Tuesday, December 22, 2009

सान्ता क्लॉस येतोय !

या ’गोडबोल्या’ व हंसर्‍या चेहर्‍याच्या म्हातार्‍या माणसाच्या आठवणी माझ्या बालपणीच्या अविस्मरणीय आठवणींच्या संग्रहात घर करून आहेत. त्यावेळी मला ’सान्ता क्लॉस’ हा शब्द मराठीत नीट लिहिता येत नव्हता, की त्याचं इंग्रज़ी स्पेलींग सुद्धा येत नव्हतं. सदर्‍याच्या बाहीनं शेंबडं नाक साफ करण्याचा सतत निष्फळ प्रयत्न करणारा छोटासा कारटा होतो मी त्यावेळी. मी लवकर झोपावं म्हणून आई नेहमी मला एका जाडजूड म्हातार्‍याच्या भयानक गोष्टी सांगून घाबरवायची, "तू लवकर झोपला नाहीस तर हा पांढरीशुभ्र दाढीवाला म्हातारा तुला आम्हां सगळ्यांपासून दूर कुठल्यातरी गांवी घेऊन जाईल. त्याचं नाव आहे ’सांता क्लॉस’." आणि कुणीतरी जादू केल्याप्रमाणे मी लगेच झोपी जायचो. त्या दाढीवाल्या म्हातार्‍याची सॉलीड भीति वाटायची मला त्या वेळी !
हा हसर्‍या (?) चेहर्‍याचा, पण मनात भीती निर्माण करणारे लालभडक कपडे घातलेला (लाल म्हणजे धोका, हे समीकरण!) म्हातारा मला पुन्हा दिसत असे तो डिसेंबर महिन्याच्या सुमारास बाबांना त्यांच्या ऑफिसमधे मिळणार्‍या ग्रीटींग कार्ड्सवर. ती चित्रं पाहून माझी अगदी खात्रीच पटली होती की त्या म्हातार्‍याच्या पाठीवर असलेल्या मोठ्या लाल पोत्यात माझ्यासारखीच लवकर न झोपणारी बरीच वात्रट पोरं भरलेली होती.
आणि म्हणूनच डिसेंबरच्या एका संध्याकाळी, जेव्हां बाबांच्या गोर्‍या साहेबाने दिलेल्या एका मुलांच्या पार्टीत मी त्या हसर्‍या म्हातार्‍याला आपलं लाल पोतं घेऊन नाचत येताना पाहिलं, तेव्हा मला आश्चर्याचा गोड धक्काच बसला. मला अगदी चांगलं आठवतंय, जेव्हा त्यानं आपल्या पाठीवरचं लाल पोतं जमिनीवर ठेवलं, तेव्हा त्याला तिथं पाहून मी मोठ्यानं किंचाळून पळूनच जाणार होतो. आणि नेमका भीतीने चक्कर येऊन मी जमिनीवर कोसळणार, तेवढ्यात मला आपल्या पोत्यात कोंबण्याऐवजी आपल्या पोत्यातून एक मस्तपैकी भेट काढून त्यानं माझ्या हातात ठेवली. मी अगदी मोठ्याने ओरडलो खरा पण घाबरून नव्हे, तर आनंदाने !
त्या दिवशी घरी पोचल्यावर मी आईशी चक्क भांडलो की तिने मला त्या सफ़ेद दाढीवाल्या, लालभडक कपडे घातलेल्या, प्रेमळ म्हातार्‍याबद्दल काहीतरी भलत्याच खोट्या दंतकथा सांगून उगीचच घाबरवलं होतं. आणि पहिल्यांदाच माझ्या कोणत्याहि प्रश्नाचं उत्तर आईजवळ नव्हतं. कदाचित याचं कारण हे असणं शक्य होतं की तिच्या मते सांता क्लॉस (एव्हांना मला त्याचं नाव कळून चुकलं होतं !) क्रिस्ती धर्माचं प्रतीक होतं, एक असा धर्म जो ती ना पाळत होती, ना समजत होती.
त्या बालपणीच्या आठवणी खूप मागे सोडून मी बरीच वाटचाल केलीय. आता मला जाणवतंय की त्यावेळी मला व इतर मुलांना आपल्यापासून दूर पळताना पाहून सांता क्लॉसला किती वाईट वाटलं असावं. आणि तेसुद्धा तो इतक्या प्रेमाने सगळ्या मुलांना जवळ बोलावीत असतांना. काही मुलं मला पाहून देखील अगदी तसंच वागायची. हो, सांता क्लॉसच्या भावना मी नीट ओळखून चुकलो आहे.
माझ्या एकुलत्या एक भाचीचा वाढदिवस नाताळ सणाच्या दिवशी, म्हणजे २५ डिसेंबरला, येतो. भारत सोडून पैशांची हिरवळ शोधायला म्हणून मी दुबईच्या रुक्ष वाळवंटात गेलॊ (बापरे बाप !) त्यावेळी मी तिचा वाढदिवस तिथं माझ्या काही छोट्या मित्रांच्या संगतीत साजरा करायला सुरवात केली. एकदा जेव्हा माझ्या चिमुकल्या मैत्रीणीनं मला विचारलं, "दोस्त, या पार्टीला सांता क्लॉस येतोय का?", तेव्हा मी स्वत:लाच विचारलं, "का नाही?" एका म्हातार्‍या क्रिस्ती बाईनं मला लगेच सांता क्लॉसचा झकास पोषाख शिवून दिला, अगदी त्याच्या झुब्बेदार टोपी व लाल पोत्यासकट. तिथल्याच एका सुपर-मार्केटमधून मी पांढरीशुभ्र दाढी असलेला एक मुखवटा विकत घेतला आणि अशा प्रकारे माझ्या सांता क्लॉसच्या रूपाने जन्म झाला.
"सांता क्लॉस येतोय... सांता क्लॉस येतोय," मुलांच्या उत्साहपूर्ण गलक्याने माझं स्वागत केलं. त्या सगळ्यांच्या निष्पाप चेहर्‍यांवर थोडासा अविश्वास व खूपखूप आनंद भरलेला होता. सगळ्या दिशांतून मुलं येत होतीं ... सगळ्या वयाची ... सगळ्या धर्मांची ... सगळ्या सामाजिक स्तरांची. सांता क्लॉसला प्रत्यक्षात बघायचंय या एकाच इच्छेनं त्या सर्वांना एका सूत्रात बांधलेलं होतं. त्या सर्वांना "याची देही, याची डोळा" सांता क्लॉसला पहायचं होतं, त्याला स्पर्ष करायचा होता, त्याला अनुभवायचं होतं, तो देत असलेल्या अपूर्व आनंदात सहभागी व्हायचं होतं... आणि हो, तो मोकळ्या हातानं वाटत असलेल्या भेटवस्तूंवर ताबा सुद्धा मिळवायचा होता. या असीम आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या इच्छेनं मी दुबईच्या एका प्रसिद्ध सुपर-मार्केटनं, मोहेबी सेण्टरनं, दिलेल्या जाहिरातीला उत्सुकतेनं प्रतिसाद दिला होता. त्यांना नाताळच्या काही दिवस आधीपासून दुकानात बसायला सांता क्लॉस हवा होता. आणि मला हा अनुभव (व त्याबरोबर मिळणारा आर्थिक मोबदला देखील !) हवा होता.
माझ्याकडॆ तयार असलेला लाल पोषाख मला आयता उपयोगी पडला. मी सेण्टरवाल्यांना फक्त काळे बूट द्यायला सांगितलं. मागे अशाच एका प्रसंगी एका लहान मुलीनं मला विचारलं होतं, "सांता क्लॉसचे काळे गमबूट तुझ्याकडे का नाहीत?" या अचानक प्रश्नाने मी थोडावेळ गोंधळून गेलो होतो. पण लगेच मी प्रसंगावधान बाळगून तिला उत्तर दिलं होतं, "दुबईच्या वाळवंटात सांता क्लॉसला त्यांची मुळी गरजच नाही, म्हणून." त्या थोड्या अवधीत मुलांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांनी मला जणू टाचेवरच ठेवलं होतं.
"सांता, तू इतका बारीक का दिसतोयस? तुला तुझी आई नीट खायला देत नाही का?" एका मुलीनं विचारलं.
"तुझी दाढी इतकी पांढरीशुभ्र कशी?" अजून एकानं विचारलं.
"तू खराखुरा माणूस नाहीस, खरं ना?", एक अतिचौकस मुलगा म्हणाला.
आणखी एका (आगाऊ) मुलाला माझा मुखवटा काढून माझा खरा चेहरा पहायचा होता. या मुखवट्यामागे खरा चेहरा कुणाचा होता, कुणालाच माहीत नव्हतं. जणूं सारं विश्व अगदी जवळून तसंच खूप अंतरावरून पाहिल्यासारखं होतं.
"बाळा, तू पांचगणीहून केव्हा आलास?" मी हलकेच एका मुलाला कौतुकाने विचारलं, कारण मला माहीत होतं की तो मुलगा पांचगणीच्या एका शाळेत शिकत होता.
"सांता, पण तुला कसं कळलं मी पांचगणीला शिकतोय तें?" त्याने डोळे विस्फारून मला मोठ्या आश्चर्याने विचारलं.
"सांताला सगळं काही माहीत असतं," मी उत्तरलो.
"सगळं काही?", तो पुन्हा म्हणाला. "तू माझ्या बाबांना सुद्धा ओळखतोस? ते देखील माझ्याच शाळेत होते, लहान असतांना."
"माहीत आहे मला. मी त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा ते तुझ्यापेक्षाहि लहान होते."
त्याने माझ्या सफ़ेद दाढीकडे पाहिलं आणि आपल्या शंकेचं निरसन झाल्याच्या समाधानाने मान डोलावली.
काही मुलं एकटी आली तर काही घोळक्यात आली. काहींना फक्त सांताला पाहायचं होतं, काहींना त्याच्याकडे हस्तांदोलन करायचं होतं, काहींना सांताबरोबर फोटो काढून घ्यायचे होते. बरेच जण फुकट मिळणार्‍या भेटवस्तू घेण्यासाठी परत येत होते, तर काही आईबाप आधी मिळालेल्या वस्तू कुठेतरी लपवून आपल्या मुलांना भेटवस्तूंसाठी पुढे ढकलत होते. काहीजण सांताला आपल्या घरी निमंत्रित करण्यासाठी येत होते.
"सांता, तू माझ्या घरी येशील?," एका मुलाने माझा लाल झगा ओढीत हळूच विचारलं.
"नक्की येईन, माझ्या लाडक्या बाळा."
"तू माझ्या घरी ईदसाठी येशील?" एकीने विचारलं.
"अन माझ्या घरी दिवाळीच्या वेळी?", दुसर्‍या एका गोड मुलाने प्रश्न केला.
"त्यांच्या घरी ईद व दिवाळीला जाणार असशील तर माझ्या वाढदिवसाला सुद्धा येशील?" दुसर्‍याने विचारलं.
अन सांता त्याचा गालगुच्चा घेत म्हणाला, "वाढदिवसालाच कशाला, तुझ्या लग्नाला सुद्धा येईन बरं."
हे ऐकून सगळेजण जोरजोराने हंसायला लागले. या सर्व प्रश्नोत्तरांनी त्यांचा सांता क्लॉसच्या अस्तित्वावर असलेला विश्वास दिसून येत होता. या वेळी त्यांच्या मनात सांता क्लॉस केवळ क्रिस्ती धर्माचं प्रतीक राहिलं नव्हतं. काळाचं, वेळेचं किंवा धर्माचं कसलंच बंधन सांताला नव्हतं. तो होता शांति, शुभेच्छा व आनंदाचा अग्रदूत -- मग दिवाळी असो, ईद असो, पटेटी असो की नाताळ. कारण एक निष्पाप बालकाला मानवेतेशिवाय दुसर्‍या कुठल्याहि धर्माचं बंधन नसतं. मोठ्यांच्या दुनियेत खूप मोठ्या प्रमाणात असतात ताण, दाह, कलह, द्वेष, मत्सर. अशा परिस्थितीत एकच सत्य असतं. प्रत्येक मूल स्वर्गातील ईश्वराचा हा संदेश घेवून पृथ्वीवर जन्माला येतं की तो, म्हणजे परमेश्वर, मानवाच्या बाबतीत अजून हताश झालेला नाही. कधीतरी हे कलह, ही युद्धं नक्की थांबतील. आणि प्रत्येक नाताळाला सांता क्लॉस याच महत्वपूर्ण संदेशाची पूर्ति करण्यासाठी येतो.


लक्ष्मीनारायण हटंगडी
वसई (पूर्व)