दिवशी मारानं दुखत असलेलं अंग आतां जास्तच ठणकायला लागलं होतं; डोकं जड झालं होतं. शाळा सुटल्यावर अशोकचं पाकीट धरून लाल्या त्याला अगदी घरापर्यंत सोडायला आला.
दुसर्‍या दिवशी शाळा सुटेपर्यंत लाल्या अशोकची वाट पहात होता, पण अशोक आलाच नाहीं. लाल्याला खूप एकटं वाटत होतं. सबंध दिवस लाल्याने जांभया देऊनच काढला. शाळा सुटल्याची घंटा वाजतांच लाल्यानं अशोकच्या घराकडे धूम ठोकली. त्यानं जोरानं दार वाजवलं अन बराच वेळ वाट पाहून दार ढकललं. अशोकला अंथरूणावर पडून राहिलेला पाहून लाल्याचे डोळे ओलावले. त्याने अशोकवर प्रश्नांचा भडिमार सुरूं केला. पण कुठल्याहि प्रश्नाचं उत्तर न देतां अशोक फक्त मंदपणे हंसत होता. लाल्यानं अशोकच्या अंगाला हात लावून पाहिला तर त्याला चटका बसला. अशोकचं अंग तापाने भणभणून निघालं होतं.
"अशोक, तुला ताप चढलाय," लाल्याच्या आवाजात चिंता होती. अशोक लाल्याचा हात हातांत धरून परत हंसला. आपण चिंतेनं व्याकूळ झालेलो असतांना सुद्धां अशोकला हंसतांना पाहून लाल्या सॉलीड वैतागला, व त्याने अशोकला फटकारलं, "साल्या, मी काळजीने मरतोय व तूं बिनधास्त हंसतोयस? लाज नाहीं वाटत तुला?"
लाल्याच्या मागे पाहून अशोक घाबरून एकदम उदगारला, "बाबा!"
लाल्यानं अचानक मागे वळून दारांत उभ्या असलेल्या अशोकच्या बाबांकडे शेक-हॅण्ड करायला हात पुढे केला व हंसायला तोंड उघडलं. त्याचे ते किडके दांत, मळकट कपडे अन त्याचा एकूण अवतार पाहून त्यांना किळस आली. त्यांनी वैतागून त्याचा हात दूर फटकारला व पुढे होऊन अशोकवर ओरडायला सुरवात केली. त्यांचा तो अवतार पाहून लाल्याने मात्र मागच्या मागे पलायन केलं.
"कोण होतं ते ध्यान?"
अशोकनं अगदी दबल्या आवाजांत उत्तर दिलं, "लाल्या, माझा जिगरी दोस्त. रोज मी तुम्हांला ज्याच्याबद्दल सांगायचा प्रयत्न करत असतो ना, तोच माझा दोस्त."
अशोकच्या अंगात ताप आहे हे विसरून त्याच्या बाबांनी अशोकच्या मुस्काटीत दिली व ते पुन्हां ओरडले, "पुन्हां ते कार्टं इथं दिसलं तर तुझी खैर नाहीं. चामडी उतरवीन मी तुझी, समजलं? झोपडपट्टीतल्या त्या कुत्र्याकडे तूं मैत्री केलेली मला मुळीच खपणार नाहीं. सांगून ठेवतो. त्याची मैत्री सोड, समजलास?"
आपल्या बाबांनी आपल्या अंगात ताप असून देखील आपल्याला मुस्काटीत मारली याहीपेक्षां त्यांनी आपल्याला लाल्याची मैत्री सोडायला सांगितली याचं दु:ख अशोकला अधिक वाटलं. ते दु:ख सहन न होऊन त्यानं मुसमुसत उशींत तोंड लपवलं.
नंतरचे दोन दिवस लाल्याने अशोकची वाट पहातच घालवले. तिसर्‍या दिवशीं अशोक शाळेत आला तो उतरलेल्या तोंडाने.
"अशोक, मी गेल्यावर त्या दिवशी काय झालं ते मला सांग," लाल्याने विचारलं.
"लाल्या, बाबांनी मला तुझी मैत्री सोडायला सांगितलंय. ते म्हणतात की तूं वाईट आहेस," अशोक हळूंच म्हणाला.
आपले अश्रू आपल्या मित्राला दिसूं नयेत म्हणून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करीत लाल्या म्हणाला, "खरं आहे, अशोक. मी खूप्पखूप्प वाईट आहे. मी स्वत:च म्हणालो होतो तुला."
लाल्याचे भिजलेले हात आपल्या हातांत घेत अशोक उत्तरला, " साफ खोटं आहे. तूं खोटं बोलतोयस. बाबा खोटं बोलताहेत. तू वाईट नाहींस ... बाबा वाईट आहेत. मी यापुढे त्यांना कांहीच सांगणार नाहीं. तू वाईट असलास तर मला सुद्धां वाईट व्हायचंय. मी सुद्धां खूपखूप वाईट होणार, पण कांहीं झालं तरी तुझी दोस्ती सोडणार नाहीं."
अशोकच्या वडिल्यांच्या मर्जीला न जुमानतां, शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अशोक व लाल्याची दोस्ती वाढतच चालली. वर्गांत आणि वर्गाबाहेर त्यांची बोलणी चालतच राहिली. पण फरक एवढाच होता की आतां त्यांना कशाचंच भय उरलं नव्हतं. शिक्षकांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या व प्रगति-पुस्तकं आई-वडिलांपर्यंत कधी पोंचतच नव्हती. आईच्या नांवाने सही करण्याची कला लाल्याकडे होतीच; वडिलांच्या नांवाने सही करायची कला लाल्याच्या मदतीने आतां अशोकने हस्तगत केली.
एके दिवशी अचानक लाल्या म्हणाला, "ए अशोक, माझ्या घरीं येणार? मी तुझ्या घरी आलोय, पण तूं कधींच नाहीं आलास." हात उडवीत अशोक म्हणाला, "आलो असतो, यार. पण या दिवसांत बाबा ऑफिसमधून लवकर घरी येतात. आणि त्यांची परवानगी विचारली तर ..."
"तर ते नक्कीच नाही म्हणणार, बरोबर? माहीत आहे मला. पण वेड्या, सगळ्या गोष्टी आपण कुठे घरी सांगायला हव्यात? आणि आपण तसं केलं तर त्यांत मजा ती काय राहिली? तूं असाच चल. आपण मधल्या सुटीनंतर दांडी मारून जाऊं. नाहींतरी आपण वर्गांत असलो काय की बाहेर असलॊ काय, कुणाला काय फरक पडतोय? मधल्या सुटीनंतर गेलो तर निदान तूं वेळेवर घरीं पोंचशील ना."
हळूंहळूं अशोक बर्‍या-वाईटांतील फरक विसरत चालला होता. त्यानं आनंदानं मान डोलावली व मधल्या सुटीची घंटा वाजताच दोघे दोस्त उड्या मारीत बाहेर पडले. चालतांचालतां त्यांना रस्त्यावर एक चित्रपटगृह दिसलं. लाल्या अशोकला आंत खेंचून घेऊन गेला. त्याला थांबवायचा तोकडा प्रयत्न करीत अशोक म्हणाला, "लाल्या, तुझ्या घरी जातोय ना आपण? तुझं घर इथं आहे?"
डोळे मिचकावून लाल्या म्हणाला, "ए, भंकस करतोस काय माझी? मी इथं रहातो काय? इथं अमिताभ बच्चन, संजय दत्त, अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि शाहरुख खान सारखे नट रहातात. पण जास्तीत जास्त एका आठवड्यासाठी. माझ्या घरी केव्हांहि जातां येईल. आज शाहरुख खानचा इथं शेवटचा दिवस आहे. म्हणजे या पिक्चरचा लास्ट डे आहे. सुप्पर पिक्चर आहे म्हणे. बघूं तरी काय भानगड आहे ती. हवंतर उद्यां माझ्या घरी जाऊं. मग तर खुष?"
"पण माझ्याकडे पैसे ...", अशोक बोलतांबोलतांच थांबला.
"बास्स काय, बॉस्स? मी विचारले तुला पैसे? तुझ्या या जिगरी दोस्ताकडे आहेत पैसे. फिकर नॉट, यार," असं म्हणत लाल्यानं दोन तिकीटं काढली व ते आंत जाऊन बसले.
अशोकला पिक्चर खरोखरच खूप मस्त वाटला. सिनेमाच्या पडद्यावर करामती करून खलनायकांचा नायनाट करणार्‍या त्या धाँसू हीरोच्या जागी अशोक लाल्यालाच पहात होता. आपल्या जिगरी दोस्ताचं त्याला सॉलीड कौतुक वाटलं आणि अभिमानानं त्याची छाती उंचावली. बाहेर आल्यावर लाल्याने त्याला परत एकदां आठवण करून दिली, "लक्षांत ठेव हं. शाळेत वार्षिक समारंभाची तयारी चाललीय. आपल्याला सुद्धां त्यांत असंच बिनधस्त ऍक्टींग करायचं आहे."
"साल्या ... सॉरी, मेरा मतलब है, लाल्या, मला शिकवूं नकोस. घरी काय सांगायचं ते मला चांगलंच माहीत आहे. गॅदरींगची तयारी चाललीय म्हणून उशीर झाला. करेक्ट?" अशोक हंसत म्हणाला.
"आखिर साला चेला किसका है?" लाल्यानं हंसत म्हटलं.
दुसर्‍या दिवशी अशोक लाल्याबरोबर त्याच्या आईला भेटायला म्हणून त्याच्या घरी गेला. घर? लाल्या ज्या जागी रहात होता त्या जागेला "घर" म्हणतां येईल की नाहीं याची अशोकला शंका वाटली. खुराडं होतं तें, घर नव्हें. त्याच्या आसपास रहाणार्‍या लोकांना पाहून अशोकला भीति वाटली. त्यांचे ते मळकट, खुनशी चेहरे --- त्यांच्या तोंडांतून क्षणॊक्षणी बाहेर पडणार्‍या त्या शिव्या --- त्यांची रानटी भाषा --- त्यांची प्रत्येक हालचाल --- त्यांच्याशी संबधित असलेल्या प्रत्येक वस्तूचा अशोकला तिटकारा आला. आपला जिगरी दोस्त लाल्या या ... या गटारांत कसलं जीवन जगतोय, असा प्रश्न अशोकला सतावूं लागला. पण कसेही असले तरी ते लाल्याचे ’लोक’ होते.
लाल्याच्या जीवनाविषयी अशोकला जितकी जास्त माहिती मिळत गेली तितकाच अशोकच्या मनांत लाल्याबद्दल जिव्हाळा व आपुलकी वाढत गेली.
"लाल्या, मी माझ्या आधीच्या शाळेत वार्षिक सम्मेलनांत नेहमी कामं करायचो. मला या शाळेत देखील भाग घ्यायचाय," एकदां अशोकनं लाल्याला म्हटलं.
"म्याड आहेस की काय तूं?" लाल्या म्हणाला.
"कां?"
स्टेजवर येणं सोड, आपल्याला प्रेक्षक म्हणून सुद्धां आत घेतील की नाहीं याची शंका आहे मला."
"पण कां?" अशोकनं पुन्हां विचारलं.
"तुला इतकी खाज असेल ना तर तूंच विचारून बघ."
अशोक तस्साच काळे गुरुजींकडे गेला. "सर, मलासुद्धां नाटकांत भाग घ्यायचाय. मीसुद्धां चांगला अभिनय करूं शकतो."
"राजाचे नवीन कपडे" या नाटुकल्याची तालीम थांबवून काळे सरांनी अशोककडे पाहिलं. त्यांच्या नजरेतील तिरस्कार पाहून अशोक घाबरला, पण हिम्मत करून तो परत म्हणाला, "सर, मला सुद्धां नाटकांत काम करायचं आहे. अगदी छोटी भूमिका असली तरी चालेल."
"तुम्हीं चालू ठेवा रे तालीम," असं ओरडून काळे गुरुजी अशोकला एका कोपर्‍यात घेऊन गेले व म्हणाले, "महाराज, काय करूं? छोटी कशाला, तुम्हांला मी राजाची भूमिका सुद्धां दिली असती. पण तुम्हीं आहात त्या बदमाष लाल्याचे गुलाम. आणि त्या झोपडपट्टीतील त्या किड्याकडे कसलाही संबंध असलेल्या कुणालाहि कुठल्याहि प्रकारे इन्व्हॉल्व करायचं नाहीं असा हुकूम आहे शेंडे सरांचा. साला, सरकारी दबाव आहे म्हणून, नाहींतर तुम्हीं दोघेही केव्हांचेच शाळेबाहेर झाला असतांत. चालते व्हा इथून."
अशोकला धक्का देऊन दूर करीत काळे गुरुजी इतर मुलांकडे वळून किंचाळले, "साला, तुम्हीं लोकं कसला तमाशा बघताय? तुम्हांला नाटक करायचंय की त्या दोघा गुंडांच्या वाटेला जायचंय?"
अशोक हिरमुसला होऊन हॉलबाहेर पडला. दाराबाहेरच रेंगाळणार्‍या लाल्यानं पुढं येत विचारलं, "काय अशोक कुमार, झालं समाधान?" त्या क्षणाला अशोकनं उत्तर दिलं नाहीं पण कसल्याशा विचारानं त्याला हसूं फुटलं.
अखेरीस वार्षिक समारंभाचा दिवस उजाडला. सबंध हॉल सुंदरपैकी सजवला गेला होता. कार्यक्रमांत भाग घेतलेली मुलं स्टेजच्या मागच्या बाजूला गोंधळ घालत होती. हळूंहळूं पाहुणे यायला लागले व हॉल भरूं लागला. या सगळ्या गोंधळात कांही पाकीटं हातांत घेऊन इथंतिथं फिरणार्‍या लाल्या व अशोककडे अगदी कुणाचंही लक्ष गेलं नाहीं.
हॉल भरल्यावर लवकरच कार्यक्रम सुरूं झाला. आधीं नकला, नाच-गाणी, भाषणं वगैरे किरकोळ कार्यक्रम झाले, अन मग घोषणा झाली, "आतां माध्यमिक विभागाची मुलं आपल्या मनोरंजनासाठी सादर करीत आहेत आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण, रंगीत नाटिका, "राजाला हवेत नवीन कपडे". तर माध्यमिक विभागाची मुलं सादर करीत आहेत एक मजेदार नाटिका, "राजाला हवेत नवीन कपडे".
अन लगेच पडदा उघडून नाटक सुरूं झालं. सारखे नवीन कपडे विकत घेण्याची हांव असलेल्या राजाची गोष्ट सगळ्यांनाच माहीत होती, पण त्याचं नाट्यरूपांतर पहाण्याची सगळ्यांनाच हौस होती. अन तसंच झालं. नाटिकेनं सगळ्यांनाच मोहून घेतलं. आणि मग एक मजेदार गोष्ट झाली. राजा झालेल्या शेंडेनं आधीं हळूंहळूं व नंतर जोरजोराने अंग खाजवायला सुरवात केली. कहाणीत नसलेला हा भाग पाहून कांहीं प्रेक्षकांनी गालांतल्या गालांत हंसायला सुरवात केली. प्रेक्षकांकडे पाहून पटकन शेंडेने स्वत:ला सांवरलं, पण थोडाच वेळ. सहन न होऊन त्यानं आपलं अंग जोरजोराने खाजवायला सुरवात केली. आतां स्टेजवर असलेल्या पात्रांना देखील हंसूं आवरेना. थोड्याच वेळांत शेंडे आपल्या अंगावरचे राजसी, रंगीबेरंगी कपडे एकेक करून बाजूला फेकीत होता व दुसरीकडे सगळं अंग जोरजोरानं खाजवीत होता. रंगाचा बेरंग व्हायला उशीर नाहीं लागला. लवकरच शेंडेने जोराने रडत ओरडायला सुरवात केली, "मला राजाचे नवीन कपडे मुळीच नकोत, पण माझे हे जुने कपडे आधी कुणीतरी काढा. मला सहन होत नाहीं."
ओरडत-ओरडत शेंडे अस्ताव्यस्त इथंतिथं धांवायला लागला. प्रेक्षागृहांत व स्टेजवर गोंधळ वाढतच चालला अन अचानक सगळीकडे अंधार पसरला. हॉलमधील सर्व दिवे गेले होते. घाबरून लोकांनी ओरडायला सुरवात केली, अन अचानक फटाक्यांचा आवाज यायला सुरवात झाली. सगळं शांत होईपर्यंत बराच उशीर झाला होता. या सगळ्या गोंधळांत लाल्या व अशोक हळूंच बाहेर सटकले.
थोड्याच वेळांत दोघेही लाल्याच्या घरी पोंचले. घरी पोंचल्यावर खूष होऊन लाल्यानं खिशांतून एक विडी काढून आपल्या ओठांमध्ये ठेवली.
"लाल्या, हे काय करतोयस?" अशोकने दबल्या स्वरात विचारलं.
लाल्या हंसला, "साला, भंकस करतोस काय माझी? दिसत नाहीं, मी विडी ओढतोय तें?"
अशोक कांहीच बोलला नाहीं. अचानक आपल्या तोंडातून विडी बाहेर काढीत लाल्या अशोकला म्हणाला, "ए, ओढतोस काय जराशी? मी मारली आईच्या कपाटांतून."
काय बोलावं हे न कळून अशोक गप्प बसला. हा अजब अनुभव नवीनच होता, पण ... अशोकची शांतता ही संमतिसूचक समजून लाल्यानं आपल्या तोंडातली उष्टी बिडी अशोकच्या ओठांमध्ये खुपसली व तो म्हणाला, "काय धम्माल आली ना शाळेत? सगळीकडे फटाक्यांचा धूरच धूर झाला होता बघ. अरे, बघतोयस काय असा येड्यासारखा? लेका, आधीं धूर आंत ओढून घे अन मग हलकेच बाहेर सोड. हां, अस्साच. शाबास बच्चा."
अशोकनं लाल्यानं सांगितल्यानुसार करायचा प्रयत्न केला, पण सहन न होऊन त्याला जोराचा ठसका बसला व खोकल्याची जोराची उबळ आली.
"साला, बच्चा आहेस अजून. पण होईल संवय हळूंहळूं." हंसत-हंसतच लाल्याने अशोकच्या हातांतली विडी आपल्या ओठांत धरली व झुरके मारायला सुरवात केली. तो अगदी रंगात आलेला असतांनाच अचानक बंद दारावर धक्का बसला व दार उघडलं. लाल्यानं झटक्यांत तोंडातली विडी काढून मागे फेकली. दारांत लाल्याची आई उभी होती. डोळ्यांतून आग ओकीत तिनं लाल्याकडे पाहिलं व त्याला विचारलं, "भडव्या, इडी वडत व्हतास नाय का?"
शाळेत सगळ्या शिक्षकांना उलट उत्तर देण्यासाठी वळवळणारी लाल्याची जीभ बावचळली व तो पुटपुटला, "न्हाय ग माये, मी नव्हतो वढीत."
सहजपणे वाकून तिनं लाल्यानं मागे फेकलेलं थोटूक उचललं व त्याच्यापुढे नाचवीत ती लाल्यावर गरजली, "मंग ह्ये थोटूक कंचा रे? तुझा मेलेला बा आला व्हता व्हय स्वर्गातनं हे वढायला? आरं गाढवा, तुझी आय हाय मी. मला बनवतुयास? आरं, म्यां माझ्या इडीचा वास वळखीत नाय की काय?"
एवढं बोलून तिनं लाल्याला दोन्हीं हातांनी बदडायला सुरवात केली. खूप मारल्यावर हुंदके देत ती अशोककडे वळली व म्हणाली, "आवं सायब, तुम्हीं तरी सांगा यास्नी. म्यां सांगितलेलं कायबी आयकत नाय बगा हें पोरगं. आतां तुमच्या शाळेकडनंच येतंय म्यां. सगळे बोंबलतायत येच्या नांवानं." तिच्या आवाजांत कारुण्य व काठिण्य या दोन्हींचा केविलवाणा संगम होता. या देखाव्याने बावचळून घाबरलेला अशोक धांवत बाहेर पडला.
घरी आल्यावर अशोक विचार करूं लागला, जिला लाल्या प्रेमळ म्हणतो त्या आईने त्याला कां मारावं? त्याची चूक तरी काय होती? विडी पिणं वाईट जर होतं तर ती स्वत: विड्या कां वळायची? शाळेंत वार्षिक समारंभाच्या वेळीं झालेला गोंधळ काय त्याच्या आईला कळला होता? आपण स्वत: वाईट वागलो होतों कां? आणि यापुढे काय? सगळे प्रश्न त्याला सतावीत राहिले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला कुणाकडून तरी हवी होतीं. पण कुणाला विचारणार?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लाल्याकडून घ्यायच्या निश्चयाने अशोक दुसर्‍या दिवशी शाळेंत गेला. लाल्याच्या हातांत त्याचं पाकीट नव्हतं. पहिल्या तासाची घंटा व्हायच्या आधीच लाल्याने अशोकला बातमी दिली, "अशोक, मी यापुढे शाळेत येणार नाहीं. झाल्या प्रकाराबद्दल हेडमास्तरांनी आईला शाळेत बोलावलं होतं. आई सरांना भेटायला आली होती. मी माझा गुन्हा कबूल केलाय. सरांनी माझं नांव काढलंय शाळेतून. यापुढे मी शाळेत येणार नाहीं... कधींच नाहीं."
ही भयंकर बातमी ऐकून अशोकचं आधीच अस्वस्थ झालेलं मन जास्तच चळलं. त्याच्या डोळ्यांपुढे अंधारसा पसरला. लाल्या शाळेत येणार नाहीं? वार्षिक समारंभात झालेल्या प्रकाराबद्दल फक्त लाल्याचं नांव काढलं होतं? त्या सगळ्या प्रकारात आपला जास्त हात असूनदेखील शिक्षा फक्त लाल्याला मिळावी? हे योग्य नव्हतं. "पण लाल्या..."
लाल्यानं अशोकचं तोंड दाबून धरलं व तो म्हणाला, "अशोक, एक शब्दही बोलूं नकोस. मी अगदी बाद झालोय, पण तूं वाईट नाहींस. मी तुला बिघडवलं होतं. आतां मी शाळेंत येणार नाहीं, तू परत चांगला हो. तुला माझी शप्पथ."
अशोक रडायला लागला होता. लाल्याने आपला गुन्हा स्वत:च्या अंगावर घेतला होता. आतां त्याच्याशिवाय आपलं कसं होणार? कॊण बोलणार आपल्याशी? कोण करणार आपल्याशी दोस्ती? त्याला रडूं आवरेना. त्याला त्या अवस्थेत बघून नेहमी त्याचं सांत्वन करणारा लाल्या चुपचाप वर्गाबाहेर पडला. मुसमुसून रडणार्‍या अशोकचा पुढे झालेला हात मागे सारून लाल्या बाहेर पडला --- अशोकचं सांत्वन करायची इच्छा असूनदेखील त्याच्याकडे न बघतां लाल्या वर्गाबाहेर जाऊन उभा राहिला.
राणे बाई वर्गांत शिरल्या व आपल्या खुर्चीवर जाऊन बसल्या. हजेरी घेण्याकरितां त्यांनी आपलं रजिस्टर उघडलं. "अशोक मोघे" म्हणून पहिलं नांव घेण्याआधीच कसल्याशा निर्धाराने अशोक राणे बाईंजवळ येऊन उभा राहिला... अगदी कांहींच न बोलतां.
राणे बाई त्याच्यावर खेंकसल्या, "आतां काय हवंय आपल्याला?"
अशोक मान खाली घालून कांहीं वेळ स्वस्थ उभा होता.
"मोघ्या, मी तुला विचारतेय, काय हवंय तुला?"
हळूंच मान वर करीत अशोक पुटपुटला, "बाई, मला परत चांगलं बनायचंय. इतर मुलांशी बोलायचंय. मी आतांपर्यंत खूप वाईट वागलो याचं मला खूपखूप वाईट वाटतंय. पण मला परत चांगलं बनायचंय ... मला एक चान्स द्या ... प्लीज़..." अशोक मुसमुसत होता.
कांहीं वेळ राणे बाई आश्चर्याने अशोककडे पहात राहिल्या. मग त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, त्यांनी एकदम अशोकला जवळ ओढलं व त्याच्या काळेभोर केसांतून प्रेमाने हात फिरवायला सुरवात केली. हे अजीब दृश्य पाहून कांही वेळ वर्गांत अजीब शांतता पसरली. मग एका मुलाने हळूंच टाळ्या मारायला सुरवात केली. थोड्याच वेळांत सगळा वर्ग टाळ्या मारायला लागला. वर्गांतलं ते दृश्य पाहून वर्गाबाहेर उभ्या असलेल्या लाल्याच्या मोठाल्या डोळ्यांतून समाधानाचे दोन अश्रू टपकले. त्याने आपली शर्टाची बाही वर केली, पण डोळे पुसायला नव्हें. त्या बाहीनं त्याने आपलं वहाणारं नाक हळूंच साफ केलं. त्याच्या डोळ्यांतून अश्रू टपकत राहिले अन त्याला वाटलं की त्याच्या अश्रूंनीं त्याचं सारं पाप ... त्याच्या सार्‍या चुका धुऊन निघाल्या.

* * * * * समाप्त * * * * *

लक्ष्मीनारायण हटंगडी
EC51/B104, Sai Suman CHS,
Evershine City, Vasai (E)
PIN 401208
suneelhattangadi@gmail.com

Thursday, June 24, 2010

"सोन्याची बाहुली"

खास लहान मोठ्यांकरिता, व मोठ्या लहानांकरिता
एक रहस्यपूर्ण तीन अंकी नाटक


*** अंक पहिला ***
( एका छोट्या गावातील छोट्या घराची एक छोटीशी खोली. एका कोपर्‍यात एक रायटींग टेबल, त्यावर बरीचशी पुस्तकें. दुसर्‍या कोपर्‍यात छोटसं कपाट. मध्यभागी काही खुर्च्या, समोर एक गोल टेबल, व त्यावर एक फोन. पडदा वर जातो तेव्हां तीन मुलं -- अभय, त्याची बहीण रेखा, व अजय -- अस्वस्थपणे फेर्‍या मारीत असतात. यांचीं वयं अकरा ते तेरा वर्षांपर्यंत. काही वेळ फेर्‍या मारल्यावर ... )
रेखा : ए दादिटल्या, मी दमले.
अभय : हूं, म्हणे दमले. दमलीस तर गेलीस उडत.
अजय : तुम्हीं मुली म्हणजे ना, नेहमी अशाच. जरा वेळ फेर्‍या मारल्या की, "मी दमलें".
अभय : ते काही नाही. आम्ही फेर्‍या मारणार म्हणजे मारणार. काय रे अजय?
अजय : बरोबर आहे, आम्ही फेर्‍या मारणार म्हणजे मारणार. तू हवीतर आत जा अन काय हवं ते कर.
रेखा : अरे पण फेर्‍या तरी किती वेळ मारायच्या? अर्धा तासपासून आपल्या नुसत्या फेर्‍याच चालू आहेत. इथून तिथे, तिथून इथे.
अभय : शहाणीच आहेस तू अगदी. म्हणे अर्धा तास? अर्धा तास काहीच नाही. तुला काहीच माहीत नाही. विचार करायचा असला म्हणजे मोठमॊठे डिटेक्टिव अशाच फेर्‍या मारीत असतात. फक्त अर्धा तासच नव्हे तर दीडदोन तास. अश्या --- (हनुवटी खाजवीत एकदम थाटाने चालून दाखवतो.) कळलं?
रेखा : कळलं बरं, कळलं. मी सुद्धा वाचलीयत म्हटलं तसलीं पुस्तकं बाबांच्या कपाटात.
अजय : फक्त पुस्तकं वाचून काहीच उपयोग नसतो, रेखाबाई. त्याला अक्कल लागते अक्कल.
अभय : बरोब्बर बोललास. दे टाळी. अर्ध्या तासात हिचे पाय दुखायला लागले. आपलं काम एवढं सोपं थोडंच आहे की मारल्या चार फेर्‍या, व आले विचार डोक्यात? तू जा आत व पुस्तकं पालथी घाल. चलरे अजय, आपण मारूं फेर्‍या.
( अभय व अजय दोघे काहीवेळ फेर्‍या मारतात. मग --- )
अजय : अभय, आता मात्र माझेदेखील पाय दुखायला लागले. थोडा वेळ आपण स्वस्थ बसून विचार करूंया.
रेखा : सकाळपासून आपला विचारच चाललाय. नो ऍक्शन!
अजय : खरं सांगायचं तर तुमचं गांवच मुळी भिकार आहे. रेखा सांगते तसं अगदी नो ऍक्शन. मुळीच मजा नाही येत. तरी मी बाबांना सांगत होतो, मला नाहीं जायचं साहसपुरला. म्हणे साहसपूर! नांवच फक्त साहसपूर, पण इथं तर काहीच घडत नाही. बस, दिवसभर झोपायचं ---
अभय : झोपून कंटाळा आला की गप्पा मारायच्या ---
रेखा : गप्पा मारून कंटाळा आला की खात सुटायचं ---
अजय : खाऊन कंटाळा आला की पुन्हा झोप ---
अभय : मग पुन्हा गप्पा.
रेखा : मग पुन्हा खाणं.
अजय : पुन्हा झोप.
अभय : पुन्हा बडबड.
रेखा : पुन्हा खाणं.
अजय : मग पुन्हा ---
रेखा : आता पुरे. तेच-तेच काय आपण पुन्हापुन्हा बडबडतोय? आपण खाऊया का काहीतरी?
अभय : (जोराने हसून) अजय, दे टाळी.
अजय : (टाळी देऊन) टाळी कशासाठी?
अभय : अरे, या मुलींचं अस्संच असतं बघ. सदानकदा यांचं तोंड आपलं चालू. जेव्हा या खात नसतात तेव्हा बडबडत असतात, अन जेव्हा बडबडत नसतात तेव्हा खात असतात.
अजय : हे जागेपणीं झालं. जेव्हा या झोपलेल्या असतात तेव्हा देखील यांचं तोंड चालूच, घोरणं. (घोरून दाखवतो.)
रेखा : (रागाने) माझी एवढी चेष्टा करायची गरज नाही हं. मी जातेच कशी इथून. माझी गरज लागेल तेव्हा या मला मस्का लावायला.
अभय : रेखाबाई, खुश्शाल जा. आम्हाला तुझी गरजच लागणार नाही मुळी. उलट गेल्याबद्दल आभार मानूं तुझे.
( रेखा रागावून कोपर्‍यातल्या टेबलावर जाऊन बसते. )
अजय : अभय, मला एक कळत नाही, तुम्ही पोरं या रटाळ गावात दिवस तरी कसे काढता? मला तर अगदी दोनच दिवसांत सॉलीड कंटाळा यायला लागला.
रेखा : ए, मला एक मस्त आयडिया सुचलीय.
अभय : आता कां मधेमधे बोलतेस? आम्ही मस्का लावायला आलो नव्हतो कांही.
अजय : अभय, तू गप्प रे. रेखा, तू बिनधास्त बोल. कसली आयडिया?
रेखा : (अभयला चिडवून दाखवीत) आज दादाचा मित्र विकास व त्याची बहीण वनिता येणार आहेत आपल्याकडे.
अजय : मग?
रेखा : मग काय? मज्जाच मज्जा! येताना तो ढीगभर पुस्तकं घेऊन येईल. मग बघा दिवस कसे भराभर जातात ते.
अभय : पहिल्यांदाच शहाणपणाचं बोललीस. आज विकास येणार आहे, म्हणजे धम्माल येईल.
अजय : ती कशी?
अभय : तुला माहित नाही. जिथं विकास असतो ना, तिथं हज्जार भानगडी असतात. खूप धमाल येते, काही विचारू नकोस. कधी या हरवलेल्या वस्तूंचा तपास लाव, तर कधी त्याचा पाठलाग कर.
अजय : फॅण्टॅस्टिक! मग तर धमालच येईल. कधी येणार तुझा तो विकास?
( इतक्यात दारात एक पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा, विकास, व एक सुमारे दहा वर्षांची मुलगी, वनिता, येऊन उभे रहातात. विकासच्या हातात एक मोठी सूटकेस व वनिताच्या हातात एक छोटी बॅग असते. फक्त रेखा त्यांना पहाते व --- )
रेखा : दादा ...
( विकास दारातून तिला गप्प रहाण्याची खूण करतो. )
रेखा : दादा, सांग ना, कधी येणार विकास?
अजय : हो अभय, सांग ना, कधी येणार हा तुझा विकास?
विकास : (दारातून आंत येत) आजच येणार आहे हा विकास, आत्ताच येणार आहे. हा बघ, आला देखील.
( अभय आनंदाने जाऊन विकासला मिठी मारतो. अजय आश्चर्याने त्यांच्याकडे बघत रहातो. वनिता धावत जाऊन रेखाला बिलगते. )
अभय : अजय, हाच तो प्रसिद्ध विकास, ही त्याची बहीण वनिता.
रेखा : आणि विकास, हा माझा मावसभाऊ, अजय.
अभय : फक्त तुझा नाही, आमचा मावसभाऊ. दोनच दिवसांपूर्वी मुंबईहून आलाय आपली सुटी घालवण्याकरिता.
विकास : हॅल्लो अजय, कसा आहेस?
अभय : बरा दिसतोय ना? म्हणजे बरा आहे. तुमचं हाय-हॅल्लॊ नंतर. आधी सांग, तू आपल्याबरोबर कायकाय भानगडी घेऊन आलायस? फटाफट सांग. कुठे कसली चोरी झाली? कुणी कुणाचा खून केला? आज आपल्याला कुणाचा पाठलाग करायचा आहे?
विकास : अरे हो, जरा हळू चालव आपल्या प्रश्नांची गाडी.
अभय : ते शक्य नाही. आज आमची गाडी एकदम फास्ट धावणार आहे. Not stopping at any stations. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. अगदी नॉन-स्टॉप. नाहीतर मी तुझा खून करेन.
विकास : (हसत) अजय, बाबारे तुझ्या या भावाला सांग, तेवढं एक करू नकोस. कारण मी मेलो तर माझी ही बॅग कुणालाच उघडता येणार नाही. आणि बॅग नाही उघडली तर तुम्हाला पुस्तकंबिस्तकं काही मिळणार नाहीत. मग बसा बोंबलत.
अजय : अभय, त्या बिचार्‍याला थोडा दम तरी घेऊं दे.
अभय : काही बिचाराविचारा नाही हं. आणूनआणून शेवटी पुस्तकंच आणलीस ना? त्यापेक्षा एखादी मस्त भानगड घेऊन आला असतास तर काही बिघडलं असतं तुझं?
विकास : सॉरी दोस्त, गुन्हा कबूल. या खेपेला येताना मी कसलीच भानगड नाही आणली. पण काळजी नको. मी आहे म्हणजे भानगड फार दूर नसेल..
रेखा : ए विकासदादा, या अभयच्या भानगडी गेल्या खड्ड्यात. तू मला आपली पुस्तकं दे बघू..
वनिता : दादा, तुझ्या बॅगेतला माझा टॉवेल दे. खूप दमलेय मी. मस्त थंड पाण्याने आंघोळ करायची आहे मला.
अभय : मग आधी तुम्ही दोन्ही मुली आत कटा बघू. आत जाऊन आंघोळ करा नाहीतर काय हवा तो धुमाकूळ घाला.
विकास : मला आधी बसून माझी बॅग तर उघडूं द्या. मग मी तुला तुझा टॉवेल, रेखाला तिची पुस्तकं व जमल्यास अभयला चिक्कार भानगडी देईन.
अजय : आणि मला काहीच नाही?
अभय : वेडाच आहेस. विकासनं आणलेल्या भानगडी आपण तिघांनी मिळून सोडवायच्या.
रेखा : अन आम्ही नाही वाटतं?
अजय : मुलींची कटकट नकोय आम्हांला.
अभय : आता कसं शहाण्यासारखं बोललास.
वनिता : दादा, असला कसला रे हा आगाऊ मुलगा?
विकास : आधी सगळेजण गप्प बसा पाहू. मी माझी बॅग उघडतो आधी.
( विकास मधल्या खुर्चीवर बसून आपली बॅग उघडायला लागतो. सर्वजण त्याच्याभोवती घोळका करून उभे रहातात. बॅग उघडायला थोडा त्रास होतो म्हणून विकास आपल्या खिशातील स्क्रूड्रायवर काढून बॅग उघडतो. बॅग उघडताच त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलायला लागतात. तो वैतागलेला दिसतो. हळूंहळूं बॅगेतील एकेक कपडे काढून तो खाली फेकायला लगतो. कपडे बरेच मोठे असतात. )
अभय : काय विकासराव, हे काय? आपल्या बाबांची तर बॅग घेऊन आला नाहीस ना?
( विकास उत्तर देत नाही. तो हळूंहळूं सगळी बॅग रिकामी करून त्यातले कपडे बाहेर फेकतो. तेवढ्यात रेखा बॅगेत पाहून जोरजोराने हंसायला लागते. )
अजय : रेखा, हंसायला काय झालं?
रेखा : तूच येऊन बघ.
( अभय व अजय जवळ येऊन बॅगेत पहातात व हंसायला लागतात. फक्त विकास तेवढा गंभीर व गप्प आहे. )
अभय : विकास, तू बाहुल्यांबरोबर कधीपासून खेळायला सुरवात केलीस?
रेखा : अन तुम्ही मुलं मात्र आम्हा मुलींना चिडवायला नेहमी तयार असता.
वनिता : दादा, तू बाबांचे कपडे कशाला आणलेस? आणि ही बाहुली कुणाची आणलीस?
विकास : (चिडून) तू गप्प बस बघूं. माझं डोकं नको खाऊस.
वनिता : चूक तुझीच, मग उगीच माझ्यावर कशाला चिडतोस?
विकास : (थोडा शांत होत) चूक नाही, काहीतरी भानगड झालीय खास.
अभय : (आनंदाने ओरडत) हुर्रे! भानगड? वेरी गुड! तरी मला वाटलंच, विकास भानगडींशिवाय येणं अशक्यच.
विकास : म्हणजे तुला वाटतं तशी भानगड नाही काही. तशी साधीच गोष्ट आहे.
अभय : हॅत तिच्या!
( विकास वैतागून ओरडतो. )
वनिता : काय झालं दादा?
विकास : ही बॅग माझी नाही.
सर्वजण : (ओरडून) काय?
विकास : त्यात ओरडण्यासारखं काही नाही. ही बॅग माझी नव्हे.
रेखा : मग कुणाची?
विकास : तेच तर शोधून काढायचं आहे आपल्याला.
अभय : (आनंदाने ओरडून) लगेच सुरवात करूया शोधायला.
अजय : अब आयेगा मज़ा.
वनिता : ए दादा, मला माहीत आहे बॅग कुणाची असेल ते.
विकास : कुणाची?
वनिता : त्या माणसाची.
( अभय जोरजोराने हसायला लागतो. )
वनिता : हसायला काय झालं?
अभय : बॅग माणसांचीच असते. कुत्र्यामांजरांची नाही. एवढी साधी गोष्ट सांगायला तुझ्या अकलेची गरज नव्हती.
अजय : पण मला एक प्रश्न पडलाय.
विकास : काय?
अजय : बॅग मोठ्या माणसाची असती तर ती बाहुली कुणाची? मोठा माणूस बाहुलीबरोबर नक्कीच खेळणार नाही.
वनिता : तो माणूस बाहुली आपल्या मुलीसाठी घेऊन जात असेल.
विकास : शक्य आहे. साधी गोष्ट आहे.
अभय : शक्य आहे, पण साधी गोष्ट नाही.
रेखा : एक गोष्ट नक्की आहे. विकासदादाला वाटते तेवढी साधी गोष्ट दिसत नाही ही. यात नक्कीच काहीतरी भानगड आहे.
अभय : रेखाचं म्हणणं बरोबर आहे. आणि मी आधीच म्हणालो होतो. विकास जिथं आहे तिथं भानगड असायलाच हवी.
अजय : मोठ्या माणसाच्या बॅगेत बाहुली म्हणजे नक्कीच भानगड आहे. आणि भानगड असली तर आपण इथं जन्मभर रहायला तयार आहोत. माझे बाबा नेहमी म्हणतात, मी भानगडी करण्यात नंबर वन आहे.
अभय : अजय, पण इथं तू भानगड करायची गरजच नाही मुळी. भानगड आपल्यापुढे तयार आहे, आपल्याला फक्त भानगड सोडवायची आहे.
वनिता : ए दादा, ती बाहुली मला द्याना.
( विकास वैतागून बाहुली वनिताला देतो व दूर जाऊन विचार करायला लागतो. )
रेखा : मला वाटतं की आपण या बॅगेचा मालक शोधून त्याची बॅग त्याला देऊन टाकू.
अजय : (बॅग पहात) हे बघा, या बॅगेच्या मालकाचं नांव व पत्ता.
( सगळेजण अजयभोवती गोळा होतात. )
सर्वजण : बघूं बघूं.
विकास : (बॅगेवरील नाव वाचीत) मिस्टर शामराव काळे. यावर पत्ता मुंबईचा आहे.
अभय : त्याला या गावात शोधणार तरी कुठे?
अजय : पण त्याची बॅग तर त्याला दिली पाहिजे.
वनिता : दादा, मला ही बाहुली खूप आवडली.
अभय : लोकांच्या बाहुलीशी आपल्याला मुळीच खेळायचं नाही.
अजय : आपल्याला मुळी बाहुलीशीच खेळायचं नाही, मग लोकांची असो किंवा आपली स्वत:ची.
रेखा : जरा माझं ऐका.
( सर्वांचं लक्ष रेखाकडे जाते. तिच्या हातात बाहुली आहे. )
रेखा : ही साधीसुधी बाहुली नाही.
अभय : मूर्खच आहेस अगदी. बाहुलीसारखी बाहुली आहे. म्हणे साधीसुधी बाहुली नाहीं. वेडाबाई कुठची!
रेखा : मी पुन्हां सांगते, ही बाहुली साधीसुधी नाही.
सर्वजण : (आश्चर्याने) म्हणजे?
रेखा : ही हातात धरून पहा.
( आळीपाळीने सगळेजण बाहुली हातात घेऊन तिचं निरीक्षण करतात. )
रेखा : काय आढळलं?
सर्वजण : साधीच तर बाहुली आहे.
रेखा : साफ चूक. नीट पहा. ही बाहुली इतर बाहुल्यांपेक्षा जड आहे.
सर्वजण : (ओरडून) काय?
रेखा : होय.
सर्वजण : मला बघूंदे ... मला बघूंदे.
( सगळेजण तिच्या हातातून बाहुली हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतात. त्या गडबडीत बाहुली रेखाच्या हातून निसटून दाराकडे जाऊन पडते. याच वेळी दारात एक मध्यमवयीन गृहस्थ येऊन उभा आहे, पण त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाहीं. )
सर्वजण : बाहुली कुठे गेली?
गृहस्थ : (खाली वाकून बाहुली उचलत) माझ्याकडे आहे.
( सर्वजण चमकून दाराकडे बघतात. )
वनिता : (विकासला) दादा, मी त्या माणसाला कुठंतरी पाहिलंय.
विकास : मीसुद्धा. पण कुठं?
अभय : विकास, त्याच्या हातातली बॅग पाहिलीस? अगदी तुझ्या बॅगेसारखीच आहे.
अजय : त्याच्या बॅगेसारखी नाही, विकासचीच बॅग आहे ती. विकासने आणलेल्या बॅगेत याच माणसाचे कपडे होते. आणि आपण त्याची मस्करी करीत होतो,
गृहस्थ : (हसायचा प्रयत्न करीत) मुलांनो, कसलीं खलबतं चाललीयत तिथं?
रेखा : (धैर्य एकवटून) कोण हवंय तुम्हांला?
गृहस्थ : मला सर्वच मुलांना भेटायला आवडेल, पण तुमच्यापैकी विकास जोशी कोण आहे?
विकास : (पुढे होत) मी विकास जोशी. काय काम आहे?
गृहस्थ : खूप महत्वाचं काम आहे. आज गाडीने येताना माझी बॅग तू घेऊन आलायस.
विकास : (रोखून पहात) मी? तुमची बॅग घेऊन आलो --- का तुम्हीच जाणून-बुजून बॅगांची अदलाबदल केलीत?
गृहस्थ : (चपापून) आं? छे, छे, तुझी काहीतरी चूक होतेय.
( वनिता झटकन पुढे होऊन त्याच्या हातातली बाहुली ओढून घेते. )
वनिता : माझी बाहुली... चूकून तुमच्या हातात आली.
गृहस्थ : (अजून हसायचा प्रयत्न करीत) शक्य आहे, बाळा, शक्य आहे. माझीच चूक झाली असेल. पण ती बॅग व खाली पडलेले कपडे माझेच आहेत. यात काही चूक नाही.
रेखा : पण ही बॅग तुमचीच आहे कशावरून?
गृहस्थ : कारण ती बॅग शामराव काळेच्या मालकीची आहे, व मी शामराव काळे आहे. हवंतर माझं ओळखपत्र दाखवूं शकतो मी.
विकास : (हात जोडून) नाही, त्याची गरज नाही. तेवढा विश्वास आहे आमचा. खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. तुमच्या हातातली बॅग माझी आहे.
गृहस्थ : (विकासला हातातली बॅग देत) ही घे तुझी बॅग. आणि माझी बॅग?
विकास : समोरच आहे. तुम्हीं घेऊन जाऊं शकतां.
( रेखा विकासला चिमटा काढायचा प्रयत्न करते. तो गृहस्थ वाकून खाली पडलेले कपडे बॅगेत भरायला लागतो. बॅग भरून झाल्यावर --- )
गृहस्थ : थॅंक्स. बॅग मिळाली, पण अजून एक वस्तू शिल्लक आहे.
वनिता : कोणती वस्तू?
गृहस्थ : तुझ्या हातातली ती बाहुली.
विकास : वनिता, ती बाहुली देऊन टाक त्यांना.
( एवढ्यात रेखा विकासला जोराचा चिमटा काढते. तो ओरडतो. )
रेखा : विकासदादा, ही बाहुली वनिताची आहे. मला माहीत आहे.
वनिता : मी नाही देणार माझी बाहुली कुणाला.
गृहस्थ : (आवाज थोडा कठोर) हे पहा मुलांनो, ती बाहुली माझी आहे व मला परत हवीय.
विकास : मिस्टर काळे, तुम्हीं आम्हाला धमकी देताय?
गृहस्थ : (विकासच्या पाठीवरून हात फिरवीत) धमकी नव्हे, मुला. पण ती बाहुली मला हवीय. माझ्या मुलीची बाहुली आहे ती.
( रेखा वनिताच्या हातातून बाहुली घेऊन टेबलाकडे जाते. )
रेखा : आता बघूं कोण घेतं वनिताची बाहुली ते.
( आता अभय, अजय, रेखा, व वनिता खोलीच्या एका कोपर्‍यात आहेत, तर बरोब्बर त्यांच्या समोरच्या बाजूला दाराजवळ विकास उभा आहे व त्याच्या मागे तो गृहस्थ. )
विकास : वनिता, ठीक आहे, ठेव ती बाहुली तुझ्याकडे. मिस्टर काळे, जाऊं देना. आम्ही तुम्हाला या बाहुलीची किम्मत देऊं. चालेल?
गृहस्थ : नाही चालणार. मी बाहुली घेतल्याशिवाय इथून जाऊं शकत नाही.
( आता तो गृहस्थ हलकेच आपल्या खिशातून एक पिस्तुल काढून विकासच्या पाठीवर टेकवतो. हे प्रेक्षकांना दिसत असलें तरी स्टेजवरील मुलांना दिसत नाहीं. )
गृहस्थ : विकास, तू यांच्यापेक्षा मोठा आहे, शहाणा आहेस. तू ऐकशील ना माझं? माझ्या मुलीची बाहुली ... मला परत द्यायला सांग पाहूं त्यांना.
रेखा : विकासदादा, बाहुली वनिताची आहे.
अभय : काका, तुम्ही बॅग घेऊन जाना. हिला बाहुली खूप आवडलेली आहे.
अजय : शिवाय, तुमच्या बॅगेवर पत्ता मुंबईचा आहे, म्हणजे तुमची मुलगी मुंबईलाच असेल. तिला तिथं बाहुल्यांची काय उणीव?
विकास : अभय-अजय, तुम्हीं उगीच मध्ये बोलूं नका. रेखा, ती बाहुली मला दे. यांच्या मुलीची आहे.
( सगळेजण आपापसात कुजबुजायला लागतात, "या विकासला काडीची अक्कल नाही". )
विकास : मिस्टर काळे, तुम्हाला बाहुली हवी ना? तुमची बाहुली आहे, तुम्हाला मिळेल. त्यासाठी एवढं भांडण कशाला? मी आणून देतो तुम्हाला.
( विकास लगेच पुढे चालायला लागतो. गृहस्थ पटकन आपलं पिस्तुल खिशात परत टाकतो. विकास रेखाच्या हातून बाहुली घेतो व दोन पावलं पुढे टाकतो. )
विकास : मिस्टर काळे, ही घ्या बाहुली. पण लक्षात ठेवा, इतक्या सहजासहजी मिळणार नाही तुम्हांला. हिसकावून घ्यावी लागेल.
गृहस्थ : (दांतओठ चावीत) तितका वेळ नाही माझ्याकडे आता. मी पुन्हां भेटेन तुम्हांला. (जायला लागतो.)
विकास : काका, माझी बॅग? का हिसकावून घ्यावी लागेल?
( तो गृहस्थ परत येऊन आपल्या हातातली बॅग खाली ठेवतो व मघाची बॅग घेऊन जायला लागतो. )
गृहस्थ : मी पुन्हां सांगतो, ती बाहुली मला मिळालीच पाहिजे.
विकास : आणि मी पुन्हां सांगतो, ती तुम्हाला हिसकावूनच घ्यावी लागेल.
( तो गृहस्थ संतापाने निघून जातो. त्याने गेल्यावर विकास घाईघाईने बॅग उघडून पहातो. )
विकास : सर्व वस्तू ठीक आहेत.
वनिता : माझा टॉवेल?
रेखा : माझी पुस्तकं?
अभय/अजय : अन आमच्या भानगडी?
विकास : प्रत्येकाला आपापल्या आवडीच्या वस्तू मिळतील, पण आधी मला ती बाहुली हवीय.
रेखा : मघाशी तर माझ्या नावाने शंख करीत होतास, बाहुली त्याला परत दे, परत दे म्हणून.
विकास : करीत होतो... कारण मघाशी माझ्या पाठीला पिस्तुल लावलेलं होतं.
( सगळेजण आश्चर्यानं ओरडतात. )
रेखा : मी आधीच सांगितलं होतं तुम्हांला की ती बाहुली साधी नव्हें म्हणून.
विकास : शाबास रेखा, तू खरोखरच शहाणी आहेस. ही घे तुझीं पुस्तकं. (तिला पुस्तकं देतो. वनिताला टॉवेल देतो.) वनिता, हा तुझा टॉवेल. (वनिता आत पळते.) अभय-अजय, तुम्हाला मिळाली ना हवी ती भानगड? (अभय व अजय आनंदाने उड्या मारतात.) आता मला माझी बाहुली हवी. (रेखाच्या हातातून बाहुली घेतो.)
अजय : मी तर आता इथं कायमचा रहायला तयार आहे.
अभय : आता असं म्हणतोयस खरं, पण एकदा विकास मुंबईला गेला की परत माझं डोकं खायला लागशील.
( इतक्यात दारात एक तरूण, रुबाबदार व्यक्तिमत्वाचा गृहस्थ येऊन दार ठोठावतो. )
विकास : काय हवंय आपल्याला? कोण आपण?
इन्स्पेक्टर : मी कोण ते पर्यायाने कळेलच तुम्हांला. तूर्त तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. मला ती बाहुली हवीय.
विकास : कसली बाहुली? बाहुल्यांशी खेळायचं आमचं वय आहे असं का वाटतं तुम्हांला?
इन्स्पेक्टर : I like that. तुमचीं नावं काय?
अभय : माझं नाव अभय टिपणीस. तिथं पुस्तकांत डोकं खुपसून बसलीय ती माझी बहीण, रेखा.
अजय : मी अजय बर्वे, अभयचा मावसभाऊ.
इन्स्पेक्टर : थॅंक्स. पण मला तुमच्यापैकी कुणालाच भेटायचं नाही. मला फक्त ती बाहुली हवीय, आता.
अभय : त्याने सांगितलं तुम्हांला, बाहुल्यांशी खेळायचं वय नाहीं आमचं.
अजय : तुम्ही कुठल्या बाहुलीबद्दल बोलताय तेच कळत नाहीय आम्हाला.
इन्स्पेक्टर : शाबास बच्चे लोग. अभिनय सुंदर जमतो तुम्हांला, पण मला सर्व माहीत आहे. मला सांगा, आता इथून गेलेले गृहस्थ कोण?
विकास : आम्ही कुणीहि ओळखत नाही त्यांना.
अभय : आम्हीं त्यांना आज अगदी पहिल्यांदाच पाहिलं.
अजय : कोण होते ते?
इन्स्पेक्टर : विकास जोशीबरोबर बॅग बदललेले गृहस्थ होते ते.
विकास : तुम्हाला काय माहीत?
इन्स्पेक्टर : मला सर्व माहीत आहे. त्याने तुझ्याजवळ बदललेल्या बॅगेत सोन्याची बाहुली आहे हे देखील मला माहीत आहे. म्हणूनच मला ती सोन्याची बाहुली हवीय.
रेखा : (पटकन) पण सोन्याची बाहुली नाही ती. साधीच आहे.
इन्स्पेक्टर : (हसत) म्हणजे तुम्हाला त्या बाहुलीबद्दल माहीत आहे तर? मघाशी तर तुम्ही म्हणत होता की बाहुलीबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही.
विकास : हिच्या मूर्खपणापुढे आता काहीच लपवण्यात अर्थ नाही. हो, आम्हाला माहीत आहे बाहुलीबद्दल. नुकतेच आलेले ते गृहस्थ त्या बाहुलीसाठीच आले होते.
इन्स्पेक्टर : (घाईघाईने) तुम्ही दिली त्याला?
विकास : हो. काय करणार? ते म्हणाले की बाहुली त्यांच्या मुलीची आहे.
अभय : जवळजवळ हिसकावूनच घेतली त्यांनी आमच्या हातून.
अजय : ही वनिता रडली सुद्धा बाहुलीसाठी. हिला ठेवून घ्यायची होती बाहुली. हो की नाही ग, रेखा?
रेखा : हो ना, किती सुंदर बाहुली होती ती!
इन्स्पेक्टर : घोटाळा झाला.
अभय : म्हणजे नक्की काय झालं?
इन्स्पेक्टर : त्या बाहुलीत सोनं लपवून ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी मला ती बाहुली पाहिजे होती.
विकास : (रोखून पहात) तुम्ही नक्की आहात तरी कोण?
इन्स्पेक्टर : मी खरं सांगितलं तर कदाचित तुम्हीं घाबरून जाल.
विकास : आमच्याकडे पाहून तुम्हाला खरंच वाटतं की आम्हीं घाबरून जाऊ?
रेखा : आम्ही घाबरणारी मुलं नाही आहोत.
इन्स्पेक्टर : शाब्बास पोरांनो. मी आहे इन्स्पेक्टर ढवळे.
विकास : आणि तुम्हाला वाटतं की आम्ही तुमच्या थापांवर विश्वास ठेवूं?
इन्स्पेक्टर : मुळीच नाही. तुम्हीं अगदी स्मार्ट मुलं आहात. हे माझं कार्ड पहा, म्हणजे विश्वास बसेल तुमचा.
( खिशातून आपलं कार्ड काढून दाखवतो. सगळेजण ते कार्ड बघतात. )
विकास : इन्स्पेक्टर साहेब, बसा.
इन्स्पेक्टर : बसायला वेळ नाही. ती बाहुली त्या गृहस्थाकडे गेलीय, मला त्याचा पाठलाग करायला हवा.
विकास : पण त्या बाहुलीत आहे तरी काय एवढं?
इन्स्पेक्टर : सोनं. सोन्याची बाहुली आहे ती. सांगितलं मी.
रेखा : तरीच ती जड लागत होती.
इन्स्पेक्टर : तो माणूस सोनं स्मगल करून नेत आहे. मी त्याच्यावर पाळत ठेऊन मुंबईहून त्याचा पाठलाग करीत आहे. विकास, मी तुला सुद्धा गाडीत पाहिलं होतं.
विकास : माझं नाव कसं कळलं तुम्हांला?
इन्स्पेक्टर : सोपी गोष्ट आहे. स्टेशनवर उतरल्याबरोबर मी त्या माणसाची बॅग तपासली. त्यावर नाव होतं, "कुमार विकास जोशी".
अजय : अन मग?
इन्स्पेक्टर : तेव्हाच मला कळून चुकलं की त्यानं संधि साधून बॅगांची अदलाबदल केली होती. मी परत एकदा हरलो. पुराव्याअभावी मी त्याला अटक करूं शकलो नाहीं. ती बाहुली अखेर त्याच्याच हातात राहिली.
अभय : इन्स्पेक्टरसाहेब, तुम्ही अटक करूं शकत नाही त्याला?
इन्स्पेक्टर : नाहीं पोरांनो, मी म्हटलं ना, केवळ संशयावरून कुणालाहि अटक करता येत नाहीं आम्हांला. भक्कम पुरावा लागतो त्यासाठी.
विकास : अन तो पुरावा, म्हणजे ती बाहुली, सोन्याची बाहुली, त्या माणसाच्या हातात आहे. खरं ना? तुम्हांला त्याचा पाठलाग करायचा असेल ना?
इन्स्पेक्टर : हो मुलांनो, आता निघतो मी. पुन्हा भेटूच आपण. थॅंक्स.
( इन्स्पेक्टर घाईघाईने निघून जातो. रेखा त्याच्या पाठोपाठ जाऊन तो गेल्याची खात्री करून घेते. )
रेखा : गेला एकदाचा. आणि काय रे विकास, त्या इन्स्पेक्टरला खोटं का सांगितलंस की ती बाहुली त्या माणसाने नेली असं?
अभय : मग काय, ती आपल्याच जवळ आहे असं सांगून सारी मजा घालवायची? या गोष्टीचा शोध तर आपल्यालाच लावायचा आहे ना?
अजय : शिवाय आपल्याला स्वप्न थोडंच पडलं होतं तो गृहस्थ पोलिसांतला आहे म्हणून?
विकास : जाऊंदे. आता वाद नको. जे झालं ते उत्तमच झालं म्हणायचं. प्रत्येकाने आपापली कामगिरी उत्तम वठवली.
रेखा : आता कायरे होणार?
विकास : अब आयेगा मज़ा. हे बाहुलीचं प्रकरण भलतंच गूढ होत चाललंय. माझी खात्री आहे की तो माणूस पुन्हा एकदां ती बाहुली घेण्याचा प्रयत्न करेल.
अजय : पण आपण त्याला घेऊं दिली तर ना? आपण त्याला सामना द्यायचा.
विकास : सगळं खरं, पण ही भानगड अभयच्या आईबाबांना कळली म्हणजे?
अभय : त्याची काळजी नको. आईबाबा दोघेही बाहेर गेलेयत व आजचा दिवस तरी येणार नाहीत. आणि आपण सर्वांनी शपथ खायची की हे गुपित त्यांना कळूं देणार नाही. रेखा ....
रेखा : माझ्याकडे बोट नको दाखवूंस. मी कधीच कुणाला नाही सांगणार. तू आपली काळजी घे.
विकास : प्रत्येकाने आपापली काळजी घ्या म्हणजे झालं.
अजय : (हसत) आणि आपल्या सर्वांची काळजी विकास घेईल.
विकास : पण आता नव्हे. आता मी चिक्कार दमलोय. जरा आराम करूं द्या मला.
अजय : मला सुद्धां. मघापासून फेर्‍या मारून मारून माझे देखील पाय दुखतायत.
अभय : माझेदेखील.
रेखा : चला, आपण सर्वच जण मस्तपैकी आराम करूंया.
( सगळेजण आत निघून जातात. पडदा पडतो. )

* * * * * पहिला अंक समाप्त * * * * *

* * * * * दुसरा अंक * * * * *
( प्रवेश पहिला )

( पहिल्या अंकातील देखावा. दुसरा दिवस. आता खोली बरीच नीट लावलेली दिसते. पडदा वर जातो तेव्हां पांचही मुलं गप्पा मारताहेत. )
अजय : विकासचा तर्क खरा ठरला.
वनिता : कसला तर्क?
अजय : हाच की तो कालचा माणूस पुन्हां एकदा बाहुली घ्यायचा प्रयत्न करील.
रेखा : याचं सगळं श्रेय खरं म्हणजे मला मिळालं पाहिजे.
अभय : का म्हणून?
रेखा : कारण तुम्हां सर्वांना आधी मीच सांगितलं होतं की ती बाहुली साधीसुधी नाही ते. अखेर माझाच तर्क खरा ठरला.
अभय : (चिडवीत) अखेर माझाच तर्क खरा ठरला. कधी नाही चालत ती एकदा अक्कल चालली म्हणून एवढा भाव खायला नको कांही.
रेखा : खाणार, मी भाव खाणार. मला सांगणारा तू कोण? मला हवा तेवढा, हवा तेव्हां आणि हवा तिथं भाव खाणार मी.
अभय : खा. भाव खा, हवा खा. हवं तेव्हां, हवं तेवढं, हवं तिथं आणि हवं ते खा. दुसरं येतं काय तुला?
रेखा : खाणार, खाणार, खाणार. मला सांगणारा तू कोण? नाहीच खाणार मी, कांही नाही खाणार.
विकास : (संतापून) अभय-रेखा, जरा तुमची कटकट थांबवा पाहू. थोडा वेळ गप्प बसा.
अभय/रेखा : ठीक आहे, आता गप्पच बसतो आम्हीं.
( दोघेही "हाताची घडी, तोंडावर बोट" मुद्रेत बसतात. )
विकास : मी मघापासून विचार करतोय की आता पुढे काय करायचं?
अजय : ए विकास, जरा लवकर विचार कर ना. मला तर काहीतरी भानगड केल्यावाचून चैनच पडत नाहीं.
विकास : घाई करून चालणार नाही. प्रत्येक पाऊल सावधपणे उचललं पाहिजे. आपला शत्रू कुणी साधासुधा माणूस नाही.
वनिता : विकासदादा, तुला कसं कळलं?
अजय : मला विचार. अग, काल विकासच्या पाठीला त्यानं चक्क पिस्तुल लावलं होतं.
वनिता : आणि तुम्हीं सर्व गप्प बसलात? मी असते तर तेच पिस्तुल त्या दुष्ट माणसाच्या टाळक्यात मारलं असतं.
अजय : मग आता मार. तो बघ, तो माणूस परत आलाय.
( वनिता घाबरून विकासला बिलगते. अजय जोरजोराने हसायला लागतो. वनिता रागाने त्याला मारायला धावते, व तो पळतापळता खिडकीकडे येतो. तेवढ्यात वनिताचं लक्ष बाहेर जातं. )
वनिता : (घाईघाईने) विकासदादा, लवकर इथं ये.
विकास : (खिडकीजवळ येत) काय झालं?
वनिता : तो माणूस बघ बाहेर उभा आहे. बहुतेक आत येईल तो. मला भीति वाटतेय.
अभय : अहारे, भित्री भागूबाई.
विकास : आत येणार नाही तो. आता त्याची जायची वेळ झाली.
अजय : तुला कसं माहीत?
विकास : मी सकाळपासून त्याला तिथं पहातोय.
अजय : मला वाटलं मीच त्याला पहिला पाहिला. सकाळपासून आहे तो इथं?
विकास : हो, सकाळपासून. तो अन त्याचा साथीदार सकाळपासून आपल्यावर पाळत ठेवून आहेत. प्रत्येकजण तासभर वाट पहातो व निघून जातो.
वनिता : (घाबरून) बापरे!
विकास : हात वेडे. घाबरलीस होय?
अजय : आपण तर मारामारी करायला बेचैन झालोय.
विकास : ऊंहूं, हाणामारी करून चालायचं नाही. आपल्याला युक्तीनंच सगळी माहिती काढावी लागेल. काय अभय?
( अभय आधी कानांवर व नंतर तोंडावर बोट ठेवून आपण बोलणार नसल्याची खूण करतो. )
विकास : कायग रेखा, या अभयचं डोकं का फिरलं अचानक?
अभय : (भडकून) डोकं का फिरलं काय विचारतोस? तुझंच फिरलं असेल. आधी आम्हाला गप्प बसायला सांगतोस, व आम्हीं गप्प बसलॊ तर म्हणे डोकं फिरलं.
विकास : बरं बाबा, माझंच चुकलं.
अभय : फक्त चुकलं म्हणून सुटका होणार नाही. हात जोडून माफी माग.
विकास : बरं बाबा, हात जोडून माफी मागतो. (हात जोडून) अभयराव, माझी चूक झाली, मला माफ करा. (तोंड वळवून) काय करणार? अडला हरी, गाढवाचे पाय धरी.
अभय : काही म्हणालास तू?
विकास : नाही, म्हटलं, माझी चूक झाली.
अभय : शाब्बास, तर काय म्हणत होतास मघाशी?
रेखा : ए विकासदादा, तुला माझी सुद्धा माफी मागावी लागणार.
विकास : बरं बाबा, तुझी देखील माफी मागतो. अजून कुणाची माफी मागायची असेल तर रांगेत उभे रहा, एकदमच सर्वांची माफी मागतो. हुकुम करा.
रेखा : हं, काय म्हणत होतास मघाशी?
विकास : नी विचारत होतो की आता पुढे काय करायचं? तो बाहेर माणूस पाहिलास? सकाळपासून आपल्यावर पाळत ठेवली जात आहे.
अभय : (आनंदाने) ग्रॅण्ड! आता खरी मजा यायला लागलीय.
विकास : मिस्टर, फक्त मजा घेऊन चालणार नाही. आता हातपाय हलवायला सुरवात केली पाहिजे.
अजय : आणि तुम्हां लोकांचे केवळ रुसवेफुगवे व गप्पा चालल्यायत. चला, हातपाय हलवायला सुरवात करा.
रेखा : विकासदादा ...
विकास : ए, आधी तू हे ’विकासदादा’ म्हणणं बंद कर पाहू. आवडत नाहीं मला कुणी दादा म्हटलेलं. मुंबईच्या गुंडांना दादा म्हणतात.
रेखा : बरं. विकास, ती माणसं इथं आपल्यावर पाळत ठेवून उभी आहेत तोवर आपण त्यांच्या घरी जाऊन शोध घेऊंया.
अभय : (चिडवून) म्हणें घरी जाऊन शोध घेऊं. ते काय किचनमधे जाऊन लाडू चोरण्याइतकं सोपं आहे?
अजय : कल्पना उत्तम आहे.
वनिता : लाडू चोरण्याची?
अजय : नाही. त्यांच्या घरी जाऊन शोध घेण्याची.
विकास : पण तसं करण्यात धोका देखील तेवढाच आहे.
अजय : आपण तयार आहोत धोका पत्करायला.
अभय : आपण सुद्धां.
रेखा : मी सुद्धां.
वनिता : मी देखील.
विकास : पण आपणां सर्वांना जाता येणार नाही. कुणालातरी मागे रहावं लागणार.
सर्वजण : आपण नाही मागे रहाणार.
विकास : हे बघा, मी तुमच्यापेक्षा मोठा आहे, कबूल?
सर्वजण : कबूल.
विकास : आणि तुम्हीं मला आपल्या गॅंगचा लीडर नेमला आहे. कबूल?
सर्वजण : कबूल.
विकास : मग मी सांगेन तसंच करायचं. शिवाय ही भानगड देखील माझ्यामुळेच सुरु झाली, खरं ना?
सर्वजण : कबूल. आम्हीं ऐकूं तुझं. बोल.
विकास : अजून थोड्या वेळानं तो बाहुलीवाला माणूस निघून जाईल. मी अन आपल्यापैकी दुसरं कुणीतरी त्याचा पाठलाग करूं. तोपर्यंत तुम्हीं इथं त्या दुसर्‍या माणसाला चकवा. संधी साधून, त्याच्या घरी कुणी नसताना, आम्हीं आत शिरून घराचा तपास करूं. ठीक आहे?
रेखा : ठीक आहे, पण पाठलाग करणार कसा? त्यानं तुम्हांला पाहिलं तर?
विकास : तो मला ओळखणार देखील नाही कदाचित.
अजय : विकास, तुझ्याबरोबर मी येईन त्या बाहुलीवाल्याच्या घरी.
विकास : उत्तम. आणि या दोन मुलींना अभयबरोबर एकटं सोडणार? शहाणाच आहेस. ते काही नाही. मी व रेखा त्या बाहुलीवाल्याच्या घरी जातो. तुम्ही इथला मोर्चा संभाळा.
रेखा : पण विकास, आपण त्यांचा पाठलाग कसा करायचा ते नाहीं सांगितलंस.
विकास : सगळं काहीं सांगतो. घाई करूं नका. असे जवळ या अन नीट ऐका.
( सगळेजण विकासभोवती घोळका करतात. विकास हलकेंच त्यांच्या कानांत कुजबुजतो. ते ऐकून सगळेजण आनंदाने ओरडतात व विकासला उचलायचा प्रयत्न करतात. पडदा पडतो. )

* * * * * प्रवेश दुसरा * * * * *

( अभयच्या घरासमोरील रस्त्याचा देखावा. पहिल्या अंकातील माणूस, शामराव काळे, तिथं उभा आहे. सारखं घड्याळाकडे लक्ष. इतक्यांत रस्त्याच्या दुसर्‍या बाजूकडे त्याचं लक्ष जातं. )
शामराव : लवकर ये गाढवा. रेंगाळतोयस कशाला?
( आतून एक खुनशी चेहर्‍याचा माणूस घाईघाईने येतो.)
शामराव : राणे, इतका उशीर का झाला तुला?
राणे : मी सॉरी झालो, साहेब.
शामराव : बास, प्रत्येक वेळी फक्त सॉरी होतोस. हे बघ. ती मुलं कुठेतरी जायच्या तयारीत आहेत. त्यांचा नीट पाठलाग कर. ती कुठं जातात, काय करतात नीट लक्ष ठेव. गाढवपणा करूं नकोस. आणि गाढवपणा करून सॉरी झालो म्हणूं नकोस.
राणे : सॉरी साहेब... म्हणजे मी सॉरी झालो असं म्हणणार नाहीं. सगळं नीट होईल.
शामराव : ते कळेलंच आता. मी जातो. अर्ध्या तासानंतर मी इथंच भेटतो मी तुला. त्या मुलीच्या हातात एक पाकीट असेल, त्याच्याकडे नीट लक्ष ठेव. त्या पाकिटात आपली बाहुली असेल.
राणे : (मोठ्याने) सोन्याची बाहुली?
शामराव : बोंबलू नकोस.
राणे : मी सॉरी झालो, साहेब. चुकलो साहेब. तुम्ही जा. बघा तर मी सगळं कसं झटपट काम उरकतो तें.
( शामराव घाईघाईने निघून जातो. दुसर्‍या बाजूने अभय, अजय व वनिता प्रवेश करतात. वनिताच्या हातात मोठंसं पाकीट आहे. )
राणे : (मुलांना थांबवून) मुलांनो, मला जरा मदत करता का?
अजय : बोला मामा, काय हवंय तुम्हांला?
राणे : तुम्हीं कुठं चाललाय?
अभय : अहो, मिस्टर कोण असाल ते, आम्हीं कुठं जातोय याच्याशी तुम्हांला काय करायचंय? तुम्हांला काय हवंय तेवढं सांगा.
राणे : (हसत) रागावलात मुलांनो? मला वाटलं तुम्हीं हे पाकीट घेऊन पोस्टात जाताय. मलाही तिथंच जायचंय.
अभय : असं होय? मग असे या रस्त्याने जा. पुढे गेल्यावर दोन रस्ते लागतील. त्यातला डावा रस्ता पकडा. पुढे गेल्यावर तीन वळणं लागतील. त्यातलं मधलं वळण घ्या. पुढे जाऊन डावीकडे वळा, मग उजवीकडे, मग सरळ जा. मग परत डावीकडे. मग ---
राणे : बास्स, बास्स. कळलं.
वनिता : काय कळलं?
राणे : हेंच की पोस्टाला जायचा रस्ता सोपा नाही. मी तुमच्याबरोबर येऊं का?
( अभय अजय व वनिताला घेऊन बाजूला जातो. )
अजय : काय, बनवायचा का मामा याला?
अभय : अरे, मघाशीच तू मामा म्हणालास की याला. आता खराखुरा मामा बनवायला किती वेळ लागणार? (राणेला) तुम्हीं या आमच्याबरोबर. आम्हीं तुम्हाला चांगलाच रस्ता दाखवूं.
राणे : मुलांनो, एक प्रश्न विचारूं का तुम्हाला? या पाकीटात काय आहे?
अभय : (अजयकडे पाहून डोळे मिचकावीत) या पाकिटात एक बाहुली आहे, बाहुली. पहायचीय का?
राणे : अरे व्वा! मला पण एक बाहुली घ्यायचीय.
अजय : मामा, मग तुम्ही याच आमच्याबरोबर. (तोंड वळवून) पहा तुम्हांला कसा मामा बनवतो तें.
( सगळेजण एका बाजूने निघून जातात. काही वेळाने अभय वगैरे आलेल्या दिशेनेच एक दाढीवाला भिकारी काठी टेकत येतो. त्याच्याबरोबर आपल्या साडीचा पदर तोंडावर घेऊन एक बाई प्रवेश करते. )
भिकारी : ए संभाळून. तो बाहुलीवाला तिथं उभा आहे. त्याला मुळीच संशय येता कामा नये.
बाई : पण त्याच्यामागे आपण जाणार कसे?
भिकारी : बघच तू आतां. (खिशातून दहा रुपयाची नोट काढून खाली वाकल्यासारखं करतो. नंतर शामराव गेलेल्या बाजूला पाहून ओरडतो.) अवं साह्यब, जरा हतं या की वाईच.
( शामराव प्रवेश करतो. )
शामराव : काय आहे?
भिकारी : (त्याला नोट देत) साह्यब, ह्यी नोट तुमचीच न्हवं का?
शामराव : (नोट ओढून घेत) ठीक आहे, ठीक आहे. (जायला लागतो.)
भिकारी : अव्हं साह्यब ...
शामराव : (रागानं) आता काय झालं?
भिकारी : काय राव, कायपण बक्षीस द्या की. लई भूक लागलीय बघा.
शामराव : (खिशातून एक नाणं काढून देत) हे घे अन चालता हो.
भिकारी : साह्यब, एक गोष्ट इचारूं का? एवढ्यामंदी काय व्हतं?
शामराव : (संतापून) मग काय सोन्याची खाण आणून देऊं की काय तुला?
भिकारी : सोनं नगं साब, यखादी नोकरी द्या की राव.
शामराव : हूं, नोकर्‍या काय रस्त्यावर पडल्यायत की वाट्टेल त्याला देत सुटूं?
भिकारी : (विनवण्या करीत) साह्यब, नाय म्हणूं नगा. ही एक घरधनीण अन दोन कच्च्चीबच्चीं बी घरी हायती. कायपण नोकरी द्या, साह्यब. लई मेहरबानी व्हईल तुमची. त्यो वरचा परमेश्वर भरभरून देईल तुमास्नीं.
शामराव : मग जाऊन त्या वरच्या परमेश्वराजवळ माग. चल चालता हो. खूप कामं पडलीयंत मला.
( शामराव निघून जातो. )
बाई : विकास, त्यानं तुला मुळीच ओळखलं नाही.
भिकारी : आणि ओळखेल तरी कसा? उगीच नाही मी आन्तरशालेय नाट्यस्पर्धेंत बक्षीसं मिळवलीं.
बाई : आतां?
भिकारी : आता काय? त्याची पाठ सोडायची नाहीं. बास्स --- साह्यब, कायपण नोकरी द्या राव.
( रेखा हसते. दोघेही त्याच्या पाठोपाठ जातात. काही वेळानंतर पुन्हां शामराव प्रवेश करतो व त्याच्यामागून भिकार्‍याच्या वेषात विकास अन रेखा. )
भिकारी : साह्यब, कायपण नोकरी द्याना राव.
शामराव : (हात उगारून) आता दांत घशात घालीन तुझे. मघांपासून डोस्कं खातोयस माझं.
भिकारी : मंग काय खाऊ साह्यब? दोन दिसांपासून पोटात कायभी नाय बगा. मंगा म्यां दिलेली ती नोट तरी द्या ना राव. पोटाची खळगी भरंल.
शामराव : (खिशांतून दहाची नोट काढून देत) ही घे आणि तोंड काळं कर इथून. (झटक्यात निघून जातो,)
भिकारी : चला, आपली दहाची नोट तरी परत मिळाली.
बाई : आणि मला तुझी मस्त ऍक्टींग पहायला मिळाली.
भिकारी : आता काहीतरी खाऊन घेऊं. आपलं काम झालं. त्या समोरच्या घरात रहातो तो बाहुली बहाद्दर. आता थोड्या वेळाने तो बाहेर आला की आपण त्याच्या घरात घुसूं.
बाई : पण विकास, तुला एवढी खात्री कशी की तो बाहेर येईल म्हणून?
भिकारी : उगाच नाही मीं इतकीं बक्षीसं मिळवलीं गोष्टी व नाटकं लिहिण्यात. अग, सोपं आहे. इतकी महत्वाची बाहुली मिळवण्याची कामगिरी नक्कीच तो आपल्या मदतनिसावर सोपवणार नाही.
बाई : विकास, बरोब्बर बोललास तूं. बघ तो बाहेर येतोय.
( शामराव प्रवेश करतो. )
शामराव : (संतापाने) अरे, तुम्हीं अजून इथंच? निघा म्हणून सांगितलं ना?
भिकारी : जातुयां साह्यब. मघां इसरलॊच बघा.
शामराव : (संतापून) काय विसरलास?
भिकारी : मगां तुमी ति धाची नोट दिली त्येचा थांकू म्हणाया इसरलो. थांकू साह्यब, लई उपकार झालंया तुमचं. आज पोरांचं त्वांड ग्वाड करतुया.
शामराव : बास्स झालं. आता निघां इथून. नाहीतर पोलिसात देईन.
भिकारी : नगं साह्यब. जातुया. वाईच दम घेतो व निघतो. तुम्ही काळजी नगा करू.
( शामराव तातडीनं निघून जातो. )
बाई : (तो गेलेल्या दिशेने पहात) गेला बाई एकदाचा. मला तर भीतीच वाटत होती.
भिकारी : भीति कसली? खरं धोक्याचं काम तर आतांच आहे. ती खिडकी पाहिलीस? त्यातून आत उडी मारायचीय आपल्याला. जमेल?
बाई : न जमायला काय झालं? उगीच नाहीं मी ऍथलेटीक्समधे एवढीं बक्षीसं मिळवलीं.
भिकारी : (हसून) अच्छा, ऍथलेटीक्समध्ये बक्षीसं? मेरी बिल्ली और मुझीसे म्यांऊ? चल लवकर.
( भिकारी व बाई दुसर्‍या बाजूने निघून जातात. आधी गेलेल्या बाजूने अभय, अजय व वनिता येतात. ते काहीतरीं बोलत असतानाच साध्या कपड्यांतील एक माणूस हातात दुर्बीण घेऊन प्रवेश करतो. )
अजय : आता हा कोण मॅडकॅप?
अभय : त्यालाच विचारूं ना. काय हो पाहुणं?
माणूस : मी पाहुणा नाहीं.
अजय : मग?
माणूस : याच गावचा आहे.
अभय : मी सुद्धा याच गावचा आहे. पण याआधी कधी पाहिलं नाहीं मी तुम्हांला.
माणूस : मी ओळखतो तुम्हाला.
अभय : ते कसं काय?
माणूस : तुम्हीं या समोरच्या घरात राहता. बरोबर?
अभय : म्हणजे तुम्हीं आमच्या घरात डोकावून पहात होता तर?
माणूस : म्हणजे अगदी डोकावून पहात होतो असं नाही. पण पहात होतो.
अजय : पण का?
वनिता : ए अभय, चोर तर नसेल ना हा माणूस?
माणूस : नाही, नाही. मी चोर नाही.
अजय : मग कोण पोलीस आहात?
माणूस : नाही सांगू शकत.
अभय : ते का?
माणूस : साहेबांनी सांगितलंय की मी पोलीस आहे ते कुणालाहि सांगायचं नाही. ही गुप्त बातमी आहे. म्हणून सांगू शकत नाहीं.
अजय : कुठल्या साहेबांनी सांगितलंय तुम्हाला की तुम्ही पोलिस आहात हे कुणालाहि सांगायचं नाही असं?
माणूस : मघाशी ते इन्स्पेक्टर तुमच्या घरात आले होते ना, त्या साहेबांनी सांगितलंय. मी त्यांनाच शोधत होतो.
अभय : अच्छा, इन्स्पेक्टर ढवळेंनी सांगितलंय?
माणूस : (आश्चर्याने) तुम्हांला साहेबांचं नांव कसं माहीत?
अजय : अहो, त्यांनी स्वत:च सांगितलं आम्हांला.
माणूस : कमाल आहे. स्वत: आपलं नांव सांगितलं आणि मला सांगितलं माझी ओळख द्यायची नाही म्हणून? पण आता साहेब कुठे गेलेयत?
अभय : त्यांनी सांगितलंय की ते कुठे गेलेयत हे तुम्हांला नाहीं सांगायचं.
माणूस : पण का? मी तर त्यांचाच माणूस आहे, पोलिसांतला.
अजय : कारण ते गुप्त तपास करताहेत. तो मुंबईचा कुणी गुंड गावात आलाय ना, त्याच्या मागावर गेलेयत ते.
माणूस : मग मला जायला हवं.
अभय : मग निघा लवकर. (घाईघाईने जायला वळतो.) काका, एक मिनीट थांबा.
माणूस : काय झालं?
अभय : आम्हीं तुम्हांला सांगितलं हे त्यांना सांगू नका, प्लीज़.
माणूस : नाहीं सांगत. पण मुलांनो, तुम्हींही त्यांना नका सांगू हं.
अजय : काय?
माणूस : हेंच की मी तुम्हांला कांही सांगितलंय ते.
अभय : नाही सांगणार. आपलं खास गुपित.
अजय : अळी मिळी गुप चिळी.
माणूस : म्हणजे काय?
अजय : म्हणजे एकदम टॉप सीक्रेट. आम्हीं कुणाला नाहीं सांगणार.
अभय : आणि तुम्हीं कुणाला नाहीं सांगायचं.
( सगळेजण एकमेकांना तोंडावर बोट ठेवून गप्प रहायची खूण करीत वेगवेगळ्या बाजूला निघून जातात. )

* * * * * (तिसरा प्रवेश) * * * * *

( एक अंधारी खोली. समोरच्या खिडकीतून विकासची आकृति आत उडी टाकते. )

विकास : रेखा, लवकर उडी टाक ना. किती वेळ वाट पहायची?
रेखा : (बाहेरून) विकास, ही खिडकी खूप उंच आहे. जरा मदत कर ना.
विकास : शेवटी मदत लागलीच ना तुला? बढाया मारत होतीस, "न जमायला काय झालं?" आता ऍथलेटीक्समधली बक्षीसं बाजूला ठेव, माझा हात पकड अन आत ये. (हात बाहेर काढतो.)
रेखा : (बाहेरून) घट्ट पकड हां, हात सोडूं नकोस. मी उडी टाकतेय. (रेखा आत उडी टाकते.) विकास, इथे केवढा अंधार आहे. जरा दिवा लाव ना.
( विकास भिंतीकडे चाचपडत जातो व दिवा लावतो. काही वेळाने खोलीत उजेड पसरतो. ही शामरावची खोली. एका कोपर्‍यात एक पलंग व त्याखाली एक मोठी ट्रंक आहे. एकदोन खुर्च्या व एखादे टेबल. )
रेखा : ही ट्रंक बंद आहे.
विकास : मग काय कुणी आपल्यासाठी ट्रंक उघडी ठेवून जाणार आहे? काळजी करूं नकोस. माझ्याकडे सगळ्या बंद वस्तू उघडण्याचे उपाय आहेत. आत नाहीं का आलो आपण?
( विकास खिशातून किल्ल्यांचा झुबका काढतो व काही प्रयत्नांनंतर ट्रंक उघडतो व त्यांतून वस्तू काढून तपासायला लागतो. एक बाहुली काढून रेखाला दाखवतो. )
विकास : ही बघ बाहुली.
रेखा : तसलीच बाहुली?
विकास : फक्त बाहेरून, आतून नाहीं.
रेखा : म्हणजे तो अजून सोनं पळवण्याच्या तयारीत आहे की काय? विकास, कसंही करून आपण त्याचा हा प्रयत्न फसवायला पाहिजे.
विकास : अग हो, त्याचसाठी आलोयत आपण इथं. जरा थांब, अजून काही पुरावा सापडतो का बघूं.
( विकास बाहुलीखेरीज इतर सर्व वस्तू ट्रंकेत ठेवतो व ट्रंक बंद करून पलंगाखाली परत सरकवतो. )
रेखा : विकास, त्या तिथं कपाटात बघ.
( विकास कपाटाकडे जाऊन ते उघडायचा प्रयत्न करतो, पण व्यर्थ. )
रेखा : काय झालं?
विकास : हे कपाट लेकाचं हट्टी आहे, सरळपणे उघडत नाही. फिक्र नॉट. प्रयत्नांती परमेश्वर.
( तो पुन्हां कपाट उघडायचा प्रयत्न करीत असतांनाच अचानक खोलीचे दार उघडते व राणे आत येतो. )
राणे : पोरांनो, तुम्हीं नका त्रास घेऊं, मी मदत करतो तुम्हांला.
( विकास व रेखा दचकून दाराकडे पहातात. )
विकास : (स्वत:ला सावरून) साह्यब, कायपण घेतलं नाय म्यां. माफ करा राव, लई भूक लागली म्हनूनशान काही गावतं का बघाया आत शिरलो व्हतों. पन कायबी सापडलं नाय बघा.
राणे : (विकासजवळ येतो.) काय बी सापडलं नाय, फक्त ही बाहुली सापडली, काय?
विकास : साह्यब, माझ्या कच्च्याबच्च्यांसाठी घेतली व्हती.
राणे : (संतापाने) मला मूर्ख बनवायचा प्रयत्न करूं नका. कोण आहेस तूं सांग. (त्याच्या दाढीला हात घालतो. दाढी हातात येते.) तुम्हीं पोरं आहात तर? हेरगिरी करायचं धैर्य मोठं आहे तुमचं. हे घे बक्षीस. (काडकन त्याच्या मुस्काटीत भडकावतो. विकास कोलमडतो. राणे रेखाला मारायला जातो, तेवढ्यात विकास त्याचा हात पकडतो.)
विकास : त्या मुलीच्या अंगाला हात लावलास तर हात तोडून टाकीन तुझा. लेचापेचा समजायचं काम नाहीं.
( राणे मागे वळून दोन्हीं हातांनी विकासचा गळा पकडायचा प्रयत्न करतो, तेवढ्यात रेखा त्याच्या हाताला चावते. तो ओरडून हात सोडतो. )
राणे : पोरी, मला चावलीस? जिवंत सोडणार नाहीं मी तुला. (तिच्याकडे वळतो.)
( रेखा घाबरून पलंगाभोवती धावायला लागते. राणे तिच्यामागे धावतो. तो धावत असतांना विकास मध्ये पाय घालून त्याला खाली पाडतो. तो खाली पडल्यावर पलंगावर असलेले एक मोठं कुलुप घेऊन विकास त्याच्या टाळक्यात हाणतो. राणे खाली कोसळतो. )
विकास : छान काम झालं. आता निदान अर्धा तासतरी हा काही गडबड करूं शकणार नाहीं. आता याला मुसक्या बांधून कुठंतरी लपवला पाहिजे.
( विकास पलंगावरचे उशीचे कव्हर काढून राणेच्या तोंडात कोंबतो व पलंगावरची चादर काढून त्याला बांधतो. विकास व रेखा त्याला धरून खेंचायला लागतात. )
रेखा : कुठं टाकायचा याला?
विकास : त्या बाजूच्या खोलीत व्यवस्था करूं त्याची.
( दोघेही त्याला खेंचीत दुसर्‍या खोलीत नेतात व बाहेर येतात. )
रेखा : आता?
विकास : घरीं जायचं. चल लवकर.
( दोघेही घाईघाईने खिडकीकडे जायला वळतात. बाहेर उडी टाकणार तेवढ्यात दाराकडून आवाज येतो, "खबरदार, कसलीच हालचाल करूं नका." दोघेही दचकून दाराच्या दिशेने पहातात. शामराव आत येतो. )
शामराव : (जोराने हसत) भिकार्‍यांची पोरं? स्वत:ला फार हुशार समजत होतां नाहीं? आता तुमची हुशारी संपली. काय समजून घरात यायचं धाडस केलंत?
विकास : तुमच्या घराचा तपास करायला आलो होतों आम्हीं.
शामराव : (विकासची पाठ थोपटत) शाबास. उत्तर देतांना भीति नाहीं वाटत तुला?
विकास : एका गुन्हेगाराची कसली भीति वाटणार? विजय नेहमी सत्याचाच होत असतो. मुलांच्या पाठीला पाठून पिस्तूल टेकवून धमक्या देणार्‍या घाबरटाचा नाहीं.
शामराव : (रागाने त्याचा हात पिरगाळून) तोंड बंद ठेव कारट्या. नाहीतर जीभ खेंचून हातात ठेवीन, समजलं? बोल, कुठं आहे माझी बाहुली?
विकास : मला नाही माहीत.
शामराव : (अजून जोराने हात पिरगाळीत) माहीत नाहीं का सांगायचं नाहीं?
विकास : माहीत असेल तर परत विचारतां कशाला?
शामराव : तोंड बंद ठेव आणि सांग, कुठं आहे माझी बाहुली?
विकास : तोंड बंद ठेवून कसं सांगू?
शामराव : जास्त शहाणपणा नको. बोल, कुठं आहे बाहुली?
विकास : (निर्धाराने) मला माहीत नाही, आणि माहीत असलं तरी सांगायचं नाही.
रेखा : मी देते बाहुली. आधी त्याचा हात सोडा.
( शामराव विकासचा हात सोडतो. रेखा खाली पडलेली बाहुली उचलून शामरावला देते. )
शामराव : (बाहुली खाली फेकत) ए शहाणे, खेळायला नकोय मला ही बाहुली. माझी सोनं भरलेली बाहुली परत हवीय मला.
रेखा : इथं घेऊन यायला मूर्ख नाही आहोत आम्हीं. घरीं ठेवून आलोय ती सोन्याची बाहुली.
शामराव :अच्छा, एकूण लढा द्यायचं ठरवलंय तुम्ही पोरांनी?
विलास : बरोब्बर ओळखलं तुम्हीं.
शामराव : अजून किती वेळ तुमची हिम्मत टिकते तेच बघायचंय मला. अजून अर्ध्या तासात मला माझी बाहुली मिळाली नाही, तर माझं हे पिस्तूल असेल व तुमचीं टाळकीं.
रेखा : बाहुली हवी असेल तर घरी जाऊंदे आम्हांला.
शामराव : तितका मूर्ख नाहीं मी. तुमची दोस्त मंडळी घेऊन येतील ती बाहुली.
रेखा : आम्हांला कैद करून ठेवलंय असं त्यांना कळलं ना, तर ते पोलिसांना घेऊन येतील, बाहुली नाही.
शामराव : तुम्हांला कैद करून ठेवलंय असं त्यांना कळलं तर ना? त्यांना फोन करून इथं बोलावून घ्या.
विकास : ठीक आहे. कुठाय फोन?
शामराव : तो समोरच्या टेबलावर आहे फोन. (विकास जायला वळतो.) पण लक्षात ठेव. माझ्याशी कसलाहि दगाफटका करायचा विचार सुद्धा डोक्यात आणलास तर या पिस्तुलांतील गोळी या पोरीच्या मेंदूपार होईल. तो फोन उचल.
( विकास टेबलाकडे जाऊन फोन उचलतो शामराव खिशातील पिस्तुल काढून रेखाच्या मस्तकावर टेकवतो. विकास फोन उचलून नंबर फिरवतो. )
विकास : हॅल्लो, कोण बोलतंय? हां, अभय? हे बघ, तुला काहीतरी सांगायचंय. ती बाहुली घेऊन ताबडतोब मी सांगतो त्या पत्त्यावर निघून या. हो, काही काळजी करूं नका. रेखा माझ्याबरोबरच आहे. मी सांगतो तो पत्ता लिहून घे व मुळीच वेळ न दवडतां या. घर नंबर चौदा, तळमजला, तेलंग रस्ता. आणि येताना थोडी बिस्कीटं घेऊन ये. कडाक्याची भूक लागलीय मला. प्लीज़ लवकर या.
( फोन खाली ठेवतो. शामराव आपलं पिस्तुल हटवतो. )
शामराव : आता कसं वळणावर आलात. आता तुमची दोस्त मंडळी येईपर्यंत त्या पलंगावर बसून थोडा आराम करा.
( विकास व रेखा पलंगावर बसून रहातात. )

( पडदा पडतो. )
* * * * * दुसरा अंक समाप्त * * * * *

तिसरा अंक
* * * * * प्रवेश पहिला * * * * *

( पहिल्या अंकातील अभयच्या घराचा देखावा. अभय, अजय, व वनिता बोलत बसले आहेत. )
अभय : चला मंडळी, युद्धाला तयार व्हा.
अजय : (आश्चर्याने) युद्धाला का म्हणून? विकास तर म्हणाला, सर्व ठीक आहे म्हणून. मी ऐकत होतो तुमचं बोलणं.
अभय : विकासनं बिस्कीटं आणायला सांगितलंय.
वनिता : होना. विकासदादाला खूप भूक लागली असेल. पण त्यानं बिस्कीटं आणायला कशाला सांगितलं? त्याला तर बिस्कीटं मुळीच आवडत नाहीत. तो नेहमी म्हणत असतो की बिस्कीटं फक्त कुत्रीं खातात.
अभय : आणि तो कुत्रा थोडाच आहे?
अजय : मग त्यानं बिस्कीटं आणायला का सांगितलं?
अभय : अरे, तीच तर गम्मत आहे. इथून जायच्या आधी आमचं ठरलं होतं की जर तो धोक्यात असला तर मला बिस्कीटं आणायला सांगेल.
अजय : याचा अर्थ असा की विकास अन रेखा धोक्यात आहेत?
वनिता : (हुंदके देत) दादा धोक्यात आहे?
अभय : ए वेडाबाई, रडायचं नाही. आपण शूर मुलं ना?
वनिता : (रडत) हो.
अभय : व्वा, असं कधी कोण सांगतं वाटतं? (रडायची नक्कल करीत) आम्हीं शूर मुलं आहोत. हुं, हुं. चल, हेच वाक्य हंसून म्हण पाहू.
वनिता : (हंसून) मी नाहीं रडणार. मी शूर मुलगी आहे.
अजय : शूर विकासदादाची शूर बहीण आहे मी.
वनिता : तू नाहीस, मी विकासदादाची शूर बहीण आहे.
अभय : शाब्बास, आता सर्वजण तयार व्हा.
अजय : (उडी मारून) मी तर केव्हांचा एका पायावर तयार आहे.
अभय : उत्तम. एका पायावर तयार रहा अन एका हातात ती बाहुली घे.
अजय : इतक्या मुश्किलीने मिळवलेली बाहुली अशीच परत द्यायची?
अभय : अशीच परत नाही द्यायची. हातापायाबरोबर आपलं डोकंदेखील चालवायचं. पक्का लढा द्यायचा. आणि तशीच वेळ जर आली तर ती बाहुली त्या माणसाच्या तोंडावर फेकून द्यायची.
वनिता : पण का?
अभय : कारण त्या सोन्याच्या बाहुलीपेक्षा आपल्या मित्राचे प्राण जास्त महत्वाचे आहेत. चला, आता अजून वेळ नाही दवडायचा.
( तिघेजण घाईघाईने दरवाज्याकडॆ वळतात. तेवढ्यात पहिल्या अंकातील इन्स्पेक्टर ढवळे दारात उभा असतो. त्याला पाहून मुलॆं दचकतात. )
इन्स्पेक्टर : (हसत) घाबरलात मुलांनो?
अभय : पोलिसांना घाबरून कसं चालेल, इन्स्पेक्टरसाहेब?
इन्स्पेक्टर : शिवाय मी दोस्त आहे तुमचा, शत्रू नव्हें.
अजय : आमचा दोस्त?
इन्स्पेक्टर : हो, मदत करायला आलोय तुम्हांला.
अभय : (हसत) थॅंक्यू, पण आम्हांला मदत नकोय तुमची.
इन्स्पेक्टर : (हसत) थॅंक्यू. पण बर्‍याच वेळां आम्हां पोलिसांना लोकांच्या बोकांडी बसावं लागतं -- त्यांची इच्छा नसतांना देखील.
अभय : इन्स्पेक्टरसाहेब, ही ज़बरदस्ती झाली. आम्हांला कधी तुमची मदत हवी असलीच तर जरूर बोलावूं तुम्हांला. पण आता, प्लीज़, उशीर होतोय आम्हांला.
अजय : थोडं महत्वाचं काम आहे.
वनिता : थोडं नाहीं, खूप महत्वाचं काम आहे.
( इन्स्पेक्टर मध्यभागी येऊन तिथं खुर्चीवर ठाम मांडून बसतो. )
इन्स्पेक्टर : मुलांनो, नक्की कुठं जायचंय तुम्हांला?
( अभय, अजय व वनिता चरफडत एका बाजूला होतात. )
अभय : (बाजूला) हा चिकट्या माणूस असा ऐकायचा नाही.
अजय : मग अशा लोकांना काय करावें?
वनिता : आमच्या बाई म्हणतात, अशा लोकांना कोरड्या विहिरीत टाकून द्यावें.
अभय : आणि कोरडी विहीर नसली तर?
अजय : तर याला इथंच बंद करून ठेवावं.
अभय : ही कल्पना उत्तम आहे.
वनिता : तुझे बाबा परत आले म्हणजे?
अभय : बाबांनी येऊन दार उघडलं की जाईल निघून. फार फार तर चार शिव्या टाकेल आपल्याला.
इन्स्पेक्टर : मुलांनो, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीं दिलं तुम्हीं. कुठं जायचंय तुम्हांला?
अभय : इन्स्पेक्टर ...मामा, आम्हीं विचार करीत होतों, तुम्हांला खरं सांगायचं की खोटं?
इन्स्पेक्टर : मग काय ठरलं?
अजय : मामा, आम्हांला निर्णय घ्यायला अजून पांच मिनीटं द्या.
इन्स्पेक्टर : (संशयाने त्यांच्याकडे पहात) कबूल.
( इन्स्पेक्टर आपल्या मनगटावरील घड्याळाकडे पहात बसतो. अभय अजय व वनिताला बाजूला खेंचून घेऊन जातो. )
अभय : वेड्या, पांच मिनीटात काय होतं?
अजय : वत्सा, पांच मिनीटात चिक्कार कांही होऊं शकतं. (नाटकीपणें) पांच मिनीटात पर्वत उडूं शकतात. राज्यच्या राज्यं धुळीला मिळूं शकतात.
अभय : ए मिस्टर, नाटकं पुरे.
अजय : (शांतपणे) बालका, नाटकं नव्हें. अरे हा तर एक साधा माणूस आहे. याला आपल्या वाटेतून दूर करायला कित्ती वेळ लागेल? फक्त पांच मिनीटं पुरे आहेत.
अभय : म्हणजे नक्की काय करायचं?
अजय : आता तू आणि वनिता लायब्ररीत जाणार.
अभय : अरे पण आपल्याला तर ---
अजय : मुला, देवानं आपल्याला हे डोकं दिलंय तें आपण योग्य वेळीं वापरावं म्हणूनच ना?
अभय : (रागाने) मग तूंच वापर ना आपलं डोकं.
अजय : तेंच करतोय, अभय. त्या इन्स्पेक्टरला सांग की तू आणि वनिता लायब्ररीत जाणार आहांत. मी आतल्या खोलींत जाऊन वाचन करणार आहे. मी खिडकीतून तुम्हांला बाहुली देतो व उडी मारून बाहेर येतो. बाहेर गेल्याबरोबर तुम्हीं खोलीला कुलूप लावून घ्या. आहे की नाहीं सोपी गोष्ट? मी --- वापरलं --- आपलं --- डोकं.
अभय : जहांपनाह, तुस्सी ग्रेट हो!
अजय : इडीयट, आतां नाटकं नकोत.
अभय : उत्तम. काय घडलंय ते कळायच्या आधींच आपण गुल झालेले असूं.
इन्स्पेक्टर : तुमचीं पांच मिनीटं संपलीत.
अभय : आणि आम्हीं निर्णय घेतलाय. मी आणि वनिता लायब्ररीत जाणार आहोत.
अजय : मी आत कॉमिक्स वाचत बसणार आहे.
अभय : लायब्ररीतून परत आल्यावर आम्हीं सर्वजण त्या बाहुलीवाल्याच्या मागावर जाणार आहोत.
अजय : तोपर्यंत तुम्हीं आत माझ्याबरोबर कॉमिक्स वाचत बसूं शकतां. मी मुंबईहून येताना मस्तपैकी कॉमिक्स आणलीयत. याच तुम्हीं.
इन्स्पेक्टर : नको, मी इथंच ठीक आहे.
( अभय व वनिता बाहेर निघून जातात. अजय आंतल्या खोलीत जातो. इन्स्पेक्टर काही वेळ तिथंच बसून रहातो. मग कसला तरी संशय येऊन आतल्या खोलीत जातो, व वैतागून लगेच बाहेर येतो. चेहरा त्रस्त व वैतागलेला. )
इन्स्पेक्टर : पोरांनी पुन्हां एकदा मला बनवलेलं दिसतंय. (दाराकडे जाऊन बाहेर जायचा प्रयत्न करतो, पण अयशस्वी होऊन परत येतो.) कैद --- मला कैद करून कारट्यांनी बाहेरच्या बाहेर पळ काढलेला दिसतोय. सोडणार नाहीं तुम्हांला. याद राखा.

* * * * * प्रवेश दुसरा * * * * *

( शामरावच्या घरातील खोली. विकास व रेखा पलंगावर बसलेले आहेत. बाजूलाच शामराव हातात पिस्तूल घेऊन
उभा आहे. )
शामराव : वीस मिनीटं झालीं, अजून तुमच्या मित्रांचा पत्ता नाहीं. काही चलाखी तर केली नाहीं ना तुम्हीं?
विकास : उगीच काहीतरी काय बोलताय? चलाखी कशी करणार आम्हीं? मी फोन केला तेव्हां तुम्हीं समोरच तर होतात.
शामराव : मग आले का नाहींत तुझे मित्र?
विकास : उडून येणार नाहीत कांही ते. आता येतील सगळे.
शामराव : लक्षात ठेव, अजून दहा मिनीटात ते आले नाहीत तर आधी मी या मुलीचा मुडदा पाडणार आणि नंतर तुझा.
विकास : कबूल, पण तशी वेळच येणार नाहीं.
( तेवढ्यात दरवाजाची घंटा वाजते. शामराव जाऊन दरवाजा उघडतो. )
शामराव : (हसत) या मंडळी, आनंद झाला तुम्हांला भेटून. (आधी अभय, त्यामागून अजय व शेवटी वनिता प्रवेश करते. अभयच्या हातात एक पाकीट आहे. वनितानं मागे लपवलेल्या हातात बाहुली आहे.) अजून दहा मिनीटं उशीर केला असतां तर तुमच्या मित्रांना मी खायला देणार होतो --- या बंदुकीतली गोळी.
अभय : त्यांच्यासाठी बिस्कीटं आणलीयत आम्हीं. गोळी परत घाला --- तुमच्या घशात, सॉरी, बंदुकींत.
शामराव : (अभयची पाठ थोपटीत) शाब्बास! खूप काळजी घेताय आपल्या मित्रांची. माझी बाहुली कुठाय?
अभय : (हातातील पाकीट त्याला देत) ही घ्या. पॅक करून, खूप जपून आणलीय.
अजय : या फालतू बाहुलीपेक्षा आम्हांला आमचे मित्र प्रिय आहेत.
शामराव : अभिमान वाटतोय मला तुमचा. त्याच वेळी ही परत केली असतीत तर ही वेळच आली नसती. जाऊं दे. मुकाट्याने तुम्हीं बाहुली घेऊन आलात ते बरं केलंत.
( याचवेळी शामरावची नजर चुकवून वनिता आपल्या हातातली बाहुली हळूंच पलंगावर ठेवते व विकास ती पलंगाखाली लपवतो. )
वनिता : आतातरी तुम्हीं माझ्या दादाला सोडणार ना?
शामराव : (हसत) सोडेन ना, मला काय त्याचं लोणचं घालायचंय? पण परत कधी माझ्या भानगडीत पडूं नका. मला आजपर्यंत कुणीच चकवूं शकलं नाहीं.
अभय : खरं सांगायचं तर तसा प्रयत्न करणं हीच आमची चूक झाली. आम्हांला माफ करा.
( एव्हांना शामराव पाकीट सोडून बघायला लागतो, पण कागदांच्या गुंडाळ्यांखेरीज त्याला कांहीच सांपडत नाहीं. तो संतापून पाकीट खाली फेकतो. )
शामराव : (क्रूरपणे) बनवलं तुम्हीं मला?
अभय : काय झालं? बाहुली नाहीं त्यात? अगदी सकाळपर्यंत त्यांतच होती.
शामराव : मग आता कुठं गेली? माझाच मूर्खपणा झाला. मघांशी तुम्हीं मला तें पाकीट दिलं तेव्हांच मला कळायला हवं होतं की सोन्याने भरलेली बाहुली इतकी हलकी नसते.
अजय : खरंच कळायला पाहिजे होतं तुम्हांला. कसं कळलं नाहीं?
अभय : अजय, आपण देखील इतके मूर्ख कसे? आपल्याला देखील कळायला पाहिजे होतं, नाहीं?
शामराव : (खिशांतून पिस्तूल काढून) आता कळायला लागेल तुम्हां कारट्यांना. कुठं आहे बाहुली?
वनिता : मघाशी तिथं पाहिली मी.
अभय : चला रे, आपण सारेजण शोधूंया.
( सगळेजण इथंतिथं शोधल्याचं नाटक करतात. )
अभय : सापडली. तुमची बाहुली सापडली.
अजय : मग देना त्यांना.
अभय : मिस्टर, इथं पलंगाखाली आहे. आपण नाही बुवा हात लावणार. तुम्हींच काढा.
( शामराव बाहुली बघायला पलंगाखाली वाकतो, तोच अभय त्याच्या तंगडींत पाय अडकवून त्याला आडवा पाडतो. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराने शामरावचा तोल जाऊन तो पालथा होतो व त्याच्या हातून पिस्तूल खाली पडते.विकास एकदम पिस्तूल उचलून आपल्या खिशात टाकतो. अजय झटपट बाहुली उचलून एका कोपर्‍यात जातो. आता सर्व मुलें खोलीच्या वेगवेगळ्या कोपर्‍यांत वर्तुळाकार उभीं राहतात. शामराव उठून उभा रहातो. )
शामराव : खूप झाला चावटपणा. बाहुली कुठें आहे?
अजय : ही घ्या. आता खरंच घ्या. मघांशी चुकून आमचा पाय तुम्हांला लागला व तुम्हीं पडलात. सॉरी. ही घ्या बाहुली.
( शामराव अजयकडे जातो, तोच अजय बाहुली विकासकडे फेकतो. शामराव विकासकडे धावतो. तेवढ्यात विकास बाहुली अभयकडे टाकतो. शामराव तिथें जातो तेव्हां अभय बाहुली रेखाकडे टाकतो. शामराव रेखाकडे धावत असतांना अभय त्याच्या पायात पाय अडकवून त्याला पाडतो. शामराव पडल्याबरोबर विकास पलंगावरचे कुलूप काढून त्याच्या टाळक्यात मारायला जातो. पण शामराव चपळाईने बाजूला सरकतो व उठायचा प्रयत्न करतो. याचवेळी सर्व मुलॆं एकदम त्याच्यावर झडप घालतात, पण त्यांचा प्रयत्न साफ फसतो. शामराव त्यांना जोराने धक्का देऊन मागे सारतो. फक्त विकास त्याच्याशी झटापट करीत असतो. या झटापटीत विकासच्या खिशांतील पिस्तूल जमिनीवर पडते. शामराव चटकन पिस्तूल व बाजूला पडलेली बाहुली घेऊन दरवाज्याच्या बाजूला जातो. आता शामरावची पाठ दरवाज्याकडॆ आहे व सर्व मुलें त्याच्या समोर. शामरावचे पिस्तूल मुलांवर रोखलेले असतें. )
शामराव : (क्रूरपणे हंसत) झालं समाधान पोरांनो? तुम्हीं कारटीं स्वत:ला खूप चलाख समजत होतांत. पण शेवटी विजय माझाच झालाय. ही बाहुली मिळवण्याची खूप धडपड केलीत तुम्हीं, पण व्यर्थ. (वनिताकडे पाहून) पोरी, तुला बाहुली हवी होती ना? तू आठवण म्हणून ती रिकामी बाहुली ठेवून घे.
वनिता : (एकदम शामरावच्या मागे दरवाजाकडे पाहून) इन्स्पेक्टरकाका, यांना पकडा. आम्हांला मारायला निघालेत ते.
( शामराव दचकून मागे पहातो. ही संधी साधून विकास उडी मारून त्याचा पाय खेंचतो, आणि त्याने पडताच त्याच्या हातातून पिस्तूल ओढून घेऊन त्याच्यावर रोखतो. )
विकास : (क्रूर व्हायचा प्रयत्न करीत) शाळेत ट्रेनींग घेतोय मी, व पिस्तूल चालवता येतं मला. आजमावायचं असेल तर प्रयत्न करून बघा. किंचितही हालचाल केलीत तर कसलीहि दयामाया न दाखवतां ही गोळी तुमच्या मेंदूपार करीन. तुमच्यासारख्या बदमाषांना दयेने वळवतां येत नाहीं. आता मुकाट्याने ती बाहुली आमच्या स्वाधीन करा.
( शामराव थोडावेळ विचार करून बाहुली अजयच्या हातात देतो. अजय, अभय, रेखा आणि वनिताला घेऊन विकास बाहेरच्या दरवाजाकडे जातो, व नंतर शामरावच्या पाठीला पिस्तूल लावून त्याला आतल्या दरवाजाकडे घेऊन जातो. )
विकास : (पिस्तूल अजून शामराववर रोखलेले) इथून हलायचाहि प्रयत्न केलात तर हे तुमचंच पिस्तूल असेल व तुमचंच डोकं. (बाहेरच्या दरवाजाकडे जात) थोड्याच वेळात तुमचा तो साथीदार तुम्हांला सोबत द्यायला येईल. तो बघा आलाच. (आतून राणे प्रवेश करतो.) मिस्टर तुम्हीं जे कुणी असाल ते, आहात तिथंच उभे रहा. अभय, तू तो फोन उचल व घरीं फोन करून त्या इन्स्पेक्टरला बोलावून घे.
अभय : विसरलॊं मी, पण मोबाईल आणलाय मी. ( अभय खिशातला मोबाईल काढून नंबर फिरवतो. काहीच उत्तर न मिळाल्यावर फोन परत ठेवतो. )
अभय : विकास, घरी फोन कुणीच उचलत नाहीं.
विकास : ठीक आहे. आता तुम्हीं बाहेर जा. लवकर.
( विकासखेरीज सगळेजण बाहेर निघून जातात. विकासला एकटा पाहून शामराव व राणे पुढे सरकायचा प्रयत्न करतात. )
विकास : (क्रूरपणे) संभाळून. तुम्हांला जिवंत रहायचं असेल तर तसला मूर्खपणा मुळीच करूं नका. मी आधींच सांगितलंय तुम्हांला, मला पिस्तूल चालवतां येतं. विश्वास नसेल तर आता पुरावा देईन. हें पिस्तूल थेट तुमच्या मेंदूकडे रोखलेलं आहे.
( शामराव व राणे जागच्या जागी थांबतात. )
शामराव : (हात वर करीत) विकास, मी तुला शरण जातोय.
विकास : फक्त शरण जाऊन कांहींहि होणार नाही, मिस्टर शामराव काळे. काळी कृत्यं करणार्‍या देशद्रोही गुन्हेगारांना कायद्यानंच शिक्षा व्हावी लागते.
( याच वेळीं बाहेरून इन्स्पेक्टर ढवळे इतर मुलांसह प्रवेश करतो. त्याच्या एका हातात बेड्या व दुसर्‍या हातात एक कागद आहे. )
इन्स्पेक्टर : ... व ती झाल्याशिवाय रहाणार नाहीं. मिस्टर शामराव काळे, मी तुम्हांला अटक करीत आहे. हे आहे तुमच्या अटकेचं वॉरण्ट.
( काय घडत आहे हे कुणाच्या लक्षात येण्यापूर्वींच शामराव सर्वांना बाजूला ढकलून बाहेर पळतो. विकास घाईघाईने बाहेरच्या बाजूला धावतो. शामरावच्या पाठीं जावं की खोलींत असलेल्या राणेवर नजर ठेवावी हे न कळून इन्स्पेक्टर गोंधळलेल्या अवस्थेत असतांनाच बाहेरून आधी गोळी चालल्याचा व ताबडतोब शामरावच्या ओरडण्याचा आवाज ऐकूं येतो. काहीं वेळानं शामराव लंगडत प्रवेश करतो, व त्याच्यामागे विकास पिस्तूल घेऊन येतो. )
विकास : (हसत) शामराव, सांगितलं होतं मी तुम्हांला, मला पिस्तूल चालवतां येतं. आणि फक्त चालवतां येतं एवढंच नाहीं तर हवा तिथं नेमदेखील धरतां येतो. तुमच्या पायावर नेम धरला कारण मला तुम्हांला मारायचं नव्हतं, फक्त थांबवायचं होतं.
( इन्स्पेक्टर शामरावच्या व राणेच्या हातात बेड्या अडकवतो. )
इन्स्पेक्टर : शाबास मुला, तू खरोखरच कमाल केलीस.
विकास : इन्स्पेक्टरसाहेब, मी एकट्यानंच नाहीं, माझ्या या इतर मित्रांनीं सुद्धां.
इन्स्पेक्टर : (त्यांच्याकडे रोखून पहात) मान्य आहे मला, यांनी तर खरोखरच कमाल केली.
अजय : इन्स्पेक्टरसाहेब, मघाशी आम्हीं तुम्हांला कैद केलं त्याविषयीं म्हणात असाल, तर सॉरी. आम्हांला माफ करा. तो सगळा प्लॅन माझा होता.
अभय : आम्हांला तुमची अडचण नको होती. सर्व रहस्य आम्हांला स्वत:च सोडवायचं होतं.
इन्स्पेक्टर : पण तसं करण्यांत धोका होता.
विकास : जाणीव होती आम्हांला त्याची. पण ही ना ती भानगड करायला आम्हीं नेहमींच उत्सुक असतो.
इन्स्पेक्टर : (हसत) शाबास, बरेच साहसी आहात तुम्हीं सगळेजण. यापुढे मला कधी गरज लागलीच तर तुमचीच आठवण करीन मी.
सर्वजण : (आनंदाने ओरडून) खरंच? वचन द्या पाहूं.
इन्स्पेक्टर : वचन. पण एका अटीवर. आता तुम्हीं वचन द्या पाहूं.
रेखा : कबूल. कसलं वचन?
इन्स्पेक्टर : सगळं काम स्वत: करून माझ्या नोकरीवर गदा आणूं नका म्हणजे झालं.
सर्वजण : कबूल. दिलं वचन.
इन्स्पेक्टर : (शामरावकडॆ वळून) मंडळी, आपण आज संध्याकाळच्या गाडीनं मुंबईला जाणार आहोत. तिथली मंडळी तुम्हांला भेटायला बेचैन झाली असेल. तयारी आहे ना?
शामराव : इन्स्पेक्टर, या क्षणाला तुम्हीं न्याल तिथं यायची तयारी आहे माझी. पण सांगून ठेवतो, मला तुम्हीं जास्त वेळ आत ठेवूं शकणार नाहीं.
इन्स्पेक्टर : माहीत आहे मला. तुम्हां स्मग्लर लोकांचे आतबाहेर खूप कॉण्टॅक्टस असतात, ठाऊक आहे मला. पण तें नंतर बघूं. आतांपुरती तुमच्या नांवानं एक खोली रिझर्व आहे. आणि मुलांनो, चला, तुम्हांला मी माझ्या गाडीनं घरीं सोडतो.
सर्वजण : चला.
( आधी शामराव व राणेला घेऊन इन्स्पेक्टर बाहेर जातो, त्यानंतर इतर मुलें जातात. थोडावेळ स्टेज रिकामं असतं. मग विकास धावत परत येतो व पलंगावर पडलेली बाहुली उचलतो. )
इन्स्पेक्टर : (बाहेरून) विकास, आता काय राहिलं?
विकास : जिच्यामुळे सगळी भानगड निर्माण झाली ती सोन्याची बाहुली इथंच राहिली होती ती घ्यायला आलो मीं.
( इतक्यांत बाहेरून वनिता धावत येते व दुसरी बाहुली उचलते. )
वनिता : ही बाहुली त्या माणसानं मला घ्यायला सांगितलं होतं. आठवतंय ना? आतां चल.

( विकास व वनिता दोन्हीं बाहुल्या घेऊन बाहेर जातात. )

* * * * * पडदा पडतो * * * * *
( तिसरा अंक व नाटक समाप्त )

लक्ष्मीनारायण हटंगडी
EC51/B104, Sai Suman CHS,
Evershine City, Vasai (E)
PIN 401208
(suneelhattangadi@gmail.com)

हिट : मिरची-मसाला !

( पडदा बंद असतांना दैवी संगीत ऐकूं येत आहे. हळूंहळूं पडदा उघडतो. स्टेजच्या मध्यभागी एका जुनाट खुर्चीवर एक व्यक्ति उदास चेहर्‍याने बसलेली दिसते -- ही व्यक्ति म्हणजेच परमपिता परमेश्वर. तो उदासपणे कधी भिंतीवरच्या कॅलेण्डरकडे तर कधी मनगटावरच्या घड्याळ्याकडे पहात असतो. अचानक त्याचं लक्ष आंतून येणार्‍या चार माणसांकडे जाते व त्याचा चेहरा उजळतो ... फक्त एकच क्षण ...)
परमेश्वर : (उदासपणे) कोण हवंय आपल्याला?
माणूस १ : (लबाड हसत) परमपिता परमेश्वर, तुम्हीच हवाय आम्हांला. आम्हीं ओळखलं तुम्हांला.
माणूस २ : तुम्हीं स्वत:ला लपवायचा कितीहि प्रयत्न केलात तरी आम्हीं तुम्हांला शोधून काढलंच.
माणूस ३ : तुम्हीं आपले दैवी कपडे बदलले तरी चेहर्‍यावरचं तेज काही लपलं नाहीं.
माणूस ४ : हे परमेश्वरा, आम्हीं तुम्हांला शरण आलोय.
माणूस १ : आमच्यावर दया करा. आम्हांला प्रसन्न व्हा.
( परमेश्वराचा चेहरा उजळतो. )
परमेश्वर : बोला वत्स, मी प्रसन्न झालोय. मोगॅम्बो खुश हुआ. (पटकन जीभ चावीत) सॉरी, मला म्हणायचंय, मी परमपिता परमेश्वर खुश झालोय. तुम्हांला काय हवंय? आपली ओळख द्या. तुम्हीं कोण आहांत?
माणूस १ : धन्यवाद. थॅंक यू, परमेश्वरा. आम्हीं मराठी चित्रपटक्षेत्रातील काही दु:खी माणसं आहोत. मी आहे श्रीयुत चटपट मसालेदार, एक निर्माता-दिग्दर्शक.
माणूस २ : मी आहे यांचा चमचा.
माणूस ३ : (दुसर्‍या माणसाकडे बोट दाखवीत) आणि मी आहे यांचा चमचा.
परमेश्वर : वत्सा, तुमची नावं काय ते सांगा, नुसती विशेषणं नकोत.
माणूस २ : काय उपयोग, महाराज?
माणूस ३ : हल्ली आम्हांला नावानं कुणीच ओळखत नाही.
माणूस ४ : अन मी आहे दु. खी. लेखक.
परमेश्वर : बालका, तू दुखी का आहेस?
माणूस ४ : देवा, माझं पूर्ण नाव आहे दुष्यंत खीमजी लेखक, दु.खी. लेखक. आणि मी खरोखरच दु:खी आहे, याला कारणं अनेक आहेत. लवकरच कळेल तुम्हांला.
परमेश्वर : बोला वत्स. बिनधास्त आपली दु:खं माझ्यासमोर मांडा. मी तुमची काय मदत करूं शकतो? How can I help you, guys?
माणूस १ : परमेश्वरा, मी मराठी चित्रपटक्षेत्रातील एक निर्माता-दिग्दर्शक आहे ...
माणूस २ : मी यांचा चमचा...
माणूस ३ : ... अन मी ....
परमेश्वर : (रागाने) यांचा चमचा. पाठ झालंय मला. (पहिल्या माणसाला) हां, तू बोल, तुझा काय प्रॉब्लेम आहे? ओघाओघाने यांचा प्रॉब्लेम कळेलच.
माणूस १ : निर्माता-दिग्दर्शक व्हायच्या आधी मी एक स्वयंपाकी होतो. मुंबई-पुणे-हैदराबाद-चेन्नई मधल्या सगळ्या कलाकारांच्या घरी मी कामं केलीयत. सगळ्या पार्टीसमधे मी केलेल्या मसालेदार डिशेस फेमस होत्या. अगदी मुंबईच्या वडा-पाव पासून ते पुणेरी मिसळ; चेन्नईच्या इडली-डोसापासून ते हैदराबादच्या चिकन बिर्यानीपर्यंत ...
परमेश्वर : (उत्सुकतेने) थांबू नकोस. बोलत रहा. तुझी गोष्ट तोंडाला पाणी आणण्यासारखी म्हणजे चवदार आहे. मग पुढे काय झालं?
माणूस १ : मग एके दिवशी माझी बुद्धि माती खायला गेली. म्हणजे माझी बुद्धि भ्रष्ट झाली. व मी किचनमध्ये कुक करणं बंद केलं.
परमेश्वर : अरे देवा रे, पण का असं केलंस तूं?
माणूस २ : मला बोलूं दे, सर. देवा, त्यांना मसालेदार डिशेसच्या ऐवजी मसालेदार चित्रपट बनवायची खुजली .... चुकलो, मोह झाला.
माणूस ४ : त्यांनी माझ्या मसालेदार गोष्टी घेऊन चित्रपट बनवले.
माणूस ३ : ... आणि सगळे चित्रपट धडाधड आपटले.
परमेश्वर : (आतुरतेने) कुणी आपटले? कसे आपटले? कुठे आपटले?
माणूस १ : तिकीट-खिडकीवर, म्हणजे बॉक़्सऑफिसवर. सगळे चित्रपट पिटले. म्हणूनच आम्हीं तुमच्याकडे आलोय, गा‍र्‍हाणं घेऊन, देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा, आतां, उघड दार देवा.
परमेश्वर : (थोडासा वैतागून) उघडलं दार, आपलं गाणं आपल्या देहातच ठेवा व सरळ बोला.
माणूस १ : देवा ...
माणूस २ : परमेश्वरा ...
माणूस ३ : परमपित्या परमेश्वरा ...
माणूस ४ : आमच्यावर मेहरबानी करा.
परमेश्वर : (वैतागून) पण मेहरबानी करूं, म्हणजे नक्की काय करूं ते सांग.
माणूस १ : हिट करा.
परमेश्वर : (हात उगारून) कुणाला हिट करूं?
माणूस १ : माझे चित्रपट हिट करा ... म्हणजे यशस्वी करा. हिट, सुपरहिट, सूपरडूपर हिट चित्रपट बनवण्याचा सीक्रेट फॉर्म्युला मला सांगा. म्हणजे माझं कल्याण होईल.
माणूस २ : माझंसुद्धां कल्याण होईल ...
माणूस ३ : माझसुद्धां कल्याण होईल ...
माणूस ४ : माझंसुद्धां पॉवरफुल कल्याण होईल ...
परमेश्वर : (संतापून) चुप करा, तुमचं कल्याण होईल आणि माझं ठाणं होईल. बत्ती गुल ... पुरती पॉवर-कट. हे बघा, तुम्ही सगळे मूर्ख आहांत.
माणूस ४ : काय झालं देवा? माझे संवाद ऐकून अचानक तुमचा मूड ऑफ का झाला?
परमेश्वर : कारण तुम्हीं बोलणीच मूर्खासारखी करताय. अरे वेड्यांनो, हिट चित्रपट बनवायचा सीक्रेट फॉर्म्युला जर का माझ्याकडे असता तर मी या रामगोपाल वर्माच्या भुताटकीच्या सेटवर, या सी-ग्रॆडच्या खुर्चीवर तुमच्यासारख्या लोकांची गार्‍हाणगीतं ऐकायला कां बसलो असतो? केव्हांच भूलोकाचं one-way तिकीट काढून एखाद्या corporate office मधून करोडोंचं भांडवल उभारून हॉलीवूड किंवा बॉलीवूडला जाऊन वर्षभर चालणारा सोडा, एकाद्या मल्टीप्लेक्समध्ये एक दिवस चालणारा पिक्चर काढला असता.
माणूस १ : (हताशपणे) देवा, तुम्हीं हे काय बोलताय?
परमेश्वर : सत्य बोलतोय, वत्सा. आत टीव्ही वर डेली सोप बघत बसलेल्या गीतेची शपथ घेऊन सत्य बोलतोय. मागे विद्यार्थीगण परीक्षेच्या वेळी मस्का लावायला माझ्या दरबारी नियमीत हजेरी लावायचे. पण आता दिवस बदलताहेत. शिक्षण अधिकारी परिक्षा रद्द करून मुलांचं व त्यांच्या पालकांचं जीवन सोपं करूं पहातायेत. पण त्यामुळे इथल्या शंभर कोटी देवांच्या जीवनाची वाट लागतेय हे त्यांना कोण सांगणार? इतर लोक नोकरीच्या निमित्ताने माझ्या दरबारी आपली गा‍र्‍हाणी घेऊन यायचे. आत्ता ते सुद्धा बंद झालेयत. चाय-पाणी व इतर अनेक मार्गांनी सगळे प्रॉब्लेम्स खालच्या खालीच सोडवले जातात. बसूनबसून कंटाळा आला की मी थियेटरमध्ये फ़्लॉप झालेले सिनेमे डिस्कवर पहात बसतो. तरीहि इतक्या वर्षांनंतर एखादा सिनेमा हिट का होतो हे अजूनही माझ्या लक्षात आलेलं नाहीं. तर वत्स, या बाबतीत मी तुम्हां लोकांची काहीहि मदत करूं शकणार नाहीं. तर तुम्हीं जिथून आलात तिथंच परत जा आणि प्रयोग करीत रहा. बेस्ट ऑफ लक !
( पहातापहाता परमेश्वर अद्रुश्य होतो. )
माणूस १ : चला मंडळी, इथेही निराशाच पदरी पडली.
माणूस २ : सर, आता काय?
माणूस १ : (वैतागून) मेरा सर !
माणूस ३ : पुन्हां प्रयोग चालू.
माणूस ४ : सर, माझ्या डोक्यात एक मस्त स्टोरी घुमतेय.
माणूस १ : (रागाने) मग ती तिथेच घुमत राहूं दे. मला हिट चित्रपट पाहिजे, हिट स्टोरी नव्हें. (दुसर्‍या माणसाला) चमचा नंबर वन, गेल्या तीन वर्षांतील सगळ्या हिट पिक्चर्सच्या सीडीस मला आणून दे.
माणूस २ : सार, अक्षय कुमारची "चांदनी चौक टू चाईना" आणून देऊ?
माणूस १ : (संतापून) हिट फिल्म्स म्हणालो मी. अक्षयचा सीसीटीसी नंबर वन फ़्लॉप आहे. (तिसर्‍या माणसाला) तू तातडीने जा अन माझ्या हीरो-हीरोईनला ताबडतोब माझ्या घरी यायला सांग. अगदी असाल तस्से यायला सांगितलं आहे म्हणून सांग. कळलं?
माणूस ३ : येस बॉस.
माणूस ४ : कशासाठी सर?
माणूस १ : स्टोरी डिस्कशनसाठी. समजलं?
माणूस ४ : समजलं सर. मी माझी स्टोरी ऐकवू? माझ्या डोक्यात मघापासून घुमतेय.
माणूस १ : (ओरडून) मग तुमची स्टोरी तुमच्या डोक्यातच घुमवा. माझं डोकं नका खाऊ. (आवेशाने) माझी मराठी पिक्चर्स धडाधड आपटलीत. म्हणून आता मी हिंदी पिक्चर काढणार आहे.
माणूस ४ : पण सर, हल्लीचे सगळे मराठी चित्रपट धडाधड हिट होताहेत. नावं सांगू? नटरंग, लालबाग-परळ, मी शिवाजी राजे बोलतोय ...
माणूस १ : पण आता मी बोलतोय. मी हिंदी चित्रपटच काढणार आहे.
माणूस ४ : पण हिंदी चित्रपट का, सर?
माणूस १ : कारण सगळे मराठी कलावंत हिंदी चित्रपटांकडे वळले आहेत ... किंवा टीव्हीकडे. मराठी चित्रपटांकडे कुणी वळून सुद्धां पहात नाहीत. बोलत राहू नका. घाई करा अन स्वर्गाच्या विमानतळावर पळा, नाहीतर आपली फ्लाईट मिस होईल.
( सगळेजण घाईघाईने निघून जातात. )

( दृश्य दोन )
( श्रीयुत मसालेदारांच्या घराचा दिवाणखाना. कांही वेळातच माणूस १ (मसालेदार) घाईघाईने प्रवेश करतो. )
माणूस १ : (प्रेक्षकांना) सॉरी, थोडा उशीरच झाला. स्वर्गातून विमान उशीरा उडालं. पण हरकत नाही. माझे हीरो-हीरोईन अजून आलेले नाहीत ना?
( प्रेक्षकांतून आवाज येतात: "अजून कुणाचाच पत्ता नाहीं." )
माणूस १ : वाटलंच म्हणा. हीरो-हीरोईन कसले वेळेवर येतात म्हणा? तोपर्यंत मी तुम्हां सर्वांना माझ्या कुटुंबाची ओळख करून देतो. (आंत पाहून) बच्चे लोग बाहेर या पाहूं.
( आंतून सात मुलं गात बाहेर येतात, "सा रे के सारे, ग म को लेकर गाते चले..." )
माणूस १ : ही आहे माझी म्युझीकल म्हणजे संगीतमय फ़ॅमिली. मुलांनो, नांवं सांगा रे आपली.
सा : सा ... साधना.
रे : रे ... रेखा.
ग : ग ... गणेश.
म : म ... मनोज
प : प ... पल्लवी.
ध : ध ... धर्मेश.
नी : नी ... नीना.
माणूस १ : आम्हीं त्यांना बोलावतो ...
सा : सा ...
रे : रे ...
ग : ग ....
म : म ...
प : प ...
ध : ध ...
नी : नी ...
सगळेजण : आम्हांला कशाला बोलावलंत, पप्पा?
माणूस १ : कांही नाही, या लोकांची ओळख करून द्यायला. काय चाललंय?
सा : पप्पा, मी प्रॅक्टीस करीत होते, सा, रे, ग, म "लिटील चॅम्प्स" मध्ये भाग घ्यायची.
रे : मी "इण्डियन आयडल" मध्ये जायची.
ग : मी "डांस इंडिया डांस - लिटील मास्टर्स" ची.
म : मी "बूगी-वूगी"ची.
प : मी होमवर्क करीत होते.
ध : मी शाळेला जायची तयारी करीत होतो.
नी : मी शाळेला जायला तयार आहे.
माणूस १ : बच्चे लोग, आपापली कामं थांबवा. बॅगा फेकून द्या.
सगळेजण : का, बाबा?
माणूस १ : मी हिंदी पिक्चर बनवणार आहे. आपण श्रीमंत बनणार आहोत. मग शाळेला जायची काय गरज?
म : मग शाळेला रोजचीच सुट्टी? फक्त "बूगी-वूगी"?
सगळेजण : म्हणजे शाळेला कायमची सुट्टी?
( सगळेजण नाचायला व गायला लागतात. तेवढ्यात माणूस २, माणूस ३ व माणूस ४ प्रवेश करतात. )
माणूस ३ : सर, तो येतोय ...
माणूस २ : ... आहे तस्सा येतोय.
माणूस १ : चमचे लोग, कोण येतोय? नीट सांगा.
माणूस ४ : सर, तुमचा हीरो येतोय.
( एवढ्यात हीरॊ अर्धी चड्डी अन गंजी घालून प्रवेश करतो. )
हीरो : ("तुमने पुकारा और हम चले आये"च्या चालीवर गात) तुम्हीं बोलावलत मला, मी निघून आलो ...
माणूस २ : (गात) ... चड्डी आणि गंजीतच आलो ... ओ, ओ, ओ...
माणूस १ : आणि हीरोईन कुठे आहे?
माणूस ३ : सार, ती म्हणाली की आहे तश्शी येणार नाही.
माणूस १ ; (रागाने) पण कां?
माणूस २ : कारण ... ती ...
माणूस १ : ... कारण काय?
माणूस २ : कारण ती आंघोळ करीत होती.
माणूस ४ : आणि ती आहे तश्शी आली असती .. तर ... तर चक्क फोटोसकट ही स्टोरी सगळ्या न्यूझपेपर्समध्ये पहिल्या पानावर व टीव्ही चॅनल्सवर "ब्रेकींग न्यूज़" म्हणून आली असती.
( सगळी मुलं फिदीफिदी हंसायला लागतात. )
माणूस १ : सा, रे, ग, म, बास्स करा.
( सगळी मुलं नाचत-गात आंत निघून जातात. दुसर्‍या बाजूने हीरोईन लिपस्टीक लावत, गाणं गात प्रवेश करते. )
हीरोईन : तुमने पुकारा और हम चलें आये ...
हीरो : (तिच्या तोंडावर हात ठेवून) मी हे गाणं आधीच म्हटलंय, अन तेसुद्धां मराठीतून. तेव्हां कॉपी नकोय.
हीरोईन : वाईट्ट आहत तुम्हीं सगळे हीरो लोक. सगळं कांही आधीच करून मोकळे होता. आम्हां हीरोईन्सनां मुळी चान्सच नाहीं देत. पण लवकरच हमारे भी दिन आयेंगे.
माणूस ४ : बर्रोबर आहे. किसी शायरने कहा है, "हर कुत्तेका दिन आता है."
माणूस १ : आयेगा, आयेगा. सारखी तक्रार करीत बसूं नका. मी तुम्हां सर्वांना एक महत्वाची बातमी देण्याकरिता इथं बोलावलंय. एकदम इम्पॉर्टण्ट.
माणूस २ : व्हेरी इम्पॉर्टण्ट.
माणूस ३ : व्हेरी व्हेरी इम्पॉर्टण्ट.
माणूस ४ : मोस्ट इम्पॉर्टण्ट.
माणूस १ : चमचे लोक, गप्प रहा.
माणूस २/३: आम्ही गप्प आहोत.
माणूस ४ : मैं भी चुप रहूँगा.
माणूस १ : मी एक सुपर-हिट हिंदी चित्रपट निर्माण करायचा ठरवलं आहे.
माणूस ४ : पण सर, स्टोरी?
माणूस १ : चुप. इथं स्टोरी कुणा गाढवाला हवीय? मी हिट फिल्मची गोष्ट करतोय. चित्रपटाची गोष्ट नंतर शोधता येईल. आधी फिल्मचं नांव ऐका.
सगळेजण : बोला.
माणूस १ : चित्रपटाचं नांव आहे ... (थांबतो.)
हीरोईन : हुझूर, आप रुक क्यों गये? आप रुक गये, तो मेरे दिलकी धडकन रुक गई.
माणूस १ : फिल्मी डायलॉग्स नकोत. मी श्वास घ्यायला रुकलो. पिक्चरचं नांव आहे, "इश्कमें पागल गजिनी मेजरसाब दिलवाले दुल्हनियाके शोले हैं कौन?"
सगळेजण : (आश्चर्याने) क्या?
माणूस १ : (सावकाश) "इश्कमें पागल गजिनी मेजरसाब दिलवाले दुल्हनियाके शोले हैं कौन?" कसं वाटलं?
हीरो : नांव थोडं लांबलचक नाहीं वाटत?
हीरोईन : आणि थोडसं विचित्र?
माणूस ४ : शिवाय या पिक्चरचं नांव घेतांघेतां लोकांचा श्वास बंद होईल.
माणूस १ : गप्प. तुम्हीं सगळे मूर्ख आहात. तुम्हांला कांही कळत नाही.
सगळेजण : का बॉस?
माणूस १ : नीट लक्ष देऊन ऐकलंत तर तुमच्या लक्षात येईल की बर्‍याच हिट फ़िल्म्सचा मसाला यामध्ये असेल. ’इश्क’ म्हणजे रोमांस; ’दिल तो पागल है’ म्हणजे अमर संगीत; ’गजिनी’ म्हणजे आमीर खानी ऍक्शन; ’मेजरसाब’; ’दिलवाले दुल्हनिया’; ’शोले’; ’हम आपके हैं कौन’ म्हणजे कौटुंबिक मसाला. आणि काय हवंय आपल्याला?
माणूस २ : पण सार, मेजरसाब एक मेजर फ़्लॉप होता, आणि थियेटर्समधून लवकर रिटायर झाला होता.
माणूस १ : पण त्यांत सर अमिताभ होते. शिवाय ’मेजरसाब’ म्हटलं की देशभक्ति आली.
माणूस ४ : पण सर, पिक्चरची स्टोरी?
माणूस १ : (संतापून) मी आधीच सांगितलंय, मला हिट फ़िल्म बनवायची आहे, स्टोरीवाली फ़िल्म नव्हे. कळलं?
माणूस ४ : कळलं.
माणूस १ : अरे बाबा, आपल्या फ़िल्मचं नांव ऐकून मोठमोठ्या कंपनी आपल्याला नकद नारायण, म्हणजे फायनान्स, देतील, फ़िल्म बनायच्या आधी -- आणि सरकार फ़िल्म टॅक्स-फ़्री करेल फिल्म पूर्ण झाल्यावर.
हीरोईन : ते कसं?
माणूस १ : ए पोरगी, तू आपला दिमाग जास्त वापरू नकोस. आपलं सरकार कलात्मक म्हणजे आर्ट फिल्म्सना खूप एनकरेज करतंय. आणि आपल्या फ़िल्मचं नांवच किती आर्टी आहे. आर्ट फिल्म्सची पहिली अट म्हणजे त्यांची नावं लांबलचक असली पाहिजेत.
माणूस ३ : आठवतंय. "चंपा और चमेली की चमकती साडीमें खूनका लाल रंग क्या कर रहा है?" या पिक्चरला एका फॉरेन फ़िल्म फ़ेस्टीवलमध्ये कुठलातरी अवॉर्ड देखील मिळाला होता.
माणूस १ : (खुश होऊन) आतां कसं बोललास, मेरे चमचे? आपल्या पिक्चरने सरकार आणि जनता दोघांनाहि टोप्या घालता येईल. व अजून थोडा जास्त त्रास घेतला की एकदोन इण्टरनॅशनल फ़िल्म फ़ेस्टिवल्समध्ये जायचा चान्स सुद्धां मारता येईल.
माणूस ४ : पण सर, स्टोरी हवीच ना?
माणूस १ : (वैतागून) तुला स्टोरीच ऐकायची आहे ना? मग ऐक. सगळे बसा व स्टोरी ऐका. (सगळेजण भोवती बसतात.) या फ़िल्मची स्टोरी एकदम ओरिजिनल आहे. फ़िल्मचा हीरो एकदम गरीब आहे. त्याचं प्रेम एका अत्यंत श्रीमंत मुलीवर बसतं.
माणूस २ : ब्रिल्लियण्ट, सर.
माणूस ३ : वाह! क्या बात है, सर! यह हुई ना बात!
माणूस ४ : (घाबरत) पण सर, ही स्टोरी सर्वच फिल्म्समध्ये असते.
माणूस १ : पुन्हां मध्ये बोललास? या स्टोरीमध्ये ट्विस्ट आहे. ए स्टोरी-रायटर, ट्विस्ट म्हणजे काय माहीत आहे ना? (सगळेजण माना डोलावतात.) हीरो नोकरीसाठी अमेरिकेला जायचं ठरवतो.
माणूस २ : Simply brilliant, sir.
हीरो : म्हणजे मला अमेरिकेला जायचा चान्स!
माणूस ४ : पण सर, अमेरिकेचा व्हिसा ईझीली मिळत नाही.
माणूस १ : चुप्प. अमेरिकेचा व्हिसा नसेल मिळत तर हीरोला दुबईला पाठवूं. तर ठरलं, हीरो नोकरीसाठी परदेशांत, म्हणजे दुबईला जातो.
हीरोईन : (डोळे मिटून स्वप्नांत रंगते.) दुबई --- सोनेका शहर.
माणूस १ : (झोपायची खूण करीत) सोनेके लिये तुम्हांला दुबईलाच जायला नको कांही.
हीरोईन : (लाजून) इश्श, सोनेका शहर म्हणजे झोपण्यासाठी जायचं शहर असं नव्हतं मला म्हणायचं. दुबई म्हणजे सोन्याचं शहर, सिटी ऑफ गोल्ड.
माणूस ४ : सर, दुबईचा व्हिसा ...
माणूस १ : ... मिळतो. दुबईला वर्षभर कांही ना कांही चालूच असतं --- दुबई स्प्रिंग शॉपींग फेस्टीवल, नाहीतर दुबई समर सरप्राइझ नाहीतर विण्टर शॉक. टूरिस्ट व्हिसा सहज मिळेल. तर ठरलं, हीरो नोकरीसाठी दुबईला जातो.
हीरोईन : इथं आपल्याला एक ट्विस्ट देतां येईल.
माणूस २ : काय?
हीरोईन : हीरोईन हीरोच्या पाठोपाठ दुबईला जाते.
माणूस २ : यांत ट्विस्ट काय आहे?
हीरोईन : Titanic फ़िल्ममध्ये हीरो हीरोईनचा पाठलाग करून शिपवर चढतो ...
माणूस ४ : अहो, पण ती स्टोरी तशी नाही. मी पाहिलंय ते पिक्चर बर्‍याच वेळां. त्याची कॉपी करून मी एक कथा देखील लिहिलीय. ऐकवूं?
हीरोईन : आतां नको. गप्प रहा तुम्हीं. तर आपली हीरोईन हीरोचा पाठलाग करून दुबईला जाते.
माणूस १ : मॅडम, यांत ट्विस्ट काय आली?
हीरोईन : हीरोईन विमानाने जात नाही. ती जाते एका शिपने.
माणूस ४ : पण शिपनेच कां?
हीरोईन : तुम्हीं गप्प रहा पाहूं. मी हीरोईन आहे आणि मी सांगते म्हणून ती शिपने जाते. जेव्हांपासून मी Titanicची DVD पाहिलीय तेव्हांपासून मलासुद्धां सारखं वाटतंय ... माझं किनई मुळी स्वप्नच आहे की मीसुद्धां एखाद्या ट्रॅजडी फिल्ममध्ये लीड रोल करावा.
माणूस १ : (बाजूला) बाई, तुमचे सगळेच पिक्चर्स ट्रॅजडी असतात.
माणूस २ : निदान प्रेक्षकांसाठी.
माणूस ३ : आणि निर्मात्या-दिग्दर्शकांसाठी देखील.
माणूस १ : मॅडम, माझं हे पहिलं हिंदी फिल्म असेल. Titanic बनवायला माझ्याकडे तेवढा पैसा नाही. तसली शिप बनवायला खूप पैसा लागतो.
हीरोईन : नो प्रॉब्लेम, बॉस. मग आपण शिप ऐवजी बस दाखवूंया. बास?
हीरो : (हंसत) दुबईला, अन बसमधून? आपलं भुगोलाचं नॉलेज अगाध दिसतंय.
माणूस ४ : इथं कहाणीत एक ट्विस्ट देतां येईल. टायटॅनिकमध्ये शिप समुद्रात बुडते. आपल्या फिल्ममध्ये बस गटारात बुडलेली दाखवता येईल.
माणूस २ : Simply brilliant,सार. नाहींतरी आपल्याकडे गटारं जरा जास्तच झालीयत.
माणूस १ : (संतापून) गप्प, तू चमचा कुणाचा आहेस, माझा का याचा?
माणूस २ : तुमचाच, सर. चमचा नंबर वन.
माणूस १ : मग मला ठरवूं दे, आपल्या बसला गटारांत बुडवायचं, का समुद्रात --- की आकाशात.
माणूस ४ : (निराश होऊन) येस, सर.
माणूस ३ : सर, पैशांचा प्रॉब्लेम आपल्याला सहज सोडवतां येईल.
माणूस १ : तो कसा काय?
माणूस ३ : वेगवेगळ्या सीन्सकरितां आपल्याला वेगवेगळे स्पॉन्सर्स घेतां येईल.
माणूस २ : Brilliant, sir.
माणूस ३ : एक सीन, एक जाहिरात --- दुसरा सीन, दुसरी जाहिरात --- तिसरा सीन, तिसरी जाहिरात ---
माणूस १ : पुरे. कळलं. आतां शहाणपणाचं बोललांत.
हीरो : पुढे काय होतं? तुमची स्टोरी खूप दिलचस्प आहे. तर हीरो नोकरीसाठी दुबईला जातो.
हीरोईन : (मध्येच) हीरोईन त्याचा पाठलाग करीत शिपने दुबईला जाते.
माणूस १ : (वैतागून) उंटाच्या पाठीवरून जाईल.
माणूस २ : ... किंवा गाढवाच्या शेपटीला धरून ---
माणूस १ : तें हीरो दुबईला गेल्यावर ठरवतां येईल. तर आधी हीरो दुबईला जातो.
हीरोईन : आणि हीरोईन त्याच्या पाठोपाठ दुबईला येते --- शिपवरून --- (पटकन जीभ चावते.) किंवा उंटावरून, ship of the desert. (हीरोला) माझं जनरल नॉलेज अगाध आहेच मुळी.
माणूस १ : गप्प रहा. कसं जायचं ते नंतर ठरवता येईल. एवढं ठरलं की हीरो नोकरीसाठी दुबईला जातो व हीरोईन त्याच्या पाठोपाठ येते. दुबई शॉपींग फेस्टीवलच्या गर्दीत हीरो-हीरोईन वेगळे होतात.
माणूस २ : Brilliant sir. Separation scene. एक सॅड सॉन्ग.
माणूस १ : फिल्मच्या शेवटच्या सीनला ते दोघेही दुबईमधील अजून एका फेस्टीवलच्या वेळी एकत्र येतात आणि त्यांचं लग्न होतं.
माणूस ४ : आणि ते दोघे मधुचंद्रासाठी ... म्हणजे हनीमूनसाठी अमेरिकेला जातात. दुबईहून अमेरीकन व्हिसा मिळायला फारसा त्रास होत नाही.
माणूस १ : (वैतागून) निर्माता-दिग्दर्शक कोण आहे?
माणूस ४ : तुम्हीं.
माणूस १ : स्टोरी कुणी लिहिलीय?
माणूस ४ : तुम्हीं.
माणूस १ : मग हनीमूनला कुठे जायचं तेही मलाच ठरवूं दे. कळलं?
माणूस ३ : Brilliant, sir.
माणूस २ : Simply brilliant, sir.
माणूस ४ : (खालच्या मानेनं) खरोखर brilliant, sir.
माणूस १ : तर हीरो-हीरोईन हनीमूनसाठी जातात, पण अमेरिकेला नाहीं. इथं स्टोरीत अजून एक ट्विस्ट आहे.
सगळेजण : काय?
माणूस १ : हीरो-हीरोईन हनीमूनसाठी सुदान किंवा इथिओपियाला जातात.
हीरो : (निराशेने) माझं शॉपींग बुडालं. पण या उपाशी राष्ट्रांत हनीमून कशासाठी?
माणूस १ : तीच तर ट्विस्ट आहे. इथें स्टोरीला एक human angle देतां येईल.
हीरोईन : मी love triangle ऐकलाय, पण human angle?
माणूस १ : हीरोईन दु:खी व पीडीत लोकांची सेवा करायला इच्छुक असते.
हीरोईन : पण कां?
माणूस १ : कारण ती पूर्व जन्मांत मदर टेरेसा असते.
माणूस २ : Brilliant, sir.
माणूस ३ : Simply brilliant, sir.
माणूस १ : (खुष होऊन) थॅंक यू ... थॅंक यू. पुनर्जन्माच्या स्टोरीवर आधारित पिक्चर्स नेहमीच हिट असतात.
माणूस २ : महल, मधुमती, मेहबूबा.
माणूस ४ : पण या हिटमध्ये स्टोरी कुठे फिट होते?
माणूस १ : चुप्प. मी एवढा वेळ सांगत होतो ती स्टोरीच होती. आणि मी पुन्हां सांगतो, मला हिट फिल्म बनवायचीय, फिट फिल्म नव्हे.
माणूस २ : सर, फिल्म सुरू व्हायच्या आधी एक सुचना द्यायची ...
माणूस ३ : Brilliant. काय सूचना द्यायची?
माणूस २ : सूचना द्यायची की जर कुणाला आमच्या फिल्ममध्ये स्टोरी आढळली तर आम्हांला जरूर कळवा.
माणूस १ : चमचा नंबर वन, ग्रेट आयडिया.
माणूस ४ : पण सर, अशी नोटिस फक्त फालतू विनोदी चित्रपटांमध्ये देतात. From Chandani Chowk To China; Housefull, वगैरे.
माणूस १ : गप्प. काय स्टोरी रायटर, आतां तरी झालं ना समाधान?
( माणूस ४, लेखक, हताशपणे मान डोलावतो. )

( दृश्य ३ )

निवेदक : (प्रवेश करीत) तर मंडळी, आतां तुम्हीं पाहिलंत की मिस्टर मसालेदार व कंपनीने मराठी चित्रपटसृष्टीचा त्याग करून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करायचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. सुदैवाने लवकरच चित्रपट पूर्ण देखील झाला. महाराष्ट्र सरकारच्या कला विभागाने चित्रपटाचं distribution -- शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर चित्रपटाचं वितरण हाती घेतलं, व मुंबईच्या हिंदी चित्रपटांच्या भयाण जंगलांत अजून एका चित्रपटाची भर पडली, "इश्कमें पागल गजिनी मेजरसाब दिलवाले दुल्हनियाके शोले हैं कौन?" हाँ, तुम्हां सगळ्यांना या मसालेदार चित्रपटाची झलक दाखवण्यापूर्वीं एक महत्वाची सूचना देणं आवश्यक आहे. या चित्रपटांतील सर्व पात्रं संपूर्णपणे काल्पनिक असून कुणाही पात्राचे साम्य एखाद्या जीवित, मृत, अद्याप जन्मास येणार्‍या अथवा यानंतर मृत होण्यार्‍या व्यक्तीशी आढळून आलेच तर तो केवळ एक योगायोग असेल.
( याचवेळी आतून एक व्यक्ति घाईघाईने येऊन निवेदकाशी हुज्जत घालायला लागते. )
व्यक्ति : अहो महाराज, एखाद्या राजकारणी नेत्यासारखं कितीवेळ बोलत रहाणार तुम्हीं? दिग्दर्शकसाहेब सिनेमा सुरूं व्हायची वाट पहात आहेत. आपल्या सगळ्या नातेवाईक अन मित्र मंडळींना त्यांनी थियेटरमधे डांबून ठेवलंय. सिनेमा संपायच्या आधी कुणीहि बाहेर जायचं धाडस करूं नये म्हणून चित्रपटगृहाची सगळी दारं बाहेरून बंद केलेली आहेत. तुम्हीं अजून बडबडत राहिलात तर लवकरच दंगा सुरूं होईल.
निवेदक : (प्रेक्षकांना) बाय, नंतर भेटूंच. आणि हो, चित्रपट हिंदीत असल्यामुळे यापुढचा भाग हिंदीत असेल याची नोंद घ्या.
( दोघेही घाईघाईने आत निघून जातात. )

( दृश्य ४ )

( हीरो झाडू घेऊन प्रवेश करतो व गात-गात झाडू मारायला लागतो. )

हीरो : सबकुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी, सच है दुनियावालों के हम हैं भिखारी ... (अचानक त्याच्या पाठीत कळ भरते व तो जागच्या जागी स्तब्ध उभा राहून ओरडायला लागतो ...) आह... ऊह ... आऊच. )
(दुसर्‍या बाजूने एक व्यक्ति आपल्या हातात मोठी ट्यूब घेऊन प्रवेश करते. ट्यूबवर लिहिलेलं आहे "खिसक". )
व्यक्ति : इस फिल्मका यह हिस्सा स्पॉन्सर किया है खिसक फार्मास्युटिकल ने. पीठका दर्द हो, या जोडोंका दर्द, सब दर्दसे राहत पाईये. आह से आहा और आऊच तक.
( हीरोईन प्रवेश करते व ती ट्यूब खेचून घेते व हीरोकडे जाते. ट्यूबमधील औषध हीरोला लावते. हीरो परत हालचाल करायला लागतो. )
व्यक्ति : खिसक लगाइये और अपने पीठदर्दसे कहिये, "खिसक". (बाहेर निघून जातो.)
( हीरोईन हीरोच्या हातातील झाडू भिरकावून देते. काही क्षण दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून पहात रहातात. अचानक हीरोईन गायला लागते, "धक धक करने लगा, के मेरा जियरा डरने लगा ..." याच वेळी तिचा बाप प्रवेश करतो. )
बाप : बेटी, यह क्या कर रही हो तुम? मुझे तुमसे यह उम्मीद नहीं थी. कहाँ तुम, और कहाँ यह भिखारी? तुमने मुझे कहींका नहीं छोडा, तुमने मेरी नाक कटवा दी. मेरे खानदानकी इज़्ज़तको इस भिखारीकी टोकरीमें फेंक दिया. क्या तुम पागल हो गई हो?
हीरोईन : पिताजी, अगर प्यार करना पाप है, प्यार करना पागलपन है, तो हाँ, मैं पापी हूँ, मैं पागल हूँ. मेरा दिल पागल है ...
( हीरोईन आपलं ’दिल’ हातांत घेऊन ’धक, धक’ करीत गायला लागते, "दिल तो पागल है, दिल दीवाना है ..." तिचा पिता रागाने तिचं ’दिल’ तिच्या हातांतून खेंचून घेतो व त्याचे तुकडे करायचा प्रयत्न करतो. )
हीरोईन : जान-ए-जिगर, तुम डरो नहीं --- यह दिल इतना कमज़ोर नहीं कि मेरे ज़ालीम बापके तोडनेसे टूट जायेगा.
( आतून दुसरी व्यक्ति हातात फ़ेवीकॉलची ट्यूब घेऊन प्रवेश करते. )
व्यक्ति २ : इस फिल्मका यह हिस्सा फ़ेवीकॉलका स्पॉन्सर किया हुआ है. क्या आपका दिल कमज़ोर है? तो फ़ेवीकॉल इस्तेमाल कीजीये और अपने दिलको मज़बूत बनाइये. सब टूटे हुए दिलोंको जोडनेके काम आये फ़ेवीकॉल. (पिताकी ओर देखकर) लगे रहो, लगे रहो. यह फ़ेवीकॉल का जोड है. फ़ेवीकॉल ऐसा जोड लगाए जो बुरे से बुरा तोड ना पाये.
( व्यक्ति २ बाहेर निघून जाते. )
बाप : नादान लडकी, मुझसे चीटींग करती हो? फ़ेवीकॉलसे जुडा हुआ दिल लेकर घूमती हो? लडकी, अगर तुम्हारा दिल फ़ेवीकॉलसे जुडा हुआ है तो मेरे घरकी दीवारें भी हाथी छाप सीमेण्ट से बनी हैं. तुम्हें ले जाकर घरकी चार दीवारोंमे बंद करता हूँ. फिर देखता हूँ कि तुम उन दीवारोंको कैसे तोडती हो.
हीरोईन : (तडपकर) पिताजी ...
बाप : पिताजीकी बच्ची, चल मेरे साथ. और तुम भिखारी की औलाद, मेरी बेटीसे दिल लगाना है, तो पहले उसे किसी लायक बनाओ.
हीरो : (खुश होकर) मतलब अपने दिलको भी फ़ेवीकॉलका बनाऊँ?
बाप : (हडबडाकर) नादान, मेरा मतलब यह नहीं था. मेरा मतलब है कि पहले कुछ पैसे-वैसे कमाओ ---
हीर्रो : ससुरजी, आप मुझे घर जमाई बनाएंगे?
बाप : खामोश --- बदतमीज़ --- जंगली --- जानवर --
हीरो : ससुरजी, हम भी कुछ कम नहीं --- दिल तो पागल है --- हम दिल दे चुके हैं सनम --- प्यार तो होना ही था --- मेरा दिल इसके प्यारसे हाऊसफ़ुल है ---
बाप : बदमाश कंपनी, फिल्मोंके नाम लेकर मुझे पटानेकी नाकाम कोशिश कर रहे हो? पहले मुंबई छोडकर कहीं और चले जाओ, कुछ बनो, डॉलर्स कमाओ और फिर शादीकी सोचो. निकल जाओ. (निघून जातो.)
हीरो : प्रियतमे, तुम्हारे बापने मेरी बहुत इंसल्ट की है. अब तो मुझे बंबई ...
हीरोईन : नादान, बंबई भूल जाओ, मुंबई कहो. नहीं तो, ना चाहते हुए भी निकाले जाओगे.
हीरो : ठीक है, अब तो मुझे मुंबई छोडकर जाना ही होगा. प्लीज़, मुझे मत रोको.
हीरोईन : मैंने तुम्हें कब रोका है? लेकिन अब तुम कहाँ जाओगे? क्या करोगे?
हीरो : (गाते हुए) अब कहाँ जाएं हम? (थोडा रुककर) ए, क्या बोलती तू?
हीरोईन : ए, क्या बोलूँ मैं?
हीरो : सुन ---
हीरोईन : सुना ---
हीरो : आती क्या खण्डाला?
हीरोईन : क्या करूँ आके मैं खण्डाला?
हीरो : घूमेंगे, फिरेंगे, नाचेंगे, गायेंगे, ऐश करेंगे, और क्या?
हीरोईन : ऐश अब अभीकी हो चुकी है. और तुम्हें ज़रा भी शर्म नहीं आती? पिताजीने तुम्हारी इतनी इंसल्ट की और फिर भी तुम खण्डाला जानेकी सोच रहे हो?
हीरो : तो तुम्हीं बताओ, मैं क्या करूं?
हीरोईन : मेरी कुछ सहेलियाँ कह रही थी कि दुबई शॉपींग फ़ेस्टीवल फिरसे शुरू हो रहा है. और वहाँके सरकार को कुछ भंगियोंकी ज़रूरत है.
हीरो : वाह, क्या आयडिया है सरजी! मैं दुबई चला जाता हूँ. तुमभी चलो.
( आतून व्यक्ति ३ प्रवेश करते. )
व्यक्ति ३ : इस फ़िल्मका यह हिस्सा Pet Airways का स्पॉन्सर किया है. Buy one Pet Airways ticket and get one ticket free. Visa will be arranged on arrival.
हीरो : चलो जान-ए-मन. मौसम भी है, मौका भी है, टिकट भी फ़्री है.
हीरोईन : लेकिन मैं फ़्री नहीं हूँ. पहले तुम चले जाओ. जल्द ही पिताजीको उल्लू बनाकर मैं भी आ जाऊँगी.
हीरो : जैसा तुम कहो. मैं हूँ ज़ोरू का गुलाम ... (गाते हुए) बाय, बाय, मिस, गुड नाईट, फिर हम मिलेंगे.
हीरोईन : (गाकर) तू जहाँ जहाँ रहेगा, मेरा साया साथ होगा --- मेरा साया, मेरा साया...
( दोघेही विरुद्ध दिशांनी निघून जातात. )

( दृश्य ५ )
( दुबईमधील एक रस्ता. भिंतींवर जागोजागी "Dubai Shopping Festival"ची पोस्टर्स लागलेली आहेत. थोड्या वेळाने हीरो प्रवेश करतो. )
हीरो : दुबई, the City of Gold. क्या बात है, कहीं सोनेका पेड नज़र नहीं आता.
( एक सुंदर मुलगी प्रवेश करते. तिच्या अंगावर सोन्याचे दागिने भरलेले आहेत. कांही वेळ हीरो तिच्याकडे थक्क होऊन पहात रहातो. )
मुलगी : हेल्ल्ल्लो हॅण्डसम. दुबईमे नये लगते हो. और इतने हैरान क्यों लगते हो?
हीरो : मैंने सुना था कि दुबईमें सोनेके पेड होते हैं, लेकिन सोनेकी लडकी पहली पहली बार देख रहा हूँ.
मुलगी : तो जी भर देख लो. (गाकर) बार बार देखो, हज़ार बार देखो, मैं देखने की चीज़ हूँ, हमारे दिलरुबा. टालि हो ... टालि हो .... पर तुम यहाँ क्या करने आये हो?
हीरो : मैं मुंबईसे नौकरीकी तलाशमें आया हूँ. तुम कौन हो?
मुलगी : मैं थर्ड ऍंगल हूँ.
हीरो : यह थर्ड ऍंगल क्या है?
मुलगी : जब एक हीरो और दो हीरोइन्स या फिर एक हीरोईन और दो हीरो होते हैं तब थर्ड ऍंगल पैदा होता है. यशराजकी फिल्मोंमें अक्सर यह पाया जाता है. जैसे ... जैसे "दिल तो पागल है" में करिश्मा कपूर है. कुछ समझमें आया?
हीरो : करिश्मा कपूरजी, (गाते) तुमसे मिलकर, ऐसा लगा तुमसे मिलके, अरमाँ हुए पूरे दिलके. कुछ आया समझमें?
मुलगी : आया, लेकिन मुझे करिश्मा कपूर मत कहो. वह तो फ़िल्मोंसे रिटायर्ड हो गयी हैं. नाम देना ही है तो मुझे करीना कपूर कहो; या फिर कटरिना कैफ़ कहो --- या फिर ऐश्वर्या राय बच्चन कहो.
हीरो : बचपना छोडो. इनमेंसे किसीका भी नाम लूँगा तो मेरी जान खतरेमें होगी. जाने भी दो ना, नाममें क्या रखा है? तुम्हारी नज़रोंमें अजीबसा जादू है. क्या मैं इसी बातपर एक गाना गा सकता हूँ? बहुत देरसे कोई गाना ही नहीं गाया. (गाकर) मैं कोई ऐसा गीत गाऊँ, जो आरज़ू जगाऊँ, अगर तुम कहो.
मुलगी : क्या तुम्हें "डर" फ़िल्मका "जादू तेरी नज़र..." गाना आता है?
हीरो : गाना पुराना है लेकिन मुझे ज़बानी याद है. (गाते हुए) जादू तेरी नज़र, खुशबू तेरा बदन ... तू हाँ कर, या ना कर. (मूडमें आकर अपना मुँह उसके मुँहके पास ले जाता है और झटसे दूर हटाता है.) खुशबू तेरा बदन, लेकिन बदबू तेरी ये साँस.
( दृश्य ’फ़्रीझ’ होतं. एका बाजूने व्यक्ति ४ टूथपेस्टची भलीमोठी ट्यूब हातात घेऊन प्रवेश करते. ट्यूबवर लिहीलेलं आहे, "मुँह खोल". )
व्यक्ति ४ : फिल्मके इस अगले हिस्सेके स्पॉन्सर हैं "मुँह खोल" टूथपेस्ट. क्या साँसकी बदबू आपको एक दूसरेसे दूर रखती है? अपना मुँह खोलिये और "मुँह खोल" टूथपेस्टसे ब्रश कीजिये. "मुँह खोल" आपके मुँहके अंदर, और साँसकी बदबू बाहर.
( मुलगी त्या व्यक्तीच्या हातून ट्यूब घेऊन तोंड धुतल्याची ऍक्शन करते. त्याच क्षणाला हीरो परत गायला सुरवात करतो. )
हीरो : जादू तेरी नज़र, खुशबू तेरा बदन ...
( ऍक्शन स्तब्ध होते. व्यक्ति ५ साबणाची वडी घेऊन प्रवेश करते. साबणावर लिहिलंय, "सफ़ेद". )
व्यक्ति ५ : इस गानेको स्पॉन्सर किया है "सफ़ेद" साबन बनानेवाली कंपनीने. फिल्मी सितारोंका खुशबूदार साबन, "सफ़ेद" साबन. सफ़ेदसे नहाईये और पाईये सफ़ेदीकी झंकार, बार बार. "सफ़ेद" साबनसे पाईये ना सिर्फ सफ़ेदीकी झंकार, पाईये खुशबूदार बदन. (साबणाची वडी हीरोईनच्या हातात देऊन निघून जाते.)
हीरो : ऐ हसीना, तो अब मैं गाना पूरा करूँ? (गाते हुए) जादू तेरी नज़र, खुशबू तेरा बदन ... तू हाँ कर, या ना कर ...
मुलगी : (गाते हुए) मेरे मेहबूब मेरे सनम, शुक्रिया मेहेरबानी करम. कब मैंने यह सोचा था, कब मैंने यह जाना था, तुम इतने बदल जाओगे, तुम इतना मुझे चाहोगे, तुम इतना प्यार करोगे, तुम यूँ इकरार करोगे ...
हीरो : ... मेरे मेहबूब, मेरे सनम, शुक्रिया मेहेरबानी करम ...
( दोघेही नाचत असतानाच हीरोईन प्रवेश करते व त्यांना पाहून तोंड फिरवते. )
हीरोईन : जानम, मुझे तुमसे यह उम्मीद नहीं थी. मेरी फ़्लाईट थोडीसी लेट क्या हुई, तुम किसी औरके साथ गुलछर्रे उडाने लगे! (गाते हुए) मेरे दिलके तुकडे हज़ार हुए, कोई यहाँ गिरा, कोई वहाँ गिरा...
हीरो : मैं और क्या करता? मेरा वक्त गुज़र नहीं रहा था, तो मैंने सोचा थोडा बहक जाऊँ. तभी यह सामने आई ...
हीरोईन : ऐ नादान लडकी, निकल जा. जबतक मैं हूँ, मेरी जगह लेनेकी सोचना भी नहीं.
( मुलगी रागाने पाय आपटीत निघून जाते. )
हीरो : चलो जानेमन, हम जुमैरा चलते हैं. वहाँ मस्त मेला लगा है. घूमेंगे, नाचेंगे, ऐश करेंगे और क्या? अब हमारा मिलन हुआ है, तो अगला सीन ज़रूर जुदाईका होगा. देखॊ, मौसम भी कितना सुहाना है. जल्दी चलो.
( दोघेही हातांत हात घालून गुणगुणत निघून जातात. व्यक्ति ६ हातात घड्याळ घेऊन प्रवेश करते. )
व्यक्ति ६ : अब मौसम का हाल सुनिये "घडी वॉचेस" के सौजन्यसे. सही वक्तका अंदाज़ा लगाना हो, तो ले आईये घडी वॉचेस. अब मौसमका आँखो देखा हाल सुनिये. दुबईके आसमानमें तूफानी बादल मँडरा रहे हैं. बहुत जल्द तूफान आयेगा और हमारे हीरो-हीरोईन एक दूसरेसे बिछड जानेकी संभावना है. लेकिन थॊडीही देरके लिये. उनके फिरसे मिलनेकी शुभ घडीका इन्तज़ार कीजिए घडी वॉच पहनकर.
( घडी जाहिरातवाली व्यक्ति निघून जाते. हीरो व हीरोईन वेगवेगळ्या बाजूने प्रवेश करतात. )
हीरो : (गात) तू छुपी है कहाँ, मैं तडपता यहाँ. तेरे बिन सूना सूना दुबईका समाँ ... तू छुपी है कहाँ ....
हीरोईन : (गात) आवाज़ दो हमको, हम खो गये. कब नींदसे जागे, कब सो गये ...
( हीरो-हीरोईन एकमेकांना शोधत चकरा मारीत असतांनाच एक मुलगा हातांत काही वर्तमानपत्रं घेऊन प्रवेश करतो. )
मुलगा : बिछडे हुओंको फिरसे मिलाना है, तो फोन उठाईए और नंबर मिलाईए गल्फ़ के जानेमाने अखबार "गल्फ़ टाईम्स टूडे" के क्लासिफ़ाइड सेक्शनसे. हम आपके लिये ले आते हैं कलकी खबर आज. बिछडे हुओंको एक पलमें मिलाता है "गल्फ़ टाईम्स टूडे".
हीरो : ए लडके, क्या तुम मुझे एक अखबार दे सकते हो?
मुलगा : (वर्तमानपत्र त्याला देत) शौकसे लिजीए --- बिल्कुल मुफ़्त --- शॉपींग फ़ेस्टीवलकी खुशीमें.
( दुसर्‍या बाजूने हीरोईन येते. )
हीरोईन : अगर मुफ़्त है तो एक पेपर मुझे भी दे दो. मेरा हीरो कहीं खो गया है.
मुलगा : (पेपर देत) तो उसकी तस्वीर हमारे अखबारमें ज़रूर छपी होगी. आपका मिशन कामयाब हो. Best of luck. (निघून जातो.)
( दोघेही आपापल्या जागी पेपर उघडून पहातात, नंतर एकमेकांकडे पहातात व जवळ धावतात. )
हीरो : (गात) तुम जो मिल गये हो, ऐसा लगता है, के जहाँ मिल गया ...
हीरोईन : यह नहीं, हम "मिलन" पिक्चरका वह फ़ेमस गीत गाते हैं. "हमतुम युगयुगसे ये गीत मिलनके, गाते रहेंगे ... हम तुम ...
( ते दोघे नाचत-गात असतांना हीरोच्या हातातला पेपर हीरोईनच्या डोक्याला लागतो. ती अचानक गायचं थांबवून विचित्रपणे इथंतिथं बघायला लागते. )
हीरोईन : बस करो. गानेशानेमें बहुत वक्त बरबाद हुआ. मुझे बहुत कुछ करना है.
हीरो : तो हम दोनोंकी मंज़ील एकही है. मुझेभी बहुत कुछ करना है -- जैसे की शादी करके अपना घर बसाना है. बच्चे पैदा करने हैं. और उससे पहले हनीमून के लिये जाना है.
हीरोईन : चलो बेटा, जल्दी चलो. हमें हमारे हनीमूनपर ले जानेके लिये हवाई जहाज़ सुदान और इथीयोपिया जानेके लिये तैयार है.
हीरो : सुदान? इथीयोपिया? लेकिन वहाँ क्यों?
हीरोईन : क्योंकि वहाँके भूखे-प्यासे लोग मेरी प्रतीक्षा कर रहें हैं.
हीरो : तुम्हारी प्रतीक्षा?
हीरोईन : (मुस्कराकर) लगता है, तुमने मुझे पहचाना नहीं. मैं पिछले जनममें मदर टेरेसा थी. लेकिन इस जनममें बातोंमें वक्त बरबाद मत करो. मुझे जाना होगा.
हीरो : (लंबी साँस लेकर) काश पिछले जनममें तुम प्रिन्सेस डायना होती.
हीरोईन : तो क्या होता?
हीरो : तो हम अपने हनीमूनके लिये सुदान और इथीयोपिया नहीं, लंडन जाते.
हीरोईन : लंडन ड्रीम्स बादमें देखेंगे. मैं अगले जनममें और अगली पिक्चरमें प्रिंसेस डायनाही बनूँगी. मैंने इसी शर्तपर इस पिक्चरमें काम किया है. अब चलो.
( हीरो और हीरोईन निघून जातात. निवेदक प्रवेश करतो. )
निवेदक : हीरो-हीरोईन आपल्या मधुचंद्रासाठी सुदान, इथिओपिआ व इतर भूखग्रस्त देशांना जातात. तिथे नेमकं काय होतं याचं सविस्तर चित्रण तुम्हाला दाखवून तुमच्या भुका घालवायचा आमचा मुळीच बेत नाही. तर आमचा हा मसालेदार हिंदी चित्रपट आम्हीं इथंच आवरतो. पण "समाप्त" किंवा "दी एण्ड"चा पडदा पाडण्याआधी आम्ही तुम्हाला कांही प्रेक्षकांच्या काही मुलाखती दाखवूं इच्छितो. लोकांच्या आवडत्या "क्रेझी" चॅनलवर आधीच लोकप्रिय झालेल्या "हिट गई पिट" या कार्यक्रमासाठी या खास मुलाखती घेतल्या गेलेल्या आहेत. तर चला, पाहूंया "हिट गई पिट" हा खास कार्यक्रम, नुकत्याच सिनेगृहांतून बाहेर पडलेल्या काही लोकांबरोबर.
( एका बाजूने एक देखणी वार्ताहर मुलगी हातांत मायक्रोफोन घेऊन प्रवेश करते. दुसर्‍या बाजूने येत असलेल्या लोकांना जबरदस्तीने थांबवून ती त्यांना विचारायला लागते. )
वार्ताहर मुलगी : प्लीज़, तुम्हीं आताच पाहिलेल्या या चित्रपटाबद्दल आपलं अमूल्य मत द्याल?
प्रेक्षक १ : (गोंधळून) चित्रपट? कुठला चित्रपट?
वार्ताहर मुलगी : हाच, "इश्कमें पागल गजिनी मेजरसाब दिलवाले दुल्हनियाके शोले हैं कौन?" चित्रपट.
प्रेक्षक १ : मी सांगू शकणार नाहीं.
वार्ताहर मुलगी : पण कां?
प्रेक्षक १ : कारण मी सिनेगृहात होते पण चित्रपट पाहिला नाही.
वार्ताहर मुलगी : (गोंधळून) म्हणजे?
प्रेक्षक १ : हल्ली इलेक्ट्रिसिटीचे दर इतके महागडे झालेले आहेत व लोडशेड्डींग इतकं वाढलंय की घरी बसण्यापेक्षां एखाद्या वातानुकूलित, म्हणजे एयर-कण्डिशण्ड थियेटरमध्ये बसून झोप काढलेली परवडते. धन्यवाद...
वार्ताहर मुलगी : (दुसर्‍या प्रेक्षकाला थांबवून) तुम्हांला चित्रपट कसा काय वाटला?
प्रेक्षक २ : चित्रपटांत गोष्ट नांवाची गोष्टच नाही. कुणी खलनायक नाही. एका प्रसंगाचा दुसर्‍या प्रसंगाशी काही संबंध नाही ...
वार्ताहर मुलगी : बास्स, कळलं. (तिसर्‍या प्रेक्षकाला) आपलं मत काय आहे?
प्रेक्षक ३ : हल्ली सिनेमाची तिकीटं इतकी महाग असतात. आम्हीं निदान तीन तासांचा चित्रपट पहायच्या आशेनं गेलो होतों. निदान पैसा तरी वसूल होतो. फक्त निराशाच पदरी पडली. चित्रपट फारच लहान होता. काय ते म्हणतात ना, एखादी आर्ट फिल्म असावी, तसा.
प्रेक्षक ४ : अन चित्रपटाला कंटाळून बाहेर पडायचं म्हटलं तर तेही शक्य नव्हतं.
वार्ताहर मुलगी : कां?
प्रेक्षक ४ : सिनेमाघराची सगळीं दारं बाहेरून बंद केलेली होतीं.
प्रेक्षक ५ : ओह माय गॉड! निव्वळ डोकेदुखी.
( सगळे प्रेक्षक घाईघाईने निघून जातात. आंतून माणूस १, माणूस २, माणूस ३ व माणूस ४ येतात. वार्ताहर २ त्यांना थांबवतो. )
वार्ताहर २ : प्लीज़, आपण या चित्रपटाबद्दल आपलं मत सांगू शकाल?
माणूस २ : (वार्ताहराला बाजूला घेऊन) आपण चुकीच्या माणसाला विचारताय.
वार्ताहर २ : कां?
माणूस २ : ते या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक आहेत, मिस्टर मसालेदार.
वार्ताहर २ : (हंसत) मग चुकीच्या नाहीं, अगदी बरोब्बर माणसाला प्रश्न विचारला मी. सर, आपल्या या चित्रपटाबद्दल आपलं काय मत आहे?
माणूस १ : हल्ली प्रेक्षकांना नेमकं काय हवं असतं ते त्यांचं त्यांनाच कळत नाही. चांगल्या कथेवर आधारीत चित्रपटसुद्धां आपटतात. चित्रपट यशस्वी झाला तर फालतू कथेवर आधारित चित्रपटांची सुद्धां खूप प्रशंसा केली जाते. माझ्या या चित्रपटांत काय नव्हतं मला सांगा पाहू. आजचे लोकप्रिय हीरो-हीरोईन होते ... लोकप्रिय संगीतकाराचं धाँसू संगीत होतं ... विदेशी लोकेशन्स होतीं ... सुदान-इथिओपिया सारख्या पीडित राष्ट्रांचा सामाजिक प्रश्न मी हाताळला होता. प्रेक्षकांना याचं काय? पण मी अजून आशा सोडलेली नाहीं. माझा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जरी आपटला तरी मी सरकारकडे वशिला लावून हाच चित्रपट झुमरी-तलैय्या सारख्या एखाद्या जागी होणार्‍या एखाद्या आंतर-राष्ट्रीय चित्रपट समारोहासाठी पाठवायचा प्रयत्न करीन. आणि ते सुद्धां जमलं नाहीं तर ...
माणूस २ : ... तर काय, सर?
माणूस ४ : ... मला पुढल्या चित्रपटाची स्टोरी लिहायचा चान्स द्याल?
वार्ताहर २ : ... तर काय कराल, मिस्टर मसालेदार?
माणूस १ : पुन्हां एकदां माझ्या जुन्या व्यवसायाकडे वळेन.
वार्ताहर २ : आणि तो काय?
माणूस १ : मुंबईच्या सिनेसृष्टीतील यशस्वी लोकांसाठी चटपटा व मसालेदार स्वंयपाक करायला लागेन मी. प्रयत्न करूनही अयशस्वी सिनेमे बनवून हात जाळून घेण्यापेक्षां या यशस्वी लोकांच्या किचनमध्ये हात जाळून घेणं पत्करलं.
माणूस ३ : (प्रेक्षकांकडे वळून) तुमच्यापैकी कुणाकडे आहे कां, मिर्चीमसालेदार हिट चित्रपट बनवण्याचा फ़ॉर्म्युला?

* * * * * पडदा * * * * *

(प्रथम लिहिल्याची तारीख: १०/८/१९९८
पुनर्लेखनाची तारीख : २० जून, २०१०)

लेखक
लक्ष्मीनारायण हटंगडी
EC51/B104, Sai Suman CHS,
Evershine City, Vasai (E)
PIN 401208
(suneelhattangadi@gmail.com)